ग्रंथपरिचय- औषध, उतारे आणि आशिर्वाद

ग्रंथपरिचय- औषधं उतारे आणि आशिर्वाद

मंत्रतंत्र बाबा बुवांच्या गप्पा चाललेल्या असताना एका मित्राने एक पुस्तक वाचायला दिलं. काहीशा नाखुशीनेच मी ते पाहिल. औषधं, उतारे आणि आशिर्वाद. मनोविकारांचा मागोवा हे उत्तम पुस्तक लिहिणारे मानसोपचार तज्ञ डॊ श्रीकांत जोशी यांनी ते अनुवादित केल होत. मूळ पुस्तक Mystics, Shamans and Doctors डॊ सुधीर कक्कर यांच. डॊ. श्रीकांत जोशी यांना हे पुस्तक का अनुवादित करावस वाटल हे वाचताना त्यांची भुमिका समजली. ते म्हणतात," अनेक शहाणी-सुरती दिसणारी- म्हणजे असलेली म्हणायला हरकत नाही, अगदी सुशिक्षित, सुसंकृत उच्चभ्रु समाजातील मंडळी स्वामी, महाराज गुरु यांच्या कच्छपी कशी लागतात? मला अध्यात्मातले काही कळत नाही. परंतु यातले काही गुरु मला उघडपणे भोंदु दिसत होते. पण माझीच काही मित्रमंडळी मोठ्या भक्ती भावाने त्यांच्या पायावर डोके ठेवत होती. त्यातुन त्यांना काहीतरी मिळत होते हे निश्चितच." हे पुस्तक वाचताना आपल्या अंतर्मनातील खोल दडलेल्या विचारांना भावनांना समजुतींना हाका मारणारे विचार वाचत,ऐकत आहोत असे वाचकांना वाटेल. लेखकाचा पुस्तक लिहिण्याचा उद्देश हा मानसिक आरोग्य आणि मनोविकार यांच्याशी संबंधित अशा पारंपारिक भारतीय प्रथा आणी उपचार पद्धती यांचा अभ्यास करणे हा आहे. लेखक कुठल्याही वादात पडु इच्छित नाही. तीन वर्षे भारतात हिंडत या गोष्टीचा अभ्यास करीत असताना भेटलेले गुढ संप्रदायाचे गुरु, शामान, मांत्रिक,भगत,वैद्य आणि इतर पारंपारिक औषधोपचार करणारे हकीम, बाबा वगैरे लोकांच्या भेटी गाठी व चर्चेतुन तयार झालेला हा दस्त ऐवज आहे. पुस्तक वाचताना अनिल अवचटांच्या धार्मिक पुस्तकाची हमखास आठवण येते.
बाहेरची बाधा म्हणजे काय? भुते कशी झपाटतात! ती कशी उतरवली जातात! मंत्र तंत्र यात तथ्य आहे का हे सर्व झूट? महाराज, माता, स्वामी यांच्य शिकवणीतुन आपणास मनाची शांतता खरच लाभु शकते का? हजारो वर्ष चालत आलेल्या आयुर्वेदाच्या परंपरेचा निश्चित अर्थ काय? मांत्रिक,स्वामी,महाराज, माता यांच्याकडे हजारो भारतीय का धाव घेतात? या व अशा अनेक प्रश्नांच्या अंगाने घेतलेला एक धांडोळा म्हणजे हे पुस्तक.

पहिल्या भागात पत्तेशाह दर्ग्यातील पीरबाबा व त्यांची उपचार पद्धती. यात भुताखेताशी सामना करण्याची बाबाची पद्धत. बाबांचे रुग्ण याबाबत किश्श्यांसह माहिती व त्याचे मनोवेश्लेषण दिले आहे. जिन, सैतान, बला, फरिश्ता या भोवती बाबांचे तत्त्वज्ञान फिरते. बाबांच्या रुग्ण संवादात स्वप्नांना फार महत्व आहे.
भुतप्रेतांचे स्वामी ( बालाजीचे मंदिर) या प्रकरणात मंदिरात भरणारा पिडितांचा दरबाराचे वर्णन आहे.राजस्थान मधील भरतपुर जवळ हनुमानाचे बालाजी हे रुप आहे. इथे भुतांचा बंदोबस्त एखाद्या कोर्ट कचेरी सारखा असतो, प्रथम अर्ज करायचा म्हणजे डाळ तांदुळ लाडु याचा नैवेद्य पुजार्‍यामार्फत देवाला दाखवायचा पुजारी एक लाडु म्रुतीला स्पर्श करुन रुग्णाला खायला देतो. त्या लाडवातुन बालाजीची शक्ती रुग्णात प्रवेश करते व भुताला दरबारात प्रकट व्हायला भाग पाडते. याला पेशी म्हणतात. ही पेशी यशस्वी झाली नाही तर जरा वरच्या लेव्हलचा अर्ज. अर्थात याचा खर्च जास्त. यात अजुन काही देवतांना आवाहन केले जाते. मंत्र म्हणले जातात. मंतरलेले पाणी त्याला प्यायला दिले जाते. रुग्णाच्या अंगात आले कि पेशी यशस्वी झाली. मग पुढे देवदेवतांचा व भुतांचा सामना चालू होतो. यात शिव्या आक्रोश व फटके यांचा सामावेश असतो. एरवी शालीन वाटणार्‍या स्त्रिया घाणेरड्या शिव्या देवदेवतांना व नातेवाईकांना देतात. शेवटी अंगातले भुत वठणीवर येते व कबुली जबाब या शेवटच्या नाट्यांक चालू होतो. मग ते भुत स्वत:ची ओळख सांगत माफी मागत रुग्णाला म्हणजे झाडाला सोडत. रुग्ण मग वारंवार देवाच्या पाय पडतो. अगदी आपल्याकडच्या दत्तसंप्रदायाच्या गाणगापुरची आठवण येते.
लेखकाने बालाजी मंदिरात अठ्ठावीस जणांच्या दीर्घ मुलाखती घेतल्या होत्या. त्यातील पंधरा हिस्टेरिक केसेस होत्या. पुर्वभारतातील आदिवासी भगत व तिबेटी परंपरा यावर देखील लेखकाने लिहिले आहे.
दुसर्‍या भागात राधास्वामी सत्संग निर्मला माता व तांत्रिक पंथा बाबत लिहिल आहे. गुरु-शिष्य या परंपरेतील द्वैत नात्याचे पैलू यात उलगडले आहेत.सत्संगा सारखी सामूहिक प्रार्थना, प्रवचने, तत्वज्ञानाचा प्रसार, पारायणे गुरुभक्ती या सर्वातुन काय साध्य करायचे? गुरुची प्रार्थना करुन त्याच्याशी एकरुप होउन शिष्य संसाराच्या चिंतेतुन मुक्त होउ पहात असतात. माताजींच्या कुंडलीनि जागृती बाबत लेखकाने स्वत: घेतलेला अनुभव फार मजेशीर आहे.'ओम सक्षत मोक्षदायिनी सक्षत निर्मलादेवी' या मंत्राचा उतारा अंगातील फ्रॊईड उतरवण्यासाठी उपयोगी होता. निर्मला मातेच्या मते फ्रॊईडियन लोकांची डावी बाजु कमकुवत असते.
तंत्रशास्त्रात अघोरी वा अनाचारी वाटणा‍र्‍या लैंगिक वर्तनाच्या/ मानसतिकतेचा विचार इथे केला आहे. स्वत:च्या शरीरातले पौरुषत्व व स्त्रीत्व अशा दोन्हींना जागृत करुन त्याचा आनंद लुटणे, लिंग भेदापलिकडे पोहोचणे असे काहीसे ध्येय यात असते. तांत्रिक ग्रंथात इश्वर आणि लिंग, संभोग आणि मुक्ती असे शब्द ऐकमेका ऐवजी सहज वापरले जातात. आपल्या तांत्रिक अनुभवामध्ये त्वचेवरील प्रत्येक घर्मछिद्र हे योनि प्रमाणे वाटते व संपुर्णे शरिर भर संभोगाचा आभास होतो असे रामकृष्णांनी लिहिले आहे असा उल्लेख यात आढळतो.
तिसर्‍या भागात आयुर्वेद व वैद्यांच्या उपचार पद्धतीबाबत उहापोह आहे. लेखक म्हणतो," पाश्चात्य सोडून इतर सर्व उपचार पद्धती ह्या जुनाट छा छु करणार्‍या युगातील आहेत असे मला वाटे. एखाद्या विषयाच्या शास्त्र शुद्ध अभ्यासासाठी त्या विषया बद्दल एकीकडे आदर आणि दुसरी कडे शंकेखोर चिकित्सा असा दुहेरी दृष्टीकोण आवश्यक असतो. हे मला आतापर्यंत जमले नसावे." धर्म संस्कृती, आयुर्वेद, , पाश्चात्य वैद्यक,मानसशास्त्र, आधुनिक उपचार पद्धती, त्यांच्या मर्यादा अशी निरिक्षणे मांडत झारसेटली या हरियाणातील वैद्य गुरुजींचे रुग्णांच्या केसेस दिल्या आहेत.
पुस्तक वाचताना एक गोष्ट जाणवते ती म्हणजे लेखकाला केवळ सैध्तांतिक चर्चा करायची नसुन अनुभवात्मक पातळीवर त्याचे विश्लेषण करायचे आहे. हे सर्व करताना भारतीय परंपरा औषध उतारे आणि आशिर्वाद या बद्दल मनात एक मउ कोपरा आहे. तो जपायचा आहे. समंजस सायकियाट्रिस्ट व समंजस भगत मांत्रिक यांच्यातील अलिखित कराराची निरिक्षण लेखकाला यात दिसते. वाचकांना हे पुस्तक काही ठिकाणी जड व दुर्बोध वाटले तरी ती लेखकाची अपरिहार्यता आहे. ड्र्ग व मॆजिक रेमिडि ऎक्ट चा विचार करताना पुस्तक एका अनोख्या पैलूचे दर्शन घडवते. एका मनोविश्लेषण तज्ञाचे मनोगत म्हणुन पुस्तकाची दखल नक्कीच घ्यावीशी वाटते.

पुस्तकाचे नांव- औषध उतारे आणि आशीर्वाद
लेखक- डॊ सुधीर कक्कर
अनुवाद- डॊ श्रीकांत जोशी
प्रकाशक - मॆजेस्टिक प्रकाशन
प्रथमावृत्ती मार्च १९९३
पृष्ठे-२०३
मुल्य- १००/-

Comments

आदर

पाश्चात्य सोडून इतर सर्व उपचार पद्धती ह्या जुनाट छा छु करणार्‍या युगातील आहेत असे मला वाटे. एखाद्या विषयाच्या शास्त्र शुद्ध अभ्यासासाठी त्या विषया बद्दल एकीकडे आदर आणि दुसरी कडे शंकेखोर चिकित्सा असा दुहेरी दृष्टीकोण आवश्यक असतो. हे मला आतापर्यंत जमले नसावे.

मलाही जमत नाही. चुकीच्या मतांचा आदर करणे म्हणजे स्वतःच्या विचारशक्तीचा अनादर आहे.

हे सर्व करताना भारतीय परंपरा औषध उतारे आणि आशिर्वाद या बद्दल मनात एक मउ कोपरा आहे. तो जपायचा आहे.

"We need to understand and sympathise with the deep hurt and offence that a man can feel if we insult his traditional beliefs by trying to stop him beating his wife, or setting fire to his daughter or cutting off her clitoris (and please don't let's hear any racist or Islamophobic objections to these important expressions of faith). We shall support the introduction of sharia courts, but on a strictly voluntary basis – only for those whose husbands and fathers freely choose it." -- डॉकिन्सबाबा

शंभर रुपये म्हणजे ठीक आहे, कुठे मिळेल?

"You can have my tolerance, you can't have my respect." -- Bill Maherक्ष्

मॅजेस्टिक

पुण्यातील मॅजेस्टिक शनिवार पेठ इथे मिळेल. अन्यत्र उपलब्ध असण्याची शक्यता कमी वाटते कक्कर बाबांची वेबसाईट सापडली
प्रकाश घाटपांडे

उत्कृष्ट

उत्कृष्ट पुस्तक परिचय
चन्द्रशेखर

असेच म्हणतो...

उत्तम पुस्तक परिचयाबद्दल धन्यवाद...

-सौरभ.

==================

फायरफॉक्ससाठी एक आमचाही पर्सोना. कसा वाटला ते जरुर कळवा.

छानच

पुस्तकपरिचय छानच.. पुस्तकविश्ववरही चढवा अशी विनंती करणार होतो.. पण तुम्ही आधिच चढवले आहे.

परिचय वाचून पुस्तक वाचावेसे वाटते आहे यातच परिचयाचे यश!

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

चांगला

चांगला परिचय. पुस्तक वाचायला आवडेल.

पुस्तक परिचयाचा वस्तुपाठ

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.प्रकाश घाटपांडे यांनी नाखुषीने पुस्तक वाचायला घेतले पण ते लक्षपूर्वक समजून घेऊन वाचले आणि वाचकांना त्याचा उत्तम परिचय करून दिला. कोणत्याही नियतकालिकासाठी पुस्तक परिचय/पुस्तक परीक्षण असे सदर ते यशस्वीपणे लिहू शकतील.( पण एक अडचण आहे. श्री.प्रकाश घाटपांडे संपूर्ण पुस्तक स्वतः वाचून समजून घेतात आणि मगच परिचय लिहितात!)

लय भारी

एरवी शालीन वाटणार्‍या स्त्रिया घाणेरड्या शिव्या देवदेवतांना व नातेवाईकांना देतात. शेवटी अंगातले भुत वठणीवर येते व कबुली जबाब या शेवटच्या नाट्यांक चालू होतो. मग ते भुत स्वत:ची ओळख सांगत माफी मागत रुग्णाला म्हणजे झाडाला सोडत. रुग्ण मग वारंवार देवाच्या पाय पडतो. अगदी आपल्याकडच्या दत्तसंप्रदायाच्या गाणगापुरची आठवण येते.

अरे बापरे!! ;-) या सुप्रसिद्ध लेखाची आणि विडिओची आठवण झाली. एरवी साध्या वाटणार्‍या स्त्रिया केस पिंजारून, मळवट भरून, घागरी फुंकू लागल्या की ही मला 'अरे बापरे!' असे म्हणावेसे वाटते. तशी दोन्ही प्रकारच्या स्त्रियांना मदतीची किंवा उपचारांची गरज असते.

पुस्तकाचा विषय भारी आहे आणि मांडलाही मस्त आहे. थोडे आधी लिहिले असते तर मला मागवता तरी आले असते. :-( असो.

अंनिस

अंनिसच्या सुरवातीच्या काळात मी एक उपक्रम सुचवला होता. काही समुपदेशक व मानसोपचार तज्ञांच्या सहकार्याने एक कायम स्वरुपी कौन्सिलिंग सेंटर चालू करावे. लोकांना बाबा बुवा का जवळचे वाटतात? तो दिलासा व जवळीक आपण त्यांना दिली तर लोक आपल्याकडे येतील. सकारात्मक पर्याय आपण त्यांना दिला तर प्रबोधन परिणामकारक ठरेल. अन्यथा ती हस्तिदंती मनोर्‍यातील हाकाटी ठरेल. तत्वज्ञान भरल्यापोटीच सुचते.
अर्थात हा उपक्रम काही राबवला गेला नाही.
पुस्तक वाचताना एक गोष्ट जाणवली कि भारतातल्या लोकसंख्येला पुरेल अशी मानसोपचार तज्ञांची संख्या आहे का? तळागाळातील लोकांचे मानसिक आरोग्य जपण्यासाठी काय पर्याय उपलब्ध आहे? मानसोपचार तज्ञाकडे जा हा सल्ला देण ठिक आहे पण त्याला तो परवडणारा आहे का? हे देखील पाहिल पाहिजे.
प्रकाश घाटपांडे

परवडणारा मानसोपचार

मानसोपचाराच्या बाबतीत २ प्रमुख समज आहेत.
१. तो फक्त वेड्या लोकांसाठी आहे.
-हा अर्थातच चुकीचा आहे.
२. मानसोपचार अत्यंत महागडा असतो./मनोविकारतज्ञांच्या फिया गगनचुंबी असतात.
-माहिती नाही. पण हा समज बरोबर असावा, असे वाटते.(मलाही इतर सामान्य लोकांप्रमाणे असे वाटते.)

||वाछितो विजयी होईबा||

एक उद्बोधक चित्रफीत

ऍनलाइज़ धिस हा मानसोपचारचार व मानसोपचारतज्ज्ञांबद्दल एक उत्कृष्ट माहितीपट आहे. त्यातली ही एक चित्रफीत अतिशय उद्बोधक अशी आहे. पाहा:

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

डॉ. सुधीर कक्कर

पुस्तकाचा उत्तम परिचय करून दिल्याबद्दल धन्यवाद. पुस्तक वाचायची उत्सुकता अजून झाली नसली तरी बघायला आवडेल.

पुस्तक परिचयावरून वाटले की डॉ. सुधीर कक्कर हे वैद्यकातले डॉ. आहेत. मात्र त्यांच्या संस्थळावर पाहिले तर त्यांचे शिक्षण मेकॅनिकल इंजिनियरिंग, नंतर अर्थशास्त्रात पी.एच्.डी. आणि मग सिगमंड फ्रॉईड इन्स्टिट्युट मधून एक पदविका घेतली आहे. आता प्रश्न पडला की दुसरे डॉ. श्रीकांत जोशी कुठले डॉक्टर.

मानसोपचार वैद्यक (सायकियाट्री) , मानसशास्त्रज्ञ (सायकॉलॉजी) यापेक्षा सायकोऍनॅलिसिस् वेगळे आहे. पुढील दुव्यातील क्रिटीसिज्मचा भाग वाचला तर या तंत्राला मिथ्याविज्ञान म्हणणारे आहेत.
http://en.wikipedia.org/wiki/Psychoanalysis. याबद्दल कोणी अधिक माहिती देऊ शकले तर बरे. भारतात अशा वैज्ञकीला या वेळी

आता भारतीय अप्रशिक्षित मानसोपचार तज्ञ (बाबा, बुवा, मांत्रिक, मठ पुजारी वगैरे.) यांच्या बाबत. यांचे दोन पैलू आहेत. रुग्णाला आराम वाटतो. आणि दुसर्‍यांना काहीतरी केल्याचे समाधान लाभते. (परवडेल तेवढे करायचे.) यातील पहिल्या पैलूवर पुस्तकातून काही प्रकाश पडतो का? (हे कळले नाही). याशिवाय दुसरे म्हणजे मानसोपचार तज्ञ (खाजगी वा सरकारी रुग्णालयातील) यापेक्षा हे महाग का स्वस्त. काही उपचार जास्त महाग वाटले. (कदाचित तसे नसेलही.)

मानसोपचार तज्ञाची कमतरता आहे म्हणून लोक उठून गाणगापूर, बालाजी मंदिरात जातात हे पटण्यासारखे नाही (दुरून जाणार्‍या लोकांबद्दल.)

मानसोपचार वैद्यकाकडे जाण्यात 'वेडेपण' मान्य केले गेले असते अशा भितीतून तर या ठिकाणी जात नसावेत ना असे वाटते. याशिवाय मानसोपचार वैद्य कमी संख्येने असणे हे सुध्दा येत असेल.

प्रमोद

डॉ श्रीकांत जोशी

डॉ श्रीकांत जोशी हे एम् डी (सायकॉलॉजिकल मेडिसिन) आहेत. मानसोपचार त़ज्ञ म्हणुन काम करतात. १ गौतम टेरेस मोनीज हॉटेल जवळ कोपरी रोड, नौपाडा, ठाणे असा त्यांचा संपर्काचा पत्ता आहे. ( संदर्भ - मनोविकारांचा मागोवा)
अंनिस त नवोदितांना मनोविकारांच्या माहितीसाठी हे पुस्तक संदर्भ म्हणुन दिले जाते.

मानसोपचार तज्ञाची कमतरता आहे म्हणून लोक उठून गाणगापूर, बालाजी मंदिरात जातात हे पटण्यासारखे नाही (दुरून जाणार्‍या लोकांबद्दल.)

कोणाला पटण्यासारखे नाही? तुम्हाला मला पटो न पटो हे वास्तव आहे." ब्रेड मिळत् नाही तर हे लोक केक का खात नाही? "असा प्रश्न विचारणार्‍यांना आपण समाज वास्तवाच भान नाही असे आपण म्हणतोच ना? पिडितांसाठी सक्षम पर्याय देउ शकत नाही आणि ते उपलब्ध असलेला पर्याय वापरत असतील अंधश्रद्ध अंधश्रद्ध असे हिणवायचे. तुमचा पर्याय अशास्त्रीय आहे असे म्हणायच. अशी टीका अंनिसतील ऍकॅडमिस्ट लोकांवर नेहमीच होत असते. मला त्यात तथ्य वाटते.
माझे अंनिसतले एक मित्र प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करतात. तिथे उपलब्ध असलेल्या सुविधा इतक्या तोकड्या आहेत कि तुम्ही बाबा बुवा भगत यांच्या कडे कोणत्याही परिस्थितीत जाउ नका असे सांगण्याची नैतिक ताकद होत नाही.
प्रत्येकाच्या अनिश्चिततेला टक्कर देण्याच्या क्षमता निराळ्या असतात. अंधश्रद्ध लोकांची कीव करता कामा नये हा विचार पुस्तकातच राहतो. ज्या अंधश्रद्धा अज्ञानातुन निर्माण झाल्या त्या प्रबोधनातुन् दुर करता येतीलही पण ज्या अगतिकतेतुन निर्माण झाल्या त्याचे काय? त्या तर समाज व्यवस्थेशी निगडित आहेत.
मला एक ससुन मानसोपचार केंद्रात कौन्सिलर भेटले ते म्हणाले," तुम्ही गरीब अशिक्षित कष्टकरी वर्गातील लोक जेव्हा रात्री थोडी देशी दारु घेउन झोपतात त्यांना तुम्ही काय दारु पिणे आरोग्यास अपायकारक आहे असं सांगणार? अहो त्यांचे दिवसभरातील कष्ट पहा. त्यांचा जगण्याचा स्तर पहा. नशेत ते शारिरिक व मानसिक वेदना विसतात."
ऍलोपथी मधे वेदनाशामक औषधे ही काही रोगनिर्मुलक नव्हे. रोगाचे निवारण करणे ही गोष्ट वेदना कमी केल्यानंतरच शक्य आहे. वेदना कमी होणे ही त्याची प्रथम गरज आहे.
पुर्वी देवी रोग हा देवीचा कोप आहे म्हणुन मंदिरात भगत उपचार करीत होतेच. शासनाने खेडोपाडी सक्षम आरोग्य सेवा पोचवुन देवी रोगाचे निर्मुलन केल. देवीचा रोगी कळवा हजार रुपये मिळवा असे फलक लावेपर्यंत ही मोहीम राबवली.
मानसोपचार हा फक्त वेड्यांनीच घ्यायचा असा समज सुशिक्षितांमध्ये देखील आहे. मला मानसोपचाराची गरज नाही हे मानसोपचार आवश्यक असणार्‍या लोकांना वाटत असते. मानसोपचार घेणे हे लपवुन ठेवले जाते.
मानसशास्त्र ही खूप गुंतागुंतीचे आहे. याबद्दल कुणाचे दुमत नसावे.

प्रकाश घाटपांडे

खर्च

कोणाला पटण्यासारखे नाही? तुम्हाला मला पटो न पटो हे वास्तव आहे." ब्रेड मिळत् नाही तर हे लोक केक का खात नाही? "असा प्रश्न विचारणार्‍यांना आपण समाज वास्तवाच भान नाही असे आपण म्हणतोच ना?

पण दूर जाण्यात एक दिवसाचा रोजगार बुडतो, शिवाय प्रवासखर्च होतो. मला वाटते की मानसोपचारतज्ञ त्यापेक्षा स्वस्तच असतील. शिवाय सरकारी उपचार फारसे महाग नसतात. जेजे रुग्णालयाच्या बाकी विभागांपेक्षा मानसोपचार ओपीडीत कमीच गर्दी असते. जेजेच्या बाहेर कुडमुडे डॉक्टर आणि बाबा आहेतच. पण ते अतिरिक्त उपचार करीत असतील, जेजेऐवजी उपचार देत नसतील असे वाटते.

अतिरिक्त उपचार्

पण ते अतिरिक्त उपचार करीत असतील, जेजेऐवजी उपचार देत नसतील असे वाटते.

मानसोपचार घेत असताना अतिरिक्त म्हणुन 'बाहेरचे' उपचार घेणारे रुग्ण आहेतच, हे निरिक्षण कक्कर व जोशी या दोघांचे ही आहेच. 'विशिष्ट' मर्यादेपर्यंत उपचार झाले कि त्या पुढे डॉक्टर व भगत परस्परांकडे पाठवतात. हे ग्रामीण भागासाठी निरिक्षण आहे. उदा. बाहेरची बाधा काढलेली आहे आता दाक्तर कडुन उपचार घ्या असे भगत म्हणतो.
प्रकाश घाटपांडे

वास्तव

कोणाला पटण्यासारखे नाही? तुम्हाला मला पटो न पटो हे वास्तव आहे." ब्रेड मिळत् नाही तर हे लोक केक का खात नाही? "असा प्रश्न विचारणार्‍यांना आपण समाज वास्तवाच भान नाही असे आपण म्हणतोच ना? पिडितांसाठी सक्षम पर्याय देउ शकत नाही आणि ते उपलब्ध असलेला पर्याय वापरत असतील अंधश्रद्ध अंधश्रद्ध असे हिणवायचे. तुमचा पर्याय अशास्त्रीय आहे असे म्हणायच.

कुठे तरी गोंधळ झाला आहे. जे लोक दूरवर जातात त्यांच्या विषयी माझे लिखाण होते.

मानसोपचार देणारे वैद्यक सध्या प्रमुख शहरात भरपूर संख्येने उपलब्ध असावेत इतक्या पाट्या मला दिसतात.
यांना सोडून शहरातील व त्या आसपासचे लोक दूरच्या गाणगापुरास (वा बालाजीस जातात) जातात तेंव्हा उपलब्धता नसणे वा पैसे नसणे या कारणाशिवाय इतर कारणे संभवतात. ती अशी

१. पर्याय माहित नसणे (भूतबाधा झाल्यावर मानसोपचार तज्ञाकडे जाऊ शकतो हेच माहित नसणे.)
२. हा प्रकार दैवी आहे त्याला डॉक्टर काय करणार असे मानणे. (म्हणजे डॉक्टर असतात हे माहित आहे पण डॉक्टरयोग्य बाधा आहे हे न मानणे.)
३. मानसोपचार तज्ञाकडे जाणे हे वेड लागले तरच जाणे आणि हे तर वेड नाही असे म्हणणे.
लोक जेव्हा दूरदूर जातात (शेजारच्या भगताकडे नाही.) आणि जास्त पैसे खर्च करतात (जाणे येणे, रोजगार) तेव्हा वरील तीन कारणे जास्त संभवतात.

आता शेजारच्या भगताकडे महाराज इत्यादींकडे जाणारे, जवळच्या देवळात जाणारे, अंगारा धुपारा लावणारे, ही मंडळी उपलब्धता वा ऐपत नसण्यामुळे तसे करत असतील.
पण त्यांच्याही बाबतीत वरील कारणे नजरेआड करून चालणार नाही.

'तुमचा पर्याय अशास्त्रीय म्हणून हिणवायचे' 'ब्रेड मिळत् नाही तर हे लोक केक का खात नाही?'मला वाटते हे माझ्या प्रतिक्रियेत आले नाही. आले असले असे वाटल्यास माफ करा.

प्रमोद

अन्वयार्थ

'तुमचा पर्याय अशास्त्रीय म्हणून हिणवायचे' 'ब्रेड मिळत् नाही तर हे लोक केक का खात नाही?'मला वाटते हे माझ्या प्रतिक्रियेत आले नाही.

तुमच्या प्रतिक्रियेत ते आले आहे असे मी म्हटलेलेच नाही. पुढचे वाक्य पहा ..अशी टीका अंनिस तील ऍकॅडमिस्ट वर होत असते. मला त्यात तथ्य वाटते.
माझा मुख्य मुद्दा हा बाबा बुवांपेक्षा जवळचा वाटेल असा सक्षम व व्यवहार्य पर्याय उपलब्ध करणे. देवी चे उदाहरण मी त्यासाठीच दिले आहे.
बाकी मुद्द्याशी सहमत आहेच.

प्रकाश घाटपांडे

धन्यवाद

सुधीर कक्कर यांच्याबद्दल महत्वाची माहिती शोधल्याबद्दल धन्यवाद.

मानसशास्त्रज्ञ (सायकॉलॉजी) यापेक्षा सायकोऍनॅलिसिस् वेगळे आहे

माझ्या माहितीनुसार सायकोऍनॅलिसिस हे मानसशास्त्राचा भाग आहे.

मानसोपचार तज्ञाची कमतरता आहे म्हणून लोक उठून गाणगापूर, बालाजी मंदिरात जातात हे पटण्यासारखे नाही (दुरून जाणार्‍या लोकांबद्दल.)
मानसोपचार वैद्यकाकडे जाण्यात 'वेडेपण' मान्य केले गेले असते अशा भितीतून तर या ठिकाणी जात नसावेत ना असे वाटते. याशिवाय मानसोपचार वैद्य कमी संख्येने असणे हे सुध्दा येत असेल.

सहमत. त्यांची समस्या मानसिक रोगांशी संबंधित असल्याची शक्यताच त्यांना वाटत नसावी, हेही एक कारण असू शकेल.

बाहेरची बाधा

त्यांची समस्या मानसिक रोगांशी संबंधित असल्याची शक्यताच त्यांना वाटत नसावी, हेही एक कारण असू शकेल.

ते लोक अशा प्रकाराची सोपी वर्गवारी करतात ती म्हणजे बाहेरची बाधा. मनोविकाराचा मागोवा या पुस्तकात त्यावर स्वतंत्र प्रकरण आहे.
प्रकाश घाटपांडे

सायकोऍनलिसिस

माझ्या माहितीनुसार सायकोऍनॅलिसिस हे मानसशास्त्राचा भाग आहे.

सायकोऍनलिसिस विरुद्ध काही वेळा मी वाचले आहे. http://skepdic.com/therapy.html आणि http://skepdic.com/psychoan.html या दोन ठिकाणी त्यातील काही माहिती आहे.

गुगलून शोध घ्यायचा प्रयत्न केला तर आधुनिक सायकोऍनॅलिसिस वर हे मिळाले http://modernpsychoanalysis.org/default.aspx.
ताण तणावासंबंधी ती वापरली जाते असे त्यावरून वाटले.

याविषयीची हल्लीची वैद्यकीय आणि शास्त्रीय मते जाणून घ्यावीशी वाटतात. पण नीट माहिती मिळाली नाही.

प्रमोद

धन्यवाद

ग्रंथपरिचय उपयोगी वाटला.

 
^ वर