मराठीतील रूढ संस्कृत शब्द आणि वचने - भाग ५.

मराठीतील रूढ संस्कृत शब्द आणि वचने - भाग ५.

, , आणि येथे ह्यापूर्वीचे भाग पहावेत.

१) परोपदेशे पाण्डित्यम्.

परोपदेशे पाण्डित्यं सर्वेषां सुकरं नृणाम्।
धर्मे स्वीये त्वनुष्ठानं कस्यचित्तु महात्मनः॥
हितोपदेश १.१७.

दुसर्‍यांना उपदेश करण्याचे पांडित्य सर्वांना सहज येते. आपल्या धर्माचे पालन करणे हे मात्र एखाद्याच महात्म्याला जमते.

२) कळ काढणे.

अष्टादश निमेषास्तु काष्ठा त्रिंशत्तु ता: कला।
तास्तु त्रिंशत्क्षणस्ते तु मुहूर्तो द्वादशास्त्रियाम्॥
ते तु त्रिंशदहोरात्रः...
अमरकोष कालवर्ग ११-१२.

’कळ सोसणे’ म्हणजे वेदना सोसणे. ’कळ काढणे’ म्हणजे स्वल्पकाल वाट पाहणे. ’कला’ हे कालमापनाचे एक परिमाण (आधुनिक ८ सेकंदाइतके) अमरकोशामध्ये दाखविले आहे ते असे: अहोरात्र = (२४ तास) = ३० मुहूर्त = ३६० क्षण = १०,८०० कला = ३,२४,००० काष्ठा = ५८,७२,००० निमेष. अर्थात् १ क्षण = ४ मि. आणि १ कला = ८ से.

३) चर्वितचर्वण.

’चर्वितचर्वण’ (शब्दशः - चावलेले चघळणे) म्हणजे एकदा मांडलेला विचार पुनःपुनः मांडत राहणे. मोनिअर-विल्यम्स संस्कृत शब्दकोषानुसार पाणिनि ३.१.१५ आणि सिद्धान्तकौमुदी येथे हा शब्द भेटतो. माझा पाणिनीच्या व्याकरणाचा अभ्यास नाही. विद्वान् मित्राने कळविल्यानुसार ’सूत्र ३.१.१५ कर्मणः रोमन्थतपोभ्यां वर्तिचरोः’ ह्याचे स्पष्टीकरण ’रोमान्थतपोभ्यां कर्मभ्यां क्रमेण वर्तनायां चरणे चार्थे क्यङ् स्यात्। रोमन्थं वर्तयति रोमन्थायते॥ हनुचलन इति वक्तव्यम्॥ चर्वितस्याकृष्य पुनश्चर्वण इत्यर्थ:।’ असे आहे. रोमन्थ म्हणजे रवंथ ह्या शब्दाविषयी हे सूत्र आहे.

४) पिष्टपेषण.

पिष्टपेषण (शब्दश:- पीठ दळणे) म्हणजे एकदा बोललेले वा सांगितलेले पुन:पुन: घोळत राहणे. मोनिअर-विल्यम्स संस्कृत शब्दकोषानुसार हा शब्द आपस्तंब गृह्यसूत्रांमध्ये वापरण्यात आला आहे. तेथे मी पाहू शकलो नाही पण विद्वान् मित्राच्या सांगण्यानुसार आपस्तंब गृह्यसूत्रांवरील हरदत्त नामक टीकाकाराच्या ’पुंसुवनं व्यक्ते गर्भे तिष्येण॥ १४.९’ ह्या सूत्रावरील टीकेत हा शब्द पुढीलप्रमाणे दाखविला आहे:
"केचित्-तृतीयवच्चतुर्थेऽपि सीमन्तात्पूर्वं निमित्तस्य पूर्वत्वादिति ।
इदमपि सीमन्तवत्प्रथमगर्भ एव, न तु प्रतिगर्भम्; पिष्टपेषणन्यायादेव।"

५) अर्थो हो कन्या परकीय एव.

अर्थो हो कन्या परकीय एव
तामद्य सम्प्रेष्य परिग्रहीतुः।
जातो ममायं विशद: प्रकामं
प्रत्यर्पितन्यास इवान्तरात्मा॥
अभिज्ञानशाकुन्तल ४.२२.

कन्या हे परक्याचे धन असते. तिच्याशी विवाह करणार्‍याकडे तिला पाठविल्यावर ठेव परत करणार्‍याप्रमाणे माझे मन आता स्वच्छ आणि शांत झाले आहे.

६) शिवास्ते पन्थानः सन्तु.

’शुभास्ते पन्थानः सन्तु’ असेहि ह्या प्रसिद्ध वचनाचे एक रूपान्तर दिसते. शाकुन्तलाच्या चौथ्या अंकात पतिगृही जायला निघालेल्या शकुन्तलेला उद्देशून काश्यपमुनि हा आशीर्वाद देतात. ह्याचा अर्थ ’तुझा मार्ग शुभ असो’.

७) अजापुत्रं बलिं दद्यात्.

अश्वं नैव गजं नैव व्याघ्रं नैव च नैव च।
अजापुत्रं बलिं दद्याद्देवो दुर्बलघातक:।।
सुभाषित.

घोडयाचा नाही, हत्तीचा नाही, वाघाचा तर नाहीच नाही. शेळीच्या पिलाचा बळी द्यावा. देवहि दुर्बलांच्या मुळावर उठतो.

(अशाच अर्थाचा अन्य एक प्रसिद्ध श्लोक:

वनानि दहतो वह्नेः सखा भवति मारुतः।
स एव दीपनाशाय कृशे कस्यास्ति सौहृदम्॥
पंचतंत्र काकोलूकीय ५७.

वारा हा वन जाळणार्‍या अग्नीचे साहाय्य करतो आणि तोच वारा दिवटी विझवतो. दुर्बळाची कोण मैत्री करतो?)

८) एरण्डोऽपि द्रुमायते.

यत्र विद्वज्जनो नास्ति श्लाघ्यस्तत्राल्पधीरपि।
निरस्तपादपे देश एरंडोऽपि द्रुमायते॥
हितोपदेश १.६३

जेथे विद्वान व्यक्ति नाही तेथे कमी बुद्धीच्याचीहि चलती असते. ज्या देशातील वृक्ष नाहीसे झालेले आहेत तेथे एरंडालाहि वृक्ष ही पदवी मिळते

९) येन केन प्रकारेण.

घटं भिन्द्यात्पटं छिन्द्यात्कुर्याद्रासभरोहणम्।
येन केन प्रकारेण प्रसिद्धः पुरुषो भवेत्॥
शार्ङ्गधरपद्धति १.१४६८.

घडा फोडावा, कपडे फाडावेत, गाढवावर स्वारी करावी. कोठल्यातरी मार्गाने माणसाने प्रसिद्धि मिळवावी.

१०) विद्वान्सर्वत्र पूज्यते.

विद्वत्त्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन।
स्वदेशे पूज्यते राजा विद्वान्सर्वत्र पूज्यते॥
वल्लभदेवकृत सुभाषितावलि.

विद्वत्ता आणि राजेपणा हे केव्हाहि बरोबरीचे नसतात. राजाला आपल्या देशात मान मिळतो. विद्वानाला सर्वत्र मान मिळतो.

११) भारवाही.

तुकारामाच्या 'फोडिले भांडार, धन्याचा तो माल, मी तो हमाल, भारवाही' ह्या अभंगामुळे ’भारवाही’ ह्या शब्दाला ’काही न समजता केवळ घोकंपट्टी करणारा’ असा कुचेष्टेखोर अर्थ मिळालेला आहे. त्याचे मूळ पुढील श्लोकात आहे:

यथा खरश्चन्दनभारवाही भारस्य नेता न तु चन्दनस्य।
एवं हि शास्त्राणि बहून्यधीत्य अर्थेषु मूढा: खरवद्वहन्ति॥
सुश्रुतसंहिता १.१९.

चंदनाचा बोजा वाहून नेणार्‍या गाढवाला केवळ बोजा जाणवतो. तो चंदनाचा आहे हे त्याला कळत नाही. त्याचप्रमाणे अर्थ न कळता शास्त्रे शिकणारे हे केवळ गाढवाप्रमाणे ती शास्त्रे वाहतात.

१२) कर्तुमकर्तुम्.

’असीमित सत्ता’ अशा अर्थाचा हा शब्दप्रयोग संस्कृत शास्त्रचर्चेमध्ये ’कर्तुमकर्तुमन्यथा कर्तुम् (’कर्तुं अकर्तुं अन्यथा कर्तुम’ म्हणजेच ’काही करणे, न करणे किंवा दुसरे काही करणे’) अशा स्वरूपात अनेक जागी भेटतो. अशी एक जागा म्हणजे शंकराचार्यांचे ब्रह्मसूत्रावरील भाष्य. त्यात एके ठिकाणी ते म्हणतात:
ध्यानं यद्यपि मानसं तथाऽपि पुरुषेण कर्तुमकर्तुमन्यथा वा कर्तुं शक्यं, पुरुषतन्त्रत्वात्, ज्ञानं तु प्रमाणजन्यम्। प्रमाणं च यथाभूतवस्तुविषयम्। अतो ज्ञानं कर्तुमकर्तुमन्यथा कर्तुमशक्यम्। (ब्रह्मसूत्र शांकरभाष्य अध्याय १ पा १ सू ४).

१३) सत्यं ब्रूयात्प्रियं ब्रूयात्.

सत्यं ब्रूयात्प्रियं ब्रूयान्न ब्रूयात्सत्यमप्रियम्।
प्रियं च नानृतं ब्रूयादेष धर्मः सनातनः॥
मनुस्मृति ४.१३८.

खरे बोलावे, गोड बोलावे, कटु सत्य बोलू नये, गोड असत्य बोलू नये. हा सनातन धर्म आहे.

१४) चर्पटपंजरी.

अनावश्यक चर्‍हाट अशा अर्थाचा हा शब्द. शंकराचार्यकृत ’मोहमुद्गर’ नावाची अनेक श्लोक असलेली प्रसिद्ध रचना आहे. तिला ’चर्पटपञ्जरिकास्तोत्र’ असेहि म्हणतात. त्यावरून हा शब्द प्रचारात आला. त्यातील एक प्रसिद्ध श्लोक:

भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते।
प्राप्ते सन्निहिते मरणे न हि न हि रक्षति डुकृञ् करणे॥

(भज रे हरिला भज रे हरिला भज रे मूढा श्रीहरिला।
कृतान्त संनिध उभा ठाकता गम् गच्छति नच रक्षि तुला॥
अच्युत बळवंत कोल्हटकर - अप्रकाशित)

१५) इतो भ्रष्टस्ततो भ्रष्टः.

इतो भ्रष्टस्ततो भ्रष्टः परमेकान्तिवेषभाक्।
न संसारसुखं तस्य नैव मुक्तिसुखं भवेत्।।
सुभाषित.

नावापुरता यतिवेष धारण करणारा हेहि गमावतो आणि तेहि गमावतो. त्याला संसारसुखहि मिळत नाही आणि मुक्तिसुखहि मिळत नाही.

१६) गतानुगतिक.

एकस्य कर्म संवीक्ष्य करोत्यन्योपि गर्हितम् ।
गतानुगतिको लोको न लोकः पारमार्थिकः ।।
पंचतंत्र मित्रभेद ३७३.

एकाचे वाईट कृत्य पाहून दुसराहि तेच करतो. मनुष्य गतानुगतिक असतो. परमार्थाचा विचार तो करीत नाही.

१७) त्राहि त्राहि करणे.

महाबले महोत्साहे महाभयविनाशिनि|
त्राहि मां देवि दुष्प्रेक्ष्ये शत्रूणां भयवर्धिनि||
मार्कंडेय पुराण, देवीकवच १८.

संस्कृत स्तोत्रवाङ्मयामध्ये आराध्यदेवतेला उद्देशून ’त्राहि माम्’, ’त्राहि भगवन्/भगवति’ (ईश्वरा, माझे रक्षण कर) असे शब्द बरेच जागी भेटतात. त्याचेच एक उदाहरण वर दिले आहे. त्यावरून ’त्राहि त्राहि करणे’ म्हणजे मोठया संकटात अथवा बिकट अवस्थेत पडणे अशा अर्थाचा वाक्प्रचार निर्माण झाला.

१८) तारांबळ.

तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव।
विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेऽङ्घ्रियुगं स्मरामि॥

(विवाहात मुहूर्ताची घटिका जवळ येऊ लागली की ती साधण्यासाठी भटजींची मंत्र म्हणण्याची घाई होते. तशा मंत्रांपैकी वरील मंत्रातील ’ताराबलं’वरून ’तारांबळ’ शब्द साधला आहे.) शुभसमय, शुभदिन, ताराबल, चंद्रबल, विद्याबल आणि दैवबल एकाच वेळी आहेत. हे लक्ष्मीपति, मी तुझ्या पदांचे स्मरण करतो.

१९) खटपट.

नलगे व्याकरणाची न्यायाची घटपटादि खटपट ती।
वैकुंठपेठ मोठी नावावरि हीनदीन खटपटती॥
मोरोपंत?

भारतीय तत्त्वाज्ञानातील षट्शास्त्रांच्या चर्चेत उदाहरणासाठी ’अयं घटः अयं पट:’ (हा घडा, हा कपडा) अशा प्रकारचे शब्दोपयोग वारंवार भेटतात. त्यातील ’घटपटादि’चे ’खटपट’ हे अपभ्रष्ट रूप.

२०) इतिकर्तव्यता.

एवं सर्वं विधायेदमितिकर्तव्यमात्मन:
युक्तश्चैवाप्रमत्तश्च परिरक्षेदिमाः प्रजाः॥
मनुस्मृति ७.१४२

(राजाची कर्तव्ये सांगून झाल्यावर मनु म्हणतो...) आपले असे इतिकर्तव्य पार पाडून कार्यप्रवण आणि प्रमादरहित राहून राजाने प्रजेचे रक्षण करावे.

भाग २ मध्ये ’छिद्रेष्वनर्था बहुलीभवन्ति’ ह्या वचनाचा उगम पंचतंत्रात असल्याचे म्हटले होते. पण शूद्रकलिखित ’मृच्छकटिक’ नाटकात चारुदत्ताच्या तोंडी पुढील श्लोक आढळला. हा पंचतंत्राच्या पूर्वीचा आहे.

यथैव पुष्पं प्रथमे विकासे समेत्य पातुं मधुपाः पतन्ति ।
एवं मनुष्यस्य विपत्तिकाले छिद्रेष्वनर्था बहुलीभवन्ति ।।
(मृच्छकटिकम् ९.२६)

फूल उमलत आहे असे पाहून भुंगे त्यावर तुटून पडतात. तसेच मनुष्याच्या संकटकाली एका अडचणीतून अनेक अडचणी निर्माण होतात.

’वरं जनहितं ध्येयम्’ (पुणे महानगरपालिकेचे बोधवाक्य) हे वचन आणि ’चंचुप्रवेश’ (चञ्चुप्रवेशे मुसलप्रवेश:) ह्यांचा उगम मला सापडलेला नाही.