अर्थ अवर

वर्ल्ड वाईल्ड लाइफ फंड (WWF) व सिडने मॉर्नींग हेराल्ड यांच्या सौजन्याने मार्च २००७ मधे सिडनी ऑस्ट्रेलिया येथे क्लायमेट चेंज विषयावर जनजागृती अभियान निमित्ताने पहीला "अर्थ अवर" साजरा केला. सिडनी मधील २.२ दशलक्ष जनता यात सामील झाली. सामान्य जनतेबरोबर अनेक उद्योगधंदे, संस्था, विद्यापीठे देखील यात सहभागी झाले होते. एक तास दिवे बंद ठेवण्याची ही कल्पना होती. याला मिळालेला अभुतपूर्व प्रतिसाद पाहून २००८ मधे जगभर हा प्रयोग राबवला गेला.

मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी एक तास दिवे बंद. २००८ मधील अर्थ अवर कार्यक्रमात ३५ देशातील ४००हून आधीक शहरे सहभागी झाली होती. न्यूयॉर्क मधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअर येथील कोका कोला बिलबोर्ड, गोल्डन गेट ब्रीज सॅन फ्रॅन्सीस्को, स्पेस नीडल सीएटल, सिडनी ऑपरा हाउस, रोम मधील कलोसीयम, असे नेहमीच प्रकाशीत असणार्‍या स्थळातील दिवे विझवण्यात आले होते. २००८ मधील या मोहीमेत ५० दशलक्ष लोकांचा सहभाग होता. २००८ मधे याप्रकल्पात सहभागी गुगलने त्या दिवशी आपले वेबपेज काळ्या रंगात ठेवले होते.

या वर्षी अर्थ अवर २८ मार्च रोजी रात्री ८.३० ते ९.३० आहे. जवळजवळ ८० देश व हजारावर शहरे यात सामील होणार आहेत. दिल्ली व मुंबई शहरे ही यात सामील होणार आहेत. जवळजवळ १ अब्ज लोकांचा सहभाग अपेक्षीत आहे की त्याद्वारे डिसें २००९ मधे कोपनहेगन येथे होणार्‍या क्लायमेट चेंज वरील परिषदेत जगातील प्रमुख देशांच्या नेत्यांना ठोस उपाययोजनेसाठी एक जोरदार संदेश जावा.

२००८ मधे एक तास वीजवापर कमी झाल्याने होणारी बचत व पर्यायाने कमी होणारे कार्बन डायॉक्साईड प्रदुषण याची पहाणी करण्यात आली. किमान १ टक्का ते ९ टक्के वीजबचत पर्यायाने ६ ते ४० टन कमी कार्बन एमीशन झाल्याचे दावे केले गेले. अर्थात एक तास वीजबंद हा काही ठोस उपाय नक्कीच नाही तर प्रतिकात्मक प्रयोग आहे. ह्या निमित्ताने याविषयावर जनजागृती तसेच प्रत्येकाने एक अल्पसा का होईना पुढाकार म्हणुन नक्कीच पाहीले पाहीजे. केवळ दोन तीन वर्षात या योजनेला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पहाता जगातील बहुसंख्य जनता पर्यावरण या विषयी जागरुक आहे व संघटीत होत आहे. तसेच भविष्यात आपापल्या सरकारांवर दबाव आणू शकतील हा एक मोठा दिलासा आहे.

आपण ह्यावर्षी या योजनेत सामील होणार? भारतासाठी ह्या प्रकल्पाचे संकेतस्थळ आहे अर्थअवर.इन तसेच मुख्य संस्थळ आहे अर्थअवर.ऑर्ग

एक छोटी चित्रफीत येथे पाहू शकाल - युट्युब दुवा

संदर्भ - http://en.wikipedia.org/wiki/Earth_Hour

Comments

नक्कीच

अर्थात एक तास वीजबंद हा काही ठोस उपाय नक्कीच नाही तर प्रतिकात्मक प्रयोग आहे. ह्या निमित्ताने याविषयावर जनजागृती तसेच प्रत्येकाने एक अल्पसा का होईना पुढाकार म्हणुन नक्कीच पाहीले पाहीजे.

याच दृष्टीने पाहिले तर प्रयोगाचे प्रबोधनात रुपांतर् करता येईल. चला भारनियमनाला एक् कोलीत मिळाले.
प्रकाश घाटपांडे

प्रबोधनासाठी

चांगली योजना आहे.
माहितीबद्दल धन्यवाद.

हेच,

चांगली योजना आहे.
माहितीबद्दल धन्यवाद.

हेच म्हणू पाहातो..

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

चांगला प्रयत्न

मला वाटते २००७ मधे पण भारतात काही भाग सहभागी झाला होता असे वाचल्याचे आठवते.

बाकी वर प्रकाशराव म्हणले आहेतच, पण महाराष्ट्र या बाबतीत "पायोनियर" राज्य आहे इतके मात्र नक्की. आपल्याकडे काही ठिकाणी "अर्थ अवर" हा दिवसातून "एक तास" वीज देऊन साजरा होतो असे म्हणतात :-)

सहमत आहे ...

>>मला वाटते २००७ मधे पण भारतात काही भाग सहभागी झाला होता असे वाचल्याचे आठवते.
+१, आपल्या मताशी सहमत आहे ...
काही मेट्रोजमध्ये की जेथे विनोदाने सांगायचे म्हटल्यास "अमेरिकेत पाऊस पडल्यास इकडे छत्र्या उघडुन बसायची सवय आहे " अशा ठिकाणी हा कार्यक्रम झाला होता ...

वरचा विनोदाचा भाग् सोडला तर् आम्हाला दिल्ली, बेंगलोर, कोलकता, काही अंशी पुणे, हैद्राबाद, वगैरे शहरात "अर्थ अवर" पाळला गेल्याचे आठवते.
इथे बेंगलोरमध्ये बर्‍याच लोकांनी २००७ आणि २००८ मध्येही हा "अर्थ अवर" पाळल्याचे आढळुन् आले.
२००७ च्या तुलनेत २००८ मध्ये जरा जास्तच जनजागॄती आढळली ...
बाकी लेख, त्यातली माहिती आणि दुवे उत्तम आहेत ह्यात वादच नाही.

------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

उत्तम

प्रबोधनात्मक माहिती. उपास जसा एका ठरलेल्या दिवशी आणि सर्वांनी मिळून केल्याने जे समाधान मिळते तसेच हे नव्या काळातले उपास होणार असे दिसते आहे.

सहभागी होण्याचा प्रयत्न करीन.

माहितीपूर्ण लेखन

>>एक तास वीजबंद हा काही ठोस उपाय नक्कीच नाही तर प्रतिकात्मक प्रयोग आहे. ह्या निमित्ताने याविषयावर जनजागृती तसेच प्रत्येकाने एक अल्पसा का होईना पुढाकार म्हणुन नक्कीच पाहीले पाहीजे.
सहमत आहे ! प्रबोधन करणार्‍या लेखनाबद्दल आभारी !

अवांतर : सध्या आमच्याकडे ऑलरेडी सकाळी तीन तास आणि सायंकाळी तीन तास वीजबंद असतेच आम्ही त्याबाबतीत पुढाकार केव्हाच घेतला आहे :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहमत

मला वाटते मागील वर्षी पुण्यात हा प्रयोग झाला होता. स्थानिक एफेम वाहिन्यांवरुन त्याची जोरदार जाहिरात झाली होती.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

वा!

वा वा! वीज बंद करण्याबरोबर लोकांना घराबाहेरहि पडायला उद्युक्त केले पाहिजे.. त्यानिमित्ताने चार जणांबरोबर लोक मिसळतील.. सामाजिक स्वास्थ्य नक्कीच वाढेल

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

स्तुत्य

स्तुत्य प्रयत्न आहे. या निमित्ताने याबद्दलची जाणीव वाढीला लागल्यास उत्तमच.
असेच ब्लॅकल अर्थात ब्लॅक गूगलविषयी ऐकले होते. यामुळे नेमकी किती बचत होते यावर मात्र दुमत आहे.

----
परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो.

चांगला प्रयत्न

लहानशी माहिती आवडली. वेळेत वाचली. :-)

अर्थ अवर चित्रफीत

सिडनी, बिजिंग, दुबई, अथेन्स, पॅरिस आणि लंडन इथल्या प्रसिद्ध वास्तूंचा सहभाग ह्या बीबीसीच्या चित्रफितीत पाहता येईल.

तारतम्य

जनजागृतीसाठी अशा योजना महत्त्वपूर्ण आहेत, फक्त तारतम्य वापरून त्यांची अंमलवबजावणी होईल अशी अपेक्षा आहे. आजच ही बातमी वाचनात आली.
अर्थात या बातमीवर माझा स्वतःचा किती विश्वास आहे हे मलाच माहित नाही.

वेल,

"माझा स्वतःचा या बातमीवर किती विश्वास आहे हे मलाच माहिती नाही," असे वाक्य या प्रतिसादात आहे.
वेबसाईट वरच आपल्याविषयी "बीबी स्पॉट प्रॉड्यूसेस अ व्हरायटी ऑफ फीचर्स लाईक फेक न्यूज स्टोरीज सॅटारायझिंग द टेक अँड पॉलिटिकल वर्ल्ड्स..." असे लिहून ठेवले आहे.
जालावर केलेल्या शोधात इतकी महत्त्वाची बातमी का दिसू नये? ना बीबीसीवर, ना सीएनएनवर. गेलाबाजार आपल्या ब्रेकिंग न्यूजमध्येही ती नव्हती हे पुरेसे बोलके मानावे?
बीबीस्पॉटवरील बातमीत त्या रुग्णालयाच्या संचालकाची अत्यंत निर्बुद्ध शब्दांतील प्रतिक्रिया आहे. ती वाचल्यावर याला रुग्णालयाचा संचालक कोणी केला असा प्रश्न पडावा (म्हणजेच त्या बातमीत गडबड आहे). 'अर्थअवर'ची वेळ निर्धारित होती आणि त्यावेळी म्हणे त्या इतक्या मोठ्या रुग्णालयात एक हृदरोग शल्यविशारद शस्त्रक्रिया करीत होता.
महत्त्वाचे म्हणजे, अर्थ अवरमध्ये जीवनावश्यक सेवांचा वीजपुरवठा खंडीत केला जात नाही (माझ्या माहितीत चूक असल्यास दुरूस्ती करावी). तेव्हा तारतम्य महत्त्वाचेच.

 
^ वर