आधुनिक विज्ञानाचे आधारस्तंभ असलेली समीकरणं

समीकरणांचा उल्लेख वाचत असताना गणिताची आठवण येणे स्वाभाविक आहे. गणिताविषयी ज्या काही कडू आठवणी (काहींच्या) मनात असतील त्यांनी (व गोड आठवणी असतील त्यांनीसुद्धा! ) काही काळ त्यांना बाजूला सारून विचार करू लागल्यास गणितातील समीकरणांना साहित्य-प्रकारातील काव्यसदृश दर्जा आहे हे लक्षात येईल. जे काही विधान करायचे आहे ते स्पष्टपणे, थोडक्यात आणि त्यातूनच भरपूर काही सांगण्यासाठी विज्ञानाच्या क्षेत्रात गणितीय समीकरणांचा फार मोठा योगदान आहे. ज्याप्रकारे (चांगल्या!) कविता आपल्या अंतर्मनाशी हितगुज करतात त्याच प्रकारे समीकरणंसुद्धा आपल्या अंतर्मनात शिरून वेगळ्या प्रकारचे विश्व डोळ्यासमोर उभे करण्याचे प्रयत्न करतात. फक्त त्यासाठी त्या त्या विषयाची किमान तोंडओळख हवी.

आपल्यातील बहुतेकांना गणितीय पद्धतीवर ठाम विश्वास आहे. कारण जगभरातील वैज्ञानिक, अभियंते, तंत्रज्ञ अणुरेणूंच्या रचनेपासून अवकाशयानासारख्या गुंतागुंतीच्या रचनेपर्यंतच्या प्रत्येक टप्प्या टप्प्यात गणितीय समीकरणांचा वापर करून मानवाला उपयोगी पडू शकणार्‍या सोई सुविधा उपलब्ध करून दिल्या व त्यांच्या सुरक्षिततेची हमी घेतली. आपल्या दैनंदिन जीवनोपयोगी तंत्रज्ञान सुविधांच्या बिनधोक वापरात समीकरणांचा फार मोठा हात आहे. गॅलिलिओच्या मते गणित ही विज्ञानाची भाषा असून त्याचे व्याकरण विज्ञान प्रयोगातील बारीक सारीक गोष्टी लक्षात आणून देते व काही वेळा एखाद्या अद्भुत कल्पनेला जन्मही देते. आइन्स्टाइनला गणित हा विषय केवळ मानवी बुद्धीचा आविष्कार असूनसुद्धा व त्याला कुठलीही पूर्वानुभवाची बैठक नसतानासुद्धा भौतिक घडामोडींचा कसा काय अर्थ लावू शकते याचे आश्चर्य वाटत होते. म्हणूनच अनेक वेळा गणित हे invention आहे की discovery हा प्रश्न वैज्ञानिक व तत्वज्ञांना नेहमी सतावत असतो. गणित हे फक्त साधन की साध्य हा ही एक अवघड प्रश्न ठरतो. काही का असेना गणिताने आपले जीवन सुखकर केले, अनेक सोई - सुविधा उपलब्ध करून दिल्या, जीवनात समृद्धी आणून दिली हे मान्य करायला हवे. एके काळी गूढ, चमत्कृतीपूर्ण वाटणार्‍या गोष्टींचा उलगडा केला.

विज्ञानातील प्रगतीच्या कालखंडाची ढोबळपणे विभागणी केल्यास तर्क (reason), उद्बोधन (enlightenment), तात्विकवाद (ideology) आणि विश्लेषण (analysis) असे चार भाग पाडता येतील. या कालखंडांची परिणती वैज्ञानिक क्रांतीत झाली असे म्हणण्यास भरपूर वाव आहे. ही साधनं वापरून पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू (व ईथर) याभोवती बराच काळ घुटमळत असलेल्या चमत्कार सदृश विज्ञानाला बाहेर काढणे शक्य झाले; हे करत असताना सर्वशक्तीमान, सर्वांतर्यामी, श्रृष्टीकर्ता परमेश्वराची हकालपट्टी झाली; विज्ञानाने तथाकथित भविष्यवेध घेणार्‍या फलजोतिष 'शास्त्रा'ला कायमचे हाकलून दिले; विज्ञानातून तंत्रज्ञान विकसित होत त्यातून अर्थप्राप्ती होऊ शकते याची जाण आली व जन्म-मृत्यु, अवकाश - काळ या अद्भुत वलयात अडकून पडलेल्या मानव वंशाची सुटका झाली. अत्यंत गहन अशा जटिल, गुंतागुंतीच्या संकल्पनांची सुटसुटीत, साधे व सरळ व काही मोजकी इंग्रजी मूळाक्षरं व गणितीय संज्ञा वापरून समीकरणांची मांडणी करणार्‍यात अमोघ बुद्धीमत्ता होती, बौद्धिक परिश्रम करण्याची जिद्द होती. एवढेच नव्हे तर साहित्यक्षेत्रातील कवीप्रमाणे काही मोजके शब्द व संज्ञातून संशोधनाचे निष्कर्ष मांडण्याची कला त्यांना अवगत झाली होती.

विज्ञानाची जननीच गणित असल्यामुळे आपण उपभोगत असलेल्या आधुनिक जगातील सर्व सोई-सुविधांच्या तंत्रज्ञानासाठी गणितीय आधार आहे. या तंत्रज्ञानातील बहुतेक गोष्टींची मांडणी काही सूत्र वा समीकरणाद्वारेच केली आहे. अंधारयुगातील जगाला आधुनिकतेकडे पोचवणार्‍या विज्ञान व तंत्रज्ञानांच्या मुळाशी असलेल्या समीकरणांपैकी काही निवडक समीकरणं व या समीकरणांच्या संशोधकाविषयी माहिती करून घेण्याचा अल्पसा प्रयत्न यानंतरच्या काही लेखामधून करण्यात येणार आहे. या लेखनात गणितीय विधानांचा फार कमी प्रमाणात वापर केला असून समीकरणांचा उगम व त्यातून घडत गेलेल्या वैज्ञानिक क्रांतीविषयी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. जरी ही समीकरणं अमूर्त, अनाकलनीय, वा गुंतागुंतीचे असे वरवरून वाटत असले तरी त्यांच्याबद्दलची इतर माहिती वाचल्यानंतर या विषयीचे आपले मत नक्की बदलेल असे वाटते.

या लेखमालेतील पहिला लेख आयझ्याक न्यूटनच्या गुरुत्वबलाविषयी असून त्याच्या या संशोधनामुळे आपण मानवाला चंद्रावर पाठवू शकलो असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.

....क्रमश:

Comments

उत्तम सुरूवात

पुढच्या भागांची वाट पहात आहे. सूत्रांचं चित्र आवडलं.

सहमत

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
अदिती यांच्या प्रतिसादाशी सहमत.प्रस्तावनेचा लेख फारच छान जमला आहे.

हे करत असताना सर्वशक्तीमान, सर्वांतर्यामी, सृष्टीकर्त्या परमेश्वराची हकालपट्टी झाली; तथाकथित भविष्यवेध घेणार्‍या फलज्योतिष 'शास्त्रा'ला विज्ञानाने कायमचे हाकलून दिले; विज्ञानातून तंत्रज्ञान विकसित होत त्यातून अर्थप्राप्ती होऊ शकते याची जाण आली

...विज्ञानाने तथाकथित फलज्योतिषशास्त्राची ज्ञानक्षेत्रातून कायमची हकालपट्टी केली हे खरे. पण श्रद्धाळू जनांच्या मनात ते अजूनही रुतून बसले आहे. कालान्तराने ही अंधश्रद्धाही दूर होईलच.
लेखमालेतील पुढील लेखाच्या प्रतीक्षेत.

छान.

लेख वाचतो आहे, निदान ह्यामुळेतरी मला गणितात रुची वाटेल अशी अपेक्षा करतो.

अरे वा

अरे वा! वाट पाहतोय पुढील भागाची!

ऋषिकेश
------------------
'नाविन्य' हे एकाच व्यक्तीने वेगवेगळ्या आयडीने लिहुन कसे बरे तयार व्हावे?
नुसते नावात गोड पदार्थ घालुन तसे लिहिता थोडेच येते?

काव्य

कवीप्रमाणे काही मोजके शब्द व संज्ञातून संशोधनाचे निष्कर्ष मांडण्याची कला

हे खूपच आवडलं. 'या चंद्राशी त्या चंद्राचे कसले नाते' म्हणणार्‍यांनी एकच चंद्र पुन्हा पुन्हा पाहून दुसर्‍याला झिडकारलं असं वाटतं. त्यांचाच तोटा म्हणायचा. समीकरणांतलं काव्य लेखमालेतून दृग्गोचर होईल अशी आशा आहे.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

छान !

लेख मस्त जमला आहे. धन्यवाद.

मागे कुठेतरी वाचल्याचं आठवतय - गणित हे "वि़ज्ञान" आहे कि "विचारधारा" आहे हे अजून ठाम पणे सांगता येत नाही.
---------------------
-धनंजय कुलकर्णी

 
^ वर