विरशैव तत्त्वज्ञान

सुप्रसिद्ध लेखक आणि वक्ते कै.मा.श्री. निर्मलकुमार फडकुले यांच्या सत्कार समारंभावेळी (इ.स. २००३) एक गौरवग्रंथ प्रकाशित झाला. त्या ग्रंथात अनेक मान्यवरांचे अनेकविध विषयांवर अभ्यासपूर्ण लेख प्रसिद्ध झाले. 'साहित्य - सामाजिक अनुबंध' असे या ग्रंथाचे नाव आहे.
हा गौरवग्रंथ सोलापुरच्या गायत्री प्रकाशनाने प्रसिद्ध केला. पण त्याचे प्रताधिकार कोणाकडे आहेत त्याचा उल्लेख नाही.

या ग्रंथातील सारेच लेख वाचनीय आणि माहितीपूर्ण आहेत. पण तो सहजासहजी सर्वांना (विकतही) उपलब्ध होईल असे वाटत नाही. माझ्या सासूबाई या मा. फडकुलेंच्या (माजी) विद्यार्थिनी असल्याने त्यांना हा ग्रंथ फडकुल्यांच्या स्वाक्षरीसह उपलब्ध झाला. (आणि पुस्तकी किडा जावई म्हणून मी तो हक्काने घेतला :)) त्यातील महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण लेख येथे प्रसिद्ध करण्याचे मनात आहे. प्रस्तुत लेखांतील मते त्या त्या लेखकांची असून फक्त माहितीसाठी प्रस्तुत केली आहेत हे वेगळे सांगणे नकोच. लेख मोठे आहेत. त्यामुळे क्रमशः लिहावे लागतीलसे दिसते.

मूळ लेखकांचे शतशः आभार.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

लेख क्र. १३ - (पृष्ठ क्र. १९७ ते २०५)


विरशैव तत्त्वज्ञान.

लेखक - श्री. डॉ. शे.दे.पसारकर.

वीरशैव संप्रदाय महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर दक्षिणोत्तर भारतात विस्तरलेला आहे. या संप्रदायाची रंभापूर, उज्जयनी, केदार, श्रीशैल आणि काशी अशी पाच पीठे असून, त्या पीठाधीशांना पंचाचार्य असे म्हटले जाते. पंचाचार्य हेच वीरशैव मताचे संस्थापक होत, असे परंपरा मानते. कर्नाटकात बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी या संप्रदायाचा सामाजिक दृष्टीने विचार करून त्याचा प्रसार - प्रचार केला.

वर शब्दे नोच्यते विद्या शिवजीवैक्य बोधिका |
तस्यां मन्ते ये शैवा वीरशैवास्तु ते मतः || ५-१६ ||

अशी 'सिद्धांतशिखामणी' या ग्रंथात 'वीरशैव' या पदाची व्याख्या केली आहे. 'वी' म्हणजे शिवजीवैक्याचा बोध करणारी विद्या. अशा विद्येत 'र' म्हणजे रत होणारा तो वीरशैव होय, असा या श्लोकाचा आशय आहे. मायिदेवांनी 'विशेषार्थ प्रकाशिकेत'
वि शब्दोत्र विकल्पार्थो शब्दो हितार्थकः |
विकल्परहितं शैव वीरशैवं इति स्मृतः || २-२० ||
वि = विकल्प, र = रहित अर्थात विकल्परहित तो वीरशैव, असे वीरशैव शब्दाचे स्पष्टीकरण दिले आहे. जो विरोधरहित तो वीरशैव (विरोधरहितं शैव वीरशैवं विदुर्बुधा :- क्रियासार) असेही एक स्पष्टीकरण नीलकंठ शिवाचार्यांनी दिले आहे. ही स्पष्टीकरणे तात्विक अंगांनी केलेली आहेत. वीरवृत्तीने शैवधर्माचा प्रसार करणारे ते वीरशैव, असाही एक सयुक्तिक अर्थ लावला जातो. परमार्थसाधनेत कामक्रोधादी विकारांवर विजय मिळवण्यासाठी एक वीरवृत्ती आवश्यक असते. त्या अर्थानेही शैवांना 'वीर' हे विशेषण लावले असण्याची शक्यता आहे.

वीरशैव तत्त्वज्ञानाचा मूलस्रोत :

शंकराने पार्वतीला जो उपदेश केला त्याला 'आगम' असे म्हटले जाते. आगमाचेच पर्यायनाम 'तंत्र' असे आहे. ज्याच्या अध्ययनाने ज्ञानवृद्धी होते ते 'तंत्र' होय. (तन्यते विस्तारयते ज्ञानमनेन) ब्राह्मणतंत्र, बौद्धतंत्र आणि जैनतंत्र असे तंत्राचे तीन प्रकार आहेत. उपास्यदेवतेच्या भेदामुळे ब्राह्मणतंत्राचे शिव , वैष्णव आणि शाक्त असे तीन भाग झाले. वैष्णवागम (पांचरात्रागम) विशिष्टाद्वैताचे, शाक्तागम अद्वैतांचे आणि शैवागम द्वैत-अद्वैत-द्वैताद्वैत-विशिष्टाद्वैत-शक्तिविशिष्टाद्वैत यांचे प्रतिपादन करतात.

(पान क्र.१९७ पूर्ण)-------------------------------------------------------------------------------------

कामिकागमपासून ते वातुलागमापर्यंत अठ्ठावीस आगमांना 'शैवागम' असे म्हणतात. 'सिद्धांतागम' असेही त्यांचे एक पर्यायनाम आहे. उपनिषदांना 'वेदान्त' आणि आगमांना 'सिद्धांत' असे संबोधिले जाते. १ कामिक, २ योगज, ३ चिन्त्य, ४ कारण, ५ अजित, ६ दीप्त, ७ सूक्ष्म, ८ सहस्र, ९ अंशुमान, १० सुप्रभेद, ११ विजय, १२ निश्वास, १३ स्वायंभूव, १४ अनल , १५ वीर ,१६ रौरव, १७ मकुट, १८ विमल, १९ चंद्रज्ञान, २० बिंब, २१ प्रोद्गीत्, २२ ललित, २३ सिद्ध, २४ संतान, २५ शर्वोक्त, २६ पारमेश्वर, २७ किरण आणि २८ वातुल असे अठ्ठावीस शैवागम होत. यांपैकी पहिले दहा आगम शिवाकडून आणि पुढील अठरा रुद्राकडून उपदेशिलेले आहेत. विद्वानांनी आगमांचा काल वेदांइतकाच प्राचीन मानलेला आहे. अठ्ठावीस आगमांपैकी फारच थोडे आगम आज उपलब्ध आहेत.

आगमांमध्ये क्रियापाद, चर्यापाद, योगपाद आणि ज्ञानपाद असे चार विभाग असतात. क्रियापादात देवालयाची स्थापना, मूर्तीचे निर्माण व प्रतिष्ठापना या विषयाचे प्रतिपादन असते. चर्यापादात मूर्तीची पूजा, उत्सवादि विषयांचे निरुपण, योगपादात अष्टांगयोग साधना आणि ज्ञानपादात दार्शनिक विषय वर्णिलेले असतात. हे शैवांगमंच वीरशैव तत्त्वज्ञानाचा मूलस्रोत होय. अठ्ठावीस शैवागमांपैकी पहिल्या दहा आगमांचा स्वीकार करून द्वैतवादी सिदधांत-शैवदर्शन निर्माण झाले. पुढील अठरा आगमांना प्रमाण मानून अद्वैतवादी काश्मीर शैवदर्शन निर्माण झाले. परंतु, वीरशैवाचार्यांनी सर्व अठ्ठावीस शैवागमांचा स्वीकार करून समन्वयात्मक तत्त्वज्ञान प्रस्थापित केले. शक्तिविशिष्टाद्वैत, षट्स्थलसिद्धांत, अष्टावरण आणि पंचाचार ही वीरशैव संप्रदायाची चार प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. उपनिषदांचे सार जसे भग्वद्गीतेत संकलित झाले, त्याप्रमाणे शैवागमांचे सार शिवयोगी शिवाचार्यांच्या 'सिद्धांतशिखामणी' या ग्रंथात संग्रहित झालेले आहे. म्हणून या ग्रंथाला 'वीरशैवांचा धर्मगंथ' अशी प्रतिष्ठा लाभली आहे.

शक्तिविशिष्टाद्वैत :

क्रमशः -१

Comments

वाह !

विसुनाना,

खुप दिवसांपासून बसवेश्वर आणि 'विरशैव' पंथा बद्दल ऐकून होतो. येथे या पंथाची विस्तृत माहिती देताय हे वाचुन बरे वाटले. पुढील सर्व भागांची आतुरतेने वाट पाहतोय.

निर्मलकुमार पडकुलेंना लोकमत मधे संतसाहित्यावर लिहीलेलं आठवतं. ते वाचायचोही नियमीत. मागे सोलापुरच्या साहित्यसंमेलनाच्या वेळी ते प्रकाशझोतात आले होते. संत साहित्याचे ते गाढे अभ्यासक होते असं ऐकुन आहे. या अनुशंगाने त्यांच्या बद्दलही काही लिहीता आले तर बघा . अर्थात ही लेखमाला संपल्यावर !

नीलकांत

सुंदर उपक्रम

त्यातील महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण लेख येथे प्रसिद्ध करण्याचे मनात आहे.

आपल्या या सत्कार्याला आमच्याकडून अनेकोत्तम शुभेच्छा! विरशैव संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाचा परिचय या लेखात उत्तमरीतीने करून दिला आहे. हा लेख आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल धन्यवाद! लेखमालेतील पुढील लेखांबद्दल उत्सुकता आहे.

आपला
(वाचनोत्सुक) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~

लिंगायत

आपला हा लेख पुन्हा वाचला आणि एक शंका मनात आली, विरशैव संप्रदायातील लोकांनाच काही भागांत लिंगायत असे म्हणतात का हो?
आपला
(प्रश्नग्रस्त) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~

अर्थातच्

वीरशैव म्हणजेच लिंगायत.

 
^ वर