इन्द्राय इन्दो परिस्रव ।।
भारतात बरीच मद्यप्रिय लोकं जर ऋषीमुनी सोमरस पित होते तर आम्ही मद्यपान करणे गैर कसे अशी मखलाशी करतात. त्यावर मी बरेच दिवस विचार करीत होतो की ऋग्वेदात अनेक ठिकाणी मद्यपान करू नका, जुगार खेळू नका असे सांगितले असताना ही मंडळी असे कसे म्हणतात. खरोखरच सोमरस हा दारूचा प्रकार आहे का?
मात्र २-३ आठवड्यापूर्वी डिस्कव्हरीवर "द स्टोरी ऑफ इंडिया" हा कार्यक्रम पाहत असताना त्याचा निवेदक अचानक म्हणाला, सोमरसाचा शोध घेण्यासाठी आपल्याला बलुचिस्थानला जावे लागेल. तेथील बाजारात आजही सोमरस नावाचे पेय मिळते जे हर्बल टी सारखे असते आणि जे प्यायल्यामुळे उत्साह, जोम मिळतो. इतकेच नव्हे तर ती हिरवी वनस्पतीसुद्धा दाखवली जी दगडाने ठेचल्यावर जिच्यातून तो सोमरस बाहेर पडतो. मात्र हा सोमरस आज ही न आंबवता ताजाच प्यायला जातो.
त्यानंतर योगायोगाने मला गुंडोपंत हरिभक्त कृत "ऋग्वेदाची ओळख", कर्नाटक प्रकाशन संस्था (१९६१) हे दुर्मिळ पुस्तक मिळाले. त्यात लेखक लिहितो -ऋग्वेदाच्या नवव्या मंडळात सर्व ११४ सूक्तांत केवळ सोमरसाचे वर्णन केले आहे. सोम ही वनस्पती आर्जिक देशांत होते. ऋजु म्हणजे सरळ. त्यावरून आर्जिक म्हणजे सरळ वृत्तीच्या लोकांचा देश. ती वनस्पती पर्वत शिखरावरून आणून तिच्यावर पाणी शिंपडून ती ओली ठेवीत असत. मग बैलाचे कातडे अंथरून त्यावर ती ओली सोमवल्ली ठेवीत आणि दगडी बत्त्याने ठेचून तिचा रस काढीत. ह्या रसात पाणी मिसळून तो चांगला ढवळीत आणि तो दशापवित्र नावाच्या गाळण्यातून गाळीत.
ह्या गाळण्यात ओतलेल्या रसाला उद्देशून ऋषि म्हणतात : एखाद्या मस्त घोड्याला मोतद्दाराने धुवावे तसे ह्या सोमाला १० युवती (हाताची दहा बोटे) स्नान घालीत आहेत.
तर गाळण्यातून टपकणार्या रसाच्या थेंबांकडे पाहून ऋषिंची प्रतिभा उचंबळून येई आणि हर्षनिर्भर होऊन ते म्हणतात - लहान मुलांप्रमाणे नाचत बागडत हा तेजस्वी सोम पवित्रातून हजारो धारांनी खाली पाझरत आहे.
तर शिशु आंगिरस मुनी सोमाला म्हणतो, -
अश्वो वोळ्हा सुखं रथं हसनाम उपमन्त्रिण:
वार् इत् मण्डूक इच्छति । इन्द्राय इन्दो परिस्रव ।। ९-११२
घोडा म्हणतो ओढायला हलका रथ बरा, चैन करणारांना थट्टा मस्करीच हवी, बेडकाला डबके प्रिय, पण हे इंदो तू इन्द्रासाठी वाहत रहा.
असा हा इन्द्रासाठी निर्माण केला जाणारा सोमरस तयार होतो. तो ताजा रस पिऊन इन्द्राला जोम, ताकद, उत्साह येतो.
अस्य पीत्वामदानाम् इन्द्रो वृत्राणि अप्तति । जघान जघनत् च नु ।। ९-२३-७
स्फुरण निर्माण करणार्या सोमरसाचे प्राशन करून शतक्रतु इन्द्राने वृत्रांना मारले, आणि तो अजून ही त्यांना मारेल.
Comments
सोमरस पान
शरद
जिते रहो ! राजे, आपण तर या मधुशालानिवासी लोकांच्या हातातला चषकच हिसकावून घेतला कीं! आम्ही तर तुम्हाला
जाहिद-ए-उपक्रम ह्या पदावर नेमून टाकले.
समित्पाणी [एक अपेयपान न करणारा]
पवमान सोम
पवमान सूक्त म्हणून जे म्हटले जाते त्या सूक्तात हे पवमान (गाळल्या जाणार्या?) सोमाचे वर्णन आहे असे वाटते. चूभूद्याघ्या. तुम्ही दिलेली माहिती योग्य आहे असे वाटते.
'अप्तति' आहे की 'अप्रति' आहे?
पवमान
पवमान म्हणजे दशापवित्र ह्या बनातीच्या (?) गाळण्यातून जो सोमरस गाळून, स्वच्छ होऊन द्रोणकलशात येतो तो.
'अप्तति' आहे की 'अप्रति' आहे?
पुस्तकात हा शब्द अप्तति च दिलेला आहे जो मला सुद्धा डाचत आहे. माझ्या माहितीतील संस्कृत विद्वानांना विचारून पाहतो. मात्र तो मारणे ह्या अर्थी दिला असल्यामुळे अप्रति हा शब्द असेल असे वाटत नाही.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
संस्कृतस्य महिमवर्णनेन नास्ति साधितम् । सततसंभाषणेन तस्य जीवनं स्थिरम् ।।
अप्रति
ऋग्वेद मुळातून पाहिला, तिथे 'अप्रति' दिला आहे. मारणेसाठी जघान आलाच आहे.
पहिल्या सूत्रात(९.११२.०४) दुसर्या ओळीत 'शेपो रोमण्वन्तौ भेदौ' हे सुरुवातीचे तीन शब्द आहेत. ते गाळले आहेत असे दिसते. बाकी सर्व मुळाप्रमाणे.--वाचक्नवी
"अप्रति"
"अप्रति" चा माझ्याकडच्या शब्दकोशात अर्थ irremediable, अटळ, अनाथ असा दिला आहे.
'शेपो रोमण्वन्तौ भेदौ' हे सुरुवातीचे तीन शब्द आहेत. ते गाळले आहेत असे दिसते.
असेल बुवा, माझ्याकडच्या पुस्तकात एव्हढाच श्लोक दिला आहे.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
संस्कृतस्य महिमवर्णनेन नास्ति साधितम् । सततसंभाषणेन तस्य जीवनं स्थिरम् ।।
अप्रतिकार आणि अप्रति.
अटळ, अनाथ, दुबळा हे अप्रति(ती)कारचे अर्थ. परंतु 'अप्रति' चा अर्थ-प्रतिकार करण्यास अशक्य. हा अर्थ ऋग्वेदाच्या त्या ऋचात चपखल बसतो.
जाताजाता: अप्रतिकर म्हणजे विश्वासू.--वाचक्नवी
मागे उपक्रमावर चर्चा
गुंडोपंतांनी सुरू केली होती, विसुनाना यांनी उत्तम माहिती दिली होती (दुवा)
सोम म्हणजे आंबवलेली दारू नाही हे खरेच. सोम हे उद्दीपक आहे.
सौत्रामणि यज्ञात (आंबवलेली) दारू पीतात - मात्र हा सोमयाग नाही.
(ऋग्वेदात जरी बहुतेक ठिकाणी सोमाची स्तुती आहे, तरी सोम प्याल्याचे तोटेही कुठल्यातरी सोमसूक्तात सांगितलेले आहेत, असे कुठेतरी वाचल्याचे आठवते. [आंबवलेल्या] दारूबद्दलही प्रतिषेध लिहिला आहे काय?)
सोमाचे झाड
डिस्कव्हरी वर दाखवलेले व दुव्यात दाखवलेले सोमाचे झाड एकच आहे यात प्रत्यवाय नाही.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
संस्कृतस्य महिमवर्णनेन नास्ति साधितम् । सततसंभाषणेन तस्य जीवनं स्थिरम् ।।
हो!
डिस्कव्हरीवरचा तो कार्यक्रम मी सुद्धा पाहिला होता. बाकी दारु पिणारे दु:खातही पितात आणि सुखात आनंद साजरा करायलाही पितात. कारण असले म्हणजे झाले!
-सौरभदा
जाहिद
शरद
जाहिद म्हणजे दारू पिण्यापासून लोकांना रोखणारा सरकारी अधिकारी किंवा धर्मगुरू. लोकांना उपदेशाचे [दारूऐवजी]
डोस पाजणे हाच उद्योग असल्याने मद्यप्रेमींचा एक नंबरचा शत्रू.शायरांनी त्याचीए टर उडविण्याकरिता अनेक शेर लिहले
आहेत.
लुत्फ़े मय तुझसे क्या कहूं जाहिद
हाय कंबख्त,तुने पी ही नही किंवा
जाहिद शराब पिने दे मस्जिदमे बैठकर
या वो जगह बता दे जहॉ खुदा न हो
हे दोन प्रसिध्द शेर.
समित्पाणी
छे, छे, छे...
शरदसाहेब आपला काहितरी गैरसमज होतोय. दारु पिऊ नका असे सांगणारा मी कोण? आणि मला असे सांगायची गरजच काय? मी तर व्यक्तीस्वातंत्र्याचा पुरस्कार करतो. मला वाटते ही सर्व मते आपलीच आहेत आणि आपण ती माझ्या तोंडात कोंबायचा प्रयत्न करत आहात.
मी फार तर असे म्हणेन की आपण जर चवीने शेण खात असू तर ते कबूल करावे, उगाच पूर्वीच्या काळी यज्ञकर्मात गोमयाला किती स्थान होते असे संभावितासारखे म्हणू नये. (पहा, धनंजयरावांनी दिलेला दुवा)
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
संस्कृतस्य महिमवर्णनेन नास्ति साधितम् । सततसंभाषणेन तस्य जीवनं स्थिरम् ।।
सोम
शरद
ऋजुसाहेब,
प्रथम माझ्या गैरसमजाबाबत.आपल्या लेखातले पहिले वाक्य हे भारतात बरीच मद्यप्रिय लोकं जर ऋषीमुनी सोमरस पित होते तर आम्ही मद्यपान करणे गैर कसे अशी मखलाशी करतात. त्यावर मी बरेच दिवस विचार करीत होतो की ऋग्वेदात अनेक ठिकाणी मद्यपान करू नका, जुगार खेळू नका असे सांगितले असताना ही मंडळी असे कसे म्हणतात. खरोखरच सोमरस हा दारूचा प्रकार आहे का? आणि आपण ते साधार सिध्दही केलेत.नंतर अनेक विद्वत्जनांनी त्याला मान्यताही दिली.माझ्या मते आपण मधुशालावासीयांच्या पायाखालची सतरंजीच ओढलीत. पूर्वासूरींचा हवाला देत चषक उचलणाऱ्यांच्या हातातला पेला तुमच्या लेखाने नक्कीच हिंदकळला असणार. त्यावर खूश होऊन मी आपणाला दाद दिली.सनदही दिली.हा उर्दु शायरी वाचण्याचा परिणाम.असो. आपण नाराज होऊ नका.मी आपली माफ़ी मागतो व नेमणणूकही रद्द करतो.चू.भू.दे.घे.
आता आपल्या गैरसमजाबद्दल. मी लिहलेल्या दोन ओळीत कुठलेही मत मांडलेले नाही. अभ्यास नसतांना कसले डोंबल्याचे मत देणार? दोनही ओळी आपल्या कौतकाच्या आहेत.नवीन पिढीतील कोणीही व्यवसायाच्या बाहेरच्या विषयाचा अभ्यास करून चार ओळी लिहत असतील तर मला त्याचे अप्रूपच आहे. असेच लिहीत रहा.
अवांतर ; मित्रांच्या तोंडात कोंबावयाला भेळ, कांदाभजी असले चांगले पदार्थ असतांना मते कशाला कोंबायची?
आ.न.
समित्पाणी
धन्यवाद.
त्यावर खूश होऊन मी आपणाला दाद दिली.
धन्यवाद.
पण माझ्या आठवणीप्रमाणे मी आपल्याला खाजगीत (आपल्या खरडवहीमध्ये) जाहिद म्हणजे काय असे विचारले होते. आपण त्याला जाहिरपणे उत्तर न देता खाजगीतच उत्तर दिले असतेत तर आपल्या तथाकथित सद् हेतु बद्दल मनात शंका आली नसती.
असो. मरणान्ति वैराणि । एकदा गैरसमजाचा मृत्यु झाला की उरतो तो केवळ स्नेहभाव.
असाच लोभ कायम ठेवावा,
कळावें,
आपला नम्र,
ऋजु.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
संस्कृतस्य महिमवर्णनेन नास्ति साधितम् । सततसंभाषणेन तस्य जीवनं स्थिरम् ।।