वेटिंग फॉर गोदो ते द ट्रॅम्प (व्हाया बिनाका गीत माला,हिंदू,शोले इ.)
वेटिंग फॉर गोदो ते द ट्रॅम्प (व्हाया बिनाका गीत माला,हिंदू,शोले इ.)
लक्षात येणं म्हणजे समजणं वगैरे किंवा उदाहरणार्थ टाळक्यात प्रकाश पडणे. जेहत्ते कालाचे ठायी हे अमूक- तमूक असे काही फक्त मलाच उमगले असे म्हणणे म्हणजे मोठा विनोदच, हॉ,हॉ,हॉ.
हेही कुणाच्यातरी लक्षात आलं असेलच. -म्हणजे निदान असायला हवं.हॉ,हॉ,हॉ.
तर काय सांगत होतो? माणूस अनेक गोष्टी एकसमयावच्छेदेकरून करू शकतो असे ठिकाण म्हणजे त्याचे डोके.मनुष्यानेअसे करावे की नाही ही गोष्ट वायली.
***
परवा एका नाटकाला गेलो होतो.. इंग्रजीतून 'वेटिंग फॉर गोदो...'. स्टेजवर गोगो आणि डीडी गोदोची वाट पहात (आणि आमच्या आकलनशक्तीची वाट लावत) होते. असं चालू असताना अचानक एक ओळखीची, जुनी धून नाटकाच्या पार्श्वसंगीतातून कानी आली. तीच ती - बिनाका गीत मालाची सिग्नेचर ट्यून क्र. २.
आणि चमकलो. कारण ही स्वरावली तीच असली तरी वाद्ये वेगळी होती.
हे संगीत एस्पान्या कॅन्यी मुळात लमाणी लोकांचं.
***
आणि रात्री घरी आल्यावर हातात नेमाडेंची नवी सहाशे एकोणचाळीस पानी कादंबरी - हिंदू (खाली लहान अक्षरात-) जगण्याची समृद्ध अडगळ.
आमच्या गावाजवळ ओसाड पडलेलं एक हरिपुरा नावाचं खेडं आहे. तिथले लभाने लोक आपली रोजची कामं करत असताना अचानक पेंढाऱ्यांची धाड पडली आणि पळापळी झालेली आतासुद्धा दिसते : चुलीत अर्धी जळलेली लाकडं, तिथेच भाजी कापताना विळी टाकून दिलेली- म्हणजे भीतीनं पळून गेलेल्या बाया- या जाणिवा नुस्तं त्या खेडय़ात एक फेरी मारली तरी हवेत आढळतात.
हरिपुर्याचे लभाने आणि मग मोरगावात असलेली 'झेंडी' हे या कादंबरीतलं बरंच मोठं खटलं आहे.
***
कट टू... शोले - "सरदार, गाव के बाहर बंजारे आकर रुके है|"
मेहबूबा,मेहबूबा...या लभान्यांचं वर्णन नेमाड्यांनी अक्षरशः शोले पाहून केलं आहे काय असं वाटावं...
मोरगावातली झेंडी हेलनसारखी दिसत असेल काय?
***
चार्ली चॅपलिनचं 'द ट्रॅम्प'म्हणजे भटक्या-बेघर-आवारा व्यक्तीचित्र लहानपणापासून भुरळ घालत आलंय. स्थिर समाजात घुसून स्वतःचे भटकेपण विसरण्याचा त्याचा प्रयत्न 'आतले' लोक वारंवार हाणून पाडतात. (आपला राजकपूरही 'मेरा जूता है जापानी' म्हणत त्याच्या मागोमाग त्याच वाटेवरून चालला.) हा भटकेपणा चार्लीच्या गुणसूत्रातच त्याच्या बंजारा-लमाण आईकडून वारसाहक्काने आला होता.
'द ग्रेट डिक्टेटर' करताना त्याला ज्यू आणि रोमा (जिप्सी /लमाण/बंजारा) या दोघांचाही छळ करणारा हिटलर उभा करायचा होता काय? - हे दोन्ही वंश त्याच्यात होते.
या छळाला तिकडचे बंजारा म्हणतात 'काली त्रास' : Kali Traš - अक्षरशः 'काळा त्रास'.
***
आता तुम्ही म्हणाल की हा माणूस (म्हणजे मी - हॉ,हॉ,हॉ) हे तुटक तुटक ललित गद्य का लिहितोय?
तर 'एकसमयावच्छेदेकरून'-
हेच ते लोक - लमाण/बंजारा/रोमाने.
गुजरात - राजस्थान सीमेवर यांचे मूळ वसतीस्थान होते असे म्हणतात. इंग्रजांनी उगाचच त्यांना इजिप्शियन बनवले आणि त्यांचे 'जिप्सी' असे नामकरण केले.
'शिळ्या कढीला ऊत' असेल हा. हॉ,हॉ,हॉ.
तिथे लेखक म्हणतात -
मुख्यत्वे या लोकांचा उद्योग लहान मोठी कामे करून किंवा लोकांना रिझवण्याचे (संगीत, नृत्य) उद्योग करून आपले पोट भरणे असा असावा. याचबरोबर भुरट्या चोर्या, जादू, मंत्र तंत्र असेही उद्योग केल्याने सदर जमातीबद्दल स्थानिक लोकांच्या मनात किंतूच राहिला असावा. (काही प्रमाणात आपल्याकडे जे डोंबारी, फासे पारधी जातींच्या नशिबी येते तेच उपरेपण रोमांच्या नशिबी आले असावे. समाजाने त्यांच्याशी फटकून वागणे टाळता येत नाही.)
इथे तरी लमाणांना आपण कुठे आतले समजतो? झाली चोरी की -'अरे, गावकुसाबाहेर लमाणांचा तांडा आहे. त्यांचेच हे काम!" की निघालीच पोलीस पार्टी तिकडे.
कुणी म्हणतात की गझनीच्या महंमदाने त्यांना बंदी बनवून इ.स.१०००च्या आसपास अफगाणीस्तान आणि इराणात नेले. तिथून ते युरोपमार्गे अमेरिकेत (दक्षिण आणि उत्तर) पसरले. इसवीसन १५०० मध्ये ते इंग्लंडात होते कारण शेक्सपियरच्या नाटकांमध्ये त्यांचे (काही अपमानजनक) उल्लेख आहेत.
भारतातील मौखिक वाङ्मयात त्यांचा उल्लेख 'औट घटकेचा राजा शिराळशेट'च्या कथेत आढळतो. म्हणजे इ.स. १४००च्या आसपास बंजारा/लमाण हे फिरस्ते व्यापारी म्हणून शेठ सावकारांच्या दारी होते. (तसे म्हटले तर श्रीयाळषष्ठीला आपण लमाणांचीही पूजा करायला हवी.)
निजामाबाद-हैदराबाद-बीदर-(नेमाड्यांच्या 'हिंदू' कादंबरीत ऐतिहासिक तथ्य असेल तर खानदेशातील जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील) हरीपुरा - सौराष्ट्र - अफगाणीस्तान - इराण - इजिप्त - स्पेन - जर्मनी - यु.एस. - ब्राझील असे सर्वत्र आढळणारे बंजारा-मनाविरुद्ध स्थलांतरीत झाले असतील असे वाटत नाही. ते मुळात स्थिर नसावेतच - चरच असावेत.
माझ्या मताने ते मालवाहू व्यावसायिकच होते आणि इतिहासपूर्व कालापासून ते भारतापासून इजिप्तपर्यंत खुष्कीच्या मार्गाने प्रवास करत असावेत. एका ठिकाणी नागरी वस्ती करणे ही त्यांची पद्धतच नव्हे. त्यांचे नावच त्याचे द्योतक आहे - बंजारा = 'वन + चर'.
ते ऐश करतात = ते रमन्ते = रमाने = रोमाने आणि ते रमन्ते = लमन्ते = लमाने = लमाणे अशी त्यांच्या नावाची उत्पत्ती असेल काय?
त्यांच्या जगभर पसरलेल्या भाषेत संस्कृतोद्भव शब्द प्रामुख्याने आढळतात.
मराठी 'गाव'ला ते 'गाव'च म्हणतात.
मराठी सारस्वताला त्यांच्या बेबंद जगण्याची भुरळ पडलेली आहे. मंगेश पाडगावकरांचा एक काव्यसंग्रह 'जिप्सी' नावाचा आहे.
डॉ. श्रीराम लागूंचे 'लमाण' नावाचे आत्मकथन आहे. शिरवाडकरांनी 'नटसम्राट' नाटकात लमाणांची भारवाही प्रतिमा वापरलेली आहे.
एक वेगळाच विचार मनात येतो -
या जमातीच्या स्वच्छंद जीवनाबद्दल वाटणार्या सूप्त असूयेमुळे तर नागरी लोकांनी त्यांच्यावर अत्याचार केले नसतील? सौराष्ट्रात रणकंदन करणारा गझनीचा महंमद, हरीपुर्यावर तुटून पडणारे यशवंतराव होळकराचे पेंढारी, इंग्लंडात कमी लेखणारा शेक्सपियर, जर्मनीत गॅस चेंबरमध्ये कोंबणारा हिटलर, भारतात अजूनही कोणत्याही गुन्ह्यासाठी त्यांना तुरुंगात डांबणारे पोलीस - हे सारेच वसत्या संस्कृतीचे फिरस्त्या संस्कृतीवरचे आक्रमक आहेत काय?
***
इथे डोळ्यांसमोर उभा रहातो आमचा (माजी) वॉचमन रामलू. (म्हणजे तो अजूनही तिथेच वॉचमन आहे. आम्हीच त्या बिल्डिंगमधून भूतपूर्व झालो.)
त्याच्या कुटुंबाला अपार्टमेंटच्या आवारात रहायला खोली आहे. रामलू आता बंजारा वाटत नाही. त्याची बायको चांदनी घरोघरची धुणीभांडी - झाडलोट करून पैसे मिळवते. रामलूची इंग्रजी शाळेत शिकणारी मुले एकमेकांशी इंग्रजीत बोलतात. मोठी मुलगी बी.ए. झाली , जावई कुठेशी नोकरी करतो.
रामलू मात्र अजूनही दिवसभर अपार्टमेंटची कामे करतो आणि रात्रभर टुन्न असतो.
फेसबुकवर/ऑर्कुटवर त्याची मुलेही आपली ओळख निर्माण करतील आणि प्रोफाईलमध्ये 'करंट सिटी'बरोबरच 'होमटाऊन'ही लिहीतील.
निदान भारतात तरी आता त्यांनी स्थिर जीवनपद्धती अंगीकारली आहे किंवा स्थिर जीवनपद्धतीने त्यांनाही पचवले आहे.
***
हिंदू कादंबरी वाचताना हे 'टँजंट' विचार मनात आले इतकंच!
जेहत्ते कालाचे ठायी हे अमूक- तमूक असे काही फक्त मलाच उमगले असे म्हणणे म्हणजे मोठा विनोदच, हॉ,हॉ,हॉ.
हेही कुणाच्यातरी लक्षात आलं असेलच. -म्हणजे निदान असायला हवं.हॉ,हॉ,हॉ.
Comments
हिंदू कादंबरी
हिंदू एक ... अडगळ आजच वाचून संपवली.
वरील गद्य तुटक -तुटक पण जोडलेले त्याची आठवण करून देते.
महाराष्ट्रात बंजारी - बंजारा एकच का दोन असा एक मोठा वाद आहे. बंजारी लोकांचे म्हणणे आम्ही देखील बंजारा. यातील बहुतांश लोक आता स्थायी जीवन जगतात. ते व्यापारी वा मालवाहक होते.
प्रमोद
गमतीदार शैली
गमतीदार शैली आहे.
नेमाड्यांचे पुस्तक वाचायची उत्सूकता वाटते आहे.
+१
अस्सेच म्हणतो.
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
अजून मोरगांवातच
आमचा खंडेराव आताशी मोरगांवात आला आहे आणि झेंडी-हरखूची कहाणी सांगत आहे. पुस्तक पूर्ण संपल्याशिवाय प्रतिसाद लिहिणे म्हणजे उदाहरणार्थ उंटाच्या टिंब टिंब टिंबचा मुका घेणे. हॉ हॉ हॉ.
ठ्ठालवि ठ्ठालवि ठ्ठालवि ठ्ठालवि ठ्ठालवि!
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
रसग्रहण आवश्यक
वाचकालाच कॅलिडोस्कोपमध्ये घालून लोळविण्याची पद्धत रुजते आहे की काय?
पु. ना. ओकांची आठवण झाली.
हो ना.
दिवाळी अंकात लिहायची सवय असल्यासारखे वाटते आहे :)
खूपच माहितीपर लेख आहे.
>>> ऐश करतात = ते रमन्ते = रमाने = रोमाने आणि ते रमन्ते = लमन्ते = लमाने = लमाणे
ह्याच तर्काने हिप्पी आणि जिप्सी लोकांमध्ये पण काही साम्य असू शकेल का?
आणि शोले/ट्रम्प/सिबाका/शेक्सपिअर म्हणजे फारच मोठी रेंज म्हणायची हि :) भलतंच फुटेज खाल्लय.
आणि हो, हिंदू कशी आहे हो? का अमुक एक लोकांना शिव्या घातल्या आहेत? उदाहरणार्थ सावरकर वगैरे, हे म्हणजे थोर झालं.
लेख/साँगलाईन्स
आवडला. समीक्षकी भाषेत संदर्भसंपन्न म्हणावा असा. अलीकडेच ऑस्ट्रेलियातील मूळ रहिवाशांच्या सद्यस्थितीवर भाष्य करणारे 'द साँगलाईन्स' हे पुस्तक वाचनात आले, त्यातही हा भटक्या वि. स्थिरावलेल्या संस्कृतींमधला संघर्ष मांडला आहे.
त्यातलं अजून एक आठवणारं रूपक म्हणजे केन आणि एबलचं. केन हा स्थिरावलेला शेतकरी आणि एबल भटकता मेंढपाळ - आणि त्यांच्या संघर्षाचा परिणाम. Yahweh चा 'गॉड ऑफ वे' असा अजून एक अर्थ इत्यादी माहितीद्वारे हा संघर्ष फार प्राचीन आहे असं मत यात मांडलं आहे.
योगायोगाने आजच ही बातमी वाचनात आली. (फ्रान्समध्ये अवैधपणे राहणार्या जिप्सींना देशाबाहेर हाकलण्याचा आदेश)
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
वंजारी
बंजारासाठी मराठी शब्द वंजारी ना? * वाण लागलेला दिसतो. हॉहॉहॉहॉहॉ!!!!!*
हीहीहीहाहाहाहॉहॉहॉ! दुव्यावर टिचकी न मारताच शिळ्या कढीची आठवण झाली. ;-)
लेखक कुठे बिचारे म्हणायला? हे वाक्य आमच्यासारखे अर्धज्ञानी प्रतिसादी म्हणतात. ;-)
अरेच्चा! आणखी एक दुवा विसरलात. धर्मात्मामध्ये काचेच्या गोळ्यात भविष्य बघणारी नादीरा आणि दाक्षिणात्य रोमानी बंजारन हेमा. पैकी सुंदरी हेमा येथे दिसेल.
अरे हो! हा घ्या आणखी एक -
नका ठेवू किन्तु; हेलन, हेमा की नितु ते ठरवा.
अवांतरः
नाटकातली की यूट्यूबची? यू ट्यूबरच्या सिंफनीमध्ये बँड आणि ऑर्केस्ट्राची वाद्ये एकत्रित वाजताना दिसताहेत. मूळ संगिताचे एक्स्टेंशन असावे. अशाप्रकारे फायनल काउंटडाऊनपासून लेडी गागाच्या नव्या गाण्यांपर्यंत सर्व गाणी त्या भेसूर व्हायोलिनवर सुरेल वाजतात. ;-)
बंजारा = वंजारी?
बंजारा = वंजारी? वाद आहेत. इथे पहा -http://www.loksatta.com/old/daily/20040802/vishesh.htm
बंजारा = मराठी 'बंजारी' (वंजारी नाही.) असे लक्ष्मण माने म्हणतात.
शिळ्या कढीतील उद्धृते तुमची आहेत. चुकीचा उल्लेख केल्याबद्दल क्षमस्व.
'एका लेखिकेने' असे म्हणायला हवे होते.
धनगर आणि धनगड
>>> बंजारा = वंजारी? वाद आहेत. <<<
होय. या 'ब' आणि 'व' चा वाद शासनाच्या राखीव जागाच्या (नोकरी/शिक्षण/शिष्यवृत्ती) बाबती प्रकर्षाने येतो आणि याबाबत वर्षानुवर्षे कोर्टकचेर्या चालतात/चालू आहेत.
महाराष्ट्रात "धनगर" जमातीला अशा 'स्पेलिंग मिस्टेक' मोठा फटका बसला आहे. या जातीतील जे युवक सैन्यात भरती झाले त्यांच्या सर्व्हिस बुकमध्ये मिलिटरीतील रेकॉर्ड बाबूने जात रकान्यामध्ये “Dhanagar” च्या ऐवजी “Dhanagad” असा उल्लेख केला. कारण उत्तर भारतात सर्रास अखेरच्या "आर" चा उच्चारात "डी" केला जातो. नेमकी हीच बाब महाराष्ट्रात या जातीला नडली आहे. कारण या सैनिकांची मुले दिल्ली वा तत्सम परिसरातील ज्या शाळेत शिकली त्यांना जे स्कूल लिव्हींग सर्टिफिकेट मिळाले त्यात जातीच्या ठिकाणी "“Dhanagad” असा उल्लेख करून मिळाला आणि अशा नावाची जात इथे अस्तित्वात नसल्याने यांचे पाल्य अनेक सवलतीपासून वंचित राहीली आहे, त्यांचाही कोर्ट कचेर्यांचा झमेला चालू आहेच.
हॅहॅ
कसच कसचं! हे तर बहु आयामी, बहुस्पर्शी.
मुक्तक आवडले.
प्रकाश घाटपांडे
अलफातून
स्फुट अलफातून. 'समृद्ध अडगळीची' वाट पाहतो आहे. ही कांदबरी एकंदरपणे फटँस्टिकेटेड इतिहास असावा असा माझा कयास.
कांदबरी?
काय हे. पुण्यातील फलकांचा वाण नाही पण गुण लागला :-)
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
हम्म
मुक्तक आवडले पण सगळे कळलेच ही ग्यारंटी नाही. आजकाल लेखक लोक आख्ख्या २० ओव्हर गुगली, राँग वन आणि लेगब्रेकचे बेमालूम मिश्रण करत टाकतात.
त्यात ज्यांचे फुटवर्क चांगले आहे
ते वर आणि इतरत्र
सेंच्युर्या ठोकून गेले
त्यांचे हार्दिक अभिनंदन
आम्ही खेळतो आहोत चाचपडत
त्रिफळा कधी उडतो किंवा
गल्लीत क्याच कधी जातो
याची वाट बघत
आयुष्यानेच गुगल्या टाकल्या
तर लेखकांनी का टाकू नयेत
हॉहॉहॉ?
एकूणात वर्णन आणि ६३९ हा आकडा पाहून हिंदूच्या वाटेला जाईन असे वाटत नाही. (मी नेमाडपंथी नाही.)
शंका : हॉहॉहॉ म्हणजे उदाहरणार्थसारखे काही आहे का?
--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com
639 ही किंमत नाही
639 ही किंमत नसून पृष्ठसंख्या आहे. :-)
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
म्हणूनच
हो, म्हणूनच छाती दडपली. :)
चुकून चुकलो
६३९ पाने ही पृष्ठसंख्या चुकीची आहे. ६०३ पाने (तीही कॉपीराईट, लेखकाची अगोदरची पुस्तके, आयएसबीएन + मधली प्रकरणांसाठी सोडलेली आठ -दहा पाने (सुभाष अवचटांच्या मुखपृष्ठाच्या ब्लॅक/व्हाईट प्लेटींसह) धरून) आहेत.
पुस्तकाची मूळ किंमत ६५० रुपये आहे. मला प्रसिद्धीपूर्व ४५० ला पडले. पण कागद, छपाई, मुखपृष्ठ आणि बाइंडिंग एवढ्याचेच २५० रु. व्हावेत. अडगळीतल्या संदर्भासाठी मजकूर २०० रु...बाकी मनोरंजनासाठी ५० रु. वगैरे धरले तरी ५० रुपये फायदाच झाला म्हणायचा.
'हिंदू' खरीदनेमे फायदाही फायदा है| :)
एक अवांतर विचारायचे राहिलेच -
जीजिगीषा असा काही शब्द मराठीत आहे का हो, (लेखकराव भालचंद्र नेमाडे)?
हल्ली
हल्ली जाड ठोकळे वाचताना आपले किती आयुष्य बाकी आहे असा विचार मनात येतो. :प्
तसे ६०० म्हणजे फार नाही. मुराकामीचे विंड अप बर्ड क्रॉनिकल ६०० पानीच आहे, पण ते सुरू केल्यावर खाली ठेवणे अशक्य होते.
तितका इंटरेस्ट हिंदूमध्ये येईल का याची खात्री नाही. इथे नेमाडपंथियांना दुखवण्याचा हेतू नाही याची कृपया नोंद घ्यावी. नेमाडेंच्या जिनियसविषयी शंका नाही पण प्रश्न आवडीचा आहे आणि तिथे तर्क चालत नाही. जेम्स जॉइसला सगळे जग वाखाणते पण आम्हाला तो भावत नाही. काय करणार? चूक असली तर आमचीच आहे.
--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com
जीगिषा आहे
माझ्या ओळखीच्या एका म्हराटी मुलीचे नाव जीगिषा आहे. त्यामुळे जीगिषा हा शब्द मराठीत असावा. जीजीगिषा असायला हरकत नाही.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
अर्थ काय?
जिगीषा म्हणजे जिंकण्याची इच्छा ना? जिजिगीषा म्हंजे काय?
लहरी हैदर
विजिगीषा असा शब्द आहे=जिंकण्याची इच्छा
जीजिविषा असा शब्द आहे=जगण्याची दुर्दम्य इच्छा
अशा शब्दांच्या यादीत 'ईप्सित' हा शब्दही आहे.
पण दोन्हींचा संकर=जीजिगिषा?
लेखक 'लहरी हैदर' आहे.
तो म्हणू शकतो की तो मी निर्माण केलेला शब्द आहे.
"चचैवेति चचैवेति चचाति चचतो भगः|"
असे विनोदी अपभ्रष्ट लिहीलेच आहे त्याने.
चांगला शब्द-घाट
जिजीविषा मध्ये "जीव्-जीव्" अशी शब्दानुभूती होते.
जिजीगिषा मध्ये "जग-जगणे" अशी शब्दानुभूती होते.
हा शब्दप्रकार प्रकार मराठीत प्रचलित केल्यास बरे होईल.
संस्कृतात वाटेल त्या धातूपासून असा शब्द बनवता येतो. चित्->चिकित्सा, कृ -> चिकीर्षा, युध् -> युयुत्सा, पा -> पिपासा, ज्ञा -> जिज्ञासा.
तसेच मराठीला मानवेल. बंद यादी न समजता, नवीन शब्द घडवता येतील असा "प्रत्यय-विधी" समजावा.
संस्कृत "घस्->जिघत्सा" (खाय-खाय) ऐवजी मराठी खाणे -> चिखासा, असे मराठमोळे धातू वापरता आले तर मजा येईल.
पाहाणे -> पिपाहिषा
झोप -> जुझोपिषा
बस -> बीबसिषा
कर -> (चिकीर्षा ऐवजी) चीकरिषा
रड -> रीरडिषा
(श्री. अजय भागवत यांना सांगितले पाहिजे.)
नेमाड्यांच्या कादंबरीबद्दल वीवाचिषा (वाच) उत्पन्न करता-करता श्री. विसुनाना यांनी बिनाका गीतमालेबद्दल पुन्हा आयैकिषा (ऐक) जागवली आहे. मात्र भटक्या समाजाच्या करुण इतिहासाने रीरडिषा (रड) अनावर होते आहे. त्याच वेळी बंजार्यांचे म्हणून दाखवलेले हिंदी चित्रपटांमधल्या नाचांबद्दल पीपाहिषा (पहा) लेखा-प्रतिसादांमुळे थोडी शमली. बोटे दुखल्यामुळे टीटंकिषेला (टंक) मारून-मुटकून गप्प बीबसिषा (बस)... बस्स्