मराठीतील रूढ संस्कृत शब्द आणि वचने - भाग ५.

मराठीतील रूढ संस्कृत शब्द आणि वचने - भाग ५.

, , आणि येथे ह्यापूर्वीचे भाग पहावेत.

१) परोपदेशे पाण्डित्यम्.

परोपदेशे पाण्डित्यं सर्वेषां सुकरं नृणाम्।
धर्मे स्वीये त्वनुष्ठानं कस्यचित्तु महात्मनः॥
हितोपदेश १.१७.

दुसर्‍यांना उपदेश करण्याचे पांडित्य सर्वांना सहज येते. आपल्या धर्माचे पालन करणे हे मात्र एखाद्याच महात्म्याला जमते.

२) कळ काढणे.

अष्टादश निमेषास्तु काष्ठा त्रिंशत्तु ता: कला।
तास्तु त्रिंशत्क्षणस्ते तु मुहूर्तो द्वादशास्त्रियाम्॥
ते तु त्रिंशदहोरात्रः...
अमरकोष कालवर्ग ११-१२.

’कळ सोसणे’ म्हणजे वेदना सोसणे. ’कळ काढणे’ म्हणजे स्वल्पकाल वाट पाहणे. ’कला’ हे कालमापनाचे एक परिमाण (आधुनिक ८ सेकंदाइतके) अमरकोशामध्ये दाखविले आहे ते असे: अहोरात्र = (२४ तास) = ३० मुहूर्त = ३६० क्षण = १०,८०० कला = ३,२४,००० काष्ठा = ५८,७२,००० निमेष. अर्थात् १ क्षण = ४ मि. आणि १ कला = ८ से.

३) चर्वितचर्वण.

’चर्वितचर्वण’ (शब्दशः - चावलेले चघळणे) म्हणजे एकदा मांडलेला विचार पुनःपुनः मांडत राहणे. मोनिअर-विल्यम्स संस्कृत शब्दकोषानुसार पाणिनि ३.१.१५ आणि सिद्धान्तकौमुदी येथे हा शब्द भेटतो. माझा पाणिनीच्या व्याकरणाचा अभ्यास नाही. विद्वान् मित्राने कळविल्यानुसार ’सूत्र ३.१.१५ कर्मणः रोमन्थतपोभ्यां वर्तिचरोः’ ह्याचे स्पष्टीकरण ’रोमान्थतपोभ्यां कर्मभ्यां क्रमेण वर्तनायां चरणे चार्थे क्यङ् स्यात्। रोमन्थं वर्तयति रोमन्थायते॥ हनुचलन इति वक्तव्यम्॥ चर्वितस्याकृष्य पुनश्चर्वण इत्यर्थ:।’ असे आहे. रोमन्थ म्हणजे रवंथ ह्या शब्दाविषयी हे सूत्र आहे.

४) पिष्टपेषण.

पिष्टपेषण (शब्दश:- पीठ दळणे) म्हणजे एकदा बोललेले वा सांगितलेले पुन:पुन: घोळत राहणे. मोनिअर-विल्यम्स संस्कृत शब्दकोषानुसार हा शब्द आपस्तंब गृह्यसूत्रांमध्ये वापरण्यात आला आहे. तेथे मी पाहू शकलो नाही पण विद्वान् मित्राच्या सांगण्यानुसार आपस्तंब गृह्यसूत्रांवरील हरदत्त नामक टीकाकाराच्या ’पुंसुवनं व्यक्ते गर्भे तिष्येण॥ १४.९’ ह्या सूत्रावरील टीकेत हा शब्द पुढीलप्रमाणे दाखविला आहे:
"केचित्-तृतीयवच्चतुर्थेऽपि सीमन्तात्पूर्वं निमित्तस्य पूर्वत्वादिति ।
इदमपि सीमन्तवत्प्रथमगर्भ एव, न तु प्रतिगर्भम्; पिष्टपेषणन्यायादेव।"

५) अर्थो हो कन्या परकीय एव.

अर्थो हो कन्या परकीय एव
तामद्य सम्प्रेष्य परिग्रहीतुः।
जातो ममायं विशद: प्रकामं
प्रत्यर्पितन्यास इवान्तरात्मा॥
अभिज्ञानशाकुन्तल ४.२२.

कन्या हे परक्याचे धन असते. तिच्याशी विवाह करणार्‍याकडे तिला पाठविल्यावर ठेव परत करणार्‍याप्रमाणे माझे मन आता स्वच्छ आणि शांत झाले आहे.

६) शिवास्ते पन्थानः सन्तु.

’शुभास्ते पन्थानः सन्तु’ असेहि ह्या प्रसिद्ध वचनाचे एक रूपान्तर दिसते. शाकुन्तलाच्या चौथ्या अंकात पतिगृही जायला निघालेल्या शकुन्तलेला उद्देशून काश्यपमुनि हा आशीर्वाद देतात. ह्याचा अर्थ ’तुझा मार्ग शुभ असो’.

७) अजापुत्रं बलिं दद्यात्.

अश्वं नैव गजं नैव व्याघ्रं नैव च नैव च।
अजापुत्रं बलिं दद्याद्देवो दुर्बलघातक:।।
सुभाषित.

घोडयाचा नाही, हत्तीचा नाही, वाघाचा तर नाहीच नाही. शेळीच्या पिलाचा बळी द्यावा. देवहि दुर्बलांच्या मुळावर उठतो.

(अशाच अर्थाचा अन्य एक प्रसिद्ध श्लोक:

वनानि दहतो वह्नेः सखा भवति मारुतः।
स एव दीपनाशाय कृशे कस्यास्ति सौहृदम्॥
पंचतंत्र काकोलूकीय ५७.

वारा हा वन जाळणार्‍या अग्नीचे साहाय्य करतो आणि तोच वारा दिवटी विझवतो. दुर्बळाची कोण मैत्री करतो?)

८) एरण्डोऽपि द्रुमायते.

यत्र विद्वज्जनो नास्ति श्लाघ्यस्तत्राल्पधीरपि।
निरस्तपादपे देश एरंडोऽपि द्रुमायते॥
हितोपदेश १.६३

जेथे विद्वान व्यक्ति नाही तेथे कमी बुद्धीच्याचीहि चलती असते. ज्या देशातील वृक्ष नाहीसे झालेले आहेत तेथे एरंडालाहि वृक्ष ही पदवी मिळते

९) येन केन प्रकारेण.

घटं भिन्द्यात्पटं छिन्द्यात्कुर्याद्रासभरोहणम्।
येन केन प्रकारेण प्रसिद्धः पुरुषो भवेत्॥
शार्ङ्गधरपद्धति १.१४६८.

घडा फोडावा, कपडे फाडावेत, गाढवावर स्वारी करावी. कोठल्यातरी मार्गाने माणसाने प्रसिद्धि मिळवावी.

१०) विद्वान्सर्वत्र पूज्यते.

विद्वत्त्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन।
स्वदेशे पूज्यते राजा विद्वान्सर्वत्र पूज्यते॥
वल्लभदेवकृत सुभाषितावलि.

विद्वत्ता आणि राजेपणा हे केव्हाहि बरोबरीचे नसतात. राजाला आपल्या देशात मान मिळतो. विद्वानाला सर्वत्र मान मिळतो.

११) भारवाही.

तुकारामाच्या 'फोडिले भांडार, धन्याचा तो माल, मी तो हमाल, भारवाही' ह्या अभंगामुळे ’भारवाही’ ह्या शब्दाला ’काही न समजता केवळ घोकंपट्टी करणारा’ असा कुचेष्टेखोर अर्थ मिळालेला आहे. त्याचे मूळ पुढील श्लोकात आहे:

यथा खरश्चन्दनभारवाही भारस्य नेता न तु चन्दनस्य।
एवं हि शास्त्राणि बहून्यधीत्य अर्थेषु मूढा: खरवद्वहन्ति॥
सुश्रुतसंहिता १.१९.

चंदनाचा बोजा वाहून नेणार्‍या गाढवाला केवळ बोजा जाणवतो. तो चंदनाचा आहे हे त्याला कळत नाही. त्याचप्रमाणे अर्थ न कळता शास्त्रे शिकणारे हे केवळ गाढवाप्रमाणे ती शास्त्रे वाहतात.

१२) कर्तुमकर्तुम्.

’असीमित सत्ता’ अशा अर्थाचा हा शब्दप्रयोग संस्कृत शास्त्रचर्चेमध्ये ’कर्तुमकर्तुमन्यथा कर्तुम् (’कर्तुं अकर्तुं अन्यथा कर्तुम’ म्हणजेच ’काही करणे, न करणे किंवा दुसरे काही करणे’) अशा स्वरूपात अनेक जागी भेटतो. अशी एक जागा म्हणजे शंकराचार्यांचे ब्रह्मसूत्रावरील भाष्य. त्यात एके ठिकाणी ते म्हणतात:
ध्यानं यद्यपि मानसं तथाऽपि पुरुषेण कर्तुमकर्तुमन्यथा वा कर्तुं शक्यं, पुरुषतन्त्रत्वात्, ज्ञानं तु प्रमाणजन्यम्। प्रमाणं च यथाभूतवस्तुविषयम्। अतो ज्ञानं कर्तुमकर्तुमन्यथा कर्तुमशक्यम्। (ब्रह्मसूत्र शांकरभाष्य अध्याय १ पा १ सू ४).

१३) सत्यं ब्रूयात्प्रियं ब्रूयात्.

सत्यं ब्रूयात्प्रियं ब्रूयान्न ब्रूयात्सत्यमप्रियम्।
प्रियं च नानृतं ब्रूयादेष धर्मः सनातनः॥
मनुस्मृति ४.१३८.

खरे बोलावे, गोड बोलावे, कटु सत्य बोलू नये, गोड असत्य बोलू नये. हा सनातन धर्म आहे.

१४) चर्पटपंजरी.

अनावश्यक चर्‍हाट अशा अर्थाचा हा शब्द. शंकराचार्यकृत ’मोहमुद्गर’ नावाची अनेक श्लोक असलेली प्रसिद्ध रचना आहे. तिला ’चर्पटपञ्जरिकास्तोत्र’ असेहि म्हणतात. त्यावरून हा शब्द प्रचारात आला. त्यातील एक प्रसिद्ध श्लोक:

भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते।
प्राप्ते सन्निहिते मरणे न हि न हि रक्षति डुकृञ् करणे॥

(भज रे हरिला भज रे हरिला भज रे मूढा श्रीहरिला।
कृतान्त संनिध उभा ठाकता गम् गच्छति नच रक्षि तुला॥
अच्युत बळवंत कोल्हटकर - अप्रकाशित)

१५) इतो भ्रष्टस्ततो भ्रष्टः.

इतो भ्रष्टस्ततो भ्रष्टः परमेकान्तिवेषभाक्।
न संसारसुखं तस्य नैव मुक्तिसुखं भवेत्।।
सुभाषित.

नावापुरता यतिवेष धारण करणारा हेहि गमावतो आणि तेहि गमावतो. त्याला संसारसुखहि मिळत नाही आणि मुक्तिसुखहि मिळत नाही.

१६) गतानुगतिक.

एकस्य कर्म संवीक्ष्य करोत्यन्योपि गर्हितम् ।
गतानुगतिको लोको न लोकः पारमार्थिकः ।।
पंचतंत्र मित्रभेद ३७३.

एकाचे वाईट कृत्य पाहून दुसराहि तेच करतो. मनुष्य गतानुगतिक असतो. परमार्थाचा विचार तो करीत नाही.

१७) त्राहि त्राहि करणे.

महाबले महोत्साहे महाभयविनाशिनि|
त्राहि मां देवि दुष्प्रेक्ष्ये शत्रूणां भयवर्धिनि||
मार्कंडेय पुराण, देवीकवच १८.

संस्कृत स्तोत्रवाङ्मयामध्ये आराध्यदेवतेला उद्देशून ’त्राहि माम्’, ’त्राहि भगवन्/भगवति’ (ईश्वरा, माझे रक्षण कर) असे शब्द बरेच जागी भेटतात. त्याचेच एक उदाहरण वर दिले आहे. त्यावरून ’त्राहि त्राहि करणे’ म्हणजे मोठया संकटात अथवा बिकट अवस्थेत पडणे अशा अर्थाचा वाक्प्रचार निर्माण झाला.

१८) तारांबळ.

तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव।
विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेऽङ्घ्रियुगं स्मरामि॥

(विवाहात मुहूर्ताची घटिका जवळ येऊ लागली की ती साधण्यासाठी भटजींची मंत्र म्हणण्याची घाई होते. तशा मंत्रांपैकी वरील मंत्रातील ’ताराबलं’वरून ’तारांबळ’ शब्द साधला आहे.) शुभसमय, शुभदिन, ताराबल, चंद्रबल, विद्याबल आणि दैवबल एकाच वेळी आहेत. हे लक्ष्मीपति, मी तुझ्या पदांचे स्मरण करतो.

१९) खटपट.

नलगे व्याकरणाची न्यायाची घटपटादि खटपट ती।
वैकुंठपेठ मोठी नावावरि हीनदीन खटपटती॥
मोरोपंत?

भारतीय तत्त्वाज्ञानातील षट्शास्त्रांच्या चर्चेत उदाहरणासाठी ’अयं घटः अयं पट:’ (हा घडा, हा कपडा) अशा प्रकारचे शब्दोपयोग वारंवार भेटतात. त्यातील ’घटपटादि’चे ’खटपट’ हे अपभ्रष्ट रूप.

२०) इतिकर्तव्यता.

एवं सर्वं विधायेदमितिकर्तव्यमात्मन:
युक्तश्चैवाप्रमत्तश्च परिरक्षेदिमाः प्रजाः॥
मनुस्मृति ७.१४२

(राजाची कर्तव्ये सांगून झाल्यावर मनु म्हणतो...) आपले असे इतिकर्तव्य पार पाडून कार्यप्रवण आणि प्रमादरहित राहून राजाने प्रजेचे रक्षण करावे.

भाग २ मध्ये ’छिद्रेष्वनर्था बहुलीभवन्ति’ ह्या वचनाचा उगम पंचतंत्रात असल्याचे म्हटले होते. पण शूद्रकलिखित ’मृच्छकटिक’ नाटकात चारुदत्ताच्या तोंडी पुढील श्लोक आढळला. हा पंचतंत्राच्या पूर्वीचा आहे.

यथैव पुष्पं प्रथमे विकासे समेत्य पातुं मधुपाः पतन्ति ।
एवं मनुष्यस्य विपत्तिकाले छिद्रेष्वनर्था बहुलीभवन्ति ।।
(मृच्छकटिकम् ९.२६)

फूल उमलत आहे असे पाहून भुंगे त्यावर तुटून पडतात. तसेच मनुष्याच्या संकटकाली एका अडचणीतून अनेक अडचणी निर्माण होतात.

’वरं जनहितं ध्येयम्’ (पुणे महानगरपालिकेचे बोधवाक्य) हे वचन आणि ’चंचुप्रवेश’ (चञ्चुप्रवेशे मुसलप्रवेश:) ह्यांचा उगम मला सापडलेला नाही.

Comments

अप्रतीम्

अप्रतीमच्. सगळेच भाग अप्रतीम. सन्ग्रह करावे असे

कालगणना आणि कालमापन

अहोरात्र = (२४ तास) = ३० मुहूर्त = ३६० क्षण = १०,८०० कला = ३,२४,००० काष्ठा = ५८,७२,००० निमेष. अर्थात् १ क्षण = ४ मि. आणि १ कला = ८ से.

या हिशेबाने १ सेकंद = ३.७५ काष्ठा = ६८ निमेष. किंवा १ निमेष म्हणजे साधारणपणे ०.०१४ सेकंद.

एवढ्या सूक्ष्म कालगणनेची आवश्यकता कशासाठी पडत असावी, आणि एवढा लहान कालावधी कशाच्या साहाय्याने मोजला जात असेल?

सूक्ष्म कालमापन

इतके सूक्ष्म कालमापन कसे केले जात असावे ह्याचे उत्तर मजपाशी नाही. शंकर बाळकृष्ण दीक्षितलिखित 'भारतीयज्योतिषशास्त्राचा इतिहास' ह्या पुस्तकात, जालावर मिळणार्‍या जुन्या पुस्तकांमध्ये आणि अन्य विकिपीडियासारख्या ठिकाणी शोध घेतला पण हातास विशेष काही लागले नाही. प्राचीन ज्योतिषी वेधांसाठी आणि कालमापनासाठी जी यन्त्रे वापरीत असत त्यांचे वर्णन दीक्षितांच्या पुस्तकात आहे पण ती कितपत सूक्ष्म होती हे त्यावरून मला तरी उलगडले नाही.

तरीहि वरील वा अन्य कालविषयक कोष्टके हा सगळा मनाचाच खेळ होता असेहि वाटत नाही.

दीक्षितांच्या पुस्तकात वेगवेगळ्या प्राचीन ग्रंथात महायुगामध्ये (४३२०००० वर्षांमध्ये) प्रत्येक ग्रहाचे भगण (तारकांच्या पार्श्वभूमीवर ग्रहाचा पूर्ण ३६० अंशांचा प्रवास म्हणजे त्या त्या ग्रहाचा एक भगण) किती होतात हे दिलेले आहे. सर्वांचे आकडे थोडे थोडे वेगळे असतात पण उदाहरणार्थ पहिल्या आर्यभटाचे पुढील २ आकडे पाहू (गणना भारतीय पद्धतीने):

सूर्यभगण: ४३,२०,००० - (अ)
सावन दिवस (सूर्योदय ते सूर्योदय - civil day): १,५७,७९,१७,५०० - (ब)

ह्यावरून वर्षमान निघते: दिन ३६५ घटिका १५ पल ३१ विपल १५ - (क)
(दिन ३६५ घटिका १५ पल ३१ विपल १५ = दिन ३६५.२५८६८०५. हे झाले आर्यभटाने धरलेले वर्षमान. सध्याच्या मोजलेल्या वर्षमानाची दिनसंख्या दिन ३६५ ता ५ मि ४८ से ४६ = दिन ३६५.२४२१९० इतके आहे. आर्यभटात आणि ह्यात थोडेच अंतर आहे. आर्यभटाचे मोजलेले वर्ष आज मोजलेल्यापेक्षा सुमारे २४ मि. अधिक लांब आहे.)

(ब/अ=क हे आपण कॅल्क्युलेटर वापरून पडताळून पाहू शकतो. येथे क्षण-कला-काष्ठा इत्यादि न वापरता पल-विपल वापरले आहेत. १ दिन = ६० घटिका = ३६०० पल = २१६००० विपल = ८६४०० से. म्हणजेच १ विपल = ०.४ से.)

वरील अ, ब आणि क पैकी कोठले तरी २ आकडे मुळात हाताशी पाहिजेत म्हणजे तिसरा शोधता येईल. पै़की अ (म्हणजे वर्षे हा आकडा) आपण हवा तो निवडू शकतो कारण आपल्याला किती मोठा काळ हिशेबासाठी घ्यायचा आहे हे आपणच ठरवायचे आहे म्हणून arbitrarily ४३,२०,००० हा आकडा ठरवला. (खरेतर तोहि इतका arbitrarily निवडलेला नाही पण तिकडे आता वळत नाही.) आता ब कसा सापडला? हे उघडच आहे की कोणीहि ४३,२०,००० वर्षे एका जागी बसून तितक्या वर्षातील सगळे दिवस मोजलेले नाहीत. त्याअर्थी हेहि उघड आहे की आर्यभटाला वर्षमान = दिन ३६५ घटिका १५ पल ३१ विपल १५ हे गृहीत म्हणून माहीत होते आणि त्यावरून त्याने अ*क = ब असा ब शोधून काढला आणि आपल्या ग्रंथात टाकला.

त्याच पद्धतीने प्रत्येक ग्रहाचा १ भगण काळ कोणीतरी (विशेषतः गुरु-शनिसारख्या सावकाश चालणार्‍या ग्रहांचा) कोणीतरी चिकाटीने बराच काळ वेध घेऊन ठरवला असला पाहिजे. एकदा तो भगणकाल मिळाला की त्या ग्रहाचे एका महायुगात किती भगण होतात हे भागाकाराने कळेल. प्रत्येक ग्रंथात ही भगणकोष्टके ready reckoner सारखी देऊन ठेवली आहेत अशा हेतूने की कोणत्याहि दिवशी कोणत्याहि ग्रहाचे स्थान शोधायचे असले तर त्या दिवसाचे अहर्गण (महायुगप्रारंभापासून त्या दिवसापर्यंत गत दिवस) शोधून काढायचे आणि महायुगाच्या एकूण अहर्गणात म्हणजे १,५७,७९,१७,५०० दिवसात इतके भगण तर इष्ट अहर्गणात किती हे त्रैराशिक सोडवायचे. उत्तरातील पूर्ण अंक काढून टाकले की उरलेला अपूर्णांक म्हणजे त्या ग्रहाची स्थिति. असो. हे जरा अवान्तर झाले.

ह्याचा सारांशरूपाने अर्थ असा की विपल म्हणजे ०.४ से. इतका सूक्ष्म काळ मोजण्याचे काही साधन कोठेतरी (भारतात वा भारताबाहेर) निर्माण झालेले होते.

आता हे मात्र माहीत नाही की आर्यभटाला (आणि तशाच अन्य ग्रंथकारांना) इतके सूक्ष्म दिनमान सापडले कसे? त्याने स्वत: शोधले का अन्य कोणा भारतीयाला ते सापडले? का भारताबाहेर ते प्रथम कोणाला तरी सापडले आणि प्रवास करीत करीत येथवर पोहोचले. अशा प्रश्नांची उत्तरे कायमची हरवलेली दिसतात.

(ज्योतिर्गणिताचा माझा काहीहि खास अभ्यास नाही. दीक्षितांच्या पुस्तकावरून मला जे समजले ते येथे मांडले आहे. कोणी अधिक प्रकाश टाकला तर ते मला हवेच आहे.)

छान

तारांबळ, खटपट आणि कळ काढणे वगैरेंवर वाचायला अधिक आवडले.

गतानुगतिको लोको न लोकः पारमार्थिकः

स्नानासाठी जाण्यापूर्वि (हरवू नये म्ह्णून) एका साधकाने नदीकाठी एका पळी पन्चपात्री वाळूत पूरून् त्यावर खुणेसाठी 'शिवाची' पिन्डी काढली जेणे करून लोक बाजूने जातील् (त्यावर पाय देणार नाहीत) व पळी पन्चपात्री पण सुखरूप राहील (चोरली जाणार नाही).

पण लोकाना हा काही सिध्ही वा तत्सम् खास प्रकार वाटून नन्तर तेथे येणारया सर्वानीच 'शिवाची' पिन्डी काढली. असन्ख्य अश्या 'शिवाची पिन्डी' तिथे निर्माण् झाल्यामुळे बिचाऱ्या ब्राह्मणाची पळी पन्चपात्री मात्र हरवली असा 'गतानुगतिको लोको' वर वेगळा श्लोक शाळेत असाता वाचल्याचे आठवते. श्लोक मात्र आठवत नाही.

हा श्लोक वाचून मजा वाटली.

अजून् एक श्लोक आठवतो. दोन्ही ओळी सारख्या, अर्थ वेगळा: तमाखू पत्र राजेन्द्र भज मा अद्न्यानदायकम् (हे राजन अद्न्यान् कारक् तम्बाखू खाऊ नकोस). पण दुसऱ्या ओळीची फोड नक्कि आठवत् नाही. ('तू आखुपत्र म्हणजे दुर्वा आवडणाऱ्या गजाननाची पूजा कर असा अर्थ आठवतो)

तमाखुपत्रं इ.

तमाखुपत्रं राजेन्द्र भज माज्ञानदायकम्|
तमाखुपत्रं राजेन्द्र भज माऽज्ञानदायकम्||

असा हा श्लोक आहे. पहिल्या आणि दुसर्‍या ओळीत केवळ एका अवग्रहचिह्नाचे अंतर आहे.

ह्याचा अर्थ पहिला अर्धः राजेन्द्र तं आखुपत्रं माज्ञानदायकं भज - हे राजेन्द्रा, मा (लक्ष्मी) आणि ज्ञान देणार्‍या त्या गणेशाला (आखु म्हणजे उंदीर, पत्र म्हणजे वाहन, आखु आहे पत्र ज्याचे बहुव्रीहि समास) भज.

दुसरा अर्ध: राजेन्द्र अज्ञानदायकं तमाखुपत्रं मा भज - हे राजेन्द्रा, अज्ञानदायक अशा तंबाखूच्या पानाचे सेवन करू नकोस.

तमाखुपत्रं

धन्यवाद.

;)

फक्त ऽ चा फरक आहे.
यक्स्लंट!

आणि आघातस्थानांचा

जर वाक्ये वाणीने म्हणायची असतील, तर आघातस्थानांचाही फरक आहे :

मा॑खुप॒त्रंरा॑जे॒न्द्रभ॒माज्ञा॑नदाय॒म्|
त॒मा॒खु॒प॒त्रंरा॑जे॒न्द्रभ॒माज्ञा॑नदायकम्||

(ज्यांना अनुदात्त " ॒ " आणि स्वरित " ॑ " खुणांवरून आघातस्थळे ओळखण्याची सवय नाही, त्यांच्याकरिता आघातस्थळे ठळक ठशात दिली आहेत.

"ऽ"ही खूण वैकल्पिक आहे.

- - -

"अ" मिसळून नाहिसे झालेले संधी बघून संस्कृत नवीन शिकणार्‍याला मोठे आश्चर्य वाटते.
आ+अ = आ
त्यातही गंमत अशी की 'अ' अक्षराने सुरू होणारे कित्येक शब्द नकारार्थी असतात. उदाहरण वरच्या श्लोकात आहे :
ज्ञानदायकम् <-विरुद्धार्थी->अज्ञानदायकम्
जर तो तार्किकदृष्ट्या अतिमहत्त्वाचा 'अ' असा नाहिसा होणार आहे, तर संस्कृतात तेच वाक्य दोन्ही विरुद्ध अर्थांने वाचक होऊ शकते.
माज्ञानदायम् = मा+ज्ञानदायकम् अथवा मा+अज्ञानदायकम् !
एकाद्या नवशिक्याला ही त्या भाषेची महती वाटू शकेल. परंतु लवकरच असे जाणवते, की एकाच ध्वनिरूपातून दोन विरुद्ध अर्थ उपलब्ध असणे हे मोठे गैरसोयीचे आहे. संदेश पुष्कळदा फसू शकतात. अर्थातच यशस्वी संदेशमाध्यमात हे असे असणार नाही (आणि संस्कृतभाषा ही बर्‍यापैकी यशस्वी ध्वनि-संदेशमाध्यम होती).

प्रत्यक्ष बोलण्यात आघातांवरून "माज्ञानदायम् = मा+ज्ञानदायकम् किंवा मा+अज्ञानदायकम् एकच" हा निर्णय नि:संदिग्ध होतो.

मराठी बोलण्यातही संधी होतातच. (लिहिताना शब्द सुटे लिहिण्याची प्रथा आहे.) आ+अ = आ हे मराठीतही होतेच.
पण "लता रसिक आहे" आणि "लता अरसिक आहे" या दोन वाक्यांत (कितीही भराभर बोललो तरी) गोंधळ होत नाही. दोन्ही वाक्यांचा भराभरा केलेला उच्चार "लतारसिकाय्" असा होतो. पण आघात वेगवेगळे येतात :
लता रसिक आहे = तासिकाय्
लता अरसिक आहे = लतारसिकाय्

- - -

गतानुगतिक

गतानुगतिकाचे उदाहरण असणारा माझ्या माहितीचा श्लोक वेगळी कथा सांगतो. एका धोब्याचे गाढव मरते म्हणून तो रडू लागतो. त्याला रडताना पाहून रडण्याचे कारण न जाणताच त्याचे नातेवाईक रडू लागतात. त्यांना रडताना पाहून आणखी लोक रडू लागतात आणि शेवटी आख्खा गावच रडू लागतो.
गतानुगतिको लोको न लोक: परमार्थिक:
निखिलो रोदिति ग्राम: मृते रजकगर्दभे ॥
असा काहीसे ते सुभाषित होते. चुभू. द्या घ्या.
____________________________________
माझ्या अनुदिनी - वातकुक्कुट आणि विवस्वान

तोच श्लोक थोडयाबहुत फरकाने

मी पूर्वीच एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे तोच श्लोक थोडयाबहुत फरकाने अन्य स्थानी भेटणे हे शेकडो उदाहरणात दिसते. एखादा लोकप्रसिद्ध श्लोक घेऊन त्याच्यावरून आपल्या कल्पनेने दुसरा बेतायचा असे झाले की एकाच श्लोकाचे वेगवेगळे अवतार समोर येऊ लागतात आणि त्यामधील मूळ कोणचा आणि नक्कल काय हे सांगण्याचे सगळे दुवे नष्ट झालेले असतात. आजच्या दिवसातली लेखनकार्यातील शिस्त जुन्या काळात नसल्याने ग्रंथनिर्मिति स्थान, वर्ष, निर्माता (स्वतः लेखक अथवा copyist), copy असल्यास कशावरून copy करण्यात येत आहे त्याचा उल्लेख इत्यादि दुवे कधीच मिळत नाही. ज्याच्यावरून copy करायची ती प्रत अपूर्ण, फाटलेली, वाळवीने खाल्लेली, भिजून अक्षरे धुवून गेलेली वगैरे असली तरीहि अपुरा भाग पुरा करण्यासाठी कोणी काही पदरचे घालत असणार. कधीकधी copy करणार्‍यालाच वाटले की मूळच्यापेक्षा अमुक एका दुसर्‍या शब्दात तीच गोष्ट जास्त चांगली सांगता येईल तर तो तसेहि करणार. अशा अनेक कारणांनी हे एकाच श्लोकाचे अनेक अवतार तयार होतात.

वासरात लंगडी गाय..

जेथे विद्वान व्यक्ति नाही तेथे कमी बुद्धीच्याचीहि चलती असते. ज्या देशातील वृक्ष नाहीसे झालेले आहेत तेथे एरंडालाहि वृक्ष ही पदवी मिळते

थोऽडा शब्दांचा अर्थ वेगळा आहे असे नाही वाटत आपल्याला?

"निरस्तपादपे" >> जेथे मोठे वृक्ष नाहीत..? vs. "नाहीसे झालेले आहेत" (त्या काळी ग्लोबल वॉर्मिंग अन् ते इको डिस्ट्रक्शन वगैरे नव्हते असे माझे मत..)

एरन्ड

एरन्डावर कसाही असला तरी साहित्यात भरपूर उल्लेख दिसतो.
'ऊन्च वाढला एरन्ड तरी होइल का तो इक्षुदन्ड' (ऊस्) होईल् का असा उल्लेख् आठवतो.

मित्र आणि कलिंगड

पुण्याला शाळेत शिकत असताना एक दिवस संस्कृतच्या वर्गात गुरुजींनी चांगला मित्र कसा मिळवावा यावर एक सुभाषित फळ्यावर लिहिले होते ते आठवण्याचा गेली कित्येक दशके प्रयत्न करीत आहे पण अजून यश नाही. एक चांगलं कलिंगड घेण्यासाठी आपण शंभर कलिंगड तपासतो त्याप्रमाणेच मित्रही नीट बघून घ्यावा असा त्याचा आशय आहे. सुभाषिताचे काही शब्द आठवतात ते असे--मित्राणि कलिन्गफलानि चापि... एकस्य लाभाय सुशोभिनस्य परिक्षितव्यानि फलं शतानि... कोणास हे सुभाषित माहित असेल तर ते येथे द्यावे हि विनंती.

 
^ वर