सागरी तेलविहीर दुर्घटना - २
पहील्या भागात आपण तेल, तेल विहीर आणि आत्ता झालेला अपघात इथपर्यंत वाचले असेल. आता परीणामांच्यासंदर्भात आधी थोडे समजून घेण्याचा प्रयत्न करूया...
प्रदुषणाचे परीणाम दृश्य-अदृश्य अशा दोन्ही स्वरूपात असतात. त्यांची व्याप्ती ही अनेक गोष्टींवर ठरते. त्यात नुसते प्रदुषणाचे रासायनीक मिश्रणच जबाबदार नसते तर भौगोलीक परीस्थिती, वातावरणातील तापमान, पाउस/कोरडेपणा, पाणी असेल तर त्याचा वेग, घनता, जमिनीत असेल तर त्या मातीचे गूण, चढ उतार, आजूबाजूस असलेले भूगर्भातील जल त्याचे वाहणे वगैरे वगैरे अनेक गोष्टी हे ठरवत असतात.
थोडे अवांतर होईल, पण कल्पना येण्यासाठी, एक उदाहरण म्हणून सांगतो, कॅनडातील क्युबेक (त्यातील जंगलांचा) भाग हा आमच्या घरापासून साधारण ४००-४५० मैलावर रस्त्याने असेल. गेल्या रविवारी म्हणजे मे ३०, २०१० ला तेथे जंगलात बरेच वणवे पेटले. तर बॉस्टनमधे हवा काळवंडली आणि जळका वास हा दिवसभर येत होता. राज्याच्या पर्यावरण विभागाला काही भागात हवेने धोक्याची पातळी गाठली असल्याने लोकांना घरात बसायला सांगावे लागले. दुसर्या दिवशी पाऊस पडला तर चार्ल्स नदीवर काजळी पसरल्याचे जाणवत होते. असेच एक अजुनही मोठे उदाहरण म्हणजे चीन सध्या मोठ्या धडाक्यात औष्णीक वीज केंद्रे बांधत आहे. तर त्याचे परीणाम पॅसिफिकच्या दुसर्या टोकाला असलेल्या कॅलीफोर्नियात जाणवत आहेत. थोडक्यात पर्यावरण आणि प्रदुषण हे कुठल्या राजकीय अथवा आर्थिक/सामाजीक सीमा पाळत नाही.
खनीज तेल हे प्रामुख्याने हायड्रोजन आणि कार्बन यांच्या विविध संयोगांचे मिश्रण असते. तरी देखील त्यातून कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड, व्होलाटाईल ऑर्गॅनिक कॉम्पाउंड्स, शिसे (लेड) वगैरे वगैरे बरेच काही, ज्याला प्रदुषण म्हणता येईल अशी घन-द्रव-वायू रुपातील रसायने असतात. एक छान वाक्य आहे, मला वाटते मी युएस फिशरीच्या संकेतस्थळावर वाचलेले होते: तेल जेंव्हा आपण गाड्या, उर्जा उत्पादन, घरं गरम करायला वापरतो, तेंव्हा ती एक मोठी गरज असते. मात्र तेच तेल जेंव्हा समुद्रात सांडते तेंव्हा तो एक मोठा प्रश्न ठरतो. प्रदुषणाच्या नेहमी वापरलेल्या (येथील) कायदेशीर (रेग्युलेटरी) ठोकताळ्यात बोलायचे तर, एका गॅलन तेलाने एक बिलीयन गॅलन्स पाणी प्रदुषित होऊ शकते!
Source: seawifs.gsfc.nasa.gov |
मात्र एक गंमतशीर आलेख मला नासाच्या संस्थळावर मिळाला. अर्थात यातील विदा हा अमेरिकेचा आहे, पण इतरत्र याहून चांगली अवस्था असण्याची शक्यता कमी वाटते! याचा अर्थ असा की तेलाने होणारे प्रदुषण हे जास्त करून मोठ्या कंपनीकडून एकदाच होण्या ऐवजी व्यक्तिगत कृत्यातून दरोज, हळू हळू घडत असते! अर्थात हे स्लो पॉयझनिंग सारखे ठरत असते आणि त्यातून एकतर नद्या अथवा काही जवळचे किनारे हे खराब होतात.
याचा अर्थ बिपीकडून जे काही घडले ते विशेष नाही असा होतो का? अर्थातच नाही. एक भांडवलदार म्हणून बिपीकडून पैसे वाचवण्यासाठी आधी आणि अपघातानंतरही अनेक चुका (का गुन्हे?) झाल्या आहेत. त्यात सुरक्षायंत्रणा नीट नसणे हे प्रामुख्याने आधीचे कारण होते. तर नंतर ज्या पद्धतीने वाचलेल्या कामगारांकडून फसवून सह्या करून घेतल्या (आम्हाला काही झाले नाही वगैरे, हे एनपीआर वर ऐकले होते) त्यातून त्यांची लबाडी समजली. अर्थात आता ते सगळे बदलत आहे कारण अक्षरशः अभाळ फाटले असताना ठिगळाने स्वतःचा बचाव करणे येथे शक्य होऊ शकत नाही. सुरवातीस दिवसास १००० बॅरल्स इतकी तेलगळती सांगितली. इपिए आणि एनओएए या संस्थांनी अधिक संशोधन केल्यावर ती पाचपट अधिक म्हणजे दिवसाला ५००० बॅरल्स इतकी आढळली. न्यूजवीकच्या आजच्या बातमीत म्हणल्याप्रमाणे ४२ दिवसात साधारण दिवसाला १९००० बॅरल्स इतकी तेलगळती होत आहे. अर्थात खरा आकडा कुणालाच ठाम पणे सांगता येत नसला तरी सुरवातीस सांगितलेला आकडा फारच कमी होता.
Source: www.newsweek.com and Charlie Riedel , AP |
तेल प्रदुषणाने, सागरीसृष्टी खराब होते - नुसते तेलात बुडल्यानेच नाही! तर संपूर्ण जैविकशृंखलाच खिळखिळी झाल्याने. त्यामुळे मासेमारी थांबते. अर्थात मच्छिमार उद्योग असलेल्या भागांचा प्रत्यक्ष व्यवसाय जातो आणि ते विकत घेऊन विकणार्यांचा धंदा. त्यातूनही जर नकळत प्रदुषित पाणि, हवा अथवा मासे खाल्ले गेले तर त्याचे आरोग्यावर परीणाम होतात आणि डॉक्टरांकडे जावे लागले की आरोग्याच्या विम्यावर. सरकारी विमा असला तर त्या दुखण्यांचा काही खर्च सरकारला उचलावा लागतो तर खाजगी असला तर खाजगी क्षेत्राला. विम्यासंदर्भातील विधान हे विशेष करून अमेरिकेलाच लागू आहे. पण इतरत्रही कुठल्यानकुठल्या रुपाने आरोग्यावर पैसे जातातच. असे तेल जर किनार्यावर आले तर त्यातून ते किनारे हे पर्यटनासाठी खराब होतात. म्हणजे पर्यटन व्यवसाय बुडाला. व्यवसाय बुडाला याचा अर्थ माणसांचे काम/पैसे कमी झाले. सरकारी महसूल कमी झाला, वगैरे वगैरे. थोडक्यात एका कंपनीच्या पैसे वाचवण्याच्या चुकीच्या पद्धतीने आज त्या कंपनीचे देखील आर्थिक नुकसान झाले आणि राष्ट्राचे आर्थिक नुकसानही होत आहे.
भाग ३ - तेलगळती थांबावायचे प्रयत्न - तांत्रिक, सामाजीक, राजकीय पाउले, इतरत्र वापरलेली अणूबाँबसहीत वेगवेगळी तंत्रज्ञाने.
-------------
Comments
बघवत नाहिये
तेलात लडबडलेले असहाय्य पक्षी बघवत नाहीत. नाही बघितले तरी रहावत नाही आणि करता काहीच येत नाही.
--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com
उत्तम लेखमाला
लेखमाला माहितीपूर्ण आहे. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
असेच एक अजुनही मोठे उदाहरण म्हणजे चीन सध्या मोठ्या धडाक्यात औष्णीक वीज केंद्रे बांधत आहे. तर त्याचे परीणाम पॅसिफिकच्या दुसर्या टोकाला असलेल्या कॅलीफोर्नियात जाणवत आहेत.
हे कळले नाही. म्हणजे चीन मधील औष्णिक वीज केंद्रे फक्त कॅलीफोर्नियात जाणवेल अशी हालचाल करीत आहेत का सर्वत्र. थोडा संदर्भ मिळाला तर बरे वाटेल.
प्रमोद
प्रदुषणाची व्याप्ती
म्हणजे चीन मधील औष्णिक वीज केंद्रे फक्त कॅलीफोर्नियात जाणवेल अशी हालचाल करीत आहेत का सर्वत्र.
हे प्रदुषणाची व्याप्ती केवळ स्थानीक अथवा एखाद्या देशापुरतीच मर्यादीत रहात नसून देशाच्याच काय खंडाच्या सीमा पण पार करते हे सांगायला लिहीले होते.
या संदर्भात त्यावेळेस बरेच ऐकले होते. आत्ता गुगल्यावर न्यूयॉर्क टाईम्सचा हा संदर्भ मिळाला. त्यातील एक वाक्य खालील प्रमाणे:
एम आय टी च्या एका अभ्यासानुसार चीन आठवड्याला दोन इतक्या गतीने नवीन औष्णीक वीज केंद्रे बांधत आहे. त्याच्या प्रदुषणाचा त्रास हा कॅनडातील पश्चिमी किनार्यावरील भागास पण होत आहे.
अर्थात अमेरिकेचा पण असाच त्रास जगाला होत आहे हे देखील विसरून चालणार नाही. मात्र सुरवातीस म्हणल्याप्रमाणे, चीन-अमेरिका या अर्थाने हे लिहीले नव्हते तर पूर्णपण प्रदुषण किती पसरू शकते हे समजण्यासाठी लिहीले होते.
--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
उत्तम लेखमाला
या प्रकारातून प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष जीवितहानीचा काही अंदाज आहे का?
दुसरा एक सर्वसाधारण प्रश्न - अशा जेव्हा घटना घडतात, तेव्हा त्यांचा पर्यावरणावर होणारा परिणाम मोजण्याचं काही एकक आहे का? म्हणजे भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी रिश्टर स्केल आहे तसं काहीसं...
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
रिश्टर स्केल आणि हानी
भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी रिश्टर स्केल आहे
थोडे अवांतर आहे, पण या संदर्भात मला २००१ सालचा दिलीप डिसुझांनी लिहीलेला रिडीफमधील एक छान लेख आठवला आणि गुगगल्यावर तो मिळाला मिळाला.
यात डिसुझांनी भूज (२००१) आणि बे एरीया (१९८९) मधे झालेल्या भूकंपाची तुलना केली आहे. त्यांचे थोडक्यात म्हणणे असे की लोकसंख्या घनता ही भूजपेक्षा बे एरीयात जास्त, दोन्ही भूकंपाची तिव्रता तुलना करता येण्याजोगी. तरी देखील भूजमधे जिवीतहानी ही जवळपास २०,००० तर बे एरीयामधे जिवीत हानी ६३! असे का? याचे उत्तर केवळ मनुष्याच्या जीवाला असलेली किंमत आणि त्या अनुषंगाने इमारती बांधताना पाळलेले नियम हे आहे. या संदर्भात मी उत्सुकतेने दोन्हीकडील वित्तहानी पाहीली तर ती बे एरीयात $६ बिलियन्स तर भूजमधे $५.५ बिलियन्स! अर्थात वित्तहानी बर्यापैकी तुलनात्मक तर जिवीतहानीतील तफावत खूपच गंभीर!
अजून एक गंमतशीर माहीती पण केवळ ऐकीव: भूजमधील सरकारी इमारती पडल्या नव्हत्या (अथवा कमी पडल्या) कारण त्या बिल्डींग कोड प्रमाणे बांधलेल्या होत्या. :-)
तात्पर्यः रिश्टर स्केलने भूकंप केव्हढा झाला हे समजू शकले तरी त्याने झालेली हानी ही स्थलकालपरत्वे वेगळी असते.
--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
आर्थिक नुकसान
या तेल प्रदूषणाने कितपत आर्थिक नुकसान झाले असावे याचा अंदाज आहे का?
लेखमाला उत्तम चालली आहे. पुढील लेखही येवढ्याच लांबीचे टाकावेत. चित्रदर्शी लेखाबद्दल धन्यवाद.
..अत्यंत भयानक
नुकतेच गिरीश कुबेरांचं '..हा तेल नांवाचा इतिहास आहे' हे याच विषयावरचं पुस्तक संपवलं आणि लगेच हे भाग वाचायला मिळाले. या तेल कंपन्यांची दादागिरी व अनैतिकता पुढे अत्यंत घातक ठरणार आहे हे नक्की. उत्तम मांडणी व माहितीबद्दल धन्यवाद.
-हेमन्त
धन्यवाद + प्रतिसादांसदर्भात अधिक माहीती
सर्व वाचक, प्रतिसादांचे आभार.
आरागॉर्न म्हणतात: तेलात लडबडलेले असहाय्य पक्षी बघवत नाहीत. नाही बघितले तरी रहावत नाही आणि करता काहीच येत नाही.
लेखात लिहायचे राहीले पण ते त्याच का त्याच्या आदल्या दिवशी प्रसिद्ध झालेले चित्र होते - लुइझियानाच्या राज्य पक्षी - ब्राउन पेलीकनचे. आपले क्षेत्र वेगळे असल्याने, तुम्ही/आम्ही/मी काहीच करू शकत नाही हे अनेकांसाठी वास्तव असले, तरी पक्षी वाचवणारी संस्था या संदर्भात बरेच काम करत आहे. त्यात पक्षी संशोधक , मरीन बॉयॉलॉजिस्ट वगैरे वगैरे लोकं जातीने काम करत आहेत. आत्ता पर्यंत १५७ पक्ष्यांना ते वाचवू शकले.
राजेश घसकडवी विचारतात: या प्रकारातून प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष जीवितहानीचा काही अंदाज आहे का? दुसरा एक सर्वसाधारण प्रश्न - अशा जेव्हा घटना घडतात, तेव्हा त्यांचा पर्यावरणावर होणारा परिणाम मोजण्याचं काही एकक आहे का?
प्रत्यक्ष मानवी जीवितहानीचा आकडा ११ आहे. अप्रत्यक्ष हानीबद्दल अनेक अंदाज येत राहतील - ते दोन्हीकडील टोकाचे असू शकतात. पण मला वाटते त्याचे उत्तर मिळायला वेळ लागेल. जो पर्यंत नक्की प्रदुषणाचा अंदाज येत नाही तो पर्यंत त्यातून होणारे "रीस्क ऍनॅलिसिस" पण मला वाटते नीटसे होणार नाही. उ.दा. नुसतेच तेलाचे प्रदुषण हे पाण्यात राहीले तर त्याचे होणारे परीणाम हे खूपच मर्यादीत असू शकतील. पण तेच जर जमिनीवर आले तर त्याची व्याप्ती वाढणार आहे. म्हणूनच भूकंपासारखे केवळ एकच एकक या संदर्भात असू शकणार नाही. गळती मुळे जल-जमीन-वायू यात होणार्या रासायनीक प्रतिक्रीयांवर, त्यांच्या क्वांटीटीवर बरेच काही अवलंबून असणार आहे.
प्रियाली विचारतात: या तेल प्रदूषणाने कितपत आर्थिक नुकसान झाले असावे याचा अंदाज आहे का? पुढील लेखही येवढ्याच लांबीचे टाकावेत.
काही बज डॉलर्स! पण त्या संदर्भात नंतर अधिक लिहीन. लेखाची लांबी आपण म्हणता त्याप्रमाणे आणि विषय कंटाळा ठरू नये म्हणून मर्यादीत ठेवण्याचा प्रयत्न करत आहे (मला ते खूपच अवघड जाते तरी ;) ) . पुढे देखील तेच करेन. अर्थात काही बदल सुचवायचे असल्यास अवश्य सुचवावेत..
हेमन्त यांनी म्हणलेले गिरीश कुबेरांचे पुस्तक नुसते ऐकले आहे. अजून वाचायचा योग आला नाही... ह्या विषयाची सर्वांना थोडी का होईना माहीती असावी इतके नक्की वाटते.
--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)