हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ : चार शब्द


कोण आहे मी?
    मी मी आहे, खंडेराव.
    ह्यावर स्तब्धता. मग मी विचारतो, तू कोण?
    मी तू आहेस, खंडेराव.
    अंमळ चुळबुळत्साता मी म्हणतो, म्हणजे? तुलाच मी मी कोण असं विचारलं? म्हणजे स्वत:लाच मी कोण आहे, असं? मग तो कोण? मीच?
    आत्ता बरोबर. तरच आपल्याला काहीतरी सांगता येईल, खंडेराव. मी तू तो एकच.
    ह्यावर सामसूम. किती एक शतकांची. नि:शब्द.
    आणि खंडेराव, फक्त गोष्टच सांगत जा राव.

    अशी हिंदूची सुरुवात आहे. एका भयंकर, जगड्व्याळ रोलरकोस्टरवर घेऊन जाणारी महाकादंबरी. बरीच वर्षं येणार म्हणून गाजलेली. पण आल्यावर, वाचल्यावर एवढा वेळ लागला तो साहजिकच आहे असं मान्य करायला लावणारी.

    एका भल्या मोठ्या पृष्ठभागावरचा एक अतिविशाल देखावा. तो कधीच एका नजरेत येत नाही. तुकड्यातुकड्याने पहावा लागतो. त्यात काय नाही? हा खंडेराव आहे, खंडेराव विठ्ठल मोरगावकर! त्याचं खानदेशातलं मोरगाव, या गावाचा खंडेरावाच्या मागच्या सातव्या पूर्वजापासूनचा नागोजीरावपासूनचा इतिहास, या गावामागची सातपुड्याची डोंगररांग, तिथले आदिवासी, भलामोठा खटलं असणारं त्याचं कुणबी कुटुंब, लाख केळी असलेला त्याचा कर्तृत्त्ववान बाप, शेकडो एकरांची शेती, त्यातले सालदार, मजूर, गावातले बारा बलुतेदार, परत अगणित नातेवाईक, घरातल्या म्हातार्यार, त्यांचा भूतकाळ, नवरा मेल्यावर परत आलेल्या स्त्रिया. अजून काय सांगितलं म्हणजे कल्पना येईल? आणि खरंच कल्पना येईल? खरंच?

    हा खंडेराव पुरातत्ववेत्ता आहे. उत्खनन करतो, युनेस्को-मोहनजो-दडो १९६३ या प्रकल्पात सध्या त्याचं काम चालू आहे. मडकी जोडतो. मडकं सापडलं तिथे सांगाडा असलाच पाहिजे. दुसर्‍या दिवशी खोदायला घ्यायचा आयत नीट आखायला दोरी लागते. त्यांचा भलामोठ्या भेंडोळ्याचा गुंता सोडवायला हा रात्रभर जागतो. जाणिवांना पुरातत्त्वात स्थान का असू नये म्हणून सांखळिया सरांशी वाद घालतो. ह्याच्या बोलण्यातून मोरगावच्या वंशपरंपरागत गणिकांचे उल्लेख ऐकून कुतूहल चाळवलेल्या स्कॉटिश मंडीला हा मोरगावला काही महिने राहायलाच पाठवून देतो.

    उत्खननाबरोबरच याच्या डोक्याचंही उत्खनन चालूच आहे. पार सिंधू नदीच्या तीरावरच्या आर्यांपासून ते मोरगावातल्या लभान्यांच्या गणिका, त्यांची वंशज असलेली सध्याची झेंडी इथपर्यंतचे गुंते या खंडेरावाच्या डोक्यात भरलेले आहेत. पाकिस्तानात आलेली त्याची महानुभावांची तिरोनी आत्या, तिला शोधायला हा खटपट करतो आहे. "संपूर्ण डोक्यावरुन रजई पांघरुन आत तयार झालेल्या उबदार अंधारात गर्भाशयातल्यासारखं डोक्याकडे गुडघे घेऊन सुषुप्तीच्या अबोध अवकाशात तरंगणारा" हा असा खंडेराव आहे.

    संपूर्ण कादंबरीभर पसरलेले अगणित लोकजीवनाचे संदर्भ, महानुभावांचे संदर्भ, परत लोकगीतं, लोककथा, म्हातार्‍याकोतार्‍यांच्या आठवणी, तुकाराम, पाकिस्तानात असताना वेड लावलेल्या गझला, गाणी, शेकडो शेर, गांधींच्या सर्वभक्षक हिंदुत्वाला घाबरुन मुसलमानांनी मागितलेला पाकिस्तान, मग फाळणी, फाळणीनंतर आपल्याच देशात परदेशी झालेले लोक, परत मोरगावचे ऐतिहासिक संदर्भ असा सगळाच हा पसारा आहे. आणि शिवाय स्वत:च्या नजरेतून या सगळ्याकडे बघणारा खंडेराव. आता अजून काय काय लिहू? आणि हे एवढं लिहून नेमाड्यांकडे तरी लिहायला आता शिल्लक काही राहिलं आहे का? असा प्रश्न पडायला लावणारी ही अडगळच आहे खरी. हिला काय नावं द्यायचं? समृद्ध? नाव बरोबर आहे मग.

    कोसलाशी हिची तुलना करायचं कारण नाही. पण दोन्हींमध्ये थोडी साम्यं आहेत. ती लगेच जाणवण्यासारखी आहेत. (हिंदूबद्दल लिहायचं काय हा अवाढव्य प्रश्न सोडवण्याकरिता ही तुलनेची पळवाट मी काढली आहे असं म्हणू फारतर.) कोसलातला पांडुरंग सांगवीकर एकुलता एक वंशाचा दिवा आहे. खंडेरावाचं तसं नाही. याला भाऊ आहेत, बहिणी आहेत. पण पांडुरंग सांगवीकरासारखाच हाही घरापासून तसा अलिप्तच आहे. कापडचोपड खरेदी करणारे हरामखोर लोक यालाही आवडत नाहीत असं म्हणता येईल. कोसलातला नायक घरी परत येतोच शेवटी. पण खंडेराव काय करणार आहे? मधुमेह झाल्यावर औषधपाणी करायलाही सवड मिळत नाही इतका भलामोठा शेतीचा पसारा त्याचा बाप घालून बसला आहे. घरातल्यांचं करता करता झिजून चाललेल्या वहिनीची बाजू घेऊन बोलताच याला टांगायला निघालेल्या लोकांकडून, बाप मेल्यादिवशीच घरातल्या सोन्याची वाटणी पोटच्या पोरींमध्ये करुन टाकणार्‍या आईपासून हा लांब जाणार यात नवल काय? तशी मग पांडुरंगाची आणि खंडेरावाची विचारपद्धती सारखीच आहे.

    सुरुवातीला पाकिस्तानातल्या उत्खननाच्या साईटवरुन सुरु झालेली कादंबरी खंडेरावाच्या वडिलांच्या मृत्यूशय्येवर असल्याच्या तारेनंतर खंडेराव मोरगावला निघतो तेव्हा फ्लॅशबॅकमध्ये शिरते आणि मधल्या रोलरकोस्टर राईडनंतर खंडेराव गावात आल्यावर त्याचे वडील जेव्हा त्याच्या मांडीवर प्राण सोडतात तिथे येऊन संपते. आता या पुढे या खंडेरावाचं काय होणार आहे? तो काय करणार आहे? हे सगळं तो मागे सोडून जाणार आहे? गेलाच तर मग या सगळ्याकडे कोण बघणार आहे? या प्रश्नांची उत्तरं पुढच्या भागातच आता मिळणार. चांगदेव चतुष्टयासारखे याचेही पुढचे भाग येणार असल्याचा उल्लेख मलपृष्ठावर आहेच. ते तरी लवकर यावेत अशी नेमाड्यांना विनंती करता येईल.

    तर शेवटी माझ्या कुवतीनुसार मला हे एवढंच लिहिता येईल असं वाटत होतं आणि तेवढंच लिहिलेलं आहे. तात्पर्य विचाराल तर ही कादंबरी वाचणं हा एक अनुभव होता. अनुभवाच्या आधी कोणतं विशेषण लावावं हे मात्र कळत नाही. गेल्या वीसपंचवीस वर्षात वाचून मिळालं नसेल इतकं या कादंबरीनं मला (माझ्याबद्दल बोलतो आहे मी) वाचतानाच्या चार दिवसात दिलं असं म्हणता येईल. त्यामुळे तरी वाचलीच पाहिजे अशी माझ्यामते ही कादंबरी आहे. मलपृष्ठावर म्हटल्याप्रमाणे जीवनाची व्यापकता, व्यामिश्रता यांचे दर्शन घडवणे जसे महाकाव्याकडून अपेक्षित असते तसेच ते कादंबरीकडूनही असते आणि हिंदू त्यात यशस्वी झाली आहे. या वाक्याची खातरजमा कादंबरी वाचल्यावर तुम्हाला करता येईल. आमेन!

उपक्रमावर याआधी प्रसिद्ध झालेल्या परिक्षणाला वाचायच्या आधीच हा लेख लिहिलेला होता. म्हटलं इतके भारंभार लेख येत असतात (याचा अर्थ आधीचे परीक्षण असा घेऊ नये. इतर भारंभार लेख असा घ्यावा. :-) मग आपण लिहिलेला रिव्ह्यू उर्फ परिक्षणाचा लेख कचर्‍यात का टाकायचा? त्यामुळे उपक्रमवासियांना अजून एका परिक्षणाची मेजवानी मिळते आहे. परत एकदा आमेन!

Comments

हिन्दु

एकच घाव
खोल,पूर्ण शक्तीनीशी,
सकारात्मक परीणामासा.....
अन्तीम उपाय`म्हणूनच........

प्रतिसाद् अगदी वर् थेव्ला तर् वेल् वाचेल्.प्रशासन् ह्यावर् विचार् करेल्?

अजून एक

कादंबरी नीट वाचली का? अनुभव वगैरे ठीक आहे. पण ही खालची लिंक वाचा. ३७वर्षे संशोधन(?) केल्यानंतर लिहीलेल्या कादंबरीत इतक्या घोडचुका कश्या असू शकतात?

http://www.evivek.com/26sept2010vishesh/index.html

हिन्दू

हिन्दू वाचल्यानन्तर गावगाडा वाचले. त्यानन्तर शेतकर्यान्चा असुड.
खरे तर उल्ट्या क्रमाने वाचायला हवे होते.

 
^ वर