कॅलिडोस्कोप भाषेचा - एक परि-कवितेचं रसग्रहण.

सतीश रावलेंनी कॅलिडोस्कोप भाषेचा या रचनेत आपली प्रतिभा पणाला लावलेली आहे, व त्यातून निर्माण झाली आहे एक गद्य भासणारी पण नितांतसुंदर कविता.

तिला कविता म्हणण्याने काही बुचकळ्यात पडतील हे माहीत आहे. पण रावलेंनी मुळात आकारबंधांशीच खेळ केलेला आहे. गद्य, पद्य व चित्र या माध्यमांतून एक भव्य दिव्य 70 एम एम स्टिरिओफोनिक चित्र उभं केलं आहे. ही रचना कवितेची बंधनं झुगारून पलिकडे जाते म्हणून खरं तर मी हिला परिकविता म्हणतो. यातल्या परि चा 'परीकथा'तील परी सारखा अर्थ काढू नये. परिसर, परिवर्तन, परियोजना, परिसरण, यातल्या परि प्रमाणे. परिवर्तन म्हणजे change through revolt, परिसरण म्हणजे explode + spread प्रमाणे ही कविता क्रांती करते, स्फोट होऊन पसरते, माध्यमाची क्षितिजं विस्तारते. त्या अर्थाने ती परिकविता.

या विस्तारातच गद्य, विशेषतः उपक्रमावर येणाऱ्या वैचारिक लेखनाचे तर्कदुष्टतेचे नियम केव्हा झुगारून दिले जातात हे कळतच नाही. वाचकाच्या कोत्या विचारसरणीच्या तकलादू संरचनांचे त्या स्फोटाने काचेप्रमाणे ठिकऱ्या ठिकऱ्या उडतात, व त्या ठिकऱ्यांपासूनच तयार होतो - एक कॅलिडोस्कोप!!

उदा. ते म्हणतात - "उत्क्रांती अवस्थेत पोहचण्यासाठी 'सुधारणा' व 'बदल' हे दोन नियम कार्यरत असतात." उत्क्रांतीला ते प्रक्रिया म्हणण्याऐवजी अवस्था म्हणतात, सुधारणा व बदल यांना नियमाच्या पातळीवर पोचवतात. ही संकल्पनांची सरमिसळ ज्या खुबीने ते करतात ते पाहून तोंडून सहजच वाः न म्हणणारा विरळाच. आणि एखाद्या प्रतिभावान कवीने रूपकाचे दोन पैलू सहज उलगडून दाखवावे त्याप्रमाणे त्याप्रमाणे नंतर ते सुधारणांना निकषही म्हणतात. या त्यांच्या कौशल्याने अवाक् व्हायला होतं.

भाषेतील परिवर्तनाचा परिसर काल असतो.
भाषेतील परिसरणाचा परिसर स्थल/स्थान असते. (सुंदर अनुप्रास)
भाषेतील परियोजनेचा परिसर व्यक्ती असते.

यांसारखी वाक्यं वाचकाला केवळ मंत्रमुग्ध करतात. भाषा बदलते, पसरते, व व्यक्तिनिष्ठ असते यासारखं गहन सत्य सोप्या शब्दांत सांगणं सोपं नाही. ग्रीक व संस्कृतमधील सगळ्यांनाच माहिती असलेली साम्यं एका टेबलमध्ये मांडल्यामुळे त्या परिकवितेचा घाट आणखीनच मनोहारी होतो.

मात्र रावलेंची खरी प्रतिभा दिसते ती त्यानंतर, त्यांच्या रूपकांची हळुहळू उलगड होते तेव्हा. एक रूपक आहे कॅलिडोस्कोपचं - त्यातल्या काचेच्या तुकड्यांविषयी आपण बोललोच. दुसरं ते घेतात ते कांदेपोह्यांचं. कांदेपोह्यांच्या रूपकाचा ते प्रश्नमांडणीसाठी, तो थोडा सोडवण्यासाठी करतात तर कॅलिडोस्कोपचा वापर ते विचारसरणीच्या ठिकऱ्या करण्यासाठी तर नंतर ते विचार गोल गोल घुमवून नवीन चित्रं तयार करण्यासाठी करतात. या गोलघुमाव तंत्राचं सूतोवाच कांदेपोहेच्या वर्णनातच होतं. ते नीट समजावून घेतलं पाहिजे.

कांदेपोहे - वरखाली - शिजणे : आयुष्य - उलथापालथ - पक्के होणे : भाषा - परि (सरण, वर्तन, योजना) - समृद्धी.

काय चवदार, झणझणीत रूपक आहे. एखाद्या रविवारी सकाळी लिंबू पिळून खायला कांदेपोह्यांची तोड जशी दुसऱ्या कशाला येत नाही, तसंच हे रूपक अद्वितीय आहे.

कुठच्याही एका विधानापासून सुरू करून दुसऱ्या विधानापर्यंत पोचायचं हा या तंत्राचा गाभा आहे. ते तंत्र अधोरेखित करण्यासाठी पुढे एक टेबलदेखील देतात - यात कुठच्याही अक्षरापासून पुरेसे परिबदल केले की दुसरं जराही त्यासारखं न दिसणारं अक्षर तयार होतं हे दाखवलं आहे. तशीच थोडी गोलघुमाव केली की एकदम

मराठीने इंग्रजीच्या जागतिकीकरणापुढे स्वतःचे अस्तित्व टिकवायचे कसे? हा सध्याचा ज्वलंत प्रश्न आहे.

हे विधान येतं व वाचक रावलेंच्या प्रतिभेने थक्क होतो. पण ते इथे थांबत नाहीत. कॅलिडोस्कोप पुन्हा फिरतो. आणि

भाषांची प्रभुत्वता, इतिहासातील घटनां, व गीतेतील त्रिगुणात्मक प्रकृतीचे नियम

असा (रिकर्सिव्ह) त्रिकार साधतात. आणि मग आत्तापर्यंतच्या सगळ्या असंबद्ध काचांच्या तुकड्यासारख्या वाटणाऱ्या विचारांचे तुकडे पुन्हा फिरतात, जागा बदलतात, व नवनवीन आकार वाचकाच्या डोळ्यांना दिपवून जातात. त्रिगुणांच्या आरशांतून परावर्तित होऊन झपाटून टाकतात. बृहत्प्रतलांवर घडणाऱ्या घटनांचा वेध - शितावरून भाताची परीक्षा या न्यायाने केवळ एखाद दोनच उदाहरणं मांडून ते वेगवेगळी युगं, त्यावरून येणारी आगामी युगं, संस्कृतचे मंत्र, इंग्रजीचे मंत्र, अक्षरं म्हणजे शिव व शक्ति यांचं मीलन...वगैरे उत्तुंग कल्पनेच्या भराऱ्या घेतात. ज्यांना या भरारीची भीती वाटून खाली जमिनीवरच राहातात ते एका थोर आनंदाला मुकतात. स्वर व व्यंजनांच्या मीलनाने झालेली अर्धनारीनटेश्वर असलेली अक्षरं (मराठीच्या नातलग इंग्रजीमध्ये ती सिलॅबल् बनून एकाच वेळी तिघे चौघे मीलन करतात असं म्हणणाऱ्यांनी जमिनीवरच राहावं) शेवटच्या चित्रात वाचकाला भूल घालायला ठेवून अनेकविध विचारवाऱ्यांचं परिसरण करत ही कविता केव्हा संपते कळतच नाही....

तर अशी ही गारूड घालणारी परिकविता. हिच्यामुळे मराठीत कविता या माध्यमाचीच व्याप्ती होईल इतकी ही समर्थ, शक्तीशाली आहे. पण रावले तिथे थांबत नाहीत. आपल्या रचनेवर तीहूनही गहन टिप्पणी लिहून त्यांचा समीक्षा क्षेत्रातही परिवर्तन (change through revolt) करण्याचा इरादा दिसतो. असंच समर्थ लेखन त्यांच्या हातून होत राहो ही शारदेच्या चरणी प्रार्थना.

लेखनविषय: दुवे:

Comments

छान रसग्रहण

कदाचित, मूळ परिकविता एकाच वेळी इतकी तरल आणि 'ठोस' असल्यामुळेच मला समजली नव्हती. ती नीट पचवून सांगितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला रसग्रहण करताना मोकळे होण्याचा परम आनंदसुद्धा लाभला असेलच!

हेच म्हणतो

अगदी असेच.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

सुंदर रसग्रहण

इतके छान रसग्रहण देउनही मूळ कविता मला अजून कळलीच नाही, असे पहिल्यांदाच झाले असावे. :)

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

मी आपला आभारी आहे!

मी लिहीलेलं कोणालाच कळलं नाही, या भावनेने मी खरंच दु:खी झालो होतो. शनिवारपासून ते आजपर्यंत मी संगणकाला नेटसर्फिंककरीता हातही लावला नव्हता. तुमचं हे रसग्रहण वाचून मला दुध प्यायला सारखे वाटले, खूप बरे वाटले.
राजेश घासकडवी, मी खरचं आपला आभारी आहे.

थक्क

मी थक्क झालो आहे!

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

अप्रतिम ~~ दोन्ही !!

अप्रतिम लिखाणाची ही दोन्ही उदाहरणे सातत्याने वाचावित अशीच झाली आहेत. श्री. घासकडवी यांच्या या देखण्या कलाबतूमुळे मूळ "कॅलिडोस्कोप" ला रत्नखचित उंची लाभली आहे असे नि:संशयपणे कविताप्रेमी रसिक म्हणतील.

श्री.सतीश रावले यांना "दूध प्यायला सारखे वाटले" यातच सर्व काही आले.

निस्संशय

अप्रतिम लिखाणाची ही दोन्ही उदाहरणे सातत्याने वाचावित अशीच झाली आहेत. श्री. घासकडवी यांच्या या देखण्या कलाबतूमुळे मूळ "कॅलिडोस्कोप" ला रत्नखचित उंची लाभली आहे असे नि:संशयपणे कविताप्रेमी रसिक म्हणतील.
श्री.सतीश रावले यांना "दूध प्यायला सारखे वाटले" यातच सर्व काही आले.

निस्संशय. माझ्या भावना तुम्ही अप्रतिमपणे मांडल्या आहेत. माझ्यामते घासकडवी म्हणतात तशी ही केवळ परिकविता नाही. ही तर पराकविता आहे. श्री. सतीश रावले ह्यांनी लिहीत राहिले पाहिजे. श्री. घासकडवी ह्यांनी रसग्रहण करीत राहिले पाहिजे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

छान

रसग्रहण आवडले. मूळ कलाकृतीमधील जाणिवांना भेदून नेणिवांच्या कडेकडेने जाणारे तरल मनोकायिक आविष्कार रसग्रहणामुळे अधिक ठोस व्हावेत मात्र त्याचवेळी त्यांची पोत अधिक भुसभुशीत व्हावी. त्यांचे तरंग अधिक गडद व्हावेत मात्र त्यांची शिवण उसवावी. काहीशा आंबट-तेलकट अशा या जाणिवांना कवी जेव्हा उत्क्रांतीची फोडणी देतो तेव्हा मानवात लाखो वर्षे दडून राहिलेल्या आदिम संवेदना त्या पोह्यांवर मनोकायिक कोथिंबीर आणि परियोजनेच्या खोबर्‍याचा कीस यांची पखरण करतात.

परिचालन, परियोजन आणि परिमार्जन अशा सर्व पर्‍या जेथे जमल्या आहेत त्या कांदापोह्यांच्या बुफेला तुम्ही येणार ना?

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

सुंदर रसग्रहण

सुंदर रसग्रहण.

परिप्रतिसाद - हेच म्हणते

वरील सर्व प्रतिसदांशीही सहमत आहे. ;-)

++१

आवडला

प्रमोद

शंका

इथे "परिकविता" हा शब्दप्रयोग मेटा-पोएम् या अर्थाने केला आहे काय ?

नाही

परि चा अर्थ मेटा असा घेतला तर तो योग्य परिणाम साधत नाही. परिस्थिती ही स्थितीची स्थिती अशी फोड नीट जमत नाही. मेटा साठी मराठीत अधि हा प्रत्यय अधिपासूनच आहे. आपण मेटाफिजिकल ला अधिभौतिक म्हणतो. 'जीव मेटाकुटीला आला' मधला मेटा मात्र वेगळा.

परि हा शब्द विस्तृत, मर्यादा ओलांडून वेगाने पलिकडे जाणारा अशा काहीशा अर्थाने येतो. 'पलि'कडे हा सुद्धा कदाचित परि च्या अपभ्रंशाने आला आहे असं कळलं तर मला आश्चर्य वाटणार नाही.

धम्मकलाडू यांनी पराकविता हा प्रतिशब्द सुचवला आहे. त्यातल्या परा ला एक परागंदासारखी, परदेशी, कोणी म्हणेल फारशी झाक आहे. तो थोडासा उपरा वाटतो, पराभूत वाटतो.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

पराचा कावळा केला की

त्यातल्या परा ला एक परागंदासारखी, परदेशी, कोणी म्हणेल फारशी झाक आहे. तो थोडासा उपरा वाटतो, पराभूत वाटतो.
पराचा कावळा केला की. मला परासामान्य (पॅरानॉर्मल)/ पराविज्ञानातला (पॅरासायन्स) परा अपेक्षित होता.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

 
^ वर