हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ : चार शब्द


कोण आहे मी?
    मी मी आहे, खंडेराव.
    ह्यावर स्तब्धता. मग मी विचारतो, तू कोण?
    मी तू आहेस, खंडेराव.
    अंमळ चुळबुळत्साता मी म्हणतो, म्हणजे? तुलाच मी मी कोण असं विचारलं? म्हणजे स्वत:लाच मी कोण आहे, असं? मग तो कोण? मीच?
    आत्ता बरोबर. तरच आपल्याला काहीतरी सांगता येईल, खंडेराव. मी तू तो एकच.
    ह्यावर सामसूम. किती एक शतकांची. नि:शब्द.
    आणि खंडेराव, फक्त गोष्टच सांगत जा राव.

    अशी हिंदूची सुरुवात आहे. एका भयंकर, जगड्व्याळ रोलरकोस्टरवर घेऊन जाणारी महाकादंबरी. बरीच वर्षं येणार म्हणून गाजलेली. पण आल्यावर, वाचल्यावर एवढा वेळ लागला तो साहजिकच आहे असं मान्य करायला लावणारी.

    एका भल्या मोठ्या पृष्ठभागावरचा एक अतिविशाल देखावा. तो कधीच एका नजरेत येत नाही. तुकड्यातुकड्याने पहावा लागतो. त्यात काय नाही? हा खंडेराव आहे, खंडेराव विठ्ठल मोरगावकर! त्याचं खानदेशातलं मोरगाव, या गावाचा खंडेरावाच्या मागच्या सातव्या पूर्वजापासूनचा नागोजीरावपासूनचा इतिहास, या गावामागची सातपुड्याची डोंगररांग, तिथले आदिवासी, भलामोठा खटलं असणारं त्याचं कुणबी कुटुंब, लाख केळी असलेला त्याचा कर्तृत्त्ववान बाप, शेकडो एकरांची शेती, त्यातले सालदार, मजूर, गावातले बारा बलुतेदार, परत अगणित नातेवाईक, घरातल्या म्हातार्यार, त्यांचा भूतकाळ, नवरा मेल्यावर परत आलेल्या स्त्रिया. अजून काय सांगितलं म्हणजे कल्पना येईल? आणि खरंच कल्पना येईल? खरंच?

    हा खंडेराव पुरातत्ववेत्ता आहे. उत्खनन करतो, युनेस्को-मोहनजो-दडो १९६३ या प्रकल्पात सध्या त्याचं काम चालू आहे. मडकी जोडतो. मडकं सापडलं तिथे सांगाडा असलाच पाहिजे. दुसर्‍या दिवशी खोदायला घ्यायचा आयत नीट आखायला दोरी लागते. त्यांचा भलामोठ्या भेंडोळ्याचा गुंता सोडवायला हा रात्रभर जागतो. जाणिवांना पुरातत्त्वात स्थान का असू नये म्हणून सांखळिया सरांशी वाद घालतो. ह्याच्या बोलण्यातून मोरगावच्या वंशपरंपरागत गणिकांचे उल्लेख ऐकून कुतूहल चाळवलेल्या स्कॉटिश मंडीला हा मोरगावला काही महिने राहायलाच पाठवून देतो.

    उत्खननाबरोबरच याच्या डोक्याचंही उत्खनन चालूच आहे. पार सिंधू नदीच्या तीरावरच्या आर्यांपासून ते मोरगावातल्या लभान्यांच्या गणिका, त्यांची वंशज असलेली सध्याची झेंडी इथपर्यंतचे गुंते या खंडेरावाच्या डोक्यात भरलेले आहेत. पाकिस्तानात आलेली त्याची महानुभावांची तिरोनी आत्या, तिला शोधायला हा खटपट करतो आहे. "संपूर्ण डोक्यावरुन रजई पांघरुन आत तयार झालेल्या उबदार अंधारात गर्भाशयातल्यासारखं डोक्याकडे गुडघे घेऊन सुषुप्तीच्या अबोध अवकाशात तरंगणारा" हा असा खंडेराव आहे.

    संपूर्ण कादंबरीभर पसरलेले अगणित लोकजीवनाचे संदर्भ, महानुभावांचे संदर्भ, परत लोकगीतं, लोककथा, म्हातार्‍याकोतार्‍यांच्या आठवणी, तुकाराम, पाकिस्तानात असताना वेड लावलेल्या गझला, गाणी, शेकडो शेर, गांधींच्या सर्वभक्षक हिंदुत्वाला घाबरुन मुसलमानांनी मागितलेला पाकिस्तान, मग फाळणी, फाळणीनंतर आपल्याच देशात परदेशी झालेले लोक, परत मोरगावचे ऐतिहासिक संदर्भ असा सगळाच हा पसारा आहे. आणि शिवाय स्वत:च्या नजरेतून या सगळ्याकडे बघणारा खंडेराव. आता अजून काय काय लिहू? आणि हे एवढं लिहून नेमाड्यांकडे तरी लिहायला आता शिल्लक काही राहिलं आहे का? असा प्रश्न पडायला लावणारी ही अडगळच आहे खरी. हिला काय नावं द्यायचं? समृद्ध? नाव बरोबर आहे मग.

    कोसलाशी हिची तुलना करायचं कारण नाही. पण दोन्हींमध्ये थोडी साम्यं आहेत. ती लगेच जाणवण्यासारखी आहेत. (हिंदूबद्दल लिहायचं काय हा अवाढव्य प्रश्न सोडवण्याकरिता ही तुलनेची पळवाट मी काढली आहे असं म्हणू फारतर.) कोसलातला पांडुरंग सांगवीकर एकुलता एक वंशाचा दिवा आहे. खंडेरावाचं तसं नाही. याला भाऊ आहेत, बहिणी आहेत. पण पांडुरंग सांगवीकरासारखाच हाही घरापासून तसा अलिप्तच आहे. कापडचोपड खरेदी करणारे हरामखोर लोक यालाही आवडत नाहीत असं म्हणता येईल. कोसलातला नायक घरी परत येतोच शेवटी. पण खंडेराव काय करणार आहे? मधुमेह झाल्यावर औषधपाणी करायलाही सवड मिळत नाही इतका भलामोठा शेतीचा पसारा त्याचा बाप घालून बसला आहे. घरातल्यांचं करता करता झिजून चाललेल्या वहिनीची बाजू घेऊन बोलताच याला टांगायला निघालेल्या लोकांकडून, बाप मेल्यादिवशीच घरातल्या सोन्याची वाटणी पोटच्या पोरींमध्ये करुन टाकणार्‍या आईपासून हा लांब जाणार यात नवल काय? तशी मग पांडुरंगाची आणि खंडेरावाची विचारपद्धती सारखीच आहे.

    सुरुवातीला पाकिस्तानातल्या उत्खननाच्या साईटवरुन सुरु झालेली कादंबरी खंडेरावाच्या वडिलांच्या मृत्यूशय्येवर असल्याच्या तारेनंतर खंडेराव मोरगावला निघतो तेव्हा फ्लॅशबॅकमध्ये शिरते आणि मधल्या रोलरकोस्टर राईडनंतर खंडेराव गावात आल्यावर त्याचे वडील जेव्हा त्याच्या मांडीवर प्राण सोडतात तिथे येऊन संपते. आता या पुढे या खंडेरावाचं काय होणार आहे? तो काय करणार आहे? हे सगळं तो मागे सोडून जाणार आहे? गेलाच तर मग या सगळ्याकडे कोण बघणार आहे? या प्रश्नांची उत्तरं पुढच्या भागातच आता मिळणार. चांगदेव चतुष्टयासारखे याचेही पुढचे भाग येणार असल्याचा उल्लेख मलपृष्ठावर आहेच. ते तरी लवकर यावेत अशी नेमाड्यांना विनंती करता येईल.

    तर शेवटी माझ्या कुवतीनुसार मला हे एवढंच लिहिता येईल असं वाटत होतं आणि तेवढंच लिहिलेलं आहे. तात्पर्य विचाराल तर ही कादंबरी वाचणं हा एक अनुभव होता. अनुभवाच्या आधी कोणतं विशेषण लावावं हे मात्र कळत नाही. गेल्या वीसपंचवीस वर्षात वाचून मिळालं नसेल इतकं या कादंबरीनं मला (माझ्याबद्दल बोलतो आहे मी) वाचतानाच्या चार दिवसात दिलं असं म्हणता येईल. त्यामुळे तरी वाचलीच पाहिजे अशी माझ्यामते ही कादंबरी आहे. मलपृष्ठावर म्हटल्याप्रमाणे जीवनाची व्यापकता, व्यामिश्रता यांचे दर्शन घडवणे जसे महाकाव्याकडून अपेक्षित असते तसेच ते कादंबरीकडूनही असते आणि हिंदू त्यात यशस्वी झाली आहे. या वाक्याची खातरजमा कादंबरी वाचल्यावर तुम्हाला करता येईल. आमेन!

उपक्रमावर याआधी प्रसिद्ध झालेल्या परिक्षणाला वाचायच्या आधीच हा लेख लिहिलेला होता. म्हटलं इतके भारंभार लेख येत असतात (याचा अर्थ आधीचे परीक्षण असा घेऊ नये. इतर भारंभार लेख असा घ्यावा. :-) मग आपण लिहिलेला रिव्ह्यू उर्फ परिक्षणाचा लेख कचर्‍यात का टाकायचा? त्यामुळे उपक्रमवासियांना अजून एका परिक्षणाची मेजवानी मिळते आहे. परत एकदा आमेन!

Comments

हेही परीक्षण, रसग्रहण आवडले.

गेल्या वीसपंचवीस वर्षात वाचून मिळालं नसेल इतकं या कादंबरीनं मला (माझ्याबद्दल बोलतो आहे मी) वाचतानाच्या चार दिवसात दिलं असं म्हणता येईल. त्यामुळे तरी वाचलीच पाहिजे अशी माझ्यामते ही कादंबरी आहे. मलपृष्ठावर म्हटल्याप्रमाणे जीवनाची व्यापकता, व्यामिश्रता यांचे दर्शन घडवणे जसे महाकाव्याकडून अपेक्षित असते तसेच ते कादंबरीकडूनही असते आणि हिंदू त्यात यशस्वी झाली आहे.

-असेच म्हणतो.

मीही हिंदूचे एक परीक्षण लवकरच लिहीणार आहे. ;)
भारंभार परीक्षण लेखांमध्ये आमचीही काडी. (अख्ख्या बाजारात आमचंच गवत स्पेश्शल आणि अस्सल आहे. कोपर्‍यात का होईना, आमचाही स्टॉल असावा म्हणून रुमाल टाकून ठेवतो.)

लिहा...

येऊद्या तुमचीही काडी मग लवकर. अरेरे, पण प्रतिसाद दिल्याने आता रुमाल हलला. :-)

==================

फायरफॉक्ससाठी एक आमचाही पर्सोना.

खंडेरावाचा भाऊ

हेही रसग्रहण आवडले. विसुनानांच्या व इतरांच्याही रसग्रहणाची वाट पाहत आहे.

याला भाऊ आहेत, बहिणी आहेत.

रसभंग होऊ नये म्हणून व्हैट अक्षरांत. इच्छुकांनी स्वतःच्या जबाबदारीवर ओळ वाचावी.
खंडेरावाला भाऊ होता. भावड्याच्या अकाली निधनाचा संदर्भ त्यात आला आहे. पांडुरंगाला आणि खंडेरावाला दोघांनाही बहिणी आहेत.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

तुमचा रुमाल कुठे आहे?

विसुनानांच्या व इतरांच्याही रसग्रहणाची वाट पाहत आहे.

अरे, तुमचा रुमाल टाकला नाही? छे, हे काही बरोबर नाही. वाटल्यास तुमची जागा धरून ठेवतो. ;)

हो की मग...

खंडेरावाला भाऊ आहेच की मग. मी आधी मकडूलाही भाऊच समजून चाललो होतो. त्यामुळे भाऊ आहेत असे लिहिले.
शिवाय पांडुरंगाला पण बहिणी आहेतच. पण वंशाचा दिवा तो एकुलता एकच आहे. तसे खंडेरावाचे नाही. भावडूच्या नंतर तो एकुलता राहिला आहे.

तुम्हाला काय म्हणायचे आहे ते नीट कळलेच नाही.

==================

फायरफॉक्ससाठी एक पर्सोना.

सॉरी


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

गुंगी !!

>>> तात्पर्य विचाराल तर ही कादंबरी वाचणं हा एक अनुभव होता. <<<

हाच अनुभव सध्या घेतोय. अजून वाचन संपलेले नाही (त्यामुळे या सुंदर अभ्यासू परिक्षणावर लिहिलेले नाही). एका मित्राने सल्ला दिला होता की, 'कादंबरी फक्त रात्रीच्या वेळी, टीव्ही, बातम्या, रेडिओ, मोबाईल हे बाजूला ठेवून वाच...`, त्याने असे का सांगितले ते पहिल्या शंभर पानातच कळते. लेखनाची विलक्षण जादू असलेले नेमाडे स्वतःसमवेत वाचकालादेखील मोहोनजडो आणि पाकिस्तानातील विविध प्रांतात घेऊन जातातच पण तेथून इकडेतिकडे न सोडता थेट मोरगावात आणतात आणि मग त्या ठिकाणाहून, त्या गोतावळ्यातून आपण बाहेर पडूच शकत नाही, असा थरारक प्रवास आहे, ही कादंबरी म्हणजे !

वर्थ वेटिंग !! गुंगीच आहे ही एक प्रकारची ~~ (झळझळीत उन्हात रस्त्याची कामे करणार्‍या बाया, अन् झाडाखाली ठेवलेले पोर रडले तर कामातून यायला लागू नये म्हणून अगोदरच त्याला अंगावर दूध पाजताना त्यांनी स्तनाला अफूची बोंडे लावणे अन् दीर्घकाळ त्याला झोपविणे.... हा प्रकार अंगावर काटा आणणारा आहे.)

गांधींच्या सर्वभक्षक हिंदुत्वाला घाबरुन मुसलमानांनी..

हे कळाले नाही.

हे तुम्हाला म्हणायचे आहे की नेमाड्यांना ? नक्की कळाले नाही. कादंबरी वाचल्यावर कळू शकेल काय ?

मला येथेही भेट द्या.
http://rajdharma.wordpress.com

+१

मीही हेच विचारणार होतो.

सिंधी पात्र

कादंबरीत कराचीमधील एक सिंधी पुढारी 'गोप भंभाणी' वरील मत व्यक्त करतो. त्याच्या मते "मुसलमानांना अशी सतत भीती वाटत होती की, 'ईश्वर अल्ला तेरे नाम' म्हणत गांधीबाबा सर्वांनाच एक दिवस हिंदू करून टाकणार म्हणून अखंड हिंदुस्थान नको"..... वगैरे वगैरे !

सिंधी पात्र.........

कमाल आहे ! एकडे अजुनही लोक गांधीबाबाला पाकधार्जिणे म्हणून शिव्या घालताहेत....असो. हे कादंबरीतील पात्राचे मत आहे असे म्हणता तर जास्त चर्चा करण्यात काही हशील नाही. पण बरेच वेळा पात्राचे मते हे लेखकाचे मत असू शकते. (तसे येथे आहेच असे नसावे.) एकंदरीत कादंबरी लवकरात लवकर वाचायलाच हवी. न जाणो कोणत्या ना कोणत्या कारणामुळे गहजब व्हायचा आणि बंदी यायची.

मला येथेही भेट द्या.
http://rajdharma.wordpress.com

फाळणी

हे विचार पात्राचेच आहेत. भंभाणी असं म्हणतो की पाकिस्तान जीनामुळे जितका झाला नसेल तितका गांधींमुळे झाला. कारण गांधीजींच्या प्रार्थना, भजनं, उघडं शरीर, महिनोन महिने उपवास यामुळे मुसलमान घाबरले. शिवाय सतत मुसलमानांची बाजू घ्यायची आणि दाखवायला दिलदार हिंदू, त्यामुळे गांधीजींचा संशय यायला लागला. गांधीजी कॉंग्रेसचे सर्वेसवा नसते आणि त्याऐवजी पटेल, नेहरु, सुभाषचंद्र असते तर पार्टिशनचं मुसलमानांच्या लक्षातही आलं नसतं.

बाकी कादंबरीतला काही भाग विवादास्पद होऊ शकला असता. कारण महानुभावांच्या पाच नामांपैकी जी या पंथात अगदीच महत्त्वाची मानली जातात ती सरळ छापली आहेत जी माझ्या मते या पंथाचा उपदेश घेतल्याशिवाय कुणाला मिळत नाहीत किंवा मिळणे बरोबर समजले जात नाही. अर्थात महानुभावांचा वारकर्‍यांसारखा दबावगट नसल्याने यादवांच्या तुकारामचं झालं तसं करणं महानुभाव पंथियांना जमण्यासारखंही नाही. कधी कुणाच्या लक्षात आलंच तर ते आवाज उठवतील पण त्याचा परिणाम कितपत होईल शंका आहे. कदाचित कुणाला आक्षेपार्ह वाटणारही नाही.

-सौरभ.

==================

फायरफॉक्ससाठी एक पर्सोना.

महानुभाव

महानुभावांच्या पाच नामांपैकी जी या पंथात अगदीच महत्त्वाची मानली जातात ती सरळ छापली आहेत जी माझ्या मते या पंथाचा उपदेश घेतल्याशिवाय कुणाला मिळत नाहीत किंवा मिळणे बरोबर समजले जात नाही.

सायंटॉलॉजीसारखेच दिस्ते!

महानुभावांचा वारकर्‍यांसारखा दबावगट नसल्याने

वि.भि. कोलते यांना ५००० दंड झाला.

कधी?

वि.भि. कोलते यांना ५००० दंड झाला.

जरा सविस्तरता का?

-सौरभ.

==================

फायरफॉक्ससाठी एक पर्सोना.

दुरुस्ती

दंड २५००० रु. होता, टंकनदोषाबद्दल क्षमस्व. एक दुवा सापडला आहे. कोलते यांच्या मृत्यूनंतर इतरांवर दावा चालू होता असे दिसते. या निकालात कोलते यांच्या हयातीतील खटल्यांचे उल्लेख आहेत पण ते मी न्यायालयाच्या संस्थळावर शोधले नाहीत.

आभार

सर्वप्रथम ह्या लै भारी परिक्षणाबद्दल आभार.. सौरभने ही कादंबरी नुसती वाचली नाहि तर वाचताना अनुभवली आहे हे परिक्षण वाचतानाच कळते. पुस्तकाचा सचित्र परिचय, परिचय करून देण्याची अदा (शैली पेक्षा अदाच) खूप आवडला.

आतापर्यंत ग्रंथालयात आल्यावर वाचुन घेऊ म्हणत होतो.. पण आता घेऊनच येतो.. उत्सुकता जास्त ताणली गेलीये

अवांतरः सर्व वाचकांना विनंती की पुस्तकविश्चवरही हे परिचय येऊ दे. भविष्यात तिथे सर्व संबंधित परिक्षणे पुस्तकावरून एकत्र शोधायला सोपी जातील

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

असंच म्हणतो

आपल्याला म्हणायचं कोणीतरी आधीच म्हणून ठेवलेलं किती बरं असतं...

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

यश

परिक्षण वाचून माझा आधी कादंबरी न वाचण्याचा विचार बदलला. यातच परिक्षणाचे यश आहे असे वाटते. अनेक आभार.

-
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

विचार बदलल्याबद्दल

अभिनंदन. मनुष्याने ... असो. ;)
तोटा नक्कीच होणार नाही.

आवडले

परिक्षण आणि परीचय आवडले. असे वाटले की मी का हे लिहिले नाही.

उपक्रमावर याआधी प्रसिद्ध झालेल्या परिक्षणाला वाचायच्या आधीच हा लेख लिहिलेला होता. म्हटलं इतके भारंभार लेख येत असतात (याचा अर्थ आधीचे परीक्षण असा घेऊ नये. इतर भारंभार लेख असा घ्यावा. :-) मग आपण लिहिलेला रिव्ह्यू उर्फ परिक्षणाचा लेख कचर्‍यात का टाकायचा? त्यामुळे उपक्रमवासियांना अजून एका परिक्षणाची मेजवानी मिळते आहे. परत एकदा आमेन!

अजून भरपूर परिक्षणं येऊ शकतात. एकाच गोष्टीच्या अनेक अर्थ आणि जाणीवा ही पण या कादंबरीची खासियत आहे.

कथेत कधी कधी कालविसंगती वाटणारी विधाने येतात. पण त्यांच्या इतर अभ्यासपूर्ण विधानांमुळे आपली माहिती तपासून पहाविशी वाटते. मला असे वाटते की सिंधी (हिंदू) पुढारी हा खरा असावा. (ते कादंबरीतले पात्र नाही.) १९६०-६२ मधे मराठवाडा विद्यापीठ नामांतराची चळवळ होती हे वाचून असेच आश्चर्य वाटले होते. (मला वाटायचे की ती ७० च्या दशकातली). पण कदाचित ते खरे असेल.

प्रमोद

सीडीचा उल्लेख : काळाचा गोंधळ

पहिल्याच प्रकरणात सीडीचा उल्लेख करून लेखकाने गोंधळ माजवला आहे.
१९७१ साली 'काँपॅक्ट डिस्क' किंवा तिचे लघुरूप 'सीडी' असेल असे स्वप्नातही पटत नाही.
त्यावेळी काँपॅक्ट टेपरेकॉर्डरही भारतात तसे दुर्मिळच होते.

झेरॉक्स ??

वरीलप्रमाणेच "काळ" विसंगतीची काही उदाहरणे आहेतच. उदाहरणार्थ ~~ युनेस्कोच्या प्रोजेक्टसाठी सन १९६३ साली पाकिस्तानच्या सक्कर धरण परिसरात सिंधुनदीच्या तळपातळी सभोवती संशोधकांचा कॅम्प अन् तिथे भारतातील डॉ.सांखळीया, पाकिस्तानातील डॉ.जलील, काही अमेरिकन, ब्रिटिश यांच्यासमवेत नायक खंडेरावही आहे. कँम्पची मुदत संपत येते त्यावेळी कामाच्या उरलेल्या धबडग्यात खंडेराव प्रोजेक्टची जी कामे करतो त्याचा उल्लेख करताना म्हणतो, "नकाशे जुळवून रेषा पक्क्या करणे, ड्राफ्ट्समनकडून् नकाशे करून त्यांच्या शंभर झेरॉक्स प्रती त्या त्या फायलीत् लावणे...." इ. इ.

माझी शंका '१९६३' साली भारतात (वा पाकिस्तानमध्ये) झेरॉक्स सिस्टीम होती? माझ्या माहितीनुसार भारतात सन १९७५ पर्यन्त तरी "झेरॉक्स" ही सोय नव्हती. (की होती?).

(अर्थात या छोट्या छोट्या उदाहरणांचा आणि कादंबरीच्या महतेचा काही संबंध नाही.)

सांकलिया

डॉ.सांखळीया हे कल्पित पात्र आहे की खरे? कारण डेक्कन कॉलेजमधील पुरातत्वविभागात डॉ. सांकालिया बरीच वर्षे संशोधन करत होते.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

डॉ.सांखळिया

>>> कारण डेक्कन कॉलेजमधील पुरातत्वविभागात डॉ. सांकालिया बरीच वर्षे संशोधन करत होते. <<<

कादंबरीत असा उल्लेख आहे ~~ "डेक्कन कॉलेजात मी आणि मंडी (लंडन विद्यापीठातील एक ब्रिटीश तरूणी) गेल्या वर्षी रुजू झालो - मी सांखळिया सरांकडे पीएचडीचा विषय पक्का करण्यासाठी गेलो."

त्यामुळे आपण म्हणता तेच डॉ.सांकालिया या "खंडेरावा"चे गाईड असणार.

हो...

तसेच असावे. नेमाडे यांनीही कादंबरीतले पुरातत्व वगैरे त्यांचे शिकवण्याचे विषय असल्याचे स्टार माझाच्या मुलाखतीत सांगितले होतेच. त्यामुळे हे सांखळिया खरेच त्यांचे गाईड असावेत.

-सौरभ.

==================

फायरफॉक्ससाठी एक पर्सोना.

झोपेशी मात्र नक्कीच संबंध

(अर्थात या छोट्या छोट्या उदाहरणांचा आणि कादंबरीच्या महतेचा काही संबंध नाही.)
संपादकांच्या झोपेशी मात्र नक्कीच संबंध आहे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

तिथेही

संपादकांच्या झोपेशी मात्र नक्कीच संबंध आहे.

नेमाडेंची वाक्ये उडविल्यावर झालेल्या व्य.नि. देवाणघेवाणीचे धागे छापणार आहेत का?

??

>>> संपादकांच्या झोपेशी मात्र नक्कीच संबंध आहे. <<<

यू मीन मि.रामदास भटकळ अँड को ??

अर्थातच!

यू मीन मि.रामदास भटकळ अँड को ??
अर्थातच. तुमच्या आणि इतर उपक्रमींच्या लक्षात आलेल्या झेरॉक्स, सीडी सारख्या कालविसंगती संपादकांच्या लक्षात आल्या नसल्यास त्यांनी झोपण्यासाठीच पैसे घेतले असावेत. कालविसंगती त्यांच्या लक्षात येऊनही त्यांनी लेखकाच्या लक्षात आणून दिल्या नसल्यास त्यांच्यापेक्षा पॉप्युलर प्रकाशनातला सांगकाम्या प्यून बरा! वरील गोष्टी भटकळांच्या कशा बरे लक्षात आल्या नाहीत? मार्केटिंगकडे जेवढे लक्ष दिले त्याच्या १० टक्के लक्ष संपादनाकडे द्यायला हवे होते. असो.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

संपादक की मुद्रितशोधक?

एक तर ही कादंबरी असल्याने त्याला संपादक नसणार हा माझा अंदाज आहे. आणि अशा चुका शोधणे हे काम संपादक असले/नसले तरी मुद्रितशोधकाचे असते असे मला वाटते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

संपादन/मुद्रितशोधन

>>> तरी मुद्रितशोधकाचे असते असे मला वाटते. <<<

मला वाटते श्री.धम्मकलाडू म्हणतात तसे कालविसंगतीच्या काही चुका या "संपादन" टेबलशीच निगडित आहेत. मुद्रितशोधकाचे काम "जसे आहे तसे तपासणे" इतकेच असते (ही बाब मी आज मुद्दाम एका प्रकाशन संस्थेत काम करीत असलेल्या ओळखीच्या गृहस्थाकडून माहित करून घेतली.)

उदा. "भारतातील पहिली रेल्वे ठाणे-मुंबई मार्गावर धावली." असे जर छापल्या जाणार्‍या क्रमिक पुस्तकात वाक्य असेल तर इथे संपादकाचे काम आहे की, ते वाक्य "मुंबई-ठाणे मार्गावर धावली" असे करणे. पण त्याच्या नजरेतून ही बाब सुटली तर "मुद्रितशोधक" हे वाक्य मूळ कॉपीत तसेच असेल तर ते त्याच्या अखत्यारीत तो तसेच ठेवेल. (मात्र छपाईत "ठाणे" शब्द "ठाने" असा पडला असेल तर मात्र नक्कीच योग्य ती दुरुस्ती करेल.)

काही प्रकाशन संस्थात त्या त्या विषयातील विद्यापीठातील "एक्स्पर्ट" मानधन तत्वावर नियुक्त केलेले असतात आणि मुद्रितशोधनानंतर "अखेरचा हात" फिरविण्यासाठी (विशेषत: वर नेमाडे यांच्या कादंबरीतील विसंगतीची उदाहरणे टिपण्यासाठी) मुद्रणप्रत त्यांच्याकडे दिली जाते. अर्थात ही बाब मुख्यतः क्रमिक पुस्तकाबाबत कटाक्षाने पाळली जाते. ललित वाङ्मयाबाबत असे केले पाहिजे, पण प्रकाशकांना लेखक "खपाऊ" वाटत असल्याने त्यांच्यात बेफिकीरी येतेच येते. त्यातूनही वर्तमानपत्रातून वाद झालाच तर ठरलेले उत्तर असतेच "पुढील आवृत्तीत या चुका काढल्या जातील."

आवडले

भारावून जाऊन लिहिलेले छान परीक्षण. आवडले. वाचकही परीक्षण वाचून भारावून जाऊ शकतात. अर्थात मराठीचे जगच एवढे छोटे आहे की एवढा मोठा कॅनवास मराठीत हाताळल्यावर मराठीच्या वाचकांना तसे वाटल्यास नवल नाही.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

भारावणे

एवढा मोठा कॅनवास मराठीत हाताळल्यावर-

-नाही हो. मोठाबिठा कॅनवासबिनवास नाही. एका किरकोळ खेड्यातली जमीन आहे ती. (जमीन - जशी गझलेची असते तशीही)
आकाशाच्या कॅनव्हासवर काल्पनिक चित्र रेखण्यापेक्षा पायाखालच्या मातीत खरोखरच्या रेघोट्या मारणे बरे, हॉ,हॉ,हॉ -
असे 'देशीवादी'/नेमाडपंथी वाक्य डोक्यात आले.;)

वाटच बघत होतो...

कुणीतरी 'भारावून लिहिलेले परीक्षण आवडले' हे प्रतिसादात लिहणार हे मला माहितच होते. अगदी पहिलाच प्रतिसाद असा येईल इतपत मी तयारी ठेवली होती. पण असा प्रतिसाद यायला उशीर झाला. :-)

लेख लिहिल्यावर जेव्हा मी परत उपक्रमवर आलो (कारण सलग हिंदूच वाचत असल्याने चारपाच दिवस आलो नव्हतो) तेव्हा सहस्त्रबुद्धे यांचं अगदी हातचं राखून लिहिलेलं परीक्षण वाचलं तेव्हा मला वाटलं की अरे हे सहस्त्रबुद्धे असं लिहितात आणि आपण तर अगदी तोंड फाटण्याइतपत स्तुती केली आहे. मग आता काय करावं? पण नंतर 'लोकांकडे लक्ष देऊ नये' हा माझा नेहमीचा निश्चय कामी आला आणि मी माझ्या लेखात बदल केले नाहीत.

आता माझं मत असं आहे की उपक्रमावरचे काही काही मराठी लोक कुणाचंही कौतुक करायचं झालं तर हजारदा विचार करतात आणि हजारदा विचार केला तरी हे कौतुक करतीलच असं नाही. कारण बरेच प्रकांडपंडित आहेत. (हो असे सदस्य उपक्रमावर आहेत.) आणि हे एकतर नियोजन समितीवर तरी जायचे किंवा चढतचढत युनोचे अध्यक्ष तरी व्हायचे पण सगळीकडे मेला वशिल्याचा कारभार असल्याने हे इकडे मसावर येऊन इतरांचं जरा ज्ञान वाढावं या हेतूने मौलिक चर्चा करतात, विचार मांडतात आणि त्यांचा बहुमूल्य वेळ वाया गेल्याबद्दल तक्रारही करत नाहीत.

बघा आता असं काही नेमाडे ष्टाईल मी लिहून बसलो. आता हा हिंदूचा विजय की पराभव? :-)

तात्पर्य काय (परत एकदा) तर हिंदू वाचून एका वीसपंचवीस वर्षाच्या नेमाडेपंथी नसलेल्या ( हो कारण दुसरे तर फक्त कोसलाच वाचले आहे मी, चांगदेव चतुष्टय वाचायचे आहे अजून ) मुलाची काय प्रतिक्रिया झाली हे प्रामाणिकपणे मांडणे जास्त महत्त्वाचे (मला) वाटते. शिवाय मी तसा अजूनही बर्‍याच गोष्टी बघून भारावून जातो. हे चांगले की वाईट हे मात्र अजून कळालेले नाही. कदाचित मी अजून तेवढा निर्ढावलेलो नसेन. (मराठी सायटींवर वेळ काढूनही. )

त्यामुळे तुम्ही म्हणता तसे मराठीतल्या या एवढ्या छोट्या जगात एकतर भारावून जाण्याचे प्रसंग आम्हाला सारखे सारखे मिळत नाहीत. त्यामुळे तुम्ही म्हणता तसेच आम्ही भारावून गेलो तर त्यात काही नवल नाही. बरोबर आहात तुम्ही!

-सौरभ.

==================

फायरफॉक्ससाठी एक पर्सोना.

खरे आहे

आता माझं मत असं आहे की उपक्रमावरचे काही काही मराठी लोक कुणाचंही कौतुक करायचं झालं तर हजारदा विचार करतात आणि हजारदा विचार केला तरी हे कौतुक करतीलच असं नाही.

खरे आहे फक्त उपक्रमावरचेच असे नाही. एकूणातच मराठी माणूस दिलखुलास दाद द्यायला कचरतो असा अनुभव आहे.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

उशीर झाला नाही

कुणीतरी 'भारावून लिहिलेले परीक्षण आवडले' हे प्रतिसादात लिहणार हे मला माहितच होते. अगदी पहिलाच प्रतिसाद असा येईल इतपत मी तयारी ठेवली होती. पण असा प्रतिसाद यायला उशीर झाला. :-)

उशीर झाला नाही. दयाभावनेतून प्रतिसाद आधी टाकला नाही असे समजा असे ठळकपणे लिहिणार होतो.

आता माझं मत असं आहे की उपक्रमावरचे काही काही मराठी लोक कुणाचंही कौतुक करायचं झालं तर हजारदा विचार करतात आणि हजारदा विचार केला तरी हे कौतुक करतीलच असं नाही. कारण बरेच प्रकांडपंडित आहेत. (हो असे सदस्य उपक्रमावर आहेत.) आणि हे एकतर नियोजन समितीवर तरी जायचे किंवा चढतचढत युनोचे अध्यक्ष तरी व्हायचे पण सगळीकडे मेला वशिल्याचा कारभार असल्याने हे इकडे मसावर येऊन इतरांचं जरा ज्ञान वाढावं या हेतूने मौलिक चर्चा करतात, विचार मांडतात आणि त्यांचा बहुमूल्य वेळ वाया गेल्याबद्दल तक्रारही करत नाहीत.

वरील वाक्ये म्हणजे पेनकिलर गोळ्या आहेत. चालू द्या.

तात्पर्य काय (परत एकदा) तर हिंदू वाचून एका वीसपंचवीस वर्षाच्या नेमाडेपंथी नसलेल्या ( हो कारण दुसरे तर फक्त कोसलाच वाचले आहे मी, चांगदेव चतुष्टय वाचायचे आहे अजून ) मुलाची काय प्रतिक्रिया झाली हे प्रामाणिकपणे मांडणे जास्त महत्त्वाचे (मला) वाटते. शिवाय मी तसा अजूनही बर्‍याच गोष्टी बघून भारावून जातो. हे चांगले की वाईट हे मात्र अजून कळालेले नाही. कदाचित मी अजून तेवढा निर्ढावलेलो नसेन. (मराठी सायटींवर वेळ काढूनही. )

तुम्ही फक्त वीसपंचवीस वर्षांचे आहात हे खरेच माहीत नव्हते. हे वयच भारावून जाण्याचे असते. भारावून जात राहा.मलाही स्तुती आणि परीक्षण ह्यातला फरक कळला नाही हे खरेच.

प्रामाणिक अवांतर:
तुम्ही छानच लिहिता हो. तुमचा ब्लॉगही छान आहे. लिहीत राहा.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

:)

आता माझं मत असं आहे की उपक्रमावरचे काही काही मराठी लोक कुणाचंही कौतुक करायचं झालं तर हजारदा विचार करतात आणि हजारदा विचार केला तरी हे कौतुक करतीलच असं नाही. कारण बरेच प्रकांडपंडित आहेत. (हो असे सदस्य उपक्रमावर आहेत.) आणि हे एकतर नियोजन समितीवर तरी जायचे किंवा चढतचढत युनोचे अध्यक्ष तरी व्हायचे पण सगळीकडे मेला वशिल्याचा कारभार असल्याने हे इकडे मसावर येऊन इतरांचं जरा ज्ञान वाढावं या हेतूने मौलिक चर्चा करतात, विचार मांडतात आणि त्यांचा बहुमूल्य वेळ वाया गेल्याबद्दल तक्रारही करत नाहीत.

:) आवडले.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

छान परिचय

असा परिचय आल्यावर मग पुस्तक वाचायचीच गरज वाटणार नाही. फार तर चाळू
बाकी कालविसंगत उदाहरणे लेखकापर्यंत पोचायला हवीत.
प्रकाश घाटपांडे

वाचणे फार गरजेचे आहे.

>>> असा परिचय आल्यावर मग पुस्तक वाचायचीच गरज वाटणार नाही. फार तर चाळू <<<

असे म्हणू नका, सर ! तुम्ही स्वतः एक चांगले लेखक आहात, त्यामुळे "वाचना"चे महत्व तुम्हाला अधिकपणे पटवून सांगणे गरजेचे नाही. फार सुंदर वर्णन आहे खानदेशातील समाज जीवनाचे. श्री.नेमाडे यांची मराठी भाषेवर असलेली स्पृहणीय पकड पहिल्या शंभर पानातच जाणवते.

तुम्ही वाचाच.

अरेरे!

निकट भविष्यात तरी हे पुस्तक वाचायला मिळेल असे वाटत नाही याची खंत वाटली.

असो. परीक्षण आणि परीक्षणाची मांडणी आवडली.

कालविसंगती हेतुपुरस्सर?

कालविसंगतीची उदाहरणं मुद्दाम तर घातलेली नसतील? एक प्रकारचा एलिएशन इफेक्ट म्हणून? कथेच्या प्रवाहात वाचक वाहून जाऊ नये, कथेतल्या पात्रांच्या सुखदु:खांशी एकरूप होण्यामुळे निर्माण झालेल्या भावनिक नात्यांत वाचकानं विचार करायचं विसरून जाऊ नये म्हणून काहीतरी अनपेक्षित आणि मुद्दाम घातलेलं जाणवेल असं मध्येच कुठेतरी घालणं हे त्या घाटातलं एक मूलभूत तंत्र आहे.

अवांतरः हे तंत्र देशी नाही, पण तसंही नेमाड्यांना विदेशी गोष्टींचं वावडं नाहीच आहे ;-)

- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

गूढ वाक्य

कालविसंगतीची उदाहरणं मुद्दाम तर घातलेली नसतील? एक प्रकारचा एलिएशन इफेक्ट म्हणून?
हा इफेक्ट नाटक-सिनेमांशिवाय कांदबरीतही वापरतात तर.

अवांतरः हे तंत्र देशी नाही, पण तसंही नेमाड्यांना विदेशी गोष्टींचं वावडं नाहीच आहे ;-)
जंतूमहोदय, काही कळले नाही. शेवटच्या भावचिन्हामुळे वाक्य अधिकच गूढ झाले आहे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

देशी-विदेशी

अवांतरः हे तंत्र देशी नाही, पण तसंही नेमाड्यांना विदेशी गोष्टींचं वावडं नाहीच आहे ;-)
जंतूमहोदय, काही कळले नाही. शेवटच्या भावचिन्हामुळे वाक्य अधिकच गूढ झाले आहे.

मराठी साहित्यप्रांतात नेमाडे हे "देशीवादा"चे अध्वर्यू समजले जातात. असे असतानाही , एलियनेशन यांसारख्या पाश्चात्य - पर्यायाने - विदेशी संकल्पनेचा उपयोग त्यांनी आपल्या साहित्यकृतींमधे केला असा , जिंतातूर जंतूनी उपयोजिलेल्या "भावचिन्हा"मागचा विनोद असावा. चूभूदेघे.

सानेगुर्जी आम्हालाही आवडतात

मराठी साहित्यप्रांतात नेमाडे हे "देशीवादा"चे अध्वर्यू समजले जातात.

नक्कीच. सानेगुर्जी आम्हालाही आवडतात आणि ते सिगारेटऐवजी बिड्या पितात/वढतात म्हणे.

असे असतानाही , एलियनेशन यांसारख्या पाश्चात्य - पर्यायाने - विदेशी संकल्पनेचा उपयोग त्यांनी आपल्या साहित्यकृतींमधे केला असा , जिंतातूर जंतूनी उपयोजिलेल्या "भावचिन्हा"मागचा विनोद असावा. चूभूदेघे.
पण ( केवळ) डिस्टंसिंग इफेक्टकडे इशारा नसावा असे वाटते.

माझ्या मागच्या प्रतिसादात स्मायली विसरून गेलो होतो.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

अगदी बरोबर

मराठी साहित्यप्रांतात नेमाडे हे "देशीवादा"चे अध्वर्यू समजले जातात. असे असतानाही , एलियनेशन यांसारख्या पाश्चात्य - पर्यायाने - विदेशी संकल्पनेचा उपयोग त्यांनी आपल्या साहित्यकृतींमधे केला असा , जिंतातूर जंतूनी उपयोजिलेल्या "भावचिन्हा"मागचा विनोद असावा. चूभूदेघे.

'कॅचर इन द राय'वरून् कोसला उसनी घेतल्याचा दावाही आमच्या मनात होताच. उसनं घ्यायचं ते घ्यायचं अन् वर 'देशीवाद' म्हणून नगारे बडवायचे तर मग आमच्याकडून काही भावचिन्हं त्यांना अर्पण होणार नाहीत तर काय! असो. (तरीही हिंदू वाचणारच)

- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

फोटो

मुखपृष्ठाचा फोटो लहान केल्यास लेख व प्रतिसाद नीट वाचता येतील.
'संपादकांच्या झोपेशी मात्र नक्कीच संबंध आहे.' हे धम्मकलाडूंच्या प्रतिसादातील वाक्य मात्र वाचता आले.

अरेरे अरेरे अरेरे...

ऋषि आणि प्रियाली यांना आवडलेले सादरीकरण केवळ क्रेमर यांच्यामुळे संपादकांनी संपादित केले काय?

हिंदूचे अवाढव्यपण ठसवण्यासाठी आम्ही जे विचारपूर्वक आणि मुद्दाम सादरीकरण केले, फोटोशॉपमध्ये किडे करत एवढे तास वाया घालवले त्याचे रुपडे संपादकांनी पार बिघडवून टाकले असे मला वाटते आहे. बरं लहान केल्यावरही ते किमान आधीसारखे ठेवता आले असते तसेही झालेले नाही. सगळेच विस्कळीत दिसते आहे.

:-(

-सौरभ.

==================

फायरफॉक्ससाठी एक पर्सोना.

अरेरे...

बरं लहान केल्यावरही ते किमान आधीसारखे ठेवता आले असते तसेही झालेले नाही. सगळेच विस्कळीत दिसते आहे.

तुम्हालाच स्वयंसपादनाचा अधिकार असता तर तुम्ही पुन्हा मेहनतीने आधीसारखे ठेवले असते. पण संपादकांकडे इतका वेळ व उत्साह स्वाभाविकपणेच नसणार. तेव्हा स्वयंसंपादनाच्या अधिकाराची आवश्यकता तुमच्या प्रतिसादावरून ध्यानात येत आहे.

सुटलेला बाण

पहिला प्रतिसाद मिळेपर्यंतच स्वसंपादनाची सुविधा ठीक आहे. चर्चा सुरू झाल्यावर (शुद्धलेखन वगळता) स्वसंपादन करणे चूक आहे. अन्यथा किमान एक आवृती नियंत्रण व्यवस्था असावी.

उत्तम परीक्षण

परीक्षण उत्तम झाले आहे. हिंदू आता नक्कीच वाचू.

नेमाडे हे अनेक मराठी लेखकांप्रमाणे ६०-७० च्या दशकाचे कैदी आहेत असे मलाच एकट्याला जाणवत आहे का?

 
^ वर