जपून! ते लक्ष ठेवून आहेत - २

जपून! ते लक्ष ठेवून आहेत - १ या मागील भागात ग्रोटेस्क, गरगॉयल, कायमेरा या अनेक शिल्पांची ओळख करून घेतली. आता पुढे ....


गरगॉयल्सची शिल्पकला मध्ययुगात प्रसिद्ध झाली असली तरी प्राचीन काळीही अशाप्रकारच्या शिल्पांचा आणि चित्रांचा वापर होत असे हे जाणवते. पुरातन इजिप्शियन स्थापत्त्यशास्त्रातील स्फिन्क्स, ग्रीक मडक्यांवर आढळणारे अर्धपशूमानव या सारख्या शिल्प आणि चित्रांना सुमारे ३-४ हजार वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. इजिप्शियन स्फिन्क्सला ग्रीकांनी आपली पौराणिक कथा जोडून भयनिर्मितीचा प्रयत्न केलेला आहे असे सांगितले जाते. एक आद्य गरगॉयल म्हणून याकडे पाहता यावे. याचप्रमाणे जुन्या काळातील उत्कृष्ट गरगॉयल कोणते यावर अनेक तज्ज्ञांचे एकमत होते ते म्हणजे अथीनाच्या ढालीवर असणारे मेड्युसाचे शीर. ग्रीक पुराणांत मेड्युसा या राक्षसीला गॉर्गॉन असे म्हटले गेले आहे.

चित्र ४: पार्थेनॉनची प्रतिकृती असलेल्या नॅशविलमधील अथीनाची ढाल येथे पाहता येईल.

गॉरगॉन या शब्दाचा अर्थ "घशांतून मोठ्याने आवाज काढणारे (डरकाळ्या फोडणारे) " असा होतो. प्राचीन ग्रीक संस्कृतीत दुष्ट प्रवृत्तींना पळवून लावण्यासाठी अशा शिरांचा वापर केला जाई. कपडे, चिलखते, ढाली, घरे, भिंती वगैरेंवर गॉरगॉनचे शीर रंगवलेले किंवा कोरलेले आढळत असे. अलेक्झांडर द ग्रेटच्या चिलखतावरही मेड्युसाचे शीर विराजमान असल्याचे पॉम्पै येथील कलाकृतीवरून कळते.

येथे एक गंमतीदार गोष्ट आठवते ती म्हणजे मेड्युसा ही पूर्वी अतिशय रूपवान होती. तिच्यावर रागावलेल्या अथीनाने तिला शाप दिल्यावर मेड्युसा भयंकर दिसू लागली. तिचे लांबसडक केस विषारी सापांत बदलले. ती इतकी हिडीस दिसू लागली की तिला पाहून भीतीने थरथरणार्‍या मनुष्याचे रुपांतर दगडात होई, म्हणजेच भीतीने आक्रसून घेतलेल्या किंवा वेडावाकडा चेहरा झालेले एक नवे गरगॉयल अस्तित्वात येई.

पाश्चात्य जगतातून सरकून भारताकडे नजर टाकल्यास भारतीय स्थापत्यशास्त्राला हजारो वर्षांचा इतिहास आहे हे लक्षात येते. परकीय आक्रमणे, कलेवरील परकीय प्रभाव या सर्वातून भारतीय कला फुललेली आहे.

भारतातील गरगॉयल्स

मुंबईत असताना छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या इमारती समोरून तुम्ही अनेकदा गेला असाल तर वरील गरगॉयल्स तुमच्या पाहण्यात आली असतील. असे नसल्यास, यानंतर कधी जाणे झाले तर या स्थापत्यशास्त्राच्या उत्कृष्ट नमुन्यासमोर काही काळ अवश्य रेंगाळा. सुबक आणि घाटीव गरगॉयल्स इमारतीच्या माथ्यावरून तुमच्याकडेच रोखून पाहात आहेत याची प्रचीती येईल. तेथून पुढे फोर्ट विभागातील जुन्या इमारतींकडेही बघा, तिथेही गरगॉयल्स सापडण्याची शक्यता आहेच. बडोद्याच्या लक्ष्मीविलास राजमहालावरही अशाच प्रकारचे गरगॉयल्स आहेत अशी बातमी नुकतीच एका मित्रांशी बोलताना कळली. अर्थातच, हे पाश्चात्य स्थापत्यशास्त्राचे नमुने आहेत. लक्ष्मी विलास राजवाडा हा संपूर्ण पाश्चात्य धर्तीचा नसला तरी त्यावर काही पाश्चात्य धाटणीचे सोपस्कार पार पडले असावेत असे वाटते. यामुळेच अस्सल भारतीय स्थापत्यशास्त्रातील गरगॉयल्स म्हणून यांची गणना करता येणार नाहीत.

भारतातही गरगॉयलसारखी शिल्पे कोरली जात का? या प्रश्नाचे उत्तर "होय" आहे. गोमुख हे सर्वार्थाने योग्य गरगॉयल मानले तरी गरगॉयल या शब्दाचा हेतू ज्याप्रमाणे बदलला आहे त्या सदृश भय उत्पन्न करणारी शिल्पेही भारतात आढळतात. भारतातील कोरीवकामाने मढवलेल्या कोणत्याही मंदिरांकडे पाहिले तर अशा गरगॉयल सदृश मूर्ती सहज दिसून येतील. या ठिकाणी चटकन आठवलेले दोन शिल्प प्रकार म्हणजे दक्षिण भारतातील मंदिरांत आढळणारे याली आणि भारतभर सर्वत्र सहज आढळणारे कीर्तिमुख यांची माहिती पुढे दिली आहे.

शरभेश्वर (सरभ/ याली/व्याल)

पुराणांतून पुढील कथा सांगितली जाते ती अशी, हिरण्यकश्यपूचा नायनाट झाल्यावरही विष्णूने घेतलेल्या नरसिंहावताराचा राग शांत होईना. नरसिंहावताराच्या रागाचा त्रास संपूर्ण जगाला होऊ लागला तेव्हा त्याचा नि:पात करण्यासाठी शिवाने सिंह, गरूड आणि मानव यांच्या संकराने बनलेला शरभेश्वर अवतार धारण केला आणि नरसिंहाशी घनघोर युद्ध केले. काही काळाने नरसिंहाला शरभेश्वराचे खरे स्वरूप कळले आणि त्याचा राग शांत झाला आणि तो शरभेश्वराचा परमभक्त बनला. यापेक्षा थोड्या वेगळ्या प्रकारे, शरभ उपनिषदात शरभाने नरसिंहाला मारून टाकले असा उल्लेख येतो.

चित्र ५: मैसूर सँडल सोपचे बोधचिन्ह असणारा शरभेश्वर

दक्षिण भारतात मंदिरांच्या खांबावर सिंह, गरूड यांच्या संकराने बनलेला अर्धपशूमानव कोरण्याची प्रथा मध्यकाळापासून प्रसिद्ध आहे. याला "याली" असे म्हटले जाते. भारतात इतरत्रही हे याली, शरभेश्वर किंवा सरभ या नावाने प्रसिद्ध आहेत. मंदिरांचे संरक्षण करणार्‍या देवता म्हणून त्यांना खांबावर कोरले जाते. सिंह-गरूड आणि मानव यांच्या संकराने दर्शवलेले पर्शियन सम्राट दरायसचे (दर्युश) चित्र, बॅबिलॉनचे पंखधारी सिंह आणि सुप्रसिद्ध इजिप्शियन स्फिन्क्स हे सर्व शरभेश्वराविषयी लिहिताना नजरेआड करवत नाही.

दिवाळीच्या दिवसांत उटण्यासारखा साबण म्हणून ज्या मैसूर सँडल सोपचा वापर केला जातो त्याचे बोधचिन्ह शरभेश्वर आहे.

चित्र ६: मदुराईमधील मंदिराच्या खांबावर कोरलेला याली

कीर्तिमुख

मध्यंतरी बिल मॉयर्स या प्रसिद्ध अमेरिकन पत्रकाराने जोसेफ कॅम्पबेल यांच्या घेतलेल्या मुलाखतींचे संकलन वाचताना शिवपुराणातील एक गोष्ट आढळली. ती काहीशी अशी -

कोण्या एका बलाढ्य राक्षसाने देवांचा पराभव करून स्वर्गावर आपले राज्य स्थापन केले आणि तेथून तो तडक कैलासावर पोहोचला आणि विजयोन्मादाच्या भरात त्याने शिवाकडे पार्वतीची मागणी केली. संतप्त शिवाने आपले तिसरे नेत्र उघडले आणि त्यातून विजेचा लोळ बाहेर पडला. त्या लोळातून पहिल्या राक्षसापेक्षाही बलवान आणि भयंकर असा दुसरा राक्षस निर्माण झाला. सिंहाचे डोके, त्यावर लांबलचक जटाधारी केस, प्रचंड शरीर असणार्‍या या राक्षसाची निर्मिती शिवाने पहिल्या राक्षसाला खाऊन टाकण्यासाठी केली होती. या राक्षसाला पाहून पहिला राक्षस थरथरा कापू लागला आणि शिवाकडे क्षमायाचना करू लागला. भोळ्या शिवाला याचनेचा अव्हेर करता येईना आणि त्याने या पहिल्या राक्षसाला क्षमा केली.

आता दुसर्‍या राक्षसाने शिवाला विचारले, "माझी निर्मिती या पहिल्या राक्षसाला खाण्यासाठी तुम्ही केलीत. मी प्रचंड भुकेला आहे. आता मी कोणाला खाऊ?" शिवाने उत्तरात म्हटले, "असं कर. तू स्वतःलाच खा." शिवाची आज्ञा शिरसावंद्य मानून या राक्षसाने प्रथम आपले पाय खाण्यास सुरूवात केली. मग पोट खाल्ले. नंतर हात खाल्ले, छाती, मान खाल्ली आणि असे करता करता केवळ डोके शिल्लक राहिले. राक्षसाच्या या आज्ञाधारकतेवर प्रसन्न झालेल्या शिवाने त्याला तेथेच थांबवले आणि वर दिला, तो असा, "यापुढे तुला जग कीर्तिमुख म्हणून ओळखेल. माझ्या मंदिराच्या प्रवेशद्वारावर तुझी स्थापना होईल. तुझ्यासमोर वाकल्याखेरीज माझे दर्शन लोकांना होणार नाही, त्यांना पुण्य प्राप्त होणार नाही."

कीर्तिमुखांची कथा पद्मपुराणातही आढळते परंतु त्यात थोडाफार बदल दिसतो. तो काहीसा असा, कीर्तिमुख हा शंकराच्या जटेतून निघालेला एक शिवगण. याला तीन तोंडे, तीन पाय, तीन शेपट्या आणि सात हात होते. शंकराच्या आज्ञेवरून याने प्रेत खाऊन दाखवले. त्याचे साहस पाहून शंकराने वर दिला की, 'तुझे स्मरण केल्याशिवाय माझे दर्शन करणार्‍याचा अध:पात होईल.'

sangameshwar - dhruv"
चित्र ७: संगमेश्वर मंदिरातील कीर्तिमुख

शंकराच्या शिवगणाची ही गोष्ट खरी मानली तरी विष्णूमंदिरातदेखील ही कीर्तिमुखे सहज दिसून येतात. वेंकटेश्वर बालाजीच्या मूर्तीवरही हे कीर्तिमुख दिसते. महाराष्ट्रातील काही शिवमंदिरांतील कीर्तिमुखे उपक्रमावरील ध्रुव या प्रकाशचित्रकारांनी मला वापरण्यासाठी दिली होती ती येथे लावत आहे. भयंकर चेहर्‍यांच्या या राक्षसांचे देवाच्या मंदिरांत स्थान गॅरगॉयल (ग्रोटेस्क) सदृशच असावे हा कयास येथे मांडता येतो.

ध्रुवने दिलेले कीर्तिमुखांचे काही फोटो येथे लावत आहे. फोटो काढण्यादरम्यान ध्रुवने निरीक्षण केले त्यात महाराष्ट्रात कीर्तिमुखे केवळ प्रवेशद्वारे किंवा कमानींवर न दिसता गर्भगृहाकडे जाणार्‍या पायर्‍यांवर, विशेषतः सर्वात वरच्या पायरीवरही दिसून येतात. वाचक्नवींनी पुरवलेल्या माहितीनुसार प्राचीन संस्कृतीत सिंह हे सामर्थ्याचे प्रतीक मानले आहे. त्यामुळे राजद्वारावर, राजाच्या आसनावर, मंदिरात गाभार्‍याच्या दरवाज्यावर, देवाच्या प्रभावळीत, उंबर्‍यावर अथवा शिखरापासी एक विक्राळ सिंहमुख(कीर्तिमुख) कोरलेले असते. अशी आकृती असलेले भवन सुरक्षित राहते अशी भावना असते. जैन आणि बौद्ध संस्कृतीतही अशाप्रकारे कीर्तिमुखे कोरण्याची प्रथा आहे.

चित्र ८: वाटेश्वर मंदिरातील एक ग्रोटेस्क

जगातील विविध संस्कृतींची तुलना करत गेल्यास त्यांच्यातील साम्यस्थळे आश्चर्यचकीत करतात. गरगॉयल्स, ग्रोटेस्क, कायमेरा, स्फिन्क्स, याली, कीर्तिमुखे ही एकमेकांशी सांस्कृतिक दुव्यांतून बांधली गेली असावीत का? या प्रश्नाचे उत्तर संस्कृतीचा तौलनिक अभ्यास करणारा अभ्यासक "होय" असेच देईल. ड्रॅगनसदृश प्राणी किंवा भयंकर दिसणारे डायनॅसोर, काळाच्या ओघात नष्ट पावलेले काही प्रचंड आकारांचे जीव हे तर या गरगॉयल्समागील प्रेरणा नसावेत. विषयाचा आणि या शिल्पांचा आवाका बराच मोठा आहे. या लेखातून या विविध शिल्पांना केवळ स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आहे. एखाद्या शांत संध्याकाळी वेळ काढून या गरगॉयल्सकडे अवश्य नजर टाका, तेही तुमच्याकडे इमारतींच्या छतांवरून कुतूहलाने पाहतील याबाबत शंका नाही.

grotesque - dhruv
चित्र ९: महाराष्ट्रातील एक ग्रोटेस्क

संदर्भ, अधिक माहिती, पूरक वाचनः

  1. गरगॉयल्स
  2. नाईटमेअर्स इन द स्काय : स्टिफन किंग
  3. अबाऊट गरगॉयल्स
  4. शरभ उपनिषद
  5. कीर्तिमुख
  6. जोसेफ कॅम्पबेल अँड पावर ऑफ मिथ
  7. याखेरीज, विकिपिडीयावर अनेक संदर्भ वाचनास मिळतील.

चित्रे:

  1. चित्र क्र. ५ www.mysoresandal.co.in येथून घेतले आहे.
  2. चित्र क्र. ६ www.art-and-archaeology.com येथून घेतले आहे.
  3. ध्रुवची चित्रे त्याच्या परवानगीने लावली आहेत.

Comments

छान

भाग १ आणि २ एकापाठोपाठ वाचले. चांगले अभ्यासपूर्ण आहेत. माहितीपुर्ण लेखांबद्दल प्रियालीचे आणि मदत करणार्‍या इतर सर्व उपक्रमींचे अभिनंदन.






व्वा !

अतिशय अभ्यासपूर्ण, कथा, दंतकथेचा संदर्भ देत एक संग्रही ठेवावा असा माहितीपूर्ण लेख !
अभिनंदन !

>>मुंबईत असताना छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या इमारती समोरून तुम्ही अनेकदा गेला असाल तर वरील गरगॉयल्स तुमच्या पाहण्यात आली असतील. असे नसल्यास, यानंतर कधी जाणे झाले तर या स्थापत्यशास्त्राच्या उत्कृष्ट नमुन्यासमोर काही काळ अवश्य रेंगाळा.

हम्म, पाहावे लागतील हे गरगॉयल्स !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गॉर्गॉयल्स

हॅरी पॉटरच्या पुस्तकांत डंबलडोरच्या ऑफिसमधे शिरण्याआधी दारावरच्या गॉर्गॉयल्सना सांकेतिक शब्द द्यावा लागे. आज हा लेख वाचून व त्यातील चित्रे पाहून ते गॉर्गॉयल्स कसे दिसत असतील याची कल्पना करता आली.

गरगॉयल्स, ग्रोटेस्क, कायमेरा, स्फिन्क्स, याली, कीर्तिमुखे ही एकमेकांशी सांस्कृतिक दुव्यांतून बांधली गेली असावीत का? या प्रश्नाचे उत्तर संस्कृतीचा तौलनिक अभ्यास करणारा अभ्यासक "होय" असेच देईल.

याचा संदर्भ मिळेल का? वाचायला आवडेल.

राधिका

सर्व संस्कृती

सर्व किंवा विविध संस्कृती एकमेकांशी कशा बांधलेल्या आहेत यावर उदाहरणादाखल जोसेफ कॅम्पबेल यांचे द हिरो विद ए थाउजंड फेसेस हे पुस्तक वाचता येईल.

अच्छा.

धन्यवाद. याच पुस्तकात

गरगॉयल्स, ग्रोटेस्क, कायमेरा, स्फिन्क्स, याली, कीर्तिमुखे ही एकमेकांशी सांस्कृतिक दुव्यांतून बांधली गेली असावीत

असे विधान केले गेले आहे का?

राधिका

अच्छा

गरगॉयल्स, ग्रोटेस्क, कायमेरा, स्फिन्क्स, याली, कीर्तिमुखे ही एकमेकांशी सांस्कृतिक दुव्यांतून बांधली गेली असावीत का? या प्रश्नाचे उत्तर संस्कृतीचा तौलनिक अभ्यास करणारा अभ्यासक "होय" असेच देईल.

ही आपली अटकळ आहे असे आपण सांगेपर्यंत कळले नव्हते. असो. अशा अटकळी बांधण्याइतका आपला व्यासंग आहेच!

राधिका

वा

वा !! उत्तम लेख..फार छान.
मागच्या लेखाच्या प्रतिसादात देवळाच्या उंबरठ्यावर असलेल्या मुखाचा मी उल्लेख केला होता त्याबद्दल येथे वाचायला मिळाले. :)
--लिखाळ.

मस्त लेख

हा लेखहि मस्त! बरीच नवी माहिती मिळाली.
याली हा उभाच असावा लागतो का? एका मंदीरात (तेच मडीकेरीतील :) )अशीच आकृती पायर्‍यांच्या बाजुला मिळाली

अजून एका खिडकीवर एक चेहरा होता.

ह्याला ग्रोस्टेक म्हणता येईल का?

उत्तम लेखाबद्दल अनेक आभार

बाकी हे मंदीर असे होते की बरेच प्रश्न आहेत. मागे चित्राताईच्या लेखापासून इथे स्वतंत्र चर्चा विषय टाकेन म्हणतोय.. अजूनहि वेगवेगळे फोटो आहेत.. वेळ मिळाताच माझ्या प्रश्नांसोबत वेगळा चर्चाविषय टाकेन

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

सुंदर शिल्पे

दोन्ही शिल्पे सुंदर आहेत. येथे लावल्याबद्दल धन्यवाद.

पहिले शिल्प याली आहे का? मला ते स्पष्ट दिसत नाही. (बहुधा फक्त घोडा असावा असे वाटते आहे.) दुसरे मात्र नेमके कीर्तिमुख आहे. याला गरगॉयल म्हणता यावे.

छानच

प्रतिसादासाठी जागा आरक्षित करतो आहे.

शरभाबद्दल शंका

याची सोंड आणि हत्तीचे दात दिसतात. विजयनगराच्या विठ्ठलमंदिरातल्या यालीच्या खांबांमध्येसुद्धा मी हे जवळून बघितले आहे.

पौराणिक कथेत हत्तीच्या अंशाचासुद्धा उल्लेख आहे का?

पौराणिक कथेत

मी वाचलेल्या पौराणिक कथेत तरी मला हत्तीचा अंश मिळाला नाही. :-( परंतु मैसूर सँडल सोपचे बोधचिन्ह पाहावे त्यात सहज हत्ती दिसून येईल.

शरभेश्वराचे नरसिंहाशी लढतानाचे हे चित्र पाहा.

यातही हत्ती दिसत नाही परंतु विकीवरील याली या लेखात हत्तीचा उल्लेख येतो. परंतु, सोबत जे चित्र दाखवले आहे त्यात हत्ती दिसत नाही.

मी लेखात हत्तीचा उल्लेख कंसात टाकायला विसरले. हत्ती ऑप्शनला टाकला आहे का काय कोणजाणे?

माझ्या लेखात जे शेवटचे चित्र आहे त्यात मला हत्तीचे मुख, गरूडाची मान आणि सिंहाचे धड दिसते आहे. हे महाराष्ट्रातील एका मंदिरावरील (मी अनेक फोटोंतून हा कोणत्या देवळातला फोटो आहे ते पाहून मंदिर कळवते.) यालीसदृश शिल्प मला वाटले.

असो, हत्तीचे हे कोडे काय आहे ते मलाही सोडवून हवे आहे.

व्यालांचे वेगवेगळे प्रकार

या दुव्यावर दिलेले आहेत (दुवा)

शार्दूल-व्याल, मार्जार-व्याल, गज-व्याल, वगैरे.

लेखातील चित्र गजव्यालाचे आहे.

"व्याल" म्हणजे त्रासदायक. पण बहुधा "साप" या अर्थी सुद्धा वापरला जातो.

वरील चित्रांतील यल्ली (व्याल) हे सापासारखे सडपातळ आणि बाकदार असतात.

वाचनीय दुवा

वाचनीय दुवा आहे. धन्यवाद.

बरीच

बरीच माहिती मिळाली. लेख आवडला. एकदोन दिवसांत अधिक लिहीते.

उत्तम / शरभोपनिषद

माहितीपूर्ण लेख आवडला.

लेखातील शरभेश्वर आणि नृसिंहाचे वर्णन पाहून मायाजाळावर इतरत्र शोध घेतला. शोध घेतांना शरभोपनिषदाची पीडीएफ गवसली. ती या दुव्यावर उपलब्ध आहे. त्यातील श्लोक वाचल्यानंतर, इंग्रजी विकिपीडीया आणि मायाजाळावर इतरत्र शरभेश्वराने नृसिंहास मारून टाकल्याचे उल्लेख चुकीचे भाषांतर वाटते. शरभोपनिषदाच्या चौथ्या आणि पाचव्या श्लोकाने हा मुद्दा स्पष्ट होण्यास मदत होईल.

यो घोरं वेषमास्थाय शरभाख्यं महेश्वरः ।
नृसिंहं लोकहन्तारं संजघान महाबलः ।। ४ ।।

हरिं हरन्तं पादभ्यामनुयान्ति सुरेश्वराः ।
मावधीः पुरूषं विष्णुं विक्रमस्व महानसि ।। ५ ।।

तसेच, तेरावा श्लोक.

अवांतर - सगळे श्लोक वाचल्यानंतर खगोलशास्त्रातील दोन कृष्णविवरांची टक्कर झाल्यावर होणा-या पुंजभौतिकीय क्रियांचे वर्णन असल्याचा आभास होतो, मजा आली! शरभोपनिषदावरील टिका / वार्त्तिके वाचूनच पूर्ण मत बनवता येईल.

स्नेहांकित,
शैलेश

शैवपंथीय

हा उल्लेख मी वाद होऊ नये म्हणून लेखात टाळला होता. मिळवलेल्या माहितीनुसार, शैव पंथीय शरभेश्वराने नरसिंहाला ठार केले असे मानतात तर वैष्णव अर्थातच हे मानत नाहीत. या अनुषंगाने शरभ उपनिषदात फेरफार जाणवतात. शैवपंथीयांत हे उपनिषद अधिक प्रचलीत आहे किंवा कसे याची माहिती मिळवायला आवडेल. नेमके कोणते योग्य आहे याची कल्पना नसल्याने मिळालेली कथा दिली.

वरील चित्रातूनही नरसिंह शरभेश्वराला शरण आल्याचे दाखवले नसून ज्याप्रमाणे हिरण्यकश्यपु आणि नरसिंहाचे चित्र मिळते त्याप्रमाणे येथे शरभ आणि नरसिंहाचे (मारताना) चित्र मिळते. काही ठिकाणी नरसिंह शरभेश्वर अवताराला शरण आल्याचेही दाखवले आहे.

याच गोष्टीतील बदल येथे मिळतील.

छान माहितीपूर्ण लेख

पहिल्या भागाहूनही सरस. या लेखांसाठी आपण पाश्चिमात्य आणि भारतीय पुराणांचा अभ्यास केलात, अनेक उपक्रमींनी आपापल्या परीने सहयोग दिला आणि एक उत्तम वाचनीय आणि संग्रहणीय असा लेख पहायला मिळाला हे सगळे कौतुकास्पद आहे.

जाता जाता एक निरीक्षण : अथीनाच्या ढालीवरली मेड्युसा फारच गोड दिसते. तिला पाहूनच कदाचित शत्रू वार करणार नाही!

मेड्युसा

या ढालीवरची मेड्युसा भयंकर न दिसता एखाद्या गुबगुबीत अमेरिकनासारखी दिसते खरी. :-)

कलाकार आपल्या आजूबाजूच्या राहणी-जीवनमानानुसार शिल्पे-चित्रे घडवतो (उदा. राजा रविवर्म्यांची चित्रे) असे म्हटले जाते त्याचे एक उदाहरण वाटते. :-)

असो. प्रतिसादासाठी अनेक धन्यवाद.

गरगॉयल्स किंवा गरगळे (मराठी)

गरगॉयल्सला मराठीत गरगळे म्हणतात असे स्मरते (चुभुदेघे). आजही कदाचित भारतातील घरांना गरगळे पहायला मिळतील. त्यांचे स्वरुप फक्त अव्हेलेबल साधनांनुसार बदललेले मिळेल.
औरंगाबादला माझ्या आजोळी मागच्या अंगणात सिमेंटच्या नळीदार (का नालीदार ?) पत्र्याच्या काही खोल्या होत्या. पावसाळ्यातल्या पाण्याने किंवा वर भिंतींवर ठेवलेल्या कुंड्यांना पाणी घातल्यावर त्यांच्या वाहुन जाण्याची व्यवस्था म्हणुन केलेले गरगळे या लेखामुळे आठवले. ते गरगळे म्हणजे जुन्या पत्र्याचा डबा डिसेंबल करुन (किंवा उकलुन) तयार झालेल्या पत्र्यांना जोडुन बनवलेली नाली होती. पत्र्यांच्या नळीदार भागातुन पडणार्‍या अनेक लहान लहान धारा त्या गरगळ्यात एकत्र होत आणी पुढे गरगळ्याच्या शेवटातुन एकत्र खाली कोसळत. ती कामचलावु आणी मातीचे अंगणाची झीज टाळण्याच्या गरजेतुन तयार झालेली व्यवस्था असल्याने त्याला कसलेही मुख वैगेरे नव्हते.

आजही झोपडपट्टीत जिथे दोन घरांमधे (झोपड्यांमधे) अत्यंत चिंचोळी जागा असते तिथे हमखास ही व्यवस्था केलेली आढळते. सर्वसाधारणपणे मेणकापड असे संबोधल्या जाणारा ताव वापरुन दोन लांबलचक सुतळ्या पॅरलल ठेवुन त्याला तो ताव तान्ह्या मुलांच्या झोळीसारखा शिवला जातो, आणी हे कामचलाउ हंगामी गरगळे तयार केले जाते.

महाबळेश्वरला जेव्हा पावसाळा सुरु होतो तेव्हा सगळ्या इमारती घरे वैगेरे याच मेणकापडात गुंडाळलेल्या असतात. मागच्या पावसाळ्यात तिथेही ही हंगामी गरगळी पहायला मिळाली.

पावसाळ्यात रेनकोट पांघरलेले महाबळेश्वर अन उजव्या बाजुला दिसणारे गरगळे

छान लेख...

राधिका म्हणतात त्याप्रमाणे हॅरी पॉटरची पुस्तकं वाचलेल्यांना गारगॉयलची वेगळी ओळख करुन द्यायची गरज नाही. या पुस्तकांत हा शब्द कितीतरी वेळा आला आहे.

शिवाय एज ऑफ मायथॉलॉजी सारखे मनोरंजनात्मक खेळ खेळल्याने मेड्युसा, कायमेरा, सेंटॉर, मिनोटॉर, अनुबीस इत्यादी अर्धमानवी पशूंची ओळख देखील आहे. विशेषत: कायमेरा आणि मिनोटॉर इत्यादींचे या खेळातले उपद्रव मूल्य खूपच जास्त असल्याचे आठवते.
तुम्ही सांगितलेल्या थॉथ आणि अनुबीस बरोबरच रा आणि सेट हे इजिप्शियन देव देखील अर्धपक्षी/पशू आहेत.

कोणार्कच्या सहलीत हा फोटो काढला होता? हे काय आहे?

==================

सिंह(?)

हे चित्र सिंहासारखे वाटते आहे. दोन प्राण्यांचा संकर वाटत नाही त्यामुळे कायमेरासदृश वाटले नाही. (तसे तोंड नेमके सिंहाचे आहे की वाघाचे ते स्पष्ट होत नाही. आयाळ नसल्याने व्याघ्र असावे काय असेही वाटले.) परंतु, निर्मिती भय वाढवण्यासाठी (किंवा मंदिराचे संरक्षक म्हणून) केली असल्याचे वाटते. ग्रोटेस्क म्हणता यावे असे आहे.

सिंहच असावा..

ओरिसात बहुतेक सगळीकडेच असा उभा सिंह त्याखाली हत्ती आणि त्याखाली क्वचित माणूस अशी शिल्पे आढळतात.
ही काही अजून चित्रे बघा. हे पहिले तर खूपच भयंकर वाटते.

हे वर सांगितल्याप्रमाणे सिंह हत्ती वगैरेचे...

आणि ही दोन मगरीची (?) तोंडे गारगॉयल असावीत का?

-सौरभ. (सदस्य नाव, चित्राचे नाव नाही :-)

==================

पाणी बाहेर टाकत असतील

तर नेमकी गरगॉयल्स. :-) पण भयंकर आहेत खरीच. मगरीचे तोंड मूळ मंदिराच्या फत्तरापेक्षा वेगळ्या फत्तराचे आहे असे वाटून गेले.

पहिल्या भागात मुक्तसुनित यांनीही अशीच चित्र लावली होती.

व्याल आणि गंड भेरुंड

व्याल

पद्मश्री प्रभाशंकर सोमपुरा हे गुजराथचे प्रसिद्ध शिल्पविशारद.त्यांच्या अनेक प्रसिद्ध कलानिर्मितीत प्रमुख म्हणजे सोमनाथ मंदिराचे नवनिर्माण. या थोर स्थपतीच्या घराण्यात ही कला वंशपरंपरेने आलेली. अतिशय अभ्यासू अशा श्री. सोमपुरा यांचे "भारतीय शिल्पसंहिता" हे १९७५ सालचे पुस्तक माझ्याकडे आहे. त्यातील व्याल स्वरूप या प्रकरणाचा काही भाग येथे देत आहे. दक्षीणेकडील देवालयात पायावर उभे असलेले विशालकाय सिंह समान प्राणी दिसतात. त्यांना "व्याल" म्हणतात.वरालक, विरालिका,याली,दाळी ही इतर नावे.
यांचे एकुण २४ प्रकार. व्यालाचे शरीर सिंहासारखे असते.तो दोन पायांवर उभा असून त्याचा एक पाय उचललेला असतो. तोंडाच्या जागी वनचर,गायचर, पशू,पक्षी किंवा मनुष्य यांची तोंडे आसतात.द.भारतात व ओरिसामध्ये देवालयाची बाहेरील भिंत, प्रदिक्षणा मार्ग, अशा ठिकाणी ८-१० फ़ूट उंचीचे व्याल आढळतात. काही रेखाटने पुढे देत आहे.
व्याल-१

व्याल-२

व्याल-३

गंड भेरुंड

एक काल्पनिक पक्षी.याचा आकार गरुडासारखा असतो; पण त्याच्या एका धडातून दोन चोची फ़ुटलेल्या असतात.दोन्ही चोचीत आणि पावलांच्या पंजात एकेक हत्ती पकडलेला असतो.ही म्हैसूर नरेशांची राजमुद्रा होती. हे प्रतीक म्हैसूरच्या राजप्रासादावर व बेंगळूरच्या विधानसौधावरही दिसते.
गंड भेरुंड

शरद

कर्नाटक एस् टीचे बोधचिन्ह

हे गंडभेरूंड आहे असे वाटते.

उपरोक्त प्रतिसाद माहितीप्रद

वा!

वा! माहितीपूर्ण प्रतिसाद!..

प्रियालीताई व शरदराव,
एकमेकांकडील माहिती एकत्र करून यावर अजून एक विस्तारीत लेख/भाग वाचायला आवडेल

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

आभारी आहे.

ही पाने येथे स्कॅन करून चढवल्याबद्दल आभारी आहे.

इतर प्रतिसादकर्ते आणि वाचकांचेही अनेक धन्यवाद!

भेरूंड

भरतनाट्यममध्ये अशीच एक संयुक्त (दोन हातांची) भेरूंड (काक) मुद्रा आहे. ती आठवली. (आणि नेटावर सापडली.)

श्रीलंकेचा झेंडा

श्रीलंकेच्या झेंड्यावर एक अशाच प्रकारचा विचित्र प्राणी दिसतो
इथे पहा

सिंह

श्रीलंकेच्या ध्वजावर असणारा हा केवळ सिंह आहे. याची आख्यायिका येथे सापडेल.

झेंडे

बर्‍याच देशांच्या झेंड्यावर काही प्राण्यांची चित्रे असतात ती गरगळे ह्या सदरात मोडतात का?

१) स्पेन

२) भुतान
३) बरमुडा

नसावे

बर्‍याच देशांच्या झेंड्यावर काही प्राण्यांची चित्रे असतात ती गरगळे ह्या सदरात मोडतात का?

नसावे. यांना गरगॉयल असे म्हणता येत नाही पण ते कायमेरा किंवा व्यालही नाहीत. सबंध प्राणी एकच दिसतो. ड्रॅगन किंवा सिंह, गरुड वगैरे. हे फक्त एम्ब्लेम्स वाटतात. तसेही गरगॉयल्स किंवा ग्रोटेस्क हे सहसा शिल्पांना म्हटले जाते.

मुंबई विद्यापीठातील चेहरे

दक्षिण मुंबईत गेल्यावर जुन्या स्थापत्य शैलीच्या इमारती निरखणे हा माझा आवडता उद्योग. पावसाळ्यात किमान एकदा तरी सीएसटी ते फोर्ट, कुलाबा परिसरात पायपीट करून पाण्याने स्वच्छ झालेल्या इमारतींचे सौंदर्य निरखण्यात वेगळीच मजा येते. या इमारती पाहुन पडणार्‍या अनेक प्रश्नांपैकी एका महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर आपल्या लेखात सापडले त्याबद्दल मनापासून धन्यवाद्. सीएसटी रेल्वे स्थानकाच्या पश्चिम (डी.एन्. मार्ग) बाजू कडील भींती वरील गरगॉयल्स अगदी वाहनात बसूनही पाहू शकता.
मुंबई विद्यापीठाच्या दिक्षांत (कॉन्वोकेशन) सभागृहात (नेमकी जागा आठवत नाही परंतु बहुतेक) सज्जाच्या दर्शनी भागावर विविध भारतीय चेहरे कोरलेले आहेत. भीतीदायक नसले तरी रोखून मात्र नक्कीच पाहतात.

जयेश

वा!

पावसाळ्यात किमान एकदा तरी सीएसटी ते फोर्ट, कुलाबा परिसरात पायपीट करून पाण्याने स्वच्छ झालेल्या इमारतींचे सौंदर्य निरखण्यात वेगळीच मजा येते.

वा! हे खूपच आवडले. अनेक भिजलेले दिवस आठवले. अशा वेळी झाडांनीही मनसोक्त आंघोळ केल्यामुळे त्यांच्या हिरवेपणाला एक वेगळीच लकाकी येते.

----
“What people say about you is none of your business” - Sean Stephenson

धन्यवाद, जयेश

फोर्ट विभागात तुमचे अनेकदा जाणे-येणे होत असेल तर तेथील इमारतींवर गरगॉयलसदृश शिल्पे आढळतात का याचे निरीक्षण करून त्याची अवश्य माहिती येथे द्या.

प्रतिसादासाठी धन्यवाद.

कदाचित अवांतर

बौद्ध काळात बांधलेल्या काही स्तूपांवर यक्ष आणि यक्षी असतात. त्याही संरक्षक देवता म्हणूनच असतात असे ऐकले आहे. पण त्यांच्याबाबतीत असे अर्धमानवीपण ऐकले नाही.

पण किन्नर हा मात्र असा गण असल्याचे ऐकीवात आहे. अधिक माहिती येथे आणि येथे मिळाली.

अर्थात त्यांना गारगॉयल्स म्हणता येईल का हे माहिती नाही..

बाकी लेख आणि प्रतिसादांमधून खूपच माहिती मिळाली.

यक्ष, यक्षी, किन्नर आणि तुंबरु

यक्ष आणि यक्षी या संरक्षक देवता असून त्या बरेचदा दिसायला भयंकर असतात. यांना रुप बदलण्याची कला अवगत असते अशा आख्यायिका वाचल्या आहेत त्यानुसार असे यक्ष-यक्षी मंदिरांत किंवा बौद्ध विहार, चित्रांत वगैरे दिसतात.

किन्नर हयवदन असतात. सर्वच किन्नर घोड्याच्या तोंडाचे नसतात असे सांगितले जाते. सेंटॉरच्या विरुद्ध प्रकार वाटतो. ;-) किन्नर हे गाणे-बजावणे करतात परंतु गंधर्वांइतका मान त्यांना नसतो असे वाटते. काही गंधर्वही हयवदन असल्याचे वाचले आहे. (इथे जरा माझा गोंधळ आहे. असो.)

चित्रा, मागे एकदा तुमच्या लेखात तुंबरुवर चर्चा झाल्याचे आठवत असावे. कुठेतरी वाचल्यानुसार तुंबरु हा हयवदन होता. तो गंधर्व होता की किन्नर हे मात्र माहित नाही. (बहुधा गंधर्व चू. भू. दे. घे.)

मात्र किन्नरांना गरगॉयल्स म्हणता येणार नाही. ते भयनिर्मिती करत असल्याची किंवा दुष्ट असल्याची उदाहरणे वाचलेली नाहीत. ते दुय्यम दर्जाचे सेवक असावेत.

सुंदर सखोल माहिती देणारा लेख

व तसेच माहितीपूर्ण प्रतिसाद. हे सर्व उपक्रमाची शोभा वाढवणारे आहे.

सहज 'फोटोज ऑफ गर्गॉय्ल्स' असे गूगलले असता हा दुवा सापडला. त्यातील काही चित्रे मात्र गर्गॉय्ल्सची नव्हेत. विषेशतः चिनी राजवाड्यांसमोर असलेले दोन सिंह नुसते द्वारपालासारखे बसलेले असतात, त्याच्यात भीतिदायक काहीही वाटत नाही. तरीही ह्या चित्रविक्रेत्याने त्याचाही समावेश गर्गॉय्ल्समधे केलेला आहे.

धन्यवाद

दुव्यावरील काही फोटो अतिशय सुंदर आणि कुतूहल वाढवणारे आहेत.

स्टीफन किंगच्या पुस्तकातही अतिशय सुरेख चित्रे होती परंतु प्रताधिकार उल्लंघन होऊ नये म्हणून चढवली नाहीत. :-(

प्रतिसाद आणि दुवा दोन्हींसाठी धन्यवाद.

ग्रिफिन

दक्षिण भारतात मंदिरांच्या खांबावर सिंह, गरूड यांच्या संकराने बनलेला अर्धपशूमानव कोरण्याची प्रथा मध्यकाळापासून प्रसिद्ध आहे.

ह्या सिंहाचे शरीर व डोके व पंख गरुडाचे असलेल्या काल्पनिक जीवाला ग्रिफिन असे म्हणतात. मात्र तो मानव प्राणी आहे की नाही ते नक्की माहित नाही. ऑक्सफर्डनुसार त्याची ही व्याख्या होते. पण मूळ फ्रेंच शब्द ग्रिफॉन शोधला तर त्याचा अर्थ हा होतो. मात्र त्याबाबत संशोधकांमध्ये मतभेद आहेत. त्यामध्ये गिधाड हा सर्वसंमत अर्थ आहे. असे असले तरी ग्रिफिन आणि ग्रिफॉन हे एकमेकांना समांतर शब्द मानले जातात.

_______________________________________________
भो भद्र कृतं मौनं कोकिलैर्जलदागमे ।
वक्तारो दर्दुरा यत्र तत्र मौनं हि शोभनम् ।।

चीनमधील कायमेरा

वॉल्ट डिस्नी एपकॉटच्या राज्यात चीनमधील बहुधा सहाव्या किंवा आठव्या शतकातील एका राजाच्या थडग्यावर आढळलेला हा कायमेरा स्थित आहे. त्याचे छायाचित्र लेखात साठवत आहे.

DSC02105

 
^ वर