प्रायव्हेट लॅमिनची खुशाली

हॅरी लॅमिन एक साधारण सैनिक होता. १९१७ मध्ये पहिल्या महायुद्धात सहभागी होण्यासाठी तो फ्रांसला गेला. तिथून त्याने जमतील तशी त्याच्या बहिणीला आणि भावाला पत्रे धाडली. या पत्रांचा संग्रह त्याचा नातू बिल लॅमिन जपून ठेवला आहे आणि आता ही पत्रे त्याच्या अनुदिनीवर प्रकाशित होत आहेत. प्रत्येक पत्र ज्या तारखेचे आहे, त्याच तारखेला बरोबर ९० वर्षांनंतर प्रकाशित केले जात आहे. महायुद्धातून हॅरी घरी सुखरूप परत आला का याचे उत्तर मिळण्यासाठी वाचकांना शेवटचे पत्र प्रकाशित होईपर्यंत थांबावे लागेल. बरोबर उपलब्ध असतील तशी छायाचित्रेही दिली आहेत.

ही पत्रे वाचताना अनेक भावना मनात येतात. बर्‍याच वेळा त्या काळच्या परिस्थितीचे चित्र डोळ्यासमोर येते. आत्तापर्यंत युद्धाचे वर्णन करताना राष्ट्रप्रमुख, राजकारणी, सैन्यातील उच्चपदस्थ अधिकारी यांचा दृष्टीकोन बरेचदा समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर एका साध्या सैनिकाने अनुभवलेल्या युद्धाचे चित्र फारच वेगळे आहे असे जाणवते. यात मेसिनेस येथील युद्धाचाही उल्लेख आहे आणि ख्रिसमससाठी पाठवलेली ग्रीटींग कार्डही आहेत.

ही अनुदिनी आता जगभर लोकप्रिय होत आहे. वर्तमानपत्रे, न्यूज चॅनेल यावर तिचा उल्लेख होतो आहे. साधारण एक किंवा दोन पोष्टकार्डावर मावतील एवढ्या लांबीची ही पत्रे अगदी साधी आहेत. बरेचदा व्याकरणाच्या चुकाही आहेत. यात कुठलीही रोमहर्षक वर्णने नाहीत. आठवडाभर फक्त पाणी आणि बिस्कीटे यावर दिवस काढल्याचा उल्लेख, चॉकलेट किंवा केक घरून पाठवण्यासाठी मागणी, घरातल्या लहानग्यांची चौकशी, कधी एखादा सहकारी मरण पावल्याची बातमी आणि मधूनमधून हे युद्ध लवकर संपून घरी परत यायला मिळू दे अशी इच्छा. कदाचित यामुळेही असेल, पण ही पत्रे वाचताना नकळत आपणही हॅरीविषयी काळजी करायला लागतो, त्याच्या पुढच्या पत्राची वाट पहायला लागतो.

हा लेख इथेही वाचता येईल.

Comments

अभिनव प्रकार आहे

प्रत्येक पत्र ज्या तारखेचे आहे, त्याच तारखेला बरोबर ९० वर्षांनंतर प्रकाशित केले जात आहे.

अभिनव प्रकार आहे. :-)

राजेंद्र, एका आगळ्यावेगळ्या प्रकाराची माहीती इथे दिल्याबद्दल आभार.

आत्ता

आत्ता वाचायला सुरवात केली.. शिपायाची करून दिलेली ओळख, पात्रपरीचय आणि पहिली काहि पत्रे वाचली. फार अभिनव प्रकल्प तर आहेच् पण पत्र फारच प्रामाणिक आणि थेट भिडणारी वाटली.
राजेंद्र,
इथे ही माहिती दिल्याबद्दल अनेक आभार!! सगळी पत्र वाचून तपशीलवार प्रतिसाद देईनच
-ऋषिकेश

सहमत

आत्तापर्यंत युद्धाचे वर्णन करताना राष्ट्रप्रमुख, राजकारणी, सैन्यातील उच्चपदस्थ अधिकारी यांचा दृष्टीकोन बरेचदा समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर एका साध्या सैनिकाने अनुभवलेल्या युद्धाचे चित्र फारच वेगळे आहे असे जाणवते

अगदी अभिनव प्रकल्प आहे. मी पण पहिली दोन तीन पत्रे वाचली.. आता अनुदिनीला भेट देत राहीन.
इथे ही माहिती दिल्याबद्दल अनेक आभार!!

आभार

सहजराव, ऋषिकेश
प्रतिसादांबद्दल आभारी आहे. मला ही पत्रे फारच भिडणारी वाटली. पत्रांवरून लॅमिनचा स्वभाव साधा आहे असे वाटते. दुसरी जाणवणारी गोष्ट म्हणजे सैनिकांना युद्ध कशासाठी आहे, कुणाची बाजू नैतिक आहे याबद्दल फारसा विचार करण्याची संधी मिळत नाही. (आणि मिळाली तरी त्यांच्या हातात काय असते?) आणि एखाद्या जर्मन सैनिकाची डायरी वाचली तरी फारसे वेगळे चित्र असेल असे वाटत नाही.
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

 
^ वर