जपून! ते लक्ष ठेवून आहेत - १

प्रस्तावना: काही महिन्यांपूर्वी पौराणिक कथांवरील काही निबंध आणि मुलाखती वाचताना भारतीय मंदिरांतील एका विशिष्ट प्रकारच्या शिल्पाची कथा वाचायला मिळाली होती. याचकाळात हेमाडपंती मंदिरांवर लेख लिहिणे सुरू होते. आपले उपक्रमी सदस्य ध्रुव यांच्याकडे या विषयावर सहज बोलताना त्यांनी मला हवे असणारे फोटो मिळवून देतो असे सांगितले आणि वेळात वेळ काढून आणूनही दिले. त्यावेळेस या प्रकाशचित्रांचा वापर कसा करायचा हे ठरले नव्हते. कामाच्या रगाड्यात मी देखील ही चित्रे विसरून गेले. यानंतर कधीतरी एका माजी उपक्रमींनी चित्रांविषयी हजार शब्द लिहावेत अशी काहीशी चर्चा सुरू केली होती. त्यावेळेस मला या प्रकाशचित्रांची पुन्हा आठवण झाली.

माझ्याकडे असलेल्या कथेची छाननी वाचक्नवी यांच्याकडून करवून अधिक संदर्भ मिळवता आले तरी लेख लिहिण्याजोगी पुरेशी माहिती मिळत नव्हती. ती गोळा करताना कोठेतरी सहज ग्रोटेस्क, गरगॉयल यांची आठवण झाली आणि संबंध जुळत गेले पण आळसाने म्हणा, लिहिण्याची प्रबळ इच्छा नव्हती किंवा कामातून वेळ काढणे नको वाटले म्हणून पुन्हा ही माहिती शोधणे बंद झाले. चित्रा यांचा स्थापत्यकलेतील कमानींचा वापर हा लेख आला आणि त्या दरम्यान त्यांच्या आणि प्रदीप यांच्या खरडींवरून लेख लिहिण्याची इच्छा झाली. चित्रा यांनी या संबंधी दिलेले संदर्भ फारच मौलिक ठरले. लेख लिहिताना सहजच विसुनाना आणि त्याच्याशी (उपक्रमी सदस्यः तो) केलेली बातचितही हवीहवीशी माहिती देऊन गेली. सुयोग्य शब्द, मराठीकरण इ. गोष्टींत याआधीही धनंजय आणि वाचक्नवी यांची मदत अनेकदा घेतली होतीच. ती या लेखालाही घेतली आहेच. चित्तरंजन यांनी लेखाचा कच्चा मसूदा वाचून केलेल्या सूचनाही उपयुक्त ठरल्या. उपक्रमावर लिहिताना अशा अनेक सदस्यांची मदत होते याचे निश्चितच अप्रूप वाटते. या सर्व सदस्यांना जितके धन्यवाद द्यावेत तितके थोडे आहेत.

लेखाची लांबी थोडी वाढल्यामुळे लेख २ भागात प्रसिद्ध करावा लागत आहे.


Seeing this obscene thing is a shock; what is worse is seeing people passing to and fro beneath it, intent on either plotting their day's business or planning their evening's pleasure; they pass to and fro and do not look up.

None of them look up.

I hear him say it again: We don't see them... but they see us.

- Stephen King
Nightmares in the sky

सुप्रसिद्ध भयकथा लेखक स्टीफन किंग यालाही अंगावर शहारे आणणारे असे काही अस्तित्वात आहे ही कल्पनाच मोठी रोचक आहे. वर उद्धृत केलेली वाक्ये स्टीफन किंगच्या एखाद्या प्रसिद्ध कादंबरीतील नसून एका विशिष्ट प्रकारच्या शिल्पकलेवरील चित्रांच्या पुस्तकासाठी किंग यांनी केलेले हे भाष्य आहे. मध्ययुगात प्रामुख्याने प्रसिद्ध झालेल्या परंतु पुरातन काळापासून सर्व संस्कृतीत चालत आलेल्या या शिल्पकलेला ढोबळमानाने गर्गॉयल्स , ग्रोटेस्क अशा नावांनी संबोधले जाते.

गरगॉयल म्हणजे काय?

सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर गरगॉयल म्हणजे इमारतींवरील पाणी वाहून नेणारी आणि त्याचा निचरा करणारी नळकांडी. याला इंग्रजीत "गटर" असा शब्द आहे. ही प्रामुख्याने इमारतींच्या माथ्यावर स्थित असून नळकांड्याच्या तोटीला एखादा भयप्रद चेहरा किंवा अर्धपशूमानवी आकृतीचे शिल्प असते. यांचा मुख्य उपयोग इमारतीच्या भिंती आणि वास्तुचे पावसाच्या पाण्यापासून संरक्षण करून हे पाणी इमारतीपासून थोड्या दूर अंतरावर फेकणे हा असतो. आपल्याकडेही थोडेफार यासाठीच परंतु वेगळ्या वापरासाठी देवळांमध्ये गोमुखे दिसतात.

चित्र १: पाणी ओकणारे गरगॉयल

गरगॉयल या शब्दाची व्युत्पत्ती झाली आहे "गार्गल" या शब्दावरून. घशातून गुळण्यांसारखे आवाज करत पाणी ओकणार्‍या या शिल्पांना गरगॉयल हा ध्वन्यानुसारी शब्द अगदी चपखल बसतो. अशाचप्रकारे, इमारतींवर स्थित चमत्कृतीपूर्ण परंतु पाण्याचा निचरा न करणार्‍या शिल्पांना ग्रोटेस्क, दोन किंवा अधिक प्राण्यांच्या संकराने तयार होणारे "कायमेरा" अशा अनेक प्रकारांनी संबोधले जाते. ही शिल्पे इमारतींचे कळस, प्रवेशद्वारे, खांब, कमानी यांवर स्थित दिसतात. कायमेरा, ग्रोटेस्क आणि गरगॉयल्स यांच्यात मूलभूत फरक असला तरी प्रामुख्याने ही शिल्पे गरगॉयल्स या नावाने अनेक माध्यमांतून प्रसिद्ध असल्याने लेखाच्या सुटसुटीतपणासाठी गरगॉयल असाच शब्द यापुढे वापरला आहे.

गरगॉयल, ग्रोटेस्क आणि याप्रकारची शिल्पे अस्तित्वात कशी आली असावीत याचा विचार करता अनेक संस्कृतींमध्ये समान आढळणारी आणि प्राचीन काळापासून चालत आलेली काही उदाहरणे येथे देता येतील.

माणसाला अनादी काळापासून त्याच्या आसपास वावरणारे प्राणी आणि त्यांच्या वर्तणूकीविषयी कमालीचे कुतूहल वाटत आले आहे. वाघाचे शौर्य, घारीची नजर, गरुडाची झेप, कोल्ह्याचे चातुर्य, लांडग्याचा लबाडपणा, सशाचे भित्रेपण यासर्वांमधून मानवी स्वभावाचे विशेष प्राण्यांना चिकटवलेले आढळतील आणि प्राण्यांचे विशेष मानवी स्वभावात उतरतात हे दर्शवलेले आढळेल. पक्ष्यांची आभाळातील भरारी पाहून माणसालाही आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न पडले असावे ही गोष्ट जितकी सत्य आहे त्याचबरोबर, मनुष्य आणि प्राणी यांच्या संकराने चमत्कृतीपूर्ण अशी अर्धपशूमानवी व्यक्ती आणि शक्ती निर्माण करण्याचा मानवाचा मानसही पुरातन काळापासून स्पष्ट आहे.

काही पुरातन संस्कृतींचा विचार करता, ग्रीक संस्कृतीतील मिनोटॉर हा राक्षस, सापांचे केस डोक्यावर बाळगणारी मेड्युसा, भारतीय संस्कृतीतील हत्तीचे डोके चिकटवलेला गणपती, बोकडाचे डोके लावलेला दक्षराज, घोड्यांची तोंडे असणारे गंधर्व, शंकराचा नंदी, इजिप्शीयन संस्कृतीमधील कोल्ह्याचे तोंड चिकटवलेला मृत्युदेव अनुबीस, पक्ष्याचे डोके असणारा थॉथ आणि परिकथांतून समोर येणार्‍या मत्स्यकन्या, घोड्याचे धड असणारे धनुर्धर सेंटॉर, पंखधारी पर्‍या वगैरे या अर्धपशूमानवी गटात मोडतील. अगदी अर्वाचीन काळातही वटवाघळांसारखे पंख लावून फिरणारा बॅटमॅन, मनगटातून कोळ्याची जाळी काढणारा स्पायडरमॅन हे साय-फाय नायकही प्राण्यांचे गुणधर्म मानवी जीवनात अंतर्भूत करताना दिसतात आणि याच पार्श्वभूमीवर कुठेतरी चमत्कृतीपूर्ण गरगॉयल्सचीही भेट घडते. इमारतींच्या कळसांवरून तुमच्याकडे ते सतत पाहात असतात. नजर ठेवून असतात, तुमच्या लक्षात ते येवो किंवा न येवो.

चित्र २: पॅरिसमधील सुप्रसिद्ध नोत्र दाम चर्चवरील ग्रोटेस्क

एखाद्या जुन्या गॉथिक किंवा रोमन बांधणीच्या इमारतींवर भयप्रद किंवा हिंस्त्र चेहरे, अर्धपशूमानवी मुखवटे आणि शरीरे, आक्रमक आविर्भावातील पशू यांची शिल्पे तुमच्या पाहण्यात आली असावीत. युरोपमधील ऐतिहासिक इमारती, चर्चेस, न्यूयॉर्क, बॉस्टन, फिलाडेल्फिया, मुंबई अशा अनेक ठिकाणी अशी शिल्पे तुमच्या नजरेस पडतील. पडली नसतील, तर पाहून घ्या, आढळतील हे निश्चित. आकाशातून उंचावरून आपल्याकडे अशा हिडीस आकृत्या पाहात आहेत ही कल्पना मनाला हुरहुर लावणारी नक्कीच ठरावी. हॅलोवीनच्या सुमारास बाजारातही गरगॉयल्सच्या चमत्कारिक प्रतिकृती विकायला ठेवलेल्या आढळतील.

पशूंच्या आणि अर्धपशूमानवांच्या चमत्कृतीपूर्ण शिल्पांबरोबरच संपूर्ण मानवी परंतु हिडीस आणि भयप्रद स्वरूपातील गरगॉयल्सही अनेकदा इमारतींवर पाहण्यास मिळतात. एखाद्या रोमन किंवा गॉथिक बांधणीच्या इमारतींच्या कमानींवरील किंवा प्रवेशद्वारांवरील की-स्टोन्सवर असे हिडीस चेहरे सहज दृष्टीस पडतील. अशा भयप्रद चेहर्‍यांमुळे अनेकांना हे गरगॉयल्स एखाद्या सैतानी करणीचे, दुष्ट प्रवृत्तींचे प्रतिनिधी वाटतात आणि गरगॉयल्सच्या गूढपणात भर पडते. काहीजणांच्या मते वास्तुकडे सैतानी प्रवृत्तींची नजर पडू नये म्हणून त्यांना घाबरवण्यासाठी ही शिल्पे कोरलेली असतात तर काहींच्या मते शत्रूची मुंडकी प्रवेशद्वारांवर लावून विजय साजरा केला जातो. या ठिकाणी शौर्यवान विजेता राहतो असे सांगण्याची ही पद्धत असावी, इमारतीच्या मालकांचा किंवा त्यांच्या विजयांचा संबंध या शिरांशी जोडता येतो असे काहींना वाटते. भारतातही शत्रूचे शीर तोडून ते वेशीवर, किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर जनतेला दिसावे असे ठेवले जाण्याची प्रथा होती तसेच काहीसे. काही तज्ज्ञांच्या मते हल्लीच्या काळात जसे एखाद्या चेहर्‍याचे व्यंगचित्र करण्याची पद्धत आहे त्याप्रमाणेच मध्ययुगात एखादा चेहरा अशा स्वरूपात लावण्याची पद्धत असावी. त्यात भयरसाची निर्मिती नसून केवळ विनोदनिर्मितीसाठी ही शिल्पे कोरली जात असावीत. कारणे काहीही असली तरी ही शिल्पे पाहून अंगावर शहारा आल्यास किंवा भीतीची भावना मनाला चाटून गेल्यास नवल नाही.

चित्र ३: हॅलोवीनच्या सुमारास अशी गरगॉयल्स बाजारात विकायला ठेवलेली आढळतात.

क्रमशः


तळटीपा:

उपक्रमावरील टंकात ग्यर्गॉयल या उच्चारात शब्द लिहिणे कठिण वाटल्याने सुटसुटीत गरगॉयल या शब्दाचा वापर लेखात केला आहे.

ग्रोटेस्क या शब्दाचे मूळ ग्रोट्टो या शब्दात दडलेले आहे. अधिक माहिती येथे मिळेल.

चित्रे:

चित्र १ आणि चित्र २ ही विकिपिडीयावरून घेतलेली असून चित्र ३ www.frightcatalog.com येथून घेतले आहे.

Comments

उत्तम

सुरूवात, पुढच्या भागाची वाट पाहतो.

काहींच्या मते शत्रूची मुंडकी प्रवेशद्वारांवर लावून विजय साजरा केला जातो. या ठिकाणी शौर्यवान विजेता राहतो असे सांगण्याची ही पद्धत असावी, इमारतीच्या मालकांचा किंवा त्यांच्या विजयांचा संबंध या शिरांशी जोडता येतो असे काहींना वाटते. भारतातही शत्रूचे शीर तोडून ते वेशीवर, किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर जनतेला दिसावे असे ठेवले जाण्याची प्रथा होती तसेच काहीसे.

'राजा शिवछत्रपती'त तालिकोट्याच्या लढाईनंतर विजयनगरच्या राजा रामरायाच्या मुंडक्याची अशीच विटंबना (गरगॉयल) म्हणून केल्याचा अंगावर शहारे आणणारा उल्लेख आहे. (चू. भू. द्या. घ्या.) कुणाकडे संदर्भासाठी हे पुस्तक असल्यास याची खातरजमा करता येईल.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

लेख छानच

प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत घेतलेल्या आढाव्यामागची कल्पना आवडली. यात नंतर गणपती, नंदी यांना पूजेत विशेष स्थान का मिळाले ते पहायला हवे.

पुढच्या लेखाची वाट पाहत आहे, त्याबरोबरच अधिक प्रतिक्रिया देते.

मुंबई

मुंबईतल्या छ. शिवाजी/व्हिक्टोरिया टर्मिनसच्या इमारतीवरसुद्धा अशी अनेक विचित्र गरगॉयल्स पाहिल्याचे आठवते.

वरतून बघणारी राक्षसी श्वापदे

चित्रे आणि माहिती आवडली.

पावसाच्या पाण्याच्या तोट्यांवर चढवलेली प्राण्यांची शिल्पे मी देखील व्हिक्टोरिया टर्मिनस (सी.एस्.टी.) इमारतीवर बघितली आहेत. इंडो-सारसेनिक ब्रिटिश इमारतींवर असलेल्या चित्रविचित्र तोट्या खूप आठवतात, पण जुन्य भारतीय देवळांवर मात्र तोट्या आठवत नाहीत - हा केवळ माझा स्मृतिदोष आहे काय?

(बाकी ग्रोटेस्क आणि गारगॉइल यांच्यातला फरक आतापर्यंत माहीत नव्हता - इतके दिवस नोत्र दाम द पारी चर्चवरील प्रसिद्ध शिल्पाला मी "गारगॉइल" असेच समजत होतो. शेवटच्या तळटिपेतील निर्देशाने "ग्रोटेस्क" म्हणजे "गुहेतील"पासून "विकृत" हे अर्थपरिवर्तन जाणवले, आणि रोचक वाटले.)

भारतीय देवळावरची तोटी

एक उदाहरण :

हे खजुराहो मधले :

ही तोटी नव्हे , पण आहे देवळावरचेच.

भोसरीतील सत्यनारायण मंदिर

वरील प्रतिसादातील शेवटच्या चित्रातील आकृती या भोसरीतील सत्यनारायण(?) मंदिरावरील आकृतींशी तंतोतंत मिळत्याजुळत्या आहेत.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

लेख चांगला चालला आहे.

सामान्य कुतुहल आणि जिज्ञासापूर्ण वाचन या दोन्ही पातळींवर एकाचवेळी यशस्वी ठरत असलेला लेख.
पुढचा (चे?) भाग वाचण्यास उत्सुक आहे.

गॉर्गॉयल , ग्रोटेस्कची कारणमिमांसा करणारी तज्ञांची मते देताना काही संदर्भ दिल्यास उपयुक्त ठरेल.
(तो विषय लेखापुरता संपवला आहे असे गृहित धरून -) या भागाचा शेवटचा परिच्छेद थोडा सखोल बनवला असता तरी चालले असते.
याबाबत लेखिकेचे स्वतःचे मत जाणून घेण्याची इच्छा आहे.

सहमत

सामान्य कुतुहल आणि जिज्ञासापूर्ण वाचन या दोन्ही पातळींवर एकाचवेळी यशस्वी ठरत असलेला लेख.
पुढचा (चे?) भाग वाचण्यास उत्सुक आहे.

असेच म्हणतो


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

छान्

छान लेख. गोमुखे सोडुन गरगॉयल्स पाहिल्याचे आठवत नाहीत.
लेण्यामधे किंवा जुन्या मंदिरात खांबांवर जणु छत तोलुन धरले आहेत अश्या मुर्ती प्रतिमा असतात. त्यांना काय म्हणतात ?

लेख आवडला !

>>छान लेख. गोमुखे सोडुन गरगॉयल्स पाहिल्याचे (शब्दही कधी उच्चारल्याचे) आठवत नाहीत.

असेच म्हणतो !

-दिलीप बिरुटे

भारतात

गोमुखे सोडुन गरगॉयल्स पाहिल्याचे (शब्दही कधी उच्चारल्याचे) आठवत नाहीत.

भारतात त्यांना गरगॉयल म्हणत नाहीत ना म्हणून आठवत नाही. :-) तसे आपण गोमुखे याच कारणांसाठी वापरतो की. पुढच्या भागात भारतीय ग्रोटेस्कचे स्पष्टीकरण टाकते. खाली दिलेले छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या इमारतीवरील गरगॉयल्सचे फोटो अवश्य बघा.

मनुष्याकृती खांब

इंग्रजीत त्यांना कॅरियॅटिड (Caryatid दुवा) म्हणतात.

(कुठल्यातरी स्पर्धा परीक्षेसाठी हा शब्द शिकलो होतो.)

अहं ..

अहं .. ते नव्हे. मला खांबासारखे खांब् पण वर् ते छताला जोडले जातात तिथे चारही बाजुंनी पाठीवर छत तोलणार्‍या मनुष्यसद्रुष्य आकृत्या असे म्हणायचे होते. शक्य झाल्यास फोटो टाकेन.

छत तोलून धरणारे यक्ष

पण वर् ते छताला जोडले जातात तिथे चारही बाजुंनी पाठीवर छत तोलणार्‍या मनुष्यसद्रुष्य आकृत्या असे म्हणायचे होते.

हे मलाही पाहिल्याचे आठवते पण शोधून चित्रे सापडली नाहीत. बहुधा अवकाशविहार करणारे यक्ष छत तोलून धरतात असे हे म्यूरल असते असे वाटते. चू. भू. दे. घे.

हे अजिंठ्याला पाहिले असावे का? एक संदर्भ येथे मिळाला.

आणि एक असे चित्र -

ह्म्म्

माझ्याकडे आहेत काही फोटो पण ते रिपॉझिटरीत सर्चावे लागतील. तोवर हा फोटो पहा ..

Chat tolnare Yax

हा भुलेश्वरच्या मंदिरातला अगदीच साधा यक्ष आहे .. याहीपेक्षा सुरेख खांबावरचे यक्ष घृष्णेश्वर मंदिरात आहेत. (चुभुदेघे ऑफकोर्स)

हा अजुन् एक्

Chat tolnare Yax

संपादकांना फोटो देणे अनावश्यक वाटल्यास तसे कळवावे म्हणजे फोटो काढुन लिंका देता येतिल.

छत तोलून धरणारे यक्ष..

असेच का?

-
ध्रुव

एग्झ्याक्टली

एग्झ्याक्टली !!
ध्रुवरावांना मदतीसाठी व्यनीकरायचा मानस होताच.

हेच हेच :-)

मी कुठे पाहिले ते मला आठवत नव्हते पणभुलेश्वरचा अंदाज आला होताच. :-)

धन्यवाद

सर्व प्रतिसादकर्त्यांचे धन्यवाद.

व्ही टी स्टेशन आणि भारतीय गरगॉयल्सचा उल्लेख पुढील लेखात येईलच.

विसुनाना, लेख इतका मोठा होत होता की खोलवर स्पष्टीकरणे दिलेली नाहीत. ती संदर्भांतून येतील आणि प्रतिसादांतून चर्चाही करूच.

सध्याचाच लेख २००० शब्दांवर गेलेला आहे. आणखी मोठा झाला तर लोक कंटाळतील या काळजीत मी आहे. ;-)

या दुव्यावर व्ही टी स्टेशनवरील एक गरगॉयल पाहता येईल. फ्लिकरवरील फोटो असल्याने येथे तडक चिकटवलेला नाही.

छान

छान लेख. बरीच नवीन माहिती मिळाली.

एखाद्या रोमन किंवा गॉथिक बांधणीच्या इमारतींच्या कमानींवरील किंवा प्रवेशद्वारांवरील की-स्टोन्सवर असे हिडीस चेहरे सहज दृष्टीस पडतील.
स्त्रासबर्ग येथील कथिड्रल गोथिक पद्धतीचे आहे. तिथे अशा प्रकारचे गरगॉयल पाहिल्याचे आठवते. पण तेव्हा यामागचा इतिहास ठाउक नव्हता.

----
“What people say about you is none of your business” - Sean Stephenson

इमारतींबरोबरच

इमारतींबरोबरच जुन्या काळातील पोहण्यासाठी राखीव अशा विहिरींमधील पाणी खेळते राहावे व त्यातील पाण्याचा निचरा होत रहावा म्हणून जवळच्या नदीपात्रात किंवा ओढ्याच्या काढांवरही अशी गोमुखे पहावयास मिळतात. मंचरमधील सुप्रसिद्ध पाच पांडवांच्या विहिरीमधील पाण्याचा निचरा जवळच्याच (साधारण २०० फूट अंतरावरील) ओढ्यात होण्यासाठी असे एक गोमुख बांधलेले आहे. असाच प्रकार मंचरजवळील एका वाडीवरील अकबर बावडी या नावाच्या पोहण्याच्या विहिरीतही आहे. दुर्दैवाने त्यांची चित्रे उपलब्ध नाहीत. कुठे मिळाल्यास इथे लावीन.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

नंदी

माहितीपूर्ण लेख ! आवडला.
मडीकेरीच्या मंदिरांच्या खांबांवर नंदी आहे हाही ग्रोटेस्क का?

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

नंदी

नंदीला ग्रोटेस्क म्हणणे मला योग्य वाटत नाही. नंदीमध्ये काही भीतीदायक, कुरूप, चमत्कृतीपूर्ण (?) आहे असे वाटत नाही.
निदान मलातरी. ;-) लहानपणी नंदीबैलाला घाबरणारी मुलंही बघितली आहेत.

वा !

वा ! फारच छान लेख. पुढचा भाग वाचण्यास उत्सुक आहे.
वरील प्रतिसादात नंदनने जो रामदेवरायाचा उल्लेख केला तो मला पण आठवला. (त्याची विटंबना पाहूनच हरपाळदेव हा त्याचा जावई पुन्हा उठाव करता झाला असेही आठवले. अर्थातच चुभू ..)
देवळात खांबांवरती आकाश तोलणारे यक्ष असतात असा माझाही समज आहे.

हे विचित्र चेहरे आणि त्यामागची कारणे देणारा लेख आवडला.
आपल्या देवळांत उंबर्‍यावर अश्या तर्‍हेचे काही विचित्र मुखवटे असतात. देवळात जाताना त्यावर पाय देऊन जावे लागते (आपल्या अहंकाराचे ते प्रतिक असते असे ऐकून आहे.)
--लिखाळ

एक उथळ विचार

आपला लेख आवडला. ही शिल्पे पक्शी दूर रहावेत म्हणून तर नसतील?

बुजगावण्यासारखी??

नाही, विचार उथळ नाही :-) विचार करण्याजोगा आहे. असा उल्लेख मला सापडला नाही परंतु पक्षी आणि पक्ष्यांच्या विष्ठेमुळे इमारतीचे सौंदर्य कमी होऊ नये म्हणून असे हिडीस पुतळे लावण्याची कल्पना रोचक आहे.

पण, मग रस्त्यांवरील पुतळ्यांचे किंवा आपल्याकडील पुतळ्यांचेही पक्ष्यांनी (विशेषतः कबुतरे) काय हाल केलेले असतात ते पाहून पक्ष्यांना घाबरवायला हे पुतळे ठेवलेले नसावेत असे वाटले.

क्ष हा kSha किंवा X या बटणांचा वापर करून लिहावा.

थोडे खोलात

थोडा विचार केल्यावर वाटते की पक्षी* पुतळ्यान्च्या वरून जाताना विधी उरकतात. गरगळ्यान्च्या बाबतीत मात्र कदाचित पक्ष्यानी घरटी करून पाणी तुम्बू नये असा हेतू असावा. अर्थात हे धादान्त चूक असण्याची शक्यता आहे. उपयूक्तता हे एकच परिमाण वापरल्याने असे वाटले.

*क्ष हा kSha किंवा X या बटणांचा वापर करून लिहावा (आभारी आहे)

कळस

फारच सुंदर लेख. परदेशातल्या जुन्या काळातल्या इमारतींवर अशी शिल्पे असलेली मी पाहिली आहेत, पण त्यांना काय म्हणतात हे माहीत नव्हते. ते भयानक चेहेरे आपल्यावर नजर ठेवून आहेत ही कल्पना भन्नाट आहे.

आपल्याकडील बहुतेक मंदिरांवर कळस किंवा शिखरे असतात, निदान उतरते छप्पर असते. त्यात पावसाचे पाणी साठायचा प्रश्न येत नसल्यामुळे त्याचा निचरा करण्यासाठी वेगळी तोटी लागत नाही. रौद्र किंवा बीभत्स रसातल्या चित्रांसाठी वेगळी जागा ठेवली असल्याचे मी पाहिले नाही.

लेख आवडला...

सुरेख लेख. पुढच्या भागांची वाट बघत आहे.

-
ध्रुव

 
^ वर