आम्हीच खर धर्मश्रद्ध
(नरेंद्र दाभोलकर)
धर्मविचाराचा बुद्धीने शोध घेण्याचा आस्थेने प्रयत्न जेथे झाला, त्या महाराष्ट्रातील आजचे चित्र उफराटे आहे. धर्माची कर्मकांडे व त्याद्वारे धर्माचा अभिमान, अस्मिता, अहंकार बलवान करण्याचा प्रयत्न सध्या सर्वच धर्मांत चालू आहे. धर्मभावनांचे व्यापारीकरण, बाजारीकरण, विकृतीकरण आणि राजकारण चालू आहे...
कथित धर्मरूढी, प्रथा, परंपरा, पूजा, व्रतवैकल्ये, सणवार, कर्मकांडे यांना समाजजीवनात जणू उधाण आल्याचे दिसते आहे. याचा एक अर्थ यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करणारे जे आहेत त्यांना यश लाभते आहे. दुसरा अर्थ आपले कल्याण होईल, असे मानून भ्रमचित्त समाज चुकीच्या मार्गाने चालला आहे. याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे या वातावरणाला प्रशासकीय कठोरपणाचे उत्तर पुरे होईल, असे मानले जाते आहे. परिस्थितीच्या गांभीर्याची जाण येण्यासाठी एक उदाहरण पुरेसे आहे. गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्रातील कोणत्याही शहरातच नव्हे, तर खेड्यातही लोकवर्गणीतून जमणारे पैसे कशासाठी खर्च झाले ते तपासून पाहा. धार्मिक उत्सव, हरिनाम सप्ताह, जुन्या देवळांचा जीर्णोद्धार, नव्या मंदिराची उभारणी यांसाठी उधळला जाणारा पैसा हा शिक्षण, आरोग्य, उद्योजकता विकास यापेक्षा कितीतरी अधिक आहे.
जीवनात धर्माला वैशिष्ट्यपूर्ण स्थान आणि दीर्घ इतिहास आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा उदय आणि विकास ही त्यामानाने गेल्या अवघ्या चारशे वर्षांतील गोष्ट आहे. संघटित धर्माचा उदय त्याआधी कित्येक शतके झाला. विज्ञानाच्या उदयाआधीच त्याला विशालस्वरूप आणि विलक्षण सामर्थ्य प्राप्त झाले. जीवनाचे सर्व आयाम धर्मकल्पनेच्या प्रभुत्वाने व्यापले गेले. सर्व जीवनावर धर्माची अप्रतिहत सत्ता फार दीर्घकाळ चालली.
आपण लहानपणी भाषा शिकतो. धर्म जन्मतःच मिळतो. मायबोलीप्रमाणे व मायधर्म संस्काराने आपण स्वीकारतो. धर्मविचाराचा प्रश्नच उपस्थित केला जात नाही. व्यक्ती प्रौढ, विवेकी झाल्यावर तिने धर्मविचार करावा, अशी अपेक्षा असते. बहुतेकांच्या जीवनात हे घडत नाही. लोकहितवादी, महात्मा फुले, न्या. रानडे, पंडिता रमाबाई, डॉ. केतकर, गाडगेबाबा, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्म या विषयावर मनन, चिंतन व कृती केली. धर्मविचाराचा बुद्धीने शोध घेण्याचा आस्थेने प्रयत्न केला. त्याच महाराष्ट्रातील आजचे चित्र उफराटे आहे. धर्माची कर्मकांडे व त्याद्वारे धर्माचा अभिमान, अस्मिता, अहंकार बलवान करण्याचा प्रयत्न सध्या सर्वच धर्मांत चालू आहे. धर्मविचार व धर्माभिमान या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. धर्माभिमानी माणूस धर्मविचार करू शकेल; पण करेलच असे नाही. धर्माभिमानाला जास्तीत जास्त तीव्रता व धर्मविचाराला ओहोटी असे महाराष्ट्रातले आजचे स्वरूप आहे. संतांची भक्ती व शिकवण वेगळ्या प्रकारची आहे. माणसाने आपले कर्तव्यकर्म करावे; पण ते ईश्वराची आज्ञा म्हणून ईश्वरार्पण बुद्धीने करावे, अंतःकरणाच्या शुद्धीला व ईश्वरविषयक तळमळीला प्राधान्य द्यावे. माणुसकीने व करुणेने वागावे, हे संतांनी सांगितले आणि आचरलेही, परंतु हा मार्ग मराठी मनाला व्यापून टाकू शकलेला दिसत नाही. कर्मकांडाचे आणि उत्सवी धर्माचे साम्राज्य अबाधित राहिलेच, पण ते वर्धिष्णूही बनते आहे.
आपल्या देशातील आजचे वातावरण धर्मनिरपेक्षतेचे नाही. सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली धर्म शरणागतीचे आहे. लोकांच्या धार्मिक भावनांना पद्धतशीरपणे उधाण आणण्याचे काम धर्म, त्याचे पंथ, उपपंथ, त्याचे विविध धार्मिक सोहळे आपापल्या अनुयायांमार्फत करत आहेत. दुसरा धर्म, पंथ, जात, संघटित व आक्रमक होत आहे. यामुळे आपण त्यांच्यापेक्षा अधिक संघटित व आक्रमक व्हावयास हवे, असे समर्थन धर्माच्या सार्वजनिक वापरासाठी खुबीदारपणे दिले जाते. गोकुळाष्टमी, गणपती, नवरात्र, दिवाळी, दत्तजयंती, गणेशजयंती, महाशिवरात्र, गुढी पाडवा, रामनवमी, हनुमान जयंती अशा सर्व बाबी सार्वजनिक व्हाव्यात आणि त्यात इथले जनमानस गुंतून (की गुंगीत) राहावे, यासाठी पद्धतशीरपणे प्रयत्न होत आहेत. त्याशिवाय या धार्मिक उत्सवांच्या वाट्याला एवढी भरभराट आलीच नसती. धर्मभावनांचे व्यापारीकरण, बाजारीकरण, विकृतीकरण आणि राजकारण चालू आहे. येथील माणसाची मानसिकता अंगभूतपणे धार्मिक आहे. ही धार्मिकता नैतिकतेकडे वळविण्याचा प्रयत्न संत व समाजसुधारकांनी केला. ती धार्मिकता धर्मांध बनवण्याचा पद्धतशीर प्रयत्न चालू आहे. माणसाची धार्मिकता हा जणू कच्चा माल झाला आहे. अशा परिस्थितीत खरे प्रश्न, खरी मूल्ये याचे आत्मभान न हरवल्यासच नवल.
आत्मभाननिर्मितीचा दावा करणाऱ्या धर्माच्या नावाने हे घडावे हे भयचकित करणारे आहे. ही धार्मिकता विवेकही जागृत करत नाही आणि माणुसकीही जागवत नाही. ही प्रक्रिया याच तेजीने चालू राहिली तर धार्मिक राष्ट्रवादाचे रूप ती धारण करेल. राष्ट्राचे संविधान धर्मनिरपेक्ष व समाज धार्मिक राष्ट्रवादी अशा पेचात देश सापडेल. गुजरातमध्ये याची झलक आपण पाहिलीच आहे. याबरोबरच समाजातील अगतिकता, अस्थिरता, चंगळवाद, काळ्या पैशाचा प्रभाव, राजकीय सामाजिक मान्यतेसाठी धर्म सवंगपणे वापरणे हे सर्वही खरे आहे. या सर्वांतून अत्यंत चुकीच्या पद्धतीने धर्मभावना प्रभावित केली जात आहे.
न्यायालयाचे निर्णय व त्याची प्रशासकीय खंबीर अंमलबजावणी, यामुळे या परिस्थितीला फक्त मर्यादितच आळा बसू शकतो. धर्मनिरपेक्षतेचा संविधानातील आशय जनमानसात रुजविणे हा त्यावरचा अधिक मूलगामी उपाय आहे. त्यासाठी एका व्यापक कृतिशील जनसंवादाची व नागरी खंबीर कृतिशीलतेची गरज आहे. विचाराचे व आचाराचे पाथेय न्या. रानडे, म. फुले, म. गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उक्ती व कृतीत भरपूर उपलब्ध आहे. या सर्वांचे धर्मकारण म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून, विवेककारण होते. समाजविमुख धर्म त्यांनी समाजसन्मुख केला. विधायक धार्मिकतेचे हे चिंतन समाजकारणात आणि शिक्षण क्षेत्रात संघटितपणे क्रियाशील होणे, हीच आजची गरज आहे.
- नरेंद्र दाभोलकर
(लेखक महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष आहेत.)
Comments
हम्म्म...
नरेंद्र दाभोलकरांनी प्रशासकीय चौकटीत राहून लिहिलेला हा लेख चांगला आहे. त्यात त्यांनी काय व्हायला नको व काय व्हायला पहिजे याचे सुस्पष्ट प्रतिपादन केले आहे. परंतू ते कसे होईल यावर विस्तृत प्रमाणात भाष्य केले नाही.
या प्रश्नाच्या मूळ गाभ्याकडे बघायचे झाल्यास ते आपल्या घटनेत सापडते. धर्म-जातीच्या आरक्षणांच्या जागी बौद्धिक व आर्थिक निकषांवर आरक्षणे देऊन प्रगतीकडे नेण्याऐवजी आजचे राज्यकर्ते समाजाला फाटाफुटीच्या व विघटनाच्या मार्गावर नेत आहेत. समान नागरी कायदा लागू करुन धर्म-जातीच्या आरक्षणांचा बिमोड केल्यास जाती-धर्मांच्या अधारावर फोफावणार्या संघटना/पक्ष संपतील व समाज या दुष्टचक्रातून बाहेर पडेल असे मनोमन वाटते. दाभोलकरांनी ज्या समाजधुरिनांचा उल्लेख केलेला आहे त्या सर्वांनी आजच्या घडीला हेच केले असते असे वाटते.
आपला,
(समानतावादी) भास्कर
आहे तितुके जतन करावे, आणिक मिळवावे,
महाराष्ट्र राज्यची करावे जिकडे तिकडे ॥
प्रशासकीय चौकट
मान्य आहे. तिथेच खरी गोची होते. ज्ञानाचा उजेड आल्यावर अज्ञानाचा पर्यायाने अंधश्रद्धांचा विनाश होईल. अशी भ्रामक समजूत माझी देखील सुरवातीला होती. पण ही ऍकडमी क आहे, ऍक्टीव्हीस्ट नव्हे. ज्या अंधश्रद्धा अज्ञानातून निर्माण झालेल्या आहेत त्या ज्ञानशिक्षणातून दूर होतील ही कदाचित ; पण ज्या अगतिकेतून निर्माण झाल्या आहेत त्याचे काय? खोटे बोललेले देवाला आवडत नाही हे श्रद्धाळू लोकांना मान्य असते. पण कोर्टाच्या साक्षीत महत्वाचा साक्षीदाराने सत्य बोलल्याने त्याची जिवित वा वित्ताहानी होणार आहे हे त्याला माहिते असते. त्यामुळे तो खोटे बोलतो. त्याला माहित आहे देवावर नितांत श्रद्धा असली तरी इथे देव रक्षण करेल याची त्याला खात्री नसते.
प्रकाश घाटपांडे
हं
थोडफार तथ्य आहे. थोडफार हे असेच होणार (अटळ) आहे हे मान्य करावेच लागेल. बुद्धीने चालणारे लोक व भावनेने चालणारे लोक ह्यांचे गुणोत्तर काय आहे ते अंनिसला माहीती असेलच. हे नुसते भारतात नाहीच जगभर असेच आहे. पण जगातील इतर देशांनी सरकार, प्रशासन, सामाजीक जबाबदारी ह्या मार्गांनी त्यांच्या त्यांच्या समाजात बर्यापैकी सुधारणा केली आहे, जी आपल्याकडे तितकी नाही त्यामूळे हे "भव्य" सोहळे जास्त डोळ्यात खुपतात.
नुस्ते विचार कितीही उत्तम उदात्त असले तरी माणूस आचार जास्त आवडीने करतो. लोकांना सणसमारंभ आवडतात ते सहजासह़जी कमी होणार् नाहीत. अगदी हे सोहळे उद्या काही कारणाने जबरदस्ती बंद करवले तर आहे ते थोडेफार चांगले काम संपून, चंगळवाद जोमाने फोफावेल. कारण जो पैसा ह्या "भव्य"कामावर खर्च होतोय तो स्वस्त बसणार नाही, खर्चाला बाहेर पडेलच.
सणसमारभांच असे आहे की गेल्या १०-१५ वर्षात लोकांच्या हातात जास्त पैसा खूळखूळायला लागला आहे. कित्येक शतकांच्या विचारांचा पगडा जसे आता पैसे आले आहेत, आपले चांगले झाले आहे व असेच होत रहावे ह्या भावनेतून तर व्रतवैकल्य, दान धर्म, सोहळे करावेत ही इच्छा होणारच. सर्व पैसे स्वःतावर खर्च करण्यापेक्षा थोडेफार चांगल्या कामावर करणे लोकांना आवडते. आपल्या आळीसाठी, गावासाठी. अंनिस ला काही वाटो पण गावचा उरूस, ग्रामदैवत इ. गोष्टी इतक्यात नामशेष होणार् नाहीत. त्यातल्या त्यात हे सोहळे धर्माभिमुखच्या ऐवजी समाजाभिमुख होणे अपेक्षीत व ते तसे होत आहे. सार्वजनीक गणेशोत्सवात समाजोपयोगी कामे जास्त होताना दिसत आहेत. बराच पैसा आहे तिथे भ्रष्टाचार होतोच आहे ति पण भारतीयांची परंपराच आहे म्हणा. :-)
बर्याच लोकांची आता राजकारणात जायची इच्छा आहे तर हे सोहळे "नेटवर्कींग" चे उत्तम काम करतात. त्यामुळे सोहळे "सफल" करायचे व दुसर्यापेक्षा आपला सोहळा अजून मोठा करायची स्पर्धाच असते म्हणा. दही हंडी उत्तम उदाहरण, इतका पैसा दहीहंडीत कधीच नव्हता.
आता त्यातल्या त्यात सुशिक्षित लोकांनी स्वतः गरजू लोक, संस्था, प्राणीजात, पर्यावरण इ. महत्वाच्या सामाजिक, जागतीक समस्यांकडे आपले लक्ष, पैसा वळवला (धार्मीक बाबींपेक्षा) व हे स्वतःच्या मुलांसमोर करून एक नित्य आचरणाने आदर्श घालुन दिला तरच काही वर्षांनी पुढच्या पिढीत विवेकवाद पुढे येईल. अन्यथा चंगळवाद आपले स्थान अजुनच बळकट करेल.
कुठे आहे?
गोकुळाष्टमी, गणपती, नवरात्र, दिवाळी, दत्तजयंती, गणेशजयंती, महाशिवरात्र, गुढी पाडवा, रामनवमी, हनुमान जयंती अशा सर्व बाबी सार्वजनिक व्हाव्यात आणि त्यात इथले जनमानस गुंतून (की गुंगीत) राहावे, यासाठी पद्धतशीरपणे प्रयत्न होत आहेत. त्याशिवाय या धार्मिक उत्सवांच्या वाट्याला एवढी भरभराट आलीच नसती.
पण इतक्यातच तर असे संवाद घडले आहेत, की हल्ली सणांचे काही राहीले नाही... दिवाळी तलाल्यासारखीही वाटत नाही...?
राखी शोधायला जावे तर ती विकणारे दुकान सापडत नाही... ?
मला वाटते की इतरही गोष्टीत जनमानस गुंतते आहे त्याचाही विचार केला तर बरे.
या गोष्टी थोड्या फार प्रमाणात घडत आहेत म्हणून नव्या पीढीला माहीत तरी आहेत... त्याही घडेनाशा झाल्यावर काय करायचे?
शिक्षणावर व इतर बाबींवर खर्च जरूर व्हावा. पण मला वाटते के हे सार्वजनीक स्वरूप राहीलेच पाहीजे!
आपला
गुंडोपंत
लेख आवडला
दाभोलकरांचा लेख आवडला. अंनिसशी संबंध न जोडता वाचला त्यामुळे अधिक रुचला.
उत्सवीपणाला माझी हरकत नाही, पण कडवेपणाचा पुरस्कार व प्रचार करण्याला विरोध करता आला व आळा घालता आला तर बरे होईल.
- दिगम्भा
असेच
दाभोळकरांचा लेख आवडला. धर्माच्या नावाखाली चाललेले समाजाचे व्यापारीकरण व वाढता कंझ्युमरिझमही त्यांनी योग्य शब्दात विस्ताराने मांडायला हवा होता असे वाटते.
(विचारमग्न) आजानुकर्ण.
आम्हाला येथे भेट द्या.
पटणारे आणि न पटणारे
दाभोळकरांचा हा लेख काही बाबतीत न पटणारा तर काही बाबतीत पटणारा आहे...
जीवनात धर्माला वैशिष्ट्यपूर्ण स्थान आणि दीर्घ इतिहास आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा उदय आणि विकास ही त्यामानाने गेल्या अवघ्या चारशे वर्षांतील गोष्ट आहे. संघटित धर्माचा उदय त्याआधी कित्येक शतके झाला. विज्ञानाच्या उदयाआधीच त्याला विशालस्वरूप आणि विलक्षण सामर्थ्य प्राप्त झाले. जीवनाचे सर्व आयाम धर्मकल्पनेच्या प्रभुत्वाने व्यापले गेले. सर्व जीवनावर धर्माची अप्रतिहत सत्ता फार दीर्घकाळ चालली.
हा संपूर्ण परिच्छेद हा पाश्चात्य जगाच्या इतिहासाशी संबधीत आहे पण कोरडे ओढताना मात्र हिंदू धर्मावर आणि त्यातील विशेषकरून सणावारांवर ओढले आहेत. त्यातील अंधश्रद्धा आणि वाईट चालीरीतींवर ओढले असते तरी एकवेळ समजले असते पण गणपती, गोकुळाष्टमी, दिवाळी किंवा जे काही सण साजरे केले जात असतील त्यावर दाभोळकरांचा आक्षेप काय ते समजले नाही. आणि मग तसे इतर धर्मीयांबद्दल् बोलणार नाही. भारतातील उंच देवळे/वास्तू, अशोक स्तंभ, गणितीज्ञान, शुन्याची संकल्पना, भौतीक शास्त्र हे काही गेल्या चारशे वर्षात पाश्चात्य जगतात जाग आल्यावर तयार झालेले नव्हते. (आणि तसे काय आर्कीमिडीझ पण काही गेल्या चारशे वर्षताला नाहीच...). संघटीत धर्म हा प्रकार हिंदू धर्मात कधीच नव्हता आणि अजूनही नाही. सावरकरांनी कॉईन केलेला आणि ज्याचा कम्यूनिस्ट अथवा सूडोसेक्यूलॅरिस्ट आता शिवीसारखा वापर करतात तो "हिंदूत्व" शब्द हा राष्ट्र आणि तत्वज्ञानाशी निगडीत आहे हे वेगेळे सांगायला नको. संघटीत धर्माने ख्रिश्चन आणि मुस्लीम धर्मीयांमधे आततायी वृत्ती तयार केल्या त्यामुळे आपण आज सर्व काही भोगत आहे (त्या धर्मांमुळे नाही तर त्यातील दाभोळकरांनी सांगीतलेल्या संघटीत वृत्तींमुळे).
धर्मभावनांचे व्यापारीकरण, बाजारीकरण, विकृतीकरण आणि राजकारण चालू आहे. येथील माणसाची मानसिकता अंगभूतपणे धार्मिक आहे. ही धार्मिकता नैतिकतेकडे वळविण्याचा प्रयत्न संत व समाजसुधारकांनी केला. ती धार्मिकता धर्मांध बनवण्याचा पद्धतशीर प्रयत्न चालू आहे. माणसाची धार्मिकता हा जणू कच्चा माल झाला आहे. अशा परिस्थितीत खरे प्रश्न, खरी मूल्ये याचे आत्मभान न हरवल्यासच नवल.
हे अर्थातच मान्य आहे. पण त्यावर कोरडे ओढण्या ऐवजी दाभोळकर सामान्य माणसावर कोरडे ओढत आहेत असे वाटले..
विचाराचे व आचाराचे पाथेय न्या. रानडे, म. फुले, म. गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उक्ती व कृतीत भरपूर उपलब्ध आहे. या सर्वांचे धर्मकारण म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून, विवेककारण होते. समाजविमुख धर्म त्यांनी समाजसन्मुख केला.
हे मान्यच आहे. सर्व नेते आदरणीय आहेत पण त्यांच्या अनुयायांचे काय झाले? घोडे कुठे पेंड खात बसले हा प्रश्न दाभोळकरांनी स्वतःस विचारून उत्तर शोधायचा प्रयत्न करावा असे वाटते. उक्ती आणि कृती बद्दल त्यामानाने ज्यांच्या बद्दल भावनीक वाद निर्माण होणार नाही अशा न्या. रानड्यांचा किस्सा पहा: प्रार्थना समाज तयार केला लोकशिक्षणाचा मनापासून प्रयत्न केला आणि करत राहीले (अर्थात परक्यांच्या सरकारी नोकरीत राहून). विधवा विवाह व्हायला हवेत म्हणून भाषणे दिली. लोकांमधे एक विचार रुजवायचा प्रयत्न केला. पण स्वतःची पत्नी गेल्यावर वडलांच्या इच्छेच्या नावाखाली का होईना पण १२ वर्षाच्या कुमारीकेशी दुसरा विवाह केला. गोपाळराव जोशांनी घडवून आणलेल्या चहापान समारंभात जेंव्हा पाद्र्याच्या हातून चहा घेतला म्हणून बहीष्कृत झाले तर माफीपत्र दिले. (हाच प्रकार टिळकांबद्दल पण त्याच वेळेस झाला, पण त्यांनी कर्मठ ब्राम्हणांना खेळवत ठेवून, वाद घालून त्यांची माफी मात्र मागीतली नाही. स्वतःच्या मुलाची मुंज लावायला भटजी मिळाला नाही तर स्वतः लावण्याच्या तयारीत ते राहीले...). अर्थात इतके सारे बोलले म्हणून माझ्या लेखी रानड्यांचे श्रेष्ठत्व कमी नाही आहे. केवळ दाभोळकर "उक्ती आणि कृती" असे बोलले म्हणून हे लिहावे लागले...
विधायक धार्मिकतेचे हे चिंतन समाजकारणात आणि शिक्षण क्षेत्रात संघटितपणे क्रियाशील होणे, हीच आजची गरज आहे.
ही आजचीच काय, कालातीत गरज आहे. त्यासाठी दाभोळकरांसारख्या बुद्धीवादी माणसांनी डोळसपद्धतीने ज्या हिंदू धर्मीयांना ते नावे ठेवत आहेत त्या हिंदू धर्माचे तत्वज्ञान अभ्यासून त्या अनुषंगाने लोकशि़षण केले पाहीजे. ती तपस्या ज्ञानेश्वरांपासून तुकारामापर्यंत आणि अनेक संतांनी आणि धर्मसुधारकांनी विशेष करून महाराष्ट्रात केली आणि स्वत:च्या तत्वज्ञाना बद्दल लोकसंभ्रम तयार करण्या ऐवजी खर्या अर्थी लोकशिक्षण केले आणि आज त्याची गरज आहे असे वाटते.
पटणारे - प्रतिक्रिया
न्या. नरेंद्र चपळगावकर ज्यांचे कायदा आणि माणुस हे रविवार सकाळमधील् लेखमालेचे पुस्तकात रुपांतर झाले, त्यांना न्या. रानडे पुरस्कार मिळाला त्यावेळी हा उल्लेख सविस्तर झाला होता. नेमका कुणी केला हे मात्र आठवत नाही. आयएलएस महाविदयालयात हा समारंभास मी उपस्थित होतो.
असहमत. तो रोख राजकीय पक्षांवर आहे. यासंदर्भातला एक खाजगी किस्सा. एका निमशहरात अशा उत्सवांच्या खर्चाबद्दल त्यांनी चिकित्सा केली असता हा सगळा खर्च तेथील एकच राजकीय संबंधीत गुत्तेवाला करत होता.
पुर्णतः सहमत. समजा एखाद्याला हिंदुधर्मात परत यायचे आहे तर त्याला जात कुठली द्यायची? अंतुले हे धर्मांतरीत आहेत असे त्यांच्या वंशावळीतुन सिद्ध करता येते असे एक पत्रकार म्हणाला. त्यावेळी ते म्हणाले असेल ही खरे ! मी हिंदु आसलो काय किंवा मुस्लीम अस्लो काय माझ्या कैक पिढ्या इथल्याच मातीतल्या. महमद फजल हे जेव्हा इथले राज्यपाल होते त्यावेळी ते म्हणाले इथेले ८० ते ९० टक्के मुस्लीम लोक इथेच धर्मांतरीत झाले आहेत. ते काही परकीय नव्हे. आजही देशपांडे, कुलकर्णी. देवर्षी , देशमुख, इनामदार. मोडक् ... मुस्लिम आहेतच कि! उलट ते अधिक कट्टर झाले असतात कारण त्यांना परतीचे दरवाजे बंद असतात. मग त्याच ठिकाणी आपले अस्तित्व टिकवण्याच्या लढाईत ते कट्टर होणे क्रमप्राप्तच असते.
प्रकाश घाटपांडे
उत्स्व गैरवापर, ध्र्मांतर वगैरे...
सर्व प्रथम, आपण म्हणता तसे, "तो रोख राजकीय पक्षांवर आहे. यासंदर्भातला एक खाजगी किस्सा. एका निमशहरात अशा उत्सवांच्या खर्चाबद्दल त्यांनी चिकित्सा केली असता हा सगळा खर्च तेथील एकच राजकीय संबंधीत गुत्तेवाला करत होता.," असेल तर ते मलाही मान्य आहे. राजकीय पक्षच काय पण गावगुंडांपासून ते मोठ्या तस्करांपर्यंत सर्वत्र हा प्रकार चालू आहे आणि तो नवीन नाही. माटूंगा स्टेशनच्या बाहेर (पूर्वेस/मध्यरेल्वेच्या बाजूस) पूर्वी वरदराजनचा गणपती हा अगदी स्टेशनच्या बाहेर बसवायचे. यात धर्म, श्रद्धा / अंधश्रद्धा वगैरेचा प्रश्न नव्हता. पण (मला आठवते त्या प्रमाणे) इन्स्पेक्टर वाय सी पवार यांना काही करून हा "धंदा" बंद करायचा होता. सुरवातीस कोर्ट कचेर्याकरून उपयोग झाला नाही, कदाचीत "धार्मीक भावना" मधे आल्या असतील. पण नंतरच्या वर्षी त्यांनी जेथे गणपती बसवला जायचा तेथेच पोलीस चौकी तयार केली, मग कोर्टाला पण म्हणावे लागले की "भावने पेक्षा कर्तव्य श्रेष्ठ!". थोडक्यात पवारांनी धर्माला, श्रद्धेला नावे ठेवली नाहीत तर जे मूळ होते त्या गुंडगिरीवर घाव घालायचा मर्यादीत का होईना पण यशस्वी प्रयत्न केला. दाभोळकर त्याबद्दल बोलण्या ऐवजी जास्त धर्म आणि श्रद्धेबद्दल बोलतात असे कदाचीत त्यांच्या पुर्वेतिहासामुळे वाटले असावे पण गुंडांवर हल्ला आणि सरकारकडे तशा गोष्टि बंद होण्याची मागणि करताना अथवा जनतेस अशा बाबतीत उघडडोळ्याने वागून श्रद्धा ठेवताना ते दिसत नाहित.
समजा एखाद्याला हिंदुधर्मात परत यायचे आहे तर त्याला जात कुठली द्यायची?
प्रश्न चांगला आणि विचार करायला लावणारा आहे. अनेक धर्मांतरे होत असतात. त्यांच्या जाती कशा ठरतात माहीत नाही, पण माहीती काढायचा "उत्सुकतेपोटी" प्रयत्न करीन. एक गोष्ट वाटते की जात हा हिंदू धर्मापेक्षा संस्कॄतीचा (विकृत) भाग असावा. जेंव्हा तयार झाला तेंव्हा आणि त्याचा नंतरचा वापर हा पण कदाचीत वेगळा असावा. पण हा विषय वेगळ्या चर्चेचा ठरेल...डॉ. डेव्हीड फ्रॉलींसारखा माणूस हा धर्मांतर करून हिंदू झाला. त्यांचे नाव "वामदेव शास्त्री" आहे. मला नाही वाटत त्यांना कुठल्याही जातीत समाविष्ट केले असेल.
शिवाय असा विचार करा, जर जात हा धर्माचा भाग असती तर ती संपूर्ण हिंदू धर्मात सारखी हवी. पण राज्यागणीक जाती बदलताना दिसतात. हिंदू धर्म हा एका पुस्त��ात बांधलेला नाही जे काही आचरटपणे काळाच्या ओघात आले ते घालवून टाकले पाहीजेत इतकेच वाटते. बाकी या संदर्भात एकदा वाचले होते की: "everyone is born Hindu, until s/he goes through baptism (or similar rituals in Islam or Judaism)". वाक्य थोडे अतीच आहे, पण मतितार्थ इतकाच की जो पर्यंत एखादी व्यक्ती इश्वराच्या/धर्माच्या चर्चेत "ऑल्सो" म्हणणारी असते तो पर्यंत ती हिंदू असते पण एकदा का एखादाच प्रकार "ओन्ली" झाला की ती केवळ त्या धर्मापुरती बांधील होते.
अवांतर अनुभवः माझा एक मोठ्या भावासारखा ख्रिश्चन मित्र आहे. (घरातल्यासारखेच ते सर्व कुटूंब आहे). जूनी गोष्ट आहे. एका गावातील प्रसिद्ध (हनुमान जयंती) मारूती उत्सवात तो मित्रांबरोबर गेला होता. जेवायला बसल्यावर तेथील तिथल्या रूढीप्रमाणे वाढपी खात्री करून घेत होता की पंगतीत बसलेले सर्वजण कोण आहेत. याच्या जवळ आल्यावर विचारले की तुझे नाव काय? याने ताबडतोब उत्तर दिले "बंड्या जोशी"! वाढपी पुढ्याचाला विचारयला पुढे गेला! तेव्ह्ढ्यापुरते धर्मांतर, तेव्ह्ढ्यापुरती जात!
हिंदू = मानव असे मत ग्राह्य पण व्यवहार्य नव्हे
विकास यांचा हिंदूधर्मविषयक विचार विश्वबंधुत्वाकडे जाणारा आहे, यात त्यांच्या मनाचा चांगुलपणा आहे.
पण "समाजातली वागणूक" या चर्चेत हिंदूधर्माबद्दल वैयक्तिक संकल्पना क्षणभर बाजूला ठेवाव्यात. उदाहरणार्थ :
ही गोष्ट त्यांच्या (आणि अनेक उदारमतवादी लोकांच्या) मनातील हिंदूधर्माबद्दल पूर्णपणे सत्य आहे. पण खूप-लोक-ज्याला-हिंदूधर्म-समजून-वागतात त्या कल्पनेचे अनेक सामाजिक परिणाम होतात. खूप-लोक-ज्याला-हिंदूधर्म-समजून-वागतात ही कल्पना त्यांच्या उदार कल्पनेपेक्षा वेगळी असली तरी चर्चा करण्यालायक जरूर आहे. त्यामुळे उदारमतवादी हिंदूंनी या विषयाकडे दुर्लक्ष करू नये.
त्यांना "खूप-लोक-ज्याला-हिंदूधर्म-समजून-वागतात" साठी दुसरा सुटसुटीत सोयीस्कर शब्द वापरावासा वाटला तर ठीक. माझे बहुतेक ख्रिस्ती मित्र स्वतः मानतो तो निराळा, आणि खूप-लोक-ज्याला-ख्रिस्ती-धर्म-समजून-वागतात तो खरा नव्हे, असे म्हणतात. चर्चेत अशा परिस्थितीत, हाताशी असलेल्या महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नांना बाजूला ठेवले जाते. आणि वैयक्तिक महत्त्वाच्या एका उत्तम पण वेगळ्या चर्चेमध्ये मन रमते.