तें ... पाकिस्तानात
आत्ताच मी नेहमीप्रमाणे पाकिस्तानी वृत्तपत्र 'द डॉन' ची जालआवृत्ती चाळत होतो. नेहमी काहीनाकाही छान मिळते वाचायला. आज तर आश्चर्याची परमावधी झाली. पटकन एका कोपर्यातल्या बातमीकडे नजर गेली. अक्षरशः उडालो... बातमी होती...
"Silence! The court is in session - Veteran stage and TV artist Rahat Kazmi directs the play of India's legendary writer Vijay Tendulkar. "
http://www.dawn.com/wps/wcm/connect/dawn-content-library/dawn/news/enter...
तेंच्या "शांतता! कोर्ट चालू आहे" या नाटकाचा प्रयोग १६ मे ला उर्दूमधे कराचीत झाला, त्याची ही बातमी आणि छोटेखानी परिक्षण. बातमी मुळातून वाचण्यासारखी आहे. नाटक आणि त्याचे सादरीकरण या दोन्हीबद्दल स्तुति केली आहे. पाकिस्तानातले बहुतेक ग्रेट कलाकार इथेही तितकेच नावाजले गेले आहेत. पण आपल्या इथले सिनेकलाकार आणि उर्दू साहित्यिक सोडल्यास इतर भाषांमधून काही तिकडे गेले असेल असे वाटले नव्हते. आज अचानक हे सापडले. पाकिस्तानात नाटक वगैरे कला जिवंत आहेत आणि बर्यापैकी सुस्थितीत असाव्यात असेही वाटले.
शेवटचा परिच्छेद मुद्दम उद्धृत करत आहे:
If nothing else, the play is worth the Rs 500 price tag for its powerful dialogues, especially that of Benare in the end which sums up the dark undertones of our society. Students can avail a 50 per cent discount on the ticket.
५०० रू. तिकिट काढून लोक नाटक , ते पण एका भारतिय नाटककाराचे, बघायला येतात हे नक्किच कौतुकास्पद आहे. बेणारेबाई ही इथेच नव्हे तर तिथेही (किंबहुना कुठेही) तितकीच रेलेव्हंट (मराठी प्रतिशब्द?) वाटते!!! हेच ते तेंचे मोठेपण का?
***
खूप आनंद वाटतो आहे. हा धागा टाकायचे कारण की
०१. हा आनंद सगळ्यांबरोबर वाटावा असे वाटले.
०२. या निमित्ताने तें कसे जगभर पोचले आहेत त्या बद्दल अजून ऐकायला / चर्चा करायला आवडेल.
लिखाणात १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.लिखाणात १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.लिखाणात १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.लिखाणात १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.लिखाणात १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.लिखाणात १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.लिखाणात १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.लिखाणात १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.लिखाणात १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.लिखाणात १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.लिखाणात १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.लिखाणात १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.लिखाणात १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
Comments
रेलेव्हंट
'सुसंबद्ध' हा चटकन आठवणारा शब्द. 'प्रस्तुत' असाही एक शब्द असल्याचे कळते.
सन्जोप राव
संस्कृत शिका, संस्कृत लिहा!
http://spokensanskrit.de
रिलेव्हंटला अजुन काही मराठी शब्द
उचित, प्रसंगोचित, योग्य, प्रासंगिक.
पण सोप्या मराठीत "बेणारेबाई तिथेही आपलीशी वाटते..." असे काहीसे लिहिता येईल.
_______________________________________________
भो भद्र: कृतं मौनं कोकिलैर्जलदागमे ।
वक्तारो दर्दुरा यत्र तत्र मौनं हि शोभनम् ।।
वा
हे नाटक कराचीत झाले, आणि तिथल्या प्रेक्षकांना स्वतःच्या समाजाला लागू वाटले, हे नाटककाराचे मोठे यश आहे.
मी स्वतः हे नाटक किंवा हा चित्रपट बघितलेला नाही. "बघितलेच पाहिजे" यादीत आणखी एक ओळ...
नाटकाच दुवा
'शांतता ! कोर्ट चालू आहे' हे नाटक आपलीमराठी या संकेत स्थळावर पाहता येईल. दुवा.
मीही
मीही मोठ्या आशेनं तिथे पाहायला गेले, पण मला रेणुका शहाणेनं केलेली बेणारेबाई अजिबात आवडली नाही. अत्यंत आक्रस्ताळ्या आवाजात, एकसुरी पद्धतीनं ती त्यात बोलते. त्या बाईच्या स्वभावात अभिप्रेत असणारा मूलपणा, निरागसपणा आणि तितकीच धाडसी प्रगल्भता रेणुका शहाणेला कुठेही दाखवता आलेली नाही. (हे सगळं अर्थातच मला वाटलं!)
आपापल्या जबाबदारीवर बघा तिचा प्रयोग.
सुलभाबाई
..सुलभा बाईंचे (ब्ल्याक ऍंड् व्ह्यायटातले) "शांतता" डिवीडी वर वगैरे उपलब्ध आहे काय ? ती फिल्म दूरदर्शनवर दाखवली गेल्याचे आठवते. पण काही न कळण्याच्या वयात ते पाहिलेले.
बेणारेबाई: रेणुका शहाणे व सुलभा देशपांडे
मेघनाच्या प्रतिसादाशी पूर्ण सहमत.
शांतताचा प्रयोग : संगीत.
आताच त्या ऑनलाईन दुव्यावरून शांतता पहावे म्हणून सुरवात केली. टायटल्स् मधेच मोठ्ठा खडा : टायटलचे संगीत जसेच्या तसे "सायलेन्स् ऑफ द लॅम्ब्स् " चे .....म्हणजे तो ट्रॅकच सरळसरळ लावलाय !
पार्श्वसंगीत : नंदलाल रेळे
असहमती
ऑनलाईन प्रयोग पाहिला. शहाणे बाईंबद्दल मेघनाबाईंशी असहमत आहे. सुलभाबाईंच्या अभिनयाबद्दलची माझी स्मृती अंधुक आहे त्यामुळे तुलना करता येत नाही. पण शहाणे बाईंचा शेवटचा "डिफेन्स्" मला आवडला. बाकी नाटकातला त्यांचा वावर अम्मळ बालीश आहे; पण बाईंनी शेवटचे स्वगत उत्तम निभावून नेले आहे.
सुखात्मेंचे काम सुद्धा चांगले जमले आहे. दुभाषींमधला "आल्फा मेल्" घटक अभावानेच जाणवतो. पण साळसूद राहून हिंसा करण्याचे दर्शन साधले आहे असे वाटले.
लोकहो, मी थोडं बोलू का?
लोकहो, मी थोडं बोलू का?
मीही सुलभाबाईंचा प्रयोग पाहिलेला नाही. इथल्या बर्याच जणांच्या लिहिण्यावरून असं वाटतं आहे, की मी त्यांचा प्रयोग पाहिला आहे, असं माझ्या प्रतिसादात अभिप्रेत आहे. माझ्यामते मी तसं कुठेही म्हटलेलं नाही.
नाटक आणि त्यावर तेंडुलकरांनी लिहिलेले एक स्फुट यांवरून मी बेणारेचं जे चित्र मनाशी रेखाटलं, त्याला उद्देशून मी लिहिलं आहे. कृपया, गैरसमज नसावा. :)
बघितले
नाटकाची संहिता प्रभावी आहे ती आहेच. मन थोडेसे "लॉर्ड ऑफ द फ्लाइज" वाचून झाल्यानंतर झाले तशा स्थितीत आहे. "लॉर्ड ऑफ द फ्लाइज" मी पुन्हा वाचायचा प्रयत्न केला, पण मनाला फार त्रास झाल्यामुळे अर्धवट सोडले. हे नाटक मी पुन्हा वरील दुव्यावर बघणार नाही. पण जर कुठे रंगमंचावर बघायची संधी मिळाली तर मन घट्ट करून बघेन.
रेणुका शहाणे यांनी वठवलेले पात्र एक विचारार्ह समूर्तीकरण आहे, असे मला वाटले. मेघना भुस्कुटे यांना ते पटलेले नाही, तरी हे वठवणे अगदीच टाकाऊ नाही, असे मला वाटते. पण मेघना भुस्कुटे यांनी केलेल्या "निरागस पण प्रगल्भ" या वर्णनाने सुलभाबाईंनी वठवलेले पात्र बघायची खूप इच्छा होत आहे.
सुलभाबाईंनी वठवलेले पात्र
>>मेघना भुस्कुटे यांनी केलेल्या "निरागस पण प्रगल्भ" या वर्णनाने सुलभाबाईंनी वठवलेले पात्र बघायची खूप इच्छा होत आहे.<<
धनंजयशी सहमत आहे. त्यांनी काम केलेले नाटक कुठे मिळाले तर नक्कीच पाहिन.
--लिखाळ.
रोचक
बातमी रोचक आहे. आभार. तेंचे लेखन अमेरिकेत अनुवादित होत आहे/झाले आहे असे वाचले होते. पण हे नाटक पाकिस्तानात व्हावे याचे आश्चर्य वाटते.
थोडे अवांतर. (याबद्दल नंदनशीही एकदा चर्चा झाली होती.) मराठी संकेतस्थळे, अनुदिन्या इ. मध्ये तेंचे लेखन, त्याची समीक्षा यावर कुणीच, कधीच लिहीत नाही असे लक्षात आले. तसेच तें माझे फेवरिट आहेत असेही कुणी म्हणल्याचे आठवत नाही. (एखादा लेख असेलही, नजरेतून सुटला असण्याची शक्यता आहे.) याचे कारण काय असावे? त्यांच्या नाटकातील हिंसा? मराठी साहित्यातील दखल घेण्याजोगी जी नावे आहेत त्यात तें चे नाव येते याबद्दल दुमत नसावे. साहित्यिक चर्चांमध्येही तेंचा उल्लेख क्वचितच होतो. ही उपेक्षा का?
----
“What people say about you is none of your business” - Sean Stephenson
एक नीरीक्षण
मराठी ऑनलाईन जगताची पुरेशी कल्पना नाही ; पण २००८ चे सुमारे १२-१४ दिवाळी अंक मी वाचले. या पैकी प्रत्येक अंकात त्यांच्याबद्दल लेख होता. काही अंकात लेखमाला होत्या. हे झाले दिवाळी अंकांचे. नियमित अंकांमधे (विशेषतः त्यांच्या मृत्युनंतर) बरेच लिखाण आले असावे असा अंदाज.
त्यांच्या निधनाच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने आलेले अजून एक लिखाण :
http://loksatta.com/daily/20090517/lr11.htm
सहमत
सहमत आहे. दिवाळी अंकांमध्ये/वर्तमानपत्रात त्यांच्याबद्दल बरेच लेख वाचले आहेत. (त्यांच्या निधनानंतर जास्तच. पण असे बरेचदा पाहिले आहे. सत्यजित रे, कुमारजी यांची आठवण दूरदर्शनला ते गेल्यावरच होते आणि मग त्यांच्या दुर्मिळ चित्रफिती बघायला मिळतात असा अनुभव आहे.)
----
छान बातमी
बिपिन,
ही बातमी वाचून आनंद झाला.
राजेंद्र,
तेंडुलकरांच्या स्मृतिदिनानिमित्त मायबोली.कॉम वर एक विशेष विभाग तयार करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या शेवटच्या पुस्तकातील काही पाने पण वाचायला उपलब्ध आहेत.
आभार
समीर,
माहितीबद्दल अनेक आभार. पानावर बरेच इंटरेस्टींग लेख आहेत.
----
प्रतिक्रिया
या बातमीमुळे या नाटकाबद्दलचे , तेंडुलकरांबद्दलचे , सुलभा देशपांडे यांच्याबद्दलचे संदर्भ जागे झाले. पाकिस्तानात याचा प्रयोग व्हावा, त्याची जाणत्या लोकांमधे प्रशंसा व्हावी हे सारे रोचक वाटले.
मनात उमटलेल्या प्रतिक्रियांपैकी काही निवडक :
"शांतता" मधे ज्या अनेक "थीम्स" आहेत त्यापैकी एक (आणि बहुदा तेंडुलकरांच्या दृष्टीने मध्यवर्ती, महत्त्वाची ) म्हणजे माणसातल्या हिंसेचे प्रकटन. इथे साधीसुधी कारकुंडी माणसे "अभिरूप न्यायालय"रूपी खोटेपणाच्या पडद्याआड दडल्यानंतर जी हिंसक , मॉब मेंटॅलिटीरूपी हिंसेचे थैमान घालतात त्याचे अंगावर येणारे दर्शन घडते. या थीमला अर्थातच , धर्माचे , प्रदेशाचे , भाषेचे , देशाचे बंधन असण्याचे कारण नाही. या संदर्भात, जे आपल्या प्रदेशात परिणामकारक वाटले ते कुठेही वाटेलच.
तेंडुलकरांची नाटके इतर भाषांत परिणामकारक ठरतात याचे (मला वाटत असलेले ) एक कारण म्हणजे : त्यांची भाषा , शब्दांची योजना ही कधी क्लिष्ट नव्हती , अगदी आलंकारिकही नव्हती. (कानेटकर, शिरवाडकर या समकालीनांची नाटके या संदर्भात लक्षांत घ्यावीत. हेही उत्तम नाटककार. परंतु त्यांची नाटके इतर भाषांत नेणे कठीण. अपवाद : "अश्रुंची झाली फुले " सारखा मेलोड्रामा.) अर्थात, माझ्या तेंडुलकरांबद्दलच्या विधानालाही प्रचंड मोठा अपवाद म्हणजे : घाशीराम कोतवाल ! हे नाटक मराठीखेरीज इतर कुठल्याही भाषेत कितपत सुरेख होईल याबद्दल जबरदस्त शंका वाटते. पेशवाई, बावन्नखणी, नाना, त्यातली मुळगुंदांची नृत्ये , चंदावरकरांचे संगीत या सार्यासार्याचा मिलाफ "अन् - पोर्टेबल्" आहे. तर , या संदर्भात "शांतता!" उर्दूत जाणे , पाकिस्तानात केले जाणे , तिथे उचलले जाणे हे सारे आनंदाचे असले तरी अनपेक्षित नाही. अर्थात यातही एक छोटीशी गोम आहे. बेणारे च्या शेवटच्या स्वगतामधे "चिमणीला मग पोपट बोले" ही (बहुदा बालकवींची ) जुनी कविता येते. आता इतक्या चपखल, नाजूक कवितेला अन्य भाषेत तितकी योग्य कविता मिळाली असेल काय ? (बिपीन राव , तुमच्या उर्दूभाषिक मित्राना विचारा : याचे उर्दू पुस्तक उपलब्ध आहे काय ?अर्थात , त्याची लिपी अरेबिक असली तर मग परत बोलणे खुंटलेच !)
मात्र एक गोष्ट. कुमारी माता , गर्भपात यांचे संदर्भ आपल्या समाजात - विशेषतः शहरी भागात - ४० वर्षांत बदललेले आहेत. पाकिस्तानात - अगदी त्यांच्या शहरी भागात- या गोष्टींची चर्चा , त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहातली मान्यता हे कितपत घडले आहे कोण जाणे. जर का त्यांचा समाज अजूनही ४० वर्षे मागे असेल तर पाकिस्तानात नाटकाची ही "थीम" आणखी जास्त परिणामकारक ठरली असेल असे वाटते - कारण शॉक व्हॅल्यु जास्त.
आज
म.टा. मध्ये ३ र्या पानावर बि.का. ह्यांच्या ह्या लेखाची दखल घेतली गेली पण मटाच्या परंपरेला जपून कुठेही बि.का. ह्यांना ह्या विषयीचे श्रेय देण्याचे कष्ट वार्ताहर श्री. सौमित्र पोटे ह्यांनी घेतलेले नाहीत (पूर्वी मटावर असेच एकदा छायाचित्रकार श्री. संजय पेठे ह्यांची जालावरील काही प्रकाशचित्रे कोणताही श्रेयोल्लेख न करता परस्पर मटाने छापली होती). ज्याचा निषेध करावा तितका थोडा. तसेच अख्ख्या बातमी "तें" पाकिस्तानात पोचले ह्या विषयी आनंद व्यक्त न होता केवळ स्वामित्वमानधन हक्क मिळालेले नाही ह्याचेच रडगाणे गायलेले आहे.
एकुण हा लेख वाचून जो आनंद झाला होता त्यावर ती बातमी वाचून विरजण पडले. निदान बि.का. ह्यांचे नाव घेण्याचे तरी सौजन्य मटा वार्ताहराने दाखवले असते तर चांगले झाले असते.
_______________________________________________
भो भद्र: कृतं मौनं कोकिलैर्जलदागमे ।
वक्तारो दर्दुरा यत्र तत्र मौनं हि शोभनम् ।।
दुवा
याचा दुवा आहे का? मागे माझ्या अनुदिनीतील एक लेख मटाने छापला होता पण खाली माझे नाव आणि दुवा दिला होता. तसेच पूर्ण लेख न छापता पुढे वाचा असे होते.
----
दुवा नाही
पण मूळ लेखच घ्या.
चित्र सौजन्य - श्री. देवदत्तजी गाणार.
_______________________________________________
भो भद्र: कृतं मौनं कोकिलैर्जलदागमे ।
वक्तारो दर्दुरा यत्र तत्र मौनं हि शोभनम् ।।
अरे वा!....
बातमी वाचून आनंद झाला. हे नाटक नुसते वाचले आहे. पाहिले नाही. याची सीडी वगैरे काही निघाली आहे काय?
बाकी 'तेंडुलकरांचे ललित लेखन' - 'आणि मी' या पुस्तकात त्यांना एका पाकिस्तान्याने "मी आपल्याला भेटण्यासाठी पाकिस्तानातून आलो आहे, मला आता अपघात झाला आहे म्हणून तुम्ही मदत करा" असे म्हणून शंभर दीडशे रुपयांना गुंडाळल्याचा किस्सा तेंडुलकरांनीच लिहला आहे. त्याच्या हाताला चांगलीच जखम झालेली होती म्हणून त्याला तेंडुलकरांनी मदत केली मात्र नंतर त्याने दिलेला फोन नंबर वगैरे सगळे खोटे निघाले होते. असे त्याने का केले असावे या प्रश्नाचे उत्तर मात्र त्यांना कधीच मिळाले नाही.
मुक्तसुनीत, घाशीराम नाटक रुपांतरणाला अवघड आहेच याबाबत सहमत. कित्येकांनी त्याचेदेखील (जमेल तसे) रुपांतरण करायचा प्रयत्न केला आहे. वर नाव दिलेल्या पुस्तकात असाच 'टिस्सा चिआंग, कनातेर आणि घाशीराम' हा लेख तेंडुलकरांनी रुपांतरण करताना काय अडचणी आल्या, ते कसे भयंकर वाटत होते यावर लिहला आहे.
'तेंडुलकरांचे ललित लेखन' - 'आणि मी' हे पुस्तक जरुर मिळवून वाचावे. त्यांना घडलेला तुरुंगवास वगैरे कित्येक किस्से भन्नाट आहेत.
त्यांचे 'हे सर्व कोठून येते' हे पुस्तकही वाचण्यासारखे. बहुतेकांनी ते वाचलेले असेलच!
-सौरभ.
==================
चंदु आत्मा, के. दत्ता आणि पाकिस्तानी लोक
चंद्रु आत्म्याचे भारतात निधन झाले हे मला कराचीचे डॉ. हसन बुखारी यांनी यूट्यूबवर श्रद्धांजली म्हणून दिलेल्या गाण्यांवरून समजले. तसेच संगीतकार के. दत्ता उर्फ दत्ता कोरगावकर (बाबूजी किंवा हृदयनाथ यांचे अतिकौतुक करण्याच्या नादात आपण मराठी माणसे यांना विसरलो आहोत असे वाटते) यांची अनेक दुर्मिळ गाणी एका रावळपिंडीच्या विद्यार्थ्याने यूट्यूबवर दिली आहेत.
चन्द्रु आत्म्याची गाणी इथे ऐका
http://www.youtube.com/watch?v=PyVWdlvv0IA&feature=channel_page
तसेच के. दत्तांची "नादान" आणि "गुमास्ता" मधली लताची गाणी इथे ऐका
http://www.youtube.com/user/aapindi
विनायक
चांगली बातमी !
बिपीनसेठ, चांगली बातमी. तेंडुलकरांचं नाटकं आणि वादावादी यांचे तसे जवळचे नाते. संस्कृतीरक्षकांना सतत बीझी ठेवणारे विचार त्यांच्या नाटकात. असे असले तरी त्यांची त्यातली समाजविरोधी बंड करणारी बेणारे बाई मला आवडते. परदेशी लेखकाच्या कथेवरुन "शांतता! कोर्ट चालू आहे" सुचले म्हणतात. वास्तवतेच्या नावाखाली उथळ पात्रांची मांडामांड असे त्यांच्याबद्दल बोलले जाते. असो, असे असले तरी त्यांची नाटकं पाकिस्तानात म्हटल्यावर जरा आश्चर्यच आणि आनंदच !
आज तेंडुलकरांच्या प्रथम स्मृतिदिनही आहे. बीपीन बातमी दिल्याबद्दल धन्यू....!
उथळ पात्रे
असे जे काही लोक म्हणतात ते या नाटकाबद्दल मला पटलेले नाही.
आता हे आहे, की सुखात्मे वकील आणि बेणारे बाई ही दोन पात्रे जितक्या बारकाईने चितारली आहेत, तितकी बारकाईने बाकी पात्रे चितारली नाहीत. पण त्या पात्रांना सुद्धा काही तरी स्वभाववैशिष्ट्ये आहेत - अगदीच व्यंगचित्राइतकी एकसुरी वाटली नाहीत.
लागूंचे मत
वर समीरने दिलेल्या दुव्यात श्रीराम लागूंचे तेंबद्दलचे मत याबाबतीत रोचक ठरावे.
"पूर्वीच्या नाटकांत, किंवा कथाकादंबर्यांत प्रचंड नाटकीपणा होता. तेंडुलकरांच्या नाटकांत तसं नाही. तेंडुलकरांपासून स्फूर्ती घेऊन लिहिणार्या एलकुंचवार, कर्नाड यांच्या नाटकांतूनही हा नाटकीपणा बाद झाला. आणि म्हणूनच तेंडुलकर हे या शतकातील सर्वोत्कृष्ट नाटककार आहेत, हे नक्की."
----
नाटकाबद्दल नव्हे, तेंडूलकरांबद्दल्...
खरं तर ! माझ्यासारखा अरसिक माणूस एखादे-दोन नाटकं पाहतो ( डिव्हीडी आणून) आणि एकून नाटकांच्या वृत्ती माहिती नसल्यामुळे इतर वाचलेल्या प्रतिक्रियांचा परिणाम नाटक पाहतांना तस्साच राहतो. कदाचित तसे झाल्यामुळे तसे वाटले असेल, आपल्याला वाटलेले वेगळेपण हेही अभिरुचीवर अवलंबून असते नाही का ! नाटकातला नाटकीपणा, आणि तिकीट खिडकीवर यशस्वी होण्यासाठीची नाटकं यात काही फरक असावा असे वाटते. नाटकांमधून येणारे विषय विशेषतः विकृती चित्रणाबद्दल, जीवनातील ते वास्तव असतेच यात शंकाच नाही; पण अशा चित्रणाचे प्रयोजन काय ? जीवनातील अदृष्य पण असलेले वास्तवाचे दर्शन घडवावे हाच त्या नाटकांचा हेतू असतो का ? विकृती जीवनाचा भाग असला तरी ती जीवनाची प्रकृती होऊ शकत नाही अशी माझी स्वतःची समजूत असल्यामुळे अशा नाटकांमधून (माझ्या समोर सखाराम बाइंडर आहे) विकृती चितारणे, विकृती चिवडणे, हेच सत्य आहे. असे समजले की गडबड होते असे वाटते. कौर्य आणि विकृती केवळ लैंगिक संबधाबाबतीतच असते असे समजून नाटकांच्या बाबतीत धिटाइने विचार मांडणारा नाटककार श्रेष्ठच अशी ख्याती होते. खरे तर तेंडूलकर ग्रेटच आहेत, पण एक सामान्य रसिक म्हणून आपल्याला हे विषय झेपतात का ? असा प्रश्न मी स्वतःला विचारतो, बाकी काही नाही !!!
-दिलीप बिरुटे
सखाराम बाइंडरबाबत असहमत
आपलीमराठी संकेतस्थळावर हे नाटक आताच पाहिले.
बराच भारावलो आहे.
पण थोडक्यात आतातरी हे - कठिण परिस्थितीत अस्मिता ("मी आहे, अजून मेले नाही" असा भाव) राखणार्या चंपेचे पात्र स्फूर्तिदायक वाटले.
शोकांतिकेने साधारण काय साधते? हा प्रश्न फार मोठा आहे. तो इथे चर्चायला जड आहे.
विकृती दाखवून काय साधते, असा तुमचा प्रश्न समजला नाही. लैंगिक विकृती, त्यातून एखाद्या स्त्रीची विटंबना होते (किंवा दैवी प्रभावाने होत नाही), एखादी स्त्री अस्मिता राखते, एखादीचा बळी पडतो, अशा प्रकारच्या कथा तर फार काळापासून भारतात सांगितल्या जात आहेत.
१. यमाची बहीण यमी तिच्या भावाकडे रतिक्रीडा मागते, तो संवाद आपल्याला वेदांत सापडतो. (सहोदर संबंधाला आपण आज विकृती म्हणतो, त्याकाळातही यमाचे पात्र तेच म्हणते.)
२. महाकाव्यांपैकी त्यातल्या त्यात सर्व विषय हाताळणारे ते महाभारत. तिथे लैंगिक विकृती दाखवायची तिथे दाखवली. विचित्रवीर्याच्या पत्नींशी झालेले सर्व संबंध विकृत म्हणावे असेच होते. खुद्द विचित्रवीर्याकडून सोडा. पण त्याच्या मृत्यूनंतर अंबिका आणि अंबालिका या राण्यांकडून पंडू आणि धृतराष्ट्र या पुत्रांची गर्भधारणा नियोगाने झाली. पैकी एक बाई भीतीने फटक पडली, दुसरीने डोळे गच्च बंद करून नकोसा संग स्वीकारला, अशी वर्णने दिलेली आहेत. संग करणार्या पुरुषाला या बलात्काराचे थेट नैतिक परिणाम, शासन झाले नाही - तो तर नि:संग ऋषी. दंड कोणालाच भोगावा लागला नाही. म्हणजे या बलात्काराची निर्भर्त्सना करणारी नैतिक चर्चा अशी काहीच नाही.
(मी महाभारताला कालबाह्य परिमाणे लावू इच्छित नाही. त्या काळासाठी ते ठीकच आहे. सखाराम बाइंडर मध्ये आधुनिक काळाला अनुसरून बलात्कारांचे बीभत्स म्हणून चंपीच्या तोंडून वर्णन केले आहे. नाटककाराला त्यांच्याबद्दल चीड आहे हे सुस्पष्ट आहे, आणि कोडग्या झालेल्या प्रेक्षकालाही चीड यावी असे सादरीकरण आहे.)
३. होनाजी बाळाच्या "निजा वेगळे तुम्ही" लावणीत वर्णन आहे - गरोदरपणात बाईला संग नको आहे, पण पुरुष बळजबरीने तिच्याशी संग करतो. त्यातील काही ओळी अशा -
याआधी तीन मोठी कडवी बाईची अनिच्छा आणि दुखणे, वाटणारा छळ सांगितलेला आहे. बाईच्या दृष्टिकोनातून इतका सुक्ष्म विचार करू शकणार्या कवीचे कौतूक वाटते. (पण शेवटचा सारांश काळाच्या अनुरूप आहे - दुखत-खुपत असले तरी पतीला संग देणे हीच खरी प्रीती! ठीक आहे काळ वेगळा होता. पण आजच्या नैतिक विचारात हा अत्याचार आहे, हे विसरताही येत नाही.)
लावणी ही नाचून प्रस्तुत करायची असते - नृत्य करणारी काय अभिनय करत असेल असे वाटते?
लैंगिक विकृती पुरातन काळापासून साहित्यात दाखवत आहेत. वैदिक भाषा, महाकाव्यांतील भाषा, तंत कवींच्या भाषांची लकब वेगवेगळी. तशीच आधुनिक रंगमंचावरही विकृती दाखवतात, त्याची भाषा आजकालची बोली मराठी आहे. (कमीतकमी "सखाराम बाइंडर"मध्ये दाखवलेल्या अत्याचाराबद्दल नैतिक तिरस्कार दाखवला तरी आहे.)
नुसत्या लैंगिक विकृतींच्या बाबतीतच बोलायचे आहे, तर या दीर्घ काळाच्या साहित्याच्या इतिहासात "सखाराम बाइंडर"चीच "चिवडणे" अशी वेगळी संभावना का? या बाबतीत मी बिरुटे सरांशी असहमत आहे.
असहमती तर असहमती !
आपण दिलेले संदर्भ योग्यच आहेत. यम-यमीचा संदर्भ त्या काळी योग्य होता. शाहीर नंबर एकचे चावट, त्यांच्या लेखनीतून बरेच अश्लील वाटावेत अशी रचना दिसून येते. मला त्याचे नवल नाही. माझे म्हणने असे होते की, संगीत नाटक, फार्सिकल, आणि प्रायोगिक नाटक या तीनपैकी दोन प्रवाहांनी लोकप्रियता मिळवेली आहे. ज्या 'विषयांबद्दल' आपण चर्चा करत आहोत, ते सर्व विषय प्रायोगिक नाटकाचे. नव्या जाणिवा, नवे दृष्टीकोण,नव्या माध्यमातून मांडावे अशी एक अपेक्षा असते. रुढ झालेले विषयांपेक्षा नव्या वाटा अशा नाटकातून यायला पाहिजे. तेव्हा मराठी प्रायोगिक नाटकांनी मानवी जीवनातल्या विकृतींची चित्रं रंगवली, त्यातल्या त्यात लैंगिक संबधाबाबत त्यांना मोठी रुची तेव्हा अशी नाटकं बिभत्सेला महत्व देतात असे माझे म्हणने आहे. ते मांडू नये, असे मला बिल्कूलच म्हणायचे नाही. पण ती जीवनाची प्रकृती नाही.
सामाजिक विषय पूर्वीच्या नाटककारांनी हाताळले आहेत. जसे, संगीत शारदा या गो.ब.देवळांच्या नाटकात जरठ विवाहाचे चित्रण येते. 'शरिराची भूकेभोवती' ( दलित साहित्यातून पोटाची भूक आणि शरिराची भूक याच्याभोवती अनेक कथा दिसतात) फिरणारा सखाराम बाइंडर संबंध समाजाचा प्रतिनिधी होऊ शकत नाही. समाजातील अपवादाने दिसणारी ते एक चित्रण आहे, तेव्हा ते इतके भडक, उथळ असू नये.
'चंपा' फौजदाराची बायको, ती सखारामाबरोबर राहते, तेव्हा तिचा प्रश्न पोटाचा असतो शरिराचा नव्हे, पण लेखक तिला जबरदस्तीने 'दाउद'कडेही पाठवतो. मुळात दोन्ही स्त्रियांचा प्रश्न असतो पोटाचा. त्याकडे लेखक डोळेझाक करतो आणि शरिराच्या भूकेवर लक्ष केंद्रीत करतांना येथील 'नवरा' नावाच्या वृत्तीवर सडकून टीका करतो, येथील श्रद्धेवर सतत शिव्या घालतो, एक स्त्रीच एका स्त्रीचा बळी घेते. (त्याचे कारण काय तर ती स्त्री दुसरीकडे गेली. ) हे मला अतिशय उथळ वाटते.
'शरीर म्हणजे वासनेचे आगार' 'नवर्याइतकी नामर्द जात कोणती नाही' 'पोटासाठी रंडीबाज होणे' टाकून दिलेली स्त्री म्हणजे, 'रांड, कुत्री, दीडदमडीची रखेल, 'भलत्या जागेत तिखट भरणे' 'दारुच्या बदल्यात सगळं देणारी चंपा' हे मला कैच्या कै वाटते.
असो, विषयांतरामुळे थांबतो !
अवांतर : सखाराम बाइंडर पुन्हा पाहिले आणि त्यातील काही संवाद लिहूनच घेतले :)
-दिलीप बिरुटे
प्रश्न
नाटकांचे असे ढगळ वर्गीकरण करता येते काय? मग तेंच्याच 'घाशीरामा'ला कुठल्या वर्गात बसवाल?
प्रश्न १
>>नाटकांचे असे ढगळ वर्गीकरण करता येते काय?
समजा अंदाजाने मी तसे म्हटले आहे, असे ग्रहीत धरले तर, नाटकाचे कसे वर्गीकरण केले पाहिजे ?
>>मग तेंच्याच 'घाशीरामा'ला कुठल्या वर्गात बसवाल?
मी घाशीराम पाहिलेले नाही.
-दिलीप बिरुटे
नाटकांचे वर्गीकरण
करण्याची जरूरीच काय? जर अगदी करायचेच झाले तर 'चांगले' अथवा 'वाईट'--- ह्यात हवे तर १-५ स्केलवर ग्रेडेशन देता येईल वगैरे.
सखाराम बाईंडर
सखाराम बाइंडर संबंध समाजाचा प्रतिनिधी होऊ शकत नाही.
सखाराम बाईंडर सबंध समाजाचा प्रतिनिधी असल्याचा दावा तेंडुलकरांनी केला होता असे वाचल्याचे आठवत नाही.
बिरुटे यांनी उपस्थित केलेले अश्लीलपणाचे वगैरे आरोप हे या नाटकाच्या संदर्भात पुरातन आहेत आणि या आरोपांमध्ये काहीही दम नाही असे वाटते.
अवांतरः 'शरीर म्हणजे वासनेचे आगार' 'नवर्याइतकी नामर्द जात कोणती नाही'
हे सगळे सखारामचे तत्त्वज्ञान आहे. असे स्वतःचे तत्त्वज्ञान घेऊन हिंडणारे लोक अनेक असतात.
'पोटासाठी रंडीबाज होणे' टाकून दिलेली स्त्री म्हणजे, 'रांड, कुत्री, दीडदमडीची रखेल, 'भलत्या जागेत तिखट भरणे' 'दारुच्या बदल्यात सगळं देणारी चंपा' हे मला कैच्या कै वाटते.
यामध्ये चुकीचे असे काय चित्रण आहे? हवे असल्यास वेश्यांच्या जीवनावर(!) आधारित जालावरील लेखनाचे काही संदर्भ देतो. तेदेखील कैच्या कै वाटतील का?
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
संपूर्ण सहमत.
संपूर्ण सहमत.
कै च्या कै....
सखाराम बाईंडर सबंध समाजाचा प्रतिनिधी असल्याचा दावा तेंडुलकरांनी केला होता असे वाचल्याचे आठवत नाही.
तेंडुलकरांनी असा उल्लेख केला आहे,असे आम्ही कुठेच म्हणलेले नाही. ते आमचे वयक्तिक मत आहे.
बिरुटे यांनी उपस्थित केलेले अश्लीलपणाचे वगैरे आरोप हे या नाटकाच्या संदर्भात पुरातन आहेत आणि या आरोपांमध्ये काहीही दम नाही असे वाटते.
धन्यवाद !
हे सगळे सखारामचे तत्त्वज्ञान आहे. असे स्वतःचे तत्त्वज्ञान घेऊन हिंडणारे लोक अनेक असतात.
आभारी आहे, आम्हाला असे वाटायचे की, वास्तव असलेले जीवनातून लेखक काही पात्रांची निर्मिती करतो, त्याचे विचार, तत्वज्ञान त्यातून मांडत असतो, तरिही, नवीन माहितीबद्दल खूप आभारी !
यामध्ये चुकीचे असे काय चित्रण आहे? हवे असल्यास वेश्यांच्या जीवनावर(!) आधारित जालावरील लेखनाचे काही संदर्भ देतो. तेदेखील कैच्या कै वाटतील का?
कोणतेही संदर्भ देऊ नका. चुकीचे कशाला म्हणावे आणि बरोबर काय असते, याची समज आम्हाला आहे.
सुदैवाने आपल्या इतके नसेल पण थोडेफार पुस्तकांचे वाचन आम्हीही करतो. संदर्भांचे विचारल्याबद्दल आभारी !
तिरकस प्रतिसादांची सुरुवात झाली त्यातील भडक, सवंग, उथळपणाबद्दल आम्हाला जे वाटले ते लिहिले. कोणाला भडक काय वाटते, उथळपणा कसा असतो. ते व्यक्ती-व्यक्तीवर अवलंबून असते. अशा नाटकामधून समाजातील वास्तवतेच्या नावाखाली जे काही सादर केल्या जाते. त्याला लोकप्रियता मिळते. इतकेच आम्हाला म्हणायचे आहे. आम्ही अजूनही त्यावर ठाम आहोत.
वेळात वेळ काढून इथे प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल आभारी !
(आणखी) काही प्रश्न
बिरुटे यांच्याशी या विषयाबाबत एक सर्वसामान्य असहमती आहेच. त्यांनी आपले दृष्टीकोन मांडताना अनेक प्रश्न उभे रहावेत अशी विधाने केली आहेत.
वास्तव असलेले जीवनातून लेखक काही पात्रांची निर्मिती करतो, त्याचे विचार, तत्वज्ञान त्यातून मांडत असतो
एकूण लेखनप्रक्रियेबद्दल हे एक अतिशय ढोबळ , बोल्ड् विधान येथे केले आहे. मला त्याचा अर्थच समजलेला नाही. वास्तव असलेले जीवन म्हणजे काय ? आणि " विचार, तत्वज्ञान त्यातून मांडत असतो " म्हणजे नक्की कशातून ? वास्तवातून ? जीवनातून की पात्रांतून ?
अशा नाटकामधून समाजातील वास्तवतेच्या नावाखाली जे काही सादर केल्या जाते. त्याला लोकप्रियता मिळते. इतकेच आम्हाला म्हणायचे आहे
वास्तवतेच्या नावाखाली म्हणजे नेमके काय ? आणि नक्की काय असे सादर केले जाते ज्याला लोकप्रियता मिळते ?
बिरुटे यांच्या मूळ प्रतिसादातला संदिग्धपणा उपरोक्त प्रश्नांमुळे अधोरेखित होईल आणि आपल्या विवेचनाला ते जास्त सोप्या , स्पष्ट पद्धतीने मांडू शकतील अशी मला आशा वाटते.
आरोपीच्या पिंजर्यात....
>>वास्तव असलेले जीवन म्हणजे काय ? आणि " विचार, तत्वज्ञान त्यातून मांडत असतो " म्हणजे नक्की कशातून ? वास्तवातून ? जीवनातून की पात्रांतून ?
लेखक हा माणूस म्हणून समाजाचा घटक असतो. भोवतालच्या जीवनात घडणार्या घटना पाहतो. सर्वसामान्य माणूसही ते पाहत असतो, तेव्हा दोघांच्या समोरही सामान्य जीवन असते. पुढे सामाजिक समस्यातून निर्माण होणारे नाट्य, लेखक त्याच्या चिंतनातून उभे करतो आणि पात्रांच्या माध्यमातून हवे तसे मांडतो असे वाटते.
>>वास्तवतेच्या नावाखाली म्हणजे नेमके काय ? आणि नक्की काय असे सादर केले जाते ज्याला लोकप्रियता मिळते ?
एखादी घटना अतिशय सामान्य असते, पण तिला हास्यास्पद बनविणे,गंभीर बनविणे, योगायोगांचा वापर करुन कथेला पाहिजे तशा कलाटण्या देणे. सामान्य माणसाला रुचणार नाही अशा (रुचते काय ते विचारु नका) आकलनाच्या पलिकडच्या गोष्टी उभ्या करायच्या (जरासे वास्तवतेवर आधारीत), जरासे विचार करायला लावणारे संघर्ष दाखवायचे, न आवडणार्या तडजोडी करायच्या, कोणत्या तरी विचारांनी ताण असह्य करायचे, तत्व बित्वांना महत्व द्यायचे नाही, अशा गोष्टी सादर केल्या जातात, म्हणजे लोकप्रियतेकडे जाता येते असे वाटते.
-दिलीप बिरुटे
आणखी ...आणखी
बिरुटे एकीकडे म्हणतात :
सामान्य माणसाला रुचणार नाही अशा (रुचते काय ते विचारु नका) आकलनाच्या पलिकडच्या गोष्टी उभ्या करायच्या (जरासे वास्तवतेवर आधारीत),
त्याआधीच्याच एका प्रतिसादात ते म्हणतात :
अशा नाटकामधून समाजातील वास्तवतेच्या नावाखाली जे काही सादर केल्या जाते. त्याला लोकप्रियता मिळते.
जर सामान्य माणसाला रुचणार नाही अशी "जराशा वास्तवावर आधारित" नाटके लिहिली जात असतील तर त्याला लोकप्रियता कशी मिळत असेल बरे ?
जरासे विचार करायला लावणारे संघर्ष दाखवायचे, न आवडणार्या तडजोडी करायच्या, कोणत्या तरी विचारांनी ताण असह्य करायचे, तत्व बित्वांना महत्व द्यायचे नाही,
हे आणखी काहीतरी अगम्य. कुणाला न आवडणार्या तडजोडी ? कोण करते ? "कोणत्या तरी " विचारांनी "ताण" असह्य करायचे ? कुठले ताण ? ते असह्य करायचे म्हणजे काय ? आणि तत्व बित्वांना महत्व द्यायचे नाही म्हणजे नेमके काय ? यातून लोकप्रियतेकडे कोण जाते ? त्याना कसे जाता येते ?
बिरुटे यांचे विवेचन म्हणजे (आता अस्तंगत झालेल्या) नवकविता आणि नवसाहित्याचा एक नमुना म्हणून खपावा. . ;-) बिरुटे यांचे प्रस्तुत संदर्भातले विवेचन हे जर "आरोपीच्या पिंजर्यातून " आहे असे त्याना वाटत असेल तर "शांतता !"चा दुसरा भाग लिहून , त्यात प्रा. डॉ. दिलीप बेणारे ही मध्यवर्ती व्यक्तिरेखा म्हणून ठेवायला हरकत नाही :-) ह. घ्या. !!
- बॅ. मुक्तसुनित सुखात्मे.
सखारामची थीम
सखाराम बाईंडर या नाटकाची थीम वासना, भडकपणा किंवा उथळपणा आहे असे वाटत नाही. (मात्र तेंडुलकरांच्याच गिधाडेबाबत वासना ही थीम मानता येईल.) मला तरी हे नाटक मानवी मनातील हिंसाचाराचे चित्रण करणारे वाटले. नाटक पाहिल्यानंतर येणारी अस्वस्थता ही नाटकातील (तथाकथित) चाळवणाऱ्या प्रसंगांपेक्षा (चंपाचे लुगडे बदलण्याचा प्रसंग किंवा चंपाच्या नवऱ्याने चंपाचे केलेले वर्णन वगैरे) हिंसाचाराच्या प्रसंगांनी आली आहे (लक्ष्मीला चाबकाने/पट्ट्याने मारणे किंवा लक्ष्मी/सखारामने नंतर चंपाला मारणे वगैरे)
हा हिंसाचार समाजातील वास्तवता नाही का? देशभरात वारंवार होणाऱ्या दंगली, जाळपोळी याचे हे एका सूक्ष्म पातळीवरील एक चित्रण मानता येणार नाही का?
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
अजुन् पाहिले नाही
सखाराम बाईंडर अजुन पाहिले नाही.
पहायला पाहिजे अशा यादीत त्याचा दीर्घकाळ समावेश आहे. बघु योग येईल तेव्हा पाहु.
तेंडुलकर आणि हिंसा काल आणि आज हा अतुल पेठे यांचा लघु/ माहिती पट पण चांगला आहे.
प्रकाश घाटपांडे
एक सुधारणा
लावणीमध्ये बैठकीची लावणी हा पण प्रकार असतो. काही गाणी मैफिलीत बसून म्हटली जातात. उदा. चांद केवड्याची रात, आलीया सामोरा, राया माझ्या आंबाड्याला बांधावा गजरा किंवा राजसा जवळी जरा बसा, जीव हा पिसा तुम्हाविण बाई. सदर उपरोल्लेखित लावणी त्याच धाटणीची दिसत आहे.
--------------------------X--X-------------------------------
गडद जांभळं, भरलं आभाळ,
मृगातल्या सावल्यांना, बिलोरी भोवळ
खोलवरी चिंब बाई, मातीला दरवळ ||
उद्बोधक
उद्बोधक चर्चा. चर्चेतील काही प्रतिसादांनी आमच्या अनूभूतीच्या आयामांना चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या मितींमध्ये प्रवेश करता आला. त्या मितींमध्ये नाटकाचे रसग्रहण केल्यावर असे लक्षात आले की नाटकाला जी वास्तवतेची झळाळी आहे त्यामुळे नाटकाच्या कथावस्तूचा भुसभुशीतपणा कातरला जातो पण त्याच वेळेस पात्रांच्या शब्दप्रयोगाचा टेकू संहितेला लाभल्यामुळे नाटक तरतेही आणि बुडतेही. नाटकाची उंची खोलीला भेदून रंगमंचावरून प्रस्थान करते आणि प्रेक्षकांच्या अनूभूतीरूप वास्तवाला टोकदारपणे भिडते. थोडक्यात सांगायचे तर वास्तवाच्या तडजोडींमुळे आकलनाच्या मितींची परिभाषाच बदलते.
----
“What people say about you is none of your business” - Sean Stephenson
अस्वीकरण
नाटक हा "माझा कॉफीचा कप" नसल्यामुळे "तें" चे एकही नाटक पाहिलेले नाही. त्यामुळे मी कोणत्याही वादात पडणार नाही.
चर्चेतील काही प्रतिसादांनी आमच्या अनूभूतीच्या आयामांना चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या मितींमध्ये प्रवेश करता आला.
कसले काय हो राजेंद्रभाऊ, माझ्या बाबतीत तर मेंदु गुदमरला, झिडपिडला, भळसटला, तिरतिरला, झिणझिणला, कळकटला, चडफडला, मळकटला, बरबटला. आज रात्री कपाळाला अमृतांजन चोपडून झोपावे म्हणतेय... :)
.
.
.
.
_______________________________________________
“आमच्यासारखा मुत्सद्दी, कलासक्त, दूरदर्शी आणि कर्तबगार अन्य कोणी सम्राट तुझ्या पाहण्यात आहे काय? “
“नाही महाराज. “
“इतर कोणाच्या पाहण्यात?”
“नाही महाराज. या प्रश्नाचे ‘होय’ असे उत्तर देणार्या सर्वांचा आपल्या आज्ञेनुसार शिरच्छेद करण्यात आला आहे महाराज. “
“संतोष. परम संतोष.
हाहाहा
चर्चेतील काही प्रतिसादांनी आमच्या अनूभूतीच्या (ए)आयामांना चौथ्या, पाचव्या आणि (क)सहाव्या मितींमध्ये प्रवेश करता आला. (अ) त्या मितींमध्ये नाटकाचे रसग्रहण(क्ष) केल्यावर असे लक्षात आले की (र) नाटकाला जी वास्तवतेची झळाळी आहे त्यामुळे नाटकाच्या (क) कथावस्तूचा भुसभुशीतपणा कातरला जातो (ळ)पण त्याच वेळेस पात्रांच्या शब्दप्रयोगाचा टेकू संहितेला लाभल्यामुळे (लं)नाटक तरतेही आणि बुडतेही. (त) नाटकाची उंची खोलीला भेदून (र) रंगमंचावरून प्रस्थान करते (श) आणि प्रेक्षकांच्या अनूभूतीरूप वास्तवाला टोकदारपणे भिडते.(प) थोडक्यात सांगायचे तर (थ)वास्तवाच्या तडजोडींमुळे आकलनाच्या मितींची परिभाषाच बदलते.
राजेंद्र यांच्या वरील विवेचनाला समजून घेण्याकरता त्यातल्या विधाना-उपविधानांना एकमेकाला तर्काने जोडण्याकरता त्यांन्ना अक्षरे दिली आहेत. या सर्व उपविधानांना जोडल्यामुळे एक नवे सौंदर्यवाचक विधान तयार होते असे दिसते :
(ए)(क) (अ) (क्ष) (र) (क) (ळ)(लं) (त) (र) (श) (प) (थ) !
कर्टसी : पुलसमीक्षक सौंदर्यपांडे ;-)