या शब्दाचा अर्थ तरी काय? (भाग ३/३)

शब्दाचा अर्थ म्हणजे फक्त "आकृती" किंवा फक्त "जाती" असतो का? साधक-बाधक चर्चा
- - -

(मागच्या भागात पूर्वपक्ष होता - "शब्दाचा अर्थ म्हणजे व्यक्ती" तो खोडून काढला, येथे वेगळा पूर्वपक्ष देणार आहोत.)

गौ. सू २.२.६० : आकृतिस्तदपेक्षत्वात् सत्वव्यवस्थानसिद्धे: ।
(आकृति: तद्-अपेक्षत्वात् सत्व-व्यवस्थान-सिद्धे: ।)

(शब्दाचा अर्थ म्हणजे) आकृती. वस्तू काय आहे , त्याचे निश्चित ज्ञान होण्यासाठी आकृतीची अपेक्षा असते, म्हणून.
भाष्य : आकृति: पदार्थः : कस्मात्? तदपेक्षत्वात् सत्त्वव्यवस्थानसिद्धे: । सत्त्वावयवानां तदवयवानां च नियतो व्यूह आकृति: तस्यां गृह्यमाणायां सत्त्वव्यवस्थानं सिध्यति अयं गौरयमश्व इति नागृह्यमाणायाम् । यस्य ग्रहणात् सत्त्वव्यवस्थानं सिध्यति तं शब्दोऽभिधातुमर्हति सोऽस्यार्थ इति । नैतदुपप्द्यते यस्य जात्या योगस्तदत्र जातिविशिष्टमभिधीयते गौरिति । न चावयवव्यूहस्य जात्या योगः, कस्य तर्हि? नियतावयवस्य व्यूहस्य द्रव्यस्य । तस्मान्नाकृति: पदार्थः । अस्तु तर्हि जाति: पदार्थः ।
शब्दाचा अर्थ म्हणजे आकृती, ते कसे काय? काही आहे, ते निश्चित ज्ञान होण्यासाठी (आकृतीची) गरज असते. असलेल्या अवयवांची आणि त्यांच्या भागांची ठराविक बांधणी म्हणजे आकृती. ती लक्षात घेतली की निश्चित ज्ञान साधते, "ही गाय आहे" किंवा "हा घोडा आहे", ती लक्षात घेतली नाही, तर निश्चित ज्ञान साधत नाही. ज्याच्यामुळे निश्चित ज्ञान साधते, शब्द त्याबद्दल असणे योग्य आहे, तोच शब्दाचा अर्थ आहे.
हे ठीक नाही. ज्याची जातीशी जोडणी आहे, त्या विवक्षित जातीच्या वस्तूचा उल्लेख "गाय" शब्दाने होतो. अवयवसमूहाची जातीशी जोडणी होत नाही. मग कशाशी जोडणी होते? नियत अवयव-बांधणी असलेल्या द्रव्याशी होते. त्यामुळे शब्दाचा अर्थ म्हणजे आकृती नव्हे. मग असेच असू दे की शब्दाचा अर्थ म्हणजे जाती. (हा सुद्धा आणखी एक पूर्वपक्षच आहे.)

गौ.सू. २.२.६१ व्यक्त्याकृतियुक्तेऽप्यप्रसङ्गात् प्रोक्षणादीनां मृद्गवके जाति: ।
(व्यक्ति-आकृति-युक्ते अपि अप्रसङ्गात् प्रोक्षणादीनां मृद्गवके जाति: ।)

व्यक्तित्व आणि आकृती असली तरी (गोदान करताना) मातीच्या गायीवर पाणी सोडण्याचा प्रसंग येत नाही. म्हणून शब्दाचा अर्थ जाती असाच होय.
भाष्य : जाति: पदार्थः, कस्माद्? व्यक्त्याकृतियुक्तेऽपि मृद्गवके प्रोक्षणादीनामप्रसङ्गादिति । "गां प्रोक्षय गामानय गां देही"ति नैतानि मृद्गवके प्रयुज्यन्ते, कस्माज्? जातेरभावात् । अस्ति हि तत्र व्यक्तिरस्ति तत्राकृति: यदभावात्तत्रासम्प्रत्ययः स पदार्थ इति ।
जाती हा शब्दाचा अर्थ आहे, ते कसे काय? व्यक्तित्व आणि आकृती असली तरी (गोदान करताना) मातीच्या गायीवर पाणी सोडण्याचा प्रसंग येत नाही, म्हणून. "गायीवर पाणी सोड, गाय आण, गाय दे" असे म्हटले तर मातीची गाय वापरत नाही. हे कसे काय? (मातीच्या गायीत) जातीचा अभाव असल्यामुळे. तिथे व्यक्तीही असते, आकृतीही असते. ज्याच्या अभावामुळे तिथे (ही गाय नाही असा योग्य) अर्थ कळतो, तो ("गाय") शब्दाचा अर्थ होय.

गौ.सू. २.२.६२ नाकृतिव्यक्त्यपेक्षत्त्वाज्जात्यभिव्यक्ते: ।
( न आकृति-व्यक्ति-अपेक्षत्त्वात् जाति-अभिव्यक्ते: ।)

(वरील पूर्वपक्षाचे खंडन) आकृती आणि व्यक्तीची गरज असल्यामुळे (त्यांच्याशिवाय) जातीची अभिव्यक्ती होत नाही.
भाष्य : जातेरभिव्यक्तिराकृतिव्यक्ती अपेक्षते नागृह्यमाणायामाकृतौ व्यक्तौ जातिमात्रं शुद्धं गृह्यते तस्मान्न जाति: पदार्थ इति । न वै पदार्थेन न भवितुं शक्यं कः खल्विदानीं पदार्थ इति ।
जातीची अभिव्यक्ती आकृती आणि व्यक्तीवर अवलंबून आहे. आकृती आणि व्यक्ती लक्षात घेतल्याशिवाय शुद्ध जातिमात्र असे काही घेता येत नाही. म्हणून जाती हा शब्दाचा अर्थ नव्हे. आता शब्दाचा अर्थ "काहीच नाही" असे शक्य नाही. मग शब्दाचा अर्थ असतो तरी काय?

गौ. सू. २.२.६३ व्यक्त्याकृतिजातयस्तु पदार्थः ।
(व्यक्ति-आकृति-जातयः तु पदार्थः ।)

&& व्यक्ती, आकृती, जाती सुद्धा शब्दाचा अर्थ असतो.
भाष्य : तुशब्दो विशेषणार्थः । किं विशिष्यते प्रधानाङ्गभावस्यानियमेन? पदार्थत्वमिति । यदा हि भेदविवक्षा विशेषगतिश्च तदा व्यक्ति: प्रधानमङ्गं तु जात्याकृती । यदा तु भेदोऽविवक्षितःसामान्यगतिस्तदा जाति: प्रधानमङ्गं तु व्यक्त्याकृती । तदेतद्बहुलं प्रयोगेषु । आकृतेस्तु प्रधानभाव उत्प्रेक्षितव्यः । कथं पुनर्ज्ञायते नाना व्यक्त्याकृतिजातय इति लक्षणभेदात् । तत्र तावत् ।
येथे "सुद्धा"शब्द विशेषणाचा बोध करतो. कसले विशेषण आहे? ज्याच्या प्रधान अंगाबद्दल अनियम आहे, असा शब्दाचा अर्थ विशेष्य आहे. जेव्हा भेद विशेष करून सांगायचा असेल, किंवा विवक्षित हालचाल/गती सांगायची असेल, तेव्हा "व्यक्ती" हा अर्थ जाती-आकृती यांच्या मानाने प्रधान असतो. जेव्हा भेद विशेष करून सांगायचा नसतो, आणि सर्वसामान्य गती सांगायची असेल , तेव्हा "जाती" हा अर्थ व्यक्ती-आकृती यांच्या मानाने प्रधान असतो. आकृतीचे प्रधान असने मात्र दुर्लक्षणीय असते. व्यक्ती, आकृती आणि जाती या वेगवेगळ्या आहेत, ते कसे जाणावे? त्याची लक्षणे आहेत, ती अशी -

गौ. सू. २.२.६४ व्यक्तिर्गुणविशेषाश्रयो मूर्ति: ।
(व्यक्ति: गुणविशेष-आश्रयः मूर्ति: ।)

विशेष गुण ज्या ठिकाणी असतात, ती मूर्ती म्हणजे व्यक्ती होय.
भाष्य : व्यज्यत इति व्यक्तिरिन्द्रियग्राह्येति न सर्वं द्रव्यं व्यक्ति: । यो गुणविशेषाणां स्पर्शान्तानां गुरुत्वघनत्वद्रवत्वसंस्काराणामव्यापिनः परिमाणस्याश्रयो भवति यथासम्भवं तद् द्रव्यं मूर्ति: मूर्छितावयवत्वादिति ।
जी व्यक्त होते तीच व्यक्ती - वाटेल ते द्रव्य नव्हे. स्पर्श-वगैरे गुणविशेष जडपणा, घनता, द्रवता वगैरे संस्कार-गुण, मर्यादित व्यापाचे परिमाण... हे सर्व ज्या ठिकाणी असते, ज्याचे अवयव ज्यात सामावलेले असतात (मूर्छित) त्या द्रव्यास मूर्ती म्हणतात.

गौ.सू. २.२.६५ आकृतिर्जातिलिङ्गाख्या ।
(आकृति: जाति-लिङ्ग-आख्या ।)

जातीच्या चिह्ना-लक्षणांना आकृती म्हणतात.
भाष्य : यया जातिर्जातिलिङ्गानि च प्रख्यायन्ते तामाकृतिं विद्यात् । सा च नान्यसत्त्वावयवानां तदवयवानां च नियताद् व्यूहादिति । नियतावयवव्यूहा: खलु सत्त्वावयवा जातिलिङ्गं शिरसा पादेन गामनुमिन्वन्ति । नियते च सत्त्वावयवानां व्यूहे सति गोत्वं प्रख्यायत इति । अनाकृतिव्यङ्ग्यायां जातौ मृत्सुवर्णं रजतमित्येवमादिष्वाकृतिर्निवर्तते जहाति पदार्थत्वमिति ।
जिने जाती आणि जातीची चिह्ने-लक्षणे प्रसिद्ध असतात, तिला आकृती जाणावे. असलेल्या अवयवांची आणि त्यांच्या भागांची ठराविक बांधणी म्हणजे आकृती - त्यावेगळे काही नाही. ठराविक अवयवांच्या बांधणीसारखे अवयव असले, उदाहरणार्थ "गाय"जातीची चिह्ने असलेले डोके-पाय असले, तर "गाय"पणा कळून येतो. ज्या जाती आकृतीने व्यक्त होत नाहीत - माती, सोने, चांदी, वगैरे - त्या शब्दाच्या अर्थातून आकृती निघून जाते, आणि शब्दाच्या अर्थात केवळ जातीच शिल्लक राहाते.

गौ. सू. २.२.६६ : समानप्रसवात्मिका जाति: ।
(समान-प्रसव-आत्मिका जाति: ।)

जीतून समानता कळून येते, ती जाती होय.
भाष्य : या समानां बुद्धिं प्रसूते भिन्नेष्वधिकरणेषु यया बहूनीतरेतरतो न व्यावर्तन्ते योऽर्थोऽनेकत्र प्रत्ययानुवृत्तिनिमित्तं तत्सामान्यम् । यच्च केषांचिदभेदं कुतश्चिद्भेदं करोति तत्सामान्यविशेषो जातिरिति ।
जी अनेक ठिकाणी समान बुद्धीस जन्म देते, जिच्यामुळे खूप वस्तू असता एकामेकांत फरक नसल्याचे जाणवते, (ती जाती.) अनेक ठिकाणी जो अर्थ समान अनुभव घडवतो, त्यास "सामान्य" म्हणतात. काही वस्तूंमध्ये (एकामेकांत) भेद नाही, पण काही वस्तूंमध्ये भेद आहे, (असा बोध करून देण्याचे) असे वैशिष्ट्य असलेले 'सामान्य" म्हणजे जाती होय.

(पदार्थ-निरुपण-प्रकरण समाप्त.)

- - -

सारांश :
शब्दाच्या अर्थाचे वेगवेगळे पैलू असतात, हे जाणले नाही तर अर्थ समजण्यात संदिग्धता येऊ शकते. "गाय" या साध्या शब्दाचे वेगवेगळे अर्थ - व्यक्ती, आकृती आणि जाती - हे तीन्ही रोजव्यवहारातल्या संदर्भासह सांगून विवेचन केलेले आहे. अर्थ वेगवेगळे असतात म्हणजे शब्द निरर्थक असतात असे हताश होऊ नये. कधी कोणचा अर्थ घ्यावा याबद्दल ढोबळ सूत्र गौतमाने दिलेले आहे. (गौतमाच्या मताने नियम अंतिम आणि सुस्पष्ट आहेत. परंतु आपण विचाराअंती ते ठरवावे.) "गाय" या साध्या शब्दाचे विविध अर्थ असतात, त्यांच्यापैकी सुयोग्य अर्थ कुठला? हे जसे या सूत्रांनी बर्‍यापैकी असंदिग्ध होते, त्याप्रमाणे वादविवादांतले कठिण शब्दही त्पासता येतील. वेगवेगळे अर्थ घेतल्यामुळे जर विसंवाद होत असेल, तेवढा तरी विसंवाद टाळून खर्‍या मुद्द्याबाबत संवाद वाढवता येईल.

Comments

शुद्धिपत्र आणि अन्य भागांचे दुवे

(या प्रतिसादास उपप्रतिसाद देऊ नये. टंकनदोष खरडवहीत द्यावे. या प्रतिसादात शुद्ध रूपे देण्यात येतील.)

भाग १ : प्रस्तावना
भाग २ : शब्दाचा अर्थ म्हणजे फक्त "व्यक्ती" असतो का? साधक-बाधक चर्चा
भाग ३: शब्दाचा अर्थ म्हणजे फक्त "आकृती" किंवा फक्त "जाती" असतो का? साधक-बाधक चर्चा

तिनही लेख वाचले

बरेचसे डोक्यावरून गेले.. (म्हणूनच :) ) लेखकाबद्दलचा आदर दुणावला
कळले ते इतकेच की शब्दाचे वेगवेगळे अर्थ - व्यक्ती, आकृती आणि जाती या तिन्ही प्रकाराने असतात व आपण सरावाने योग्य अर्थ उचलतो. कधी कोणता अर्थ उचलावा याला ठोस नियम नाहित मात्र ढोबळ नियम आहेत.
बरोबर का?

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

बरोबर

बरोबर सारांश.

जेव्हा अशा प्रकारचा विसंवाद होतो आहे, अशी शंका असेल, तेव्हा तपासावे - एका संवादकाच्या अर्थात व्यक्ती प्रधान आहे, आणि दुसर्‍याच्या अर्थात जाती प्रधान आहे का? ढोबळ परीक्षा करून ते कळू शकते. असे असल्यास मग "मुळात आपण एकाच विधानाबद्दल बोलत नव्हतो" असे लक्षात येईल. संवाद सुसंवाद होण्याची शक्यता वाढेल.

क्लास आणि इन्स्टंस

जाति आणि आकृती या दोन्हींना मिळून 'व्याख्या' म्हणता येईल का?

आकृती म्हणजे जातीची व्याख्या

"ज्या चिह्ना-लक्षणांनी जाती कळते ती आकृती" असे सूत्रात म्हटलेले आहे. व्याख्येचे "प्रेडिकेट" आकृती आहे, "सब्जेक्ट" जाती आहे. असे काही असावे.

"इन्स्टन्स म्हणजे व्यक्ती" हे बरेच बरोबर आहे. पण व्यक्ती एकमेकांपेक्षा वेगळ्या ओळखता येतात, आणि त्यांना स्थल-कालाची मर्यादा असते, हीसुद्धा त्यांची खास-वैयक्तिक ओळखच.

म्हणजे "भिकंभटाची कपिला नावाची गाय तांबूस आहे", येथे रंग त्या व्यक्तीला आहे, गाय-जातीला नाही. इन्स्टन्स ज्या प्रकारे वेगळे असू शकते, त्याबाबत व्याख्येमध्ये मौन असते.

संगणक प्रणालींमध्ये कधीकधी इन्स्टन्सला व्याख्येपेक्षा अधिक कुठला गुण असण्याची सोय करून दिलेलीच नसते. (मात्र स्थल-कालमर्यादा ही व्याख्येत नसलेली ओळख असते, हे आहेच.) हा फरक लक्षात ठेवला तर मग "इन्स्टन्स"ही उपमा वापरायला हरकत नाही.

एक लक्षात ठेवले पाहिजे, की संगणक प्राणालींमधील अस्तित्वे प्रणाली-कर्त्याने ठरवलेली असतात. क्लास-व्याख्या आणि इन्स्टन्शिएशने तबकडी-स्मृतीमध्ये विवक्षित पत्त्यांवर लिहून ठेवलेली असतात. त्या प्रणालीमध्ये "क्लास" हा खरोखरच अस्तित्वात असतो. (स्मृतीपटलावर पत्ता आणि आलेख असणे = अस्तित्व).

मात्र मेंदूमध्ये जाती असते का? (बहुधा असते असे माझे मत आहे) निसर्गामध्ये जाती असते का? (बहुधा नसते असे माझे मत आहे)
या प्रश्नांची उत्तरे स्पष्ट नाहीत. ते प्रश्न क्रियाशीलपणे मांडलेले आहेत की नाहीत, याबाबत मला शंका वाटते.

ठीक पण

निसर्गामध्ये जाति असते या गृहितकवरच तर अख्खे विज्ञान उभे राहते ना?

असे गृहीतक नाही

विज्ञानाचे असे गृहीतक नाही.
फार फार तर ज्ञानेंद्रियांतील संवेदनांना जाती असते, इतके गृहीतक असते. (माझे असे गृहीतक आहे.) पण हे गृहीतक कातरून टाकता येईल की नाही याबाबत मी फार विचार केलेला नाही. कातरून टाकता आले, तर कदाचित असे गृहीतकही नसेल.

ठीक

यावर वेगळी चर्चा सुरु करावीशी वाटते आहे.

रटाळ लेख!

अभिप्राय: लेखाविशयी, लेखकाविशयी
लेखमाला वाचून इतकंच कळलं कि प्रस्तुत लेखक विद्वान आहे, त्याने बर्‍याच पुस्तकांचे वाचन केलेले आहे. लेखकाचा उजवा पाय भुतकाळात आहे, डावा पाय वर्तमानकाळात आहे.

काहि मुद्द्यांबाबत मत/स्पश्टीकरण :
लेख पहिला:
या शब्दाचा अर्थ तरी काय? (भाग १/३)
परिच्छेद क्रमांक 6 : 'शब्दांचा अर्थ असतो तरी काय?'
शब्दांचा अर्थ - 'अर्थ जाणून घेणार्‍याच्या डोक्यातील एक प्रतिमा' असते. हि प्रतिमा मानवी इंद्रियांनी जाणण्याइतकी बहूअंगी असते. ती पाहता येते, एकता येते, जाणवता येते. उदा.: 'शेंबूड' हा शब्द 'मानवाच्या नाकातील एक द्रव पदार्थ' म्हणून डोक्यात साठवलेला असतो. पण तो शब्द मनात जेव्हा प्रतिमांकित झाला तेंव्हा व त्यानंतर च्या घटना व जाणिवा त्या सोबत डोक्यात साठविल्या जातात. म्हणजे जेंव्हा 'हिरवा शेंबूड' म्हटला कि मनातील प्रतिमा अजून स्पेसिफिक होणार. 'शेंबूड या पदार्थाची चव कशी असते?' असा प्रश्न विचारला तर मनातील प्रतिमा जाणिवा, आठवणी यांच्या जुन्या फाईली ढुंडाळून उत्तर देतात ते देखील एका क्शणात.

हि प्रतिमा डोक्यात कशी आकारली गेली म्हणजे ती प्रतिमा आकारण्याची क्रिया कशी घडली यावर त्या प्रतिमेचे पुढिल कार्य होणार असते.

सध्याच्या संगणकांच्या जगात म्हणायचं झालं तर प्रत्येक द्न्यात शब्दांना मानवाच्या मेंदूत प्रतिमा द्वारे अर्थ प्राप्त होतो. प्रतिमेला स्वत:च्या प्रॉपर्टीज असतात. त्या-त्या प्रॉपर्टीज ने त्यांची वर्गवारी देखील केलेली असते. उदा.: गुण, रंग, रूप, आकार, उपयोग, कारण, हेतू, कार्य, स्तर, काळ, स्थिती, गती असे बरेच काही. प्रतिमांची इंद्रियांच्या जाणिवानुसार देखील वर्गवारी होते. उदा.: खरखरीत, गुळगुळीत, गोड, तिखट, सुगंध, दुर्गंध, लयबद्ध नाद, बेसूर नाद, उश्णता, थंड इत्यादी.

लेख दुसरा:
या शब्दाचा अर्थ तरी काय? (भाग २/३)
रुपिका म्हणजे ज्यातून अर्थ घ्यायचा आहे तो भाशेचा एक भाग. अक्शर, शब्द, जोडशब्द, वाक्य हे रुपिकेसाठीचे स्तर असतात.
रुपिका दोन पद्धतीच्या असतात.
एक - आशय सुचक रुपिका - आसुरू
दुसरी - कार्य सुचक रुपिका - कासुरू

न्यायालयाची कार्यलयीन भाशा, संशोधकांची संशोधनाची भाशा हि आसुरूमय असतात. त्यात जे सांगायचे असते तेच शब्द-वाक्यामधून व्यक्त केलेले असते. आसुरुमय पद्धत अर्थामधील गोंधळ टाळण्यासाठी वापरली जाते. उच्चारायला व ऐकायला देखील ती काहीशी किचकट असते.

व्यक्तीगत स्तरावरील भाशा ही कासुरूमय असते. त्या भाशेत बोलणारी व्यक्ती कोणत्या पद्धतीने वा कोणत्या हेतूने बोलतेय हे पाहिले जाते/ पहायचे असते. कासुरूमय पद्धत बोलण्यातील वेळ, शक्ती वाचवण्यासाठी व बहुतेकदा एखाद्याला निरुत्तर करण्यासाठी, टोला हाणण्यासाठी केला जातो.

उदा.:
'चेहर्‍याला काळी भुकटी फासली' हे आसुरूमय वाक्य
'चेहर्‍याला काळे फासले' हे कासुरूमय वाक्य इथे हेतू 'माहीती देणं' एवढंच आहे.
पण
"अगं कार्टे, काय केलंस तू हे? आमच्या तोंडाला काळे फासलेस तू." हे देखील कासुरूमय वाक्य आहे पण त्याचा वापर वेगळे सांगण्यासाठी केला गेला आहे.

समज

>>लेखमाला वाचून इतकंच कळलं कि प्रस्तुत लेखक विद्वान आहे,

एवढं तरी कळलं यात आनंद वाटला.

(अवांतर : सतीस रावले यांच्याकडून अशी प्रतिक्रिया पाहून काहीसे आश्चर्य वाटले).

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

"प्रतिमा" हे शक्य आहे

"शब्दाचा अर्थ म्हणजे अर्थ जाणून घेणार्‍याच्या डोक्यातील एक प्रतिमा".

हे शक्य आहे. संवादात अर्थ जाणून घेणारे दोघे असतात. कोणाच्या डोक्यातील प्रतिमा? या दोन्ही प्रतिमा समसमान असतात का?

हि प्रतिमा मानवी इंद्रियांनी जाणण्याइतकी बहूअंगी असते. ती पाहता येते, एकता येते, जाणवता येते. उदा.: 'शेंबूड' हा शब्द 'मानवाच्या नाकातील एक द्रव पदार्थ' म्हणून डोक्यात साठवलेला असतो.

हे सुद्धा नीट समजले नाही. "शेंबूड" पाहाता येतो. खरे आहे. पण "शेंबूड-शब्दाचा-अर्थ-असलेली-डोक्यातली प्रतिमा पाहाता येते" हे कसे? तुमच्या उदाहरणात डोक्यात साठवले आहे "मानवाच्या नाकातील एक द्रव पदार्थ" ही व्याख्या वाटते आहे. दृश्य-स्पर्श-चव यांच्या स्मृती-"फाइलीं"नी बनवलेली व्याख्या म्हणजेच प्रतिमा असते का? स्मृतींना चव कसली असते. आतापर्यंत "साखरेच्या चवीची स्मृती" ही माहितीची होती. मात्र "साखरेच्या स्मृतीची चव" ही अनोळखी आहे.

"आशय-सूचक"

येथे "आशय" काय असतो?
(गौतमाचे असे म्हणणे आहे, की काही शब्दप्रयोगांत - बहुधा तुम्ही ज्याला "कासूरू" म्हणता - जो ढोबळपणा असतो, त्याचा संदर्भ आपण सांगू शकतो. तो संदर्भ बघितल्यास अर्थ सुस्पष्ट होतो. संदर्भासह सुस्पष्ट असला, तर शब्दाचा अर्थ तुमच्या भाषेत "आसूरू" होतो काय?)

तुमची उदाहरणे बघूया :

'चेहर्‍याला काळी भुकटी फासली' हे आसुरूमय वाक्य
'चेहर्‍याला काळे फासले' हे कासुरूमय वाक्य इथे हेतू 'माहीती देणं' एवढंच आहे.

येथे कासूरू "माहिती देते" पण "आशय सूचित करत नाही" असे आहे काय? मला व्याख्येबरोबर उदाहरणही समजलेले नाही. दिलेल्या माहितीचा आशयाशी काही संबंध असावा, असे वाटते.
तसेच "कार्टीने आमच्या तोंडाला काळे फासले" विधानाला काहीतरी आशय आहे, असे वाटते. किंवा अर्थ तरी आहेच. नाहीतर तुम्ही ते वाक्य वापरले नसते. तो अर्थ काय आहे? तो "आशय" नाही, असे तुम्ही म्हणता. नसू दे. "आशय" नसलेला पण कार्यास उपयोगी असा अर्थ काय आहे?

खुलासा

"शब्दाचा अर्थ म्हणजे अर्थ जाणून घेणार्‍याच्या डोक्यातील एक प्रतिमा".
हे शक्य आहे. संवादात अर्थ जाणून घेणारे दोघे असतात. कोणाच्या डोक्यातील प्रतिमा? या दोन्ही प्रतिमा समसमान असतात का?

जरी एका भाशेचे असले तरी संवाद करणार्‍यांच्या डोक्यातील प्रतिमा बर्‍याचदा समसमान नसतात म्हणून तर लोकं कधी चर्चा करतात,तर कधी वाद घालतात, भांडतात, मारामार्‍या करतात.
उदा. हिंदी मध्ये 'चेष्टा' हे शब्दप्रतिक जी प्रतिमा हिंदी भाशकाच्या डोक्यात तयार करते ती प्रतिमा मराठी भाशकाच्या डोक्यातील प्रतिमेपेक्शा वेगळी असते. मराठी भाशक 'चेष्टा' ह्या शब्दप्रतिकेचा अर्थ वेगळा घेतो. जोपर्यंत दोघापैकी एकाला या प्रतिमेच्या भिन्नतेबाबत जाण नसते तोपर्यंत त्या दोन व्यक्तीमध्ये घोळ हा होणारच.

हि प्रतिमा मानवी इंद्रियांनी जाणण्याइतकी बहूअंगी असते. ती पाहता येते, एकता येते, जाणवता येते. उदा.: 'शेंबूड' हा शब्द 'मानवाच्या नाकातील एक द्रव पदार्थ' म्हणून डोक्यात साठवलेला असतो.
हे सुद्धा नीट समजले नाही. "शेंबूड" पाहाता येतो. खरे आहे. पण "शेंबूड-शब्दाचा-अर्थ-असलेली-डोक्यातली प्रतिमा पाहाता येते" हे कसे? तुमच्या उदाहरणात डोक्यात साठवले आहे "मानवाच्या नाकातील एक द्रव पदार्थ" ही व्याख्या वाटते आहे. दृश्य-स्पर्श-चव यांच्या स्मृती-"फाइलीं"नी बनवलेली व्याख्या म्हणजेच प्रतिमा असते का?

* सगळ्याच प्रतिमा आपण जाणिवेच्या स्तरावर आणू शकत नाही. तसे झाले तर माणसाला वेड लागेल. जी प्रतिमा जाणिवेतून उत्पन्न होते ती कालांतराने एक आठवण म्हणूनच डोक्यात ठसली जाते.
'शेंबूड' कसा दिसतो, हे आपण मनात इच्छा आणून, डोळे बंद करून कल्पना करू शकतो, व मनचक्शूं द्वारे तो शेंबूड पाहू शकतो.

स्मृतींना चव कसली असते. आतापर्यंत "साखरेच्या चवीची स्मृती" ही माहितीची होती. मात्र "साखरेच्या स्मृतीची चव" ही अनोळखी आहे.

आपण वाक्यांमध्ये उगीचच घोळ करीत आहात. 'साखर' ह्या शब्दप्रतिकेचा अर्थ 'प्रतिमा'म्हणून डोक्यात साठवला जातो, तेव्हा त्याचा रंग, आकार व चव हे ही लक्षात रहाते. * हेच उत्तर परत वाचावे.

"आशय-सूचक"
येथे "आशय" काय असतो?
(गौतमाचे असे म्हणणे आहे, की काही शब्दप्रयोगांत - बहुधा तुम्ही ज्याला "कासूरू" म्हणता - जो ढोबळपणा असतो, त्याचा संदर्भ आपण सांगू शकतो. तो संदर्भ बघितल्यास अर्थ सुस्पष्ट होतो. संदर्भासह सुस्पष्ट असला, तर शब्दाचा अर्थ तुमच्या भाषेत "आसूरू" होतो काय?)
तुमची उदाहरणे बघूया :
'चेहर्‍याला काळी भुकटी फासली' हे आसुरूमय वाक्य
'चेहर्‍याला काळे फासले' हे कासुरूमय वाक्य इथे हेतू 'माहीती देणं' एवढंच आहे.
येथे कासूरू "माहिती देते" पण "आशय सूचित करत नाही" असे आहे काय?
आसुरूमय वाक्ये केव्हा व कधी वापरली जातात ह्या बाबतीत मी वरील प्रतिसादात लिहीले आहे. तरी देखील वेगळ्या पद्धतीने इथे लिहीतो.-
'चेहर्‍याला काळी भुकटी फासली.' या वाक्यात 'डांबर फासलेले नाही','काळा ऑईल पेंट लावलेला नाही','भुकटी काळीच होती','त्या व्यक्तीचा जीव घेतलेला नाही' हे सगळे अर्थ प्रतित होत असून ही जे लिहीलय तेच आणि तेवढेच वस्तुनिश्ट आहे.


मला व्याख्येबरोबर उदाहरणही समजलेले नाही. दिलेल्या माहितीचा आशयाशी काही संबंध असावा, असे वाटते.
तसेच "कार्टीने आमच्या तोंडाला काळे फासले" विधानाला काहीतरी आशय आहे, असे वाटते. किंवा अर्थ तरी आहेच. नाहीतर तुम्ही ते वाक्य वापरले नसते. तो अर्थ काय आहे? तो "आशय" नाही, असे तुम्ही म्हणता. नसू दे. "आशय" नसलेला पण कार्यास उपयोगी असा अर्थ काय आहे?

कासरूमय वाक्याबाबत: "कार्टीने आमच्या तोंडाला काळे फासले"
ह्या वाक्याचे आसुरुमय वाक्ये असे होईल. - 'दुश्ट मुली, या पुढे तू आम्हाला समाजात वावरताना अत्यंत गैरसोयीचे होईल असे वर्तन केलेले आहेस."
वरील कासुरुमय वाक्यात जरी 'काळे फासले' असे म्हटले तरीही ते आणि वाक्य 'वस्तुनिश्टता' दर्शविणारे नाही. ते वाक्य 'कार्यसूचक' म्हणून आलेले आहे.

असे आहे का?

* सगळ्याच प्रतिमा आपण जाणिवेच्या स्तरावर आणू शकत नाही. तसे झाले तर माणसाला वेड लागेल. जी प्रतिमा जाणिवेतून उत्पन्न होते ती कालांतराने एक आठवण म्हणूनच डोक्यात ठसली जाते.

हे ठीक वाटते. बर्‍याच शब्दांच्या अर्थाची प्रतिमा जाणिवेच्या स्तरावर नसून आठवण म्हणून साठलेली असते. अशा प्रकारचा शब्द आशयसूचकरूपात वापरता येतो का?

तुमच्या उदाहरणांवरूनच मला वाटते, की वापरता येतो. या क्षणी काळ्या भुकटीचा वास मला काही करून आठवत नाही. डोळे बंद करूनही भुकटी काळीभोर की राखुंडी याची निश्चित प्रतिमा मनःचक्षूंसमोर येत नाही. तरी तुम्ही आसूरू म्हणून मान्य केलेले "काळी भुकटी फासली" हे वाक्य समजल्यासारखे वाटते. वस्तुनिष्ठ असावे असेच वाटते. म्हणजे आसुरूसाठी "प्रतिमा=पूर्ण जाणीव नसलेल्या आठवणी" इतके सुद्धा पुरे असावे. मनःचक्षूंपुढे जाणीव झालीच पाहिजे असे नसावे.)

आपण वाक्यांमध्ये उगीचच घोळ करीत आहात. 'साखर' ह्या शब्दप्रतिकेचा अर्थ 'प्रतिमा'म्हणून डोक्यात साठवला जातो, तेव्हा त्याचा रंग, आकार व चव हे ही लक्षात रहाते. * हेच उत्तर परत वाचावे.

साखरेची काही प्रतिमा (सर्व जाणिवा नाही, पण काही थोड्या जाणिवांचा आलेख) साठवला जातो, असे तुम्ही म्हणता, असे समजले. हे मर्यादित आलेख म्हणजे त्या जातीच्या वस्तूंची सामान्य चिह्ने असावी. (म्हणजे भुकटीचा नेमका काळा रंग हा भुकटीच्या आठवण-चिह्नांत नसावा. ढोबळ काळा रंग असावा. कुठलाच वास त्या आठवण-चिह्नांत नसावा.)
सामान्य-गुणांच्या आठवणींची मिळून यादी = प्रतिमा =अर्थ
असे तुम्ही म्हणता काय? तर मग समजले.

याला वरच्या लेखात "आकृती" म्हटलेले आहे, असे वाटते. आठवणीतल्या आकृतीमध्ये फक्त "सामान्य" तितकेच असते, म्हणून "सामान्यत्व=जाती" अध्याहृत असते, असे तिथे म्हणणे आहे. केवळ आठवणी असून चालत नाहीत, तर त्या आठवणी सामान्य आहेत, हे सूत्रसुद्धा लागते. उदाहरणार्थ त्या सगळ्या आठवणींच्या फायली एका फोल्डरमध्ये असाव्या लागतात. ते फोल्डर म्हणजे जाती. किंवा त्या शब्दाच्या प्रतिमेत जोडलेल्या फायली कुठल्या-कुठल्या आहेत त्यांची यादी असलेली एक फाईल सुद्धा लागते. त्या फाइलीला "जाती" म्हणतात.

असे काही सूत्र असले पाहिजे असे तुम्हालाही वाटत असावे. तुम्ही म्हणता :

...मनातील प्रतिमा जाणिवा, आठवणी यांच्या जुन्या फाईली ढुंडाळून उत्तर देतात...

सर्व फाइली धुंडाळत नाही. कुठल्या फायली बघायच्या त्यासाठी काही सूत्र असते. किंवा सर्व फायली धुंडाळल्या तरी पैकी कुठल्या फाइली निवडाव्या त्याचे सूत्र असते. ती जाती. सूत्र असते ना? मी स्वतः संगणकावर फायली धुंडाळतो, तेव्हा काहीतरी किल्ली-शब्द, तारखेची मर्यादा वगैरे देतो. तुम्ही फायली कशा धुंडाळता? हव्या त्या फायली ओळखण्यासाठी माझ्याकडे किल्ली नसली, तर त्या फायली असून-नसून सारख्याच. म्हणजे नसतातच! (फाईल डिलीट केली तर ती पुरती पुसून न काढताता तिच्या पत्त्याचा निर्देश तितका पुसतात.)

समजल्यासारखे वाटते

समजल्यासारखे वाटते पण समजले असे ठाम म्हणता येत नाही.

नामाबद्दल व्यक्ती, आकृती आणि जाती हे तिन्ही लागू मानले तर त्याप्रमाणे विशेषण आणि क्रियापदे दर्शवणार्‍या शब्दांबद्दलही असेच म्हणता येईल का? तसेच या नियमांना अपवाद असे शब्द आहेत का आणि त्यांची व्याख्या कशी ठरवावी लागेल?

अपवाद, क्रियापदे, विशेषणे

अपवाद :
(१) एक अपवाद सूत्रांतच दिलेला आहे : "माती", "सोने" वगैरे शब्दांचा अर्थ फक्त "व्यक्ती+जाती" इतकाच असतो "आकृती" हा अर्थ नसतो.
(२) संस्कृतात "निपात" म्हणतात, मराठीत "अन्वयी अव्यये" म्हणतात असे काही शब्द असतात. "आणि", "किंवा" वगैरे. या शब्दांचा अर्थ वेगळा लागतो. व्यक्ती/जाती/आकृती असा नसून "तार्किक फलन" (लॉजिकल ऑपरेटर/ऑपरेशन) असा लागतो.

विशेषणे :
संस्कृतात "विशेषणे" अशी वेगळी नसतात म्हणून सूत्रांत वेगळा उल्लेख नाही. (परंतु अर्थप्रक्रिया ही फक्त संस्कृतासाठी नाही.) विशेषणासाठी वरील विवेचन लागू आहे.

क्रियापदे :
क्रियापदांबद्दल न्यायदर्शनातले विश्लेषण संस्कृतात असले, तरी *मराठीला अधिक मानवेल! आशय ठरवण्यासाठी नैयायिक वाक्याची शब्दरचना बदलतात आणि "आहे" हे एकच क्रियापद असलेले विधान करतात.

राम बोलतो = "राम-या-कर्त्याचे वर्तमानकाळातले बोलणे" + "आहे"
राम बोलत नाही = "राम-या-कर्त्याच्या वर्तमानकाळातल्या बोलण्याचा अभाव" + "आहे"
अशा रीतीने "आहे" शब्द सोडला तर बाकी सर्व नामेच होतात, आशयही तोच राहातो.

"आहे" या एकाच शब्दाचा अर्थ करायचा शिल्लक राहातो. "अस्तित्व असे काही असते" हे स्वयंस्पष्ट ("ऍक्सियम") मानून काम भागते. असे पुष्कळ लोकांना वाटते. मात्र याबाबत दुमत आहे.

- - -
*"मराठीला अधिक मानवेल" - संस्कृत किंवा इंग्रजीच्या मानाने मराठीत वेगवेगळी मूळ-क्रियापदे कमी वापरतात, "नाम+करणे", "नाम+असणे" असे शब्दप्रयोग अधिक वापरतात.
सः प्रीयते/ही लव्ह्ज्/तो प्रेम करतो.
(क.दि. सोनटक्क्यांच्या "पापो नावाचे प्रकरण" मध्ये या अनुषंगाने एक गमतीदार लघुकथा आहे.)

हवा

हेच विवेचन हवा या नामाबद्दल कसे मांडता येते?

हवेला आकृती नाही, हवा ही व्यक्ती नाही किंवा तिला जातही नसावी(?) (मला मी काय बोलत्ये ते कळते ना?) हवा हा शब्द वरील विवेचनाला अपवाद मानता येतो का?

व्यक्ती आहे

नेहमीच्या अर्थाने "हवा" म्हणायची तर तिला व्यक्ती आहे. (उदाहरणार्थ : "इथली हवा फार आल्हाददयक आहे", "तिथली हवा दूषित आहे". आपण एकमेकांना असे सांगतो, तेव्हा सर्व ठिकाणी सामान्य असलेल्या हवा-जातीबद्दल नव्हे, तर काही मर्यादित क्षेत्र असलेल्या हवा-व्यक्तीबद्दल बोलत असतो.)
म्हणजे प्रकार "सोने", "माती" सारखाच आहे. व्यक्ती आहे, जाती आहे, पण आकृती नाही. व्यक्ती ही मर्यादित परिमाणाची असते, तिला (सामान्यात समाविष्ट नसलेले) विवक्षित गुण असतात.

- - -

मात्र तुमचे उदाहरण त्याहून खोल आहे. फार पूर्वीच्या काळी "स्थिर हवा" अशी काही संकल्पना नव्हती. फक्त वारा/हलणारा श्वास वगैरे ठिकाणीच कुठले "हवा-द्रव्य" असते, अशी संकल्पना होती. (म्हणून त्याकाळी तीनच महाभूते होती - पृथ्वी, आप, तेज). पुढे "हवा" हे महाभूत आले.

जे नेहमीच स्थिर असते , ज्याला कुठलाच गुण चिकटत नाही, जे अमर्याद असते, ते "आकाश" (=?अवकाश=स्पेस-बाय-इट्सेल्फ=ईथर) अशी संकल्पना मधल्या काळात लोकांना आवडू लागली. "पंच"महाभूतांमध्ये त्याला स्थान मिळाले. "आकाशा"ला मर्यादा नसते, गुण नसतात म्हणून "व्यक्ती" नसते. आकृती तर नसतेच. जातीच असते बहुधा.

("आकाश-महाभूत" अशी संकल्पना असायची गरजच नाही, असे आपले आजकाल मत आहे. हवा आहे/नाही असे म्हणून काहीतरी क्रियाशील फरक पडतो. तशीच बात "पृथ्वी", "गाय" यांची. "आकाश-महाभूत" संकल्पना मानून किंवा न मानून काहीएक क्रियाशील फरक पडत नाही. कुठलेच निरीक्षण वेगळे असेल असे भाकित होत नाही. "आकाश-महाभूताचे जातिवाचक चिह्न काय" असे काहीच सांगता येत नाही. मग आकाश-महाभूताला जातीही नाही. "आकाश-महाभूत" शब्दाला अर्थच नाही.)

एकूणात

एकूणात शब्दाचा अर्थ बरेचदा सापेक्ष असतो असे समजले. अर्थात गाय या सध्या शब्दाबद्दल इतकी चर्चा होऊ शकते तर अवघड संज्ञांबद्दल काय होईल सांगणे कठीण आहे.

एक वेगळा मुद्दा. इथे एकच भाषा धरली आहे. मात्र जर दोन माणसांच्या मातृभाषा वेगवेगळ्या असतील तर त्यांच्या संवादांमध्ये आणखी अंतर पडू शकेल. या संबंधात आजच एक रोचक लेख वाचनात आला.

--
अनुदिनी : मोझार्ट ऑफ मद्रास - http://rbk137.blogspot.com
रोबो नि अगिविनयो, चिट्टि नि वुयथिनयो, मिनसारम वुडलिल रत्तम, नवीन उळगतिल अरविल अधसियम
वायवुंड अनार वयनिल्लय, पेचीवुंड मूचियिल्लय, नाडीवुंड इरथियम इल्लय, गोवर्धन मुंड थिमिर इल्लय

छान दुवा

ही गूगु येमिथिर्र् भाष तर गमतीदारच आहे. त्याबद्दल आणखी काही कळले तर हवे आहे.
- - -
"जाती"ची सापेक्षता जरा जास्तच आहे, असे समजता ती "मायावी" (मनुष्यकृत व्याख्येमुळेच अस्तित्व असलेली) आहे, असा विचार बळावतो.
- - -
"गाय" आणि अवघड संज्ञा.
मुद्दामून सोपे गणित निवडतो, तसे "गाय" उदाहरण निवडलेले आहे. पण सोप्या गणितातल्याच पायर्‍या पुष्कळदा मोठ्या गणितात लागू करता येतात. म्हणजे प्राथमिक शाळेत मला १२*१६=? वगैरे गुणाकार करायला शिकवले.
त्याहून ३१४१५*९२६५४=? हे गणित कठिण आहे खरे. पण त्याच प्राथमिक शाळेत शिकलेल्या पायर्‍या (हातचे घेणे, एकाखाली एक मांडणे, बेरीज करणे...) उपयोगात आणायच्या असतात. पायर्‍या खूप असल्यामुळे काळजी खूप घ्यावी लागते, वगैरे, ही बाब आलीच.

सापेक्षता पुरती व्यक्तिसापेक्षता नसून, संदर्भासह विचार केला तर परिस्थिति-सापेक्षता होते. एकदा का परिस्थिती-सापेक्षता झाली की ती वस्तुनिष्ठच.
- - -

(गृहपाठासाठी एक कठिण उदाहरण घेऊया : आपली मागे "इलेक्ट्रॉन"बद्दल चर्चा झाली होती. तिथे काय अभिप्रेत होते, ते दोघा संवादकांसाठी सारखे होते की वेगळे?

इलेक्ट्रॉन-व्यक्तीचा प्रधान संदर्भ असला तर विचार वेगळा होतो. त्याला व्यक्तित्व-ओळख असावी लागते - मग त्याचे वस्तुनिष्ठ प्रयोगवर्णन ओळखीसह करावे लागतात. [भिकंभटाची कपिला नावाची गाय तांबुस आहे <-समांतर-> पर्वती-संशोधन-केंद्रातल्या अमुक यंत्रात अमुक काळी टिपलेल्या इलेक्ट्रॉनचा स्पिन -१/२ आहे.]

इलेक्ट्रॉन-जातीचा प्रधान संदर्भ असला तर इलेक्ट्रॉन-व्यक्तीचे गुण त्या संकल्पनेत आवश्यक नसतात किंवा अर्थपूर्णही नसतात.
[गाय जातीचा रंग काय? प्रश्नाला उत्तरच नाही. शक्य रंगांची यादी देता येईल, संभवनीयता देता येईल. <-समांतर-> इलेक्ट्रॉन-जातीचा स्पिन काय आहे? प्रश्नाला उत्तरच नाही. शक्य स्पिनांची यादी देता येईल, संभवनीयता देता येईल.]

"अमुक यंत्रातल्या अनेक इलेक्ट्रॉनांपैकी कुठलाही", याबद्दल विधान करायचे असेल तर अर्थात व्यक्ती प्रधान आहे की जाती प्रधान आहे? कठिण आहे, पण टप्प्या-टप्प्याने विश्लेषण केल्यास काही प्रगती होऊ शकते. परिस्थिति-सापेक्ष वस्तुनिष्ठता पुष्कळदा आणली जाऊ शकते.

इलेक्ट्रॉन

गूगु येमिथिर्र् भाषेबद्दल मलाही दुवा वाचल्यावरच कळले.
त्याच विषयावरील आणखी एक रोचक लेख.

--

इलेक्ट्रॉनच्या उदाहरणामध्ये इलेक्ट्रॉन हा शब्द ऐकल्यावर ऐकणार्‍या व्यक्तीच्या मनात कोणती प्रतिमा येईल हे व्यक्तीसापेक्ष आहे असे वाटते.
समजा त्या व्यक्तीने पुंजभौतिकीचा अभ्यास केलेला नसेल तर तिच्या मनात इलेक्ट्रॉन म्हणजे एक चेंडू अशी काहीतरी प्रतिमा येईल.
पुंजभौतिकी शिकलेल्यांच्या मनातही वेगवेगळ्या प्रतिमा येऊ शकतील. फाइनमनसारख्या जिनियस शास्त्रज्ञांच्या मनात याची प्रतिमा आणखीनच वेगळी असेल. (किंबहुना त्यांनी मांडलेले विचार अद्भुत वाटतात यामागे त्यांच्या या जगाबद्दलच्या प्रतिमाही अद्भुत असतात हे कारण असू शकेल.)

यामुळे संवादात अडचण येईल का? सांगणे कठीण आहे. मात्र आलीच तर चर्चा करून सोडवता येईल अशी आशा वाटते.

अवांतर : हा मुद्दा अधिक व्यापक होऊ शकतो.
उदा. एखादे सुंदर गाणे ऐकत असताना मनात विचार येतो की रहमानला हे गाणे कसे ऐकू येत असेल. माझ्या जाणिवेच्या पलिकडे असणार्‍या अनेक गोष्टी त्याला यात सापडत असतील.

--
अनुदिनी : मोझार्ट ऑफ मद्रास - http://rbk137.blogspot.com
रोबो नि अगिविनयो, चिट्टि नि वुयथिनयो, मिनसारम वुडलिल रत्तम, नवीन उळगतिल अरविल अधसियम
वायवुंड अनार वयनिल्लय, पेचीवुंड मूचियिल्लय, नाडीवुंड इरथियम इल्लय, गोवर्धन मुंड थिमिर इल्लय

व्यक्तीच्या मनातील प्रतिमा हा रावले यांचा मुद्दा

(व्यक्तीच्या मनातील प्रतिमा हा रावले यांचा मुद्दा आहे. माझा किंवा गौतमाच्या सूत्रातलाही नव्हे. परंतु विचार करण्यालायक आहे.)

म्हणूनच वैज्ञानिक संवादांत क्रियाशील व्याख्या होतात. "अमुक प्रयोग केला तर निर्देशक यंत्रांत अमुक दिसते" वगैरे.

बरोबर - व्याख्या संवादकांनी ठरवलेली नसेल, तर आपल्या मनातील प्रतिमेतील तपशील व्याखेत आहे असे एका संवादकाला वाटू शकेल, मात्र ते दुसर्‍या संवादकाला ठाऊक नसेल. मात्र हे संवादातून ठीकठाक करता येते, ही आशा सुयोग्य आहे.

व्यापक मुद्दाही विचार करण्यालायक आहे. मुद्दा सौंदर्यशास्त्रातला आहे.

तिथेसुद्धा चर्चा करायची असेल, तर "संवाद घडू शकतो त्या संकल्पना कुठल्या" असा विचार संवादकांनी करावा. जर आपल्याला (किंवा रहमानला) आपल्या सौंदर्यानुभवाचे वर्णन दुसर्‍या कोणाला सांगाची दुर्दम्य स्फूर्ती होत असेल, तर "ऐकणार्‍याला आपले शब्द समजत आहेत की नाहीत" याची शहानिशा आपण (किंवा रहमानने) करून घेतली पाहिजे. (दुर्दम्य स्फूर्ती होत असेल तर संवादक प्रयत्नही करेल. नाहीतर प्रयत्न करणार नाही, संवाद होणारच नाही.)

चांगला ऊहापोह

व्यक्ती, आकृती, व जाती ही विभागणी सर्वसमावेशक वाटते खरी. सर्वसामान्य शब्दांच्या वापरासाठी तरी ती म्युच्युअली एक्स्क्लुजिव आणि एक्झॉस्टिव्ह वाटते.

काही शब्द संकल्पनांना निदर्शित करतात. उदाहरणार्थ, 'अर्थ'. यासारख्या शब्दांनादेखील ही विभागणी लागू पडतेच. पण का कोण जाणे, थोडी विशविशित वाटते. की ते आकृती नसल्यामुळे होतं?

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

बिंदुगामी "मेटा"विचार

श्री. घासकडवी यांच्याकडून अपेक्षित असा बिंदुगामी "मेटा"विचार.

मात्र ते सांगतात त्या उदाहरणापेक्षा विरोध (किंवा विरोधाभास) पुढे आणणारी उदाहरणे आहेत : "व्यक्ती" आणि "जाति" (दोन्ही त्यांच्या उदाहरणासारख्या संकल्पनाच आहेत.)

"व्यक्ती" शब्दाचा जे अर्थ आहेत, त्यांत व्यक्ती-प्रधान-अर्थ आणि जाति-प्रधान-अर्थ असतात का?
"जाति" शब्दाचा जे अर्थ आहेत, त्यांत व्यक्ती-प्रधान-अर्थ आणि जाति-प्रधान-अर्थ असतात का?
व्यक्तीला व्यक्तित्व असते - सर्वांपेक्षा एकक म्हणून वेगळेपण, स्थलकालाच्या मर्यादा असतात. असे एकक असणे, आणि स्थलकालमर्यादा हे "जाति"च्या कुठल्याच अर्थ-संदर्भात नसतात. "जाती"च्या व्याख्येतूनच हे आले ना?

- - -
(पुढील परिच्छेद मी स्वतःच्या तत्त्वदृष्टीतून नव्हे नैयायिकाच्या दृष्टीचे ऐतिहासिक वर्णन म्हणून देत आहे.)
येथे लक्षात घेतले पाहिजे नैयायिक हे वस्तुवादी होते. ("रियॅलिस्ट"). त्यांची एकके म्हणजे वस्तू. गुण म्हणजे वस्तूत आश्रय करून राहिलेले असे काहीतरी असते. पण त्यांना वस्तूशिवाय स्वतंत्र अस्तित्व नसते. जाति हा गुण आहे. "लाली, शुभ्रता" हे सुद्धा गुणच आहेत. त्यांचा अर्थ असलेले व्यक्ति-एकक शोधता कामा नये. त्याच प्रमाणे "अर्थ" वगैरे संकल्पना सुद्धा कुठल्या-कुठल्या वस्तूत आश्रय करून राहाणारे गुण आहेत. ("उपाधी" आहेत.)
तरी नैयायिक "जाति" मानतात. "जातीची जाति" (जातीची जातीची...[क्षवेळा]... जाती) या प्रकाराला मात्र ते "उपाधी" मानतात.
"उपाधी" ज्ञान स्थिर नसते. सविकल्प असते. "जाति" ज्ञान मात्र स्थिर असते.
म्हणजे फक्त एक पायरीपर्यंतच वस्तूचे "जातीकरण" (ऍब्स्ट्रॅक्शन) हे वास्तविक-रियॅलिस्ट असते. त्यानंतर ऍब्स्ट्रॅक्शने करता येतात, मात्र ती ऍब्स्ट्रॅक्शने सविकल्प असतात. वास्तविक नसतात.

- - -
आता मला वाटते, वास्तवात "जाति" तरी का बघावी. ऍब्स्ट्रॅक्शनची एक पायरी असलेली "जाति" सुद्धा उपाधीच आहे, असे माझे मत आहे. पण ती चर्चा वेगळी.

("जाति"ला वास्तवातून बाजूला काढले, तर "निगमन=डिडक्टिव्ह इन्फरन्स" बद्दल आपली रूढ समजूत बदलावी लागते. ते करणे बरेच कष्टसाध्य असते.)

चांगली ओळख

विषयाची ओळख चांगली व फारसे कष्ट न घेता समजणारी आहे.

आठवण आली ती प्लेटो/ऍरिस्टॉटलच्या विचारांची. जाती (फॉर्म) वर त्याने लिहिलेल्या विचारांशी थोडीफार सांगड घातलेल्या सारखी वाटते.

इतर दर्शने येतील अशी आशा बाळगतो.

प्रमोद

अप्रतिहत गती

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.रावले सतीश लिहितातः.."लेखकाचा (श्री.धनंजय यांचा) उजवा पाय भुतकाळात आहे, डावा पाय वर्तमानकाळात ..
श्री.धनंजय यांना वेदांपासून ते आधुनिकोत्तर अशा कोणत्याही विषयाचे वावडे नाही.सर्व ठिकाणी त्यांची गती अप्रतिहत असते.भूतकाळात ते सहजगत्या प्रवेश करतात.पण त्यांचा पाय तिथे रुद्ध होतनाही.श्री.रावले यांनी श्री. धनंजय यांचे अन्य लेख वाचल्यास याची प्रचीती येईल.
प्रस्तुत लेखात "शब्दाचा अर्थ " या विषयावर गौतमसूत्रांत जो मूलभूत आणि सूक्ष्म विचार केला आहे, अर्थाचे आकृती, व्यक्ती,जाती असे वर्गीकरण पाडले आहे त्यातून उच्च प्रज्ञेचे आणि प्रतिभेचे दर्शन होते. ते श्री.धनंजय यांना मोहविते. आणि आपला आनंद इतरांशी वाटावा म्हणून ते लेख लिहितात असे मला वाटते.
लेखात जे मांडले आहे त्याचे सर्वांशाने आकलन मला होत नाही. पण जे काही समजल्यासारखे वाटते त्यांतूनही ओsहो ! अशा बौद्धिक आनंदाची अनुभूती होते.
(इथे सदस्यानामांचा उल्लेख आदरार्थी बहुवचनी करण्याचा शिष्टसंकेत आहे. त्याचे पालन करणे/नकरणे महत्त्वाचे नाही. जसे लेखनात भाषा हा शब्द भाशा असा लिहिला तरी तो दोष गौण मानला जातो.)

एक शंका..

"लेखकाचा (श्री.धनंजय यांचा) उजवा पाय भुतकाळात आहे, डावा पाय वर्तमानकाळात .. हे वाक्य आदरार्थी कसे लिहावे? --वाचक्नवी

सहमत - सामान्यनामे एकवचनातच

सहमत - सामान्यनामे एकवचनातच लिहावीत.

"प्रस्तुत लेखक", "वरील प्रतिसादक" वगैरे नेहमीच्या एकवचनातच बरे. "श्री. अमुकतमुक" असा उल्लेख मात्र आदरार्थी अनेकवचनात.

("श्री." म्हणजे "श्रीमान किंवा श्रीमती" असे रूप मला आवडलेले आहे. तरी क्रियापदात कित्येकदा लिंगाचा उल्लेख करावाच लागतो. "श्री. अमुकतमुक म्हणाले/म्हणाल्या". अशा परिस्थितीत "श्री. अमुकतमुक म्हणतात" असे कित्येकदा पर्याप्त असते. लिंगांत फरक न-करणारी शब्दरूपे अनेकवचनात अधिक आढळतात, हासुद्धा एक फायदाच! मात्र "प्रस्तुत लेखक" मध्ये शब्दप्रयोगातले लिंग केवळ रूढ आहे. तर "प्रस्तुक लेखक म्हणतो" मध्ये "पुरुष असलेला प्रस्तुत लेखक म्हणतो" असा अर्थ कोणी काढायचे.)

एक शंका..

"लेखकाचा (श्री.धनंजय यांचा) उजवा पाय भुतकाळात आहे, डावा पाय वर्तमानकाळात .. हे वाक्य आदरार्थी कसे लिहावे? --वाचक्नवी

शब्द

"शब्द" ह्या शब्दाची व्यक्ती, जाती व आकृती कशी वेगळी करावी वा सांगावी असा एक विचार मनात आला :)

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

 
^ वर