या शब्दाचा अर्थ तरी काय? (भाग २/३)

शब्दाचा अर्थ म्हणजे फक्त "व्यक्ती" असतो का? साधक-बाधक चर्चा
- - - -

चर्चा सुरू होण्यापूर्वी वात्स्यायन अशी भूमिका तयार करतो (सूत्र क्र. २.२.५५च्या भाष्याच्या शेवटी) :
पदेन अर्थसम्प्रत्यय इति प्रयोजनम् । नामपदं चाधिकृत्य परीक्षा गौरिति पदं खल्विदमुदाहरणम् ।
(वाक्यातील शब्दांनी=) पदांनी अर्थ कळून येतो, हे (या चर्चेचे) प्रयोजन आहे. नाम-शब्दांबद्दल संदर्भ आहे, त्याचे परीक्षण करण्यासाठी "गाय" हे उदाहरण (घेऊया).

गौ.सू. २.२.५६ : तदर्थे व्यक्त्याकृतिजातिसन्निधावुपचारात्संशयः ।
(तद्-अर्थे व्यक्ति-आकृति-जाति-सन्निधौ उपचारात् संशयः ।)

त्या अर्थी व्यवहारातील उपयोगात व्यक्ती-आकृती-जाती यांची जोड असते, म्हणून (चर्चा करण्यालायक) संशय आहे.
भाष्य : अविनाभाववृत्ति: सन्निधि: । अविनाभावेन वर्तमानासु व्यक्त्याकृतिजातिषु गौरिति प्रयुज्यते तत्र न ज्ञायते किमन्यतमः पदार्थ उत सर्व इति शब्दस्य प्रयोगसामर्थ्यात् पदावधारणं तस्मात् ।
संनिधी म्हणजे त्याविना-अस्तित्व-नाही-अशी-वृत्ती. व्यक्ती, जाति, किंवा आकृती, यांच्याशिवाय अस्तित्वच नाही (अशा एका-एका संदर्भाचा) अर्थ म्हणून शब्दाचा प्रयोग केला जातो. मग शब्दप्रयोगाच्या बळावर कळत नाही, की त्यांच्यापैकी दोन सोडून एकच कुठला अर्थ आहे, की सर्वच अर्थ आहेत.

(पूर्वपक्ष) गौ.सू. २.२.५७ : याशब्दसमूहत्यागपरिग्रहसंख्यावृद्ध्यपचयवर्णसमासानुबन्धानां व्यक्तावुपचाराद्व्यक्ति: ।
('या'शब्द-समूह-त्याग-परिग्रह-संख्या-वृद्धि-अपचय-वर्ण-समास-अनुबन्धानां व्यक्तौ उपचाराद् व्यक्ति: ।)

"जो/जी/जे"-शब्दाने निर्देश, समूह, देणे, घेणे, संख्या, वाढ, घटणे, रंग, समासांत उपयोग होणे, प्रजनन शब्दाचे हे सर्व उपयोग व्यक्तीलाच लागू असल्यामुळे शब्दाचा अर्थ व्यक्ती आहे.
भाष्य : व्यक्ति: पदार्थः । कस्माद्? 'या'शब्दप्रभृतीनां व्यक्तावुपचारात् । उपचारः प्रयोगः । "या गौस्तिष्ठति" "या गौर्निषण्णेति" नेदं वाक्यं जातेरभिधायकमभेदात् । भेदात्तु द्रव्याभिधायकम् । "चैत्राय गां ददातीति" द्रव्यस्य त्यागो, न जातेरमूर्तत्वात् प्रतिक्रमानुक्रमानुपपत्तेश्च । परिग्रहः स्वत्वेनाभिसम्बन्धः "कौण्डिन्यस्य गौर्ब्राह्मणस्य गौरिति" द्रव्याभिधाने द्रव्यभेदात् सम्बन्धभेद इति उपपन्नम् । अभिन्ना तु जातिरिति । संख्या दश गावो विंशतिर्गाव इति भिन्नं द्रव्यं संख्यायते न जातिरभेदादिति । वृद्धि: कारणवतो द्रव्यस्यावयवोपचयः , "अवर्धत गौरैति" निरवयवा तु जातिरिति । एतेनापचयो व्याख्यातः । वर्णः - "शुक्ला गौ:" "कपिला गौरिति" । द्रव्यस्य गुणयोगो, न सामान्यस्य । समासः "गोहितं गोसुखमिति" द्रव्यस्य सुखादियोगे न जातेरिति । अनुबन्धः सरूपप्रजननसन्तानो "गौर्गां जनयतीति" तदुत्पत्तिधर्मत्वाद् द्रव्ये युक्तं न जातौ विपर्ययादिति । द्रव्यं व्यक्तिरिति हि नार्थान्तरम् । अस्य प्रतिषेधः ।
(पूर्वपक्ष) शब्दाचा अर्थ म्हणजे व्यक्ती. कसे काय? "जो/जी/जे" शब्दाच्या वापरामुळे. "जी गाय उभी आहे", "जी गाय बसलेली आहे" हे वाक्य गाय-जातीबद्दल नव्हे : गाय जात अभेद असल्यामुळे. (वाक्यात) भेद आहे, तो वेगवेगळ्या द्रव्याबद्दल (विवक्षित पिंडाबद्दल) आहे. "चैत्राला गाय देतो" इथे द्रव्याचा त्याग आहे, जातीचा त्याग नाही. जातीला (मालकीचा) क्रम उद्भवत नाही. परिग्रह म्हणजे मालकीचा संबंध जोडणे. "कौंडिन्याची गाय, ब्राह्मणाची गाय" इथे वेगवेगळी द्रव्ये आहेत म्हणून वेगवेगळे मालकीसंबंध आहेत, असे होऊ शकते. "वाढ" म्हणजे कुठल्या कारणामुळे द्रव्याची रास साचून अधिक होणे. "गाय वाढली" म्हणतात. जातीला राशी नसते. याच प्रकारे "घटणे"ची व्याख्या होते. वर्ण : "पांढरी गाय", "तांबुस गाय" - रंग-गुणाचा योग द्रव्याशी होतो, सामान्य असलेल्या जातीशी नव्हे. समास : "गोहित, गोसुख" म्हणजे गाईचे हित, गायीचे सुख, हे विवक्षित द्रव्याचे असते, जातीचे नव्हे. सरूपाचे प्रजनन "गाय गायीला जन्म देते" इथे जे उत्पन्न होते ते द्रव्य असते, जाती नव्हे - जातीची (पिढ्यांमध्ये) अदलाबदल होत नाही. द्रव्य म्हणजे व्यक्ती वेगळे काही नव्हे. (पुढील सूत्रात पूर्वपक्षाचे) खंडन होते.

गौ.सू. २.२.५८ : न तदनवस्थानात् ।
(न तद् अनवस्थानात् ।)

तसे नव्हे, अनवस्थानामुळे.
भाष्य : न व्यक्ति: पदार्थः कस्मादनवस्थानात् । 'या'शब्दप्रभृतिभिर्यो विशेष्यते स गोशब्दार्थो "या गोस्तिष्ठति" "या गोर्निषण्णेति" न द्रव्यमात्रमविशिष्टं जात्या विनाऽभिधीयते । किं तर्हि जातिविशिष्टम् । तस्मान्न व्यक्ति: पदार्थः । एवं समूहादिषु द्रष्टव्यम् । यदि न व्यक्ति: पदार्थः कथं तर्हि व्यक्तावुपचार इति निमित्तादतद्भावेपि तदुपचारो दृश्यते खलु ।
व्यक्ति म्हणजे शब्दाचा अथ नव्हे. कसे काय? निश्चित अर्थ होत नसल्यामुळे. "जी गाय उभी आहे", "जी गाय बसलेली आहे" वगैरे वाक्यांत "जी" शब्द ज्या "गो"शब्दाचे विशेषण आहे, तो "गाय"शब्द जाती-नसलेल्या द्रव्याबद्दल नाही. मग काय आहे? जाती-हे-वैशिष्ट्य असलेल्या द्रव्याबद्दल आहे. म्हणून शब्दाचा अर्थ व्यक्ती नव्हे. "समूह" वगैरे मुद्द्यांबद्दल याच प्रकारे बघावे. व्यक्ती म्हणजे शब्दाचा अर्थ नसेल, तर व्यक्ती म्हणून उपयोग कसा काय होतो? काही निमित्तांमुळे (तसा अर्थ नसूनही) उपयोग होऊ शकतो, असे दिसते खरे. (ते पुढील सूत्रात सांगितलेले आहे.)

गौ.सू. २.२.५८ : सहचरणस्थानतादर्थ्यवृत्तमानधारणसामीप्ययोगसाधनाधिपत्येभ्यो ब्राह्मणमञ्चककटराजसक्तुशाटकान्नपुरुषेष्वतद्भावेऽपि तदुपचारः ।
(सहचरण-स्थान-तादर्थ्य-वृत्त-मान-धारण-सामीप्य-योग-साधन-आधिपत्येभ्यो ब्राह्मण-मञ्चक-कट-राज-सक्तु-शाटक-अन्न-पुरुषेषु अतद्भावे अपि तद्-उपचारः ।)

(तसा अर्थ नसूनही तसा वापर करण्याच्या निमित्तांची यादी आणि उदाहरणे दिलेली आहेत.)
भाष्य : अतद्भावेऽपि तदुपचार इत्येतच्छब्दस्य तेन शब्देनाभिधान इति । सहचरणाद् - "यष्टिकां भोजये"ति यष्टिकासहचरितो ब्राह्मणोऽभिधीयत इति । स्थानाद् - "मञ्चा: क्रोशन्ती"ति मञ्चस्था पुरुषा अभिधीयन्ते । तादर्थ्यात् - कटार्थेषु वीरणेषु व्यूह्यमानेषु "कटं करोती"ति भवति । वृत्ताद् - "यमो राजा" "कुबेरो राजे"ति तद्वद्वर्तते इति । मानाद् - आढके निमिता: सक्तवः "आढकसक्तव" इति । धारणात् - तुलायां धृतं चन्दनं "तुलाचन्दनमि"ति । सामीप्याद् - "गङ्गायां गावश्चरन्ती"ति देशोऽभिधीयते सन्निकृष्टः । योगात् - कृष्णेन रागेण युक्तः शाटकः "कृष्ण" इत्यभिधीयते । साधनाद् - "अन्नं प्राणा" इति । अधिपत्याद् - "अयं पुरुषः कुलम् अयं गोत्रमि"ति । तत्रायं सहचरणाद्योगाद्वा जातिशब्दो व्यक्तौ प्रयुज्यत इति । यदि गौरित्यस्य पदस्य न व्यक्तिरर्थोऽस्तु तर्हि ।
तसा अर्थ नसूनही तसा उपयोग होतो, त्या वेगळ्या अर्थाबद्दल तो शब्द वापरला जातो. सहचरणामुळे - "दंडाला जेवण घाल" म्हणजे "दंडाबरोबरच्या ब्राह्मणाला जेवायला घाल" याबद्दल असते. (आजकालच्या प्रसंगातले उदाहरण : "दुकानातून सामान आले आहे - त्यांना पैसे द्या" म्हणजे "सामानाबरोबर आलेल्या माणसाला पैसे द्या.") स्थानामुळे - "मंच रडतो आहे" म्हणजे "मंचावर बसलेले लोक रडत आहेत". त्यासाठी - चटईसाठी गवताच्या पाती विणत असताना "चटई विणतो" असे म्हणतात. वर्तनामुळे "राजा यम आहे" किंवा "राजा कुबेर आहे" म्हणजे राजा तसे वागतो. मोजमापामुळे - आढक-म्हणून (आदमासे साडेतीन किलो) मोजलेले सातूचे धान्य, त्याचा "एक आढक सातू" असा उल्लेख होतो. धारण केल्यामुळे - तराजूत धारण केलेल्या चंदनाला "तुलाचंदन" म्हणतात. सामीप्यामुळे - "गायी गंगेवर चालत जात आहेत" म्हणजे गंगेजवळच्या जमिनीवर चालत जात असतात, त्याचा उल्लेख होत असतो. जोडल्यामुळे - फडक्याला काळा रंग दिला त्या फडक्याला "काळे" म्हणतात. (मराठीसाठी योग्य उदाहरण : चेहर्‍याला काळी भुकटी फासली, तर म्हणतात "चेहर्‍याला काळे फासले.") साधन असल्यामुळे - "अन्न हेच प्राण" म्हणतात. अधिपत्यामुळे - "हा पुरुष म्हणजे त्याचे कुळ" "हा पुरुष म्हणजे त्याचे गोत्र आहे." (फ्रेंच राजा चौदावा लुई म्हणाला "राज्य म्हणजे मीच" त्याची आठवण व्हावी.) वरील यादीतल्या "सहचरण, जोडणी" वगैरे निमित्तांनी जातिवाचक शब्द व्यक्तीच्या संदर्भात वापरला जातो. जर "गाय" शब्दाचा अर्थ व्यक्ती नसला, तर नसो. तरीपण...
- - -
(क्रमशः पुढील सूत्रात आणखी एक पूर्वपक्ष सांगितला जाईल.)

Comments

शुद्धिपत्र आणि अन्य भागांचे दुवे

(या प्रतिसादास उपप्रतिसाद देऊ नये. टंकनदोष खरडवहीत द्यावे. या प्रतिसादात शुद्ध रूपे देण्यात येतील.)

भाग १ : प्रस्तावना
भाग २ : शब्दाचा अर्थ म्हणजे फक्त "व्यक्ती" असतो का? साधक-बाधक चर्चा
भाग ३: शब्दाचा अर्थ म्हणजे फक्त "आकृती" किंवा फक्त "जाती" असतो का? साधक-बाधक चर्चा

 
^ वर