मराठीतील रूढ संस्कृत शब्द आणि वचने - भाग ४.

, , आणि येथे ह्यापूर्वीचे भाग पहावेत.

१) सत्यमेव जयते.
मुंडकोपनिषत् ३.१.६.

सत्यमेव जयते नानृतमं सत्येन पन्था विततो देवयानः।
येनाक्रमन्त्यृषयो ह्यात्मकामा यत्र तत्सत्यस्य परमं निधानम्॥

सत्याचा विजय होतो, असत्याचा नाही. आत्मसुखी ऋषि अंतिम सत्याकडे जाण्यासाठी चोखाळतात तो देवमान्य मार्ग सत्यातून जातो.

२) चराति चरतो भगः.

आस्ते भग आसीनस्य ऊर्ध्वस्तिष्ठति तिष्ठतः।
शेते निपद्यमानस्य चराति चरतो भगः॥ चरैवेति चरैवेति...
ऐतरेय ब्राह्मण ७.१५.

बसलेल्याचे नशीब बसून असते, उभा राहिलेल्याचे उभे असते, झोपलेल्याचे झोपते आणि चालणार्‍याचे चालत राहते. म्हणून तू चालत रहा, चालत रहा...

३) बहुरत्ना वसुन्धरा.

पदे पदे च रत्नानि योजने रसकूपिका।
भाग्यहीना न पश्यन्ति बहुरत्ना वसुन्धरा॥
वृद्धचाणक्यशतकम्.

पावलोपावली रत्ने आणि प्रत्येक योजनावर भरलेली विहीर अशी ही पृथ्वी बहुरत्ना आहे पण भाग्यहीनांना ते दिसत नाही.

४) काकणभर सरस.

(’हातच्या कांकणाला आरसा कशाला’ ह्या म्हणीचा अर्थ लगेच उमगतो पण ’अमुक गोष्ट दुसरीहून काकणभर सरस आहे’ म्हणजे काय?) ’काकिणी’ हे प्राचीन भारतातील एका जुन्या नाण्याचे नाव आहे. १ निष्क = १६ द्रम्म = २५६ पण = १०२४ काकिणी = २०४८० वराटक असे कोष्टक भास्कराचार्याच्या लीलावतीमध्ये दिलेले आहे. अन्य ठिकाणी १ काकिणी = २० वराटक ह्याऐवजी १ काकिणी = २० कपर्द (कवडया) असाहि उल्लेख मिळतो. ह्यावरून दिसते की काकिणी हे एक फार छोटया मूल्याचे मान होते. ’काकणभर सरस’ म्हणजे अगदी थोडया फरकाने वरचढ. (कवडयादेखील बाजारात चालत असत ह्याचा पुरावा ’कवडीमोल’, ’कवडीचुंबक’ अशा शब्दांमध्ये टिकून आहे.)

५) प्राप्ते तु षोडशे वर्षे पुत्रे मित्रवदाचरेत्.

लालयेत्पञ्च वर्षाणि दश वर्षाणि ताडयेत्।
प्राप्ते तु षोडशे वर्षे पुत्रे मित्रवदाचरेत्॥
भागवतपुराण १०-११४.

५ वर्षे लाड करावे, नंतर दहा वर्षे धाकात ठेवावे. मात्र मुलगा सोळा वर्षाचा झाला की त्याला मित्रासारखे वागवावे. (ह्याच श्लोकाचा पहिला चरण नीतिसारामधे ’राजवत्पञ्चवर्षाणि दशवर्षाणि दासवत्’ असाहि सापडतो.)

६) दैवायत्तं कुले जन्म मदायत्तं तु पौरुषम्.

सूतो वा सूतपुत्रो वा यो वा को वा भवाम्यहम्।
दैवायत्तं कुले जन्म मदायत्तं तु पौरुषम्॥
वेणीसंहार, अंक ३.

मी सूत असेन, सूतपुत्र असेन वा अन्य कोणी असेन. कुळामध्ये जन्म दैवाने मिळतो पण माझा पराक्रम मी मिळविलेला आहे.

७) मिष्टान्नमितरे जना:.

कन्या वरयते रूपं माता वित्तं पिता श्रुतम्।
बान्धवा: कुलमिच्छन्ति मिष्टान्नमितरे जना:॥
नैषधचरित १०.१(?)

विवाहामध्ये कन्या रूपाची अपेक्षा करते, आई सुबत्तेची, वडील अभ्यासाची आणि नातेवाईक चांगल्या कुळाची अपेक्षा करतात, उरलेले सर्व सुग्रास भोजनाची अपेक्षा करतात.

८) स्त्रीरत्नं दुष्कुलादपि.

श्रद्दधान: शुभां विद्यामाददीतावरादपि।
अन्त्यादपि परं धर्मं स्त्रीरत्नं दुष्कुलादपि॥
मनु?

श्रद्धाळू व्यक्तीने धाकटयाकडूनहि विद्या उचलावी, अन्त्यजाकडूनहि धर्म आणि नीच कुटुंबामधूनहि स्त्रीरत्न उचलावे.

९) चारैः पश्यन्ति राजानः.

गावो गन्धेन पश्यन्ति वेदैः पश्यन्ति वै द्विजाः।
चारैः पश्यन्ति राजानः चक्षुर्भ्यामितरे जनाः॥
महाभारत उद्योगपर्व ३४.३२.

गाई गंधाने, विद्वान् ब्राह्मण वेदांमुळे आणि राजे हेरांमुळे जग जाणतात. उरलेले सर्व डोळ्यांनी जग पाहतात.

१०) बहुजनहिताय बहुजनसुखाय.
महापरिनिब्बान सुत्त ३८, जच्‍चन्धवग्गो इ. (महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आणि आकाशवाणी ह्यांचे बोधवाक्य).

’evaj vutte ayasma anando bhagavantaj etad avoca: 'titthatu bhante bhagava kappaj titthatu sugato kappaj bahujana-hitaya bahujana-sukhaya lokanukampaya atthaya hitaya sukhaya deva-manussanan' ti 'alaj dani ananda ma tathagataj yaci akalo dani ananda tathagataj yacanayati' महापरिनिब्बान सुत्त ३८ येथून. (मला पालीचे ज्ञान नसल्याने रोमन अक्षरात जसे मिळाले तसे येथे दाखविले आहे.)

येथे तेच शब्द अन्य बौद्ध लिखाणात आणि देवनागरीत पहा. अर्थ अंदाजाने कळतो.

’एवम्पि खो आयस्मा आनन्दो भगवता ओळारिके निमित्ते कयिरमाने, ओळारिके ओभासे कयिरमाने, नासक्खि पटिविज्झितुं; न भगवन्तं याचि – ‘‘तिट्ठतु, भन्ते, भगवा कप्पं; तिट्ठतु सुगतो कप्पं बहुजनहिताय बहुजनसुखाय लोकानुकम्पाय अत्थाय हिताय सुखाय देवमनुस्सान’’न्ति, यथा तं मारेन परियुट्ठितचित्तो । दुतियम्पि खो…पे॰… ततियम्पि खो भगवा आयस्मन्तं आनन्दं आमन्तेसि।’ (जच्‍चन्धवग्गो आयुसङ्खारोस्सज्‍जनसुत्तं.)

अभिजात संस्कृत वाङ्मयात हा शब्दप्रयोग कोठेच आढळत नाही. बौद्ध धर्म भारतात मागे पडल्यानंतर अलीकडच्या स्वातन्त्र्योत्तर काळातच त्याचा पुन:प्रसार झालेला दिसतो. अभिजात संस्कृत वाङ्मय वाचणार्‍या-लिहिणार्‍यांच्या विचारविश्वात बहुजनहित आणि बहुजनसुख ह्याला महत्त्वाचे स्थान नव्हते ह्याचे हे द्योतक आहे असे मला वाटते. सामाजिक विचाराच्या दृष्टिकोणातून पाहिल्यास ही गोष्ट लक्षात येण्याजोगी आहे.

११) निर्वीरमुर्वीतलम्.

तत्तद्विक्रमदोहदेन विलसद्दोर्दण्डदम्भोलिना
विद्वेषिव्ययकर्मठेन दिशता निर्वीरमुर्वीतलम् ।
किं ब्रूमश्चतुरब्धिसीमभुवनं राजन्वदातन्वता
येनाभूर्विजिगीषुणा विदधिरे दिक्पालशेषा दिशः॥
उमापतिधर (श्रीधरदाससंकलित ’सदुक्तिकर्णामृत’ येथून).

निरनिराळ्या पराक्रमांनी शोभणार्‍या हस्तरूपी वज्राने शत्रुविनाशकार्यात कठोर असा तू जेव्हा उर्वीतल निर्वीर करतोस, पृथ्वी जिंकणारा तू जेव्हा सर्व दिशांमध्ये केवळ दिक्पाल शिल्लक ठेवतोस आणि चार सागरांपर्यंत तू जेव्हा आपली सीमा नेऊन पोहोचवतोस तेव्हा, आम्हाला सांग, आम्ही त्याचे वर्णन करावे तरी कसे?

आद्वीपात्परतोऽप्यमी नृपतयः सर्वे समभ्यागता:
कन्येयं कलधौतकोमलरुचि: कीर्तेश्च लाभास्पदम्।
नाकृष्टं न च टंकृतं न नमितं स्थानाच्च नोच्चालितम्।
केनापीदमहो महद्धनुरिदं निर्वीरमुर्वीतलम्।।
सीतास्वयंवर नावाची अज्ञात कृति.

जंबुद्वीप आणि त्याच्या पलीकडून सर्व राजे येथे आलेले आहेत. सुवर्णाप्रमाणे कांति असलेली आणि कीर्तीचे निवासस्थान अशी ही कन्या आहे. तथापि कोणीहि हे प्रचंड धनुष्य ओढण्यास, त्याच्या प्रत्यंचेचा टणत्कार करण्यास, त्याला वाकवण्यास अथवा त्याला उचलण्यास समर्थ दिसत नाही. उर्वीतल निर्वीर झाले आहे असे दिसते.

जालावर बराच शोध घेतल्यावर मला हे obscure म्हणता येतील असे दोन स्रोत मिळाले. ह्यापैकी कोठलाहि एक हा खरा मूलस्रोत आहे असे खात्रीने म्हणवत नाही.

१२) जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी.

अपि स्वर्णमयी लङ्का न मे लक्ष्मण रोचते।
जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी॥
सुभाषित.

लक्ष्मणा, लंका स्वर्णमय असली तरी मला ती नको. माता आणि मातृभूमि स्वर्गाहूनहि श्रेष्ठ आहेत.

हा श्लोक रामायण युद्धकांडातील आहे अशी सार्वत्रिक समजूत असली तरी रामायणाच्या कोठल्याहि पाठात तो मिळत नाही. त्यामधील ’जन्मभूमि’ आणि तिचे ’पावित्र्य’ ह्या संकल्पना तर अगदी आधुनिक दिसतात. बंकिमचंद्रांच्या ’आनंदमठ’ ह्या कादंबरीत त्याचे मूळ आहे, पं. मदन मोहन मालवीयांच्या लिखाणात त्याचा उगम आहे ह्याहि समजुती टिकत नाहीत. गेल्या शंभरदीडशे वर्षात हा श्लोकार्ध निर्माण होऊन त्याने जनमानसाची पकड घेतली आहे, ती इतकी की आपल्या ’सत्यमेव जयते’सारखा हा श्लोकार्ध नेपाळच्या राष्ट्रीय चिह्नावरती लिहिण्यात आला आहे. ह्या सर्व बाबींची विस्तृत चर्चा येथे उपलब्ध आहे.

१३) मरणान्तानि वैराणि.

मरणान्तानि वैराणि निवृत्तं नः प्रयोजनम्।
क्रियतामस्य संस्कारो ममाप्येष यथा तव॥
रामायण युद्धकाण्ड १०९.२५.

(रावणवधानंतर राम बिभीषणास म्हणतो...) वैर मरणाबरोबरच संपते. आमचे कार्य आता झालेले आहे. ह्याचा अन्त्यसंस्कार कर. हा जसा तुझा आहे तसाच माझाहि आहे.

१४) अर्धचन्द्र.

चतुर्थः श्यामलको यावन्न याति तावद् अर्धचन्द्रप्रदानेन निष्कासित:।
पंचतन्त्र लब्धप्रणाश (महाधनेश्वरनाम भाण्डपति कथा).

महाधनेश्वर नावाच्या व्यापार्‍याकडे त्याचे चार जावई मुक्कामाला आले आणि ते परत जायचे नावच काढत नव्हते. अखेर त्यांपैकी पहिल्या तिघांना युक्तिप्रयुक्तीने रस्ता दाखविला. चौथा कशालाच बधेना म्हणून त्याला मानेमागे हाताचा अर्धचन्द्र लावून बाहेर काढले अशी कथा.

१५) चक्रम.

अतिलोभो न कर्तव्यो लोभं नैव परित्यजेत् ।
अतिलोभाभिभूतस्य चक्रं भ्रमति मस्तके॥
पंचतंत्र अपरीक्षितकारक २२.

(चार ब्राह्मण धनाच्या शोधासाठी निघाले. तिघे पुरेसे धन मिळाल्यावर थांबले. चौथ्याने अतिलोभामुळे आणि दुसर्‍यांचा हितकारक सल्ला न ऐकल्याने डोक्यावर फिरणारे चक्र मागे लावून घेतले.) अतिलोभ करू नये आणि लोभाचा पूर्ण त्यागहि करू नये. अतिलोभात फसलेल्याच्या डोक्यावर चक्र फिरू लागते.

१६) वसुधैव कुटुम्बकम्.

अयं निज: परो वेति गणना लघुचेतसाम्।
उदारचरितानां तु वसुधैव कुटुम्बकम्॥
पंचतंत्र अपरीक्षितकारक ३८.

हा माझा किंवा परका असा विचार कोत्या मनाचे करतात. ज्यांचे वागणे औदार्यपूर्ण आहे त्यांना सर्व पृथ्वी आपल्या कुटुंबासारखी वाटते.

१७) अशिक्षितपाटव.

स्त्रीणामशिक्षितपटुत्वमानुषीषु संदृश्यते किमुत याः प्रतिबोधवत्यः।
प्रागन्तरिक्षगमनात्स्वमपत्यजातमन्यैर्द्विजै: परभृता: खलु पालयन्ति॥
शाकुन्तल ५.२२.

(शापामुळे विस्मृति झालेल्या दुष्यन्ताला ओळख पटविण्यासाठी शकुन्तला त्याने पूर्वी तिजपाशी ठेवलेली त्याची आंगठी दाखविते तेव्हा तो म्हणतो...)

स्त्रियांचे अशिक्षितपटुत्व मानवी नसलेल्या प्राण्यांमध्येहि दिसते, तर मग बुद्धि असलेल्या स्त्रियांविषयी काय बोलावे? आकाशात जाण्याअगोदर कोकिळा अन्य पक्ष्यांकडून आपली पिले वाढवतात.

१८) दीर्घसूत्री.

अनागतविधाता च प्रत्युत्पन्नमतिश्च यः।
द्वावेतौ सुखमेधेते दीर्घसूत्री विनश्यति॥
महाभारत शान्तिपर्व १३७.२०.

जे येणार आहे त्याची तयारी ठेवणारा आणि शीघ्र विचार करणारा अशा दोघांची भरभराट होते. दीर्घसूत्री नष्ट होतो.

१९) योगक्षेमं वहाम्यहम्.

अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्॥
भगवद्गीता ९-२२ (आयुर्विमा महामंडळाचे बोधवाक्य).

माझे चिंतन करीत अनन्यभावाने जे मला भजतात त्यांची काळजी मी बाळगतो.

२०) सत्यं शिवं सुन्दरम्.

१९७८ साली पडद्यावर आलेला ह्या नावाचा चित्रपट आणि ह्याच शब्दांवरचे त्यातील गीत आपल्या परिचयाचे आहे. मात्र हे प्रसिद्ध वचन कोठे प्रथम निर्माण झाले हा प्रश्न अनुत्तरित आहे. एक तर्क पुढीलप्रमाणे:

’भक्तामल’ नावाची कृति नभदास नावाच्या लेखकाने १५८३ ते १६३९ ह्या काळात केव्हातरी रचली. तिच्यावर ’भक्तिरसमोहिनी’ नावाची टीका प्रियदास नावाच्या टीकाकाराने १७१२ साली लिहिली. तिच्यामधे तुलसीदासाच्या ’रामचरितमानसा’विषयी पुढील गोष्ट सांगितलेली आहे. रामचरित मानस देशी भाषेत असल्यामुळे काशीस्थित पंडित तिच्याकडे उपेक्षेने पाहात होते. अखेर एका रात्री काशीविश्वनाथाच्या गाभार्‍यात रामचरितमानस आणि वेदांसारखे अन्य ग्रंथे ठेऊन देण्यात आले. सकाळी गाभारा उघडल्यावर असे दिसले की रामचरितमानस अन्य ग्रंथांच्या वर होते आणि त्यावर ’सत्यं शिवं सुन्दरम्’ असे शब्द उमटलेले होते.

हा ’चमत्कार’ आपण आज मान्य करणार नाही परंतु नभदासाच्या टीकेत चमत्काराचे वर्णन देतांना जर हे शब्द असले तर त्यांचे मूळ १७१२पर्यंत निश्चितच जाते, मग ते नभदासाचे स्वतःचे असोत वा त्याच्या आधीचे अन्य कोणाचेतरी असोत.

’प्रथमग्रासेन मक्षिकापातः’ ह्या प्रसिद्ध उक्तीचा - किंवा तिच्यासारख्या दुसर्‍या उक्तीचा स्रोत बरेच प्रयत्न करूनहि मला मिळाला नाही. तीच गोष्ट ’व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम्’ ह्या दुसर्‍या उक्तीची. कोणास ठाऊक असल्यास प्रतिसादमार्गे अवश्य कळवावा.

भाग २ मध्ये ’षट्कर्णी होणे’ ह्यासाठी दाखविलेल्या दोन स्रोतांहून अधिक जुना वाटतो असा स्रोत म्हणजे चाणक्याच्या नावाने प्रसृत असलेली चाणक्यसूत्रे. ह्यांमध्ये क्र. ३४ वर ’षट्कर्णाद्भिद्यते मन्त्र:’ असा सूत्ररूपाने हाच विचार सांगितला आहे.

Comments

उपक्रम स्तुत्य आहे

आपण हाती घेतलेला हा उपक्रम स्तुत्य आहे. प्रसिद्ध झालेले भाग वाचले.आणखी येवोत.
पुस्तक/पुस्तिका रूपाने प्रसिद्ध करण्याजोगा ठेवा आहे.

अतिशय सुंदर

विसुनानांशी सहमत आहे. अतिशय स्तुत्त्य उपक्रम. अशा लेखांमुळे वाचनाचे समाधान लाभते.

चक्रम असणे

'तो माणूस चक्रम आहे' असे अनेकदा बोललो, बोलताना ऐकलेले आहे. पण चक्रमचा उगम संस्कृतात आहे हे आजवर माहीत नव्हते.

दीर्घसूत्री नष्ट होतो.

दीर्घसूत्रीपणा आणि दीर्घसूत्री एकच का?

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

दीर्घसूत्री

'दीर्घसूत्री' वरूनच 'दीर्घसूत्रीपणा' हा शब्द तयार होतो. 'दीर्घसूत्री' हे विशेषण आहे जसे 'दीर्घसूत्री सेवक'.

आमच्यासारख्या नाठाळ नातवंडांना उद्देशून वापरायचा माझ्या आजोबांचा हा आवडता शब्द होता!

दीर्घसूत्री कारभार

धन्यवाद. 'दीर्घसूत्री नष्ट होतो' हे वाक्य वाचून मी जरा पेचात पडलो. तिथे आता 'दीर्घसूत्रीपणा' असे वाचतो.

'दीर्घसूत्री' हे विशेषण आहे जसे 'दीर्घसूत्री सेवक'. आमच्यासारख्या नाठाळ नातवंडांना उद्देशून वापरायचा माझ्या आजोबांचा हा आवडता शब्द होता!

'दीर्घसूत्री कारभार' हा आमच्याकडचा आवडता शब्द.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

दीर्घसूत्रीच, दीर्घसूत्रीपणा नाही.

वरील श्लोकामागे तीन माशांची गोष्ट आहे. तलावाचे पाणी मच्छिमार कमी करत आहेत असे पाहून दूरदर्शी मासा वेळीच बाहेर पडतो. दुसरा quick-thinker योग्य संधीची वाट पाहून ती येताच उडी मारून बाहेर पडतो. तिसरा दीर्घसूत्री ह्यापैकी काहीच न केल्याने पकडला जातो. म्हणून 'दीर्घसूत्री विनश्यति'.

आभारी आहे

आता तो श्लोक अगदी नीट कळला. अनागतविधाता, प्रत्युत्पन्नमती आणि दीर्घसूत्री हे तीन मासे आहेत तर. फार आभारी आहे. (स्वतःशीच: थोडे तरी संस्कृत शीक.)

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

उत्तम

स्पष्टिकरण उत्तम. माहिती उत्तमच

दोन शंका

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
१) दैवायत्तं कुले जन्म मदायत्तं तु पौरुषम्.
....
माझ्यामते ही पङ्क्ती दैवायत्ते कुले जन्म मदायत्तं तु पौरुषम्.
अशी असावी. अन्वय असा :(मम) जन्म दैवायत्ते कुले(अभवत्)| पौरुषं (तु) मदायत्तं (अस्ति).माझ्या स्मरणातः "दैवायत्ते कुले जन्म मदायत्तं तु पौरुषम्." असे च आहे.

...
२) जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी.
..
रूढ असलेले वचन असेच आहे.पण इथे जननी आणि जन्मभूमी ही दोन नामे आहेत.त्या दोघांना मिळून गरीयस् हे विशेषण लावायचे आहे.संस्कृत भाषेच्या व्याकरणानुसार त्या विषेषणाचे द्विवचन (गरीयसौ अथवा काय असेल ते)नको का? उदा: रक्षःकुलनिहंतारौ त्रायेतां नो रघूत्तमौ|)

दोन्ही ठिकाणी अन्वय साधू शकतो

दोन्ही ठिकाणी अन्वय साधू शकतो.
(१) दैवायत्तं (विशेषण, विशेष्यामुळे नपुंसक, प्रथमा एकवचन) जन्म (विशेष्य, नपुंसकलिंगी, प्रथमा एकवचन)
अन्वयवाक्य : कुले जन्म दैवायत्तम्, तु पौरुषं मदायत्तम् ।

(२) जननी (विशेषण, स्त्रीलिंगी प्रथमा एकवचन) जन्मभूमि: (विशेष्य, स्त्रीलिंगी प्रथमा एकवचन) गरीयसी (विशेषण, स्त्रीलिंगी प्रथमा एकवचन) च (पादपूरणार्थ, किंवा दोन वाक्यांना जोडणारे उभयान्वयी).

अन्वयवाक्य :
लक्ष्मण! स्वर्णमयी अपि लङ्का न मे रोचते, जननी (इव) जन्मभूमि: स्वर्गाद् अपि गरीयसी (मे अस्ति) , च ।

येथे जननी म्हणजे आई-ही-स्त्री दुसर्‍या चरणात कुठून उद्भवणार? जरी लंका आवडते (पूर्वपक्ष), त्यापेक्षा आणि स्वर्गापेक्षाही जन्मभूमी आवडते (उत्तरपक्ष) अशी वाक्यरचना असेल; तर "जननी"करिता सुद्धा पूर्वपक्षात संदर्भ हवा ना.

दैवायात्तं आणि गरीयसी

माझ्यासमोर अश्वत्थामाचार्य बाळाचार्य गजेन्द्रगडकरसंपादित पुस्तकाची डिजिटल आवृत्ति आहे. तिच्यामध्ये 'दैवायात्तं' असा पाठ आहे आणि मलाहि पहिल्यापासून तोच माहीत आहे. संस्कृत कृतींमध्ये पाठभेद असणे ही अगदीच नेहमीची गोष्ट असते. 'दैवायत्तं' देखील व्याकरणात बसते.

'गरीयसी' मधली चूक तुम्ही दाखवेपर्यंत माझ्याहि ध्यानात आली नव्हती. (माझे एक विद्वान् मित्र असे कळवितात की असलेले वाक्यहि 'जननी स्वर्गादपि गरीयसी, जन्मभूमिश्च' असे लावले तर योग्यच आहे, जसे नाटकांमध्ये 'ततः प्रविशति राजा, मातलिश्च' किंवा 'ततः प्रविशति राजा, विदूषकश्च' अशी वाक्ये असतात. ते असेहि सांगतात की चूकच दुरुस्त करायची असेल 'गरीयसौ' च्या ऐवजी 'गरीयस्यौ' असा प्रयोग हवा.)

(अवान्तरः अश्वत्थामाचार्य बाळाचार्य गजेन्द्रगडकर हे भूतपूर्व सरन्यायाधीश प्रह्लादाचार्य बाळाचार्य गजेन्द्रगडकर ह्यांचे थोरले बंधु. १९व्या शतकाच्या पूर्वार्धात ह्यांचे पूर्वज राघवेन्द्राचार्य ह्यांना सातारच्या छत्रपतींनी विद्वान म्हणून सातार्‍यास बोलावून घेतले. राघवेन्द्राचार्य तत्कालीन सनातनी पक्षाचे धुरीण होते आणि वेदोक्त प्रकरणात ते ब्राह्मण पक्षाचे नेते होते असे वाचल्याचे आठवते. गजेन्द्रगडकरवाडा सातार्‍यात प्रसिद्ध होता.

अश्वत्थामाचार्य हे मुंबईचे एल्फिन्स्टन, अहमदाबादचे गुजरात कॉलेज अशा ब्रिटिश दिवसातील गाजलेल्या सरकारी कॉलेजांत संस्कृतचे प्राध्यापक होते आणि त्यांनी बरीच पुस्तके (उदा. शाकुन्तल इ.) संपादित केली होती. ते अकाली वारले. त्याबाबतची एक गोष्ट मी ऐकली होती ती अशी: अश्वत्थामाचार्य गुजरात कॉलेजात बी.ए. च्या वर्गाला विशाखदत्ताचे 'मुद्राराक्षस' शिकवीत होते. त्यात कोठेतरी चाणक्याच्या तोंडी कोणाच्यातरी मृत्यूला उद्देशून 'अहो महान्विज्ञानरशिरुपगतः' असे वाक्य आहे. त्या वाक्यावर एके दिवशी तास संपला आणि त्याच रात्री अश्वत्थामाचार्य वारले.)

राजा आला, आणि विदूषकही; राजा आणि विदूषक आले

'ततः प्रविशति राजा, विदूषकश्च'

येथे एकवचन असण्याचे कारण वेगळे आहे. "विदूषकश्च (प्रविशति)" हे पुरवणी वाक्य आहे. म्हणजे : "ततः प्रविशति राजा, विदूषकश्च प्रविशति ।"

मराठीतही अशा वाक्यांत एकवचनच अपेक्षित आहे :
तेव्हा राजा आला, आणि विदूषकही (आला).
चूक*तेव्हा राजा आले, आणि विदूषकही*चूक

पण
राजा आणि विदूषक आले
येथे मराठीतही अनेकवचनच अपेक्षित आहे, एकवचन चुकलेले आहे :
चूक*राजा आणि विदूषक आला*चूक

तसेच संस्कृतातही.

"जननी" हे "जन्मभूमि"चे उपमान-विशेषण आहे, अशा प्रकारचा अन्वय मी खाली दिलेला आहे.

असेच

"जननी" हे "जन्मभूमि"चे उपमान-विशेषण आहे, अशा प्रकारचा अन्वय मी खाली दिलेला आहे.

-मलाही असेच वाटले होते.
अवांतर : पण माझे संस्कृतचे ज्ञान आठवी ते दहावी - ५० पैकी ४५ ते ५० गुण इतकेच असल्याने गप्प बसलो. :)

संग्रहणीय

संग्रहणीय लेखमाला!

उपक्रम प्रशासनाला 'क्ष्'व्यांदा विनंती करतो: वाचनखुणांची सोय करून द्यावी

ऋषिकेश
------------------
धम्मक असेल आपली मते आपली ओळख दाखवून थेट मांडावीत, कायद्याला घाबरून भ्याडासारखे आयडीच्या पदराआड लपु नये

वाचनखुणा

कोणत्याही न्याहाळकात बुकमार्क ऊर्फ वाचनखुणा साठवण्याची सोय असते. उपक्रम प्रशासनाने तीच सोय देण्याचे कारण समजले नाही.

अरेरे!

उपक्रम प्रशासनाने तीच सोय देण्याचे कारण समजले नाही.

अरेरे! असो.

ऋषिकेश
------------------
धम्मक असेल आपली मते आपली ओळख दाखवून थेट मांडावीत, कायद्याला घाबरून भ्याडासारखे आयडीच्या पदराआड लपु नये

+१

संग्रहणीय लेखमाला!

+१

उपक्रम प्रशासनाला 'क्ष्'व्यांदा विनंती करतो: वाचनखुणांची सोय करून द्यावी

+१ ; मागणीस् पाठिंबा.

अरेरे! असो.

ह्यालाही +१ ;)

--मनोबा

+1

कोणत्याही न्याहाळकात बुकमार्क ऊर्फ वाचनखुणा साठवण्याची सोय असते. उपक्रम प्रशासनाने तीच सोय देण्याचे कारण समजले नाही.

असेच. संकेतस्थळाला गतिमंद करणाऱ्या तितक्याश्या जरूरी नसलेल्या टाळलेल्या बऱ्या.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

उत्तम

ही लेखमाला उत्तम सुरू आहे. काकिण, चक्रम वगैरेंविषयी वाचणे रोचक आहे.

स्त्रियांचे अशिक्षितपटुत्व मानवी नसलेल्या प्राण्यांमध्येहि दिसते, तर मग बुद्धि असलेल्या स्त्रियांविषयी काय बोलावे? आकाशात जाण्याअगोदर कोकिळा अन्य पक्ष्यांकडून आपली पिले वाढवतात.

म्हणजे काय? नीट संदर्भ न लागल्याने वाक्य समजत नाही. येथे दुष्यंत शकुंतलेला टोमणा मारतो आहे का?

टोमणाच

दुष्यंत शापामुळे शकुंतलेला पुरता विसरलेला असतो.

त्यामुळे शकुंतला माहेरून त्याच्याकडे येते तेव्हा "ही आपल्या गळ्यात पडू बघणारी लबाड बाई आहे", अशी त्याची भावना होते. शकुंतला तेव्हा गरोदरही असते. त्यामुळे दुष्यंताचा "आपली पिले दुसर्‍यांकडून पोसून घेणारी कोकिळा" हा टोमणा अधिकच सुसंदर्भ/बोचरा होतो.

टिप्पणी : (१) या प्रसंगात शकुंतला दुष्यंताला अंगठी दाखवू शकत नाही. तिच्या हातून अंगठी हरवलेली असते.
(२) जरी टोमणा शकुंतलेला असतो तरी ते वाक्य शकुंतलेला बरोबर आणणारी वृद्धा गौतमी हिच्या दिशेने उच्चारलेले असते.

अशिक्षितपटुत्व

बरोबर. तो टोमणाच असावा अशी शंका आली होतीच पण मग "स्त्रियांचे अशिक्षितपटुत्व" हे वाक्य काय दर्शवणारे आहे.

पुन्हा कीस काढते. क्षमस्व!

स्त्रियांचे अशिक्षितपटुत्व मानवी नसलेल्या प्राण्यांमध्येहि दिसते

या वाक्याचा नेमका संदर्भ समजला नाही कारण कोकिळेला बनेल किंवा हुशार बाईप्रमाणे मानले असावे. तिचा संबंध "बुद्धि असलेल्या स्त्रियांविषयी काय बोलावे?" याच्याशी जोडता यावा.

कोकिळेचे अशिक्षितपटुत्व

'कोकिळा ही अमानुषी (अमानवी) आहे तरीहि दुसर्‍या पक्षांकडून आपली पिले वाढवून घेण्याची चलाखी तिच्यामध्ये असते. ही समोरची स्त्री तर बुद्धि असलेल्या मनुष्यजातीची आहे. तेव्हा तिच्यातहि ती चलाखी आहे ह्यात नवल काय?' असा तो टोमणा आहे.

पाचव्या अंकात राजप्रासादात दुष्यन्तासमोर आल्यावर गौतमीच्या सांगण्यावरून शकुन्तला - जी राजप्रासादात प्रवेश करतांना 'अवगुण्ठनवती' होती - अवगुण्ठनात नाही आणि त्यामुळे ती गर्भवती आहे हे दुष्यन्ताला दिसत आहेच. (त्याला कल्पना नाही पण पूर्वीच अजाणतेपणे झालेल्या अवज्ञेमुळे शकुन्तलेला दुर्वासाने असा शाप दिलेला आहे की ज्याच्या आठवणीत हरविल्यामुळे तिचे दुर्वासाकडे दुर्लक्ष झाले आहे तो - म्हणजे दुष्यन्त - तिला विसरून जाईल.) ह्या शापाच्या प्रभावामुळे दुष्यन्त तिला ओळखत नाही. (दुर्वासाने उ:शापहि दिलेला आहे की जर दु:ष्यन्ताच्या ओळखीचा एखादा दागिना त्याला दाखविला तर त्याला ओळख पटेल. हे शाप-उ:शापाचे सर्व प्रकरण शकुन्तलेच्या सख्या नाटकाच्या पडद्याच्या मागे चौथ्या अंकात पार पाडतात आणि शकुन्तलेला त्याची कल्पना देत नाहीत कारण शकुन्तलेजवळ दुष्यन्ताची आंगठी आहेच हे त्यांना ठाऊक आहे. शकुन्तलेच्या दुर्दैवाने तिच्या बोटात असलेली दुष्यन्ताची अंगठी शचीतीर्थावर गळून पडते पण तिला तेहि कळत नाही.) दुष्यन्त आपल्याला ओळखत नाही असे दिसल्यावर ती अंगठी दाखवायचा प्रयत्न करते पण अंगठी बोटात नसतेच. तिच्याबरोबरची तापसी गौतमी अंगठी शचीतीर्थावर पडली असे तिला सांगते. शकुन्तला अजूनहि काही आठवणी सांगते. ह्या बोलाचालीमुळे दुष्यन्ताला वाटते की समोरच्या गर्भवती स्त्रीचे मूल आपल्या पदरी बांधण्याचा ह्या स्त्रियांचा डाव आहे आणि म्हणून तो वरील उद्गार काढतो.

'परभृत' म्हणजे 'दुसर्‍याकडून वाढविलेला'. संस्कृत काव्यामध्ये अनेक सर्वमान्य संकेत पाळले जातात. त्यापैकी एक म्हणजे कोकिळा कावळ्यासारख्या अन्य पक्षांकडून आपली पिले वाढवून घेते. म्हणून कोकिळेला 'परभृत' असेहि संबोधन आहे. (चौथ्या अंकात शकुन्तलेच्या पतिगृही जायच्या वेळीच कोकिळा आवाज करते आणि कश्यपमुनि म्हणतात - अनुमतगमना शकुन्तला तरुभिरियं वनवासबन्धुभि:| परभृतविरुतं कलं यथा प्रतिवचनीकृतमेभिरीदृशम्|| 'वनातले बान्धव असे जे वृक्ष, त्यांनी शकुन्तलेच्या गमनाला अनुमति दिली आहे. हे परभृताचे कल विरुत (कोकिळेचे गोड गाणे) हे त्या वृक्षांचे उत्तरच आहे.'

पहिल्या श्लोकातील 'द्विज' 'दोनदा जन्मलेला' हा शब्दहि लक्षणीय आहे. ब्राह्मण दोनदा जन्मतो - एकदा आयुष्याच्या प्रारंभाला आणि पुन व्रतबन्धानंतर - जन्मना जायते शूद्र: संस्काराद्द्विज उच्यते. पक्षीहि दोनदा जन्मतात - एकदा अंडयाच्या स्वरूपात आणि नंतर अंडयातून बाहेर पडल्यावर. म्हणून दोघेहि 'द्विज.'

असो. प्रतिसाद बराच लांबला.

गौतमीला (आणि मानुषी स्त्रियांना) बुद्धी आहेच

टोमणा असा काही (मिसॉजिनीचा दोष कालिदास/दुष्यंताकडेच...)

स्त्रिया/माद्यांचे (स्त्रीणाम्) न-शिकताही असलेले पटुत्व (अशिक्षितपटुत्वम्) अमनुष्य प्राण्यांच्या माद्यांमध्ये (अमानुषीषु) सुद्धा दिसते (सन्दृश्यते). ज्या (या:) प्रतिबोधन=विचारशक्ती असलेल्या (प्रतिबोधवत्यः) (आहेत), (म्हणजे मनुष्य स्त्रिया) त्यांचे काय घ्या (किम् उत)!

येथे पहिल्या शब्दाचा अर्थ स्त्रिया/माद्या असा घेतला आहे (इंग्रजीतल्या "फीमेल"सारखा), कारण अमानुषी आणि मानुषी यांच्यात पुढे फरक केला आहे. सर्वच मानुषी स्त्रिया विचारशक्ती-असलेल्या आहेत, त्यामुळे अमानुषी माद्यांपेक्षा त्या सर्वच अधिक लबाड आहेत. (या "अमानुषींपेक्षाही मानुषी लबाड" टोमण्यात पुन्हा "काही स्त्रियांना बुद्धी नसते" वगैरे उपटोमणे नसावेत. कारण तशा उपटोमण्याने मुख्य टोमण्याची धार कमी होते.)

धन्यवाद

या "अमानुषींपेक्षाही मानुषी लबाड" टोमण्यात पुन्हा "काही स्त्रियांना बुद्धी नसते" वगैरे उपटोमणे नसावेत. कारण तशा उपटोमण्याने मुख्य टोमण्याची धार कमी होते.

हेच समजून घेताना गोंधळ होत होता.

धनंजय यांना ;-) धन्यवाद आणि विस्तृत प्रतिसादाबद्दल कोल्हटकरांनाही.

शंकानिरसन

आम्हाला पडलेल्या शंकाचेही निवारण झाल्यामुळे शंका उपस्थित करणार्‍या प्रियालींना तन्निमित्ते धन्यवाद.--वाचक्नवी

बरे सापडले. ;-)

आम्हाला पडलेल्या शंकाचेही निवारण झाल्यामुळे शंका उपस्थित करणार्‍या प्रियालींना तन्निमित्ते धन्यवाद.

शंकेचे किंवा शंकांचे असे हवे ना? ;-) ह. घ्या.

हो

हो! ह.च घेतले.धन्यवाद...वाचक्नवी

+१

छान लेखमाला.

"चराति" एक अनोळखी शब्दरूप

"चराति चरतो भगः" मधील "चराति" हे शब्दरूप माझ्या ओळखीचे नाही.
"चराति"चा अर्थ सायणाने "दिने दिने वर्द्धते" म्हणजे "दिवसेंदिवस वाढते" असा दिलेला आहे. (दुवा, पृष्ठ ७५)
हे कुठल्या धातूचे रूप आहे?
रा. गो. भांडारकरांच्या पुस्तकात (दुवा, पृष्ठ ४०) म्हटले आहे, की वृत्तात बसवण्याकरिता "चरति" शब्दाचे हे अनियमित रूप आहे. येथे वृत्त काय आहे?

चराति

माझ्याजवळील मराठीतील भांडारकर पुस्तक २, पृष्ठ ४४ वरील उल्लेख सापडला.

भांडारकर लिहितात, "चरतिचे चराति हे रूप नियम सोडून केले असावे, अथवा छंदासाठी र दीर्घ केला असावा." त्यांच्याहि मताने येथे 'चर्' हाच धातु आहे.

प्रस्तुत श्लोकाच्या पुढचे-मागचे श्लोक पाहू:

<<
१ नानाश्रान्ताय श्रीरस्तीति रोहित शुश्रुम ।
पापो नृषद्वरो जन इन्द्र इच्चरतः सखा । चरैवेति चरैवेति॥

२ पुष्पिण्यौ चरतो जङ्घे भूष्णुरात्मा फलेग्रहिः ।
शेरेऽस्य सर्वे पाप्मानः श्रमेण प्रपथे हत: । चरैवेति चरैवेति॥

३ आस्ते भग आसीनस्य ऊध्वर्स्तिष्ठति तिष्ठतः ।
शेते निपद्यमानस्य चराति चरतो भगः । चरैवेति चरैवेति॥

४ कलिः शयानो भवति संजिहानस्तु द्वापरः ।
उत्तिष्ठँस्त्रेता भवति कृतं संपद्यते चरन् । चरैवेति चरैवेति॥

५ चरन्वै मधु विन्दति चरन्स्वादुमुदुम्बरम् ।
सूयर्स्य पश्य श्रेमाणं यो न तन्द्रयते चरन् । चरैवेति चरैवेति॥
>>

हे श्लोक (आणि त्यांच्या मधील गद्य ओळी) वाचून असे जाणवते की हे पूर्णपणे 'संस्कृत' संस्कृत दिसत नाही. ऐतरेय जेव्हा केव्हा रचले गेले तेव्हाची भाषा त्यात उमटली आहे.

वृत्ताचा विचार केला तर ते अनुष्टुभ् दिसते पण त्याचे नियमहि थोडे तोडलेले आहेत. त्यामध्ये प्रत्येक पादातील ८ वर्ण, पाचवा वर्ण लघु, सहावा गुरु आणि समपादातील सातवा लघु असायला हवा. उदा. वरील श्लोकांतील पहिल्याचे पाद १ आणि २, दुसर्‍याचा पाद ३ ह्या नियमात बसत नाहीत.

'चराति'चा विचार केला तर असे जाणवते की 'चरति' खरोखरच छंदात बसत नाही. अनुष्टुभ् छंदाला तर वरील नियम सोडून अन्य वर्णांवर काहीच नियम नसतो. तर मग 'चरति' नको, 'चराति' च हवे असे का होत आहे ह्याचे उत्तर मला सुचत नाही.

 
^ वर