लिझ माइटनर - भाग १
मानववंशाचा इतिहास असंख्य लहानमोठ्या घटनांनी भरलेला असला तरी संपूर्ण जगावर परिणाम करणाऱ्या घटना तश्या मोजक्याच आहेत. दुसरे महायुद्ध आणि त्या काळादरम्यान लागलेला अणुबॉम्बचा शोध या घटनांनी मानवजातीचे जीवनच बदलून टाकले. दुसऱ्या महायुद्धाशी निगडीत कथा असंख्य आहेत पण त्यापैकी लिझ माइटनरची गोष्ट तिच्या आयुष्यासारखीच उपेक्षित राहिली.
ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना येथे १७ नोव्हेंबर १८७८ रोजी एका ज्यू कुटुंबात लिझ माइटनरचा जन्म झाला. स्त्रियांनी उच्चाशिक्षण घेण्याविषयी उदासीनता असण्याच्या त्या काळातही लिझच्या पालकांनी तिच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले. गणित आणि भौतिकशास्त्र या विषयांची तिला विशेष आवड होती. १९०१ लिझने मध्ये व्हिएन्ना विद्यापीठात प्रवेश घेतला आणि १९०६ मध्ये भौतिकशास्त्रात डॉक्टरेट मिळवली.
![]() |
लिझ माइटनर , १९०० |
संशोधनात रस असल्याने लिझने बर्लिनला जाण्याचा निर्णय घेतला. बर्लिन विद्यापीठात किरणोत्सर्ग (रेडिओऍक्टिविटी) विषयाचा अभ्यास तिने सुरू केला. बर्लिन विद्यापीठात असतानाच तिची ओट्टो हान (Otto Hahn) या रसायनशास्त्रज्ञाशी ओळख झाली. १९१३ मध्ये त्या दोघांनी कायझर-विलहेम इन्स्टिट्यूट मध्ये संशोधन सुरू केले. या दरम्यान युरोपात पहिल्या महायुद्धाचा भडका उडाला. त्या काळात लिझने स्वयंसेविका म्हणून युद्धभूमीवर परिचारिकेचे काम केले (योगायोगाने लिझची आदर्श असणारी संशोधक मेरी क्यूरी फ्रान्समध्ये अश्याच कामात गुंतली होती)
वैज्ञानिक प्रगतीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असा तो काळ होता. अनेक नवनवीन शोधांनी वर्षानुवर्षे सर्वमान्य असणाऱ्या सिद्धांतांना मुळापासून हालवले होते. १९३२ मध्ये जेम्स चॅडविकने न्यूट्रॉनचा शोध लावला. त्यामुळे अनेक नव्या शक्यता निर्माण झाल्या आणि जगभरातील संशोधकात एक प्रकारची स्पर्धा सुरू झाली. ब्रिटनमध्ये रुदरफोर्ड, फ्रान्समध्ये आयरीन क्यूरी, इटलीमध्ये फर्मी आणि जर्मनीत लिझ आणि ओट्टो हान हे सर्व त्या स्पर्धेत सहभागी होते. "नोबेल किंवा त्यासारखा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळवण्यासाठी चाललेले पुस्तकी संशोधन" अशीच या प्रकाराबाबत समकालीन लोकांची धारणा होती. या संशोधनातून पुढे संहारक अण्वस्त्रांचा जन्म होईल याची कोणालाही कल्पना नव्हती.
या दरम्यान जर्मनीच्या राजकीय आणि सामाजिक विश्वात मोठी उलथापालथ होत होती. १९३३ मध्ये जर्मनीची सत्ता ऍडॉल्फ हिटलर च्या ताब्यात आली आणि नाझीवादाच्या वणव्यात असंख्य निरपराध लोकांचा बळी जाण्यास सुरुवात झाली. अनेक ज्यू संशोधकांना बडतर्फ केले गेले किंवा राजीनामा देण्यास भाग पाडले गेले. त्यापैकी बऱ्याच संशोधकांनी इतर देशात स्थलांतर केले. लिझचा भाचा भौतिकशास्त्रज्ञ ओट्टो फ्रिस्च (ज्याने १९४० साली अणुबॉम्ब बनवण्यासाठीचा सैद्धांतिक आराखडा तयार केला) कोपनहेगनला निघून गेला.
काही महिन्यांनंतर लिझलाही नेदरलॅंड्स मधील एका प्राध्यापकाने बऱ्याच प्रयत्नाने नेदरलॅंड्समध्ये आणले. पुढे तिने स्टॉकहोम, स्वीडन इथे सीगबानच्या (१९२४ मधील भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्काराचा मानकरी) प्रयोगशाळेत काम स्वीकारले. वैज्ञानिक संशोधनात स्त्रियांच्या सहभागाविषयी काही पूर्वग्रह सीगबानच्या मनात असल्याने तिथे लिझला थोडा त्रास सहन करावा लागला, पण तिथे असताना निल्स बोहर (प्रख्यात डेनिश भौतिकशास्त्रज्ञ, १९२२ च्या नोबेल पुरस्काराचा मानकरी) बरोबर काम करण्याची संधी तिला मिळाली.
क्रमशः
Comments
धन्यवाद!
मिलिंदराव, धन्यवाद!
हो, थोडेफार बदल करून विकिपीडिया वर हा लेख टाकता येईल.
शशांक
चांगला
शशांक,
लेख चांगला आहे. अलक्षित पण थोर अशा व्यक्तिमत्त्वांवर असेच छोटे-छोटे लेख वाचायला आवडेल. र. धों. कर्व्यांसारख्यांवरही उपक्रमींनी लेख लिहावेत असे सुचवावेसे वाटते.
चित्तरंजन