बजबजपुरी.कॉम

राम राम मंडळी,

राजकारण, चित्रपट, रंगमंच, समाज, लोक, भाषा, महाजाल अशा अनेक विषयांबद्दल तुमची परिस्थिती कधीतरी "सहन होत नाही आणि सांगता येत नाही" अशी होते का? एखादी बातमी, लेख, घटना, चित्रपट पाहिल्यावर तुम्हाला त्याची खिल्ली उडवावीशी वाटते, आजूबाजूला चाललेल्या प्रसंगांवर मार्मिक टीप्पणी करण्याची कल्पनाशक्ती तुमच्याकडे आहे, टिंगल-टवाळी करून समाजातील व्यंगांवर तुम्हाला नेमके बोट ठेवता येते, अशा सर्वांसाठी संक्रातीच्या मुहूर्तावर आम्ही बजबजपुरी.कॉम हे एक नवे मराठी संकेतस्थळ सुरु करत आहोत. उपहासात्मक शैलीतून निर्माण झालेल्या साहित्यकृतीला या कट्ट्यावर प्रकाशित करता येईल. गंभीर स्वरुपाचे लेखन मात्र येथे करता येणार नाही.

आमच्या संकेतस्थळाचे विशेष म्हणजे काही मान्यवरांकडून चालवली जाणारी सदरे. त्यापैकी काही प्रमुख सदरांची थोडक्यात कल्पना येथे मांडत आहोत.

ठमाकाकूंचा सल्ला : वाचकांनी विचारलेल्या इरसाल प्रश्नांना ठमाकाकू त्यांच्यापरीने उत्तरे देतात. ठमाकाकूंना कोणत्याही विषयाशी वावडे नाही पण कोणत्या प्रश्नांना उत्तरे द्यायची हे स्वत: ठमाकाकू ठरवतात. ज्यांना प्रश्न विचारायचे आहेत त्यांनी निरोपाने ने ठमाकाकूंना ते प्रश्न विचारावेत. प्रश्नकर्त्याला आपले नाव जाहीर करायचे नसल्यास त्याने तसे प्रश्नापुढे लिहून कळवावे. आठवड्यातून एकदा ठमाकाकू त्यांना आवडलेल्या २-३ प्रश्नांची उत्तरे देतील.

नशिबाचे भोग : सुप्रसिद्ध ज्योतिषी प्रा.डॉ.वि.धि.लिखिते यांनी वयाच्या ११ व्या वर्षी पळून जाऊन हिमालयात घोर तपश्चर्या केली. असे म्हटले जाते की साक्षात ब्रह्मदेव त्यांच्यापुढे उभे ठाकले आणि ग्रह, तारे, राशी, नक्षत्रे यांचे ज्ञान लिखित्यांच्या झोळीत घालून गेले. आमच्या संकेतस्थळावर येऊन आठवड्याचे भविष्य लिहिण्याची जबाबदारी त्यांनी उचलली आहे.

पाकिस्तान: सर्वत्र प्रकाशित होणार्‍या चविष्ट पाककृती वाचून कंटाळलेल्यांना आपली अचाट कल्पनाशक्ती वापरून नाविन्यपूर्ण पाककृती प्रकाशित करायच्या असतील तर आमच्या संकेतस्थळावर करता येतील. आठवड्याला एक नवीन पाककृती संकेतस्थळाकडून प्रकाशित केली जाईल.

माकडाच्या हाती...: एखाद्या नव्या लेखकाला आमच्या संकेतस्थळावर लिहिण्यास उद्युक्त करण्याची कल्पना साक्षात मनुष्य पितामहाच्या रुपाने साकार होईल असे आम्हालाही वाटले नव्हते. "आधीच मर्कट" असे सुप्रसिद्ध वचन असले तरी मद्य न पिताही केवळ लेखणीच्या जोरावर बजबज माजवण्याची क्षमता या मर्कटराजांमध्ये आहेत. तर अशा या मर्कटोत्तमाचे हात जेव्हा केळी सोलण्यात मग्न नसतात तेव्हा लेखणी हातात धरून माणसाच्या या पूर्वजाने आमच्या संकेतस्थळावर वाचकांना कोलांट्या उड्या मारायला लावतील असे लेख देण्याचे कबूल केले आहे.

याखेरीज, काही मान्यवरांकडून खुसखुशीत साप्ताहिक सदरे, चर्चांचे गुर्‍हाळ, गद्य आणि पद्य विभागही संकेतस्थळावर आहेतच. विनोदी लेख, कथा, विचार, अनुभव, कविता, विडंबने यांना इथे प्रसिद्धी दिली जाईल.

तर मंडळी, आमच्या संकेतस्थळाचे सदस्यत्व घेण्याचे आमंत्रण या निवेदनातून देत आहोत. बजबजपुरीवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे.

आपले स्नेहाभिलाषी,
प्रशासन,
बजबजपुरी.कॉम

डिस्क्लेमर १: इतर कोणत्याही संकेतस्थळांशी आमची स्पर्धा, मैत्री किंवा वैमनस्य नाही याची नोंद घ्यावी.

डिस्क्लेमर २: गंभीर स्वरुपाचे लेखन या कट्ट्यावरून कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय काढून टाकले जाईल. व्यक्तिगत स्वरुपाचे लेखन ठेवावे की नाही हा निर्णय बजबजपुरी प्रशासनावर राहिल.

डिस्क्लेमर ३: या कट्ट्यावर प्रसिद्ध झालेल्या लेखनावर विश्वास ठेवण्याची जबाबदारी वाचकांची आहे. बजबजपुरी प्रशासनाने जाहीर केल्यानुसार संकेतस्थळावर व्यक्त केलेल्या विचारांशी बजबजपुरी प्रशासन सहमत असेलच असे नाही.

एक विशेष सूचना : संकेतस्थळ सध्या पाहण्यासाठी उपलब्ध आहे. काही कामे अद्याप सुरु आहेत. परंतु, लवकरच जोरात सुरु होईल याची खात्री बाळगावी.

आमचा पत्ता: http://www.bajbajpuri.com/

Comments

अभिनंदन

मराठीचे आंतरजालावर आणखी एक पाऊल पुढे टाकणार्‍या ह्या स्थळाचे अभिनंदन.

आम्ही आता बजबजपुरीवर देखिल सदस्य झालो आहोत!

-कोलबेर

अभिनंदन

आंतरजालावरील नव्या मराठी संकेतस्थळाचे स्वागत.

रुपडे देखणे झाले आहे. कोंबडे आधी की अंडे आधी हा मतप्रस्तावही आवडला. बेरक्याचे लेखनही उत्तम. सदस्यत्त्व घेतले आहे. तिथे येऊन प्रतिसाद देतो.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

अभिनंदन

नवीन साइटीबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा.
बाकीच्या गमती बघायला येऊच.
----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी

हम्म!

सध्या इतकेच. बाकी जरा वाचन केल्यावर.

टीका-टवाळीत अजून थोडा (नको इतका) खंवटपणा जाणवला

या नवीन संकेतस्थळावर काही लेखांत जो खंवटपणा जाणवला, तो माझ्या आवडीपेक्षा अधिक वाटला.

तरी टवाळकी, खंवटपणा, अगदी चीरफाड करणारे व्यंग्यही साहित्यिक दृष्ट्या दर्जेदार असू शकते. पुढेमागे अशा प्रकारचा उच्च दर्जा या संकेतस्थळाला यावा, म्हणून शुभेच्छा.

सहमत

खवटपणा लेखापेक्षा प्रतिसादांमध्ये नको तितका आहे. लेख तसे उत्तमभर्जितगोमांसपट्टिकेप्रमाणे खरपूस व स्वादिष्ट आहेत.

दुसऱ्याला अपशकुन व्हावा म्हणून स्वतःचेच नाक कापणारे अनेक लोक असतात. त्यांचा सध्या थोडा त्रास आहे असे दिसते. मात्र लवकरच इथे उच्च दर्जा राखणारे लेखन होईल अशी खात्री आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

शुभेच्छा

खिल्ली/टिंगल-टवाळी साठी वाहिलेल्या मराठी संकेतस्थळाची कल्पना आवडली. सुरूवातीचे काही लेखही मजेशीर आहेत. संकेतस्थळाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

अस्थानी प्रतिसाद

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
बजबजपुरी या नवीन मराठी संस्थळाचा प्रारंभ संक्रांती दिवशी (दि.१४.जाने.२००८) झाला. त्या स्थळाची ओळख करून देणारा एक चांगला लेख उपक्रम वर आला हे योग्यच झाले.
या नूतन संस्थळाला काही उपक्रमींनी इथे शुभेच्छा व्यक्त केल्या हेही ठीक. पण तेव्हढे सोडून जे अन्य अनेक प्रतिसाद आहेत ते इथे उपक्रमावर लिहिण्याचे कारण काय? ते बजबजपुरीवर लिहिणेच इष्ट इष्ट ठरले असते. इथे असे लिहिणे अनुचित आहे असे मला वाटते.यास्तव ते सर्व प्रदिसादलेखन बजबजपुरीवर नेऊन टाकावे अशी माझी संबंधितांना विनंती आहे.

प्रिय तुषार यांस....

बाकी बजबजपुरी देखणे वाटले. लेआऊट भयंकर सुटसुटीत आहे.

आमचेही संकेतस्थळ लवकरच येत आहे. त्याचा विषय आम्ही आताच देणार नाही मात्र. :-)

-सौरभ

अनेक संदर्भ काढल्याने प्रतिसादातील काही भाग संपादित केला आहे.

शुभेच्छा !

बजबजपुरी या नव्या संकेतस्थळास शुभेच्छा. विनोदाला वाहिलेले स्थळ ही कल्पना छान आहे.
या वर उत्तम दर्जेदार विनोदी साहित्य वाचायला मिळो.

--लिखाळ.

संपादकांस......

टीका करणारे प्रतिसाद काढल्याबद्दल धन्यवाद....आता सर्व स्वच्छ असल्याचे जाणवत आहे.

+१

हेच म्हणतो. आता बजबजपुरीवर सर्व काही "स्वच्छ" आहे.

जाहीर निवेदन

या चर्चेत आलेल्या अनेक उलट-सुलट प्रतिसादांमुळे मूळ विषयाला वेगळे वळण लागल्याचे लक्षात आल्याने चर्चेतील अनेक प्रतिसाद सरसकट संपादित करण्यात आले आहेत याची कृपया सर्व सदस्यांनी नोंद घ्यावी. यांत चर्चेशी संबंधीत प्रतिसाद चुकून अप्रकाशित होण्याची शक्यता असून त्याबद्दल उपक्रमाचे संपादन मंडळ दिलगीर आहे. या चर्चेचा त्रास झाल्याचे अनेक सदस्यांनी कळवले आहे. संदर्भादाखल श्री. यनावाला यांचा प्रतिसाद येथे ठेवला आहे.

नवीन संकेतस्थळाच्या उपक्रमांबद्दल, धोरणांबद्दल नव्याने एकदा चर्चा सुरु करण्यास प्रत्यवाय नाही परंतु चर्चा वैयक्तिक अंगाने जाऊ नये हे उपक्रमाचे धोरण पाळले जाईल याची काळजी सर्व सदस्यांनी घ्यावी. चर्चेत पुन्हा आक्षेपार्ह प्रतिसाद आढळले तर चर्चा वाचनमात्र केली जाईल. इतर संकेतस्थळांवरील वाद येथे आणून सोडवण्याबद्दलही सदस्यांच्या तक्रारी आल्या आहेत. माहितीप्रधान लेखन, चर्चा आणि समुदाय हे उपक्रमचे स्वरूप टिकून राहावे आणि उपक्रमच्या लेखनविषयक उद्दिष्टांशी सुसंगत असेच लेखन इथे असावे असे संपादन मंडळाला वाटते. एकमेकांवर व्यक्तिगत वार, तेढ वाढवणे, एखाद्याचे वैयक्तिक प्रश्न सोडवणे हे उपक्रमाचे उद्दिष्ट नाही. उपक्रमाच्या धोरणांविषयी अधिक माहिती येथे मिळेल.

सर्व सदस्यांनी सहकार्य करावे ही कळकळीची विनंती. - संपादन मंडळ.

संपादक मंडळाचे आभार पण...

बजबज असणारे प्रतिसाद संपादित केल्याबद्दल संपादक मंडळाचे आभार ! पण या निमित्ताने काही माहितीपूर्ण प्रतिसाद उडाले जसे संस्थळ कोणाच्या मालकीचे होते वगैरे असे..ते प्रतिसाद अत्यंत माहितीपूर्ण होते. 'त्या'संस्थळाच्या मालकाला मराठी साहित्य प्रांतातील एका लेखनाच्या बाबतीत थोर परंपरा आहे, त्यांचे हे संस्थळ होते अशी माहिती मिळत होती. ती माहिती तमाम वाचकांना कळायलाच पाहिजे होती असे वाटते. ते प्रतिसाद काढल्याबद्दल संपादक मंडळाचा मात्र आम्ही निषेध व्यक्त करतो !!!

संपादक मंडळाच्या धोरणाचा निषेध म्हणून पुढे दहा दिवस आम्ही 'उपक्रमवर'वाचनमात्र राहू !!! :)

-दिलीप बिरुटे

आभार

कारवाईबद्दल संपादकमंडळाचे आभार.

अवांतर : सद्यस्थितीमध्ये या लेखाची वाचने १७९७ आहेत. इतका मोठा आकडा पहिल्यांदाच पाहिला.
----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी

हेच

हेच म्हणतो.

संपादक मंडळाचे आभार.

मरे एक त्याचा दुजा शोक वाहे । अकस्मात तोही पुढें जात आहे ।।
पुरेना जनीं लोभ रे क्षोभ त्यांतें । म्हणोनी जनीं मागुता जन्म घेतें ।। १६ ।।

(जालावरुन साभार)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

आभार

हेच म्हणतो.

बरेच झाले!

वा विनोदासाठी खास स्थळ!? वा क्या बात है!
इथे विनोदीपणा खरंच आला तर आवडेल.
बजबजपुरी ला मनापासून शुभेच्छा!

अशीच मराठी स्थळांची संख्या वाढती राहो. त्याबरोबर सदस्यही वाढोत.

आवांतरः
बरेच झाले!
ही भानगड पाहून मी दोन चार दिवस 'आतच ' आलो नाही. बजबजपुरी ही का ती?, असं वाटायला लागलं.
जो उठतो तो एकमेकांच्या धोतराच्या निर्‍यांना (आणि प्रसंगी कासोट्यांना) हात घालत होता.
बरं झालं उपक्रमाने लंगोट्याच आवळून टाकल्या, आणि प्रसंगी काढून घेण्याचीही बंदी केली ते.
;))
आपला
कोणत्याही भानगडीपासून सध्या जरा दूरच!
गुंडोपंत

आता पुरे

आता पुरे गुंडोपंत. उशीरा आलात म्हणून तुम्ही पुन्हा तमाशा सुरू केलाच पाहिजे असे नाही.

शुभेच्छा.

नविन संकेतस्थळाला शुभेच्छा.

शुभेच्छा.

बजबजपुरीचे गजबजपुरीत रुपांतर व्हावे हीच सदिच्छा.

मराठीचे अनेक सांस्कृतिक अंगे आजही दुर्लक्षित आहेत. त्यांना बजबजपुरीत स्थान मिळावे ही इच्छा. ( विनोद, शृंगार, भय कथा इत्यादी)

निवेदन

सर्वात आधी मी बजबजपुरीतर्फे उपक्रमावरील सर्व शुभचिंतकांचे आभार मानतो. ह्या संकेतस्थळावर बजबजपुरी.कॉम ह्या अस्मादिकांनी विकसित केलेल्या संकेतस्थळाबद्दल काही गैरसमज पसरले आहेत किंवा पसरविले जात आहेत असे दिसते. गोंधळ जरा शांत झाल्यावर ह्यावर थोडे लिहावे असे मनात होतेच. म्हणून हा प्रपंच.

कुठल्याही संकेतस्थळाला उत्तर म्हणून बजबजपुरी हे संकेतस्थळ सुरू केलेले नाही. माझे मित्र उपक्रमकार शशांक जोशी, गमभनकार ओंकार जोशी ह्या जोशीद्वयांसोबत आणि इतर काही स्नेह्यांसोबत केवळ हास्यविनोदाला वाहून घेतलेले संकेतस्थळ सुरू करण्याबाबत २००७ सालीच चर्चा केली होती. (ही चर्चा जीमेलवर जतन झालेली आहे. कुणाला हवी असल्यास देता येईल) काही आराखडेही तयार केले होते. कंपूबाजी.कॉम हे डोमेननेमसुद्धा तेव्हा विकत घेण्यात आले होते. (तारखेची खातरजमा करण्यासाठी कुणाला कंपूबाजीची पावती पाहिजे असल्यास देता येईल.) पण अनेक कारणांमुळे असे संकेतस्थळ उघडण्यासाठी २००९ सालाची संक्रांत उजाडावी लागली. असो.

सुरेशभट.कॉम, मराठीअभ्यासपरिषद.कॉम आणि बजबजपुरी.कॉम ह्या आम्ही उभारलेल्या संकेतस्थळांचा आम्हाला अभिमान आहे. पुन्हा एकदा सांगावेसे वाटते की, बजबजपुरीची स्थापना कुठल्याही संकेतस्थळाशी स्पर्धा करण्यासाठी झालेली नाही. बजबजपुरीची उद्दिष्ट्ये इतर संकेतस्थळांपेक्षा अत्यंत वेगळी आहेत. इतर संकेतस्थळे आमच्यासाठी प्रेरणास्रोतच आहेत. त्यांची भरभराट बजबजपुरीच्या हिताचीच आहे.

पूर्णविराम!

चित्तरंजन भट

शुभेच्चा.

श्री.चित्तरंजन,

आपल्या कडे संकेतस्थळ यशस्वी करण्यासाठी हवे असणारे सर्व तंत्र, कौशल्य, अनुभव आणि कल्पनाशक्ति आहेत. एक सामान्य मराठी माणूस म्हणून मला आपल्याबद्दल अतिव प्रेम् आणि जिव्हाळा वाटतो. आपल्या या प्रकल्पाला उदंड यश मिळावे अशीच माझी इच्छा आणि प्रयत्न असतील.

मराठी भाषेला अथवा भाषकांना विनोदाचे असलेले वावडे आपल्या या स्थळाने नक्कीच दुर होईल. अर्थात त्यासाठी हवे असणारे पथ्यही आपणाकडून पाळण्यात येईलच.

आपल्या यशाच्या प्रत्येक टप्प्यावर आपले शुभचिंतन करण्यास मला आनंदच वाटेल.

यशवंत व्हा, किर्तीवंत व्हा हीच परत एकदा शुभेच्छा.

कलंत्री

 
^ वर