भारत ज्योतिषशास्त्राचे माहेरघर -मोहन भागवत

आजच्या लोकसत्तात (दि. १९ मार्च २०१०) एक बातमी वाचली. ती बातमी अशी:

भारत ज्योतिषशास्त्राचे माहेरघर -मोहन भागवत

नागपूर, १९ मार्च/प्रतिनिधी
एकेकाळी भारतामध्ये ज्योतिषशास्त्र फार शिखरावर होते. अन्य देशातील विद्वान व ज्योतिषशास्त्रप्रेमी भारतात येऊन हे शास्त्र भारतीय विद्वानांजवळ शिकत असत व त्यानंतर भारतीय ग्रंथांची भाषांतरे आपापल्या देशातील भाषांमध्ये करत असत. आपला देश ज्योतिषशास्त्राबरोबर इतर विद्यांचे पण माहेरघर आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. ते नागपुरातील आंतरराष्ट्रीय संस्थेचे ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी जागतिक स्तरावर यश संपादन केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी संघ मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या एका छोटेखानी समारंभात बोलत होते. ज्योतिषशास्त्राला न्युनगंडामुळे दुय्यम परिस्थिती प्राप्त झाली आहे. पूर्वीच्या ज्योतिष ग्रंथकारांनी लावलेली व सांगितलेली ब्रम्हांडातील अपूर्व रहस्ये, शोध त्यांच्या ग्रंथामध्येच राहिले आहेत. यासाठी आता भारतातील ज्योतिषांनी अभ्यास करून, परिश्रम करून परत या क्षेत्रात देशाचे नाव उज्वल करावे, असे आवाहन मोहन भागवत यांनी केले.अमेरिकन सोसायटी ऑफ अ‍ॅस्ट्रोलॉजर्स या संस्थेतर्फे जगातील ज्योतिष अभ्यासकांकडून ज्योतिषशास्त्रानुसार ‘२०१० मधील अमेरिका’ या विषयावर लेख मागवण्यात आले होते. या आवाहनानुसार, सुमारे २३ लेख प्राप्त झाले. नुकतेच वॉशिंग्टन येथे झालेल्या या संस्थेच्या वार्षिक सभेत ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांच्या मेदिनीय ज्योतिषानुसार, २०१० मधील अमेरिका या नाविन्यपूर्ण व अत्यंत अभ्यासपूर्ण लेखास उत्कृष्ट लेख म्हणून निवडण्यात आले. डॉ. वैद्य यांनी या लेखात प्रामुख्याने बदलत्या ग्रहस्थितीमुळे निर्माण होणाऱ्या नैसर्गिक आपत्ती, प्रजापती, हर्षल ग्रहामुळे ओबामा शासनातर्फे घेण्यात येणारे चुकीचे निर्णय, आंतरराष्ट्रीय धोरणे, देशाची सांपत्तीक आणि राजकीय परिस्थिती वगैरेवर भाकिते वर्तवण्यात आली आहेत. यावेळी विविध क्षेत्रातील नामवंत उपस्थित होते.

आदरणीय सरसंघचालकांनी काही विधाने केली आहेत. त्यापैकी ३ विधाने मला विचारप्रवृत्त करणारी वाटली. ह्या विधांनावर उपक्रमींचे मत जाणून घ्यायला आवडेल. ती विधाने अशी:
१. भारत ज्योतिषशास्त्राचे माहेरघर
भारत खरेच ज्योतिषशास्त्राचे माहेरघर होते/आहे का? (होराभूषण मधला होरा हा ग्रीक आहे, असे मी बहुधा उपक्रमावरच वाचले होते.)

२. ज्योतिषशास्त्राला न्युनगंडामुळे दुय्यम परिस्थिती प्राप्त झाली आहे.
ज्योतिषशास्त्राला खरेच दुय्यम परिस्थिती प्राप्त झाली आहे का? असल्यास पहिल्या दर्जाची परिस्थिती कशी असावी?

३. पूर्वीच्या ज्योतिष ग्रंथकारांनी लावलेली व सांगितलेली ब्रम्हांडातील अपूर्व रहस्ये, शोध त्यांच्या ग्रंथामध्येच राहिले आहेत.
हे कसे काय कळले. अशा काही शोधांबद्दल, अपूर्व रहस्यांबद्दल कुणाला विशेष माहिती असल्यास कृपया द्यावी.

ह्याशिवाय,

बदलत्या ग्रहस्थितीमुळे निर्माण होणाऱ्या नैसर्गिक आपत्ती, प्रजापती, हर्षल ग्रहामुळे ओबामा शासनातर्फे घेण्यात येणारे चुकीचे निर्णय, आंतरराष्ट्रीय धोरणे, देशाची सांपत्तीक आणि राजकीय परिस्थिती वगैरेवर भाकिते वर्तवण्यात आली आहेत.
प्रत्येक मंत्रालयात एक वास्तुशास्त्री, एक होराभूषण, एक नाडीतज्ज्ञ नेमायला हवा असे दिसते. हे सगळे वाचल्यावर भाजपाच्या व संघाच्या भवितव्याबाबत, भविष्याबद्दल तुम्हाला एखादे भाकीत वर्तवावेसे वाटते आहे काय? वाटत असल्यास कृपया ते वर्तवावे, ही विनंती.

Comments

:)

:)

हा!हा!

लेख वाचून भरपूर हसून घेतले. प्रचंड मनोरंजन झाले हे मात्र खरे.

चन्द्रशेखर

अमेरिकेतील मंदी

मला आश्चर्य असं वाटतं की अमेरिकेतल्या मंदीविषयी भारतीय ज्योतिष्यांनी काही भाकितं कशी केली नाही? त्यांना जर ती मंदी दिसली असती तर अब्जावधी रुपये काही महिन्यात मिळवता आले असते. मग हा न्यूनगंड वगैरे गेला नसता का? आपल्या भारतातल्या कोणे एके काळच्या कोण्या एका सुवर्णयुगाप्रमाणे, झक मारत सगळे परदेशांतून ज्योतिष शिकायला आले असते.

बदलत्या ग्रहस्थितीमुळे निर्माण होणाऱ्या नैसर्गिक आपत्ती...

पर्यावरणवाद्यांनी कार्बन कमी करा वगैरे म्हणण्यापेक्षा ते ग्रह तिथून बाजूला हलवा असं म्हणायला पाहिजे...

बाकी ही अवलक्षणी कार्टी आपलं माहेरघर पूर्णपणे सोडून देऊन कुठल्यातरी सासरीच नांदली तर बरं असं वाटतं. व बरोबर बौद्धिक व्यभिचार करणाऱ्या (म्हणजे जवळपास सर्वच) राजकारण्यांनाही ती घेऊन गेली तर त्याहूनही उत्तम.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

(वि)फलज्योतिष

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
प्रश्नःभारत खरेच ज्योतिषशास्त्राचे माहेरघर होते/आहे का? (होराभूषण मधला होरा हा ग्रीक आहे, असे मी बहुधा उपक्रमावरच वाचले होते.)

उत्तरः**आकाशस्थ ग्रहगोलांचा मानवी जीवनावर गूढ परिणाम होतो ही मूढ कल्पना मूळ युरोपीय लोकांची.भारतीय वैदिक परंपरेत फलज्योतिषाला मुळातच स्थान नाही. ते नंतर घुसडले गेले. (हे वचन संस्कृत पंडित सी.कन्हन राजा यांचे आहे.)
** रामायण महाभारतात नक्षत्रनामांचे उल्लेख आहेत. मात्र राशीचा उल्लेख कुठेही नाही. बारा राशींचे चक्र आपण बाबिलोनियन संस्कृतीतील सारोस चक्रावरून घेतले. मेष,वृषभ, मिथुन, कर्क,सिंह.. म्हणजे अँरीस,टॉरस,जेमिनी,कॅन्सर,लिओ..अशा नावांचे त्याच अर्थाचे संस्कृत प्रतिशब्द आहेत.ते त्याच क्रमाने आहेत.
**"होरा" शब्द 'अवर' (एच् ओ यू आर्) शब्दावरून आला आहे स्पष्टच आहे. चौवीस होर्‍यांचा एक दिवस होतो.होरा=अवर=तास.

होरा स्कंध किंवा ऍस्ट्रॉलजी

धन्यवाद, यनावालासर.

उत्तरः**आकाशस्थ ग्रहगोलांचा मानवी जीवनावर गूढ परिणाम होतो ही मूढ कल्पना मूळ युरोपीय लोकांची.भारतीय वैदिक परंपरेत फलज्योतिषाला मुळातच स्थान नाही. ते नंतर घुसडले गेले. (हे वचन संस्कृत पंडित सी.कन्हन राजा यांचे आहे.)

पंडित हजारीप्रसाद द्विवेदी ह्यांच्यानुसारही होरा स्कंध वा 'ऍस्ट्रॉलजी' आपण यवनाचार्यांकडून शिकलो. अतिप्राचीन ग्रंथांत ऍस्ट्रॉलजीची चर्चा आढळत नाही. (पृष्ठ क्रमांक १३१, १३२)

आदरणीय सरसंघचालकांना बहुधा ऍस्ट्रॉनमीत भारतीयांनी किती प्रचंड प्रगती केली होती हे सांगायचे असावे. पण बातमीतले शेवटचे वाक्य वाचून असे वाटत नाही.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

भारत ...चे माहेर घर

देशप्रेमापोटी अवास्तव व अवाजवी विधाने करणारी लोक आपली देशावरील निष्ठा अधोरेखीत करीत असतात. त्यामुळे वरील बातमीत भारत ....चे माहेर घर असे जरी छापले तरी तो ... कला, शास्त्र ,अध्यात्म ,संगीत, शिल्प, तत्वज्ञान इ. अशा शब्दांनी भरता येते.
पाश्चिमात्यांकडुन आपण काही गोष्टी घेतल्या हे मान्य करणे जड जाते. भारतीय ज्योतिषशास्त्राचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास लिहिणारे शं.बा दिक्षितांना सुद्धा ते जड जाते.
प्रकाश घाटपांडे

फक्त पाश्चिमात्याकडून ?

पाश्चिमात्यांकडुन आपण काही गोष्टी घेतल्या हे मान्य करणे जड जाते.
फक्त पाश्चिमात्यांकडूनच नव्हे.
आपल्या देशबांधवा(!)कडूनही ते जर आपल्यातले (:)) नसतील तर असे मान्य करणे जडच जाते.

 
^ वर