सागरी तेलविहीर दुर्घटना - ३

सागरी तेलविहीर दुर्घटना - १
सागरी तेलविहीर दुर्घटना - २

(व्यक्तिगत अडचणींमुळे पुढचे भाग लिहीण्यास वेळ लागला, त्याबद्दल क्षमस्व!)

"Are you ****ing happy? Are you ****ing happy? The rig's on fire! I told you this was gonna happen." - डिपवॉटर होरायझॉन इन्स्टॉलेशन व्यवस्थापक जिमी हॅरेल (Jimmy Harrell) उपग्रहाद्वारे ह्युस्टनच्या नियंत्रण कक्षात फलाटाचा स्फोट झाला तेंव्हा म्हणाला. कालच बिपीच्या सीईओला जे सिनेट कमिटीने प्रश्न विचारताना माहीती दिली ते वाचण्यासारखे आहे: गेल्या पाच वर्षात एक्झॉन-मोबिल कडून सुरक्षेसंदर्भात केवळ एक चूक (safety violation) घडली, सनोको आणि कॉन्को फिलिप्स या कंपन्यांकडून प्रत्येकी ८ चूका तर बिपीच्या त्याच कालावधीत ७६० चूका झाल्या आहेत!

एक लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की, बिपीचा हा डीपवॉटर होरायझॉनचा प्रकल्प हा आजपर्यंतच्या खोलवर केल्या गेलेल्या प्रकल्पातील एक आहे. समुद्राच्या खाली ५००० फूट जेंव्हा विहीर खणली जाते, तेंव्हा तेथे पाणबुडेच काय पण पाणबुड्याघेऊन माणसे पण जाऊ शकत नाहीत. फक्त तेथे यंत्रमानवाने सज्ज अशा पाणबुड्याच देखरेखीसाठी असतात. थोडक्यात "दृष्टीआड असलेल्या या सृष्टीत" हे काम चालू होते. ते करताना आता जे काही बाहेर येत आहे त्याप्रमाणे सुरक्षेकडे दुर्लक्षही झाले. जेंव्हा अपघात झाला तेंव्हा तात्काळ नक्की किती झाला हे तात्काळ समजणे शक्य नव्हते, तसेच जितके कोंबडे झाकता येईल तितके झाकावे असा "व्यावहारीक" विचार देखील होताच. पण तसे होणे शक्य नव्हते कारण तेल काही एकाच जागी बसणार नव्हते.

अगदी पहील्यांदा १००० बॅरल्सचा असलेला तेलगळतीचा अंदाज, नंतर बिपीनेच वाढवून दिवसाला ५००० बॅरल्स पर्यंत वाढवला. नंतर काही शास्त्रज्ञांच्या कामामुळे दिवसाला १२,००० ते १९,००० पर्यंत पोचला, तर तो आता दिवसाला ६०,००० बॅरल्स इतका तेल आहे असे अंदाजापेक्षा शास्त्रिय निकषांवर सांगण्यात येत आहे. सुरवातीस जो अंदाज हा केवळ दिसणार्‍या प्रवाहावरून ठरवला जात होता तो आता तंत्रज्ञानाचा वापर करून शक्य तितका अचूक काढला जात आहे. त्यासाठी ध्वनीलहरी, सेन्सर्स तंत्रज्ञान आणि प्रेशर गेजेस वापरली जात आहेत.

या लेखात आपण फक्त ही गळती थांबवायचे उपाय पाहूया:

सगळ्यात प्रथम वापरला गेलेल्या प्रकाराचे नाव आहे: टॉप किल. खालच्या रेखाटनात त्याची चांगली माहिती दिली गेली आहे. या मधे खूप चिखल आणि काँक्रीट यांचे मिश्रण करून ती विहीर भरून टाकायचा प्रयत्न केला गेला. मात्र वर म्हणल्याप्रमाणे सगळेच नजरेआड चालले असल्याने प्रश्नाची खोली समजणे हे तंत्रज्ञांना अवघड गेले आणि तीन दिवसांच्या प्रयत्नानंतर या प्रयत्नांवर तेलाबरोबरच पाणी सोडावे लागले....अजून हवे तसे यश मिळालेले नाही.

तेल गळती जरी थांबवता आली नाही तरी तेलाचा दाट तवंग विरळ करण्याचा प्रयत्न बिपी करत आहे. त्यासाठी विषारी समजले जाणारे डिस्पर्संट वापरले जात आहे. वास्तवीक पर्यावरणशास्त्रात अशा प्रकारच्या उत्तराला, "solution of pollution is dilution" असे म्हणायची पद्धत आहे. अर्थात हा तितकासा योग्य उपचार नाही. मर्यादीत तेलगळतीवर नक्कीच उपाय होतो कारण त्यात तेल विरळ होत जाते. पण येथे सागरीसृष्टीत त्याचे काय परीणाम आहेत ह्यावर काहीच संशोधन नाही. शिवाय त्यामुळे तेल जास्त ठिकाणी पसरत आहे हा भाग वेगळाच...

अशाच प्रकारच्या दुर्घटनांमधे जगात इतरत्र काय काय केले गेले याचा धावता आढावा घेऊ या: (संदर्भः npr)

१९६१ अल्जेरीया (दि डेव्हिल्ज सिगरेट लायटर): सहारा वाळवंटात लागलेली ही ८०० फूट उंच आग सहा महीने चालू होती. स्फोट इतका भयंकर होता की त्या क्षणाला त्या भागात असलेले कामगार हे त्या स्फोटात खेचले गेले... टेक्सास मधील अग्निशमनदलाच्या तुकडीने त्यावर नायट्रोग्लिसरीनचा मारा करून आग थांबवण्यात यश मिळवले.

१९६६-७२ सोव्हीएट युनियनचे आण्विक उत्तर: १९६६ ते ७२ च्या काळात पाच वेळेस झालेल्या तेलविहीरी स्फोटांमधे सोव्हीएट युनियनने नियंत्रीत अणूस्फोट घडवून त्या तेलविहीरींना पृथ्वीच्या उदरात अक्षरशः गडप करून टाकले! अशा शीतयुद्धाच्या काळात देखील अमेरिकेने हा वापर "शांततमय वापर" म्हणून समजला. सहाव्यांदा देखील (१९८१ मध्ये) असाच प्रकार करायचा प्रयत्न केला मात्र त्यावेळेस त्याचा वापर करताना चुका घडल्या असाव्यात म्हणून साध्य झाला नाही. रशियन शास्त्रज्ञांचे आत्ता देखील बिपी संदर्भात असेच म्हणणे होते की ह्या तंत्रज्ञानाचा वापर करावा. मात्र जेंव्हा ओबामाला नोबेल शांतीपुरस्कार मिळतो, अण्वस्त्र कमी करण्याचा हट्ट अमेरिका जगभर करते तेंव्हा पाण्याखाली होणार्‍या परीणामांची कल्पना न येता असे काही करणे म्हणजे आधीच राष्ट्रीय राजकीय अडचणित असलेल्या ओबामा सरकारला आंतर्राष्ट्रीय पातळीवर पण तोंड देत बसावे लागेल म्हणून टाळले गेले आहे.

त्या व्यतिरीक्त तुर्कमेनिस्तान (१९७१ - आजतागायत), नायजेरीया (१९७० चे दशक ते आजतागायत) आणि रशिया आर्क्टीक (१९७० चे दशक ते आजतागायत) अशा ठिकाणी अज्ञात भविष्यापर्यंतच्या आगी लागलेल्या आहेत. तुर्कमेनिस्तानची आग आता पर्यटनस्थळ झाले आहे!

Comments

उत्तम लेख

अतिशय उत्तम लेख आहे. अभिनंदन

उत्तम

उत्तम लेख. शेवटी बीपी पैसे द्यायला कबूल झाले.

नायजेरियामध्ये गेली ५० वर्षे तेलगळती चालू आहे. तेथील लोकांना नुकसानभरपाई वगैरे तर फार दूरची गोष्ट आहे. शेवटी न्याय सत्ता आणि पैसा यांच्याच बाजूने असतो ही गोष्ट पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

चांगले संकलन

हा लेख आटोपता घेतल्यासारखा वाटला. ब्लोआउट प्रिवेंटरला कापून प्रतिदिनी १५००० बॅरल्स तेल बीपी जमा करत आहे. जर या तेलावर प्रक्रिया करण्याची क्षमता जास्त असली असती तर यापेक्षा जास्त तेल जमा करता येऊ शकले असते. जगात अनेक देशांकडे अशी प्रक्रिया करण्यासाठी लागणारी जहाजे, तंत्रज्ञान आहे. पण अमेरिकेतील जोन्स ऍक्ट रद्द केल्याशिवाय तसे करता येणे शक्य नाही. पर्यावरणीय दुर्घटनांमध्ये या तेल गळतीचा क्रमांक कितवा असावा यावर आत्ताच वाचलेला हा लेखही रोचक आहे.

________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.

बीपी

बीपीचा सीइओ याट ट्रिपला गेल्याचे आजच वाचले.

चांगले संकलन

माहितीचे चांगले संकलन आहे.

धन्यवाद.

आणखी एक

तेलगळतीचा आणखी एक दुष्परिणाम म्हणजे माशांची एक प्रजाती समूळ नष्ट होऊ शकेल.

आतापर्यंत झालेल्या (आणि चालू असलेल्या) इतर गळत्यांमुळे किती प्रजाती नष्ट झाल्या कुणास ठाउक.

--

 
^ वर