वारांची नावे

मराठी भाषेतील वारांची नावे आणि त्यांची निवड कशी आणि केव्हा केली गेली याबाबत उपक्रमाच्या सदस्यांना अधिक माहिती आहे काय? ढोबळमानाने आपल्या सूर्यमालेतील ग्रह तार्‍यांची नावे दिली असल्याचे दिसून येते. मराठीखेरीज हिंदीतही नावे अशीच आढळतात. फरक, शनिचर, बृहस्पतीवार आणि इतवार (का आदित्यवार?) यांचा. भारतातील अन्य भाषांत ही नावे याचप्रकारे आहेत का?

इंग्रजीत ही नावे अँग्लो-सॅक्सन देवांवरून किंवा ग्रह तार्‍यांवरुन घेतलेली आढळतात. युरोपातील इतर देशांत ती कशी वापरली जातात यावर कोणी प्रकाश पाडू शकेल का? (युरोपात आपले सदस्य आहेत हे जाणून विचारते.)

पौर्वात्य संस्कृतीत (चीन, जपान इ.) वारांची नावे कशी येतात याबद्दल कोणाला माहिती आहे का?

लेखनविषय: दुवे:

Comments

इंग्रजी नावे पण बरेचदा त्याच ग्रहांवरुन

परवा वॉशिंग्टन येथील स्मिथ्सोनियन संग्रहालयात गेलो होतो, तेंव्हा कळले की ग्रीक देवता व्हीनस हिचे कुठल्यातरी भाषेतले नाव फ्रीडा असून फ्रायडे हा शुक्राचा दिवस् अर्थात शुक्रवार आहे. त्यावरुन विचार केला तर अनेक इतर् नावे जुळतात -
संडे अर्थात सूर्याचा दिवस म्हणजेच रविवार
सॅटर्डे अर्थात शनिचा दिवस म्हणजेच शनिवार
मंडे अर्थात मून म्हणजे चंद्राचा दिवस् म्हणजे सोमवार

इतर दिवसांच्या नावांबद्दल लगेच काही कळत नाही पण थोडा अभ्यास केल्यावर कदाचित ते ही जागेवर पडतील

खिरे

सर्वच नाही.

ट्युसडे, वेनसडे, थर्सडे आणि फ्रायडे ही नावे अँग्लो सॅक्सन (जर्मेनिक ~ नॉर्डिक) देवतांच्या नावावरुन आली. फ्रायडे हे फ्रेया या देवतेवरून पडले.

धन्यवाद.

फ्रीडा नव्हे फ्रेया

हो. फ्रेया हेच व्हिनस चे नाव आहे (मी चुकुन फ्रिडा लिहिलं होतं)

फ्रेंचमध्ये

वारांची नावे
लं(अनुनासिक)दी - ल्यून म्हणजे चंद्र - सोमवार
मार्दी - मार्स म्हणजे मंगळ - मंगळवार
मॅर्क्रदी - मर्क्यूरी - बुधवार
जदी - ज्यूपीटर - गुरूवार
व्हाँद्रदी - व्हीनस - शुक्रवार
सामदी - ? - शनिवार
दिमाँश - ? - रविवार
सारांश त्याच ग्रहांवरून नावे आली आहेत.
(शनीचर हे हिंदी नाव शनैश्चरवरून - शनै: चरति - हळू चालतो, सूर्यप्रदक्षिणेला ३० वर्षे लागतात, यावरून आले आहे, तर आइतवार हे ग्रामीण नाव आदित्यवार यावरून हे स्पष्टच आहे. असेच गुरुवाराला आमच्याकडे बेस्तरवार - बृहस्पतीवार यावरून, बृहस्पती हे देवगुरू होते - म्हणतात.)
धोंडोपंतांनी दिलेला होर्‍याचा मूलाधार मलाही मान्य आहे. यात भारतीय ज्योतिर्गणित्यांना ग्रहगती आणि / किंवा ग्रहांचे पृथ्वीपासूनचे अंतर यांचा क्रम ज्ञात होता हे लक्षात घ्यावे.

- दिगम्भा

धन्यवाद

या आणि खालील काही महत्त्वाच्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद.

सारांश त्याच ग्रहांवरून नावे आली आहेत.

खरंय! याच बरोबर इंग्रजी वारांच्या नॉर्स देवतांची रोमन वारांच्या रोमन देवतांशी तुलना केली असता त्यांत साम्य आढळले.

जसे फ्रेया आणि वीनस किंवा थॉर आणि ज्युपिटर वगैरे.

बेस्तरवार

असेच गुरुवाराला आमच्याकडे बेस्तरवार - बृहस्पतीवार

हे माहिती नव्हते दिगम्भा. माहितीबद्दल धन्यवाद.
अवांतरः कोल्हापुरी भाषेतील खास शब्दांविषयी एखादा लेख लिहा. जमल्यास आम्हीही भरल्या गाडीत सूपभर धान्य टाकू!
सन्जोप राव

कोल्हापुरी भाषा

कोल्हापुरी भाषेबद्दल बर्‍याच् लोकांमध्ये गैरसमज असावा असे वाटते. मी स्वत: कोल्हापुरचा रहिवासी आहे. 'बेस्तरवार' हा शब्द जर तुम्हाला कोल्हापुरी वाटत् असेल् तर् ती तुमची चुकीची समजूत् आहे. बेस्तरवार हा बृहस्पतीवारचा अपभ्रंश आहे. त्याचा आणि टिपिकल कोल्हापुरी भाषेचा काहीच् संबंध नाही.
बाकी कोल्हापुरी भाषेबद्दल नंतर कधीतरी लिहिनंच. तेंव्हा तुमच्या माहितीत भर पडेल.
अनिरुद्ध दातार

दुवा

या दुव्यानुसार सगळ्याच वारांच्या नावांचा आणि ग्रहांच्या नावांचा संबंध आहे. रोमन आणि आपल्या संस्कृतीमध्ये इतके साम्य पाहून आश्चर्य वाटले.

शैलेश

थोडीफार माहिती

लहानसा दुवा

अनु,

हा लहानसा दुवा आवडला. उपयुक्त आहे.

धन्यवाद.

वारांची नावे

फार चांगला प्रश्न विचारला आहे म्हणून येथे लिहीतो. हे लेखन उपक्रमाचे उपसंपादक उडवणार नाहीत, असे गृहीत धरून लिहीत आहे.

वारांची नावे हा विषय ज्योतिषशास्त्राचा आहे.

उदयात उदयं वारः !!

एका सूर्योदयापासून दुसर्‍या सूर्यदयापर्यंतच्या काळाला वार म्हणतात.

वार सात आहेत. जगात सर्वत्र वारांची नावे सारखीच आहेत आणि ती भारताने दिलेली आहेत.

आर्यभट्टांचे सूत्र आहे

आ मंदात शीघ्रपर्यंतम् होरेशा: !!

दिवसाचे होरे २४ असतात. होरा म्हणजे तास. प्रत्येक होरा एक एक ग्रहांचा असतो. सूर्योदयाच्या वेळेस ज्या ग्रहाचा होरा असतो त्याचे नाव त्या दिवशीच्या वारास दिलेले असते.

वरील सूत्राचा अर्थ असा की, आ मंदात... म्हणजे मंदगतीच्या ग्रहापासून ....शिघ्रपर्यंतम....शीघ्रगतीच्या ग्रहापर्यंत... होरेशा:... होरे सुरू असतात.

मंदग्रह ते शीघ्र ग्रह असे आहेत -- शनी, गुरू, मंगळ , रवि, शुक्र, बुध, चंद्र.

शनीवारी पहिला होरा (एक तास) शनीचा, दुसरा गुरूचा, तिसरा मंगळाचा, चवथा रविचा, पाचवा शुक्राचा, सहावा बुधाचा, सातवा चंद्राचा. याप्रमाणे तीन् वेळा २१ होरे झाल्यावर २२वा पुन्हा शनीचा, २३वा गुरूचा, २४वा मंगळाचा.....

इथे २४ तास पूर्ण झाले.

आता दुसरा दिवस सुरू होतो तो पुढील म्हणजे रविच्या होर्‍याने. म्हणून शनिवार नंतर रविवार येतो.

ज्योतिषशास्त्राला शिव्या देणार्‍यांनी याचा जरूर अभ्यास करावा.

आपला,
(ज्योतिर्भास्कर) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

धोंडोपंत

आपल्या विस्तृत प्रतिसादाबद्दल आभारी आहे. चांगली माहिती पुरवलीत.

दिवसाची सुरवात ही सकाळी होते !

या ज्योतिष्याच्या नियमा प्रमाणे,

दिवसाची (वाराची) सुरवात ही सकाळी होते - मध्यरात्री नाही!
पण जगाच्या इतर भागांमध्ये काय मानले जाते?

दिवस कधी सुरू होतो या विषयी पण
अजून माहिती आहे का?

आपला
(अहोरात्र) गुंडोपंत

वार

भारतीय ज्योतिष अभ्यास हा ग्रीकांच्या अभ्यासावरून आलेला आहे असे जर्मन संस्कृतीत़ज्ज्ञांचे मत असल्याचे वाचले होते. (उलटे असण्याचीही शक्यता आहे असे तेव्हा वाटले होते!) पण त्याच लेखात ऋग्वेदकालीन दिवसांची नावे दिली होती त्यावरून सध्याची नावे ही पश्चिमेतूनच आली असावीत असे वाटते.

चीनमध्ये वारांना नावे नसून, थेट पहिला दिवस, दुसरा दिवस असे म्हणतात. बोलीभाषेत त्यातला दिवस हा भाग गाळला जातो. म्हणजे "येत्या चौथ्याला भेटू" वगैरे.

ऋग्वेदकालीन दिवसांची नावे

मृदुला

ऋग्वेदकालीन दिवसांची नावे कोणती होती यावर काही अधिक माहिती आहे का? म्हणजे ती सध्या प्रचलित असणार्‍या नावांपेक्षा वेगळी होती का?

थोडी माहिती

मी हे लेख फारा वर्षांपूर्वी वाचले होते त्यामु़ळे नावे आठवत नाहीत तरी, ती सात दिवसांच्या वारांची नव्हती असे आठवते. आपल्या प्रतिपदा द्वितीया पद्धतीची (किंवा चिनी पद्धतीची!) होती असे वाटते. थोडी शोधाशोध करून काही सापडते का बघते आहे.

सात दिवसांचा आठवडा ही पद्धत ग्रीक (की रोमन?) सैनिकांना पगार देण्यासाठी वापरत असेही वाचल्यासारखे वाटते आहे. (नुसतेच हवेतले आठवणे, संदर्भ काहीच आठवत नाहीत. :-( असो.)

हेच प्रश्न

सूर्यवार आणि चंद्रवार ही नावे इतर नामपद्धतींशी मिळतीजुळती (आणि नेमक्या त्याच वारांसाठी) आहेत, या योगायोग समजावा काय?

बहुतांश ठीकाणी सूर्यवार आणि चंद्रवार तेच राहतात. बाकीचे बदलतात (वीकडेज्) , असे का याचे आश्चर्य वाटते.

भेद

आठवड्यातला चौथा वार, की महिन्यातला चौथा दिवस

अश्या वेळी चौथ्यावारी असे म्हटले जाते असे कळले. माझ्या चिनी मैत्रिणीने सांगितल्याप्रमाणे सप्ताह या शब्दाचे चिन्ह आणि आकड्यांची चिन्हे असे मिळून वारांची नावे बनतात. रविवारचे नाव मात्र सुट्टीवार असे आहे.

होरा

होरा या शब्दाचे मूळ ग्रीक आहे. हॉरोस्कोप आठवा.

या विषयी पूर्ण माहिती द्या

नमस्कार,

होरा हा शब्द 'अहोरात्र' या शब्दा वरुन कसा काय आला नाहीये बरं?

कि 'अहोरात्र' पण मूळ ग्रीक आहे?

कृपया पूर्ण महीती द्या. नुसते कयास नको (जसा मी केलाय!)

आपला
निनाद

हॉरोस्कोप

यातील हॉरो म्हणजे तासच. इंग्रजी अवर. दुवा

आता तो ग्रीकांनी आपल्याकडून घेतला की आपण ग्रीकांकडून घेतला याबाबत माहिती मिळवणे कठिण ठरू शकते. चर्चेत कयास मांडण्यात काहीही गैर नाही. ते मांडल्याने अधिक माहिती तपासली जाते.

याचा होर्‍याशी संबंध नाही

संस्कृतात अह म्हणजे दिवस. अहोरात्र म्हणजे दिवस आणि रात्र, आपल्या भाषेत अखंड २४ तास.
होरा या शब्दाशी संबंध नाही.

- दिगम्भा

स्कोपोस

स्कोपोस हा ग्रीक शब्द आहे. हॉरोस्कोपोस वरून इंग्रजी हॉरोस्कोप बनतो.

ग्रीक

ग्रीक ही लॅटिनहूनही जुनी भाषा असावी असे वाटते, भाषातज्ज्ञ खुलासा करु शकतील असे वाटते.

चू.भू.द्या.घ्या.

काही दुवे

नक्की मलाही माहित नाही, परंतु पुरावे तपासायचे झाले तर ग्रीक जुनी आणि फाटे न फुटलेली भाषा आहे अशी माहिती मिळते एवढेच.

हे दुवे मिळाले ज्यावरून थोडी मदत होईल असे वाटते.

दुवा १
दुवा २

असो.

वारांची नावे

एवढी माहिती पचवावी कशी, हा एक प्रश्नच आहे.

भारतीय ज्योतिषशास्त्राचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास या शंकर बाळकृष्ण दीक्षीत यांनी १८९६ साली लिहिलेल्या ग्रंथातील माहिती वाचली तर् अक्षरश: अचंबित् होतं

इतर संस्कृत नावे

पूजाविधी किंवा इतर नैमित्तिक विधींमध्ये संकल्पाच्या वेळी पुरोहित वेळकाळाचा उल्लेख करतात त्यात 'भौमवासरे', 'मंदवासरे' असे काही ऐकल्याचे आठवते. अधिक माहिती मिळवून कळवतो.

भौम, मंद

भौम म्ह. मंगळ, मंद म्ह. शनि, वासर म्ह. दिवस (उलट वत्सर म्ह. वर्ष)
- दिगम्भा

वासर

वासर म्ह. दिवस

धन्यवाद. सूर्याला वासरमणी का म्हटले जाते त्याचा खुलासा झाला.

वार

वार हा शब्द वासर ह्या शब्दाचे अपभ्रष्ट रूप असावे का? वार असा शब्द संस्कृतात आहे का?

चर्चा उत्तम चालू आहे. मोलाची माहिती मिळाली. धन्यवाद.

उत्तम

उत्तम चर्चा. बरीच मनोरंजक माहिती मिळाली.
राजेंद्र

वारांच्या नांवा विषयी

** ' गुरुवार' ला बृहस्पतिवार म्हटले जाते. कोकणात बेस्तरवार आणि ऐतवार (अनु.गुरु आणि रवि ) ही नांवे काही ठिकाणी रूढ आहेत.
** रामायणात तसेच महाभारत्तात कुठेही वार आणि राशी यांचे उल्लेख नाहीत. तिथी आणि नक्षत्रे आहेत.

** अलेक्झांडरने (सिकंदर) भारतावर स्वारी केली(इ.स.पू. ४थे शतक). तेव्हा वैदिक आणि ग्रीक संस्कृतींत देवाण घेवाण झाली. आपण वार आणि राशी या कल्पना पाश्चात्यांकडून घेतल्या. त्यानी दिली म्हणून आपणही वारांना ग्रहनामे दिली.

** आर्यभट हा इसवी सनाच्या ४थ्या शतकांतील. त्याने " वारांना नावे दिली;सात वारांची पद्धत रूढ केली " हे संभवतच नाही.

**समजा एखाद्याला दोन बायका आहेत. पहिली पासून तीन मुलगे झाले. त्यांची नांवे ठेवली धर्म,भीम, अर्जुन. दुसरीला दोन झाले ते नकुल ,सहदेव. आतां या पाच जणांचा महाभारतातील पाच पांडवांशी जेवढा संबंध आहे तेवढाच नाममात्र संबंध वारनामांचा आकाशातील ग्रहांशी आहे.ग्रहांची गती आणि वार यांचे परस्पर काही नाते नाही. त्यामुळे 'अंगारकी चतुर्थी', 'गुरुपुष्यामृत योग' इ.कल्पना निरर्थक आहेत.

यनावाला - महत्त्वाचा प्रतिसाद

आपण मांडलेल्या मुद्द्यांपैकी खालील दोन मुद्द्यांवर मी माहिती शोधत होते. पुरावा म्हणून पुढे करावा अशी माहिती मिळत नव्हती, म्हणून मूळ चर्चाप्रस्तावात तसे उल्लेख टाळले. अलेक्झांडरमुळे वैदिक आणि ग्रीक संस्कृतीत नेमकी कोणती देवाणघेवाण याबाबत अधिक माहिती कोणी पुरवू शकेल काय?

** रामायणात तसेच महाभारत्तात कुठेही वार आणि राशी यांचे उल्लेख नाहीत. तिथी आणि नक्षत्रे आहेत.

** अलेक्झांडरने (सिकंदर) भारतावर स्वारी केली(इ.स.पू. ४थे शतक). तेव्हा वैदिक आणि ग्रीक संस्कृतींत देवाण घेवाण झाली. आपण वार आणि राशी या कल्पना पाश्चात्यांकडून घेतल्या. त्यानी दिली म्हणून आपणही वारांना ग्रहनामे दिली.

अनेक धन्यवाद!

वारांची नावे

"भारतीय ज्योतिषशास्त्राचा इतिहास " हा शं.बा.दीक्षित लिखित ग्रंथ आहे. (इथे ज्योतिष हा शब्द 'खगोलशास्त्र' या अर्थी आहे.'फलज्योतिष'या अर्थी नव्हे).त्यांत वारांच्या उपपत्ती विषयी लिहिले आहे. "वार आणि राशी या संकल्पना आपणाकडे खाल्डियन (बहुधा इजिप्त) संस्कृतीतून आल्या "असे त्या ग्रंथात म्हटले आहे.

मात्रु आणि पित्रु

मात्रु पासुन मदर आणि पित्रु पासुन फादर शब्द आले हे खरे आहे काय ?

नात्यांची नावे

श्री. वीरेन्द्र यांस, सप्रेम नमस्कार
'संस्कृत आणि ' इंग्रजी' या भाषांतील नात्यांच्या नांवांत साम्य आढळते.
** सं..पितृ->पितर् (पिता पितरौ पितरः|प्रथमा ) यावरून ग्रीक..pater (पेतर)...इं. फादर इं.त pater असाही शब्द आहेच.
** सं..मातृ->मातर् ग्रीक..mater इं.मदर . alma mater मातेसमान असलेली शाळा...मदरसा...मादर असा शब्द शिवीत येतो.

** मुलगा या अर्थी सं. सूनु:(शिवमुद्रेत ".....शाहसूनो:(शहाजीच्या पुत्राची) शिवस्येषा मुद्रा भद्राय राजते |) लहान मुलाला सोनू.सोन्या,सोनुला,सानू,इ.म्हणतात ते सर्व सूनु: वरून. इंग्रजीत सन.

**मुलगी, दुहिता..सं. दुहितृ->दुहितर् ..अपभृंश होत दोहतर->डोहतर्-> daughter .

** सं. स्वसृ (स्वसा; बहीण या अर्थी)->स्वसर...अपभृंश होत सिसर->सिस्टर

**भाऊ, भ्राता सं..भ्रातृ भ्रातर् अपभ्रंश ब्रातर्->ब्रादर्->ब्रदर

वरून आठवले की

उर्दूत मादरी जबान म्हणजे मातृभाषा, मादरे वतन म्हणजे मातृभूमी.
मादरे मिल्लत वरून आठवली ती दुख्तराने1 मिल्लत ही काश्मिरातली कट्टरपंथी महिला संघटना. फार्शीत दुख्तर म्हणजे मुलगी2. इंग्रजी daughter (डोटऽ) आणि संस्कृत दुहितृ ची बहीण. बिरादर, बिरादरी, ब्रदर, भ्रातृ यांची निकटताही कळायला फारशी कठीण नाही.

1 दुख्तरान हे दुख्तरचे अनेकवचन आहे. फार्शी भाषेत आणि उर्दूतही जिवंत वस्तूंचे अनेक वचन करायचे असल्यास अखेरीस 'आन' जोडतात. तालिबान हे तालिब [विद्यार्थी , पण शब्दशः बहुतेक इच्छुक (तलब म्हणजे इच्छा) चे अनेकवचन. चूभूद्याघ्या.]अगदी फार्शीत रूढ झालेल्या इंग्रजी शब्दांनाही हाच नियम लागू होतो. मेंबराने पारलियामेंट (उर्दूत उच्चार पारलियामेंट असा करतात). इनऍनिमट (मराठीत काय म्हणतात बुवा) वस्तूंच्या अखेरीस 'हा' लावतात. जसे गुलहा ए परीशाँ (विखुरलेली फुले).

1,2 टग्या ह्यांनी दोन्ही नजरचुका -- त्याही वाभाडे न काढता व्यनितून -- लक्षात आणून दिल्याबद्दल मी त्यांचा विशेष आभारी आहे.

दुख्तर

मूळ संदेश नीट वाचला नाही. म्हणून उत्तरादखलचा मजकूर काढून टाकत आहे.

उर्दूत वारांची नाव

फारच मस्त चर्चा. उर्दूत वारांची नावे अशी आहेत वारांची - पीर (सोमवार), मंगल, बुध, जुमेरात, जुमा, शनिचर, इतवार. चूभूदेघे. फारसी वार लवकरच देईन.

धन्यवाद

श्री यानावाला यान्चे आभार,

आपण दीलेली माहिती खूपच छान.

पण या वरुन आपण असे समजू शकतो का की इन्ग्रजी भाषा सन्स्क्रुत पासून उदभवली ?

वारांची नावे

सौरभ

जपानीत बरीचशी अशीच नावे आहेतः

निचियोबि - रविवार
गेचु़योबि - सोमवार
कायोबि - मंगळवार
सुइयोबि - बुधवार
मोकुयोबि - गुरुवार
किनयोबि - शुक्रवार
दोयोबि - शनिवार

जपानीत 'वार' याला 'योबि' म्हणतात.

'निचियोबि' मधला 'निचि' म्हणजे सूर्य
'गेचु़योबि' मधला 'गेचु़' म्हणजे चन्द्र
'कायोबि' मधला 'का' म्हणजे आग (अग्नि) (मंगळ हा ग्रह अग्नि प्रमाणे लाल आहे)
'सुइयोबि' मधला 'सुइ' म्हणजे पाणि (जल) (बुध हा ग्रह पाण्यासार्खा शुभ्र आहे का ? )
'मोकुयोबि' मधला 'मोकु' म्हणजे झाडे (काष्ठ , वनस्पति)
'किनयोबि' मधला 'किन्' म्हणजे सोनं (स्वर्ण)
'दोयोबि' मधला 'दो़' म्हणजे माती (पृथ्वी)

वरील वारांच्या नावांतील 'योबि' वेगळा काढल्यास जे शब्द उरतात त्यांचे अर्थ दिले आहते. अर्थात् हे अर्थ फक्त वारांच्या नावापुरतेच गृहीत धरावेत. याच शब्दांचे इतर ठिकणी वेगळे अर्थही होऊ शकतात. म्हणजे 'निचि' असा निव्वळ स्वतंत्र शब्द वापरल्यास त्याचा अर्थ 'सूर्य' होईलच असं नाही.

आता मला जे वाटतं ते सांगतो. आपल्या संस्कृत तत्वज्ञानात 'पृथ्वी, आप्, तेज, वायु आकाश' आहेत् किनई तसे जपानी तत्वज्ञानात हे अग्नि, जल, काष्ठ, स्वर्ण आणि पृथ्वी असावे.

इतर कुणाला ह्यांविषयी कही महिती असल्यास कळवावी.

वार

भारतीय ज्योतिषशास्त्राचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास या शंकर बाळकृष्ण दीक्षीत यांनी १८९६ साली

लिहिलेल्या ग्रंथात पृष्ठ १०८ (वरदा बुक्स आवृत्ती १९८९) मध्ये ते म्हणत्तात," सर्व भारत(महाभारत)

मी स्वतः ज्योतिषदृष्टीने वाचले आहे, त्यात मला सात वार आणि मेषादि राशी कोठे आढळ्ल्या

नाहीत." "शकापुर्वी ५०० च्या सुमारास मेषादि संद्न्या आमच्या देशात प्रचारत आल्या आणि

त्यापुर्वी सुमरे ५०० वर्षे वार आले असावे" वार आणि राशी या खाल्डियन,इजिप्शियन वा ग्रीक

संस्कृती कडून आपल्याकडे आल्या असे त्यांचे मत आहे.या ग्रंथाची महती सांगताना

श्री.कृ.कोल्हटकर आपल्या प्रशंसनात म्हणतात"डॉ.थीबो सारखा विद्वान पाश्चात्य ज्योतिषी हे पुस्तक

मुळातून वाचण्यासाठी मुद्दाम मराठी शिकला" हा ग्रंथ खरोखर अद्वितीय आहे.

 
^ वर