ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी .. प्रश्नोत्तरातून सुसंवाद (भाग २) प्रकरण ६ - अखिल भारतीय ज्योतिष संमेलन, सोलापूर २००१ च्य निमित्ता

अखिल भारतीय ज्योतिष संमेलन, सोलापूर २००१ च्य निमित्ताने

सोलापूरला दि. २५, २६ व २७ डिसेम्बर २००१ ला झालेले आखिल भारतीय ज्योतिष संमेलन हे अत्यंत महत्वाचे व आगळे वेगळे ठरले. फलज्योतिष हा विषय विद्यापीठ स्तरावरील अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा यूजीसीचा निर्णय हा विषय बहुचर्चित झालेला होता. त्या पार्श्वभूमीवर संमेलनाध्यक्ष काय भूमिका मांडतात यावर सर्वांचेच लक्ष होते. संमेलनात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष व फलज्योतिष विरोधक श्री. दादा चांदणे यांना सन्मानाने व्यासपीठावरुन आपली भूमिका मांडण्याची संधी दिली गेली. ही गोष्ट विरोधाची दखल व आदर दोन्हीची सूचक आहे. संमेलनाध्यक्ष श्री. व.दा. भट हे पुण्याचे ज्येष्ठ जाणकार व प्रथितयश ज्योतिषी आहेत. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात अनेक महत्वाच्या मुद्दयांना स्पर्श केला. त्यांच्या भाषणात दोन महत्वाचे भाग होते. एक म्हणजे ज्योतिषांनी आता काय टाकून द्यायला पाहिजे व काय स्वीकारले पाहिजे आणि दुसरा म्हणजे शास्त्राचे वेगळे स्वरुप व टीकाकारांचे आक्षेप.
श्री. व.दा. भट यांच्या भाषणाचा सारांश व त्यावरील आमचे भाष्य

१) समाजजीवनावर नको तितका परिणाम :- ज्योतिषशास्त्राचा समाजजीवनावर नको तितका परिणाम भारतात झाला आहे ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. धर्माचा समाजजीवनावर परिणाम आपण समजू शकतो पण त्याचा अतिरेक झाला तर काय परिणाम होतात हे आपण अनुभवतो आहेात. आश्लेषा नक्षत्राची मुलगी सासूस वाईट, मंगळाची कुंडली, मूळ नक्षत्रावरचा जन्म, साडेसाती या गोष्टी समाजात जास्त पसरल्या. अशा गोष्टी पंचांगात छापू नयेत. क्षुल्लक, किरकोळ, एकांगी ज्योतिषतत्वाची एवढी लोकप्रियता, समाजभिसरण निश्चितच चांगले नाही.
भाष्य :- चला! या निमित्ताने तरी ज्योतिषशास्त्रातल्या 'बागुलबुवा` संकल्पना पुसट होण्यास भरीव मदत होईल. या कामाची जबाबदारी आता ज्योतिषांवरच आली आहे.

२) ऋषीमुनींचे अंधानुकरण कशाला? :- पंधरावे ते विसावे शतक या दरम्यान प्राचीन ग्रंथाशिवाय नवीन विचारांचे ग्रंथ नव्हते. बाबा वाक्यम् प्रमाणम् हे आतापर्यंत चालू शकले ऋषीमुनींनी सांगितलेल्या सर्वच गोष्टी शिरोधार्य मानाव्या अशा नाहीत. त्या परिस्थितीला अनुरुप असे शास्त्र, नियम तयार केले गेले. सध्या समाजात ज्योतिषशास्त्राच्या अनेक गोष्टींबद्दल गैरसमज आहेत आणि सुमार बुद्धीच्या ज्योतिषांनी त्याला खतपाणी घातले आहे. स्वार्थ साधण्यासाठी कालसर्प योगाचा उपयोग केला जातो.
भाष्य :- फलज्योतिषाची विश्वासार्हता किंवा प्रामाण्य ठरविण्यासाठी प्राचीनत्वाचा,ऋषीमुनींचा आधार घेणाऱ्यांनी आता याचा विचार करावा. फलज्योतिषाच्या बदनामीला विरोधक कारणीभूत आहेत की हे तथाकथित ज्योतिषीच कारणीभूत आहेत हे तरी आता स्वच्छ कळाले. लोकांच्या कुंडलीतला कालसर्प येाग हा त्रिंबकेश्वरला विधी करणाऱ्या पुरोहित कम ज्योतिषांच्या कुंडलीतला धनयोगच ठरला आहे. आतातरी ज्योतिषांनी आपल घर साफ करायला सुरुवात करावी.फलज्योतिषातील अनिष्ट प्रवृत्तींना खतपाणी घालणाऱ्या घटकांचा बीमोड हा ज्योतिषांनीच केला पाहिजे.

३) धर्मशास्त्र व ज्योतिषशास्त्र गल्लत नको. :- भारतीय ज्योतिषशास्त्रावर धर्मशास्त्राचे प्रचंड प्रमाणात आक्रमण आहे. ज्योतिष हे धर्मशास्त्राशी सुसंगत असावे हे विशिष्ट मर्यादेपर्यंतच योग्य आहे. मुसलमान ख्रिश्चन या धर्मांसाठीही ज्योतिषशास्त्र आहे. पितृपंधरवडा हा ज्योतिषशास्त्रदृष्टया अशुभ नसतोच. गोदावरीच्या दक्षिणेला एक नियम व उत्तरेला एक नियम करता येणार नाही. रत्नधारण, तोडगे, उपाय यांना जास्त किंमत देउ नये, त्याचे स्तोम माजवू नये. अचूक भविष्यासंबंधी शास्त्राच्या कुवतीपेक्षा जास्त दावे करणाऱ्या काही ज्योतिष पद्धती लोकांच्या या शास्त्रासंबंधी अनाठायी अपेक्षा वाढवत आहेत. तसेच व्यावसायिक ज्योतिषांकडून करण्यात येणाऱ्या अवास्तव जाहीराती या शास्त्रासंबंधी गैरसमज पसरवित आहेत. याची दखल ज्योतिषमासिकांतून घेतली गेली पाहिजे.
भाष्य :- साताऱ्यात १९९५ साली झालेल्या अधिवेशनात त्यावेळचे संमेलनाध्यक्ष कृष्णराव वाईकर यांनी ज्योतिषाला धर्मशास्त्राचा अपरिहार्य भाग मानले होते. ज्योतिषाला विरोध करणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीला वठणीवर आणण्यासाठी त्या आधारे शिवसेना, विहिंप सारख्या संघटनांना हाताशी धरुन 'कुंकवाची उठाठेव` केली होती. ( संदर्भ म.टा अग्रलेख ३१-१०-९५ ) धर्माशी फारकत घेतली नाही तर फलज्योतिष हे कालसुसंगत राहणार नाही तसेच ते संकुचित राहील याचे भान या वेळेच्या संमेलनाध्यक्षांना आहे. बऱ्याच पोटार्थी ज्योतिषांना ही बाब रुचणारी नाही. मात्र पाश्चात्य देशात फलज्योतिष हे धर्माशी निगडीत नाही.
ज्योतिषमासिकांनी शास्त्रासंबंधी गैरसमज पसरणाऱ्या गोष्टी वा अवास्तव जाहिराती यांची दखल घ्यायची म्हणजे स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घ्यायचा कि काय? जातक लोक जेवढे अज्ञानी व अंधश्रद्ध राहतील तेवढे ज्योतिषांना सोयीचे असते. ते जर चिकित्सक बनले तर व्यावसायिक ज्योतिषी लोकांचे कसे फावणार?

४) ''फलज्योतिष हे शास्त्र नाहीच असे म्हणणाऱ्या व्यक्तिंचा वैचारिक गोंधळ स्पष्ट होतो. वास्तविक त्यांना हे 'भौतिक` शास्त्र नाही असे म्हणायचे असते. पदार्थ विज्ञान, रसायनशास्त्र वगैरे प्रकारच्या भौतिक शास्त्रांचा एक गट व मानवी जीवनाशी शरिराशी, मनाशी निगडीत शास्त्रांचा एक गट कल्पिला तर ज्योतिषशास्त्र हे पहिल्या गटाशी संबंधीत शास्त्र निश्चित नाही.``
भाष्य :- हे सर्व ज्योतिषांना मान्य असेल तर वादाचा एक मोठा तुकडा पडतो. फलज्योेतिषाचे समर्थन करताना ज्योतिष समर्थक हे भौतिक शास्त्रांचाच आधार घेउ पहातात. उर्जा, कॉस्मिक रेडिएशन, गुरुत्वाकर्षण, भरती ओहोटी, सौरडाग, चुंबकीय वादळे, यांचा फलज्योतिषाशी संबंध जोडून ते आधुनिक विज्ञानाच्या पंक्तीला बसवण्याचा प्रयत्न काही ज्योतिषी लोकच करत असतात. समजा फलज्योतिष हे इतर शास्त्रात जरी टाकले तरी इतर शास्त्रांना गृहीतके,प्रमेय नाहीत काय? इथे गृहीतकांमध्येच प्र्रचंड मतभिन्नता व अंतर्विसंगती आहे त्यामुळे ती स्पष्टपणे मांडता येत नाहीत ही वस्तुस्थिती नव्हे काय?

५) ''ज्योतिषशास्त्रा बद्दल जे काही आक्षेप, शंका, गैरसमज आहेत त्याचे मूळ कारण एखाद्या नवीन गोष्टीकडे पाहताना आपण ज्ञात ज्ञानाशी त्याची तुलना करतो त्यात आहे. माझया दृष्टिने इथेच खरी चूक होते. ज्योतिषशास्त्राला संपूर्णपणे वेगळा, स्वतंत्र असा आकृतीबंध आहे. इतर कोणत्याही शास्त्राच्या जवळ असे ते नाही. आपल्या पूर्वीच्या संकल्पना, परिमाणे, कसोटया या शास्त्रास लागू करण्याचा खटाटोप करणे चूक ठरेल.``
भाष्य :- ज्योतिषांनी हा वेगळा, स्वतंत्र आकृतीबंध मांडताना त्यांच्या संकल्पना, परिमाणे, वा कसोटया या तरी सुस्पष्ट असाव्यात. त्यात अंतर्विसंगती असू नये. तो तपासता येईल असा तरी असावा. त्या आकृती बंधाला जर श्रद्धा हे नाव दिलं तर ती व्यक्तिसापेक्ष बनते. ती तपासता येत नाही.

६) ''ज्योतिष हे बीजगणित आहे. अ + ब = क हे समीकरण बरोबर आहे. अ व ब च्या किमती स्थळ, काल परिस्थितीनुसार ठरवायच्या आहेत आणि असे करण्यात काही वावगे नाही.``
भाष्य :- मान्य! पण अ व ब च्या किमती नेमक्या कोणत्या? त्या केवळ स्थलकाल सापेक्ष आहेत की ज्योतिषी आणि जातक या नुसार बदलतात ? बीजगणिताला ही नियम असतातच की! शिवाय काही ज्योतिषी फलज्योतिषाला बीजगणित म्हणायला तयार नाहीत. त्यांच्या मते ज्योतिषाला अध्यात्म व उपासनेची जोड असावी लागते. नाही तर पुस्तकी पद्धतीने फलज्योतिष बीजगणितासारखे शिकता आले असते.

७) ''ज्योतिषशास्त्राचा मूळ प्रश्न गहन आहे. सूर्यमालेतील ग्रहांच्या परिणामाची अनुभूती तर येते पण नक्की कारणमीमांसा करता येत नाही. परिणाम नक्की कसे व कशामुळे होतात.? अल्फा बीटा किरणांमुळे? चुंबकीय लहरींमुळे? गुरुत्वाकर्षणामुळे? शरीरातील पेशी, मेंदूच्या पेशींवर परिणाम होतो काय? नदी वाहताना दिसते पण उगमाचा नक्की स्त्र्रोत कळत नाही. कारण अनेक स्त्रोत एकत्र येउन मिळत आहेत. उगमाचा शोध लागत नाही म्हणून नदीचे अस्तित्व नाकारायचे काय? आज जरी हे कोडे उलगडले नसले तरी भविष्य काळातही ते उलगडणारच नाही असे समजायचे का?``
भाष्य :- अनुभूतीत सापेक्षता आणून ते कोडेच ठेवण्याचा प्रयत्न ज्योतिष समर्थकांना नेहमीच फायद्याचा ठरला आहे. एकदा भौतिक विज्ञान नाही असे सांगितल्यावर भौतिक विज्ञानाच्या संकल्पनांचा आधार कशाला घ्यायचा? नदीचे उदाहरण इथे गैरलागू आहे कारण अनेक स्त्रोतातून ही नदी तयार होते हे विधानातच नमूद केले आहे. तो उगम काही एकच असणार नाही. ऋषीचे कूळ व नदीचे मूळ विचारु नये असे म्हणून भाबडया जातकावर वाक्चातुर्याचा प्रभाव फार तर टाकता येईल.

८) भविष्य पाहणे ही अंधश्रद्धा तर मुळीच नाही. अंधश्रद्धा म्हणणाऱ्या लोकांचा मानवी मनाचा अभ्यास कमी आहे. बुद्धीची अपरिपक्वता आहे. अज्ञाताचा पडदा दूर सारुन भविष्यकाळात काय दडले आहे. हे डोकावून पाहण्याची मानवी मनाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. मानवाला भविष्यकाळाबद्दल नेहमीच उत्कंठा कुतुहल असते.
भाष्य :- या मानवी मनाच्या नैसर्गिक प्रवृत्ती मुळेच फलज्योतिष टिकून आहे व भविष्यातही ते या ना त्या स्वरुपात टिकून राहणारच आहे. परंतु भविष्यकाळात काय दडले आहे हे आम्ही फलज्योतिषशास्त्राच्या आधारे निश्चितपणे सांगू शकतो असे मानणे ही अंधश्रद्धा आहे. संमेलनातच श्री. मोहन दाते यांनी सांगितले आहे , 'फलज्योतिष हे विज्ञान नसून श्रद्धा आहे.` प्रा. जयंत नारळीकर यांनी पण हेच तर सांगितले आहे. बहुसंख्य ज्योतिषी याच्याशी सहमत असतील तर उत्तमच! श्रध्दा ही व्यक्तिसापेक्ष असते हे सर्वमान्यच आहे.

_____________________समाप्त________________________

Comments

बरोबर नाही!

छे! अजिबातच कुणी इकडे बघत नाही हे बरोबर नाही!
त्यामुळे हे :)

मात्र पाश्चात्य देशात फलज्योतिष हे धर्माशी निगडीत नाही.
म्हणजे ते चांगले?

धर्माशी फारकत घेतली नाही तर फलज्योतिष हे कालसुसंगत राहणार नाही तसेच ते संकुचित राहील
अजिबात नाही! असे फारकत घेताच येणार नाही. असे करणे म्हणजे चहा मध्ये चहाच न घालता त्याला चहा म्हणण्यासारखे आहे. कृष्णराव वाईकर यांनी ज्योतिषाला धर्मशास्त्राचा अपरिहार्य भाग मानले होते.
वाईकर अजूनही आहेत. तेंव्हा त्यांनी मानले आहे असे म्हणायला काही हरकत नाही! तेच कशाला गुंडोपंतही तसेच मानतात!

''ज्योतिष हे बीजगणित आहे.
हे त्यांचे मत झाले. सर्व ज्योतिष्यांचे नाही... मला हे मत मान्य नाही!

फलज्योतिषाशी संबंध जोडून ते आधुनिक विज्ञानाच्या पंक्तीला बसवण्याचा प्रयत्न काही ज्योतिषी लोकच करत असतात. काही ज्योतिषी ... सगळे नाही!

त्यामुळे आपल्या भाष्यासही काही अर्थ उरत नाही!

आपला
गुंडोपंत

चालायचचं!

म्हणजे ते चांगले?

नाही. तसे नाही. फक्त वस्तुस्थिती मी सांगितली.

अजिबात नाही! असे फारकत घेताच येणार नाही. असे करणे म्हणजे चहा मध्ये चहाच न घालता त्याला चहा म्हणण्यासारखे आहे

ज्योतिष हे धर्माचे अंग आहे. धर्मात जसे काही कालसुसंगत बदल केले तसे ज्योतिषातही करावे लागले. हे बदल काही सनातनी लोकांना मान्य नसतात येवढेच. हिंदुएतर लोकांची कुंडली बनतेच ना! मग त्यांना ग्रहपुजा, ग्रहशांती, शनीस्तोत्र, नारायण नागबली, परिहार सांगितले तर त्यांच्या धर्माचरणाशी सुसम्गत होणार नाही ही त्यातली व्यवहारिक / तात्विक अडचण काही जातकांसाठी का होईना ज्योतिषांनाच जाणवली.

वाईकर अजूनही आहेत. तेंव्हा त्यांनी मानले आहे असे म्हणायला काही हरकत नाही! तेच कशाला गुंडोपंतही तसेच मानतात!

आम्हि पण मानतो. फक्त संमेलनाध्यक्ष म्हणून त्यांचे भाषण होते. म्हणुन 'होते' बोली भाषेतला भाग. आपण आहे म्हणु.

हे त्यांचे मत झाले. सर्व ज्योतिष्यांचे नाही... मला हे मत मान्य नाही!

मलाहि नाही. असे मानले तर.... चे ते भाष्य.

काही ज्योतिषी ... सगळे नाही!

म्हणुन मी काही म्हणालो.

त्यामुळे आपल्या भाष्यासही काही अर्थ उरत नाही!

अर्थपुर्ण भाष्य अद्याप मला जमले नाही!!!! अर्थस्य पुरुषो दासः तरीही.

ते बाकी काही ही असो ! गुंडोपंताच्या टिप्पणि शिवाय चर्चेला अर्थ उरत नाही.

प्रकाश घाटपांडे

हे मात्र सहमत

आज जरी हे कोडे उलगडले नसले तरी भविष्य काळातही ते उलगडणारच नाही असे समजायचे का?``
याशी मात्र मी सहमत आहे... उद्या वेगळे काही बाहेर येवूच शकेल याची शक्यता ठेवायला काय हरकत आहे...?
आपला
गुंडोपंत

ज्योतिष्यांची चलाखी

ज्योतिष्यांची चलाखी, त्यांच्या कोलांट्या उड्या आणि त्यांच्या दाव्यांमागील उघड खोटारडेपणा या लेखामालेतून पुरेसा स्पष्ट झालेला आहे.

आधी गुरुत्त्वाकर्षण, चुंबकीय, विद्युत शक्ती इ. भौतिक शास्त्राचा आधार घेऊन बघायचे. पण समोरच्या व्यक्तीला थोडासाही विज्ञानाचा परिचय असेल तर हे स्पष्टीकरण हास्यास्पद आहे हे लगेच कळते. मग "ज्योतिषशास्त्राला संपूर्णपणे वेगळा, स्वतंत्र असा आकृतीबंध आहे. इतर कोणत्याही शास्त्राच्या जवळ असे ते नाही. आपल्या पूर्वीच्या संकल्पना, परिमाणे, कसोटया या शास्त्रास लागू करण्याचा खटाटोप करणे चूक ठरेल" असे म्हणायचे. पण हा आकृतीबंध ठरवला कोणी? या तथाकथित ज्योतिष्यांना इतरांपेक्षा जास्त बुद्धिमत्ता आहे काय? ही आपल्याला हवे ते खरे म्हणण्यासाठी ही पळवाट नव्हे काय?

मुद्दा क्र. ७ तर अतिशय हास्यास्पद आहे. एके ठिकाणी भौतिकशास्त्राचे नियम लागू पडणार नाहीत म्हणायचे आणि पुन्हा जिथेजिथे संधी मिळेल तिथे अल्फा बीटा किरण, चुंबकीय लहरी, गुरुत्वाकर्षण असे म्हणत राहायचे. नदीचे उदाहरण तर अगदीच असंबद्ध आहे. नदीचा उगम आणि त्यात कोणकोणते प्रवाह येऊन मिसळले इत्यादी माहिती सहज मिळण्यासारखी आहे.

फलज्योतिषाचा धर्माशी विशेषतः हिंदू धर्माशी संबंध आहे हा निखालस खोटा दावा आहे. कोणत्याही धर्मग्रंथात तुमचे बरेवाईट ग्रहांवर अवलंबून आहे असे म्हटलेले नाही. जुन्या ग्रंथाचे जाऊ द्या, अगदी गीतेतही "जसे कर्म तसे फळ" असा निर्विवाद संदेश दिलेला आहे. ग्रहांचा मानवी जीवनावर (जन्मवेळे, स्थळाप्रमाणे वेगवेगळा) परिणाम ह्या कल्पनेचा आणि भारतीय तत्त्वज्ञानाचा/धर्मांचा काडीइतकाही संबंध नाही.

आपला
(तर्कसुसंगत) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~
"असत्याला अस्तित्व नाही आणि सत्याचा अभाव नाही"

सहमत आहे, नवी पिढी

>> ज्योतिष्यांची चलाखी, त्यांच्या कोलांट्या उड्या आणि त्यांच्या दाव्यांमागील उघड खोटारडेपणा या लेखामालेतून पुरेसा स्पष्ट झालेला आहे.

सहमत आहे. प्रत्येकाने वाचून, विचार करावा असेच हे लेख आहेत.

पण आता बर्‍याच नव्या पिढीतल्या विशेषतः उच्चशिक्षित मुलामुलींचा तसाही यावर विश्वास नाहीच आहे. नाही आहे म्हणण्यापेक्षा हे त्यांना "ऑब्वियसली ऍब्सर्ड" वाटते. शिवाय दैनंदिन जीवनात संबंध येत नसल्यानेही असेल. लग्नाच्या वेळीही पत्रिका वगैरे पाहण्याचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे ज्योतिष्यांचेच भविष्य फार काही उज्ज्वल नाही असे दिसते :)

 
^ वर