भारतीय ज्योतिषशास्त्र

भारतीय ज्योतिशास्त्र
ग्रंथपरिचय- भारतीय ज्योतिशास्त्र

ग्रंथप्रदर्शनातून बाहेर पडता पडता दुर्लक्षित ठिकाणी उपेक्षितासारखे पडलेले एक पुस्तक सहज दृष्टोत्पत्तीस पडल आणि मी ते डोळे झाकून खरेदी केलं. ते पुस्तक म्हणजे."भारतीय ज्योतिषशास्त्र अथवा भारतीय ज्योतिषशास्त्राचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास" ले. शं.बा.दिक्षित'. डॊ.थीबोसारख्या पाश्चात्य विद्वानाला हे पुस्तक मूळातून वाचण्यासाठी मराठी भाषा शिकावी लागली त्या मराठी भाषेत गेल्या शंभर वर्षात फक्त तीन आवृत्त्या निघाल्या.प्रकाशनाला अव्वल व्यवसायाचे स्वरुप हे आत्ताच आले आहे आणी पुर्वी नव्हते असे नाही. ग्रंथलेखक आपल्या प्रस्तावनेत म्हणतात,"प्रस्तुत ग्रंथ शास्त्रीय पडल्यामुळे ह्याचा खप अर्थातच कमी होणार. त्यामुळे छापण्याचे मोठ्या खर्चाचे आणि जोखमीचे काम माझ्यासारख्याने झाले नसते." आर्यभूषण प्रेसने हा ग्रंथ छापला.
इथे ज्योतिषशास्त्र हा शब्द खगोलशास्त्र या मूळ अर्थाने वापरला आहे, भविष्यशास्त्र या अर्थाने नव्हे. हा ग्रंथ दोन भागांमध्ये मांडला आहे.पहिल्या भागात वैदिक काल आणि वेदांगकाल यातील ज्योतिषशास्त्राचा इतिहास आहे. तर दुस-या भागात ज्योतिष सिद्धांत कालाच्या ज्योतिषशास्त्राचा इतिहास आहे. पहिल्या भागात शतपथ ब्राह्मणातील 'कृत्तिका पुर्वेपासून चळत नाही' अशा आशयाच्या वाक्यावरुन वेदकाळ काढला आहे.मेष,वृषभ या संज्ञा केव्हा निर्माण झाल्या? वार कधी प्रचारात आले? त्याकाळी वर्षारंभ कसा मानत? महाभारताचा काळ ठरवण्यासाठी दिक्षितांनी महाभारत सर्व दृष्टिने वाचले.पण त्यात वार व मेषादि संज्ञा सापडल्या नाहीत असा उल्लेख ते आवर्जून करतात. महाभारताच्या प्रक्षिप्त भागातून मूळ ग्रंथ शोधणे हे किती अवघड असते? गणिताद्वारे त्यांनी वैदिक काळ हा शकापुर्वी ६००० ते १५०० वर्षे व त्यानंतर वेदांग काळ हा शकापुर्वी ५०० वर्षे पर्यंत असा ठरवला, या मर्यादा स्थूल मानाने ठरवल्या आहेत.शकापुर्वी ५०० वर्षे च्या सुमारास मेषादि संज्ञा आपल्याकडे प्रचारात आल्या आणि त्यापूर्वी ५०० वर्षे अगोदर वार आले. ते खाल्डियन इजिप्शियन किंवा ग्रीक संस्कृतीतून आले असावेत असा निष्कर्ष दिक्षित साधार नोंदवतात. त्यांच्या मते महाभारताचा काळ शकापूर्वी ३००० ते १५०० वर्षे असा आहे.( पुस्तकातील उल्लेख शकाचे आहेत. वाचकांनी त्यात ७८ वर्षे मिळ्वल्यास इ.स. मिळतात)
दुस-या भागात ज्योतिषशास्त्राच्या तीन स्कंदाविषयी सविस्तर विवेचन केले आहे.पहिला सिद्धांत वा गणित स्कंध दुसरा संहिता स्कंध व तिसरा जातक अथवा होरा स्कंध म्हणजेच फलज्योतिष विषयक काही माहिति दिली आहे. प्राचीन काळतील वेधयंत्रे,वेधपद्धती, अपौरुषेय ग्रंथ व इतर ज्योतिष ग्रंथकार यांची सविस्तर माहिती,अनेक प्रकारच्या पंचांगांची माहिती, निरनिराळ्या प्रांतांमधील पंचांगे, पंचांगातील त्रुटी व पंचांग संशोधन विचार यासाठी दिक्षितांनी ५० हून अधिक पाने खर्च केली आहेत.
शेवटी उपसंहारात युरोपियनांच्या अभिप्रायांचे खंडन केले आहे. भारतीय ज्योतिषशास्त्राला वेधपरंपरा नाही या आक्षेपांचे जोरदार खंडन ग्रीकांपासून आम्ही काय घेतले? यामध्ये दिक्षित करतात. ग्रंथनिर्मितीसाठी उत्तेजना पुण्याच्या 'दक्षिणा प्राइझ कमिटी कडून त्यावेळी मिळाली.त्यासाठी त्यांनी ४५० रुपयांचे बक्षिसही ठेवले होते. ते १८९१ मध्ये दिक्षितांना मिळाले.परंतु हा ग्रंथ मुद्रित स्वरुपात १८९६ मध्ये आला आणि दोन वर्षांनी दिक्षितांचा मृत्यू झाला. आपल्या ४५ वर्षांच्या आयुष्यामध्ये ब-याच परिश्रमांनी निर्माण झालेल्या ग्रंथात अजूनही कमतरता आहे असं दिक्षितांना शेवटपर्यंत वाटत आलं. दिक्षित हे हुषार ज्योतिषी होते म्हणून एकदा एका संस्थानिकाने त्यांना वर्षफल वर्तवण्यास सांगितले पण दिक्षितांचा फलज्योतिषावर पूर्ण विश्वास नसल्याने त्यांनी ते नाकारले. तरी देखील "फलज्योतिषात तथ्य असावे असे मला अलीकडे वाटू लागले आहे. तथापि माझा पक्का विश्वास नाही.मी तत्संबंधाने शोध घेत आहे. या फलज्योतिषाच्या संबंधाने खरे थोडे व ढोंग फार असा प्रकार झाला आहे.तेव्हा यात खरे आहे तरी किती हे मला पहायचे आहे.म्हणूनच अलिकडे कुंडल्या टिपणे फलज्योतिषासंबंधी ग्रंथ वगैरे पहात असतो" असे दिक्षित एके ठिकाणी म्हणतात. दुर्दैवाने त्यांना पुढील संशोधनास अवसरच मिळाला नाही.असा हा ग्रंथ दुर्मीळ झाल्याने त्याची द्वितीयावृत्ती १९३१ साली आर्यभूषणनेच काढली. यात श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, चि,वि,वैद्य, गो.स.आपटे यांनी मुक्तकंठाने प्रशंसन केले आहे. व ग्रंथाचे ऋण मान्य केले आहे. प्रा.र.वि.वैद्यांनी याचे इंग्रजी भाषांतर केले. हिंदीत तो अनुवादित झाला. भारत सरकार प्रकाशन व प्रकाशन ब्युरो सूचना विभाग उ.प्र. यानी तो प्रकाशित केला.पण मराठीत मात्र दुर्मिळ राहिला.महाराष्ट्र शासन प्रकाशनाने त्याची दखल घेतली नाही. शेवटी वरदा बुक्स यांनी त्या ग्रंथाचे महत्व लक्षात घेता तृतीय आवृत्ती १९८९ मध्ये काढली. जिज्ञासू व चिकित्सक अभ्यासकांना हा ग्रंथ म्हणजे पाटीभर फुलांच्या गुंजभर अत्तरासारखे आहे. ज्यातली माहिती डोळे झाकून प्रमाण मानावी एवढी विश्वासार्हता या ग्रंथामध्ये आहे. एखाद्या मुद्द्यावर इतरांची काय मते आहेत ही माहिती द्यायला ग्रंथलेखक विसरला नाही.
प्रकाशक - वरदा बुक्स, सेनापती बापट रोड पुणे ४११०१६ पृष्ठे:- ५६६
किंमत- चारशे रुपये फक्त

लेखनविषय: दुवे:

Comments

अप्रतिम माहिती

वा अप्रतिम माहिती!
वरचे सगळे वाचून हा ग्रंथ संग्रही असलाच पाहिजे ही जाणीव दिली आहे.
पण मराठीत मात्र दुर्मिळ राहिला.
हे मात्र अगदी जाणवले! आपल्या इतक्या मोठ्या पुस्तक परिक्षण लेखाला प्रतिसाद येवू नयेत हे पाहून मला मनापासून वाईट वाटते आहे.
(की हा वीकएंड चा परिणाम म्हणायचा?)
मराठी ज्योतिष्यात एकतर 'ज्योतिष म्हणजे भंपकपणा' किंवा त्याविरुद्ध बोलल्यास 'तीव्र भावनादुखी' या दोनच बिंदुंवर लोकसमुदाय आहे की काय अशी शंका येते आहे. (हे इतिहासालाही तितकेच लागू! ;) )
ज्योतिषाचा 'आपण (आपण म्हणजे वरील दोन्ही ध्रुवांवर राहणारे लोक!)समतोल पणे अभ्यास करू या' असा दृष्टीकोन फारसा दिसत नाही हे आपले दुर्दैव आहे.
तरीही ज्यांना यात रस आहे ते कसेही पुस्तके मिळवून अभ्यास करतातच हा आशेचा किरण.
घाटपांडे साहेब, आपला यातला व्यासंग पाहून असा लेखक वाचक उपक्रमावर आहे याचा मनापासून आनंद होतो आहे!

असो,
वरदा बुक्सचा संपर्क दुरध्वनी क्रमांक देवू शकाल काय? (हा क्रमांक आपल्या सर्व पुस्तक परिक्षणात आला तरीचालेल :) )
शिवाय पोस्टाने पुस्तके पाठवण्याचे सोय आहे का? त्यासाठी काय अटी आहेत? (आवांतरः पुण्याचे दुकान म्हणजे अटी असणारच! ;) काय योगेशराव खरंय ना?)

आपला
गुंडोपंत

संपर्क

श्री.ह.अ.भावे
वरदा बुक्स, सेनापती बापट रोड पुणे ४११०१६ , दूरध्वनी ०२० २५६५५६५४
व्यवस्थापक श्री केळकर
पोस्टाने पुस्तक पाठवण्याची सोय उपलब्ध. एका पुस्तकासाठी सुद्धा. (काही अडचण भासल्यास माझा संदर्भ दिलात तर निराकरण होईल)

मराठी ज्योतिष्यात एकतर 'ज्योतिष म्हणजे भंपकपणा' किंवा त्याविरुद्ध बोलल्यास 'तीव्र भावनादुखी' या दोनच बिंदुंवर लोकसमुदाय आहे की काय अशी शंका येते आहे.

ज्योतिषाचा 'आपण (आपण म्हणजे वरील दोन्ही ध्रुवांवर राहणारे लोक!)समतोल पणे अभ्यास करू या' असा दृष्टीकोन फारसा दिसत नाही हे आपले दुर्दैव आहे.

याच मुद्दयावर मी इंटरफेस म्हणून काम करतो.

आपल्या इतक्या मोठ्या पुस्तक परिक्षण लेखाला प्रतिसाद येवू नयेत हे पाहून मला मनापासून वाईट वाटते आहे.

'परिक्षण' हा खूप मोठा शब्द झाला हो! तेवढी माझी लायकी नाही. ग्रंथ परिचय करुन देण्याचे भाग्य मला लाभले यातच खूप समाधान आणि अभिमान (आत्मस्तुतीचा दोष ?)आहे. हा लेख १९९० कि ९१ साली युनिक फिचर्स ने लोकमत व अन्य काही दैनिकात प्रसिद्ध केला होता. दिक्षितांचे अफाट परिश्रम व जीवन वृत्तांत वाचला कि नतमस्तक व्हायला होत.
हे पुस्तक १९८९ पर्यंत क्चचित एखाद्या ग्रंथालयात दुर्मिळ संदर्भ म्हणून फक्त तिथे बसून वाचायला परवानगी असे. एका मित्राच्या मदतीने (वशिल्याने)मी ते पुस्तक घरी घेउन आलो. इतके जीर्ण होते कि झेरॉक्सवाला ते काळजी पुर्वक हाताळेल कि नाही याची साशंकता, बाईंडींग सुटलेले. अशा परिस्थितीत चक्क् ते चोरावे. फारफार तर मित्राचे डिपॉजीट जप्त होईल. दंड होईल तो आपण भरु. असे विचार मनात आले. पण मित्राचा विश्वासघात करणे जीवावर आले. या पार्श्वभूमीवर ते पुस्तक मला ग्रंथप्रदर्शनात दिसल्यावर मी ते विकत घेतले ,पण मनात चोरल्याचीच भावना. पटकन् चारशे रुपये देउन ( नशीब त्या वेळी एवढी मोठी रक्कम खिशात होती) मी घाईघाईत सटकायला निघालो. तेवढ्यात काउंटरवरच्या माणसाने म्हणले," अहो थांबा" ( मनात विचार पकडले गेलो वाटत) २५ % सवलत आहे सध्या. उरलेले पैसे आणि पावती घेउन जा." आणि माझा जीव भांड्यात पडला.
नंतर भाव्यांना व्यक्तिगत पत्र लिहून (ठिकाण-राज्य राखीव पोलीस बलगट क्र.२ रामटेकडी, बराक) आभार मानले. अस हे मनात कोरलेले पुस्तक.
(अवांतर- आता मी मी पणा पुरे?)

प्रकाश घाटपांडे

पुस्तक परिचय अत्यंत आवडला

प्रकाशराव,
आपण कष्ट घेऊन येथे लिहिलेला अशा अलोकप्रिय विषयावरील लेख आवडला. गुंडोपंतांनी जे लिहिले आहे त्याच्याशी मी संपूर्णपणे सहमत आहे.
निखळ शास्त्रीय कुतूहल आता दुर्मिळ झाले आहे खरे.
असे सुंदर पुस्तक स्कॅन करून जालावर चढवण्याची आवश्यकता वाटते, मग ते स्वामित्वहक्काचे कसेही असो.
- दिगम्भा

छान कल्पना

वरदा बुक्स ह्या संस्थेने समजा आता ह्या पुस्तकाच्या प्रती काढणे बंद केले असेल, तर त्यांच्याकडून हे पुस्तक स्कॅन करण्याची परवानगी मिळवणे सोपे जाईल. अर्थातच स्कॅन करण्या आधी अशी परवानगी घेणे आवश्यक. ती मिळाली, तर मी आपल्याला पुण्यात याहू आणि गूगलसाठी पुस्तके स्कॅन करणार्‍या संस्थेचा पत्ता देईन. त्यांना हे पुस्तक नेऊन दिल्यास आपसूकच विश्वजालावर हे पुस्तक उपलब्ध होईल.

या बाबत मी भाव्यांशी बोलतो. ते नक्की परवानगी देतील असा विश्वास मला वाटतो. अनमोल ठेवा असलेल्या जुन्या ग्रंथांचे जतन व्हावे असे कुणाही सूद्न्य माणसाला वाटेल.
प्रकाश घाटपांडे

चोम्मेन्त्

।इन्दि इस् रेअल्ल्य् अ फन्तस्तिच् लन्गुअगे. आन्य् होव् रिघ्त् नोव् इ अम् बुस्य् इन् म्य् a+ certification अन्द् थिस् इस् रेअल्ल्य् अ रिहघ्त् देअल् फोर् अल्ल् हिन्दुस्.

पण याहू किंवा गूगल

पण याहू किंवा गूगल हे पुस्तक "कायम विनामुल्य"स्वरूपात वाचकाला उपलब्ध करून देतील ना नक्की?

नाहीतर, ते उगाच पहिली ४ पाने द्यायचे आणी नंतर बाकी पानांसाठी भरा पैसे!
मला कोणत्याही फुकट काही देणार्‍या कंपनी विषयी आधी शंकाच येते!

युयुत्सुराव,
या बुक स्कॅनींग प्रकल्पावर एक शंका निरुपण करणारा लेख लिहा बॉ जमलं तर!

म्हण्जे कसा आहे हा प्रकल्प
काय् काय् सुविधा असणार वगैरे...
आणी या सगळ्यात याहू ला काय फायदा?
ते गुगल पासून कसे वेगळे?
वगैरे वगैरे...

आपला
(शंकेखोर)
गुंडोपंत

वरदा बुक्सची परवानगी

खरं तर या पुस्तकाच्या प्रती अजून पडून् आहेत. श्री भाव्यांशी मी बोललो. व्यावहारिक दृष्ट्या हे जर जालावर फुकट उपलब्ध झाले तर त्या प्रती तशाच पडून् राहतील ही चिंता होतीच्, पण माझे आर्जव लक्षात घेता तसेच दुर्मिळ साहित्य काळाच्या पडद्या आड जाउ नये ही इच्छा असल्याने त्यानी जालावर चढवायला परवागी दिली आहे. भाव्यांकडे दुर्मिळ पुस्तकांचा खजानाच् आहे. तो पाहिला कि मनुष्याचे डोळे सखाराम गटणे सारखे लकाकतात.

प्रकाश घाटपांडे

 
^ वर