ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी .. प्रश्नोत्तरातून सुसंवाद (भाग १ ) २] काही सामान्य शंका

http://mr.upakram.org/node/777 हे नवीन वाचकांनी प्रथम वाचावे. आता भाग १ मधिल "काही सामान्य शंका "पुढील प्रकरण. फलज्योतिष हा विषय हा तसा अघळपघळ आहे. काही मुद्द्यांची पुनरावृत्ती आढळल्यास ती काही वाचकांची सोय आहे असे मी मानतो. विशेष करुन ज्यांना अनुक्रमे वा शिस्तबद्ध पद्धतीने वाचन करता येणे शक्य नाही त्यांच्या साठी. प्रश्न् विचारण्याची उस्फुर्तता मात्र दाबून ठेवु नये.

१४) साडेसाती काय प्रकार आहे?
शनीने पिडलेली साडेसात वर्षे म्हणजे साडेसाती. ही साडेसात वर्षे तीन अडीचक्यांमध्ये विभागलेली असतात. आयुष्यातला बॅड पॅच या अर्थानेही साडेसाती शब्द वापरला जातो. कोणत्याही काळी बारा पैकी कोणत्या ना कोणत्या तरी तीन सलग राशींना एकाच वेळी साडेसाती चालू असतेच. याचा अर्थ, शंभरातल्या २५ जणांना साडेसाती चालूच असते. एकेका राशीत अडीच वर्षे राहात शनी ३० वर्षात बारा राशीतून प्रवास करतो. माणसाच्या जन्म-वेळी चंद्र ज्या राशीत असतो ती त्याची रास मानतात. समजा एखाद्याची वृषभ रास असेल तर शनी जेव्हा त्या राशीच्या 'अलिकडे` म्हणजे मेष राशीत येतो तेव्हा त्याला साडेसातीची पहिली अडीचकी चालू होते. जेव्हा शनी प्रत्यक्ष 'त्या` म्हणजे वृषभ राशीत प्रवेश करतो तेव्हा मधली अडीचकी चालू होते व जेव्हा तो 'पलिकडे` म्हणजे मिथुन राशीत प्रवेश करतो तेव्हा शेवटची अडीचकी चालू होते. अशी ही साडेसाती.
साडेसातीच्या काळात माणसाच्या प्रयत्नांना यश येत नाही, त्याची व्यावहारिक गणितं चुकतात, त्याला दुर्बुद्धी सुचते, त्याच्यावर संकटं कोसळतात अशी समजूत आहे. खरंतर अशा गोष्टी आपल्या आयुष्यात इतर वेळीही होत असतात. पण साडेसातीच्या काळात घडल्या तर त्यांचा संबंध लगेच शनीशी जोडला जातो. या काळात शनीची अवकृपा होउ नये म्हणून शनिवारी, अमावस्येला शनीला तेल वहाणे, रूईची माळ वहाणे, शनीमहात्म्य वाचणे इ. गोष्टी पीडाशामक म्हणून ज्योतिषी सुचवतात अन् माणूस त्या गोष्टी करतो. समजा शनीने जाहीर केले की, बाबांनो मी काही तुम्हाला त्रास देणार नाही, तर मग कोण कशाला करील या गोष्टी ? म्हणजे या सर्व गोष्टी शनीच्या भीतीपोटी केल्या जातात, भक्तीपोटी नव्हे. साडेसाती बाबत विष्णुशास्त्री चिपळूणकर आपल्या १८७५ साली प्रसिध्द झालेल्या निबंधमालेतील 'लोकभ्रम` या निबंधात म्हणतात, '' येथे कोणाच्या राशीवर शनिमहाराजांची स्वारी वळली की, त्याच्या प्रीत्यर्थ लोहदान, तिलदान वगैरे हजारो धर्मकृत्ये केली तरी त्यांचा रोष कमी होत नाही; पण तीच स्वारी इंग्लंडातल्या वगैरे मनुष्यांच्या बिलकुल वाटेस न जाता खुशाल आपल्या वाटेने चालती होते. तेव्हा या त्यांच्या पंक्तीप्रपंचाचे काय बरे चीज असावे.? ज्या अत्युग्र ग्रहाने प्रत्यक्ष शंकरावरही दोन तीन घटिका प्रभाव गाजवला, ज्याची दृष्टि लंकापतीच्या सिंहासनावर सारखी लागली असता लवकरच चौदा चौकडयांचे राज्य फडशा होऊन गेलेे, त्याचेच सामर्थ्य य:कश्चित परदीपस्थ मनुष्यांवर चालू नये हे केवढे आश्चर्य! ``
ज्योतिषाने सांगितल्याप्रमाणे आपण उपाय करतोय् ना, मग आता आपल्याल त्रास होणार नाही, या स्वयंसूचनेनेच माणसाला बळ येते. त्याचा उपयोग संकटांशी सामना करण्यासाठी होतो. "आपल्या अपयशाला आपण जबाबदार नसून ग्रहस्थितीमुळे तसे घडतंय्, देवादिकांना सुद्धा जिथं साडेसाती चुकली नाही तिथं तुमची आमची काय कथा?" हा विचार माणसाला धीर देतो.

१५) कालसर्पयोग म्हणजे काय?
कुंडलीत राहू व केतू हे नेहमी समोरासमोर असतात व त्यांच्यामध्ये ६ घरांचे म्हणजेच ६ स्थानांचे अंतर असते. या ६ घरात बाकीचे सर्व ग्रह आलेले असले म्हणजे कालसर्पयोग होतो. पैसे मिळवण्यासाठी ज्योतिषी लोक ज्या अनेक युक्त्या करतात त्यापैकीच ही एक युक्ती आहे. तुमच्या कुटुंबावर कुणाचा तरी शाप आहे असे हा कालसर्पयोग सांगतो असे ज्योतिषी सांगतात व भीती निर्माण करतात. शुभग्रह कालसर्पऱ्योगाच्या विळख्यात सापडले की त्यांची शुभ फले द्यायची ताकद कमी होते त्यामुळे कुंडलीत गुरु, शुक्र बलवान असले तरी त्यांची शुभ फले मिळत नाहीत. या सापाने आपल्या विळख्यात माणसाला आवळून धरले आहे तो त्याला चावतही नाही व सोडतही नाही. असा योग जर कुंडलीत असला तर काही तरी अनिष्ट गोष्टी घडतात. वेड, अपमृत्यू, कर्जबाजारीपणा, अशांतता, भांडणे, वास्तुबाधा, पिशाच्चबाधा, संतती न होणे, झालीच तर त्यापासून मन:स्ताप होणे अशी ही लांबलचक यादी आहे. काही ज्योतिष्यांनी आपला धंदा तेजीत आणण्यासाठी केलेला हा लुच्चेगिरीचा प्रचार आहे.
या विषयी प्रसिद्ध ज्योतिषी व.दा. भट म्हणतात की हा योग इतका महत्वाचा असता तर त्याचा उल्लेख जुन्या ग्रंथात मिळाला असता. हा योग ५०-६० वर्षापूर्वी कुणासही ठाऊक नव्हता हे आता कुणास खरेही वाटणार नाही. ज्योतिष जगतात याचा उगम प्रसिद्ध ज्योतिषी अजन्ता जैन व इंदुमती पंडित यांच्या वृत्तपत्रीय लेखनात १९५४ मध्ये झाला. तेथे वाचकांना आकर्षित करण्यासाठी तंत्र वापरावे लागते. त्यांच्या लेखनाने असा योग असतो असा साक्षात्कार झालेले सामान्य ज्योतिषी गि-हाईकावर छाप पाडण्यासाठी याचा वापर करू लागले. शिवाय कालसर्प या भीतिदायक शब्दाचीही दहशत माणसाला वाटते. कितीतरी कर्तृत्ववान व्यक्तींच्या कुंडलीत हा योग आहे. पंडीत नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कुंडल्यांतही हा योग होता.

१६) नारायण नागबली विधी काय आहे? तो कशासाठी करतात?
आपण वर कालसर्पयोग हा काय आहे व त्याची फळे कशी घाबरवून टाकतात हे बघितलं? साहजिकच मग आता यावर परिहारक उपाय, तोडगा काय? असा प्रश्न असणारच. कालसर्प योगाचे निवारण करण्यासाठी नारायण नागबली विधी सांगितला जातो. सर्पशाप, नागपूजा वगैरे गोष्टींंचा कालसर्पयोगाशी बादरायण संबंध लावून परिहार म्हणून असे विधी सांगितले जातात. हिंदू धर्मात नाग, साप यांचा देवादिकांशी संबंध असल्याने त्यांना फार धार्मिक महत्व प्राप्त झाले आहे. हल्लीच्या काळात प्रत्येक क्षेत्रात जशा अनिष्ट प्रथा येतात तशा त्या ज्योतिषशास्त्रातही आलेल्या आहेत. ज्योतिषी व तीर्थक्षेत्रातले भिक्षुकवर्ग यांचेही लागेबांधे वाढले आहेत. त्यांची 'कट प्रॅक्टिस` चालू झाली आहे. परिस्थितीने गांजलेला माणूस मनाने हळवा बनतो. ज्योतिषी सांगतो म्हणून नारायण-नागबली विधीसाठी दोनचार हजार रूपये खर्च करायलाही तयार होतो. एवढं सगळ केलंय् तर हेही करुन बघू असा तो विचार करतो. हा विधी त्रिंबकेश्वरला घाउक प्रमाणावर केला जातो.

१७) ग्रहांची दृष्टी म्हणजे काय व कशी असते ?
ग्रहांना अनेक नजरा किंवा दृष्ट्या असतात असे हे शास्त्र म्हणते. शनीमहाराजांच्या नजरेचा लोकांना केवढा धाक असतो. शनी 'वक्री` असतांना, म्हणजे मागेमागे उलटा चालत असतांना जर का त्याची नजर तुमच्या कुंडलीतल्या एखाद्या मोक्याच्या स्थानावर पडली तर मग काही खरे नाही! 'बुरी नजरवालेे तेरा मुॅंह काला` अशी दूषणं देण्याचीही सोय नाही कारण एक तर तो स्वत:च काळा आहे आणि दुसरं म्हणजे त्याची दहशत. या शनीला सात नजरा असतात, त्यातल्या तीन पूर्ण शक्तीच्या, दोन अर्ध्या शक्तीच्या आणि दोन पाव शक्तीच्या असतात म्हणे. इतक्या सगळ्या नजरांसाठी त्याला डोळे किती आहेत ते कुणालाच ठाऊक नाहीे, पण डोळे असल्याखेरीज का दृष्ट्या असणे शक्य आहे? खरी मौज तर पुढेच आहे:- राहू आणि केतू हे काही खरोखरीचे ग्रह नव्हेत. ते म्हणजे चंद्राच्या वर्तुळाकार रस्त्यावर रोवलेले दोन काल्पनिक खुंट आहेत. ग्रहणाच्या वेळी चंद्र यापैकी कोणत्या तरी एका खुंटापाशी आलेला असतो. या काल्पनिक खुंटांना सुद्धा डोळे आणि नजरा आहेत म्हणे. राहूला सर्वात जास्त म्हणजे आठ नजरा आहेत तर केतूला फक्त एकच नजर आहे! गुरु व मंगळ यांना प्रत्येकी सात नजरा, बुध शुक्र, चंद्र आणि सूर्य यांना प्रत्येकी एकेक नजर असते. बिचारा सूर्य! सगळ्या ग्रहांचा राजा, पण त्याला नजर फक्त एकच! आपल्या पूर्वजांनी लावलेले हे अजब 'शोध` आहेत. आणि विचित्र सत्य हे आहे की या अजब शोधांच्या पायावरच ग्रहांच्या दृष्टीचा सिद्धांत उभा आहे.

१८) ग्रहदशा, अंतर्दशा हा काय प्रकार आहे?
दशापद्धती हे फलज्योतिषातले सर्वात मोठे बनवाबनवीचे प्रकरण आहे. कारण, फलज्योतिष हे ग्रहांशी संबंधित शास्त्र आहे असा ज्योतिष्यांचा दावा असतो पण या प्रकरणाचा आकाशातल्या सद्यस्थित ग्रहांशी काहीही संबंध नसतो ! ग्रहांची नावे फक्त या पद्धतीत वापरतात.
प्रत्येक ग्रह ( म्हणजे खरे तर त्याचे नाव ) काही ठराविक मुदतीत तुमच्या आयुष्यावर आपला प्रभाव गाजवतो. उदाहरणार्थ, माणसाचे आयुष्य १२० वर्षे आहे असे गृहीत धरून जी दशा पद्धती मानली आहे तिला विशोत्तरी दशापद्धती म्हणतात. त्यामध्ये शुक्राचा प्रभाव २० वर्षे असतो. त्याला शुक्राची दशा असे म्हणायचे. शुक्राप्रमाणे बाकीच्या सर्व ग्रहांच्यासुद्धा दशा असतात व त्यात पुन: अंतर्दशा असतात. या दशेचे एका विशिष्ट पद्धतीने ९ भाग पाडायचे. त्या भागांवर ९ ग्रहांचे आधिपत्य क्रमा-क्रमाने असते असे मानायचे. त्या भागांना त्या-त्या ग्रहाच्या अंतर्दशा असे नाव आहे. अष्टोत्तरी महादशेत १०८ वर्षे आयुष्य मानून याच प्रकारात दशा अंतर्दशा विभागल्या आहेत. यात केतूला वगळले आहे. कुठल्या ग्रहाला किती वर्षे याचे वाटप लॉटरी पद्धती सारखे आहे. जन्मत: कुठल्या ग्रहाची दशा आहे हे केवळ जन्मनक्षत्रावरुन ठरविले जाते. उदा. रोहिणी, हस्त वा श्रवण नक्षत्रावरचा जन्म असेल तर त्याला जन्मत: चंद्र महादशा चालू होते. आणखी जवळ जवळ ४० प्रकारच्या दशा फलज्योतिषात आहेत.
विशोत्तरी महादशा:- चंद्र १० वर्षे, मंगळ ७ वर्षे, राहू १८ वर्षे, गुरु १६ वर्षे, शनी १९ वर्षे, बुध १७ वर्षे, केतू ७ वर्षे, शुक्र २० वर्षे, रवि ६ वर्षे - एकूण १२० वर्षे
अष्टोत्तरी महादशा :- चंद्र १५ वर्षे, मंगळ ८ वर्षे, बुध १७ वर्षे, शनी १० वर्षे, गुरु १९ वर्षे, राहू १२ वर्षे, केतू - शुक्र २१ वर्षे, रवि ६ वर्षे - एकूण १०८ वर्षे

१९) ग्रहांचा मानवी जीवनावर परिणाम होतो हे खरे आहे काय?
सूर्य व चंद्र हेही ग्रहच आहेत असे हे शास्त्र मानते. या दोन ग्रहांचे भौतिक परिणाम सर्व सृष्टीवर होतात. बाकीच्या ग्रहांचे भौतिक परिणाम होत असल्याचे आढळलेले नाही. राहू व केतू हे काल्पनिक बिंदू असल्याने त्यांचे भौतिक परिणाम अशक्य आहेत. भौतिक परिणाम हे सामूहिक स्वरूपाचे असतात.
ग्रहांचे ज्योतिषीय स्वरूपाचे परिणाम मानवी जीवनावर होतात असे निश्चितपणे दाखवणारा पुरावा आजवर तरी मिळालेला नाही. गॉकेलिनचा गाजलेला मार्स इफेक्ट वादग्रस्त पुरावा आहे. त्या पुराव्यात सिलेक्शन बायेस हा दोष आहे असे कार्ल कोप्पेनशार नावाच्या एका शास्त्रज्ञाने दाखवून दिले आहे. ( यूरो स्केप्टिक-९१ या नियतकालिकात त्याचा लेख आला आहे )
या संदर्भात एका मुद्याचे विवेचन करणे आवश्यक आहे. गेली पन्नास-साठ वर्षे ज्योतिषाचे विरोधक आणि समर्थक यांच्यात वादाची जी रणधुमाळी चालली होती तिचा केंद्रंबिंदू हा होता की माणसावर ग्रहताऱ्यांचे परिणाम होत असणे शक्य आहे की नाही. 'ग्रह व तारे पृथ्वीपासून प्रचंड अंतरावर असल्यामुळे त्यांचे परिणामकारक असे प्रभाव माणसावर पडणे शक्य नाही`, अशी भूमिका विरोधकांची होती, आणि 'तसे प्रभाव पडणे शक्य आहे- नव्हे ते पडतातच` , अशी भूमिका समर्थकांची होती. त्यांच्या भूमिकेच्या समर्थनासाठी विद्युत्चुंबकीय प्रारणे म्हणजे ऊर्जालहरी, गुरुत्वाकर्षण, चुंबकीय आकर्षण, भरती-आहोटी, सजीव सृष्टीवर होणारे सूर्य-चंद्राचे परिणाम इत्यादि प्राकृतिक तत्वांचा उपयोग तर त्यांनी केलाच आणि वर 'भौतिक शास्त्रांना अद्याप न उलगडलेली अशी कितीतरी तत्वे या विश्वात आहेत,` असे टोमणेही विज्ञान-मागध् लोकांना उद्देशून मारले, -जणू काही तसली काही तत्वे फलज्योतिषाच्या पाठीशी खरोखरच उभी आहेत! डॉ. मिशेल गॉकेलिन यांनी प्रचंड संशोधन करून असे दाखवून दिले होते की अगदी सूक्ष्म प्रमाणात का होईना पण ग्रहांचा माणसावर परिणाम होतो. ते संशोधन त्यांच्या मृत्यूनंतर वादग्रस्त ठरले तो भाग वेगळा, पण कित्येक वर्षे त्या संशोधनाने शास्त्रीय जगतात धमाल उडवून दिली होती, आणि तिचा भरपूर फायदा ज्योतिष-समर्थकांना मिळाला यात शंका नाही. त्यांच्या काही युक्तिवादात थोडेफार तथ्यही होते त्यामुळे सर्वसामान्य माणसाला असे वाटू लागले की शास्त्रज्ञ मंडळींची टीका केवळ हटवादीपणाची असून ज्योतिष-समर्थकांची बाजूच बरोबर आहे.
ग्रह-नक्षत्रादिचे मानवी जीवनावर परिणाम होत असावे कि नाही हा बुद्धिमंतांना दीर्घकाळ पुरणारा विषय आहे.

२०) काही ज्योतिषी आयुष्यातील काही घटना अचूक सांगतात ते कसे?
तुम्हाला स्वत:ला असा काही अनुभव आला आहे का ? की ऐकीव गोष्टींवरून तुम्ही हा प्रश्न विचारीत आहात ?
ज्यांना असे मन:पूर्वक वाटते की या शास्त्रात काहीतरी तथ्य असलेच पाहिजे, त्यांनी पुढील चाचणी करून पहावीे :- तुमच्या आयुष्यात आजपर्यंत घडून गेलेल्या सर्व घटना तुमच्या जन्मवेळी भविष्य काळातल्या घटना होत्या हे तर खरे ना ? त्या वेळी तुमच्या जन्मकुंडलीवरून एखाद्या जाणकार ज्योतिषाला त्या अचूक वर्तवता आल्या असत्या अशी तुमची श्रद्धा आहे ना ? मग त्याच जन्मकुंडलीवरून त्या घटना आजही ओळखता आल्या पाहिजेत. जर कुणा जाणकार ज्योतिषाने त्या बरोबर ओळखून दाखवल्या तर हे शास्त्र खरे आहे हे तात्काळ सिद्ध होईल की नाही ? म्हणून असे करा की, तुमच्या आयुष्यात प्रत्यक्ष घडलेल्या ३-४ नि:संदिग्ध टळक घटना आठवून त्या घटना कोणत्या वर्षी घडल्या ते टिपून ठेवा. एखाद्या जाणकार ज्योतिषाला तुमची जन्मकुंडली द्या व त्याला फक्त त्या घटनांचे स्वरूप सांगा ( त्यायोगे त्याचे निम्मे काम सोपे होईल.) त्या घटना निदान कोणत्या वर्षी घडल्या हे तरी त्याला सांगता येते का पहा. किंवा असे करा की, त्याला घटनांची वर्षे सांगून त्यांवरून घटनांचे स्वरूप ओळखता येते का ते पहा. आमचा अनुभव असा आहे की भले-भले ज्योतिषी अशी चाचणी द्यायला तयार होत नाहीत. काही ज्योतिषी अशी प्रौढी मारतात की त्यांना मृत्यूचे भाकीत अचूक वर्तवता येते. अशा ज्योतिषाला गेल्या दोनतीन वर्षात दिवंगत झालेल्या एखाद्या व्यक्तीची कुंडली देऊन त्या व्यक्तीच्या मृत्यूचे वर्ष ओळखायला सांगा. अशी चाचणी द्यायला कुणीही ज्योतिषी तयार होणार नाही. यावरून, या शास्त्रात खरोखर काही तथ्य नाही हेच सिद्ध होत नाही का ?

२१) हिरोशिमा वा नागासाकी शहरात अणुबॉम्ब पडला त्या वेळी लाखो लोक मेले, विमान अपघात, रेल्वे दुर्घटना वा भूकंप या सारख्या घटनांमध्ये शेकडो लोक मरतात मग त्या सर्वांच्या कुंडल्यात काय एकाच वेळी मृत्यूयोग होता असे म्हणायचे का?
असा प्रश्न आपल्या मनात येणे हे शोधक वा चिकित्सक वृत्तीचे लक्षण आहे. पण ज्योतिषांना हा प्रश्न जेव्हा आपण विचारतो तेव्हा ते म्हणतात, ''अशा पन्नास कुंडल्या तरी आमच्या समोर आणा मग आम्ही त्यातले मृत्यूयोग दाखवू.`` हे प्रतिपादन वरकरणी रोखठोक वाटले तरी ते व्यवहार्य नाही हे कुणाही सूज्ञास समजेल. एकाच वेळी सर्वांच्या कुंडल्यात मृत्यूयोग असणे ही बाब कॉमनसेन्सला पटत नाही. मग ज्योतिषी 'सर्व प्रवाशांची जबाबदारी ही वैमानिकावर नसते का? त्याला जर काही झाले तर सर्वांचा जीव धोक्यात नाही का?` असला बालिश युक्तिवाद करतात. मग भूकंपाबाबत काय? तिथ मेदिनिय ज्योतिष उपयोगाला येते. मेदिनीय ज्योतिषात त्या प्रांताला पत्रिका असल्या मुळे व ती व्यक्तिंच्या पत्रिकेपेक्षा प्रभावी असणार. त्यात जर दुर्घटना असेल तर साहजिकच अनेकांना त्याचा फटका बसणार. काही ज्योतिषांच्या मते प्राक्तन हे जर आम्हाला सर्व कळालं असतं तर आम्ही ब्रम्हदेव झालो नसतो का? शेवटी प्राक्तन कुणाला टळलं आहे का? श्रद्धाळू माणसांना हे युक्तिवाद बिनतोड वाटतात. हजारो मरताना एखादा जगला तर ते प्राक्तन व हजारो जगताना एखादा मेला तर तेही प्राक्तनच. खरंतर वैज्ञानिक दृष्टिकोणात हीच बाब प्रोबॅबिलीटीच्या भाषेत सांगितली आहे. हजारो मरताना एखादा जगण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच हजारो जगताना एखादा मरण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्योतिषाला आधुनिक विज्ञानाचा आधार शोधणारी माणसे सुद्धा अशा वेळी अध्यात्माचा आधार घेतात.

२२) ज्योतिषांवर दुटप्पी पणाचा आरोप केला जातो. ज्योतिषी लोक खरोखरीच दुटप्पी आहेत का?

हा दुटप्पीपणा खरं तर फलज्योतिष या विषयातील अंतर्विसंगतीतून तसेच त्याविषयीच्या अतिरेकी अभिमानातून निर्माण होतो. मुद्यांचा प्रतिवाद करताना आपल्याला अनुकूल असे संदर्भ वा मुद्दे ज्योतिषी घेतात आणि प्रत्यक्ष जनसंपर्कात मात्र वेगळेच युक्तिवाद वापरतात. या विषयाबाबत ज्योतिषांच्यात अनेक अंतर्गत मतप्रवाह आहेत. काही ज्योतिषी सतत दुटप्पी किंवा दुहेरी विधाने करीत असतात. खोटयाचे खरे व खऱ्याचे खोटे करणे यात त्यांचा स्वार्थ साधला जात असतो. त्यामुळे त्यांना पळवाट पण मिळते. उदाहरणे देउन हे स्पष्ट करतो :-
ग्रह व तारे हे माणसाच्या जीवनावर परिणाम करतात, म्हणजेच त्यांच्या अंगी कारकत्व असते असे ते एकीकडे सांगतात, तर दुसरीकडे सांगतात की ग्रह व तारे हे फक्त भविष्याची सूचना देतात, त्यांच्या अंगी कारकत्व नसते.
एकीकडे ते प्रौढीने सांगत असतात की ज्योतिष हे सर्वात जुने व परिपूर्ण शास्त्र आहे. तर दुसरीकडे सांगत असतात की हे शास्त्र अद्याप अपरिपूर्ण आहे, त्यात संशोघन करण्याची गरज आहे. पण काय करणार, आमच्याकडे साधनसंपत्तीची वाण आहे!
राशी-भविष्याशिवाय वृत्तपत्रांचे व मासिकांचे पानही हालत नाही. शेकडो ज्योतिष्यांचे ते एक निर्वाहाचे साधन असते. लोक त्यामुळे फलज्योतिषाकडे आकृष्ट होतात. हे चित्र एकीकडे दिसते तर दुसरीकडे ज्योतिष-प्रवक्ते राशी-भविष्ये ही ढोबळमानाने लिहिलेली असतात ते खरे फलज्योतिष नव्हेच असे आवर्जून सांंगतांना दिसतात.
एकीकडे ते सांगत असतात की कुंडली जिवंत व्यक्तीची आहे की मृत व्यक्तीची आहे, तसेच ती कुंडली स्त्रीची की पुरुषाची आहे ते आम्ही सांगू शकत नाही. दुसरीकडे प्रौढीने सांगत असतात की जातक स्त्री का पुरुष ते आम्ही अचूक ओळखू शकतो. मृत्यूचे भाकीतही आम्ही वर्तवू शकतो.
एकीकडे ते सांगत असतात की आम्ही फक्त भविष्यकाल अनुकूल आहे की प्रतिकूल आहे ते वर्तवू शकतो. अचूक भविष्य फक्त ब्रम्हदेवालाच माहीत असते. दुसरीकडे हेच ज्योतिषी आपली किती भाकिते अचूक लक्ष्यवेधी ठरली त्याची यादी देत असतात.
ज्योतिषशास्त्र हे भौतिक शास्त्रापलीकडचे म्हणजेच विज्ञानापलीकडचे असे स्वतंत्र व निराळेच शास्त्र आहे असे एकीकडे सांगणारे ज्योतिषीच फलज्योतिषाने गृहीत धरलेल्या ग्रह-प्रभावांचे समर्थन करण्यासाठी अल्फा-बीटा-गॅमा किरण या तद्दन भौतिक शास्त्रीय संकल्पनांचीच चर्चा करतात.
एकीकडे प्रारब्ध अटळ आहे असे म्हणतात तर दुसरी कडे जपजाप्य, शांती, दान, खडा, मंत्रतंत्र, पूजा, उपासना इ. उपायांनी अनिष्ट भाग काही अंशी का होईना पण टाळता येतो असेही म्हणतात.

२३) ग्रहांना दैवी शक्तीची प्रतीके मानून त्यांना मानवी गुणधर्म माणसाने चिकटवले आहेत. डोळयांना न दिसणाऱ्या परमेश्वराचे प्रतीक हवे म्हणून माणूस मूर्तीची स्थापना करतो व तिची आराधना करतो. तसेच ग्रहांच्या बाबतीत केले तर काय बिघडले ?
आम्ही पण हेच म्हणतो. ग्रहांना मानवी गुणधर्म माणसाने चिकटवले आहेत पण वास्तविक ते त्यांच्या अंगी नाहीत. पण हे शास्त्र असे मानते की असे गुणधर्म ग्रहांच्या अंगी प्रत्यक्ष आहेत.या शास्त्राची श्रद्धा अशी आहे की ग्रहांना बुद्धी असते. हे कशावरून ते कळण्यासाठी या शास्त्रातली ग्रहांची वर्णने वाचावीत. ब्राम्हण-क्षत्रिय वगैरे वर्णभेद, स्त्री-पुरुष-नपुंसक हे लिंगभेद, स्वभावभेद, आवडीनावडी, आपसातील सख्य व वैमनस्य, असे सगळे मानवी गुण या ग्रहांना असतात असे या शास्त्रात सांगितले आहे. त्या स्वभावानुसार ते जातकांना फळ देतात. ग्रहांना बुद्धी असते ही श्रद्धाच इथे उघड दिसते. बहुसंख्य श्रद्धाळू लोक ग्रहांची शांती, ग्रहजप, ग्रहमख, या गोष्टी मनापासून करतात, शिंगणापूरच्या शनीचा चमत्कार चवीने सांगतात, शनीमहात्म्य भक्तिभावाने वाचतात, ते लोक अशा श्रद्धेशिवायच का या सर्व गोष्टी करतात ? म्हणजे ग्रहांना केवळ बुद्धी नाही तर ते भक्तवत्सल व करूणाघनही आहेत. जपामुळे, होमहवनामुळे ते शांत होतात. शनि आपल्या भक्तांना कमी त्रास देतो. होय! कमी त्रास देणे ही त्याची कृपाच आहे. पुराणातील ग्रहांच्या कथा तुम्ही ऐकल्यात तर एकसे बढकर एक अशा आहेत.
या संदर्भात एक ज्योतिषालंकार अशी मखलाशी करतात की, ग्रह हे पदार्थ आहेत आणि जसे निसर्गात प्रत्येक पदार्थाला गुणधर्म असतात तसेच ते ग्रहांनाही आहेत. पूर्वीचे लोक शास्त्रीय सत्ये लाक्षणिक किंवा अलंकारिक भाषेत सांगत असत, त्याला अनुसरून त्यांनी ग्रहांचे गुणधर्म अलंकारिक भाषेत ग्रंथात लिहून ठेवले आहेत, परंतु हे सर्व पूर्वीच्या थोर प्रज्ञावान लोकांचे पदार्थविज्ञानच आहे. वाहव्वा! राहू-केतू हे काल्पनिक बिंदू पदार्थच आहेत म्हणून त्यांनाही गुणधर्म आहेत, बुध-शनी हे पदार्र्थ असले तरी नपुंसक आहेत, चंद्र हा पदार्थ स्त्री आहे, मंगळ शनीला शत्रू मानतो पण शनी मंगळाला शत्रू मानत नाही, तरीपण दोघेही पदार्थ आहेत! काय हे पूर्वीच्या ज्योतिर्विदांचे अचाट पदार्थविज्ञान!

२४) ग्रहांची शांती उपासना केल्याने फायदा होतो काय?
फायदा वा तोटा हा नंतरचा भाग. पण त्यासाठी प्रथम ग्रहांना बुद्धी असते ही गोष्ट मान्य करावी लागेल. कारण ती असल्याशिवाय त्यांची शांती कशी होणार ? ग्रहांना मानवी भाव-भावना, राग-लोभ वगैरे असतात अशा श्रद्धा पूर्वीपासूनच लोक बाळगत आलेले आहेत. ग्रहांना देवताच मानत असत. अनिष्ट ग्रह बिघडलेले ( म्हणजे रागावलेले ) असले तर त्यांना शांत करण्यासाठी ग्रह-जप, दानधर्म, शांति-कर्मे यांची योजना पूर्वीपासून हे लोक करत आले आहेत. ग्रहांना माणसाप्रमाणे मन व बुद्धी आहे हे गृहीत धरूनच हे उपाय करण्यात येतात की नाही? नेमाने शनीमहात्म्य वाचल्याने, शनिवारी तेल व रुईची फुले शनीला वाहिल्याने शनी त्याची पीडा सौम्य करतो अशी श्रद्धा हे लोक ठेवतातच ना ? शनीला मन व बुद्धी असल्याशिवाय त्यांनी ही श्रद्धा ठेवली असती का ? वेदकाळापासून गायत्री मंत्र लोक कशासाठी जपत आले आहेत ? सूर्याने त्यांच्या बुद्धीचे प्रचोदन करावे म्हणूनच ना? सूर्याला बुद्धीच नसेल तर तो माणसांच्या बुद्धीला कशी प्रेरणा देईल ? म्हणून, परंपराभिमानी लोक जर प्रामाणिक असतील तर ग्रहांना बुद्धी असते हे विधान त्यांनी मान्य करायलाच हवे. हे विधान तुमच्या बुद्धीला पटते का ते प्रथम विचारा. श्रद्धाळू लोकांना असे वाटते की फायदा झाला तर शांती उपासना केल्याने झाला. जर फायदा-नुकसान काहीच झाले नाही तर 'नुकसान झाले नाही हा फायदाच म्हणायचा नाही का?` अशी समजूत करून घेतात. नुकसान झाले तर आपली श्रद्धा वा उपासना कमी पडली किंवा आपला कर्मभोग असे समजतात. एकूण काय तर फायदा-तोटयाची परिमाणे लोकांच्या श्रद्धाळूपणातच दडलेली असतात.

२५) ग्रहांचे खडे वापरल्याने अनिष्ट प्रभाव कमी करता येतात का?
ग्रहांच्या खड्यांना रत्ने असा गोंडस शब्द वापरतात. एखाद्याच्या पत्रिकेत एखादा ग्रह बलहीन असेल तर त्याचे रत्न वापरून त्याचे बल वाढवणे हा एक प्रकार किंवा सर्वात बलवान ग्रहाचे रत्न वापरून त्याच्या गुणात अधिक भर घालणे हा दुसरा प्रकार. अशा प्रकारचे तर्क लढवून या रत्नांची शिफारस केली जाते. चुकीच्या शिफारसीमुळे फायदा होण्याऐवजी तोटा पण होतो ही अजून एक भीती निर्माण केली जाते. कॉस्मिक रेडिएशन, ग्रहांपासून निर्माण होणारी व्हायब्रेशन्स,कलर स्त्रोत असे वैज्ञानिक मुलामा असणारे शब्द वापरून त्याला एक प्रतिष्ठा दिली जाते. त्यामुळे रत्नातून जणु काही रेडिओ ऎक्टीव्ह किरणे बाहेर पडत असतात असं काहीतरी चित्र सामान्य माणसाच्या मनात तयार होतं.
खरं तर तो मानसोपचाराचा एक प्रकार आहे. खडे वापरल्यामुळे अनिष्ट प्रभाव कमी झाले की नाही हे ठरवायचे कसे ? खडा वापरला नसता तर काय झाले असते असा प्रयोग करून पहाणे अशक्य आहे. खड्यांच्या परिणामांना विज्ञानाचा दिखाऊ मुलामा जो दिला जातो तो गैर आहे. कसे ते पहा. ही गोष्ट सर्वांना ठाऊक आहे की राहू हा एक मानीव बिंदू आहे. त्याच्यापासून कसलेही किरण निघणे अशक्य आहे. मग राहूचे दुष्परिणाम टाळण्यासाठी लसण्या खडा वापरण्याने त्यातून कोणते किरण तुमच्यावर पडणार किंवा कोणते किरण त्यात अडवून धरले जाणार ? अमुक रंगाच्या खड्यातून अमुक किरण परावर्तित होतात हे म्हणणे एकवेळ समजण्यासारखे आहे. पण ते अनिष्ट किरण त्या खड्यात अडवून कसे धरले जातात हे समजत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे खडयावर ग्रहांचे जे काही किरण पडतात ते फक्त ग्रह डोक्यावरच्या आकाशात असतांनाच पडतात, ग्रह मावळून पृथ्वीच्या खाली गेल्यावर त्याचे किरण इथे कसे पोचणार ? मग तशा वेळी खड्याचा काय उपयोग ? बरे, ग्रह डोक्यावरच्या आकाशात असतांना त्याचे किरण थेट आपल्यावर पडत असतातच ना? मग त्या वेळी त्या चिमुकल्या खड्यावर पडणारे किरण आणखी काय जास्त परिणाम करणार ? एकूण काय तर वैज्ञानिक कारणे दाखवून खडे वापरणे हे वेडगळपणचे आहे. हौस म्हणून खुशाल वापरावेत. खडे प्रकाश-किरण आकर्षित करतात ही कल्पना साफ खोटी आहे. खडे एवढेच काम करतात की पडलेले प्रकाश-किरण परावर्तित करतात. त्यांना पाडलेल्या पैलूमुळे प्रकाशाचे परावर्तन खूप चांगले होते, त्यामुळे ते चमकतात. पूर्ण अंधारात हिरासुद्धा चमकणार नाही हे लक्षात घ्यावे. रत्ने हा पूर्णपणे दागदागिने, सौंदर्यप्रसाधने या प्रांताचा भाग आहे. आणखी एक अशीच वैज्ञानिक मुलामा असलेली पण लुच्चेगिरीची मांडणी म्हणजे ''ग्रहांपासून निर्माण होणारी रेडिएशन्स ही नेहमीच ऋण भाराची असतात व रत्नांची जी शक्ती असते ती नेहमीच धन भाराची असते त्यामुळे ग्रहांपासून निघणारी व्हायब्रेशन्स रत्नांपर्यंत पोहोचताच 'न्यूट्रलाईज` होतात.`` सगळया थापा!
तुम्हाला बडोद्याच्या पटवर्धनांचा बोलका पत्थरविषयी माहिती असेल. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्याविरूद्ध जोरदार मोहीम उघडली होती. वीस पैशाचा अॅगेटचा खडा ते 'बोलका पत्थर` म्हणून वीस रूपयांना विकत. त्यांचा दावे असे असतात :-
" बोलका पत्थर हे अॅस्टॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिटयूटचे अनमोल संशोधन आहे. खडयातून दैवी किरण बाहेर पडतात त्यामुळे माणूस तणावमुक्त होतो. हे एक संरक्षण कवच असून अनिष्ट ग्रहांपासून तुमचे रक्षण करते. हा जन्मराशीवर आधारित असल्याने आयुष्यभर वापरता येतो. खड्याचे गुण न आल्यास पैसे परत. " त्यामुळे येथे फसवणूक होत नाही असे लोकांना वाटते. आता यात गोम अशी आहे की, गुण न आल्यास पैसे परत मागायचे ते खडा घेतल्यापासून ३० ते ४५ दिवसाच्या आत. पण हे कसे शक्य आहे ? कोर्टकचेरीतले काम, जुनाट रोग, परिक्षेचा निकाल, संतती-प्राप्ती या गोष्टीं काही ४०-४५ दिवसाच्या आत होत नाहीत. बरे, पैसे परत मागायचेच झाल्यास बडोद्याच्या ऑफीसला व्हीपी पाठवून पैसे परत घेण्याचा खर्च व्हायचा सात रुपये. " आता खडा घेतलाच आहे वापरून बघू काही दिवस " असे माणसाला वाटते. अशा अनेक कारणामुळे सहसा कुणी पैसे परत मागत नाहीत. पण हा काही खडा लाभल्याचा पुरावा नव्हे. खडयांच्या वापराला काही ज्योतिषांचाही विरोध होता. त्यांच्या मते असंख्य माणसे एकाच राशीची असतात सगळयांच्या अडचणीवर एकच उतारा कसा असेल? त्यामुळे राशीवरून खडा कोणचा वापरावा ते ठरवणे ही चुकीची व अत्यंत ढोबळ पद्धत आहे असे ते म्हणत. या खडे व्यापाऱ्यांची महत्वाची अट अशी की रत्ने वापरणाऱ्याची त्यावर श्रद्धा असायला पाहिजे नाही तर रत्नांचा काहीही उपयोग होत नाही. त्यामुळे जर तुम्हाला रत्नामुळे फायदा झाला नाही तर तुमची श्रद्धा कमी पडली असे समजून स्वस्थ बसावे ! रत्नांचा खरा फायदा कुणाला होत असेल तर तो रत्ने विकणाऱ्यांना होतो !

२६) प्रयत्नाने भविष्य बदलता येते का?
समजा मी प्रयत्न केला नसता तर माझ्या भविष्यात मी अमूकअमूक होणार होतो पण मी प्रयत्न केला म्हणून मी तमूकतमुक झालो हे तपासणार कसे? भविष्यात असणाऱ्या घटनेविषयी ज्योतिषांचे विविध मतप्रवाह आहेत. जहाल पंथ असा म्हणतो की प्रारब्ध अटळ आहे. यदृच्छेशिवाय झाडाचे पानही हलू शकत नाही. म्हणजे तुमच्या हातात काही नाही. जे काही घडणार आहे ते ठरलेले आहे तुम्ही निमित्तमात्र असता. दुसऱ्या प्रकारचे लोक असे म्हणतात की, प्रयत्नांशिवाय यश नाही हे खरेच आहे. तुमच्या प्रयत्नांनी तुम्ही प्रारब्ध बदलू शकता. पण ते स्वातंत्र्य तुम्हाला किती? एखाद्या गायीच्या वासराला दोरखंडाने खांबाला बांधलेले असते. त्याला जेवढी दोरी लांब तेवढे त्याचे स्वातंत्र्य. त्या दोरीने निर्माण केलेला परीघ ही त्याची प्रयत्नांनी केलेल्या वर्तुळाची सीमारेषा. तुमच्या पूर्वसंचित व प्रारब्ध यानुसारच तुमच्या आयुष्यातल्या घटना घडत असतात. ग्रहांचे काम एवढेच आगामी घटनांची सूचना देणे. म्हणजे ग्रह हे फक्त सूचक वा निर्देशक आहेत. ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर म्हणतात, ''ज्योतिष हे फक्त तुमचा एक पंचमांश भाग नियंत्रित करतं. बाकी चारपंचमांश हे इतर गोष्टी प्रभाव टाकत असतात.`` म्हणजे प्रयत्न ही बाब या चार पंचमांश मध्ये मोडते. आपल्याला जिचा शोध घ्यायचाय् त्या बैठकीविषयी एवढे भिन्न मतप्रवाह आहेत. धूर्त ज्योतिषांची डायलॉगबाजी बघा. ते म्हणतात, ''दैवगतीच्या रुळावरुन प्रयत्नांचे स्टेअरिंग ( ? )हातात घेऊन आपल्या आयुष्याची गाडी जेव्हा मार्गक्रमण करत असते त्यावेळी ज्योतिष हे मार्गदर्शक बोर्डाप्रमाणे काम करतं.`` काही ज्योतिषी म्हणतात, ''तुम्हाला प्रयत्न करण्याची बुद्धी झाल्याशिवाय तुमच्याकडून कसे प्रयत्न होणार. आणि प्रयत्न केल्याशिवाय यश तरी कसे मिळणार? यासाठी तर ज्योतिषाचं मार्गदर्शन घ्यायचं.`` आता बोला!

Comments

बायस्ड

आपण म्हणता की,
मी ज्योतिष समर्थक व विरोधक यांच्यातल्या मध्यस्ता प्रमाणे काम करतो.
मला तरी तसे काही वाटत नाही. ही एक लोणकढी थापच आहे!
आपले हे दोन्ही लेख वाचल्यावर आपण तसे काही करत नाही असे स्पष्टच आहे.
आपण पुर्णतः ज्योतिष विरोधी बायस्ड लेखन करूनही अशी भुमीका घेणे योग्य नव्हे.
आपल्या लेखनात, ज्योतिष पाहणे किती अयोग्य आहे हेच प्रत्येक प्रश्नाच्या शेवटी दिसतेच आहे.

आता आपली 'ज्योतिष कोठे योग्य आहे' अशी समर्थक भुमीका कुठे आहे ते ही दाखवा बॉ!
(मला हल्लीच चष्मा लागल्याने नीट दिसत नाही तेंव्हा दाखवून दिल्यास बरे ;) )
आपण हे ज्योतिषाने सांगितल्याप्रमाणे आपण उपाय करतोय् ना, मग आता आपल्याल त्रास होणार नाही, या स्वयंसूचनेनेच माणसाला बळ येते. त्याचा उपयोग संकटांशी सामना करण्यासाठी होतो. "आपल्या अपयशाला आपण जबाबदार नसून ग्रहस्थितीमुळे तसे घडतंय्, देवादिकांना सुद्धा जिथं साडेसाती चुकली नाही तिथं तुमची आमची काय कथा?" हा विचार माणसाला धीर देतो. वाक्य दिले आहे, पण त्यात वावगे काय आहे?
आयुष्यात निराशे मध्ये कोणतेही मार्ग दिसत नसतांना असा काही आशेचा किरण कुणी दाखवत असेल तर काय हरकत आहे?
या शिवाय, आपण माझ्या पहिल्या आवाहनालाही काही प्रतिसाद दिला नाहीत?

मला वाटते की ज्योतिष जसे संपुर्ण पणे डोळे झाकून स्वीकारू नये तसे संपुर्णपणे नाकारूही नये.
त्यात तथ्य आहे जे मलाही वारंवार जाणवले आहे. कदाचित मला ते वाचता येत नसेल पण असा ग्रहांचा संबंध मात्र अनेकदा जाणवून गेला आहे.

आपला
गुंडोपंत

मतपरिवर्तन

>>मी ज्योतिष समर्थक व विरोधक यांच्यातल्या मध्यस्ता प्रमाणे काम करतो.
मला तरी तसे काही वाटत नाही.

पुस्तक ज्या काळात आले तेव्हाचे दिवस, ज्या अर्थी अंनिसवाली मंडळी तिथे (प्रकाशनाच्या वेळी) होती, स्वःता घाटपांडे त्यात अंनिसवाले. म्हणून हे पुस्तक जरा त्याकडे झुकणारे असणार हे त्या फोटोप्रमाणे स्वच्छ होते. आता कदाचित लेखकाचे मतपरिवर्तन झाले असेल??? पण मग जरा वेगळे / दुसरे पुस्तक लिहायला पाहीजे होते ज्यात "मी ज्योतिष समर्थक व विरोधक यांच्यातल्या मध्यस्ता प्रमाणे काम करतो" बर्‍यापैकी सिद्ध होईल. :-) पण मग सहाजिकच तसे पुस्तक खाली म्हणल्याप्रमाणे "बायस्ड नाही पण संदिग्ध" "उत्तरे नरो वा कुंजरो वा प्रमाणे वाटली." असे वाटू शकते. हा विषयच असा आहे की अर्थात लेखकाला सगळी उत्तरे येत असलीच पाहीजे असे नाही. किंवा मग लेखक प्रचंड पोहोचलेला असामी / सिद्धपुरूष हवा, की दोन्ही बाजुचे शंका निरसन करु शकेल. तसेही अजुन दोनच भाग वाचले आहेत लगेच काही मत बनवायला नको. सगळे मांडून होउ देत. :-)

असो मग आमचे खरे.. नाही तसे नाही. शब्दछल सुरू... हे खगोल, (ज्योतीष) ऍज थियरी उत्तम पण त्यावर आधारित वैयक्तिक भविष्य, घाबरवणे, पैसे खर्च करुन उपाय ह्यामुळे विश्वासार्हता कमी. त्यात सर्वजणांना मतस्वातंत्र्य त्यामुळे मतभिन्नता. ....सगळेच इंटरप्रिटेशनबेस्ड...

धन्यवाद

प्रतिक्रियेबद्द्ल धन्यवाद ( सर्वांना उद्देशुन)
१) जकातदार हे ही माझे मित्रच आहेत.
२) लेखकाची मते म्हणजे 'अंनिस 'ची अधिकृत मते नव्हेत. ती वेगळी आहे.
३) ज्योतिषाकडे लोक जाणारच आहेत पण जाण्यापुर्वी .... हे वाचुन जा.
४) मी "दुवा" आहे ते समर्थक आणि विरोधक या दोघांनाही मी 'अभ्यासक' आहे हे मान्य असल्या मुळे.
५) कौतुक करायला शब्दांच भान सुटलं तरी एकवेळ चालत पण टीका करताना "शब्द" हे शस्त्र आहे याच भान राखाव लागत.
६) लेखकाचे मनोगत व दुसर्‍या आवृत्तीच्या निमित्ताने भिंग लावून वाचावे ही नम्र विनंती
७) चिकित्सा हा शब्द "शल्यचिकित्सा" "शवचिकित्सा" अशा अर्थानेच घ्यावा. आयुर्वेद चिकित्सा या अर्थाने घेउ नये.
८) अजुनही काही गोष्टी हातच्या राखून ठेवल्या आहेत.
९) मतभिन्नता हि असणारच हे गृहीत आहे म्हणूनच प्रतिक्रियेला मोल आहे. आपल्या मनातील आग, ओकारी, त्वेष, घृणा, राग. लोभ. ही आमची संपत्ती आहे .
१०) अहो आपल्या सारख्या लोकांच्या असंख्य प्रतिक्रिया समाजातल्या सर्व स्तरातून इतक्या वर्षात कळत नकळत गोळा झाल्या म्हणुन तर पुस्तक तयार झाले.
(आपला कृपाभिलाषी)
प्रकाश घाटपांडे

धन्यवाद

प्रतिक्रियेबद्द्ल धन्यवाद
प्रकाश घाटपांडे

लैच थोडक्यात

लैच थोडक्यात कटवताय की राव?
फक्त दोन अडीच शब्दात....?

हे झकास की राव! ;))

इतकी कंजुसी का? शनीचा व्ययाशी दाट संबंध आहे की काय? ;)))))
आपला
गुंडोपंत

हा हा ~~~~

प्रतिक्रिया "एडिट" करण्याची संधी आपल्याला मिळू नये हा अंतस्थ हेतू ( सांगु नका कुणाला. टेक्स्ट एडिटरलाही कान असतात)
(व्ययात मकरेचा शनि केतू असलेला)
प्रकाश घाटपांडे

बायस्ड नाही पण संदिग्ध

ही प्रश्नोत्तरे गुळमुळीत आणि संदिग्ध वाटली. त्यातून निश्चित अर्थ काय काढता येईल ते समजले नाही. प्रश्न उत्तम आहेत परंतु उत्तरे नरो वा कुंजरो वा प्रमाणे वाटली.

पण हा माझा अंतिम निष्कर्ष समजू नये. मला लेख एक दोनदा पुन्हा वाचून काही ठोस मिळते का ते पाहायचे आहे.

अशाश्वत

पण हा माझा अंतिम निष्कर्ष समजू नये. मला लेख एक दोनदा पुन्हा वाचून काही ठोस मिळते का ते पाहायचे आहे.

सत्य हे त्रिकालाबाधित शाश्वत नसत हे मला मान्यच आहे.

प्रकाश घाटपांडे

 
^ वर