सृजनशीलता - भाग २ - गेलेले परत मिळवणे

मागील भागांत म्हंटल्याप्रमाणे सर्वसामान्य प्रौढ माणसांच्या विचारप्रक्रियेंत उजव्या मेंदूचा वापर जवळजवळ नसतोच. हे कसे घडून येते?

मनुष्य लहान असतांना मेंदूच्या दोन्ही भागांचा व्यवस्थित वापर करीत असतो. रस्त्यावर गाडी चालवण्याची कल्पना करणारा मुलगा समोरून ट्रक येतांना दिसला तर बाजूला होतो. पण भोवतालची वडीलधारी माणसे, ज्यांच्यावर तो अवलंबून असतो, ते त्याच्या त्यांना अवास्तव वाटणार्‍या कल्पनांना फारसे उत्तेजन देतांना आढळून येत नाहीत. इतकेच नाही तर कित्येक वेळा त्याबद्दल तो इतरांच्या टीकेचा व उपहासाचा विषय होतो. अशा परिस्थितींत इतरांबरोबर टिकून राहण्यासाठी तो ज्या तडजोडी करतो त्यांत उजव्या मेंदूचा वापर न करणे ही एक तडजोड असते. जसजसा माणूस मोठा होत जातो तसतसे व्यावहारिकतेचे दडपण वाढत जाते. या वाढत्या दडपणाखाली कुठलीही नवीन कल्पना (पर्याय) अव्यवहार्य, वेळेचा अपव्यय करणारी, वाटून ती झिडकारली जाते. त्यामुळे माणसाचे जीवन चाकोरीबद्ध होऊन जाते; इतके की चाकोरीबाहेरच्या कल्पना/पर्याय त्याला सुचतही नाहीत. नेहमींच्या व्यवहारांतील उदाहरणे घेऊन सांगायचे तर रोज ऑफिसला जाणारा मनुष्य ठराविक रस्त्यानेच मार्गक्रमण करतो. परिस्थितीने लादल्याशिवाय आपणहून तो कधी बदल म्हणून दुसर्‍या मार्गाने जात नाही. घरांतील फर्निचर व जेवणाचे टेबल यांच्या जागा बदलण्याचा विचारही सहसा त्याच्या मनांत येत नाही. हॉटेलमध्ये गेल्यावर तो काही ठराविक पदार्थांपैकीच पदार्थ मागवतो. मेनूकार्डावरील तीस चाळीस पदार्थांमधून कधी न चाखलेला पदार्थ मागवण्याचा तो विचार करीत नाही. (बरोबर असलेल्या त्याच्या लहान मुलाने वेगळा पदार्थ सांगितला तर त्याची प्रतिक्रिया काय असते ते वेगळे सांगायला नको). असे का करीत नाही म्हणून त्याला विचारल्यास आपल्या चाकोरीबद्ध निवडीचे तो काही तरी (चाकोरीबद्ध) समर्थनही देतो.

अर्थात् ही परिस्थिति बदलता येणार नाही असे नाही. मात्र त्यासाठी सुस्त झालेल्या उजव्या मेंदूला कार्यप्रवण करावे लागेल. ही गोष्ट प्रत्येकाच्या आयुष्यांत अपघाताने कधीकधी तात्पुरती होत असते. पण प्रतिभावंतांप्रमाणे सृजनशीलता हा आपला स्वभाव व्हायला हवा असेल तर असे अपघाती अनुभव पुरेसे होणार नाहीत. त्यासाठी प्रयत्नाने ते कौशल्य पुनरुज्जीवित करावे लागेल.

प्रतिभावंतांचे सृजन व्यवहारापलीकडे विचार न करणार्‍यांनाही पसंत पडते. ते तर्काला सोडून किंवा अव्यावहारिक असते तर तसे झाले नसते. याचा अर्थ सृजनशीलतेंत मेंदूच्या दोन्ही भागांचा सहभाग असला पाहिजे.

स्वतःमधली सृजनशीलता विकसित करण्यासाठी मेंदूच्या दोन्ही भागांचा वापर करण्याचा सराव कसा करावा याचे तंत्र एडवर्ड् बोनो यांनी आपल्या 'सीरियस् क्रिएटिव्हिटी' या पुस्तकांत दिले आहे. त्याविषयी पुढील भागांत पाहू.

(क्रमश:)