अर्निको व चीनी छपरांचे रहस्य!

अर्निको व चीनी छपरांचे रहस्य!

बलबाहू चीन मध्ये अर्निको नावाने ओळखला जातो. या बलबाहू चा चीन, बिजींग, मध्ये पुतळा उभारला गेला. बलबाहू ने चीन मध्ये वास्तुशास्त्रात बाराव्या आणि तेराव्या शतकात केलेल्या कामाची आठवण म्हणून हे स्मारक उभारले गेले.

बलबाहू हा मूळचा नेपाळ मधील पाटण गावाचा रहिवासी होता. पाटण हे कांस्य व इतर धातूविषयक ओतकाम करण्या साठी फार प्रसिद्ध होते. अशा प्रकारे सुबक रितीने घडवलेल्या बुद्ध आणि हिंदू मूर्तींना तिबेटाच्या राजे आणि दरबारी मंडळींकडून चांगली मागणी होती. बोरोदूर या इंडोनेशिया येथील स्तूपाच्या कामासाठी सन आठशे मध्ये येथून लोक गेले होते.

धातूकामा शिवाय ही मंडळी वेदातून मांडलेल्या 'आरेखने व मांडणी' या विषयातही तरबेज होती. नेपाळ हे भारतीय आणि चीनी संस्कृतीचा संगम बनले होते. ही नेपाळी कारागिरांची कीर्ती चीन च्या मिंग या राजघराण्या पर्यंत गेली. बाराव्या शतकाच्या मध्यावर चीन च्या राजांनी नेपाळ च्या राजांना विनंती केली की, त्यांना नवीन बांधून हव्या असणाऱ्या श्वेत स्तूपा साठी कारागीर पाठवावेत. या कामासाठी पाटण गावातून ऐंशी कुशल लोक निवडले गेले. या पथकाचा प्रमुख म्हणून, बलबाहू ची नेमणूक राजांनी केली. असे मानले जाते की या वेळी बलबाहू फक्त सतरा वर्षांचा होता. हे पथक मजल- दरमजल करत चीन च्या बिजींग या शहरात पोहोचले.

एक पोरगेलासा कारागीर का या स्तूपाचे आरेखन आणि बांधणी करणार, असा विचार करून बलबाहू ची परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. पूर्वीच्या राजाचा एक भग्न पुतळा त्याला दुरुस्ती साठी दिला. हा पुतळा बलबाहू ने इतका सुरेख रित्या दुरुस्त केला की चिनी कारागीर चकीत झाले.

शेत स्तूपाच्या कामासाठी बलबाहूची नेमणूक करण्यात आली. सर्व रेखाटणे व धातूच्या तुळयांचे काम बलबाहू ने केले. हे काम यशस्वी रित्या पूर्ण करून बलबाहू ने राजा विश्वास संपादन केला. या नंतर चीन मध्ये अनेक वास्तूंची कामे त्याने केली. बलबाहू चीन मध्ये अर्निको नावाने प्रसिद्ध झाला. (कसा आणि का ते कळले नाही, शोध सुरु आहे) चिनी संस्कृतीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या उतरत्या टोकदार, डौलदार व एकाखाली एक अशा छपरांची परंपरा अर्निकोनेच सुरू केली. या डौलदार छपरांच्या कमानी टोकांवर तो (भारतीय परंपरेशी नाते सांगणारा) कळस बसवत असे. सुबक कळस आणि आणि एकाखाली एक अशा छपरावरच्या धातूच्या चमकदार कमानींची लाटच चीन मध्ये आली. बिजींग मध्ये त्याने अनेक भव्य अशा वास्तूंचा उभारणी कामात सहभाग घेतला. शहराच्या मांडणी मध्ये महत्वाचे योगदान दिले. या सगळ्याची पावती म्हणून राजाने त्याला उपाधी दिली. (उपाधीचे नाव कळले नाहीये अजून.)

अर्निकोने एका चिनी मुलीशी लग्न केले आणि चीन मध्येच राहिला. असा हा बलबाहू अर्निको भारतीय स्थापत्यशास्त्राचा झेंडा चीन मध्ये रोवून तेराशे सहा मध्ये मृत्यू पावला.

-निनाद

Comments

चांगली माहिती

निनाद,

चांगली माहिती दिलीत. तुम्हाला ही माहिती कोठे आणि कशी मिळाली? अर्निकोच्या बांधकामाची काही प्रकाशचित्रे लावता येतील का?

मी या घटनेचा थोडा शोध घेतला, काळात मला थोडी तफावत जाणवत होती कारण मिंग घराणे १४व्या शतकातील. त्यावरून कळले की कुब्लई खानला बांधकामासाठी कारागिर हवे होते आणि त्याच्या अधिकार्‍यांनी नेपाळच्या राजाकडे तशी मागणी केली असता बलबाहुला तेथे पाठवण्यात आले होते.

चू. भू. दे. घे.

ही माहिती कोठे आणि कशी मिळाली

प्रतिसादा बद्दल धन्यवाद
एक (ऑस्ट्रेलियन) मैत्रीण चीन ला असते. (ती ला चिनी अस्खलित बोलता आणी वाचता येते.) बिजींग च्या जुन्या शहरात फिरत असताना ती ला ही माहिती मिळाली. मला रस वाटेल असे वाटून तिने अर्निकोचे चिनी नाव कळवले.
त्यावर काहीच माहिती जालावर मिळाली नाही. पण ऐतिहासिक भारताचा चीन वर परिणाम शोधल्यावर अर्निको विषयी हळूहळू सापडत गेले. भारतावर चीन हा सर्व प्रकार च्या तांत्रिक, धार्मिक,वैद्यक आदी सर्व बाबतीत अवलंबून होता.

खरं तर मला वाटतेय की भारत आणी चीन हा वेगळा भाग नव्हताच - अर्थात त्यांमुळे सहज प्रसार घडत असला पाहिजे. शिवाय अनेक प्रकारे चीनी आणी भारतीय जीवनमान सारखे आहे हे ही त्याच मुळे जाणवते. चीन हे नाव ही संस्कृत शब्दावरून आले असे वाचायला मिळाले. (सिंह अशा अर्थी).

मिंग राजा की कुब्लाई खान याविषयी मी साशंक होतोच पण मला त्याची काहीच माहिती नव्हती, जाला वर निरनिराळी माहिती आढळते. (आवांतर - म्हणून संदर्भा साठी जाला पेक्षा पुस्तक महत्वाचे वाटते.)

आपल्याला ही माहिती कशी मिळली आहे?

आपण माहिती दिलीत, त्याबद्दल धन्यवाद!
-निनाद

प्रकाशचित्रे शोधतो आहे

प्रकाशचित्रे शोधतो आहे, चित्राचे मूळ कळल्या शिवाय देण्यात अर्थ नाही असे मला वाटते. (अशी तर अनेक् चित्रे उपलब्ध आहेत जालावर.)
-निनाद

कुब्लाई खान

मी मंगोलियाचा आणि मंगोल राज्यकर्त्यांचा इतिहास थोडाफार अभ्यासला आहे. कुब्लाई खानाने १२६० ते १२९४ पर्यंत राज्य केले. (त्या आधीही तो चीन प्रांताचा गवर्नर होता) त्याच्या इंपिरिअल पॅलेसचे आणि त्याने केलेल्या नागरी सुविधांचे वर्णन प्रसिद्ध आहे, तसेच मार्को पोलोचा प्रवासही पाहिला असता चीनचे भारत, तिबेट, नेपाळ यांच्याशी संबंध असावेत असे वाटते.

मला याहून विशेष माहिती नाही परंतु तेरावे शतक म्हटले तर मिंग राजघराणे नव्हते, ते १४ व्या शतकाच्या उत्तरार्धात सत्तेवर आले. १३ व्या शतकात कुब्लाई खान होता हे माझ्या लक्षात आले म्हणून अर्निकोवर दुवे शोधले त्यात कुब्लाई खानाचेच नाव होते.

तुम्ही लेखात १२ वे आणि १३वे शतक म्हटले आहे तसे असेल तर मात्र चीनमध्ये बीजिंगवर जुर्चेन घराण्याचे आणि नंतर चंगीझ खानाचे राज्य होते, पैकी जुर्चेन राजाने या कारागिरांना बोलावले असेल तर कल्पना नाही असल्यास ते ११ व्या शतकात किंवा १२ व्या शतकाच्या सुरुवातीस, मध्यावर झाले असावे. परंतु १२ व्या शतकाच्या अखेरीस चंगीझच्या स्वार्‍यांनी हा प्रांत सतत युद्धात होता, राजकीय स्थैर्य नव्हते. पुढे चंगीझ खानाने नक्कीच चीनला कारागीर बोलावले नाहीत कारण तसे कोठे वाचायला मिळत नाही आणि चंगीझ खानाला चीनमध्ये बांधकामे करण्यात कोणतीही रुची नव्हती.

शंशांक यांनी दिलेल्या दुव्यात मला काही प्रकाशचित्रेही मिळाली. अर्निकोचे बांधकाम कशाप्रकारचे होते हे पाहण्यासाठी प्रकाशचित्रे पाहायची होती.

धन्यवाद.

चीन - सिंह?

चीन हे नाव ही संस्कृत शब्दावरून आले असे वाचायला मिळाले. (सिंह अशा अर्थी).

हे किंवा याबद्दल अधिक कोठे वाचायला मिळेल?

चीन हे नाव चीनमधील प्रसिद्ध राजघराणे Qin (उच्चार बहुधा चीन किंवा इंग्रजी अपभ्रंश चीन) यावरून आलेले आहे असे वाचल्याचे स्मरते. चीनी भाषेत या देशाला Zhōngguó असे उच्चारतात. (उच्चार माहित नाही बहुधा झोंगुओ वगैरे असावा.)

चीन विषयी शोध घेत होतो. त्यात सापडले होते मागे.

चीन विषयी शोध घेत होतो. त्यात सापडले होते मागे.
या विषयी वैदिक भारताचा चीन वर परिणाम असा शोध दिल्यावर हा दुवा
http://www.hinduwisdom.info/India_and_China.htm मिळाला. या मध्ये जरा एकांगी (भारताच्या बाजूने ) उदाहरणे आहेत, पण दुवा संदर्भासहित आहे त्यामूळे महत्वाचा वाटतो.
उदा. Lin Yutang (1895-1976) author of The Wisdom of China and India:
"India was China's teacher in religion and imaginative literature, and the world's teacher in trignometry, quandratic equations, grammar, phonetics, Arabian Nights, animal fables, chess..."
(source: The Wisdom of China and India - By Lin Yutang p. 3-4).
संदर्भांची चांचणी करायला वेळ मिळाला नहिये. आपण करू शकलात तर नक्की कळवा.

माझे मत असे बनले आहे, की जगाच्या इतिहासात हा पौर्वात्य दृष्टीकोण त्रोटक आला आहे. अनेक संदर्भ/मते ही पाश्चात्य इतिहासकारांनी बनवलेली आहेत. त्यात कधी कधी सुसंगती लागत नाही. उदा. बोरोबदूर या इंडोनेशियातल्या मंदिरासाठी नेपाळ मधून कारागिर गेले असा उल्लेख मी वर केला आहे. पण बोरोबदूरच्या स्तूपां विषयी अजून माहिती काढण्याचा प्रयत्न केला तर त्यात डच इतिहासकारांच्या लेखनात (आता इंग्रजी मध्ये) काहीच संदर्भ या विषयी नाही मिळाला. शिवाय या मंदिरांत धातू विषयक काय काम होते हे पण कळले नाहिये. (असले तर चोरीला गेले असावे!)

अर्थात मी या वाचनात, खूप खोलवर अजून पोहोचलो नाहिये.
आपल्याला या विषयी काय वाटते?
आपला
निनाद

दुवा

अर्निकोची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. त्याच्याविषयी कधी ऐकले नव्हते. अर्निको चा अर्थ "स्त्रियांसारखा चेहरा असणारा" असा आहे असे कळले (दुवा). अधिक माहिती व चित्रे इथे सापडली.

वा!

अधिक माहितीसाठी दिलेला दुवा आवडला. चांगलीच माहिती देतो. धन्यवाद.

छान लेख

माहितीपूर्ण लेख आहे. हा लेख तुम्ही असाच्या असा मराठी विकिपीडियामध्ये उतरवा ही नम्र विनंती.

देणं कळलं, पण मग 'घेणं' काय होतं भारताला?

वा निनाद,
अर्निको...
लेखातून नवीनच माहीती मिळाली.
पूर्वी असं देणं घेणं होत असलं पाहीजे. आता देणं कळलं, पण मग 'घेणं' काय होतं भारताला?
'आपला पतंजली चीन्यांनी चोराला रे, आणी वर आता जगाला सुया टोचतायेत' असं माझे आजोबा उपरोधाने म्हणायचे.
यातून आपल्याला परत काही मिळाले नाही असे त्यांना म्हणायचे असावे. पण असं घडत नसतं आपल्याला पण काहीतरी फायदा चिन कडून होत असला पाहीजे.

आणी खिरे हा लेख इथे असतांना परत मराठी विकिपीडियामध्ये का असला पाहिजे?
असा पण म्या पामाराला प्रश्न पडला आहे!
आपला
गुंडोपंत

खरं आहे गुंडोपंत

गुंडोपंत,
तुमच्या आजोबांच्या म्हणण्यात तथ्य आहे.
पण त्यांना ही माहिती कुठे मिळली असेल बरं?

-निनाद

चीन चे जगाला(आणि पर्यायाने भारताला) योगदान

माफ करा..
तशी चर्चा सुरु होउन बराच काळ लोटला आहे,
पण (ज्ञान प्रसाराच्या)इच्छे ला बन्धन नसावे ही अपेक्षा.

एकदा डिसकवरी वाहिनीवर चीन बद्दल एक एपिसोड पाहिल्याचे आठवते ते म्हणजे:-

१.रेशीम,लाख, आणि साखर ह्यांचा सर्व प्रथम वापर चीन मध्ये सुरु झाला.
(म्हणूनच हिंदि मध्ये चीनी= साखर आणि संस्क्रुत मध्येही "चिनांशुके" म्हणजे रेशीम किंवा साखर ह्या पैकि एकास म्हणतात.)

२.चुम्बकाचा वापर(औषधी साहित्य म्हणून) चीन मध्ये सर्व प्रथम.

३.जगातील सर्व प्रथम भूकम्प मापन यन्त्रणेचा चीन मध्ये वापर.

४.बुद्धिबळ हा खेळ सर्व प्रथम चीन मध्ये खेळण्यात येइ.(त्यांच्या म्हणण्या नुसार)
आणि तो "ग्रह गोलीय तारकन्चे आकाशातील युद्ध्" म्हणून खेळला जाइ.
(हे ग्रह गोल म्हणे शासन कर्त्या राजाच्या बाजुचे विरुद्ध त्याच्या वाइटावर टपलेले अशा दोन क्यम्पातील असत.
खेळ खेळणार्‍याला म्हणे राजाच्या बाजूला जिंकवुन द्यावे लागे. नाय तर थेट राजाची खप्पा मर्जी! )
भारतात आल्यानंतर तोच खेळ तो राजे-रजवाडे ह्यान्च्या युद्धाचे रूप घेउन "बुद्धिबळ " म्हणून प्रसिद्धी पावला.

५.ह्या शिवाय,आपल्या मनाला सदैव प्रसन्न ठेवणार्‍या,चवीची तल्लफ लावणार्‍या "चहा" या पेयाला
आपण कसे विसरु बरे?

६.मुद्रण कलेचा आशिया खंडात सर्व प्रथम वापर चिन्यांनी क्येला.(युरोपेमध्ये होण्याच्या काही शतके आधीच.)

ह्यातील काही भाग जरी सत्य असेल तर चीनने भारतास काही दिलेच नाही असे कसे म्हणता येइल?
(वरील विधानांच्या समर्थनार्थ कोणताही दुवा देता येत नसल्याने क्षमस्व. )

जन सामान्यांचे मन

ज्ञानकोश

गुंडोपंत,

विकिपीडिया हा ज्ञानकोश आहे, म्हणून त्याचा वापर (जेंव्हा तो पुरेसा समृद्ध होईल तेंव्हा) लोक विशिष्ठ माहिती हवी असल्यास करतील. ह्याउलट उपक्रम सारखे संकेतस्थळ चर्चा, वाचन करण्यासाठी लोक (निदान मी तरी) वापरतात. म्हणजे थोडक्यात उपक्रमाचे स्वरूप एखाद्या मासिकासारखे आहे, ह्याउलट विकिपीडियाचे स्वरूप संदर्भग्रंथासारखे आहे.

शिवाय एकदा टाईप केलेली माहीती (तिचे प्रतहक्क असल्यास) नुस्ती कट् पेस्ट करायला फारसं काम पडणार नाही आणि त्यातून फायदा खूप उद्भवू शकतो म्हणून ही विनंती. ह्याआधी पण अनेक माहितीपूर्ण लेख इथे वाचायला मिळाले, पण तेंव्हा ही विनंती करण्याचं मला सुचलं नव्हतं पण प्रियाली, इत्यादी सदस्यांनीपण कृपया नोंद घ्यावी.

धन्यवाद खिरे, माझे समग्र विकि-लेखन

तेंव्हा ही विनंती करण्याचं मला सुचलं नव्हतं पण प्रियाली, इत्यादी सदस्यांनीपण कृपया नोंद घ्यावी.

याबद्दल आभारी आहे, धन्यवाद.

मी गेल्या एक वर्षापासून जास्त काळ विकिवर लेखन करत आहे. माझी सुमारे ७५० संपादनेही असावीत. (नेमकी मोजलेली नाहीत.) अधिक माहिती येथे मिळेल.
यापेक्षाही अधिक लेख मी विकिवर टाकलेले आहेत. जसे ग्रामदेवता, अप्सरा वगैरे परंतु ते इतके समग्र नाहीत. :) सध्याही मी विकिवरच लिहीत असल्याने व्यग्र आहे.

डिस्क्लेमरः विकिवर कोणीही सोम्यागोम्या लिहू शकतो. मी त्यापैकीच एक आहे. :)

सोमेगोमे

सोम्यागोम्यांना कुठेही काहीही लिहीण्याची मुभा असताना, विकीसारख्या निरस स्थळावर उपद्व्याप (ते ही नामानिराळे राहून) करण्याची गरज ती काय? विकीवर आपल्यासारखेच अभ्यासू लेखक/लेखिका (तो नव्हे) लिहीत असावेत (वाचकही काहिसे असलेच असतात). बाकी इंग्रजी विकीवर अश्या सोम्यागोम्यांसाठीच नव्हे तर अट्टल बदमाशांसाठीही वेगळी खास सोय आहे. (अधिक माहिती साठी विचारणा करा किंवा अर्थातच विकीवर शोधाशोध करा.)

'तो 'मराठी विकिपीडिया चा सदस्य आहे.

मत

सारीच माहिती मराठी विकीवर येण्यास हरकत नाही. (अगदी कंबोडियातील पंतप्रधानांच्या यादी सहित). पण मराठी वाचकाला, त्यातही जो इंग्रजी वाचू शकत नाही, नजरे समोर ठेवून, इंग्रजी विकीवर मर्यादित उपयुक्‍तता म्हणून गणले जातील (इंग्रजी विकीवर भीमसेन जोशींच्या व्यक्तिचित्रणाची 'उपयुक्ततेबद्दल शंका असलेल्या' लेखांत भलावण होत होती, अजूनही होत असेल.) किंवा दुर्लक्षित राहतील असे 'मराठी परंपरेशी संबंधेत' व 'स्थानिक आकर्षण ठरू शकतील' असे लेख प्राधान्याने यावेत असे वाटते. याने विकीच्या लोकप्रियतेत वाढ होण्यासही मदत होईल असे वाटते.

थोडक्यात आपला जिजाऊंवरचा लेख प्राधान्याने आलेला पाहायला आवडेल.

'तो 'मराठी विकिपीडिया चा सदस्य आहे.

मताशी सहमत

'मराठी परंपरेशी संबंधेत' व 'स्थानिक आकर्षण ठरू शकतील' असे लेख प्राधान्याने यावेत असे वाटते. याने विकीच्या लोकप्रियतेत वाढ होण्यासही मदत होईल असे वाटते. थोडक्यात आपला जिजाऊंवरचा लेख प्राधान्याने आलेला पाहायला आवडेल.

या मताशी १००% सहमत आहे, फक्त माझ्याकडे अशा विषयांवर लिहीण्याजोगे खात्रीशीर रिसोर्सेस नाहीत. :( उदा. जिजाबाईंचा लेख हा केवळ आठवणीतून लिहीला आहे, त्यामुळे त्याची व्याप्तीही फारच कमी आहे. सहसा मी जे वाचते ते तेथे साईड बाय साईड् उतरवून काढते, माझ्यापरीने मदत वगैरे. :) (तशी शक्य असेल तेव्हा महाराष्ट्र, मुंबई, मुंबईची उपनगरे, महाराष्ट्राचा इतिहास, सातवाहन राजघराणे इ. इ. वरही भर टाकत असते, परंतु ती म्हणावी इतकी नाही.)

माझी याच विषयावर पूर्वी इतर विकि लेखकांशी बरेचदा चर्चा होत असे. (आता इतरांनी मला सांगायचे सोडून दिले आहे. :) ह. घ्या. ) खात्रीशीर संदर्भ नसल्याने मी (म्हणजे फक्त मी, माझे व्यक्तीगत मत) सहसा असे लेखन टाळते. इतर गोष्टी ज्या येथे सहजी वाचायला मिळतात त्यावर लिहून काढते, यात माझी हौसही भागते. भविष्यात असे चांगले संदर्भ मिळाले (शहाजींवर पुस्तके मिळवून देतो असे कोणीतरी सांगितले आहे.) तर नक्कीच लिहीन.

आवडेल

खिरे साहेब,
आपली सुचवण आवडली. असे करायला नक्कीच आवडेल. फक्त असाच्या असा नको. या लेखात अजूनही काही भर घालणे आवश्यक आहे, संदर्भ होण्यालायक!
मी विनंती करतो या कामी आपण सर्वच काही मदत करू शकाल का?
-निनाद

महामार्ग

अर्निकोच्या
नावाने एक महामार्ग आहे असे इथे कळले.

एक विस्कळीत दुवा

हा एक विस्कळीत दुवा आजून

सुरेख

भारतातून चीनकडे स्थापत्याचा वारसा गेला आहे हे वाचून सुखद नवल वाटले.

या शिवाय

या शिवाय
"ध्यान" असेच भारतातून चीन मध्ये पोहोचले.
भारतीय 'ध्यान' चे झाले चीन मध्ये झाले 'चान'
हे 'चान' जपान मध्ये पोहोचले तेंव्हा झाले 'झेन'

झेन, चान आणी ध्यान तिनही चा अर्थ एकच आहे. या क्षणी आणी फक्त या(च) क्षणी असणे.
आधी नाही नंतर नाही, फक्त हा क्षण!

-निनाद

माहिती

नवीन माहिती समजली. त्यानिमित्ताने लिहिलेल्या प्रियाली यांच्या प्रतिसादातूनही नव्या नव्या गोष्टी कळल्या. धन्यवाद निनाद.

छान माहितीपूर्ण लेख

त्यानिमित्ताने लिहिलेल्या प्रियाली यांच्या प्रतिसादातूनही नव्या नव्या गोष्टी कळल्या.

हेच म्हणतो

महितीपूर्ण.

निनाद,

अनवट विषयावरचा माहितीपूर्ण लेख आवडला. असे लेख अजूनही येऊ द्या. प्रियाली यांचे प्रतिसादही अभ्यासपूर्ण वाटले.

अभिनंदन.

माधवी.

'अनवट' शब्द आवडला!

धन्यवाद!

'अनवट' शब्द आवडला!

पुढेही नक्कीच लिहीन!
निनाद

 
^ वर