कथा पादत्राणांची: एकमेव भाग!

महाराष्ट्राच्या नव्या पादत्राण संस्कृतीविषयीची माहिती देणारा हा लेख तुम्हाला येथेही वाचता येईल

सांप्रत महाराष्ट्रदेशी पादत्राणांचे महत्त्व फार आहे. हे आम्ही (दुसरं कोण!) अर्थातच जाणून आहोत. थोर वगैरे होऊन गेलेल्या विभूतींच्या पादुकांसाठी प्रसिद्ध असलेल्या शेगाव, अक्कलकोट, शिर्डी यांच्याबरोबरच सामान्य माणसांच्या चपलांसाठीही प्रसिद्ध असणारी गावे म्हणजे कोल्हापुरी चपलांचे कोल्हापूर आणि पुणेरी जोडा मिळणारे आमचे पुणे!

थोर माणसांच्या विचारांप्रमाणेच त्यांच्या चपलांनाही इतके महत्त्व देणारा दुसरा प्रदेश विरळा. चपलांना मान देण्याची ही थोर परंपरा थेट मर्यादापुरुषोत्तम श्रीरामापासोन आमच्यापर्यंत चालत आली आहे. त्याने नाही का भरताला आपल्या चपला देऊन त्याच्यावर वॉच ठेवायला सांगितले होते? त्यावेळी चपलांना पादुका म्हणत. आता फ्लोटर म्हणतात इतकाच काय तो फरक.

पण ही बातमी वाचली आणि आम्ही निपचित पडून थोडा वेळ थेट सुषुम्नावस्थेत गेलो! आता चपलांसाठी प्रसिद्ध असलेल्या गावांमध्ये आमच्या पुण्याबरोबर चपलांमुळे प्रसिद्ध झालेल्या आपल्या मुख्यमंत्र्यांच्या लातूरचेही नाव घ्यावे लागेल. (येथे लातूर हे गाव चपलांमुळे प्रसिद्ध आहे असे वाचावे... मुख्यमंत्री नाहीत!)

मज पामरासी काय थोरपण
पायीची वहाण पायी बरी

असे ज्ञानोबा महाराज सांगून गेले आहेत. या वाक्यामधून त्यांची दूरदूष्टीच दिसत नाही का? पुढे मागे पायीच्या वहाणांना इतुके महत्त्व येईल हे त्यांना आधीच माहीत असावे. (त्यांच्याही पादुका आळंदी येथे पहावयास मिळतील!) असो.

तर आपल्या महाराजांच्या लातूर गावी प्रियांकादेवी चोप्रा (एकदम चाबूक हो!) ह्यांचे दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या भाविकांनी हर्षभराने चपला उडवून आपला आनंद व्यक्त केला. इतके दिवस लग्नामध्ये अक्षता, मिरवणुकीत गुलाल, तमाशात फेटे, खंडोबासमोर खोबरं, मंदिरात फुलं (आणि बारमध्ये नोटा!) उधळण्याची आपली परंपरा होती. त्यात हिरॉईनसमोर चपला उधळण्याचा समावेश झाल्याने आता ती अधिकच समृद्ध झाली आहे.

सादर आहे एक छोटासा काल्पनिक प्रसंग

महाराज: कोण आहे रे तिकडे?

प्रधानजी: मी आहे महाराज.

महाराज: तू महाराज? मग मी कोण?

प्रधानजी: तुम्ही महाराज. मी "आहे" असं म्हटलं.

महाराज: बरं बरं. (हातातला पेपर नाचवत) हे काय आहे?

प्रधानजी: पेपर महाराज.

महाराज: ते कळतंय मला. (पेपरातल्या बातमीकडे बोट दाखवून) हे काय आहे?

प्रधानजी: बातमी महाराज.

महाराज: उगीच पीजे मारु नका. सारखे सारखे फालतू विनोद करायला तुम्ही स्वत:ला योगेश समजता की राफा?

प्रधानजी: सॉरी महाराज, पण काय झालं?

महाराज: वर आम्हालाच तोंड करुन विचारता काय झालं? राज्यात काय चाललंय याची काही खबर ठेवता की नाही? इथे भर गावात एका सुंदर तरुणीवर चपलांचा मारा होतो आणि तुम्हाला काही खबर लागत नाही म्हणजे काय? उद्या आमच्या प्रचारासाठी कोणती हिरॉईन येईल?

प्रधानजी: महाराज, खरं म्हणजे कार्यकर्त्यांचं चुकलंच, प्रत्येक वेळेला सार्वजनिक कार्यक्रम म्हटला की राखी सावंतला बोलवायची रीत आहे आपली. खरं तर तिला बोलवायला पाहिजे होतं.

महाराज: आता झालं ते झालं. याच्यावर उपाय आहे का तुमच्याकडं? की एक एसमेस पाठवून उत्तर द्या अशी स्पर्धा जाहीर करायची आपल्या जनतेसाठी?

प्रधानजी: नाही महाराज. त्याची काही गरज नाही. येक उपाय आहे. इथून पुढच्या सगळ्या सभा आणि समारंभ प्रायोजित करण्यासाठी नायके, आदिदास, बाटा, पॅरेगॉन यांना विनंती करायची. कसं?

महाराज: वा प्रधानजी.

(चित्र सौजन्य: ई सकाळ डॉट कॉम)

Comments

मजेशीर !

मजेशीर लेख !

-कृपया खिडकीतून पत्रं टाकू नयेत.आमटीत पडतात.चव बिघडते.

 
^ वर