लिझ माइटनर - भाग २

लिझ माइटनर - भाग १ वरून पुढे

दरम्यानच्या काळात जर्मनीत असलेल्या ओट्टो हानशी पत्रांच्या माध्यमातून तिचा संपर्क होता. लिझच्या सांगण्यावरून ऑट्टो हानने युरेनियम वर न्यूट्रॉन्सचा मारा करण्याचा प्रयोग केला. युरेनियमवर न्यूट्रॉन्सचा मारा केल्यानंतर त्याचे बेरियम आणि क्रिप्टॉनमध्ये रूपांतर झाले. या निष्कर्षांचे स्पष्टीकरण रसायनशास्त्रज्ञ असणाऱ्या हानला देता आले नाही. इतकेच नाही तर इतर भौतिकशास्त्रज्ञांनाही याचा उलगडा झाला नाही.

लिझ माइटनर आणि ओट्टो हान
लिझ माइटनर आणि ओट्टो हान. कायझर-विलहेम इंन्स्टिट्यूट मध्ये, १९१३

या प्रयोगाचे निष्कर्ष हानने पत्राने लिझला कळवले. या निष्कर्षाचे स्पष्टीकरण देताना युरेनियमच्या अणुकेंद्रकाचे विभाजन झाले असावे असा तर्क लिझने केला. तिने असाही निष्कर्ष काढला की युरेनियमचे रूपांतर जर बेरियम आणि क्रिप्टॉनमध्ये झाले आहे तर या अभिक्रियेत न्यूट्रॉन आणि उर्जाही मुक्त झाली असली पाहिजे. जीवशास्त्रामध्ये पेशींचे विभाजन साधारण अश्याच प्रकारे होते त्यामुळे लिझने या प्रक्रियेला "फिशन" (Fission) असे नाव दिले. यावेळी योगायोगाने तिचा भाचा फ्रिस्च तिथे होता. त्याने तातडीने कोपनहेगनला जाऊन नील्स बोहर ला लिझच्या या संशोधनाची माहिती दिली. नील्स बोहरची प्रतिक्रिया या अतुलनीय शोधाचे महत्त्व व्यक्त करणारी होती. "Oh! What idiots we all have been! Oh but this is wonderful! This is just as it must be!" कारण लिझच्या स्पष्टीकरणाने अनेक अगम्य, अनुत्तरित प्रश्नांची उकल झाली होती.

या संशोधनाचा शोधनिबंध ऑट्टो हानसोबत प्रकाशित करणे राजकीयदृष्ट्या अशक्य होते. जानेवारी १९३९ मध्ये ऑट्टो हानने या प्रयोगाचे रसायनशास्त्रीय निष्कर्ष शोधनिबंधात प्रसिद्ध केले. लिझने फ्रिस्चच्या साहाय्याने लिहिलेला, या प्रक्रियेचे भौतिकशस्त्रीय स्पष्टीकरण देणारा शोधनिबंध सुप्रसिद्ध नेचर नियतकालिकात प्रकाशित झाला. या निबंधात या प्रक्रियेला "न्यूक्लियर फिशन" असे नाव दिले. यात असणारी साखळी प्रक्रियेची (चेन रिऍक्शन) शक्यता आणि यात लपलेली प्रचंड विस्फोटक शक्ती लिझच्या ध्यानात आली होती.

लिझ माइटनर १९२८
लिझ माइटनर, १९२८

या प्रक्रियेचा वापर करून प्रचंड संहारक शस्त्रे निर्माण करता येण्याची शक्यता दिसल्याने आणि हे संशोधन जर्मनीच्या हातात असल्याने वैज्ञानिकांत खळबळ उडणे साहजिक होते. त्यापैकी काही संशोधकांनी अल्बर्ट आइन्स्टाइनला गळ घालून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रूझवेल्ट यांना पत्र लिहिण्यास सांगितले. यातून पहिल्या अणुबॉंबची निर्मिती करणारा "मॅनहॅटन प्रकल्प" जन्मला. जिच्या संशोधनातून अणुबॉंब बनवणे शक्य झाले होते त्या लिझला या प्रकल्पात काम करण्याचे आमंत्रण पाठवले गेले, पण "बॉंबच्या निर्मितीत मला आजिबात सहभागी व्हायचे नाही" असे म्हणून लिझने ते नाकारले.

१९४४ मध्ये ऑट्टो हानला "न्यूक्लियर फिशन" चा शोध लावल्याबद्दल रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. बऱ्याच संशोधकांच्या मते ते पारितोषिक ऑट्टो हान आणि लिझ यांना विभागून द्यायला हवे होते. फिशन हा रसायनशास्त्रीय शोध आहे असा उघड दावा हानने केल्यामुळे असेल किंवा नोबेलच्या समितीवर असलेल्या पूर्वग्रहदूषित सीगबानमुळे असेल पण लिझला पुरस्काराचा मानकरी मानले गेले नाही.

१९६८ साली इंग्लंडमध्ये लिझचे देहावसान झाले.

स्रोत:
http://www.users.bigpond.com/Sinclair/fission/LiseMeitner.html
http://en.wikipedia.org/wiki/Lise_Meitner

१९८२ साली काही जर्मन संशोधकांनी एका नव्या मूलद्रव्याचा शोध लावला. लिझ माइटनरच्या सन्मानार्थ त्या मूलद्रव्याचे नाव "माइटनरीयम" असे ठेवण्यात आले.

समाप्त

Comments

माहितीपूर्ण लेख

शशांक,

भाषा ओघवती आहे. मराठीत विज्ञानविषयक लेख लिहिण्याची कल्पना खूपच चांगली आहे. असे अजून लेख यावेत ही सदिच्छा!

शुभेच्छुक,
शैलेश

लेख आवडला

शशांक,
उत्तम लेख लिहीलाय तुम्ही. असेच इतरही लेख येऊ द्यात.
नीलकांत

उत्तम माहितीपूर्ण लेख

शशांक

दोन्ही भाग वाचले. अशाप्रकारचे वेगळे लेख वाचायला नक्कीच आवडतील. सर्किटने सांगितल्याप्रमाणे मराठी विकिवर ही माहिती जरूर चढवा.

प्रियाली.

लेख छान

जमला आहे. "न्यूक्लियर फिशन" च्या संशोधनात लिझ माइटनर चे एवढे मोलाचे योगदान आहे याची काहीच कल्पना नव्हती.
इंग्रजी विकीप्रमाणे इथेही छायाचित्रांखाली त्याची माहिती देता येईल का? म्हणजे हे तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे का?

अशी सोय

इंग्रजी विकीप्रमाणे इथेही छायाचित्रांखाली त्याची माहिती देता येईल का? म्हणजे हे तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे का?

अशी सोय आता उपलब्ध आहे. या सूचनेबद्दल धन्यवाद! अधिक माहितीसाठी चित्रांसाठी शीर्षकाची नवी सोय.

धन्यवाद!

प्रतिसादी आणि वाचकांचे आभार! हिस्ट्री वाहिनीवर लिझ माइटनरच्या जीवनावर आधारित कार्यक्रम पाहिल्यानंतर तिच्याविषयी अधिक माहिती मिळवण्याची इच्छा झाली. आपल्या अभ्यासक्रमात कुठे तिचा उल्लेख वाचल्याचे आठवले नाही. (जर असेल तर तो भाग 'ऑप्शन' ला 'टाकला' असेल. :))

अश्या गोष्टी वाचल्यानंतर इतिहास, सामाजिक/राजकीय परिस्थिती आणि वैज्ञानिक प्रगती या गोष्टी एकमेकांत किती गुंतलेल्या आहेत आणि 'विज्ञानाचा इतिहास' ही रंजक असतो याची कल्पना येते,

चित्रांची शीर्षके

चित्रांना/आकृत्यांना शीर्षके देता येण्याची नवी सोय आता उपलब्ध आहे. या लेखातील चित्रांना त्याचा उपयोग करून नावे दिली आहेत. नावांसाठी चित्रांच्या "alt" मध्ये असणारा मजकूर वापरला आहे.
अधिक माहितीसाठी चित्रांसाठी शीर्षकाची नवी सोय

छान

माहितीपूर्ण लेख आवडला. अशा अनेक गोष्टी ज्या कधी प्रसिद्धीच्या झोतात आल्याच नाहीत, वाचायला आवडतील.

सुरेख

शशांक,
माहितीपूर्ण लेख. विज्ञानाचा इतिहासही खरोखरच मनोरंजक असतो. अजून असे लेख वाचायला नक्कीच आवडेल. विज्ञानाच्या इतिहासात असे प्रसंग काही वेळा घडलेले दिसून येतात. स्त्रियांविषयीचे आपले पूर्वग्रह काही वेळा जास्त बलवान ठरतात. दुसरे असे उदाहरण म्हणजे डीएनएची संरचना मांडण्यात वॉटसन आणि क्रिकबरोबर रोसालिंड फ़्रॅंकलिन यांचाही महत्वाचा वाटा होता. पण नोबेल कमिटीने त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष केले.
राजेंद्र

धन्यवाद/अधिक माहिती

परीवश आणि राजेन्द्र, प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
राजेन्द्र, रोजलीन फ्रॅन्कलीन आणि डीएनएची संरचना यांच्याविषयी अधिक माहिती असलेला लेख लिहिलात तर फारच छान. वैज्ञानिक शोध आणि शास्त्रज्ञांवरील लेखांची एक मालिका करता येईल.
शशांक

चांगली कल्पना

शशांक,
कल्पना छान आहे आणि मला लिहायला नक्कीच आवडेल. जमेल तितक्या लवकर लिहिण्याचा प्रयत्न करतो.
राजेंद्र

उत्तम

शशांक,
लेख माहितीपूर्ण आणि उत्तम आहे.
विज्ञानाचा इतिहास खरोखरच रंजक असतो.

माझ्याकडे लहानपणी एक पुस्तक होते. त्यात प्रत्येक मूलद्रव्याच्या जन्माचा इतिहास होता.

असेच अजून काही वाचायला आवडेल.
--लिखाळ.

धन्यवाद!/अधिक विनंती

धन्यवाद राजेन्द्र आणि लिखाळ!
राजेन्द्र तुमच्या लेखा[खां]ची वाट पाहत आहोत. लिखाळ, तुम्ही वाचलेल्या गोष्टींपैकी तुम्हाला आवडलेल्या गोष्टी आम्हालाही सांगा :)

आवडले असते पण...

लिखाळ, तुम्ही वाचलेल्या गोष्टींपैकी तुम्हाला आवडलेल्या गोष्टी आम्हालाही सांगा :)

अहो खरोखरंच मला त्या कथा येथे लिहायला आवडल्या असत्या. त्या पुस्तकात अनेक मूलद्रव्यांच्या जन्माच्या रंजक कहाण्या आहेत.
ते मीर प्रकाशनाचे मूळ रशिय भाषेतील (रशियन हे इंग्रजी रूप आहे असे वाटल्याने रशिय लिहिले. ते योग्य आहे का?) मराठीमध्ये अनुवादित पुस्तक आहे.
पण ते पुस्तक आता माझ्या कडे नाही. ते भारतातल्या घरी आहे. असो.
आपला,
--लिखाळ.

 
^ वर