वैदीक पध्दत:-कालगणना भाग ४

वैदीक पध्दत:-कालगणना भाग ४

या पुर्वी मांडलेली कालगणणेचे भाग १,२,३ यात आलेल्या प्रतीक्रीया,सुचना व लाभलेला वाचक वर्ग ह्या सर्वांचा मी आभारी आहे.
सत्य शोधण्याच्या वेडाने झपाटलेल्या ऋषी,संत,सुधारक आणि वैज्ञानिक ह्या सर्वांचे ॠण संपुर्ण मानवजातीवर आहे.ते भान बाळगुन पुढील भाग देत आहे.

काहींनी अधिकाराने सुचना दिल्या होत्या. योग्य त्या सर्वच सुचनांचे अर्थात पालन करेल.

भाग १ मध्ये काळाची सुरवात वैज्ञानिक व प्राचीन यांची मते--
भाग २ (ख्रिस्तजन्म व ख्रिस्तनंतर)कॅलेंडरचा संक्षिप्त इतीहास--
भाग ३ यात आपल्या कडील प्राचिन काळगणना व त्याची एकके सविस्तर दिलेली आहेत. मागील भागाच्या मास ह्या शेवटा पासुन पुढे.......

(चित्रा-चैत्र,विशाखा-वैशाख,ज्येष्टा-ज्येष्ट,आषाढा-आषाढ,श्रवण-श्रावण,भाद्रपद-भाद्रपद,अश्विनी-अश्विन,कृतीका-कार्तिक,मृग-मार्गशीर्ष,पुश्य-पौष,मघा-माघ, फ़ाल्गुनी-फ़ाल्गुन.)

उत्तरायण आणि दक्षिणायन:

पृथ्वी आपल्या कक्षेत २३ १/२ अंश( उत्तर पश्चिम) वायव्य दिशेला कलली आहे, म्हणून भूमध्यरेषे पासून २३ १/२ अंश उत्तर भागात आणि २३ १/२ दक्षिण भागात किरणे लम्ब रेषेत पडतात.सूर्याची किरणे लंबवत पडणे याला संक्रांती असे म्हणतात.
या मध्ये उत्तरे कडील रेखांशाला कर्करेशा व दक्षिण कडील रेखांशाला मकररेखा म्हणतात.भूमध्य रेषेला शुन्य अंश किंवा विषुववृत्तरेखा म्हणतात.त्या मध्ये कर्क संक्रांतीला उत्तरायण आणि मकर संक्रातीला दक्षिणायन म्हणतात.

वर्षमान:

पृथ्वीदर तासाला जवळपास एक लक्ष कि.मी.या वेगाने(अंदाजे ९६६०००००० कि.मी.लांबीचा)सूर्याभोवतालीचा प्रवास ३६५ १/२ दिवसामध्ये पूर्ण करते या कालावधीला एक वर्ष म्हणतात.

युगमान:

४३२००० वर्षाच्या कालावधीत सातही ग्रह आपली स्थाने सोडून एका जागी येतात या युतीच्या काळाला कलियुग असे म्हटले आहे.(सूर्य चंद्र बुध शुक्र मंगळ गुरु शनी या सात ग्रहांचा अश्विन नक्षत्रात येण्याचा काळ).कली-युगाची सुरवात अर्जुनाचा नातु(पौत्र) राजा परीक्षिता पासुन मानली जाते.आपल्या कडील बहुतेक सर्व पंचागाची गणना/मांडणी याच काला पासुनची आहे.

अश्या प्रकारे दोनदा युती होण्याचा काळ द्वापारयुग,तीन वेळा त्रेतायुग,चारदा सत्ययुग.
१ कलीयुग --४३२००० वर्ष
२ कलीयुग-द्वापारयुग-८६४००० वर्ष
३ कलीयुग-त्रेतायुग-१२९६००० वर्ष
४ कलीयुग-सत्ययुग-१७२८०००.वर्ष
चार युगांचे एक चतुर्युग(महायुग)-४३२०००० वर्ष

मंडल:

आपल्या प्राचीन ग्रंथात वर्तमान सृष्टी पाच मंडलाची(आकाशगंगा) बनलेली आहे असे मानले आहे.चंद्र मंडल,पुथ्वी मंडल,सूर्य मंडल,परमेष्टी मंडल आणि स्वयं भूमंडल ही मंडल उत्तोरोत्तर मंडलाच्या फ़ेरया मारीत असतात.

मन्वन्तर मान:

सूर्यमंडलाने परमेष्टी मंडलाच्या(आकाशगंगा)केंद्राभोवतीचे एक चक्र पूर्ण केल्यावर होण्यरया काळाला मन्वन्तरमान काळ म्हणतात.दोन मन्वन्तरमानच्या मधील १ संध्याश सत्ययुगा बरोबर असतो.म्हणुन संध्याशसा सहित मन्वतराची गणना ३० कोटी ८४ लक्ष ४९ हजार वर्ष.
(आधुनिक प्रमाणा नुसार सूर्य २५ ते २८ कोटी वर्षात आकाशगंगेच्या केंद्राभोवतीची एक फ़ेरीपूर्ण करतो चु.भू.द्या.ध्या.)

कल्प:

परमेष्टी मंडल स्वयं भूमंडल मंडलाच्या फ़ेरया मारीत आहे, म्हणजे आकाशगंगा वर असलेल्या आकाशगंगे भोवती फ़ेरया मारत आहे.या काळाला कल्प असे म्हणतात.त्याचे काल मापन ४ अब्ज ६४ कोटी वर्ष मानले जाते,याला ब्रम्हाचा दिवस मानले जाते.(एक दिवस-रात्रीचा काळ ८ अब्ज ६४ कोटी).ब्रम्हाचे एक वर्ष ३१ खर्व १० अज्ब ४० कोटी, त्याचे आयुष्य १०० वर्षांचे मानले गेले आहे ती संख्या होते ३१ नील १ खर्व ४० अब्ज वर्ष.(संख्यांचा विकास व गणित हे पुढील लेखात देण्याचा प्रयत्न आहे.)

ब्रह्मा नंतर विष्णु व नंतर रुद्राचा काळसुरु होतो.रुद्राला स्वत: काळ रुप मानले जाते म्हणुन काळ अनंत आहे असेही म्हटले जाते.

ही सर्व गणना मौखिक परंपनेने मांडण्याच्या एका पध्दतीचा नमुना खाली देत आहे.पुरोहीत पुजा विधी करण्यापूर्वी संकल्प सोडतात ..
त्यातीत मंत्र असे:-

ॐ अस्य् श्री विष्णो राज्ञया प्रवर्त मानस्य ब्रम्हण: द्वितीय परार्धे श्री श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे अष्टविंशतितमे कलीयुगे कली प्रथम चरणे कली संवते(युगाब्दे)जम्बुद्वीपे आर्यावर्त्त्तान्तर्गत ब्रम्हावर्तैक (दण्डकारण्ये...) देशे भरतखंडे श्रीशालीवाहन शके (अमुक)नाम संवत्सरे(अमुक)अयने(अमुक)ऋतौ(अमुक)मासे(अमुक)पक्षे(अमुक)तिथौ(अमुक)वासरे(अमुक)नक्षत्रे (अमुक)योगे(अमुक)करणे(अमुक )राशिस्थिते..ग्रह चं.र.बु.वै. पुढे व्यतीचे गोत्र नांव व कार्याचा हेतु....

अमुक या ठिकाणी विशिष्ट नांवे देतात..

म्हणजे महाविष्णुद्वारे प्रवर्तीत अश्या अनंत काल चक्रात वर्तमान ब्रम्हदेवाच्या आयुष्याचा द्वितीय परार्ध पूर्ण झाला आहे.((म्हणजे वर्तमान ब्रम्हाचे ५० वर्ष झाले आहेत.)५१ वर्षाच्या श्वेतवाराह नावाच्या कल्पाचा पहीला दिवस आहे.ब्रम्हाच्या मन्वतरांतील वैवस्वमन्वंतर चालु आहे.(एका दिवसात १४ मन्वतर त्या मधील सातवे वैवस्वमन्वंतर) वैवस्वमन्वतरातील कलीयुगाचा प्राथमिक काळ चालु आहे.(एका मन्वतरां मध्ये ७१ चतुर्युगे त्यातील २८ वे चतुर्युगे कलीयुग)...या काळातील भारत खंडातील(अमुक दण्डकारण्ये..) नाम स्थानातील उत्तर/दक्षिण अयनातील..वसंत(ग्रिष्म...)ऋतुत..चैत्र(वैशाख..)मासात...शुक्ल/कृष्ण पक्षातील पंचमी...तिथित..शनि वासरे आर्द्रा..नक्षत्रे (अमुक)योगे(अमुक)करणे(अमुक ) सद्य स्थितीतील ग्रहाची राशि उदा. कुंभ राशि चंद्रे व इतर (ग्रह चं.र.बु.वै.) पुढे व्यतीचे गोत्र नांव व कार्याचा हेतु.... वै

ही सर्व कालगणनेची एकके आहेत. काळाचे ज्ञान,ग्रहांचे निरीक्षण,त्यांच्यागती,हे सर्व खगोल शाश्त्रात आहेत,(पुढे ग्रहंची अंतरे,वेग यांचे गणित आहेच) हा विषय अपोआपच खगोल माहितीकडे वळतो आहे.

प्रसिद्ध वैज्ञानिक जन्म १९३४ मृत्यु १९९६ U.S.(यांनी Cosmos: A Personal Voyage, नावाची मालिका सुरु केली होती ज्याचे प्रक्षेपण जवळ पास ६० देशात झाले होते.) कार्ल सेगन यांनी आपल्या COSMOS पुस्तकात(पृ. २१४) दिलेला मथळा असा:

Hindu religion is the only one of the world’s great faiths dedicated to the idea that the cosmos itself undergoes an immense, indeed an infinite number of deaths and rebirths.
It is the only religion in which the time scales correspond, no doubt, by accident, to those of modern scientific cosmology. Its cycles run from our ordinary day and night to a day and night of Brahma 8.64 billion years long. Longer than the age of the earth or the sun and about half of the time since the big bang. And there are much longer time scales still.

हा सर्व विकास फ़ार पूर्विपासून आपल्याकडे विकसित होता, असे मांडण्यात पूर्ण काही तथ्य नाही.

ह्या एककांच्या आधारे पुढे होणारी ही गणना आजच्या गणनेच्याजवळ जाते. ही माझ्या सारख्याला शंका वाटली.कारण आज आपण खगोल शास्रात जी काही अदभूत प्रगती पाहत आहोत ती विकसित होत आलेली आहे.अरिस्टाट्ल कोपर्निकस पासून पुढे गलिलीओ, न्युटन ते आज चंद्रशेखर,स्टिफन हाकिन्स वै..

प्रत्येक धर्मात विश्वाच्या उत्पत्ती बाबत वेगवेगळ्या कल्पना आहेत.

बायबलमध्ये पृथ्वी सपाट आहे.तसेच पृथ्वी ही केंद्रस्थानी स्थिर आहे व त्याच्या भोवती सूर्य चंद्र इ ग्रह यांचे भ्रमण वै..ही चर्चला मान्य असण्यारया(किंवा मानावे असा आग्रहअसणारा),. असा एक मोठा कालखंड सर्वज्ञात आहेच.

मला एकदा माझ्या आजोबांनी अडगळीत टाकलेले सामान मिळाले होते.त्यात पृथ्वीगोल असून ती पंचमुखीनागाच्या डोक्यावर असल्याचे चित्र होते.ते केव्हाचे याचा अंदाज नाही, पण अश्या प्रक्रारे वर्णन इतरत्र पण होते असे दिसते.
तो पर्यंत न्युटनच्या गुरुत्वाकर्षणा विषयी माहिती नसावी.त्या मुळे पृथ्वी आधांतरी असण्याला तो पर्याय होता असे आपण म्हणु शकतो.पण त्या चित्रात पृथ्वी चेंडु प्रमाणे गोल होती.

वैज्ञानिक प्रगतीचा आलेख बरयाच प्रमाणात उपलब्ध आहे.यात ही वेगवेगळ्या काळखंडात विविध संशोधन झाले.तसे आपल्याकडे झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.भारतातील अनेकांनी तुलनेने, संशोधनाने ,काहींनी प्रयोगाने अनेक गोष्टी साधार मांडल्या आहेत.त्यातुन येणारे निष्कर्ष सुद्धा अचंबीत करणारे आहेत.

जे काही साहित्य आज उपलब्ध आहे ते परंपरेने चालत आलेले आहे.साहित्य मूळ स्वरूपात काय होते? कोणी लिहिले? कधी लिहिले? या बद्दल पुरेशी माहिती उपलब्ध नाही.त्यात ही अध्यात्म, धर्म, तत्वज्ञान व इतर अनेक चर्चा आढळतात.
अविकसित अवस्था सर्वच ठिकाणी होती ती विकसित पण होत गेली आहे.पण कशी? प्रयोग केले होते का? केवळ अतर्क्य अश्या कल्पनेने मांडले होते? कल्पना कशी केव्हा झाली? का केली? त्यांची आवश्यकता काय होती?त्यामागची कारणं व परिणाम शोधता येतात का?

ह्या सर्व पद्धतीची रचना वैज्ञानिकांनी कशी केली व आपल्या ग्रंथात आहे तर कोणत्या? त्यावर उपलब्ध माहिती कोणती?शक्य तेवढी माहिती मांडतो.बाकी चर्चेच्या माध्यमातुन बरेच काही निघेल.

पुढील भागात वैज्ञानिक प्रगतीचा आढावा.

प्रतिक्रिया/सूचना/मार्गदर्शन करत रहावे. उपक्रम वरील सर्व मंडळींनी या विषयाला संलग्न अशी माहीती (दुवा) देत राहावी.

लेख कालगणना या सदरात सुरु केले आहेत,पण अप्रत्यक्षपणे हा विषय खगोल शास्राच्या प्रगतीचा माहीतीपट होईल.त्याच बरोबर धार्मिक/अध्यामिक वै. चर्चा येईल या पूर्वी दोन्ही विषय आलेले आहेत.त्यावर लेखन पण आहेच.मी ते मांडावे की नाही यावर सुचना द्याव्यात.

ध्यन्यवाद.

क्रमश:

संर्दभ:-
भारतीय कालगणना का वैज्ञानिक व वैश्विक स्वरुप- डा. रविप्रकाश आर्य
पंचाग-
COSMOS-कार्ल सेगन

शैलु.

Comments

उत्तरायण आणि दक्षिणायण

पृथ्वी सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत परिभ्रमण करत असते, परंतु तिचा अक्ष परिभ्रमणाच्या प्रतलाशी काटकोनात नसून २३.५ डिग्री अंशात कललेला आहे म्हणजेच परिभ्रमण करताना पृथ्वी एका बाजूला झुकलेली असते. या कललेल्या स्थितीमुळे पृथ्वीवर पडणार्‍या सूर्यकिरणांच्या कोनामध्ये बदल होतो व सहा महिने उत्तर ध्रुव तर उर्वरित सहा महिने दक्षिण ध्रुव सुर्याकडे कललेला असतो.
उत्तर ध्रुवाचा सुर्याकडे जास्तीत जास्त कल २१ जुन रोजी येतो, यादिवशी सुर्याची किरणे २३.५ अंश उत्तर अक्षवृत्तावर लंबरुप पडतात, म्हणून २३.५ अंश उत्तर अक्षवृत्तास कर्कवृत्त तर या दिवसास कर्कसंक्रांत असे संबोधण्यात येते, यादिवशी उत्तर गोलार्धात दिवस मोठा असतो.
दक्षिण ध्रुवाचा सुर्या कडे जास्तीत जास्त कल २१ डिसेंबर रोजी असतो, यादिवशी सुर्याची किरणे २३.५ अंश दक्षिण अक्षवृत्तावर लंबरुप पडतात, म्हणून २३.५ अंश दक्षिण अक्षवृत्तास मकरवृत्त तर या दिवसास मकरसंक्रांत असे संबोधण्यात येते, यादिवशी दक्षिण गोलार्धात दिवस मोठा असतो.
याशिवाय वर्षातुन दोन दिवस अक्ष परिभ्रमणाच्या प्रतलाशी काटकोनात येतो त्या दिवसांना वसंतसंपात (२० मार्च) व शरदसंपात (२३ सप्टेंबर) असे संबोधण्यात येते, यादिवशी सुर्याची किरणे विषुववृत्तावर लंबरुप पडतात व दोन्ही गोलार्धात १२ तासांचा दिवस व १२ तासांची रात्र असते.

काही पंचांगकर्ते व ज्योतिषी यांच्या मतानुसार उत्तरायण म्हणजे मकरसंक्रांत ते कर्कसंक्रांत हा कालावधी, आणि दक्षिणायण म्हणजे कर्कसंक्रांत ते मकरसंक्रांत हा कालावधी होय. म्हणजेच सुर्याचे मकरसंक्रांती पासुन रोजचे उत्तरेकडे सरकणे हे उत्तरायण आहे व कर्कसंक्रांती पासुन रोजचे दक्षिणेकडे सरकणे हे दक्षिणायण आहे.

लो. टिळकांच्या मते वसंतसंपात ते शरदसंपात हा कालावधी (सुर्याचे उत्तर गोलार्धात चलन) म्हणजे उत्तरायण आहे. आणि दक्षिणायण म्हणजे शरदसंपात ते वसंतसंपात हा कालावधी (सुर्याचे दक्षिण गोलार्धात चलन) आहे.
लो. टिळकांनी उत्तरायण आणि दक्षिणायण संबंधी त्यांचे मत "ओरायन" व "आर्क्टिक होम ऑफ वेदाज" या पुस्तकांत तपशीलवार मांडले आहे.

योग्य व्याख्या कोणती हा वाद गेले कित्येक वर्ष टिळकांचे समर्थक वि. ईतर असा होत आहे. ही मतभिन्नता अनेक ठिकाणी दिसून येते, उदाहरणार्थ - विकीपेडिया ईंग्लीश वर पहीली व्याख्या तर विकीपेडिया मराठी वर टिळकांची व्याख्या दिलेली आहे, थोडक्यात विकीपेडिया लेखकांत देखील मतभिन्नता आहे.

लो. टिळकांनी दिलेले पुरावे पडताळुन पाहणे मला शक्य नाही, त्यामुळे या दोन व्याख्यांपैकी कोणती योग्य आहे याबाबत उपक्रमींची मते जाणून घ्यायला आवडेल.

शिपाईगडी

लेखन

श्री शरद यांनी वैयक्तीक निरोप पाठवुन शुद्धलेखनासाठी व व्याकरणदृष्ट्या चुकांसाठी मार्गदर्शन केले आहे.

खरचं आहे, शुद्धलेखनाच्या माझ्याकडुन अक्षम्य चुका होतात.कारणे सांगणे योग्य नाही .चुका होतात. त्या मी पुढील लेखात सुधारण्याचा प्रयत्न करतो.
वाचकांनी शुद्धलेखनाच्या व व्याकरणदृष्ट्या चुकांसाठी (काही दिवस मला येईपर्य़ंत)थोडे फ़ार दुर्लक्ष करावे.ही नम्र विनंती.

जास्तीत जास्त मार्गदर्शन व सूचना देत (सर्व बाबतीत) देत राहाव्या. यातुनच माझी प्रगती होईल.

शैलु.

उत्तरायण व लोकमान्य टिळक

जुन्या आर्य ग्रंथाचे वाचन करत असताना लोकमान्यांच्या हे लक्षात आले की आर्यांचे यज्ञयाग विधी व देवांना हविर्भाग देण्याचे विधी हे अतिशय काटेकोरपणे त्यांच्या पंचांगाप्रमाणे चालत असत. आर्यांनी वर्षाचे दोन भाग केले होते. पहिला भाग वसंत-संपात दिनापासून चालू होऊन शरद संपात दिनाला( ज्याला विशुवन असे नाव होते.) संपत असे. या कालात सूर्य विषुव वृत्ताच्या उत्तरेला असतो. या कालाला देवायन असे नाव आर्यांनी ठेवले होते. वर्षाचा दुसरा भाग, जेंव्हा सूर्य विषुव वृत्ताच्या दक्षिणेला असतो, हा पितरायन म्हणून ओळखला जात असे. आर्यांचे यज्ञयाग व हविर्भाग देण्याचे विधी फक्त देवायन कालात होत असत. व हे सर्व विधी वसंत-संपात दिनापासून सुरू होत.

पुढच्या कालात,(केंव्हापासून ते माहिती नाही.) नववर्षाचा प्रथम दिन, वसंत-संपात दिवसापासून हलवून काहीतरी अज्ञात कारणास्तव, Winter Solstice (22 December) या दिवशी मानला जाऊ लागला. त्यामुळे वर्षाचे उत्तरायण व दक्षिणायन असे दोन नवीन भाग पडले. असे जरी असले तरी यज्ञयाग व हविर्भाग देण्याचे विधी, जुन्या पंचांगाप्रमाणेच(वसंत- संपात दिनापासून) चालू राहिले.
चन्द्रशेखर

रोचक

"मंडल" प्रकाराबद्दल अधिक माहिती देता येईल का?

आपल्या प्राचीन ग्रंथात वर्तमान सृष्टी पाच मंडलाची(आकाशगंगा) बनलेली आहे असे मानले आहे.चंद्र मंडल,पुथ्वी मंडल,सूर्य मंडल,परमेष्टी मंडल आणि स्वयं भूमंडल ही मंडल उत्तोरोत्तर मंडलाच्या फ़ेरया मारीत असतात.

येथे "पृथ्वीमंडल" आणि "भूमंडल" ही मंडले कुठली-कुठली आहेत? ("पृथ्वी" आणि "भू" हे दोन एकाच अर्थासाठी पर्याय म्हणून माहीत आहे. की "स्वयंभू"मंडल?)

सूर्यमंडलाने परमेष्ठी मंडलाभोवती फेरी मारण्यामुळे आकाशात काय फरक दिसतो?(लेखकाने अन्य बाबतीत "आकाशात काय दिसते" ते सांगितले आहे, तशा प्रकारचे कुतूहल मला आहे. उदाहरणार्थ, युग-कालाच्या सुरुवाती-शेवटी सात ग्रहांची एकत्र युती होते, ते आकाशात आपल्याला दिसले होते/दिसेल. असे लेखक सांगतात, ते उत्तम. अशा प्रकारचे वर्णन हवे आहे... मन्वंतर मानाच्या सुरुवाती-शेवटी कुठली आकाशीय स्थिती आहे?)

रोचक

बरीच रोचक माहिती मिळाली.. आभार.
चांगल्या चर्चेची अपेक्षा आहे

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

अजून माहिती हवी

धनंजय म्हणतात तशी "मंडल" बद्दल अधिक माहिती देता येईल का?
कारण लेखातील "सृष्टीची मंडले" ही काहीशी टायकोच्या मंडलां सारखी वाटली.

४३२००० वर्षाच्या कालावधीत सातही ग्रह आपली स्थाने सोडून एका जागी येतात या युतीच्या काळाला कलियुग असे म्हटले आहे.(सूर्य चंद्र बुध शुक्र मंगळ गुरु शनी या सात ग्रहांचा अश्विन नक्षत्रात येण्याचा काळ).

प्राचीन काळी नक्षत्रांची सीमा (व्याप्ती) उत्तर धृव ते दक्षिण धृव मानली जायची, म्हणून सात ग्रह एका नक्षत्रात एकत्र असणे अशक्य नाही. जालावर थोडे शोधल्यावर कळले की पाश्चात्य ज्योतिषी सात ग्रह एका राशीत असण्यास Grand Stellium म्हणतात व अशी ग्रहस्थिती ५ फेब्रुवारी १९६२ रोजी होती आणि ४ मे २००० रोजी देखील ६ ग्रह एका राशीत होते. खगोलशास्त्राच्या प्रणालीत (Planetarium Software) या तारखा टाकल्या नंतर दिसलेली ग्रहस्थिती याप्रमाणे -

५ फेब्रुवारी १९६२ - बुध, शुक्र, सुर्य, चंद्र, मंगळ, गुरु व शनी मकर राशीत.
४ मे २००० - बुध, शुक्र, सुर्य, चंद्र, गुरु व शनी मेष राशीत आणि मंगळ वृषभ राशीत.

विकी वरील माहितीत कलियुगाची सुरवात १८ फेब्रुवारी ३१०२ ख्रि.पु. रोजी झाली असे दिले आहे. ही तारीख प्रणालीत पडताळून पाहिल्यावर दिसलेली ग्रहस्थिती -
१८ फेब्रुवारी ३१०२ ख्रि.पु. - गुरु, शुक्र, सुर्य, मंगळ व बुध मीन राशीत, शनी कुंभ राशीत आणि चंद्र मेष राशीत होता.
१७ फेब्रुवारी रोजी चंद्र मीन राशीत आसल्यामुळे सहा ग्रह मीन राशीत दिसतात.
म्हणजे विकी वर दिलेली तारिख लेखात दिलेल्या नियमात बसत नाही, याचे कारण कदाचित प्रणाली वापरत असलेली माहिती (उदा. Synodic Period) व भारतीय ज्योतिषी व स्वामी युक्तेश्वर यांनी वापरलेली माहिती यांत तफावत असावी. विकीवर व ईतरत्र शोधले तरिही स्वामी युक्तेश्वर यांना हिच तारिख कशी मिळाली याची माहिती व त्यासाठी केलेले गणित मिळू शकले नाही.

जर तुमच्याकडे खगोलशास्त्राची प्रणाली (Planetarium Software) नसेल तर जालावर उपलब्ध असलेली हे Software वापरु शकता.

शिपाईगडी

 
^ वर