मराठीतील रूढ संस्कृत शब्द आणि वचने - भाग ६ आणि अखेरचा.

मराठीतील रूढ संस्कृत शब्द आणि वचने - भाग ६ आणि अखेरचा.

, , , आणि येथे ह्यापूर्वीचे भाग पहावेत.

१) य: क्रियावान्स पण्डितः.

पठका: पाठकाश्चैव ये चान्ये शास्त्रचिन्तकाः।
सर्वे व्यसनिनो मूर्खा यः क्रियावान्स पण्डितः॥
महाभारत वनपर्व (यक्षप्रश्न) ३१४.११२

शिकणारे, शिकवणारे आणि शास्त्रांचे अन्य अभ्यासक जर वाईट सवयी बाळगत असले तर तेहि अज्ञ जनातच गणले पाहिजेत. तोच खरा पंडित जो शिकलेले आचरणात आणतो.

२) धर्मो रक्षति रक्षितः.

धर्म एव हतो हन्ति धर्मो रक्षति रक्षितः।
तस्माद्धर्मं न त्यजामि मा नो धर्मो हतोऽवधीत् ।।
महाभारत वनपर्व (यक्षप्रश्न) ३१४.१३१

विनाश केलेली सुव्यवस्था विनाश करणार्‍याचा नाश करते. संरक्षण केलेली सुव्यवस्था संरक्षणकर्त्याचे रक्षण करते. अतएव, मी सुव्यवस्था टाकत नाही, अशासाठी की असंरक्षित व्यवस्था आमचा विनाश न करो.

३) परदु:खं शीतलम्.

महदपि परदु:खं शीतलं सम्यगाहु:
प्रणयमगणयित्वा यन्ममापद्गतस्य।
अधरमिव मदान्धा पातुमेषा प्रवृत्ता
फलमभिनवपाकं राजजम्बूद्रुमस्य॥
विक्रमोर्वशीय ४.२७

दुसर्‍याचे दु:ख मोठे असले तरी शीतल असते असे म्हणतात ते योग्य आहे. ही मदान्ध (कोकिळा) संकटात पडलेल्या माझ्या मनधरणीला दाद न देता नव्याने पिकलेल्या जांभळीच्या फळाचा चुंबन घ्यावे तसा आस्वाद घेण्य़ात गुंतली आहे. (उर्वशीचा शोध घेणारा विक्रम कोकिळेला तो प्रश्न विचारतो आणि उत्तर न मिळाल्याने हे उद्गार काढतो.)

मॅनवेरिंगनिर्मित मराठी म्हणींच्या संग्रहात क्र. ५४८ येथे ’आपदुःख भारी आणि परदुःख शीतळ’ अशी म्हण दिली आहे.

४) गजस्तत्र न हन्यते.

शूरश्च कृतविद्यश्च दर्शनीयोऽसि पुत्रक।
यस्मिन्कुले त्वमुत्पन्नो गजस्तत्र न हन्यते॥
पंचतंत्र लब्धप्रणाश ४०.

एका सिंहिणीने कोल्ह्याच्या मुलाला वाढविले पण हत्तीची शिकार त्याच्या शक्तीपलीकडची आहे हे ती जाणते म्हणून त्याला ती सांगते...) ’बाळा, तू शूर आहेस, शिकलेला आहेस, दिसायलाहि चांगला आहेस. तरीपण ज्या कुळात तुझा जन्म झाला तेथे हत्तीची शिकार होत नाही.’

५) सर्वनाशे समुत्पन्ने ह्यर्धं त्यजति पण्डितः.

सर्वनाशे समुत्पन्ने ह्यर्धं त्यजति पण्डितः।
अर्धेन कुरुते कार्यं सर्वनाशस्तु दुःसहः॥
पंचतंत्र अपरीक्षितकारक ४२.

सगळ्याचाच नाश होण्याऐवजी शहाणा माणूस अर्धे सोडून देतो आणि अर्ध्यावर भागवितो. सगळ्याचाच नाश होणे दु:खकारक असते.

६) निर्वाहः प्रतिपन्नवस्तुषु.

किं कूर्मस्य भरव्यथा न वपुषि क्ष्मां न क्षिपत्येष यत्
किं वा नास्ति परिश्रमो दिनपतेरास्ते न यन्निश्चलः |
किंत्वङ्गीकृतमुत्सृजन्कृपणवत् श्लाघ्यो जनो लज्जते
निर्वाहः प्रतिपन्नवस्तुषु सतामेतद्धि गोत्रव्रतम् ||
भर्तृहरि नीतिशतक ११७.

(स.प.महाविद्यालयाचे बोधवाक्य) कूर्म हा पाठीवरून पृथ्वीचे ओझं ढकलून देत नाही म्हणजे काय ते त्याला जड वाटत नसेल? सूर्य कधीच थांबत नाही तर त्याला काय थकवा येत नसेल? एकदा सुरु केलेले काम क्षुद्रपणे मधेच सोडून द्यायला थोर लोकांना संकोच वाटतो. हाती घेतले ते तडीस नेणे हे थोरांचे कुलव्रतच असते.

७) आन्तरः कोऽपि हेतु:.

व्यतिषजति पदार्थानान्तर: कोऽपि हेतुः
न खलु बहिरुपाधीन्प्रीतय: संश्रयन्ते।
विकसति हि पतङ्गस्योदये पुण्डरीकं
द्रवति व हिमश्मावुद्गते चन्द्रकान्त:॥
मालतीमाधव १.१५

स्त्रीपुरुषांना आतील कोठलातरी धागा एकमेकांकडे आकृष्ट करतो. प्रीति बाह्य गोष्टींवर अवलंबून नसते. सूर्य उगवल्यावरच कमळ फुलते आणि चंद्र उगवल्यावरच चंद्रकान्तमणि पाझरू लागतो.

८) कालो ह्ययं निरवधिर्विपुला च पृथ्वी.

ये नाम केचिदिह न: प्रथयन्त्यवज्ञां
जानन्तु ते किमपि तान्प्रति नैष यत्न:।
उत्पत्स्यतेऽस्ति मम कोऽपि समानधर्मा
कालो ह्ययं निरवधिर्विपुला च पृथ्वी॥
मालतीमाधव १.७.

आज जे माझी उपेक्षा करीत आहेत त्यांना काहीहि वाटो, माझा हा प्रयत्न त्यांच्यासाठी नाही. आगेमागे केव्हातरी माझा समानधर्मा जन्माला येईलच कारण काल अनंत आहे आणि पृथ्वी खूप मोठी आहे.

९) अवडंबर.

संस्कृतमध्ये ’आडम्बर’ म्हणजे ’मोठा नगारा’. त्याचा अपभ्रंश म्हणजे मराठी ’अवडंबर’ म्हणजे ’खोटा देखावा, निरर्थक आवाज’.

१०) अष्टसात्त्विकभाव.

’विठ्ठलाच्या दर्शनाने वारकर्‍यांचे अष्टसात्त्विकभाव जागृत झाले.’ हे अष्टसात्त्विकभाव म्हणजे ’स्तम्भ, प्रलय, रोमांच, स्वेद, वैवर्ण्य, वेपथु, अश्रु आणि वैस्वर्य’ म्हणजेच अनुक्रमे स्तब्धता, मूर्छा येणे, अंगावर काटा उभा राहणे, घाम, कंप, अश्रुपात आणि आवाजात बदल.

११) होरा.

मराठीत ’होरा’ म्हणजे भविष्याची कल्पना किंवा तर्क, ज्यावरून ज्योतिषांना आदरपूर्वक ’होराभूषण’ असे संबोधले जाते. मूळचा खाल्डियन भाषेतील ’दिवसाचा २४ वा भाग अशा अर्थाचा हा शब्द ग्रीक भाषेमध्ये ώρα असा बदलून तेथून भारतीय ज्योतिषात त्याच अर्थाने प्रचलित झाला. (इंग्रजी hour हा शब्दहि त्याच उगमाचा.) भारतीय ज्योतिषात दिवसाच्या २४ तासांना क्रमाने एकेक ग्रह ’होरेश’ मानला जातो आणि त्यांचा क्रम पृथ्वीभोवतीच्या त्यांच्या प्रदक्षिणाकालाच्या उतरत्या क्रमाने शनि, गुरु, मंगळ, रवि, शुक्र, बुध आणि चंद्र (सोम) असा असतो. आजच्या दिवसाचा पहिला होरेश शनि असला तर आजचा वार शनिवार. उतरत्या क्रमाने तीन आवर्तनांनंतर आजचा शेवटचा होरेश मंगळ आणि उद्याचा पहिला होरेश रवि म्हणून उद्याचा दिवस रविवार आणि ह्याच क्रमाने सोमवार, मंगळवार इत्यादि निर्माण होतात. ’होरा’ शब्दाच्या मूळ अर्थाची विस्मृति होऊन त्याला ’भविष्य’ हा अर्थ चिकटला.

ह्याविषयी श्लोक:

मन्दादध: क्रमेण स्युश्चतुर्था दिवसाधिपा:।
होरेशा: सूर्यतनयादधोधः क्रमशस्तथा॥
सूर्यसिद्धान्त भूगोलाध्याय.

(सूर्यपुत्र शनिपासून खालच्या क्रमाने होरेश होऊन चौथे ग्रह ओळीने दिवसाधिप होतात.)

१२) पंचत्वास जाणे.

पंचमहाभूते म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश. मृत्यूनंतर मृतदेह पुन: पंचमहाभूतामध्ये समाविष्ट होतो म्हणून मृत्यु पावणे म्हणजे पंचत्वास जाणे.

१३) यक्षप्रश्न.

वनवास भोगतांना नकुल एका सरोवरावर पाणी आणण्यास जातो तेथील रक्षक यक्ष त्याला बेशुद्ध करतो. क्रमाक्रमाने अन्य सर्व पांडवांचेहि तेच होते. अखेरीस यक्षाच्या सर्व प्रश्नांची योग्य उत्तरे देऊन धर्मराज यक्षाला प्रसन्न करतो ह्या महाभारतकथेवरून ’अवघड प्रश्न’ अशा अर्थी ’यक्षप्रश्न’ हा शब्द रूढ झाला.

'यादवी युद्ध' हा वाक्प्रचारहि कलियुगाच्या प्रारंभी आणि कृष्णाच्या निजधामास जाण्याचा प्रसंगी यादवांनी एकमेकात लढून द्वारका बुडविली त्यावरून निर्माण झाला आहे.

१४) हितं मनोहारि च दुर्लभं वचः.

क्रियासु युक्तैर्नृप चारचक्षुषो न वञ्चनीयाः प्रभवोनुजीविभिः।
अतोऽर्हसि क्षन्तुमसाधु साधु वा हितं मनोहारि च दुर्लभं वच:॥
किरातार्जुनीय १.४.

कार्यावर नेमलेल्या सेवकांनी हेर हेच डोळे असलेल्या राजांची दिशाभूल करू नये. अतएव माझे बोलणे प्रिय वा अप्रिय असले तरी तू त्याला क्षमा करावीस कारण हितकर आणि तरीहि मनाला रिझवणारे बोलणे दुर्मिळ असते.

१५) अहिंसा परमो धर्म:.

अहिंसा परमो धर्मस्तथाऽहिंसा परं तप:।
अहिंसा परमं सत्यं यतो धर्मः प्रवर्तते॥
अनुशासनपर्व ११५.२३

अहिंसा हा श्रेष्ठ धर्म, तप आणि सत्य आहे. अहिंसेतून धर्म उत्पन्न होतो.

१६) शठं प्रति शाठयम्.

हिते प्रतिहितं कुर्यात् हिंसिते प्रतिहिंसितम्।
तत्र दोषं न पश्यामि शठे शाठयं समाचरेत्॥
पंचतंत्र अपरीक्षितकारक ८५.

चांगल्याला चांगल्य़ाने आणि हिंसेला हिंसेने उत्तर द्यावे. गुंडाला गुंडगिरीने उत्तर द्यावे. मला ह्यात काहीहि वावगे दिसत नाही.

(अशाच अर्थाचा आणि रूपाचा आणखी एक श्लोक:

कृते प्रतिकृतिं कुर्याद्धिंसिते प्रतिहिंसितम्।
तत्र दोषं न पश्यामि दुष्टे दुष्टं समाचरेत्॥)

’शठं प्रति शाठयम्’ हे वचन लोकमान्य टिळकांच्या लिखाणातून लोकप्रिय झाले असे वाटते. तत्पूर्वी तसेच्या तसे ते कोठे आढळत नाही.

१७) द्रव्येण सर्वे वशाः.

निर्द्रव्यः पुरुषो विपल्लवतरुः सर्वत्र मन्दादरो
नित्यं लोकविनापराधकुपितो दुष्टं च सम्भाषणम्।
भार्या रूपवती च मन्दमनसा स्नेहान्न चालिङ्गते
तस्माद्द्रव्यमुपार्जय श्रुणु सखे द्रव्येण सर्वे वशा:॥
सुभाषित.

द्रव्यहीन मनुष्य निष्पर्ण झाडासारखा असतो. त्याला कोठेहि मानाची वागणूक मिळत नाही. लोक त्याची चूक नसतांनाहि त्याला रागावतात आणि त्याच्याशी दुराव्याने बोलतात. सुंदर पत्नीहि त्याच्याकडे दुर्लक्ष करते आणि त्याला प्रेमाने आलिंगन देत नाही. म्हणून मित्रा ऐक, पैसा मिळव, सगळे पैशामागे येतात.

१८) भार्या रूपवती शत्रुः.

भार्या रूपवती शत्रुः पुत्रः शत्रुरपण्डितः।
ऋणकर्ता पिता शत्रुर्माता च व्यभिचारिणी॥
सुभाषित.

सुस्वरूप भार्या, अशिक्षित पुत्र, कर्ज करून ठेवणारा बाप आणि वाईट चालीची आई हे शत्रु होत.

१९) दारिद्र्यान्मरणं वरम्.

उत्तिष्ठ क्षणमेकमुद्वह सखे दारिद्र्यभारं मम
श्रान्तस्तावदिदं चिरान्मरणजं सेवे त्वदीयं सुखम्।
इत्युक्तं धनवर्जितस्य वचनं श्रुत्वा श्मशाने शवम्
दारिद्यान्मरणं वरं वरमिति ज्ञात्वैव तूष्णीं स्थितम्॥
पंचतंत्र?

’काही काळ ऊठ आणि माझा दारिद्र्यभार आपल्यावर घे, खूप काळापासून दमलेला असा मी तेव्हढया वेळात तुझे मरणामधले सुख भोगतो’. श्मशानातील शवाने दरिद्री माणसाचे हे बोलणे ऐकले आणि दारिद्र्यापेक्षा मरण बरे हे ओळखून काही उत्तर दिले नाही.

२०) चक्रनेमिक्रमेण.

नन्वात्मानं बहु विगणयन्नात्मनैवावलम्बे
तत्कल्याणि त्वमपि नितरां मा गमः कातरत्वम्।
कस्यात्यन्तं सुखमुपगतं दु:खमेकान्ततो वा
नीचैर्गच्छत्युपरि च दशा चक्रनेमिक्रमेण॥
मेघदूत उत्तरमेध ४८.

(यक्षाने मेघाबरोबर पाठविलेल्या संदेशाचा एक भाग...) उर्वरित दिवसांचा आपल्याशीच हिशोब करत मी स्वतः स्वतःला सांभाळून आहे आणि म्हणून हे कल्याणि, तूहि फार विकल होऊ नकोस. सर्वच सुख अथवा सर्वच दु:ख कोणाला भोगावे लागते? भाग्य हे चाकाच्या आर्‍यांप्रमाणे खाली जाते आणि वरहि येते.

भाग २ मध्ये थोडया फरकाने पुढील श्लोक ’महाजनो येन गतः स पन्था:’ ह्या उक्तीसाठी दाखविला होता पण त्याचा मूलस्रोत तेथे दिला नव्हता. हा श्लोक महाभारतातील यक्षप्रश्नाचा एक भाग आहे असे थोडे शोधल्यावर कळले.

तर्कोऽप्रतिष्ठः श्रुतयो विभिन्ना
नैको मुनिर्यस्य मतं प्रमाणम्।
धर्मस्य तत्त्वं निहितं गुहायां
महाजनो येन गतः स पन्था: ।।
महाभारत वनपर्व (यक्षप्रश्न) ३१४.११९.