आज ना उद्या सर्व शिक्षण मराठीतच होईल त्या प्रक्रीयाला कोणी रोखू शकणार नाही.

इंग्रजीतच शिक्षण घेणे आवश्यक आहे अशी ओरड करत मराठी आणि स्थानिक भाषांना कमी लेखण्याचे कारस्थान रचून बहुजन समाजाला ज्ञाना पासून दूर ठेवण्याचा कुटील डाव अनादी काळा पासून परत परत रचला जात आहे. आणि हा प्रकार आजचा नाही तर थेट पांडवा पासून हेच चालत आलेले आहे .जेंव्हा भिल्ल एकलव्य हा अर्जुना पेक्षा धनुष्य-बाण विद्येत जास्त निपुण झाला हे समजले तेंव्हा त्याला त्याच्या जाती मुळे शिकवण्याकरता इन्कार करणाऱ्या द्रोणांनी माझ्या पुतळ्या समोर तू शिक्षण घेतले मला गुरुदक्षिणा पाहिजे म्हणत ज्या अंगठ्याने तू बाण ओढतोस तो अंगठा कापून दे अशी विचित्र गुरुदक्षिणा घेवून त्याचे खच्चीकरण केले. आणि गुरूचा हा नीच पणा लपवत एकलव्य किती आज्ञाधारक शिष्य होता असे खोटे गुणगान करत त्याला खोटा मोठे पणा दिला. गुरूला सर्व शिष्य समान असतात पण द्रोणांनी सुद्धा उच्च निचः भेद-भाव करून संपूर्ण गुरु जणांच्या कुळाला काळीमा फासला. पण द्रोणाचे हे पापकर्म सोयीस्कररित्या दुर्लक्षित करण्यात आले. आज ही वेगळी परिस्थिती नाही.

उगीचच मराठीला कमी लेखू नका. तमिळनाडूने अभियान्त्रिक, वैद्यकीय अभ्यासक्रम तमिळ भाषेत सुरु केले. उच्च शिक्षण इंग्रजीत पाहिजे असा कायदा नाही उच्च शिक्षण मातृभाषेतून दिले तर सध्या असलेल्या इंग्लिश उच्चभ्रू लोकांचे महत्व कमी होणार आहे.आणि ही यांची पोटदुखी आजची नाही ती ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वरी जेंव्हा मराठीत लिहिली तेंव्हा पासूनची आहे .त्या वेळीही यांनी(संस्कृत पंडितांनी) मराठी विरुद्ध असाच कांगावा करून सर्व सामान्य जनतेला गीतेच्या शिकण्या पासून,ज्ञाना पासून वंचित ठेवण्याचा कुटील डाव रचला होता तो फसला. आज सातशे वर्षा नंतर संस्कृत चे फक्त कलेवर शिल्लक आहे ती भाषा व्यव्हारात कोणी बोलत नाही.पण मराठीचा "माझा मराठीचिये बोल कवतुके , अमृताते पैजा जिंके . ऐंसी अक्षरे रसिके मेळवीन..." करत "इवलेसे रोप लावियले दारी, त्याचा वेलू गेला गगनावरी । करत मराठीचा वटवृक्ष झाला . त्यावेळी संस्कृत चा पुरस्कार करणाऱ्यांनी इंग्रज येताच वाघिणीचे दुध मानत तत्परतेने इंग्रजी आत्मसात करण्यास सुरुवात केली .इंग्रजी भाषे चा वापर करत इंग्रजा बरोबर जवळीक साधली. इंग्रजाची हुजरेगिरी सुरु केली. इंग्रजी भाषा येवू लागताच हे लोक संस्कृत ला विसरले. त्याच बरोबर यांनी मातृभाषेचा मराठी बोलणाऱ्यांचा तिरस्कार सुरु केला.

बहुजन समाजाला तर यांनी शिक्षणा पासूनच दूरच ठेवले होते, पण त्याच बरोबर स्वजातीतील स्त्रियान बरोबरच समाजातील सर्वच स्त्रियांना शिक्षणा पासून दूर ठेवले होते. या सर्व स्त्रींचा उद्धार कोण्या उच्चभ्रू
ने केला नाही तर बहुजन समाजातील एका द्रष्ट्या महात्म्याने केला . १७५ वर्षा पूर्वी असंख्य अडचणीचा सामना करत शिक्षण घेतलेल्या जोतीबा फुले या युवकाने आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाईं
यांनी १८४८ - भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी काम सुरू केले. १८६५ - विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला.१८६४ - गोखले बागेत विधवाविवाह घडवून आणला. १८६८ - दुष्काळ काळात राहत्या घरातील हौद अस्पृश्यांसाठी खुला केला. इतके महान कार्य करणाऱ्या महात्म्याला या कामात अडथळा आणण्या साठी उच्चभ्रू नी यांच्या अंगावर विष्ठा टाकण्या पासून ते यांना मारण्या साठी सुपारी देवून १८५६ - मारेकरी घालून हत्येचा प्रयत्न केला . पण फुले दाम्पत्य या सर्व संकटाना पुरून उरले. आंणी त्यांनी शिक्षणाचे व्रत अखंड पणे चालू ठेवले. हळू हळू याचा चांगला परिणाम लक्षात येताच या उच्चभ्रू वर्गाने स्वताच्या स्त्रियांना शिक्षण देवून इंग्रज सरकारच्या नोकरीत लावण्यास सुरुवात केली. पण बहुजन समाज अजूनही शिक्षणा पासून वंचितच होता. या करता कर्मवीर भाऊराव पाटील , राजश्री शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना उभी हयात यांच्या बरोबर संघर्ष करत खर्च करावी लागली तेंव्हा कोठे शिक्षणाचे वारे या समाजाला लागले आणि महत्व या समाजांना समजले.
पण या वेळे पर्यंत उच्चभ्रू समाजाने इंग्रजीत वर्चस्व मिळवले होते.संस्कृत कधीच लयाला गेली होती, यांनी मग वाघिणीचे दुध म्हणत उच्च शिक्षण इंग्रजीतच झाले पाहिजे असा डांगोरा पिटत परत बहुजन समाजाला उच्च शिक्षणा पासून वंचित ठेवण्याचा कुटील डाव टाकण्यास सुरुवात केली . कारण मराठीत जर उच्च शिक्षण सुरु झाले तर आपली मक्तेदारी संपेल , ८०० वर्षा पूर्वीच्या प्रसंगाची पुनुरावृती होईल ही भीती यांच्या मनांत आहे. आणि यांनी मराठीत असे शिक्षण अश्यक्य असा खोटा गोबेल्स तंत्राचा वापर करत प्रचार सुरु केला. पण आजच्या संगणक युगात यांचा परत पराभव निश्चित आहे. आज ना उद्या सर्व शिक्षण मराठीतच होईल त्या प्रक्रीयाला कोणी रोखू शकणार नाही. ही माझी खात्री आहे.

--
Thanks & regard,

Thanthanpal,
Always visit:-
http://www.thanthanpal.blogspot.com

Comments

व्हायची तर होऊ दे

त्याने काय फरक पडणार आहे? 'ते' लोक मराठीतही पुढेच आहेत. नसतील तरी नंतर जातील असे तुम्ही दिलेल्या उदाहरणानेच दिसते. संगणकाचा मराठीच्या उत्कर्षाशी काय संबंध आहे?

'त्यां'ची पीडा न संपणारी...

'त्या' लोकांची पीडा लवकर संपणारी नाही.
कसे ते बघा. उद्या सर्व शिक्षण मराठीत होणार म्हणजे सगळ्या विषयांतील पारिभाषिक शब्द आपल्याला मराठीत लक्षात ठेवावे लागणार. ते तर बहुतेक संस्कृत भाषेतून घेतले आहेत. आपण शाळेत शिकलो होतो की ते शब्द. उदा : फोर्स म्हणजे बल. टेन्टॅकल्स म्हणजे शुंडिका, व्हेक्टर म्हणजे सदिश ( क्रिया, प्रतिक्रिया, प्रमेय, गृहितक, साध्य, सिद्धता, वृत्तचिती, इष्टिकाचिती, आंत्रपुच्छ, महारोहिणी, मस्तिष्कचेता आणि बरेच काही). आता तसे झाल्यावर आपण संस्कृतप्रचुर मराठी बोलू लागणार. म्हणजे आज आपण एखाद्याला विचारतो, की 'भाऊ! तुझ्या पोटात का जळजळ व्हायला लागलीय?' तर तेच वाक्य आपण 'बंधो! तुझ्या उदरदाहाचे प्रयोजन काय?' असे म्हणू. लोक जेव्हा मिंग्लिश बोलतात म्हणजे इंग्रजाळलेले मराठी (जसे : माझे ऑब्जेक्शन एक़्झॅक्टली तुमच्या ऍटिट्युडला आहे. हा व्हॅलिड पॉइंट नाही कारण तुमची फ्रेम ऑफ रेफरन्सच चुकली आहे.) तेव्हा ते आपोआप इंग्रजीकडे लवकर सरकत असतात. आता जेव्हा आपण संस्कृताळलेले मराठी बोलायला लागू तेव्हा आपला प्रवास असाच संस्कृतकडे सुरू होईल. तिथेही पुन्हा ते उच्चभ्रू बसलेच आहेत. संस्कृत ही संगणकासाठी सर्वात सोपी भाषा आहे कारण जगातील सर्व भाषांत संस्कृतचे व्याकरण अचूक आणि परिपूर्ण आहे, असे ज्येष्ठ संगणक संशोधक विजय भटकर मागे म्हणाले होते. जर पुढच्या काळात संस्कृत ही संगणकाची भाषा झालीच तर मग 'त्या' लोकांना रान मोकळेच की हो.

चार दिवसांपूर्वी एक बातमी वाचली. उत्तर प्रदेशात दलित संघटनांनी चक्क इंग्रजी भाषेचे मंदिर स्थापन केले आहे. ते म्हणतात, की संस्कृत ही आमची भाषा नाही. ज्या इंग्रजीने आम्हाला शिकवले, वर आणले आणि पोटाशी धरले, तीच आता आमची मायभाषा. म्हणजे इंग्रजीला मातृभाषा मानणारा हा दलितांचा मोठा वर्ग आणि आधीपासूनच वाघिणीचे दूध पिऊन माजलेल्या 'त्या' लोकांचा वर्ग हे तर आपल्याला संपूर्ण मराठीकरणाच्या प्रक्रियेतून वगळावे लागणार. पुन्हा आपल्याकडे मराठी शाळा झपाट्याने बंद पडत आहेत. सरकार नव्या मराठी शाळांना परवानगी देण्यापेक्षा इंग्रजी शाळा वाढवण्याच्या मागे लागले आहे. उच्च न्यायालयात मराठीचा वापर न्यायाधीशांनीच फेटाळून लावला आहे. हिंदी भाषा आणि परप्रांतियांचे अतिक्रमण हा काळजीचा विषय आहेच.

या पार्श्वभूमीवर मला तुमच्या प्रबळ इच्छाशक्तीचे कौतुक वाटते.

अहो ठणठणपाळ...

अहो ठणठणपाळ, बहुजनांनी मराठी भाषेतून शिक्षण घेतले पाहिजे. मराठी भाषेतून सर्व व्यवहार झाले पाहिजेत यासाठी आग्रह धरला पाहिजे आणि 'यांनी' [ हे 'यांनी' म्हणजे कोण माहिती नाही ] इंग्रजी शाळा-महाविद्यालयातून शिक्षण घ्यायचे, परदेशी आणि स्वदेशात गलेलठ्ठ पैसे मिळवणार्‍या जागा बळकावयाच्या आणि पुन्हा तुम्हाला इंग्रजी शिक्षण घेण्यापासून कोणी रोखले, तुम्हीही शिका, पैसे मिळणार्‍या जागा मिळवा असा कांगावा करायचा आणि 'भाषेच्या अभिमानाचे' गाजर दाखवत घाण्याला जुंपणार्‍या बैलासारखे बाकीच्यांना ते[ हे 'बाकी' म्हणजे कोण माहिती नाही ] तिथेच फिरवत आहेत, हे कसे लक्षात येत नाही ठणठणपाळ तुमच्या ?

-दिलीप बिरुटे

मक्तेदारी संपेल?

मराठीत उच्चशिक्षण उपलब्ध व्हावे, हा प्रयत्न प्रशंसनीय आहे.

मात्र मक्तेदारी संपण्याशी लावलेला संबंध बादरायण वाटतो आहे. (श्री. रिकामटेकडा यांचा असाच काही मुद्दा आहे, त्याच्याशी मी सहमत आहे. कोणाला मक्तेदारी करायची असेल, तर ती मराठीमध्येही पुढे चालवतील. उगाच नाही प्रमाण विरुद्ध प्रमाणेतर मराठीचे वाद ऐकायला येत.)

मराठी शिक्षणासोबत बहुजनसमाजातील लोकांची आर्थिक प्रगती होत राहिली, तर कदाचित असे म्हटले जाईल - "मराठी शिक्षणामुळे आर्थिक प्रगती झाली"

कॉनॉटेशन ;)

प्रमाणेतर हा शब्द प्रथमच वाचनात आला.

मला वाटले की केवळ भौतिकशास्त्रातच कार्यकारणभाव नाही असे रसेल म्हणाला ;)

अप्रमाणित आणि प्रमाणेतर

प्रमाणेतर हा खरोखरच छान शब्द आहे, अप्रमाणितपेक्षा भिन्न अर्थच्‍छटा असलेला. माझ्या मते अप्रमाणित म्हणजे अजिबात मान्यता नसलेला, तुच्छ. आणि प्रमाणेतर म्हणजे प्रमाण नसला तरी काहीतरी वेगळे वैशिष्ट्य असलेला. गैरप्रमाणित.
असे शब्द आपल्याला आणखीही बनवता येतील. शिष्टसंमतच्या विरुद्ध अशिष्टसंमत असू शकत नाही. त्यामुळे तिथे शिष्टसंमतेतर म्हणता येईल. --वाचक्‍नवी

हे आणि ते कोण?

हे आणि ते यापैकी एक पार्टी ब्राम्हण आहे असे दिसते. आता अपोझिशन पार्टी मध्ये कोण आहे ते सांगा ठणठणपाळ.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

मराठी बोलता? त्यातही चुका काढू ;)

ब्राम्हण हा शब्द चुकीचा लिहिला आहे.. तो 'ब्राह्मण' असा लिहावा
;)

(त्यांच्यातला) ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

मोल्सवर्थमध्ये सापडला

ब्राम्हण आहे की मोल्सवर्थमध्ये. ब्राम्हण हा शब्द उच्चारताना तुम्ही आघात कुठे करता हे महत्त्वाचे.

आपला,

(क्रिप्टिक) आजानुकर्ण


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

ब्राह्मणादी ह्‌ ची जोडाक्षरे.

अर्ध्या ह्‌ ला ण-न-म हे नासिक्य वर्ण आणि य-र-ल-व(तामीळ-मलयालमध्ये ळ) एवढीच व्यंजने जोडता येतात. पण मराठी जिभेला ही जोडाक्षरे उच्चारता येत नाहीत. उत्तरेकडे ब्राह्मण या शब्दाचा उच्चार आवर्जून, ब्राह्‌मण असा केलेला ऐकू येतो. महाराष्ट्रात बहुतेक नाहीच. ह्ण, ह्न,ह्म, ह्र ह्ल आणि ह्व यांचे उच्चरण आणि म्हणूनच लिखाण मराठीत अनुक्रमे ण्ह, न्ह, म्ह, र्‍ह, ल्ह आणि व्ह असे होते. ह्यचे लिखाण योग्य होत असले तरी उच्चार य्ह्य असा होतो. उदाहरणार्थ : (वह्यांनी=वय्ह्यांनी).
ख-छ-ठ-थ-फ-फ़ यांची द्वित्ते उच्चारताना ह चा पुढील व्यंजनाशी संयोग होतो. तरीसुद्धा, लख्ख, लछ्छी(=लछ्‌छी), लठ्ठ, जथ्था, फुफ्फुस, लफ़्फ़ा असे शब्द मराठी माणूस बर्‍यापैकी उच्चारू शकतो. हल्ली अनेक पुस्तकांतून हे शब्द अनुक्रमे लक्ख, लच्छी, लट्ठ, जत्था, फुप्फुस, आणि फ़ुप्फ़ुस असे छापलेले दिसतील. अगदी शु्द्धलेखन तज्‍ज्ञ म्हणवणार्‍या यास्मिन शेख किंवा सत्त्वशीला सामंत यांच्या पुस्तकांतही असेच लिखाण सापडेल. त्यांना अस्सल उच्चार जमत नसावेत. याव्यतिरिक्त उरलेल्या हकारयुक्त व्यंजनांची(घ-झ-ढ-ध-भ-ज़्ह) द्वित्ते मराठी माणूस अजिबात उच्चारू शकत नाही्, ही बहुधा वस्तुस्थिती असावी. --वाचक्‍नवी

बेडूक फक्त विहिरीलाच समुद्र समजतो

thanthanpal.blogspot.comभारतात दर १५ मैला वर भाषा आणि जेवणाची चव बदलते . या मुळेच कोकणात , मराठवाड्यात ,विदर्भात ,कोल्हापुरात , खानदेशात ,मुंबईत आणि हो पुण्यात मराठी भाषा आणि जेवणाची चव बदलते.याचा अर्थ आमची भाषाच मराठी शुद्ध आणि तुमची मराठी अशुद्ध हे म्हणणे म्हणजे कूप मंडूप
वृत्ती झाली . बेडूक फक्त विहिरीलाच समुद्र समजतो कारण त्याने आयुष्यात समुद्र कधी पाहिलाच नसतो.या मुळे विचारांचा मुकाबला विचारांनीच करा उगीच भाषे वर टीका करू नका ब्राम्हण का 'ब्राह्मण' कांही फरक पडत नाही

;)

डोळा मारणारे हसतमुख ;) मुद्दाम ठळक करूनही वर आलेला प्रतिसाद वाचून हसू आले. असो माझ्या विहीरीत जाऊन हसतो ;)

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

मराठीचे

मराठीचे भवितव्य माहीत नाही. मला वेगळीच उत्सुकता आहे. सर्वांनी सर्व प्रकारे सांगूनही श्री. ठणठणपाळ त्यांच्या लेखांना छोटी, सुटसुटीत शीर्षके का देत नसावेत?

पर्याय :
१. त्यांना मोठी शीर्षके आवडतात. (इथे गोळेकाका आठवले. :))
२. लोकांना आवडत नाही हे त्यांना आवडत असावे. (हे बर्‍याच लोकांचे मोटिव्हेशन असते.)
३. कल्पना आणि शक्ती दोघेही विचार करून दमले, नंतर कॉफी प्यायला गेले.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

सर्वांनी सर्व प्रकारे सांगूनही श्री. ठणठणपाळ त्यांच्या लेखांना छ

हा तर स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. शिवाय चर्चाप्रस्तावात जे लिहाल ते त्यांना ख.व. आणि/अथवा व्य.नि.ने कळवा.

एक प्रश्न

ठणठणपाळ ठणठण करून (नेहमीच) निघुन का जातात?

लेखाचा उद्देश

लेखाच्या मजकुरावरून लेखकाचा उद्देश 'मराठीतून शिक्षण' या विषयावर चर्चा घडवून आणण्याचा नसून प्रामुख्यानी कोणावरचा तरी राग व्यक्त करण्याचा असावा असं वाटतं.

प्रतिसादाला व्यक्तिगत निरोपानी उत्तर !

माझ्या वरील "लेखाचा उद्देश" या प्रतिसादावर ठणठणपाळ यानी व्य. नि. पाठवला आहे तो असा :

" 'मराठीतून शिक्षण' हाच माझ्या चर्चेचा विषय आहे. मराठी मग ती विदर्भ, मराठवाडा, कोल्हापूर, मुंबई किंवा खानदेश पुणे असो मराठी ती मराठी. मराठीत एक म्हण आहे चोराच्या मनात चांदण. आपले म्हणणे म्हणजे असा काही प्रकार तर नाही ना?"

मराठी?

आज लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीत एक फोटो आहे आणि एका लेखातही गोंड भाषेसंबंधाने एक उदाहरण लिहिले आहे. ते पाहून (सध्याच्या पाठ्यपुस्तकातील) मराठीतून शिक्षण घेणे हा देखील तिथल्या लोकांवर (इंग्रजीतून शिक्षण घेण्याइतकाच) अत्याचार आहे असे वाटले.

नितिन थत्ते
(नाऊ आय डोंट हॅव टु राईट धिस वे)

भद्रं ते

आपण सर्व जण माझ्या विचारावर टीका केली असती , ते विचार चूक आहे, हे उदाहरण देवून खोडले असते तर मला आनंदच झाला असता. पण हे न करता भाषा, शीर्षक , शैली इत्यादी बिनकामाच्या बाबी वर चर्चा करत आहात याचाच अर्थ माझे म्हणणे बरोबर आहे. हे कटू सत्य आपल्याला पचत नाही, सहन होत नाही त्यास माझा नाईलाज आहे. रोग्याला ओषध कडू लागेल म्हणून डॉक्टर कांही ओषध देणे बंद करत नाही. रोगी बरा करणे हेच त्याचे ध्येय असते. तसेच महाराष्ट्रात मराठीत सर्व व्यवहार झालाच पाहिजे हेच माझे उदिष्ट आहे. मग ती मराठी बोली भाषा वैदर्भीय,मराठवाडी,खानदेशी, कोल्हापुरी अथवा पुणेरी ज्या त्या विभागाशी संबंधित असो मराठी ती मराठी एका विभागाची भाषा सर्वांवर लादावी असा माझा दुराग्रह नाही. क.लो.अ. ही विनंती

या व्य. नि. बद्दल धन्यवाद.

"डॉक्टर कांही ओषध देणे बंद करत नाही. रोगी बरा करणे हेच त्याचे ध्येय असते. तसेच महाराष्ट्रात मराठीत सर्व व्यवहार झालाच पाहिजे हेच माझे उदिष्ट आहे" मग तुम्ही काय उपचार केलेत?
तुम्ही केवळ ठणठण करून पळ काढता.

सर्व व्यवहार म्हणजे काय? विट्रियस ह्यूमर आणि नेत्रकाचांभ द्रव यांपैकी तुम्हाला काय सोपे वाटते? वाहक म्हणजे कंडक्टर(विजेचा) हा शब्द बस(मुळात बसला मराठीत काय म्हणणार?)च्या संचालकालाही(ऑर्केस्ट्राप्रमाणे) वापरावा का? अग्नियान गमनागमन भयसूचक लोहताम्रपट्टिका म्हणजे काय?

आज लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीत

आज लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीत

अ-भय विद्यार्थी ! Bookmark and Share Print E-mail
मिलिंद चव्हाण - शनिवार, ३ जुलै २०१०
सर्व मुलांना शिक्षण सक्तीचे करण्याचा शासनाचा निर्णय योग्यच असला तरी शाळांतील विद्यार्थीगळतीचे प्रमाण का वाढते, याचाही अभ्यास होणे गरजेचे आहे. शाळेत मुलांना केल्या जाणाऱ्या शिक्षांमुळे त्यांच्या बालमनावर आघात होतो. परिणामी मुले शाळेकडे पाठ फिरवतात. दुसरी गोष्ट म्हणजे आदिवासी-गिरीजनांना प्रमाण मराठी भाषेत शिक्षण घेताना अडचणी येतात. कारण त्यांची जीवनव्यवहाराची भाषा वेगळी असते. आदिवासी गोंडी मुलांची ही समस्या सोडविण्यासाठी त्यांच्याच बोलीत मराठी साहित्य तसेच वैज्ञानिक आणि गणिती संकल्पना समजावून देण्याचा प्रकल्प राबवला गेल्यावर त्याचे सुपरिणाम दिसून आले आहेत. त्याबद्दल..... वरील उतारा पाहिल्यास मी मातृ भाषेतून शिक्षण देणे आवश्यक आहे हे जे म्हणतो ते माझे म्हणणे खरे आहे सत्य आहे हेच सिद्ध होते

पण हा तुमचा मुद्दा नव्हताच...

>>वरील उतारा पाहिल्यास मी मातृ भाषेतून शिक्षण देणे आवश्यक आहे हे जे म्हणतो ते माझे म्हणणे खरे आहे सत्य आहे हेच सिद्ध होते <<

ठणठणपाळ,
तुमच्या संपूर्ण लेखावरून 'मातृभाषेतून शिक्षण देणे कसे आवश्यक आहे' हा मुद्दा कुठेही जाणवलेला नाही. तसे असते तर तुम्ही जपान व इस्राईल या देशांनी आधुनिक तंत्रज्ञान व मूलभूत विज्ञान स्वभाषेत आणण्यासाठी कसे जाणीवपूर्वक प्रयत्न केले याचा उल्लेख केला असतात किंवा यासंदर्भात भाषाशास्त्रज्ञ अथवा बालमानसशास्त्रज्ञांच्या मतांचा दाखला दिला असतात. त्याऐवजी तुम्ही द्रोण व एकलव्याचा अंगठा, ज्ञानेश्वर व संस्कृत पंडित, फुले दाम्पत्याचा छळ वगैरे गोष्टी लिहिल्या आहेत आणि त्यांचा रोख एका विशिष्ट वर्गाच्या दिशेने आहे. फक्त लेखाच्या शेवटच्या वाक्यात 'आज ना उद्या सर्व शिक्षण मराठीत होईल', अशी खात्री व्यक्त केली आहेत. मिलिंद चव्हाणांच्या लेखावरून त्यांचा मुद्दा स्पष्ट होत असला तरी तुमचा नाही. तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे, हे याआधीच सगळ्यांच्या लक्षात आले असावे.

भारतातील एकूण भाषा.

भारतात किमान ६१६५ बोलीभाषा आहेत. मराठीच्याच ६४ बोली आहेत. एकाच बोलीच्या अनेक उपबोली असणारच. या सर्व बोलीभाषांतून शिक्षण देणे शक्य आहे का याचा विचार सुज्ञांनी करावा. तामीळमधून वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिकवणार असल्या हुलींवर विश्वास ठेवू नये. मराठीबाबतही अशा आरोळ्या यापूर्वी अनेकदा मारून झाल्या आहेत.

वरती, गोंडी भाषेतून मुलांना कसे शिकवतात याबद्दल उल्लेख आला आहे. गोंडी भाषेला लिपी नाही, त्यामुळे देवनागरी किंवा रोमन लिपीच वापरावी लागेल. तरी सर्व उच्चार लिहिता येतील की नाही ही शंकाच. तेव्हा नवी मुळाक्षरे बनवावी लागतील. गोंडीत पृथ्वी, जग, दृष्टी असल्या साध्यासोप्या मराठी शब्दांसाठी प्रतिशब्द नाहीत. ते त्यांना मराठीतून घ्यायचे नाहीत. नवीन गोंडी शब्द बनवून वापरण्यासाठी रूढ करायचा या तथाकथित शिक्षणतज्ज्ञांचा इरादा आहे. या सर्व प्रयत्‍नांतून समाजातील फुटीरपणा वाढीला लागेल हे सांगायलाच नको. पूर्वी संस्कृतने आपला देश एकसंध राखला होता, तसेच नंतर इंग्रजी भाषेने केले. या संस्कृतच्या व इंग्रजीच्या ऋणांचे कधीही विस्मरण होऊ देता कामा नये. -- वाचक्‍नवी

प्रमाणित आणि बोली तामीळ .....

सुमारे दोनेक वर्षांपूर्वी माझ्या असं वाचनात आलं होतं की तामीळही दोन प्रकारची आहे. एक बोली तामीळ आणि दुसरी प्रमाण तामीळ. (तिला सायंटिफिक तामीळ असे म्हंटले जाते). पैकी बिगरतामीळ जी तामीळ शिकतात ती सा. तामीळ असते.

आपण जिला 'हिंदी' म्हणतो तीही प्रमाणित भाषा आहे. तिला खडी बोली म्हणतात असं आम्हाला शाळेत असताना सांगण्यात आलं होतं. आता 'खडी बोली' हा शब्द वापरात आहे की नाही ते माहीत नाही. बिगरहिंदी जी हिंदी शिकतात ती खडी बोली म्हणून ओळखली जायची.

अजून एक

कूट तामिळपण असते ;)

प्रतिगामी विचार?

श्री. ठणठणपाळ यांचे विचार स्तुत्य आहेत. मराठीला कमी लेखू नका, उच्चशिक्षण मराठीतून मिळाले पाहिजे, मराठी ही ज्ञानभाषा व्हायला पाहिजे या मागण्या पूर्वीपासून होतात.त्याच मागण्या त्यांनी इथे मांडलेल्या आहेत. त्यातून मराठीचे भलेच (भलतेच नव्हे) होईल यात शंका नाही.

पण त्या प्रतिगामी असल्याचे काही दलित नेत्यांचेच म्हणणे आहे. 'इंग्रजी ही दलितांची देवता आहे' असे घोषवाक्य ऐकू येत आहे. श्री. राज ठाकरे यांच्यासारखे लोक मराठीचा झेंडा उभारून लोकांमध्ये फूट पाडत आहेत आणि दलितांना आधुनिक ज्ञानापासून वंचित ठेवण्याचा हा डाव आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंग्रजी शिकले, इंग्रजीतून शिकले म्हणून त्यांना आपल्या दलित बांधवांसाठी काही भरीव कार्य करता आले. लॉर्ड मेकॉले हा दलितांचा मसीहा होता.म्हणून प्रत्येक दलिताने इंग्रजीची कास धरली पाहिजे.

दलित नेत्यांच्या या अधिकृत भूमिकेशी श्री. ठणठणपाळ विसंगत भूमिका घेत आहेत व म्हणून ते प्रतिगामी आहेत असा आरोप त्यांच्यावर होऊ शकतो.
त्यांनी याबाबत आपली नेमकी भूमिका स्पष्ट करावी.

उच्च शिक्षणाचे माध्यम

ही बातमी रोचक ठरेल.

अहमदाबादमधील कॉमर्स कॉलेजेस इंग्रजी माध्यमाकडे वळत आहेत.

नितिन थत्ते
(नाऊ आय डोंट हॅव टु राईट धिस वे)

 
^ वर