आयझ्याक न्यूटनच्या (1642-1727) गुरुत्वबलाचा सिद्धांत (भाग - १)

समाजावरील धर्माची पकड
न्यूटनचे व्यक्तिमत्व गूढ, विक्षिप्त व थोडेसे तर्‍हेवाइकपणाकडे झुकणारे होते. विज्ञान व धर्म यांच्या कचाट्यात सापडलेले त्याचे गूढ व्यक्तिमत्व अजूनही अभ्यासकांचा आवडता विषय आहे. सरकारी चाकरी करण्यातच अर्धे अधिक आयुष्य घालवलेल्या या वैज्ञानिकाभोवती अनेक मिथ्यकथा प्रचारात आहेत. एकीकडे गणित, भौतिकी या क्लिष्ट समजलेल्या विषयातील मूलभूत संशोधन तर दुसरीकडे लोखंडाचे सोन्यात रूपांतर करण्याच्या अल्केमीवरील गाढ (अंध)श्रद्धा! परंतु तो काळच अशा प्रकारच्या अनाकलनीय विरोधाभासाने भरलेला होता. पारंपरिक धर्मव्यवहार विज्ञानावर सतत कुरघोडी करत होता. तरीसुद्धा न्यूटनच्या व्यक्तिमत्वातील कुठल्याही घटनेकडे वस्तुनिष्ठपणे बघण्याच्या गुणविशेषामुळे गणित व भौतिकीतील त्याचे योगदान आपण कधीच विसरणार नाही.

1642च्या क्रिसमस सणाच्या दिवशी इंग्लंडमधील एका खेडयात जन्मलेला न्यूटन जन्माआधीच पोरकाझाला होता. काहीसा एकलकोंडा व अशक्त प्रकृतीचा न्यूटन काहीना काही विचार करत असे. त्याचा मेंदू हीच त्याची प्रयोगशाळा. केंब्रिजमध्ये शिकत असताना अल्केमीने त्याला झपाटले. याच वेडापायी नैसर्गिक सत्याचा शोध घेणे हेच त्याचे जीवन साध्य झाले. प्लेगच्या साथीत केंब्रिज विश्वविद्यालय काही काळ बंद पडल्यामुळे न्यूटनला पुढील दोन वर्षे आपल्या खेडयात जावून रहावे लागले. त्याच काळात स्वत:च्या प्रतिभाशक्तीने त्यानी नैसर्गिक सत्याचा पाठपुरावा केला. प्रकाशाचे स्वरूप काय असू शकेल, झाडावरील फळं जमीनीवर का पडतात, आकाशातील ग्रह-तार्‍यांचे भ्रमण कशामुळे होते, इत्यादी नैसर्गिक घटनामागील सत्य जाणून घेण्यासाठी तो सतत विचार करत असे. त्याच विचारामंथनाचे फलित म्हणजे त्यानी शोधलेले गुरुत्वाकर्षणासंबंधीचे व गतीसंबंधीचे ते प्रसिध्द नियम.

प्लेटो(424 क्रि. पू. – 348 क्रि. पू.), अरिस्टॉटल((384 क्रि. पू. – 322 क्रि. पू.), कोपर्निकस (1473 – 1543), टायको ब्राहे (1546 – 1601), गॅलिलियो (1564 –1642), ते केप्लर (1571 – 1630) पर्यंतच्या अनेक वैज्ञानिकांनी बायबल व धर्मशास्त्रातील अनेक गोष्टी विसंगतीपूर्ण आहेत हे पुराव्यानिशी सिद्ध करूनसुद्धा समाजावरील धर्माची पकड थोडीसुद्धा ढिली झाली नव्हती. पृथ्वीच्याभोवती ग्रह, तारे, नभोमंडल नसून सूर्य हा केंद्रबिंदू आहे यासाठी वैज्ञानिकांना भरपूर प्रयत्न करावे लागले.

योहान केप्लर
टायको ब्राहेच्या ऑब्झर्व्हेटरीत काम करत असलेल्या योहान केप्लरचे आयुष्यसुद्धा खडतर प्रसंगातूनच गेलेले होते. लहानपणीच वडिलांचा मृत्यु झाल्यामुळे पोटापाण्यासाठी त्याला कुंडली मांडून भविष्य सांगावे लागत असे. परंतु या गोष्टीवर त्याचा अजिबात विश्वास नव्हता. ग्रह व धूमकेतू यांच्या भ्रमणकाळांच्या सुदीर्घ नीरिक्षणातून भ्रमणकाळ व सूर्यापासूनचे त्यांचे अंतर यात अन्योन्य संबंध आहे हे त्याला प्रथम कळाले. सूर्याभोवतीच्या एका प्रदक्षिणेसाठी T वेळ व त्याचे सूर्यापासूनचे अंतर d असल्यास

T2= constant1 x d3

अशी सूत्ररूपात त्यानी मांडणी केली. ग्रह वृत्ताकारात फिरत नसून काही ठिकाणी त्यांचा वेग कमी जास्त होत असल्यामुळे त्या दीर्घवर्तुळाकारात भ्रमण करत असाव्यात असे विधान केप्लरनेच केले होते.

या पूर्वीच्या अनेक वैज्ञानिकांचा पगडा न्यूटनवर होता. न्यूटनच्या डोक्यात नेहमीच काही ना काही कल्पनांचा विचार चाललेला असायचा. अशाच प्रकारे एका विचारप्रयोगाच्या वेळी आकाशातील चंद्र झाडावरील सफरचंदाप्रमाणे खाली का पडत नाही याचा विचार तो करू लागला. त्यावेळी त्याला दोरीच्या टोकाला चेंडू बांधून स्वत:भोवती दोरी फिरवताना दोरी ताठ होण्याची बालपणीची आठवण झाली. पृथ्वीभोवती फिरत असतानाचे चंद्राचे केंद्रोत्सारी बळ (centrifugal force) त्याला खाली पडू देत नसावे हे त्याच्या लक्षात आले. हे बळ दोरीची लांबी, दोरी फिरवण्याचा वेग व टोकाला बांधलेल्या चेंडूचे वजन यावर अवलंबून असते. जितकी जास्त दोरीची लांबी तितके बळ जास्त. जितके जास्त जोरात फिरवले जाईल तितक्या प्रमाणात वस्तूवर बळाचा परिणाम जास्त. या सगळ्या गोष्टी गणितीय सूत्रामध्ये घातल्यास
केंद्रोत्सारी बळ (centrifugal force) = constant2xmxd/ T2

याचा अंदाज येईल.
यात m - वस्तूमान, d - (दोरीची) लांबी व T - एका प्रदक्षिणेसाठीचा वेळ असे गृहित धरले आहेत.

परंतु शंभर वर्षापूर्वी केप्लरने

T2= constant1 x d3

अशी मांडणी केली होती. चंद्र जरी ग्रह नसून पृथ्वीचा उपग्रह असला तरी तो पृथ्वीभोवती फिरत असल्यामुळे तोही केप्लरच्या नियमाप्रमाणे फिरत असावा असे गृहित धरून चंद्राचे केंद्रोत्सारी बळ मोजण्यासाठी T2 च्या जागी केप्लरचे मूल्य constant1 x d3 मांडून त्यानी समीकरण लिहिले.

चंद्राचे केंद्रोत्सारी बळ = (constant2xmxd)/(constant1xd3)
= (constant2/constant1)xmxd/d3
= (new) constantxm/d2

चंद्राचे केंद्रोत्सारी बळ
1665च्या प्लेगची साथ पसरलेल्या त्या काळात 23 वर्षाच्या तरुण न्यूटनला आपण शोधलेल्या या विलक्षण सूत्राचे फार कौतुक वाटले. पृथ्वीच्या भोवती एका काल्पनिक दोरीने चंद्राला बांधून कुणी तरी जोराने फिरवत असल्यामुळे चंद्र खाली पडत नाही याची त्याला मजा वाटली. त्याच्या मते स्थिरांकांच्या व्यतिरिक्त चंद्राचे वस्तुमान व त्याचे पृथ्वीपासूनचे अंतर यावरच केंद्रोत्सारी बळ निर्भर असते. एका उपग्रहाला स्वत:भोवती कायमपणे फिरवत ठेवणार्‍या या वैश्विक बळाविषयी त्याला कुतूहल वाटू लागले. याचाच विचार करत असताना पृथ्वीचे गुरुत्व बळ आणि चंद्राचे केंद्रोत्सारी बळ दोन्ही समान असल्यामुळेच हे शक्य आहे, या निष्कर्षापर्यंत तो पोचला.
पृथ्वीचे गुरुत्व बळ = चंद्राचे केंद्रोत्सारी बळ
= स्थिरांक x m/d2 हे त्याला उमजले.
या समीकरणाचा पृथ्वीपासून जितके लांब लांब जाल त्या प्रमाणात हे बळ कमी कमी होत जाणार, यावर भर होता. परंतु ते कधीच शून्यावर येणार नाही. अरिस्टॉटलला मात्र पृथ्वीचे हे बळ फक्त चंद्रापर्यंतच असते, असे वाटत होते. न्यूटनला मात्र आकाशस्थ ग्रह तारे आपल्याला काही तरी वेगळे सांगत आहेत, असे वाटले.

केप्लरप्रमाणे न्यूटनलासुद्धा अंतराळातील या घटकांचा एकमेकाशी संबंध असणे याचे आश्चर्य वाटले. ईश्वराचे अस्तित्वच या अपरिपूर्ण, दोषयुक्त विश्वाला कोसळण्यापासून, नष्ट होण्यापासून थांबवत असावे, असे त्याला वाटू लागले. 17व्या शतकातील इंग्लंडमधील धर्मव्यवस्था विज्ञानाच्या बाबतीत तुलनेने सहनशील होती. कारण ईश्वरी चमत्कार विज्ञानाला उघडे पाडतील याची त्यांना पूर्ण खात्री होती. त्याचप्रमाणे विज्ञानसुद्धा प्रत्यक्षपणे वा उघड विरोध करण्यास धजावत नव्हते. न्यूटनचे अनेक सहकारी वैज्ञानिक धर्म व विज्ञान या दोन्ही डगरीत पाय ठेवत बायबलमधील गोष्टींना पूरक असे वक्तव्य करत होते. न्यूटनच्या डोक्यावरसुद्धा दोन टोप्या होत्या. निखळ विज्ञानाचे विचार डोक्यात नसताना दैवीसाक्षात्काराच्या गोष्टींचा तो विचार करत असे. लोखंडाच्या तुकड्याला सोन्यात रूपांतरित करण्याच्या हव्यासापायी अल्केमीत तो पूर्णपणे गुंतलेला होता. याच अल्केमीमुळे आधुनिक रसायनशास्त्राचा जन्म झाला ही गोष्ट वेगळी!

.........क्रमशः

Comments

चांगला विषय

छान लेखमाला. पुढील भाग वाचण्यास उत्सुक.

छान् विषय

विज्ञानविषयक माहितीमध्ये मोलाची भर.सांगायची शैली अधिक आवडली.
लेखमाला वाचायला नक्की आवडेल.

+१

असेच म्हणतो. सोप्या भाषेत असल्याने जास्त उत्तम. अजुन यौद्या.

न्युटनच्या ह्या शोधावर केप्लरच्या सुत्राचा अमुलाग्र प्रभाव असणार असे वाटते.

उत्कृष्ट सचित्र लेख

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.प्रभाकर नानावटी यांचा हा विज्ञान-परिचय सचित्र लेख वाचनीय आणि अभ्यसनीयही आहे.अशा लेखांचे एक पुस्तक प्रकाशित करावे.शालेय विद्यार्थ्यांना तसेच सर्वसामान्य विज्ञानोत्सुक वाचकांनाही उपयुक्त ठरेल.

रोचक

विज्ञानाचा इतिहास वाचायला मजा येत आहे.
ग्रहगणिताचे नियम मांडणारा केप्लर म्हणे डोळ्याने काहीसा अधू होता. टायको ब्राहेचा शिष्य म्हणवणार्‍या केप्लरला याच कारणासाठी टायकोने नाकारले होते. टायकोच्या मागून टायकोने अतिशय काळजीपूर्वक नोंदवलेल्या निरीक्षणांचा वापर करून टायकोने ग्रहगणिताचे नियम मांडले.
चौथ्या शतकातल्या अलेक्झांड्रीयाच्या हायपेशियाला म्हणे ग्रहांच्या दीर्घवर्तुळाकार कक्षांचा शोध लागला होता. हाच केप्लरचा पहिला नियम आहे.

न्यूटनच्या डोक्यावरसुद्धा दोन टोप्या होत्या.

यावरून आईनस्टाईनच्या कॉस्मॉलॉजी कॉन्स्टंटची आठवण झाली. त्याचा इतिहास आणि वर्तमानही रोचक आहे. तशीच काहीशी गंमत हबल स्थिरांकाच्या किंमतीची!

छान लेखमालिका

विज्ञानाचा इतिहास वाचायला मजा येत आहे.

असेच. छान लेखमालिका.

चौथ्या शतकातल्या अलेक्झांड्रीयाच्या हायपेशियाला म्हणे ग्रहांच्या दीर्घवर्तुळाकार कक्षांचा शोध लागला होता. हाच केप्लरचा पहिला नियम आहे.

म्हणजे ही सगळी मंडळी धंदेवाईक/व्यावयायिक खगोलशास्त्रज्ञ वगैरे नव्हती तर.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

काळाप्रमाणे बदल

हायपेशिया त्या काळच्या शिक्षण-संशोधन-पद्धतीप्रमाणे तत्त्वज्ञ होती. टॉलेमी, सामोसचा अरिस्टार्कस वगैरे मंडळी तत्त्वज्ञान या विषयाच्या लेबलखाली खगोलशास्त्राचा अभ्यास करायची. आणि याच संशोधन-अध्यापनामुळे त्यांच्या घरी चूल पेटत असावी. टायको ब्राहेच्या मृत्युनंतर राजाची वेधशाळा केप्लर सांभाळत असे. त्याच्या बदल्यात त्या दोघांच्याही घरच्या कणग्या भरत असाव्यात.
त्यामुळे या लोकांना आजच्या पद्धतीप्रमाणे व्यावसायिक खगोलाभ्यासक म्हणण्यात अडचण नाही.

विज्ञानाचा इतिहास हा माझ्या अभ्यासाचा विषय नसल्यामुळे ही सर्व एकेकाळी कानावरून गेलेली माहिती आहे. त्यामुळे ही माहिती बिनचूक, पूर्ण् असण्याची खात्री नाही.

सुंदर लेख

लेखमाला वाचतो आहे. लेख नुसतेच वाचनीय नाहीत तर दर्शनीय पण आहेत.

थोड्या थोड्या सुधारणा सुचवितो.

१. केप्लरचा काळ आणि न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला हा काळ यात साधारण ६० वर्षाच्या फरक आहे. केप्लर (१५७१-१६३१) आणि न्यूटन (१६४२-१७२७) यांच्या काळात जन्मा प्रमाणे ७० वर्षाचे तर मृत्युप्रमाणे १०० वर्षांचे अंतर आहे. पण केप्लरने आपली तीन सूत्रे साधारणपणे १६१०-१६२३ सुमारासची असावीत. तर न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा शोध १६६५-१६८० मधे लावला.

२. न्यूटनची अल्केमी ही अंधश्रद्धा गटात मोडू नये असे माझे मत आहे. त्याकाळी मूल द्रव्यांचा शोध लागला नव्हता. त्यामुळे रासायनिक दृष्ट्या झालेले बदल याची पूर्ण माहिती नव्हती. त्याकाळी पंचतत्वांना मूलद्रव्यांप्रमाणे मानत असत. तत्कालिन वैज्ञानिक सिद्धांतानुसार अल्केमी रास्त ठरते. अल्केमीत फक्त सोने बनवण्याची क्रियाच अंतर्भूत नव्हती तर इतरही क्रिया होत्या. हा दुवा पाहिल्यास काही शंकांचे निराकरण होईल.

३. केंद्रोत्सारी बलाच्या संकल्पना तयार होण्यास न्यूटनपेक्षा इतरांचा हातभार जास्त होता. ग्रहांची गती लंबवर्तुळाकार असल्याने केंद्रोत्सारी बलाने ग्रहांची गणिते मांडण्यास मोठी गणितीय अडचण होती. न्यूटनच्या गुरुत्वकर्षण सिद्धांतात आणि गणितीय कौशल्याने ही अडचण सहज संपली.

न्यूटनचे प्रिन्सिपिया हे अतिशय वाचनीय पुस्तक आहे. इतके की टेक्स्टबुकांच्या जोडीला अधिक वाचनासाठी आजही ते जोडता येईल.

प्रमोद

सहमत

न्यूटनची अल्केमी ही अंधश्रद्धा गटात मोडू नये असे माझे मत आहे.
पूर्ण सहमत. कारण याच अल्केमीच्या छंदामुळे आधुनिक रसायनशास्त्राचा जन्म झाला.
लोखंडाचे सोन्यात रूपांतर करण्याच्या या हव्यासाला (अंध)श्रद्धा म्हणावेसे वाटले, म्हणून तसे लिहिले गेले. (चू.भू.दे.घे.)

प्रश्न

चंद्राचे केंद्रोत्सारी बळ = (constant2xmxd)/(xd3)
= (constant2/constant1)xmxd/d3
= (new) constantxm/d2

ही व्युत्पत्ती थोडी समजावून सांगावी ही विनंती. विशेष करून पहिली ओळ. न्यूटनच्याच तीन नियमांशिवाय हे सूत्र मिळालं की त्याने तोपर्यंत ते शोधून काढले होते? तुम्ही आधी दिलेली माहिती पुरेशी वाटत नाही.

जितकी जास्त दोरीची लांबी तितके बळ जास्त. जितके जास्त जोरात फिरवले जाईल तितक्या प्रमाणात वस्तूवर बळाचा परिणाम जास्त.

थोडा छिद्रान्वेष - जितकी जास्त दोरीची लांबी तितके वापरावे लागणारे बळ जास्त.

वस्तू जितक्या जोरात फिरवायची असेल त्याप्रमाणात अधिक बळ वापरावे लागेल.

केंद्रोत्सारी बळ (centrifugal force) = constant2xmxd/ T^2

मात्र यातून काळाच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात बळ का लागेल हे स्पष्ट होत नाही. केप्लरच सूत्र वापरता येण्यासाठी हा कळीचा मुद्दा आहे.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

कट् आणि पेस्ट संस्कृती

1. कट् आणि पेस्ट करण्याच्या घाई गडबडीत चूक झाली आहे.
पहिली ओळ
चंद्राचे केंद्रोत्सारी बळ = (constant2xmxd)/(xd3)
ऐवजी
चंद्राचे केंद्रोत्सारी बळ = (constant2xmxd)/(constant1xd3)
अशी दुरुस्ती हवी. क्षमस्व!
(संपादकांनी कृपया ही दुरुस्ती करावी)

2. अगदी तरूण वयातच न्यूटन यानी अनेक गोष्टींचा शोध लावला होता. गणितातील कॅल्क्युलस, गॅलिलिओच्या शोधाचा मागोवा घेत गतीनियम, प्रकाश किरणाचे पृथक्करण, इ.इ. विषयावर त्यानी मूलभूत मांडणी केली होती. यातील एखादा शोधसुद्धा त्याला वैज्ञानिक म्हणण्यास पुरेसा होता. 1972च्या सुमारास इंग्लंडच्या राजाच्या विनंतीला मान देऊन तो रॉयल सोसायटी ऑफ लंडनचा सदस्य झाला. परंतु या सोसायटीतील रॉबर्ट हूक व इतर काही वैज्ञानिकांच्या टीका-टिप्पणीला वैतागून त्यानी राजिनामा दिला व आपल्या गावी निघून गेला. मरणावस्थेतील आईची त्यानी या काळात सेवा केली. कदाचित याच कालखंडात गुरुत्वबळाविषयी त्यानी विचार करून सूत्ररूपात मांडणी केली असावी.

3. टायको ब्राहेच्या लॅबोरेटरीत काम करताना केप्लरला आकाशस्थ ग्रह तार्‍यांच्या निरीक्षणाचे वेडच लागले होते. ब्राहेप्रमाणे सर्व लहान-मोठ्या गोष्टींचा तो नोंदी ठेवत होता. याच नोंदीवरून केप्लरला सूर्यापासून ग्रह जितके लांब अंतरावर असणार त्याच प्रमाणात त्यांचा प्रदक्षिणा काळ जास्त असणार ही गोष्ट लक्षात आली. त्याचेच सूत्ररूपात त्यानी
T2= constant1 x d3 अशी मांडणी केली.
त्याचाच ऩ्यूटनने आधार घेतला.

(लेखातील शब्दसंख्येच्या मर्यादेमुऴे याविषयी जास्त सविस्तरपणे सांगता आले नाही. शिवाय जास्त लिहिल्यास लेख क्लिष्ट व कंटाळवाणा होण्याची शक्यता होती. म्हणून थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे काही गोष्टी स्पष्ट झाले नसतील हे मला मान्य आहे. परंतु उपक्रम वाचक तज्ञ असल्यामुळे माझ्यासारख्याच्या स्पष्टीकरणाची आवश्यकता नसावी.)

आवडला

लेखाची शैली आणि लेखमालिकेची संकल्पना आवडली. पुढील भाग वाचण्यास उत्सुक.

उपक्रमाने या लेखांची लेखमालिका बनवावी.

 
^ वर