मराठीतील रूढ संस्कृत शब्द आणि वचने - भाग ६ आणि अखेरचा.

मराठीतील रूढ संस्कृत शब्द आणि वचने - भाग ६ आणि अखेरचा.

, , , आणि येथे ह्यापूर्वीचे भाग पहावेत.

१) य: क्रियावान्स पण्डितः.

पठका: पाठकाश्चैव ये चान्ये शास्त्रचिन्तकाः।
सर्वे व्यसनिनो मूर्खा यः क्रियावान्स पण्डितः॥
महाभारत वनपर्व (यक्षप्रश्न) ३१४.११२

शिकणारे, शिकवणारे आणि शास्त्रांचे अन्य अभ्यासक जर वाईट सवयी बाळगत असले तर तेहि अज्ञ जनातच गणले पाहिजेत. तोच खरा पंडित जो शिकलेले आचरणात आणतो.

२) धर्मो रक्षति रक्षितः.

धर्म एव हतो हन्ति धर्मो रक्षति रक्षितः।
तस्माद्धर्मं न त्यजामि मा नो धर्मो हतोऽवधीत् ।।
महाभारत वनपर्व (यक्षप्रश्न) ३१४.१३१

विनाश केलेली सुव्यवस्था विनाश करणार्‍याचा नाश करते. संरक्षण केलेली सुव्यवस्था संरक्षणकर्त्याचे रक्षण करते. अतएव, मी सुव्यवस्था टाकत नाही, अशासाठी की असंरक्षित व्यवस्था आमचा विनाश न करो.

३) परदु:खं शीतलम्.

महदपि परदु:खं शीतलं सम्यगाहु:
प्रणयमगणयित्वा यन्ममापद्गतस्य।
अधरमिव मदान्धा पातुमेषा प्रवृत्ता
फलमभिनवपाकं राजजम्बूद्रुमस्य॥
विक्रमोर्वशीय ४.२७

दुसर्‍याचे दु:ख मोठे असले तरी शीतल असते असे म्हणतात ते योग्य आहे. ही मदान्ध (कोकिळा) संकटात पडलेल्या माझ्या मनधरणीला दाद न देता नव्याने पिकलेल्या जांभळीच्या फळाचा चुंबन घ्यावे तसा आस्वाद घेण्य़ात गुंतली आहे. (उर्वशीचा शोध घेणारा विक्रम कोकिळेला तो प्रश्न विचारतो आणि उत्तर न मिळाल्याने हे उद्गार काढतो.)

मॅनवेरिंगनिर्मित मराठी म्हणींच्या संग्रहात क्र. ५४८ येथे ’आपदुःख भारी आणि परदुःख शीतळ’ अशी म्हण दिली आहे.

४) गजस्तत्र न हन्यते.

शूरश्च कृतविद्यश्च दर्शनीयोऽसि पुत्रक।
यस्मिन्कुले त्वमुत्पन्नो गजस्तत्र न हन्यते॥
पंचतंत्र लब्धप्रणाश ४०.

एका सिंहिणीने कोल्ह्याच्या मुलाला वाढविले पण हत्तीची शिकार त्याच्या शक्तीपलीकडची आहे हे ती जाणते म्हणून त्याला ती सांगते...) ’बाळा, तू शूर आहेस, शिकलेला आहेस, दिसायलाहि चांगला आहेस. तरीपण ज्या कुळात तुझा जन्म झाला तेथे हत्तीची शिकार होत नाही.’

५) सर्वनाशे समुत्पन्ने ह्यर्धं त्यजति पण्डितः.

सर्वनाशे समुत्पन्ने ह्यर्धं त्यजति पण्डितः।
अर्धेन कुरुते कार्यं सर्वनाशस्तु दुःसहः॥
पंचतंत्र अपरीक्षितकारक ४२.

सगळ्याचाच नाश होण्याऐवजी शहाणा माणूस अर्धे सोडून देतो आणि अर्ध्यावर भागवितो. सगळ्याचाच नाश होणे दु:खकारक असते.

६) निर्वाहः प्रतिपन्नवस्तुषु.

किं कूर्मस्य भरव्यथा न वपुषि क्ष्मां न क्षिपत्येष यत्
किं वा नास्ति परिश्रमो दिनपतेरास्ते न यन्निश्चलः |
किंत्वङ्गीकृतमुत्सृजन्कृपणवत् श्लाघ्यो जनो लज्जते
निर्वाहः प्रतिपन्नवस्तुषु सतामेतद्धि गोत्रव्रतम् ||
भर्तृहरि नीतिशतक ११७.

(स.प.महाविद्यालयाचे बोधवाक्य) कूर्म हा पाठीवरून पृथ्वीचे ओझं ढकलून देत नाही म्हणजे काय ते त्याला जड वाटत नसेल? सूर्य कधीच थांबत नाही तर त्याला काय थकवा येत नसेल? एकदा सुरु केलेले काम क्षुद्रपणे मधेच सोडून द्यायला थोर लोकांना संकोच वाटतो. हाती घेतले ते तडीस नेणे हे थोरांचे कुलव्रतच असते.

७) आन्तरः कोऽपि हेतु:.

व्यतिषजति पदार्थानान्तर: कोऽपि हेतुः
न खलु बहिरुपाधीन्प्रीतय: संश्रयन्ते।
विकसति हि पतङ्गस्योदये पुण्डरीकं
द्रवति व हिमश्मावुद्गते चन्द्रकान्त:॥
मालतीमाधव १.१५

स्त्रीपुरुषांना आतील कोठलातरी धागा एकमेकांकडे आकृष्ट करतो. प्रीति बाह्य गोष्टींवर अवलंबून नसते. सूर्य उगवल्यावरच कमळ फुलते आणि चंद्र उगवल्यावरच चंद्रकान्तमणि पाझरू लागतो.

८) कालो ह्ययं निरवधिर्विपुला च पृथ्वी.

ये नाम केचिदिह न: प्रथयन्त्यवज्ञां
जानन्तु ते किमपि तान्प्रति नैष यत्न:।
उत्पत्स्यतेऽस्ति मम कोऽपि समानधर्मा
कालो ह्ययं निरवधिर्विपुला च पृथ्वी॥
मालतीमाधव १.७.

आज जे माझी उपेक्षा करीत आहेत त्यांना काहीहि वाटो, माझा हा प्रयत्न त्यांच्यासाठी नाही. आगेमागे केव्हातरी माझा समानधर्मा जन्माला येईलच कारण काल अनंत आहे आणि पृथ्वी खूप मोठी आहे.

९) अवडंबर.

संस्कृतमध्ये ’आडम्बर’ म्हणजे ’मोठा नगारा’. त्याचा अपभ्रंश म्हणजे मराठी ’अवडंबर’ म्हणजे ’खोटा देखावा, निरर्थक आवाज’.

१०) अष्टसात्त्विकभाव.

’विठ्ठलाच्या दर्शनाने वारकर्‍यांचे अष्टसात्त्विकभाव जागृत झाले.’ हे अष्टसात्त्विकभाव म्हणजे ’स्तम्भ, प्रलय, रोमांच, स्वेद, वैवर्ण्य, वेपथु, अश्रु आणि वैस्वर्य’ म्हणजेच अनुक्रमे स्तब्धता, मूर्छा येणे, अंगावर काटा उभा राहणे, घाम, कंप, अश्रुपात आणि आवाजात बदल.

११) होरा.

मराठीत ’होरा’ म्हणजे भविष्याची कल्पना किंवा तर्क, ज्यावरून ज्योतिषांना आदरपूर्वक ’होराभूषण’ असे संबोधले जाते. मूळचा खाल्डियन भाषेतील ’दिवसाचा २४ वा भाग अशा अर्थाचा हा शब्द ग्रीक भाषेमध्ये ώρα असा बदलून तेथून भारतीय ज्योतिषात त्याच अर्थाने प्रचलित झाला. (इंग्रजी hour हा शब्दहि त्याच उगमाचा.) भारतीय ज्योतिषात दिवसाच्या २४ तासांना क्रमाने एकेक ग्रह ’होरेश’ मानला जातो आणि त्यांचा क्रम पृथ्वीभोवतीच्या त्यांच्या प्रदक्षिणाकालाच्या उतरत्या क्रमाने शनि, गुरु, मंगळ, रवि, शुक्र, बुध आणि चंद्र (सोम) असा असतो. आजच्या दिवसाचा पहिला होरेश शनि असला तर आजचा वार शनिवार. उतरत्या क्रमाने तीन आवर्तनांनंतर आजचा शेवटचा होरेश मंगळ आणि उद्याचा पहिला होरेश रवि म्हणून उद्याचा दिवस रविवार आणि ह्याच क्रमाने सोमवार, मंगळवार इत्यादि निर्माण होतात. ’होरा’ शब्दाच्या मूळ अर्थाची विस्मृति होऊन त्याला ’भविष्य’ हा अर्थ चिकटला.

ह्याविषयी श्लोक:

मन्दादध: क्रमेण स्युश्चतुर्था दिवसाधिपा:।
होरेशा: सूर्यतनयादधोधः क्रमशस्तथा॥
सूर्यसिद्धान्त भूगोलाध्याय.

(सूर्यपुत्र शनिपासून खालच्या क्रमाने होरेश होऊन चौथे ग्रह ओळीने दिवसाधिप होतात.)

१२) पंचत्वास जाणे.

पंचमहाभूते म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश. मृत्यूनंतर मृतदेह पुन: पंचमहाभूतामध्ये समाविष्ट होतो म्हणून मृत्यु पावणे म्हणजे पंचत्वास जाणे.

१३) यक्षप्रश्न.

वनवास भोगतांना नकुल एका सरोवरावर पाणी आणण्यास जातो तेथील रक्षक यक्ष त्याला बेशुद्ध करतो. क्रमाक्रमाने अन्य सर्व पांडवांचेहि तेच होते. अखेरीस यक्षाच्या सर्व प्रश्नांची योग्य उत्तरे देऊन धर्मराज यक्षाला प्रसन्न करतो ह्या महाभारतकथेवरून ’अवघड प्रश्न’ अशा अर्थी ’यक्षप्रश्न’ हा शब्द रूढ झाला.

'यादवी युद्ध' हा वाक्प्रचारहि कलियुगाच्या प्रारंभी आणि कृष्णाच्या निजधामास जाण्याचा प्रसंगी यादवांनी एकमेकात लढून द्वारका बुडविली त्यावरून निर्माण झाला आहे.

१४) हितं मनोहारि च दुर्लभं वचः.

क्रियासु युक्तैर्नृप चारचक्षुषो न वञ्चनीयाः प्रभवोनुजीविभिः।
अतोऽर्हसि क्षन्तुमसाधु साधु वा हितं मनोहारि च दुर्लभं वच:॥
किरातार्जुनीय १.४.

कार्यावर नेमलेल्या सेवकांनी हेर हेच डोळे असलेल्या राजांची दिशाभूल करू नये. अतएव माझे बोलणे प्रिय वा अप्रिय असले तरी तू त्याला क्षमा करावीस कारण हितकर आणि तरीहि मनाला रिझवणारे बोलणे दुर्मिळ असते.

१५) अहिंसा परमो धर्म:.

अहिंसा परमो धर्मस्तथाऽहिंसा परं तप:।
अहिंसा परमं सत्यं यतो धर्मः प्रवर्तते॥
अनुशासनपर्व ११५.२३

अहिंसा हा श्रेष्ठ धर्म, तप आणि सत्य आहे. अहिंसेतून धर्म उत्पन्न होतो.

१६) शठं प्रति शाठयम्.

हिते प्रतिहितं कुर्यात् हिंसिते प्रतिहिंसितम्।
तत्र दोषं न पश्यामि शठे शाठयं समाचरेत्॥
पंचतंत्र अपरीक्षितकारक ८५.

चांगल्याला चांगल्य़ाने आणि हिंसेला हिंसेने उत्तर द्यावे. गुंडाला गुंडगिरीने उत्तर द्यावे. मला ह्यात काहीहि वावगे दिसत नाही.

(अशाच अर्थाचा आणि रूपाचा आणखी एक श्लोक:

कृते प्रतिकृतिं कुर्याद्धिंसिते प्रतिहिंसितम्।
तत्र दोषं न पश्यामि दुष्टे दुष्टं समाचरेत्॥)

’शठं प्रति शाठयम्’ हे वचन लोकमान्य टिळकांच्या लिखाणातून लोकप्रिय झाले असे वाटते. तत्पूर्वी तसेच्या तसे ते कोठे आढळत नाही.

१७) द्रव्येण सर्वे वशाः.

निर्द्रव्यः पुरुषो विपल्लवतरुः सर्वत्र मन्दादरो
नित्यं लोकविनापराधकुपितो दुष्टं च सम्भाषणम्।
भार्या रूपवती च मन्दमनसा स्नेहान्न चालिङ्गते
तस्माद्द्रव्यमुपार्जय श्रुणु सखे द्रव्येण सर्वे वशा:॥
सुभाषित.

द्रव्यहीन मनुष्य निष्पर्ण झाडासारखा असतो. त्याला कोठेहि मानाची वागणूक मिळत नाही. लोक त्याची चूक नसतांनाहि त्याला रागावतात आणि त्याच्याशी दुराव्याने बोलतात. सुंदर पत्नीहि त्याच्याकडे दुर्लक्ष करते आणि त्याला प्रेमाने आलिंगन देत नाही. म्हणून मित्रा ऐक, पैसा मिळव, सगळे पैशामागे येतात.

१८) भार्या रूपवती शत्रुः.

भार्या रूपवती शत्रुः पुत्रः शत्रुरपण्डितः।
ऋणकर्ता पिता शत्रुर्माता च व्यभिचारिणी॥
सुभाषित.

सुस्वरूप भार्या, अशिक्षित पुत्र, कर्ज करून ठेवणारा बाप आणि वाईट चालीची आई हे शत्रु होत.

१९) दारिद्र्यान्मरणं वरम्.

उत्तिष्ठ क्षणमेकमुद्वह सखे दारिद्र्यभारं मम
श्रान्तस्तावदिदं चिरान्मरणजं सेवे त्वदीयं सुखम्।
इत्युक्तं धनवर्जितस्य वचनं श्रुत्वा श्मशाने शवम्
दारिद्यान्मरणं वरं वरमिति ज्ञात्वैव तूष्णीं स्थितम्॥
पंचतंत्र?

’काही काळ ऊठ आणि माझा दारिद्र्यभार आपल्यावर घे, खूप काळापासून दमलेला असा मी तेव्हढया वेळात तुझे मरणामधले सुख भोगतो’. श्मशानातील शवाने दरिद्री माणसाचे हे बोलणे ऐकले आणि दारिद्र्यापेक्षा मरण बरे हे ओळखून काही उत्तर दिले नाही.

२०) चक्रनेमिक्रमेण.

नन्वात्मानं बहु विगणयन्नात्मनैवावलम्बे
तत्कल्याणि त्वमपि नितरां मा गमः कातरत्वम्।
कस्यात्यन्तं सुखमुपगतं दु:खमेकान्ततो वा
नीचैर्गच्छत्युपरि च दशा चक्रनेमिक्रमेण॥
मेघदूत उत्तरमेध ४८.

(यक्षाने मेघाबरोबर पाठविलेल्या संदेशाचा एक भाग...) उर्वरित दिवसांचा आपल्याशीच हिशोब करत मी स्वतः स्वतःला सांभाळून आहे आणि म्हणून हे कल्याणि, तूहि फार विकल होऊ नकोस. सर्वच सुख अथवा सर्वच दु:ख कोणाला भोगावे लागते? भाग्य हे चाकाच्या आर्‍यांप्रमाणे खाली जाते आणि वरहि येते.

भाग २ मध्ये थोडया फरकाने पुढील श्लोक ’महाजनो येन गतः स पन्था:’ ह्या उक्तीसाठी दाखविला होता पण त्याचा मूलस्रोत तेथे दिला नव्हता. हा श्लोक महाभारतातील यक्षप्रश्नाचा एक भाग आहे असे थोडे शोधल्यावर कळले.

तर्कोऽप्रतिष्ठः श्रुतयो विभिन्ना
नैको मुनिर्यस्य मतं प्रमाणम्।
धर्मस्य तत्त्वं निहितं गुहायां
महाजनो येन गतः स पन्था: ।।
महाभारत वनपर्व (यक्षप्रश्न) ३१४.११९.

Comments

अतिशय माहितीप्रद

माहितीप्रद आणि अभ्यासपूर्ण मालिका: संपली हे वाचून हुरहुर लागली.
हाच धागा पुढे चालवून काही प्रसिद्ध बोधवाक्ये आणि श्लोक यांचा इतिहासही दुसर्‍या मालिकेतून यावा असे वाटले.
हा आपला सांस्कृतिक ठेवा आहे.
**
'होरा' म्हणजेच 'अवर' हे वाचून पुन्हा एकदा मानवी संस्कृतीच्या समन्वयकालाची आठवण झाली.
अष्टसात्त्विकभावांमधले एक - वैवर्ण्य म्हणजे 'पांढरे फटक पडणे' हे तर स्पष्टच आहे. तो मराठी उल्लेख राहिला आहे.

+१

माहितीप्रद आणि अभ्यासपूर्ण मालिका. अनेक धन्यवाद.

संग्राह्य

वारांची उत्पत्ती (नेमके तेच ग्रह कसे) हे माहित नव्हते.
हा लेखच नाही तर सारी मालिकाच अतिशय संग्राह्य आहे!

ऋषिकेश
------------------
धम्मक असेल आपली मते आपली ओळख दाखवून थेट मांडावीत, कायद्याला घाबरून भ्याडासारखे आयडीच्या पदराआड लपु नये

होरा

अहोरात्र यात होरा हा शब्द येतोच.
'अहोरात्र डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणे' आपण म्हणतो म्हणजे दिवसाचे २४ तास लक्ष. होरा म्हणजे अन्दाज या अर्थी सुद्धा वापरतात पण होरा व त्याचे वरून् वार वगैरे गोष्टी माहिति नव्हत्या ते वाचून आनन्द झाला.

दुसरी मालिका यावी या विसुनाना यान्चया विधानाशी सहमत आहे

सुरेख

लेख मालिका फारच सुरेख झाली. तिची एकत्रित बांधणी केल्याबद्दल उपक्रम प्रशासनाला धन्यवाद.

वार ही भारतीय कल्पना

आता तरी वार ही भारतीय कल्पना आहे हे पटावे.---.वाचक्नवी

कसे?

समजले नाही. या लेखात पटण्याकरिता काय विशेष नवीन माहिती?

होर्‍यांची नावे जर ७ दृश्य ग्रहांच्या क्रमाने असतील, आणि दिवसातल्या होर्‍यांची संख्या ७ने विभाज्य नसली, तर दिवसातल्या पहिल्या होर्‍यांचे ७ दिवसांचे चक्र असणारच. म्हणजे होर्‍यांना दृश्य ग्रहांची नावे देण्याची संकल्पना जिथून कुठून आली, आणि दिवसाला पहिल्या होर्‍याच्या ग्रहावरून नाव देण्याची प्रथा जिथून कुठून आली, तिथून ७ वारांचे चक्र आले.

पण ती प्रथा भारतातून आली, असे या लेखातील माहितीवरून का बरे पटावे?

वारांची संकल्पना आणि नावे

वारांच्या संकल्पनेविषयी शं. बा. दीक्षितांनी 'भारतीय ज्योति:शास्त्र' ह्या ग्रंथात जे लिहिले आहे त्याचा संक्षेप करतो.

दीक्षित म्हणतात की सात वार आणि मेषादि राशींचा उल्लेख वेदांमध्ये आढळत नाही. त्यांनी (दीक्षितांनी) विचारात घेतलेल्या काही अन्य ग्रंथांपैकी वारांचा उल्लेख केवळ अथर्वज्योतिष आणि याज्ञवल्क्यस्मृतीत आहे. दिवसाचे होरासंज्ञक २४ भाग करण्याची पद्धति भारतीय ज्योतिषग्रंथांत वारांच्या संदर्भात आणि फलज्योतिषसंबंधात येते पण कालमापनाच्या संदर्भात येत नाही. 'होरा' हा शब्दहि मूळचा संस्कृत नसून खाल्डियामधून ग्रीसच्या मार्गाने भारतात आला आहे. ('अहोरात्र' ह्या शब्दातून 'अ' आणि 'त्र' काढून उरते ती होरा असे जे मानले जाते त्याचा उगम वराहमिहिरापासून असून त्याची ती समजूत चुकीची आहे असे दीक्षितांनी लिहिले आहे.) खाल्डियन संस्कृतीमध्ये वार फार प्राचीन कालापासून प्रचलित होते (इ.स. पूर्व ३८०० वर्षे) आणि ह्या सर्व गोष्टींचा विचार करता सात वार मूळचे भारतीय नसून खाल्डियात त्यांचा उगम आहे असा निष्कर्ष दीक्षितांनी काढला आहे.

भारतीय वारांची नावे आणि पाश्चात्य देशातील वारांची नावे सारखीच आहेत ह्यावरूनहि त्यांचा उगम एकाच स्रोतातून झाला आहे हे जाणवते.

वाचक्नवींना वारांची संकल्पना भारतीय आहे असे का वाटते हे त्यांनी थोडे विस्तारपूर्वक लिहिल्यास अधिक अभ्यास करता येईल.

मालिका फार आवडली

मालिका फार आवडली.

प्रत्येक भागात अगदी योग्य प्रमाणात मालमसाला होता - सलग वाचताना फार कमी वाटू नये, फार अधिक वाटू नये. मालिका तडीस नेण्याबाबत अभिनंदन.

या भागातले "होरा"चे स्पष्टीकरण फारच माहितीपूर्ण वाटले. आजवर आठवड्यातल्या दिवसांच्या नावाचा क्रम नीट कोड्यात पाडे. त्याचे मी स्वतःसाठी बनवलेले स्पष्टीकरण अतिशय बोजड होते. हे स्पष्टीकरण वाचून आनंद झाला.

होराविषयी

होराविषयी चर्चा यापूर्वी येथे आणि येथे झाली होती. :-)

त्यातली वारांच्या नावांबाबत माहिती लक्षात राहिली नव्हती

लेख वाचताना त्या चर्चा आठवल्या होत्या. पण वारांच्या नावांच्या क्रमाबाबत माहिती लक्षात राहिली नव्हती. अगदी मागच्या महिन्यापर्यंत मी ये वारांच्या क्रमाचे कोडे गंमत म्हणून सोडवायचा प्रयत्न करत होतो.

आभारी आहे

उपक्रमाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारी लेखमाला. अतिशय उत्तम उपक्रम!

सुरेख मालिका

मालिका सुरेखच झाली. संग्रहणीय आहे. धन्यवाद.

"धर्म" याचा अर्थ सुव्यवस्था लावला आहे त्याला अलिकडचा काही संदर्भ आहे का? का धर्माची एखादी व्याख्या सुव्यवस्था अशी आहे/होती?

धर्म म्हणजे काय?

ह्या प्रश्नाचे अधिकृत उत्तर द्यायला पुरेसा अधिकार माझ्यापाशी नाही तरी पण मला जाणवणारे लिहितो.

धारणात् धर्म:, धर्मयुद्ध, यमधर्म अशा शब्दांवरून समाजाची घडी नियमांना धरून सुरळीत चालू ठेवणे म्हणजे धर्म असे वाटते. मोनिअर-विल्यम्सच्या कोषात दिलेल्या अनेक अर्थच्छ्टा हेच सुचवितात. म्हणून मी धर्म ह्या शब्दाचे सुटसुटीत भाषान्तर 'सुव्यवस्था' असे केले आहे.

हा श्लोक मनुस्मृतीत सापडला, संदर्भानुसार "कायदा"

"धर्मो रक्षति रक्षितः" वरचा पूर्ण श्लोक मला मनुस्मृतीमध्ये सापडला (८.१५).

इन्टर्नेटवरील महाभारत वनपर्वात सापडला नाही :-( (लेखात श्लोकाचा क्रमांक चुकला आहे काय? कदाचित महाभारतातला मनुस्मृतीमध्ये उद्धृत केलेला असेल.)

आदल्यामागल्या श्लोकांवरून अनेक अर्थांपैकी कुठला निवडायचा तो संदर्भ मिळू शकतो. म्हणून शोधायला गेलो. मनुस्मृतीतल्या संदर्भात "कायदा/सुव्यवस्था/नियमानुसार वर्तन" असा काहीसा अर्थ दिसतो. हा ८वा अध्याय "राजसभा/न्यायनिवाडासभा" यांच्याबाबत आहे. कुठल्या प्रकारचे तंटे सभेत निवाड्याकरिता येतात, हे सांगितले जाते :
कर्जफेडीबाबत विवाद वगैरे (आजकालच्या दिवाणी मामल्यांची यादी), मारामारी-चोरी वगैरे (आजकालच्या फौजदारी मामल्यांची यादी दिलेली आहे. हे विवाद समोर आल्यावर...
...धर्मं शाश्वतमाश्रित्य कुर्यात् कार्यविनिर्णयम् ॥ ८.८
शाश्वत धर्माच्या आश्रयाने काय करावे त्याचा निर्णय करावा. असा "धर्म" शब्द पहिल्यांदा उल्लेखला जातो. त्या अर्थी या संदर्भात दिवाणी-फौजदारी मामल्यात न्यायनिवाडा करण्यास उपयुक्त नियमांना "धर्म" म्हटलेले आहे.

अधर्माविरुद्ध धर्माच्या बाजूने निवाडा करणे ही सभासदांची जबाबदारी आहे, असे मनू पुढे सांगतो. ही जबाबदारी टाळण्याचे धोके सांगतो : धर्माचे रक्षण केले तर तो रक्षण करतो.
या संदर्भात धर्माचे रक्षण करणे म्हणजे राजा-न्यायाधीश यांनी धर्मानुसार न्यायनिवाडा करणे. न्याय असलेले राज्य असले, तर ते राज्य, तो राजा, त्याचे न्यायाधीश टिकून राहातील, नाहीतर ते नाश पावतील.

(या चांगल्या सल्ल्यानंतर भलत्याच कशाततरी अध्याय शिरतो.)

- - -
*
त्यानंतर मनुस्मृतीतले काही श्लोक ब्राम्हण वि. शूद्र सभासद या जातीय प्रौढीत शिरतात.
उदाहरणार्थ :
जातिमात्रोपजीवी वा कामं स्याद् ब्राह्मणब्रुवः ।
धर्मप्रवक्ता नृपतेर्न शूद्रः कथंचन ॥ ८.२०
(वृत्तभंग?? टंकनदोष??)
नुसता नामधारी किंवा उपजीविकेपुरता ब्राम्हण असला, तरी त्याला धर्मप्रवका नेमावे, शूद्राला मात्र कधीच नाही... वगैरे वगैरे.
मनुस्मृती लिहिली त्या काळात काही राज्यांत शूद्र राजसभेत मानाने बसू लागले असावे, आणि अन्य राज्यांत मात्र नव्हे. त्यामुळे हा प्रकार ताज्या बातम्यांमध्ये चर्वितचर्वित असावा. नाहीतर असले काहीतरी लेखकाला प्रत्येक ठिकाणी लिहायला का बरे सुचत असेल?

*

महाभारत वनपर्व

http://sa.wikisource.org/wiki/महाभारतम्-03-आरण्यकपर्व-314

'धर्मो रक्षति रक्षित:' वरील जागी महाभारतात दिसतो. (माझ्या स्मृतीप्रमाणे मी तो येथूनहि घेतला नव्हता, तो अन्य कोठेतरी मला मिळाला पण कोठे ते आता खूप शोध घेऊनहि सापडत नाही. महाभारताच्या संहिता इतक्या ठिकाणी मिळतात - आणि त्यापैकी एकीचा दुसरीशी ताळमेळ जुळत नाही - की शोधणार्‍याला चक्रव्यूहात शिरल्यासारखे वाटते.)

महाभारतातील यक्षप्रश्नामध्ये हा श्लोक असा आहे:

धर्म एव हतो हन्ति धर्मो रक्षति रक्षितः।
तस्माद्धर्मं न त्यजामि मा नो धर्मो हतोऽवधीत् ।।

मनुस्मृतीत तो असा आहे:

धर्म एव हतो हन्ति धर्मो रक्षति रक्षितः।
तस्माद्धर्मो न हन्तव्यो मा नो धर्मो हतोऽवधीत् ।।

महाभारतातील श्लोकातील तिसरा पाद यक्ष आणि युधिष्ठिरामधील प्रश्नोत्तरांमध्ये जसा असायला हवा तसा आहे. मनुस्मृतीत हा पाद बदलून संपूर्ण तृतीय पुरुषी केला आहे.

श्लोक कोणी कोणाकडून घेतला आहे हे सांगणे अवघड आहे.

प्रक्षिप्त प्रकरण आहे

हे प्रकरण बरेच उशीरा प्रक्षिप्त आहे, अशी चर्चा मागे उपक्रमावर झाली होती. बहुधा क्रिटिकल आवृत्त्यांमध्ये हे सापडत नाही. मनुस्मृतीतील श्लोक आधी असल्याची शक्यता मला अधिक वाटते.

मनुस्मृतीत संदर्भानुसार "धर्म"चा अर्थ कायद्याचे नियम आहे. यक्षप्रश्नाच्या प्रकरणात "कुन्ती आणि माद्री यांचा एक-एक तरी पुत्र जगावा" याला "धर्म" म्हटलेले आहे.
> स्वधर्मान्न चलिष्यामि नकुलो यक्ष जीवतु ।।
> ... (दोन आयांचे समानत्व सांगून)
> मातृभ्यां सममिच्छामि नकुलो यक्ष जीवतु ।।
स्वधर्मापासून मी चळणार नाही. हे यक्षा! नकुलाला जगू दे. (दोन आयांचे समानत्व सांगून) दोघा मातांकरिता मी समसमान इच्छितो, हे यक्षा! नकुलाला जगू दे.

यक्षप्रश्न कथेत फक्त "कायद्याचे नियम" नव्हे तर "सम-वितरणाचे नैतिक मूल्य" याला "धर्मा"च्या आत आणलेले आहे.

धन्यवाद!

ह्या मालिकेचे सर्व उपक्रमींनी स्वागत केले, वेळोवेळी प्रतिसाद देऊन नवे अर्थ आणि पैलू पुढे आणले ह्यासाठी सर्वांस धन्यवाद.

मलाहि गेला महिनाभर ही जुळणी रोज थोडीथोडी करतांना खूप आनंद मिळाला आणि नवनवी माहिती मिळाली ही माझी जमेची बाजू!

उत्कृष्ट लेखमालिका!

अरविंदजी यांचे ह्या उत्कृष्ट लेखमालिकेबद्दल मनापासून आभार! आपल्या प्रयत्नांबद्दल धन्यवाद.

"जीवश्च कण्ठश्च" ह्या वाक्प्रचाराचा उगम कुणाला माहित असल्यास कृपया येथे प्रतिसादातून कळवावा :-)

 
^ वर