या शब्दाचा अर्थ तरी काय? (भाग १/३)

(येथे न्याय-दर्शनातील "पदाचा अर्थ" चर्चा आपण बघणार आहोत.)

प्रास्ताविक :

प्रौढांच्या रोजच्या व्यवहारात हा प्रश्न क्वचितच येतो - "या शब्दाचा अर्थ काय आहे, या संदर्भात अर्थ काय आहे?" मात्र लहान मुलांशी बोलताना किंवा आपल्या लहानपणची आठवण आली म्हणजे लक्षात येते - हा प्रश्न बर्‍याच वेळा पडत असावा.

एक अनुभव आठवतो - माझा भाचा त्याच्या बाळपणी मासिकातल्या चित्राकडे बोट दाखवून म्हणत असे "ताई". शब्दाचा अर्थ म्हणजे कुठलीतरी आकृती हे तो शिकलेला होता. म्हणजे लांब केस, थोडासा गोलाकार चेहरा, अशी काही आकृती. आजकाल तसे म्हणत नाही. आपल्यासारखाच "बाई" किंवा असे काहीसे म्हणतो. "ताई" म्हणजे "मोठी बहीण" असा संदर्भ असतो असे तो कळत-नकळत शिकला. पण तरी "आकृती" हे पूर्णपणे चूकही नाही. कदाचित "बाई"साठी त्याच्या मनात - आणि माझ्या मनात - कुठलीशी आकृती बिंबलेली असावी.

आणखी एक खेळ दुसर्‍या एका भाच्याच्या बाळपणी खेळल्याचे आठवते. मी बहिणीला मिठी मारून म्हणायचे "ताई माऽऽझी..." मग भाचा म्हणणार "ती ताई नाही, आई आहे. आई माऽऽझी...". मग पुढे त्याला कोणीतरी चिडवाचिडवीतून मार्ग शिकवला "ताई असेल तुझी, आई माऽऽझी...". पुढे जेव्हा तो म्हणू लागला "तुझी आई म्हणजे आज्जीऽऽ" तेव्हा या चिडवाचिडवीच्या खेळासाठी तो मोठा झालेला होता!

म्हणजे हळूहळू बाळ शिकते की "आई" ही एक विशेष व्यक्ती असू शकते, त्या एकाच व्यक्तीला मिठी मारून तो म्हणतो "आई माझी". किंवा "आई" म्हणजे "आईची *जाति" असा सामान्य गुण असू शकतो. तो वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये सापडतो.
*"आईची जात मोठी सोशीक" अशा प्रकारच्या वाक्यातला "जात" शब्द येथे वापरायचा होता. रोटी-बेटीव्यवहारातला "जात" शब्द अभिप्रेत नाही, पण तो गोंधळ होऊ नये, म्हणून संस्कृतातील "जाति" शब्द वापरलेला आहे.

अशा प्रकारचे संदर्भ वडीलधार्‍यांशी, गुरुजनांशी, मित्रांशी भरपूर आले, तर संदर्भानुसार शब्दाचा अर्थ मनात कळून येतो. मात्र संदर्भ रोजव्यवहारात नसले, किंवा आपल्या बालपणात आपण शिकलेले संदर्भ आणि दुसर्‍या कोणी शिकलेले संदर्भ वेगळे असले, तेव्हा गडबड होते. कित्येक वादविवादांत आपल्याला लक्षात येते, की विवादक शब्द अगदी वेगवेगळ्या अर्थांनी वापरत आहेत.

पण मग अर्थ संदर्भानुसार अगदी वाटेल तो होऊ शकतो काय? खराखुरा संवाद, म्हणजे एकमेकांपाशी अर्थ पोचवणे जमणारच नाही काय? तर असे नाही. आधी असहमती असूनसुद्धा पुष्कळदा संवाद होऊ शकतो. शब्दाला काही अर्थ असतो असे आपल्याला जाणवते. रोजव्यवहारात खूपदा संदर्भ जुळतात, संवाद धडून येतात. तरी "शब्दाचा अर्थ असतो तरी काय?" या प्रश्नाकडे दुर्लक्ष करता येत नाही. हा प्रश्न नुसता तर्कटच असता, अगदी व्यर्थ असता, तर विसंवाद कधीच घडले नसते. विसंवादाकडून संवादाकडे जाण्यासाठी या प्रश्नाचे बाळपणी ठसलेले "कळत-नकळत" उत्तर पुरेसे नसते. कळून-समजून उत्तर शोधावे लागते.

१५००-२००० वर्षांपूर्वीच्या गौतमाच्या न्यायसूत्रांत याविषयी बिंदुगामी चर्चा सापडते. अर्थातच त्यात दिलेले उत्तर "शेवटचे उत्तर" नाही. अन्य काही प्राचीन दर्शनांना (उदाहरणार्थ मीमांसा-दर्शनाला) हे उत्तर पटत नाही. आपल्यालाही कदाचित पटणार नाही. पण उगाच दुर्लक्ष करण्यापेक्षा या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी काही संकेत तरी मिळेल. म्हणून येथे गौतमाच्या न्यायसूत्रातील तो भाग, आणि त्यावरील वात्स्यायनाची टीका देत आहे.

चर्चा सुरू होण्यापूर्वी वात्स्यायन अशी भूमिका तयार करतो :
पदेन अर्थसम्प्रत्यय इति प्रयोजनम् । नामपदं चाधिकृत्य परीक्षा गौरिति पदं खल्विदमुदाहरणम् ।
(वाक्यातील शब्दांनी=) पदांनी अर्थ कळून येतो, हे (या चर्चेचे) प्रयोजन आहे. नाम-शब्दांबद्दल संदर्भ आहे, त्याचे परीक्षण करण्यासाठी "गाय" हे उदाहरण (घेऊया).

- - - -
येथे पाठ्य महामहोपाध्याय गंगाधरशास्त्री तेलंग यांनी शोधित प्रतीमधून घेतलेले आहेत. (संदर्भ : Vizianagram Sanskrit Series. No. 11, The Nyayasutras with Vatsyayana's bhashya, Edited by Mahamahopadhyaya Gangadhara Sastri Tailanga, Publisher: E J Lazarus & Co., Benaras, 1896) या पुस्तकाची स्कॅन-प्रत संस्कृतडॉक्युमेन्ट्स् डॉट ऑर्ग् संकेतस्थळाचे चालक श्री. नंदू अभ्यंकर यांनी मला पाठवली, त्यांचा मी आभारी आहे. हे पुस्तक डीएलआय संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
याच्या आदली सूत्रे आणि त्यामुळे सूत्र-क्रमांक यांच्यात पाठभेद आहेत असे दिसते. वरील पुस्तकात सूत्र क्रमांक अध्याय २, आह्निक २ मध्ये ही सूत्रे ५५-६६ अशी आहेत, ती मृणालकांती गंगोपाध्याय यांच्या इंग्रजी अनुवादात ५८-६९ अशी आहेत. प्रकाशक : इन्डियन स्टडीज, कोलकाता, प्रकाशनवर्ष - १९८२)

Comments

शुद्धिपत्र आणि अन्य भागांचे दुवे

(या प्रतिसादास उपप्रतिसाद देऊ नये. टंकनदोष खरडवहीत द्यावे. या प्रतिसादात शुद्ध रूपे देण्यात येतील.)

भाग १ : प्रस्तावना
भाग २ : शब्दाचा अर्थ म्हणजे फक्त "व्यक्ती" असतो का? साधक-बाधक चर्चा
भाग ३: शब्दाचा अर्थ म्हणजे फक्त "आकृती" किंवा फक्त "जाती" असतो का? साधक-बाधक चर्चा

महाभाष्यातील उल्लेख

"आकृती/व्यक्ती/जाती यांच्यातील फरक काय" ही चर्चा १५००-२००० वर्षांपेक्षाही जुनी असावी. गौतम-सूत्रांपैकी पुष्कळ भाग २२०० वर्षांपेक्षाही जुना असावा.

पतंजलीच्या व्याकरणमहाभाष्यात "व्याकरणासाठी शब्द म्हणजे काय?" ही चर्चा येते. त्यातही "द्रव्य/आकृती" या शक्यता पडताळून बघितलेल्या आहेत, आणि "गो = गाय किंवा बैल" हेच उदाहरण घेतलेले आहे. तिथे "व्याकरणापुरता अर्थपूर्ण ध्वनी-शब्द" असा निष्कर्ष व्याकरणासाठी योग्यच आहे.

गौतम आणि पतंजली यां दोहोंनी निवडलेले एकच उदाहरण आणि चर्चेचे कमालीचे समांतर स्वरूप बघून असे वाटते, की
(१) गौतमाची सूत्रे पतंजलीने अभ्यासली असतील (पण तो थेट उल्लेख कधीच करत नाही) किंवा
(२) गौतमाने जी विचारधारा सांगितलेली आहे, त्याची परंपरा बरीच जुनी असून गौतमाची नव्हे तर पारंपरिक म्हणून पतंजलीला ती चांगली ठाऊक असेल.

 
^ वर