दिनविशेष : २७ फेब्रुवारी - 'जागतिक मराठी भाषा दिवस'

माझ्या मराठी मातीला नका म्हणू हीन दीन
स्वर्गलोकाहून थोर मला हिचे अभिमान

असे अभिमानाने आपल्या काव्यप्रतिभेने अवघ्या मराठी जनांना एक अभिमान देणार्‍या कविवर्य कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस. हाच दिवस महाराष्ट्र शासनाने मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करायचे घोषित केले. जागतिक मराठी अकादमीने या कामी पुढाकार घेतला आणि हा दिवस आपण 'जागतिक मराठी भाषा दिवस' म्हणून साजरा करतो.

तेव्हा समस्त मराठी जनांना 'जागतिक मराठी भाषा दिवसाच्या' हार्दिक शुभेच्छा

जागतिक मराठी भाषा दिवस

कुसुमाग्रजांनी मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले त्याचीच आठवण म्हणून त्यांच्या जन्मदिवशी आपण 'जागतिक मराठी भाषा दिवस' म्हणून साजरा करतो. स्वत:चा वाढदिवस साजरा करण्याची कल्पना कुसुमाग्रजांना कधीही मानवली नाही. अनेकांनी त्यांचे वाढदिवस साजरे करण्याचे प्रयत्न केले. पण वाढदिवसाच्या आधी २ दिवस ते अज्ञातवासात निघून जात. परंतु त्यांच्या ८५ व्या वाढदिवशी मात्र त्यांच्या चाहत्यांनी त्यांना प्रेमाची भेट दिलीच.

कुसुमाग्रजांना मुळातच आकाश चांदणे, तारे, तारकांचे वेड होते त्यामुळे अवकाशातील एका तार्‍यालाच त्यांनी कुसुमाग्रजांचे नाव दिले. स्वीडनमधील इंटरनॅशनल स्टार रजिस्ट्री मार्फत दि.२७ फेब्रुवारी १९९६ रोजी स्वर्गदारातील तारा (स्टार इन द गेट वे ऑफ हेवन्स) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तार्‍याला कुसुमाग्रजांचे नाव देण्यात आले. एवढयावरच त्यांचे चाहते थांबले नाहीत तर त्यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करण्याचा संकल्प त्यांनी सोडला. आणि तो सिद्धीसही नेला.

Kusumagraj

नाशिक ही कवी आणि क्रांतिकारकांची भूमी आहे. अनंत कान्हेरे, वीर सावरकर अशा क्रांतिवीरांचे धगधगते कुंड अशी एके काळी नाशिकची ओळख होती. कुसुमाग्रजांच्या प्रतिभेने या क्रांतीचा ज्वाळांना शब्दांचा अंगार चढवून कवितेला स्वातंत्र्यलढय़ाच्या समरांगणात उतरवले. त्यांची ‘क्रांतीचा जयजयकार’ ही कविता तर स्वातंत्र्य- लढय़ातील सैनिकांचे स्तोत्र बनली होती. अशा या मराठी भाषेच्या वाढीसाठी प्रयत्न करणार्‍या वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी 'जागतिक मराठी भाषा दिवस' साजरा होतो आहे ही एक भाग्याचीच गोष्ट म्हटली पाहिजे.

तेव्हा आजच्या या पुण्यदिनी ज्ञानेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे "अमृताशीही पैजा जिंकणार्‍या" आपल्या माय मराठीचे कौतुक करुयात आणि तिला दिवसेंदिवस वाढीस लावण्याची मनोमन प्रतिज्ञा घेऊयात.

कुसुमाग्रजांनादेखील मराठी भाषेतील त्यांच्या अनमोल योगदानाबद्दल आदरपूर्वक श्रद्धांजली

संदर्भ : विकी, महान्यूज, काही जालीय वृत्तपत्रे आणि कुसुमाग्रज.कॉम
चित्रे : जालावरुन साभार

Comments

चुकीची दुरुस्ती..

कुसुमाग्रजांचे संकेतस्थळ कुसुमाग्रज.ओआरजी असे वाचावे.

शुभेच्छा!

'जागतिक मराठी भाशा दिवसा निमित्त' माझ्या लाडक्या मराठी भाशेला शुभेच्छा!

मराठी दिवसाच्या शुभेच्छा

स्वतःच्या ओळखीत काहि लपवण्यासारखे आहे अश्या न्यूनगंडाने भरलेल्या (किंवा भेदरलेल्या) शुल्लक व्यक्ती सोडल्यास बाकी सार्‍या स्वतःला उजळ माथ्याने मराठी म्हणून ओळखणार्‍या व ओळख करून देणार्‍या करणार्‍या प्रत्येकाला मराठी भाषा दिवसाच्या शुभेच्छा

ऋषिकेश
------------------
धम्मक असेल आपली मते आपली ओळख दाखवून थेट मांडावीत, कायद्याला घाबरून भ्याडासारखे आयडीच्या पदराआड लपु नये

हार्दिक शुभेच्छा

मायमराठीत भाषाव्यवहार करणाऱ्या किंवा करू इच्छिणाऱ्या कुक्कुल्या बाळांपासून शेंबड्या पोरांपर्यंत, फिदीफिदी हसणाऱ्या 'डूआय'पासून धाय मोकलून आंक्रदणाऱ्या 'डोन्टआय'1पर्यंत सगळ्यांना मराठी भाषादिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

1. म्हणजे ओळख नसलेली खरी आयडी/ओळख

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

 
^ वर