सृजनशीलता - भाग २ - गेलेले परत मिळवणे

मागील भागांत म्हंटल्याप्रमाणे सर्वसामान्य प्रौढ माणसांच्या विचारप्रक्रियेंत उजव्या मेंदूचा वापर जवळजवळ नसतोच. हे कसे घडून येते?

मनुष्य लहान असतांना मेंदूच्या दोन्ही भागांचा व्यवस्थित वापर करीत असतो. रस्त्यावर गाडी चालवण्याची कल्पना करणारा मुलगा समोरून ट्रक येतांना दिसला तर बाजूला होतो. पण भोवतालची वडीलधारी माणसे, ज्यांच्यावर तो अवलंबून असतो, ते त्याच्या त्यांना अवास्तव वाटणार्‍या कल्पनांना फारसे उत्तेजन देतांना आढळून येत नाहीत. इतकेच नाही तर कित्येक वेळा त्याबद्दल तो इतरांच्या टीकेचा व उपहासाचा विषय होतो. अशा परिस्थितींत इतरांबरोबर टिकून राहण्यासाठी तो ज्या तडजोडी करतो त्यांत उजव्या मेंदूचा वापर न करणे ही एक तडजोड असते. जसजसा माणूस मोठा होत जातो तसतसे व्यावहारिकतेचे दडपण वाढत जाते. या वाढत्या दडपणाखाली कुठलीही नवीन कल्पना (पर्याय) अव्यवहार्य, वेळेचा अपव्यय करणारी, वाटून ती झिडकारली जाते. त्यामुळे माणसाचे जीवन चाकोरीबद्ध होऊन जाते; इतके की चाकोरीबाहेरच्या कल्पना/पर्याय त्याला सुचतही नाहीत. नेहमींच्या व्यवहारांतील उदाहरणे घेऊन सांगायचे तर रोज ऑफिसला जाणारा मनुष्य ठराविक रस्त्यानेच मार्गक्रमण करतो. परिस्थितीने लादल्याशिवाय आपणहून तो कधी बदल म्हणून दुसर्‍या मार्गाने जात नाही. घरांतील फर्निचर व जेवणाचे टेबल यांच्या जागा बदलण्याचा विचारही सहसा त्याच्या मनांत येत नाही. हॉटेलमध्ये गेल्यावर तो काही ठराविक पदार्थांपैकीच पदार्थ मागवतो. मेनूकार्डावरील तीस चाळीस पदार्थांमधून कधी न चाखलेला पदार्थ मागवण्याचा तो विचार करीत नाही. (बरोबर असलेल्या त्याच्या लहान मुलाने वेगळा पदार्थ सांगितला तर त्याची प्रतिक्रिया काय असते ते वेगळे सांगायला नको). असे का करीत नाही म्हणून त्याला विचारल्यास आपल्या चाकोरीबद्ध निवडीचे तो काही तरी (चाकोरीबद्ध) समर्थनही देतो.

अर्थात् ही परिस्थिति बदलता येणार नाही असे नाही. मात्र त्यासाठी सुस्त झालेल्या उजव्या मेंदूला कार्यप्रवण करावे लागेल. ही गोष्ट प्रत्येकाच्या आयुष्यांत अपघाताने कधीकधी तात्पुरती होत असते. पण प्रतिभावंतांप्रमाणे सृजनशीलता हा आपला स्वभाव व्हायला हवा असेल तर असे अपघाती अनुभव पुरेसे होणार नाहीत. त्यासाठी प्रयत्नाने ते कौशल्य पुनरुज्जीवित करावे लागेल.

प्रतिभावंतांचे सृजन व्यवहारापलीकडे विचार न करणार्‍यांनाही पसंत पडते. ते तर्काला सोडून किंवा अव्यावहारिक असते तर तसे झाले नसते. याचा अर्थ सृजनशीलतेंत मेंदूच्या दोन्ही भागांचा सहभाग असला पाहिजे.

स्वतःमधली सृजनशीलता विकसित करण्यासाठी मेंदूच्या दोन्ही भागांचा वापर करण्याचा सराव कसा करावा याचे तंत्र एडवर्ड् बोनो यांनी आपल्या 'सीरियस् क्रिएटिव्हिटी' या पुस्तकांत दिले आहे. त्याविषयी पुढील भागांत पाहू.

(क्रमश:)

Comments

छान

>>त्यासाठी प्रयत्नाने ते कौशल्य पुनरुज्जीवित करावे लागेल.

पुढिल भागाची वाट पाहातो आहे.

+१

वाचत आहे.

+१

छान चालू आहे.. पुढील भागांची वाट पाहतोय

-ऋषिकेश

सुंदर

सुंदर लेखमाला. वाचत आहे. काहीसे याच प्रकारचे लिखाण काही दिवसांपूर्वी इथे वाचले होते.

----
"Those are my principles. If you don't like them, I have others." -- Groucho Marx
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

एक प्रश्न

शरद,

छान लिहित आहात. वाचते आहे. पुलेशु.

सर्वसामान्य प्रौढ माणसांच्या विचारप्रक्रियेंत उजव्या मेंदूचा वापर जवळजवळ नसतोच.

उजवेखोर माणसांबद्दल बरोबर आहे मला वाटते हे. याउलट प्रक्रिया डावखुर्‍या माणसांमध्ये होते असे ऐकून आहे परंतु नक्की माहिती नाही. आपल्यास माहिती असल्यास वाचायला, समजून घ्यायला निश्चितच आवडेल.

लिओनार्ड् दा विंची

उजवेखोर माणसांबद्दल बरोबर आहे मला वाटते हे. याउलट प्रक्रिया डावखुर्‍या माणसांमध्ये होते असे ऐकून आहे परंतु नक्की माहिती नाही. आपल्यास माहिती असल्यास वाचायला, समजून घ्यायला निश्चितच आवडेल.

लिओनार्ड् दा विंचीने बरेचसे लिखाण डाव्या हाताने व उलटे (आरशांत सुलट दिसणारे) केले आहे असे मी ऐकून आहे. कदाचित त्यामुळे त्याचा उजवा मेंदू अधिक कार्यप्रवण झाला असावा व हे त्याच्या सृजनशीलतेचे रहस्य असावे.

डावखुर्‍यांची दुनिया

शरद,

प्रतिसादाची दखल घेऊन त्यावरील आपले मत लिहिल्याबद्दल धन्यवाद.

उजवेखोर माणसांमध्ये जर उजव्या मेंदूचा वापर नसल्यात जमा असेल तर तो डावखुर्‍या माणसांमध्ये डाव्या मेंदूच्या वापराबद्दल असावा असे कुठेतरी वाचल्यासारखे वाटते. आपण लिहित असलेली मालिका ही केवळ उजवेखोरांसाठी उपयुक्त होईल असे म्हटल्यास धाडसाचे विधान होणार नाही मग ! जगातील एकूण लोकसंख्येपैकी २०% लोक डावखुरे असतात म्हणे तर अशा डावखुर्‍यांसाठीही प्रस्तुत लेखमालेत काही लिहू शकलात तर बघा. :-)

डावखुर्‍यांमध्येही दोन प्रकार असतात - एक सच्चे डावखुरे ( लिहिणे, जेवणे सारख्या गोष्टीही डाव्याच हाताने करणारे ) आणि एक अर्धुमुर्धे डावखुरे ( लिहिणे, वाचणे वगैरे गोष्टी उजव्या हाताने करायची सवय झालेले.. तरीही इतर गोष्टीतून डावखुरेपणा सिद्ध करणारे ! ) मग या लोकांमध्ये मेंदूच्या वापराबद्दल काही फरक होत असेल का? डावखुर्‍यांना जबरदस्तीने उजवेखोर बनवण्याचा प्रयत्न करू नये असेही कोणीतरी सांगितल्याचे स्मरते, त्यामागे असेच काही वैद्न्यानिक कारण असण्याची तर शक्यता नाही ना? उजवेखोरांनी जर प्रयत्नपुर्वक डावखुरेपणा शिकला तर त्यांच्या मेंदूवापरात आपोआप फरक पडेल का?

:)) भरपूरच प्रश्न झाले मला वाटतं.. यांची उत्तरे शोधायचा यथावकाश मीही प्रयत्न करेनच, कोणाला माहिती असल्यास त्यांनी सांगितल्यास तर उत्तमच होईल !

डिस्क्लेमर : मी अर्धीमुर्धी डावखुरी असल्याने या विषयात मला जास्त रस आहे.

वाट पाहतो आहे!

बर्‍याच दिवसांनी चांगले वाचायला मिळते आहे.

आपला
गुंडोपंत

उशीरा वाचायला घेतली

मी ही मालिका आज वाचायला घेतली. दोन्ही भाग खूपच आवडले.

मला स्वतःला रेस्टॉरंटात गेल्यावर अमुक एक पदार्थ मागवायचीच सवय आहे. बरेचदा खाऊन उठल्यावर 'हे काय दरवेळेस आपण हेच खाऊन येतो' हे जाणवते किंवा घरातली एखादी लहानशी वस्तू एकदा जागेवर ठेवली की काही दिवसांनी तिच्यासाठी दुसरी कुठली चांगली जागा आहे का असा विचार डोक्यात आला तरी झिडकारला जातो हे जाणवले.

सुप्त मनातील खजिन्याचा शोध

सुप्त मनावर असलेली जागृत मनाची पकड ढिली पडली की नवनिर्मिती घडू लागते. माणसाचा मेंदू अल्फा-थीटा अवस्थामध्ये आंदोलित होतो तेव्हा सुप्त मनात दडलेल्या असंख्य गोष्टी बाहेर येउ लागतात. ज्यांना हा अनुभव घ्यायचा आहे त्यानी http://www.freewebs.com/yuyutsu/musictherapy.htm या लिंक वर जाउन् काही 'फुकट' असलेले ट्रॅक्स ऐकून पहावेत. सुप्त मनातील खजिन्याचा शोध घेण्यास ते नक्की उप्योगी पडतील.

 
^ वर