भारतीय ज्योतिषविषयक पद्धतीचा मतिमंदतेच्या संदर्भात अभ्यासप्रकल्प (भाग १)

या बाबतीत श्री. प्रकाश घाटपांडे आणि माझ्यामध्ये चर्चा झाली. वैद्यकातील संशोधनाची चौकट अंगीकारून मतिमंदतेचा हा अभ्यास करता येईल का असा प्रश्न श्री घाटपांडे यांनी समोर आणला.

त्याविषयी निष्पन्न झालेल्या सल्लामसलतीचा अहवाल उपक्रमावर मांडावा अशी श्री. घाटपांडे यांची इच्छा आहे. त्याचा पहिला भाग येथे देत आहे.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

भारतीय ज्योतिषविषयक पद्धतीचा मतिमंदतेच्या संदर्भात अभ्यासप्रकल्प

अभ्यासक : प्रकाश घाटपांडे
सांख्यिकी सल्लामसलत : धनंजय

सारांश :
* हा अभ्यास-प्रकल्पाच्या चौकटीविषयी सल्ल्याचा सारांश आहे.
* उद्देश असा : शाळकरी मुलांच्या जन्मकुंडल्यांचे मतिमंद आणि सामान्य-मती असे वर्गीकरण प्रत्यक्षातल्या मतिमंदतेशी/सामान्य-मतीशी कितपत जुळते त्याचा ताळा करणे. श्री घाटपांडे यांच्यापाशी १०० मतिमंद आणि १०० सामान्य-मती शाळकरी मुलांच्या कुंडल्यांचे विदागार आहे.
* माझा अभिप्राय आहे की प्रशिक्षित ज्योतिषांना विश्वासात घेऊन प्राथमिक अभ्यास व्हावा. या अभ्यासात काही कुंडल्या आधीच कुठल्या मतिमंद आणि कुठल्या सामान्य-मती ते सांगून प्रशिक्षित ज्योतिषांना अभ्यासण्यास द्याव्यात.
* शिवाय थोडक्यात केलेली चर्चा -
(१) अभ्यासकांनी आणि प्रशिक्षित-ज्योतिषांनी कुंडल्यांचे वर्गीकरण कसे करावे, त्याबाबत काही प्राथमिक विचारार्थ पर्याय
(२) वेगवेगळे पर्याय निवडल्यास विश्लेषणासाठी योग्य असलेल्या वेगवेगळ्या गणितपद्धती
(३) संशोधनात सद्यविचार कुठला आणि नवविचार कुठला हे ठरविण्याचे महत्त्व - आणि ते न ठरवताही हा अभ्यासप्रकल्प राबवता येईल, हा विचार. अभ्यासप्रकल्प मर्यादित असल्यामुळे निष्कर्षातील अनिश्चिततेचे मोजमाप - कितपत अनिश्चितता ग्राह्य याबाबत निकष
(४) ज्या कुंडल्यांचे वर्गीकरण करणे अशक्य आहे, त्यांच्याबद्दल विचार
(५) भाकितांची अनिश्चितता कितपत असल्यास आणि अभ्यासप्रकल्पाची निर्णायकता कितपत असणार याविषयी तक्ता

-------------------------------

प्रस्तावना :
भारतीय ज्योतिषाच्या पद्धती जन्माच्या वेळच्या ग्रहस्थितीची आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांशी सांगड घालतात.

प्रमेय (हायपोथिसिस) :
मतिमंदता ही आयुष्यातली महत्त्वाची घटना आहे, असे जाणून, आपले प्रमेय असे आहे : जन्मकुंडली तपासून प्रशिक्षित भारतीय ज्योतिषी मतिमंद आणि सामान्य-मती शाळकरी मुलांचे वर्गीकरण करू शकतील.

उद्दिष्ट्ये :
(१) कुंडलीवर बेतलेल्या भाकितांची शाळकरी वयापर्यंत मतिमंदता दिसून येण्याशी सांगड कितपत घनिष्ठ आहे त्याचे मोजमाप करणे, आणि आपल्या अभ्यास-प्रकल्पाच्या मानाने त्या मोजमापाची अनिश्चितता सांगणे.
(२) हे बघणे की अभ्यासप्रकल्पा-अंतर्गत दिसलेली सांगड यादृच्छिक असणे कितपत शक्य आहे
(३) अनेक वेगवेगळ्या ग्रहदशा या निर्णयासाठी प्रशिक्षित ज्योतिषी वापरतील. त्यांच्यापैकी कुठल्या ग्रहदशांची मतिमंदतेशी अधिक घनिष्ठ संगत आहे, कुठल्यांची कमी, याचा निर्णय करणे.

हा अभ्यासप्रकल्प २०० शाळकरी वयाच्या मुलांच्या कुंडल्यांवर होईल. पैकी १०० कुंडल्या सामान्य शाळांमधील मुलांच्या आहेत, ही मुले गेली तीन वर्षे त्यांच्या वर्गात वरच्या क्रमांकांत उत्तीर्ण झालेली आहेत. उरलेल्या १०० कुंडल्या विशेष शाळांमध्ये जाणार्‍या मतिमंद मुलांच्या आहेत.

अभ्यास चौकट :
मतिमंद/सामान्य-मती असे कुंडल्यांचे ज्योतिषांकडून वर्गीकरण प्रत्यक्षातील मतिमंदतेच्या धोक्याची कितपत पूर्वसूचना देते, अशा प्रकारचे आकडेशास्त्रीय विश्लेषण (या चौकटीला "Case-Control Analysis" असे म्हणतात).

अभ्यासप्रकल्पाची रचना :
प्रकल्पाच्या प्राथमिक टप्पा थोड्याच कुंडल्या घेऊन (१० मतिमंद, १० सामान्य-मती) करावा. कोणत्या कुंडल्या मतिमंद, आणि कोणत्या सामान्य-मती हे आधीच सांगितले जाईल. या प्रकारे ज्योतिषी-अभ्यासक उरलेल्या कुंडल्यांचे कुठल्या प्रकारचे वर्गीकरण सुयोग्य आहे, ते ठरवण्यास मदत करू शकेल. उरलेल्या ९०-९० कुंडल्यांचे वर्गीकरण करताना मात्र ती कुंडली मतिमंद मुलाची की सामान्य-मती मुलाची हे सांगण्यात येणार नाही.

प्राथमिक टप्पा :
या प्राथमिक टप्प्यात ज्योतिषी-संशोधकाकडून कसले वर्गीकरण व्यवहार्य आहे, त्याबाबत माहिती कळेल. उत्तरोत्तर अधिक-अधिक गुंतागुंत असलेल्या वर्गीकरण-पद्धती येणेप्रमाणे :
१. दुहेरी वर्गीकरण: कुंडल्या दोन ढिगांत वर्गीकृत केल्या जातील (अ) मतिमंद (आ) बिगर-मतिमंद. यातही ज्योतिषी ढीग समसमान करेल, किंवा यथा-इच्छा विषमही करू शकेल
२. "सांगता येत नाही" असा ढीग असलेले वर्गीकरण : यात कुंडल्यांचे तीन ढीग केले जातील (अ) मतिमंद (आ) सांगता येत नाही (इ) बिगर-मतिमंद
३. अधिक विभाग असलेले ५-स्तरीय वर्गीकरण : (अ) स्पष्टपणे मतिमंद (आ) बहुतेक मतिमंद (इ) सांगता येत नाही (ई) बहुतेक सामान्य-मती (उ) स्पष्टपणे सामान्य-मती
४. १००-गुणांचे वर्गीकरण : ० म्हणजे स्पष्टपणे मतिमंद, १०० म्हणजे स्पष्टपणे सामान्य-मती किंवा हुशार, अधले मधले कितीही गुण कुंडलीला देता येतील

या प्राथमिक टप्प्यात प्रशिक्षित ज्योतिषी-संशोधक हे सुद्धा अनुमान करू शकेल की साधारणपणे कितपत कुंडल्या "अवर्गणीय" आहेत. अवर्गणीय कुंडल्या ना प्रमेयाच्या बाजूने कौल देतात, ना प्रमेयाच्या विरुद्ध. त्यामुळे प्राथमिक टप्प्यात याविषयी अनुमान करणे उपयोगाचे ठरावे.

या प्राथमिक टप्प्यातून हासुद्धा फायदा होईल, की तपशीलवार ज्योतिषविषयक संशोधनासाठी कुंडल्यांच्या विदागाराचा सखोल उपयोग कसा करता येईल, याबाबत उप-विदागार निर्माण करता येईल. याचे उदाहरण असे.
समजा लग्नात बुधाची आणि गुरूची युती अमुक कुंडलीत महत्त्वाची आहे, असे ज्योतिष-प्रशिक्षित-संशोधकाला वाटले, तर उप-विदागारात बुध, गुरू यांचे अंश आणि लग्नाचे अंश असल्यास पुरे. कुंडलीबाबत अशीच वेगवेगळी निरीक्षणे नमूद करता येतील. अशा वेगवेगळ्या निरीक्षणांपैकी कुठल्या निरीक्षणाचा योग्य भाकिताशी सर्वात घनिष्ठ संबध जुळतो, हे दिसून येईल. या विदागाराने पुढील ज्योतिषी भाकीत सांगताना त्या-त्या ग्रहस्थितींना कमी-अधिक वजन देऊ लागतील. प्रगतीची शक्यता जाणून आणखी तज्ज्ञ ज्योतिषांना संशोधनात सहभागी होण्यात रस वाटू शकेल.

(हा प्राथमिक टप्पा प्रशिक्षित-ज्योतिष-संशोधकाच्या दृष्टीने अभ्यास प्रकल्प ठीक-ठाक करण्यासाठी, अर्थपूर्ण करण्यासाठी आहे. यात उत्तरे आधीच सांगितल्यामुळे भाकितांची कुठलीच चाचणी होत नाही. तरी पुढील चाचणी अर्थपूर्ण होण्यासाठी हा प्राथमिक टप्पा महत्त्वपूर्ण आहे.)

मुख्य टप्पा = चाचणी

प्रशिक्षित ज्योतिषी उरलेल्या १८० कुंडल्या बघतील. त्या मतिमंद आणि सामान्य-मती मुलांच्या मिसळलेल्या असतील, आणि क्रम यादृच्छिक असेल. प्राथमिक टप्प्यात जे काय वर्गीकरण ठरवले आहे, त्या प्रकारे त्या कुंडल्या प्रशिक्षित ज्योतिषी वर्गीकृत करतील. पुढचे सांख्यिकी गणित त्या ठरवलेल्या वर्गीकरणाच्या अनुसार असेल. उदाहरणार्थ, वर उल्लेखलेल्या विविध वर्गीकरणांसाठी गणिते येणेप्रमाणे :

१.(अ) दुहेरी वर्गीकरण: यातही समजा प्रकार (अ) चाचणीच्या वेळेला इतके सांगितले जगेले की बरोबर ९०-९०चे ढीग बनवायचे आहेत

* मतिमंद शाळेतील मुले साध्या शाळेतील मुले एकूण
कुंडलीच्या दृष्टीने मतिमंद क्ष ९०-क्ष ९०
कुंडलीच्या दृष्टीने मतिमंद नाही ९०-क्ष क्ष ९०
एकूण ९० ९० १८०

यदृच्छेनेच वर्गीकरण झाले असेल, तर अपेक्षित "क्ष" आकडा ४५ असा आहे. भाकित जितके-जितके वस्तुस्थितीशी संलग्न तितका "क्ष" आकडा ४५ पेक्षा अधिक, ९०च्या जवळ जायला लागेल. अर्थात यदृच्छेनेही "क्ष" आकडा नेमका ४५ असा नसणार. यदृच्छेच्या अनिश्चिततेचे गणित "काय-वर्ग सामान्यीकरण" किंवा "फिशरचे नेमके गणित" या पद्धतींनी करता येते.

१.(आ) दुहेरी वर्गीकरण: यातही समजा प्रकार (आ) चाचणीच्या वेळेला इतके सांगितले जगेले की वाटेल तसे ढीग बनवायचे आहेत

* मतिमंद शाळेतील मुले साध्या शाळेतील मुले एकूण
कुंडलीच्या दृष्टीने मतिमंद क्ष य-क्ष
कुंडलीच्या दृष्टीने मतिमंद नाही ९०-क्ष ९० - (य-क्ष) १८०-य
एकूण ९० ९० १८०

यदृच्छेनेच वर्गीकरण झाले असेल, तर अपेक्षित "क्ष" आकडा य/२ असा आहे. भाकित जितके-जितके वस्तुस्थितीशी संलग्न तितका "क्ष" आकडा य/२ पेक्षा अधिक, "य"च्या जवळ जायला लागेल. अर्थात यदृच्छेनेही "क्ष" आकडा नेमका य/२ असा नसणार. यदृच्छेच्या अनिश्चिततेचे गणित "काय-वर्ग सामान्यीकरण" किंवा "फिशरचे नेमके गणित" या पद्धतींनी करता येते.

२. "सांगता येत नाही" असा ढीग असलेले वर्गीकरण : यात कुंडल्यांचे तीन ढीग केले जातील (अ) मतिमंद (आ) सांगता येत नाही (इ) बिगर-मतिमंद

* मतिमंद शाळेतील मुले साध्या शाळेतील मुले एकूण
कुंडलीच्या दृष्टीने मतिमंद
कुंडलीच्या दृष्टीने वर्गीकरण नाही क्ष
कुंडलीच्या दृष्टीने मतिमंद नाही ९०-(श+ह) ९० - (ष+ळ) १८०-(स+क्ष)
एकूण ९० ९० १८०

यदृच्छेनेच वर्गीकरण झाले असेल, तर अपेक्षित आकडे "स" आणि "क्ष" जाणून काढता येतात. भाकित जितके-जितके वस्तुस्थितीशी संलग्न तितका "श" आकडा "स"च्या जवळ जायला लागेल. अर्थात यदृच्छेनेही "श" आकडा नेमका स/२ असा नसणार. यदृच्छेच्या अनिश्चिततेचे गणित "काय-वर्ग सामान्यीकरण" किंवा "फिशरचे नेमके गणित" या पद्धतींनी करता येते.

(प्रकार ३: वरील सांगितलेल्या प्रकारे ५-स्तरीय वर्गीकरणाचे गणित करता येते.)

४. १००-गुणांचे वर्गीकरण : ० म्हणजे स्पष्टपणे मतिमंद, १०० म्हणजे स्पष्टपणे सामान्य-मती किंवा हुशार, अधले मधले कितीही गुण कुंडलीला देता येतील.
गणित करण्यापूर्वी मतिमंद/सामान्यमती न बघता दिलेल्या गुणांचे वितरण बघता येईल. गुण हे "नॉर्मल डिस्ट्रिब्यूशन"चे असले (ज्याला लोकांत कधीकधी "घंटेच्या आकृतीचे वितरण" म्हणतात), किंवा एकाच्या बाजूला एक दोन ठेवलेल्या "नॉर्मल डिस्ट्रिब्यूशन"चे असले, तर "टी"-टेस्ट नामक गणित प्रणाली वापरता येईल. या गणिताने असे कळेल की सामान्य शाळेतील मुलांच्या कुंडल्यांना मतिमंद मुलांच्या शाळेतील कुंडल्यांपेक्षा किती अधिक "गुण" मिळाले. यदृच्छेने अपेक्षा अशी की फरक शून्य असेल, पण नेमका "०" असा नाही. "नॉर्मल वितरण" नसेल तर गुणवत्ता-यादीतील क्रमाचे गणित करता येते.

(क्रमशः - भाग २ मध्ये चाचणीची अनिश्चितता आणि भाकितांची अनिश्चितता यांच्याबद्दल ऊहापोह, आणि तक्ता दिलेला आहे.)

Comments

सुरेख!

धनंजय आणि प्रकाश घाटपांडे ही युती असामान्य आहे. संशोधनाचा विषय देखिल खूप इंटरेस्टींग आहे. ह्या प्रकल्पाला मनापासून शुभेच्छा!

अवांतर : सध्या (साध्या) शाळेत असलेल्या मुलांच्या अभासातील प्रगतीची जुजबी माहिती मिळू शकते का? ज्योतिषाच्या आधाराने जी मुले मतिमंद होण्याचे भाकित वर्तवले आहे त्यातील जेवढी साध्या शाळेत आहेत त्यांच्या अभ्यासातील प्रगतीकडे पाहणे देखिल महत्वाचे ठरेल.

तीन प्रश्न

१. त्या २०० मुलांना आणि त्यांच्या पालकांना या प्रकाराची पूर्वकल्पना देण्यात येणार आहे का? म्हणजे कुंडलीसारख्या एखाद्याच्या खाजगी माहितीचा उपयोग त्याच्या परवानगीशिवाय करणे योग्य कसे? जर त्यांना पूर्वकल्पना देण्यात येणार असेल तर या चाचणीतून निघणार्‍या निष्कर्षांचा त्रास (समजा एखाद्या सामान्य मुलाला मतिमंद ठरवले गेले किंवा थोड्याशा ढ मुलाला मतिमंद ठरवले गेले तर मुलांना आणि त्यांच्या पालकांना होणारा त्रास) लक्षात घेतला आहे का? प्रयोगाला प्रयोग म्हणून ठीक आहे पण इथले गिनी पिग्ज कोवळी मुले आहेत हे वेगळे सांगायला नको.

२. ज्यांनी नारळीकरांना दाद लागू दिली नाही ते तथाकथित ज्योतिषी या चाचणीच्या नादी लागतील काय? असल्यास किती संख्येने ज्योतिषी अपेक्षित आहेत कारण सांख्यिकीनुसार चाचणीसाठी आवश्यक अपेक्षित ज्योतिषांची संख्याही निश्चित करावी लागेल का?

३. काल आणि आज आमच्याकडे मुसळधार पाऊस पडेल असे वेधशाळेचे भाकित होते. वेदर.कॉमचा डॉपलर रडारही हेच सांगत होता परंतु एक टिप पावसाचा पडला नाही. (हाय रे कर्मा! गवताला पाणी देऊन आमच्या तोंडचं पाणी पळालं आहे.) आधुनिक विज्ञानाच्या भाकितांची ही गत असेल तर हजारो वर्षांपूर्वीपासून चालत आलेले आणि सध्याही त्यात फारसे काही बदल न झालेल्या तथाकथित शास्त्राला कोणत्या मोजमापावर तोलले जाईल?

हे सर्व असले तरी चाचणीचे स्वरूप आवडले. पुढील पाहणीस उत्सुक आहे.

माझ्या परीने उत्तरे

१)प्रयोगाचा निष्कर्ष हा, ज्योतिष्याच्या मदतीने काही प्रमाणात मुलांचे मतिमंद असणे/नसणे वर्तवले जाऊ शकते/शकत नाही असा असणार आहे. सामान्य अथवा थोड्याशा ढ मुलांना मतिमंद सिद्ध करणे ह्या चाचणीचा उद्देश नाही / ह्या चाचणीतुन ते शक्य नाही. त्यामूळे अशा मुलांना ह्यातुन धोका उद्भवत नाही.

२) दुसरा मुद्दा महत्वाचा असला तरी त्यात मला एक शंका आहे.
ज्योतिष्य मांडणे हे एक बहुमान्य तंत्र असल्याने त्यासाठी ज्योतिषांची काय गरज आहे? मुल मतिमंद होण्यासाठी कुंडलीत नेमके काय काय असावे लागते ह्याची यादी बनवुन ती संगणकात भरली म्हणजे झाले..संगणकच ज्योतिषी म्हणून भाकिते वर्तवायला वापरता येईल.

३) वेदर.कॉम ने पाऊस पडणार असे सांगितले आणि मुसळधार पाऊस पडला असे देखिल बर्‍याचदा पहाण्यात येते. म्हणुनच चाचणीमध्ये २०० कुंडल्या समाविष्ट केल्या आहेत.

पाऊस पडणार असे सांगितले

आणि पाऊस पडला तर नवल नाही. त्यासाठीच अद्ययावत यंत्रसुविधा वापरली जाते परंतु पाऊस पडेल असे सांगून पाऊस पडला नाही असे कितीवेळा होते ते कळायला हवे. मला वाटते की १००% सत्यता कधीच नसते. ६ इंच बर्फ पडेल असे भाकित असेल तर ६ च इंच पडतो असे सहसा होत नाही. तेव्हा वेधशाळेच्या भाकितात अधिक-उणे टॉलरन्स किती पाहिला जातो आणि जर पाहिला जात असेल तर कोणतीही साधने न वापरता (म्हणजे भिंग, पोपट, पंचांग ही अगदीच कुडमुडी साधने झाली ;-)) ज्योतिषाच्या भाकिताचा अधिक-उणे टॉलरन्स किती असावा?

माझी स्वतःचीच उदाहरणे सांगते -

१. गेल्या आठवड्यात तुरळक पाऊस सांगितला असता (आमच्या नशिबाने) दिवसभर मुसळधार पाऊस पडला. दिवस शुक्रवारचा, लक्षात आहे कारण इंडी-५००चा सराव धुवून निघाला.
२. २६ जुलै २००५ ला इतका प्रचंड पाऊस पडेल हे वेधशाळेचे भाकित मुळीच नव्हते. त्या पावसात आमची दैना झाली होती.
३. दोन वर्षांपूर्वी टेनिसीत प्रचंड गारांचा पाऊस झाला होता, त्या दिवशीही फक्त तुरळक विजा-पावसाचे भाकित होते, तेव्हाही आम्ही मरता मरता वाचलो होतो.

सामान्य मुलांना मतिमंद सिद्ध करणे असा उद्देश नाही याबाबत दुमत नाही परंतु या गोष्टीचे कंगोरे तपासून पाहायलाच हवेत. असो, धनंजयांचे उत्तर पोहोचले आहेच.

काही उत्तरे

१. घाटपांडे यांनी पालकांची लेखी परवानगी घेतली आहे, असे ते सांगतात.

या बाबतीत डेटा "डी-आयडेंटिफाईड" असावा. पत्रिका की मोघम-जन्मगाव आणि जन्मवेळ एवढेच दाखवते. मुलाचे नाव सांगत नाही. त्यामुळे कुठल्याही विवक्षित मुलाचा कुठल्याही विवक्षित पत्रिकेशी संबंध लावणे दुरापरस्त आहे. (म्हणजे पैकी कुठले मूल एखाद्या अत्यंत लहान गावात जन्माला आले असेल, तर त्या गावात जाऊन, तेथील जन्म-रजिस्टरमध्ये बघून त्या मुलाची ओळख मिळवणे शक्य आहे. मोठ्या गावांमध्ये [भारतात] एका दिवशीच्या जन्म-रजिस्टरमध्ये अनेक मुलांची नावे सापडतील. त्यांच्यापैकी पत्रिका कोणाची हे सांगणे शक्यच नाही. सामान्यपणे, खाजगी-हक्कास हा धोका नगण्य मानला जातो.)

२. वैद्यकाच्या संशोधनात ज्या प्रकारे तटस्थपणे भूमिका मांडण्यात येते, त्या चौकटीत प्रकल्प बांधला आहे. ज्योतिष्यांचे सहकार्य मिळवणे महत्त्वाचे हे निश्चित. ज्योतिषी-सहकारी किती हवेत ते तितके महत्त्वाचे नाही. ते सहकारी प्रशिक्षित आहेत ही बाब त्या क्षेत्रात मान्य असल्यास पुरे.

अनेक ज्योतिषी-सहकारी मिळाले आणि त्यांचे एकमेकांत तात्विक मतभेद झाले, तर प्राथमिक टप्प्यांत कळेल. त्याचे निराकरण त्याच वेळी करण्यास वाव आहे. अनेक ज्योतिषांचे वर्गीकरण एकत्रित करून विश्लेषण करावे, की प्रत्येक ज्योतिषी-सहकार्‍याचे वर्गीकरण वेगवेगळे विश्लेषित करावे, ते ज्योतिषी-सहकारी ठरवतील. दोन्ही प्रकारे गणित करता येते.

या बाबतीत ज्योतिषांशी संपर्क कसा साधावा, त्यांच्याशी सहकार्य कसे करावे, या बाबी माझ्या आवाक्याच्या बाहेर आहेत.

आणखी प्रश्न

हे दोन्ही प्रश्न घाटपांड्यांना -

१. ज्योतिषांनी त्यांना हा उपलब्ध करून दिलेला विदा खरा कसा मानावा?

(ज्योतिषी) सहकारी प्रशिक्षित आहेत ही बाब त्या क्षेत्रात मान्य असल्यास पुरे.

२. ज्योतिषी प्रशिक्षित आहेत याबाबत काही प्रमाणिकरण आहे काय? असल्यास कोणते आणि ते कोण ठरवते?

अवांतरः गुंडोपंतांना कुंडली पाहता येते असे वाचल्याचे आठवते... ;-) पहिला ज्योतिषी सहकारी मिळतोय का बघा!!

मी

अवांतरः गुंडोपंतांना कुंडली पाहता येते असे वाचल्याचे आठवते... ;-) पहिला ज्योतिषी सहकारी मिळतोय का बघा!!

वेळ नाही, त्यामुळे सध्या तरी ल. भाकर्‍या नकोत!

आपला
गुंडोपंत

उत्तरे


१. ज्योतिषांनी त्यांना हा उपलब्ध करून दिलेला विदा खरा कसा मानावा?


हा प्रश्न जातकाने ज्योतिषाला दिलेली जन्मटिपण खरे कशावरुन मानायचे? असा देखील होउ शकतो.
या केस बाबत वस्तुस्थिती अशी आहे की नारळीकरांनी केलेल्या आवाहनानुसार प्रथम मतिमंद मुलांच्या शाळेत अंनिसच्या काही स्वयंसेवकांनी जाउन तेथील प्रमुखांना विनंती केली. त्यानुसार त्यांनी पालकांना आवाहन करुन त्यांच्या सहीने जन्म स्थळ, जन्मतारीख ,जन्मवेळ ही माहीती असलेला एक फॉर्म म्हणजे आवश्यक असणारा विदा होय. हेच हुशार मुलांच्या बाबत लागू. आता जर कुणी असं विचारल कि पालकांनी दिलेली माहिती खरी कशावरुन? तर त्यांची सदसद विवेक बुद्धी हेच उत्तर आहे. व्यावसायिक वा प्रथितयश ज्योतिषी कुंडली तयार करताना जी गोष्ट गृहीत धरतात तीच या ठिकाणी लागु आहे.

२. ज्योतिषी प्रशिक्षित आहेत याबाबत काही प्रमाणिकरण आहे काय? असल्यास कोणते आणि ते कोण ठरवते?


यात प्रमाणीकरण असे काही नाही. पारंपारिक ज्योतिषाला / व्यावसायिक ज्योतिषाला असे काहीच सर्टिफिकिट लागत नाही. ज्योतिष पंडीत , ज्योतिषशास्त्री, होरामार्तंड, होराभुषण वगैरे उपाध्या खाजगी ज्योतिषसंस्था देत असतात. सविस्तर उत्तरासाठी येथे प्रश्न क्र ६१ वाचावा.
ज्योतिषाच्या प्रमाणिकरणाचा मुद्दा ज्योतिष वर्तुळात सुद्धा प्रलंबित आहे. येथे अभ्यासक्रम ठरण्यातच ख्ररी अडचण हा भाग वाचावा.

प्रकाश घाटपांडे

जातक आणि ज्योतिषी

हा प्रश्न जातकाने ज्योतिषाला दिलेली जन्मटिपण खरे कशावरुन मानायचे? असा देखील होउ शकतो.

जातकाने ज्योतिषाला दिलेले टिपण किंवा ज्योतिषाला तुम्ही दिलेले टिपण हा दोघांतील खाजगी मामला असेल तर प्रश्न नाही. येथे ही सार्वजनिक चाचणी असल्याने आलेल्या विद्याची विश्वासार्हता पटवणे हे यातील एक अंग राहते.

असो, पारंपरिक ज्योतिषाला प्रशस्तिपत्रक लागत नसले तरी रस्त्यावर बसून पोटापाण्याचा उद्योग करणारा आणि पंचतारांकित हॉटेलात बसून वर्तमानपत्रात जाहिराती वाटणार्‍या आणि एकही पैसा न घेता केवळ छंद म्हणून असे उद्योग करणार्‍या ज्योतिषांत फरक असावा असे वाटते. त्यापैकी कोणते ज्योतिषी या तथाकथित शास्त्राचे "भविष्य" ठरवणार आहेत हा मुद्दा कळीचा आहे.

प्रथमदर्शनी पाहता मला आपल्या चाचणींमध्ये त्रुटी दिसली. ज्योतिषाचे भविष्य निश्चित करण्यासाठी किती ज्योतिषी हवेत हे येथे नमूद नाही. हजारो वर्षे लोकांच्या मनावर जो पगडा आहे तो ४-५ ज्योतिषांच्या भाकितांनी निघून जाईल किंवा त्यांच्या सहाय्याने हे शास्त्रच नाही असे सांगता येणे शक्य वाटत नाही.

जाचक आणि ज्योतिषी


जातकाने ज्योतिषाला दिलेले टिपण किंवा ज्योतिषाला तुम्ही दिलेले टिपण हा दोघांतील खाजगी मामला असेल तर प्रश्न नाही


तरी देखील ज्या विदा वरुन ही जन्मकुंडलि तयार केली जाते तो विदा जर विश्वासार्ह नसेल आन् तरीही जर ज्योतिषाचे भविष्य बरोबर येत असेल तर? म्हणजे बंडूचा हातचा चुकला तरी गणीत मात्र बरोबर येते. चाचणीकरिता पालकांनी दिलेली माहितीवरच विसंबुन राहावे लागते. तरी देखील हे मान्य आहे कि चाचणी करिता अधिक काळजी घ्यायला हवी.

त्यापैकी कोणते ज्योतिषी या तथाकथित शास्त्राचे "भविष्य" ठरवणार आहेत हा मुद्दा कळीचा आहे.


खर तर ही भवितव्य ठरवणारी चाचणी नव्हेच . ही केवळ चाचपणी आहे. कोणते ज्योतिषी सहभागी होणार? कुणीही ज्योतिषी सहभागी झाले आणी कौल ज्योतिषशास्त्राच्या विरोधात गेला तरी "ही ज्योतिषाची परिक्षा झालि ज्योतिषशास्राची नव्हे" हा युक्तिवाद लागु होणारच आहे. ज्येष्ठ व जाणते ज्योतिषी यात सहभागी होणारच नाहीत हे मी जाणतो. प्रश्न क्रमांक ६२ चे पुनरावलोकन करावे.

प्रकाश घाटपांडे

काय चालु हाये

कितीक बी ज्योतीशी आले नी गेले. ज्योतिशाले काय बी कळत नस्ते.

तव्हा येच्यात टैम घालुन काय उप्योग.
जीवनामधी काय लिहलेले अस्ते हे फकस्त देवाले समजते.

ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा इचार करायमधी आपून टैम नै घालीत फटकन लिहून मोकळं :)

बाबूराव :)

बाबुराव!

बाबुराव
आता ल्वॉक टाईम घालवनारच ना. भविष्यातल काही सुधरतय का याची उत्सुकता असतेना ! मंग टाईम लागनारच. पन लै बेकार अस्तोय ह्यो नाद . आमची क्वॉलिज ची टर्म कॅन्सल झाली या नादात!
प्रकाश घाटपांडे

प्रकल्पाला शुभेच्छा !!!

संशोधन पत्रिकेप्रमाणे या कामाचे स्वरुप वाटत आहे. या संशोधनास मनःपुर्वक शुभेच्छा !!!
मतीमंद आणि सामान्य मती असणारे कुंडलीवरुन जर ओळखता येत असेल, काही निषकर्षावर पोहचता येत असेल तर ही निच्छितच चांगली गोष्ट आहे. नसता हे सर्व थोतांड आहे असे समजण्यास अधिक मदत होईल

फक्त याच की अन्य कोणत्या जोतिषविषयक चर्चेत वाचल्याचे आठवते की जन्मवेळ कोणती प्रमाण मानायची वगैरे या प्रश्नांचीही चर्चा झालेलीच असेल. तेव्हा श्री घाटपांडे आणि धनंजय यांच्या या संशोधनकार्यास आमच्या शुभेच्छा आहेतच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान कल्पना

फक्त याच की अन्य कोणत्या जोतिषविषयक चर्चेत वाचल्याचे आठवते की जन्मवेळ कोणती प्रमाण मानायची वगैरे या प्रश्नांचीही चर्चा झालेलीच असेल.

चाचणीच्या निकालांचे एक (वेग वेगळ्या जन्मवेळा वापरुन) 'सेन्सीटीव्हिटी ऍनालसीस' पण करता येईल. त्यामूळे संशोधनाच्या निष्कर्षांना अधिक बळकटी मिळेल.

कसं रे कोलबेरा !!!

वेगवेगळ्या वेळा वापरुन त्याच्या विश्लेषणावर शंका येईल. सत्यापासून संशोधन दूर जाईल.

१) समजा 'उपक्रमचा' जन्म सकाळी ८ वा ४५ मि. आणि १२ व्या सेकंदाला (रडण्याचा आवाज) जन्म झाला आहे. ग्रह, ता-यांची त्यावेळची अवस्था वगैरे हे सर्व यात आले आहे.

कुंडली आणि स्वभाव : उपक्रम नावाची एक वस्तू जर वरील वेळेला जन्माला आली तर....त्या व्यक्तीत उत्तम माहितीची देवाण घेवाण करण्याची क्षमता असते. लोकांच्या प्रतिसादाला प्रतिसाद देण्यासाठी त्यांना वेळ नसतो. ती माणसं हुशार, संवेदनशील वगैरे असतात. अशा व्यक्ती सूखी असतात.

वेळ बदलली ( ८ वा. ४६ मि. १२ सेकंद, ग्रह ता-यांच्या स्थानासहीत ) तर : उपक्रम नावाचा एक मठ्ठ माणूस, कोणतेही ज्ञान नाही. ही माणसं वेड्यासारखी वागतात. यांना सूख नसते.

म्हणुन वेगवेगळ्या वेळा वापरल्यामुळे अशा निष्कर्षांना बळकटी येईल या बद्दल माझ्या मनात शंका आहे.

बळकटी

अहो सर तेच तर म्हणतोय ना मी. उपक्रमाच्या ह्या वेगवेगळ्या जन्मवेळा धरुन वेगवेगळी भाकिते मांडा त्यातले कुठले सत्याच्या अधिक जवळ जाते ते पाहा. हाच प्रयोग मिपा आणि मनोगताच्या कुंडल्यांवरही करा आणि त्यांची भाकिते कुठल्या वेळेला जन्मवेळ मानल्याने अधिक जवळ ते जातात ते पहा.

ह्यालाच अर्थशास्त्रात 'सेंन्सिटीव्हीटी ऍनालेसिस' म्हणतात. म्हणजेच, तुमच्या अभ्यासाचे निकाल किती बळकट (रोबस्ट) आहेत हे पडताळून पहाण्यासाठी प्रकल्पात वापरलेली गृहीतके पुढे मागे करुन त्याच चाचण्या घेणे.

समजा भाकिते आणि वस्तुस्थिती ह्यांचा परस्पर संबध नाही असा निष्कर्ष निघाला आणि हा निष्कर्ष वेग वेगळ्या जन्मवेळा वापरुन पडताळून बघीतला तर त्याला बळाकटी येणार नाही का?

मग हरकत नाही !!!

भाकिते आणि वस्तुस्थिती ह्यांचा परस्पर संबध नाही असा निष्कर्ष निघाला आणि हा निष्कर्ष वेग वेगळ्या जन्मवेळा वापरुन पडताळून बघीतला तर त्याला बळाकटी येणार नाही का?
हम्म, थोडा सहमत आहे.

पण खरं सांगू का कोलबेरा, फलजोतिषांच्या भाकितावर आमचा विश्वासच नाही. एकाच वेळेस (क्षणाला ) जन्मलेली माणसे निसर्गत: सारखे स्वभावाची किंवा त्यांच्याबद्दलची भाकिते सारखीच असतील का ? त्याचे उत्तर नाही असेच वाटते. अर्थात असे संशोधन करणा-यास आपण विरोध करत आहोत असा अर्थ कृपया कोणी घेणार नाही, असे वाटते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शुभेच्छा

तेव्हा श्री घाटपांडे आणि धनंजय यांच्या या संशोधनकार्यास आमच्या शुभेच्छा आहेतच

असेच म्हणतो

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणरे आणि न समजणारे

धनंजय मॊडेल

यापुर्वी पाश्चात्य जगात डबल ब्लाईंड टेस्ट ऑफ ऍस्ट्रॉलॉजी ही शॉन कार्लसन ने केली होती. पण भारतीय ज्योतिष हे भाकितात्मक आहे. धनंजय यांनी तयार केलेले मॉडेल हे भारतीय ज्योतिषा साठी आहे. हे मॉडेल अगोदरच जयंत नारळीकर , पुणे विद्यापीठ संख्याशास्त्र विभागाचे निवृत्त प्रा. सुधाकर कुंटे व अंनिस चे नरेंद्र दाभोलकर यांना दिले होते. प्रा सुधाकर कुंटे यांचे मते हे टिपीकल स्कॉलर मॉडेल आहे. [ हे ते उपहासात्मक रित्या म्हणाले नाहीत] १६ एप्रिल २००८ रोजी यावर चर्चा होउन पायलट स्टडी मधील मतिमंद / हुषार हा सोपा पर्याय घ्यायचे ठरले. तसे तेच अगोदर ठरले होते. पण १२ मे रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर जो प्रतिसाद आला त्याचा कल पहाता 'सांगता येत नाही 'असा पर्याय सुद्धा देण्यात येणार आहे.
प्रकाश घाटपांडे

सद्भावना आणि उलट चाचणी

श्री. घाटपांडे आणि श्री. धनंजय यांच्या या 'भारतीय फलज्योतिष : संख्याशास्त्रीय चिकित्सा' कसोटीस यश लाभावे ही मनोमन इच्छा आहे.
भले ती कोणत्याही बाजूने निकाल देवो. पण शास्त्रशुद्ध चिकित्सा केल्याने अनेक अनिर्णित प्रश्नांची उत्तरे माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला मिळू शकतील.

वरील चाचणी निष्पक्ष असली तरी ज्योतिर्विदांना ती 'फलज्योतिष हे शास्त्र नाही ' हे गृहित धरून केलेली वाटत आहे. ती फलज्योतिषाला खोटे पाडण्यासाठी तयार केलेली आहे, ज्योतिषाबद्दल खरे खोटे असे काटा-छापा करून ठरवता येत नाही इ. आक्षेप आले आहेत.
त्याऐवजी 'फलज्योतिष हे शास्त्र आहे' असे गृहित धरून एक आधुनिक कसोटी करता येईल.
खालील पद्धतीने या कसोटीचा विचार करता येऊ शकेलः

पहिली पायरी :
बुद्धीमत्ता आणि मतिमंदता यांच्या ज्योतिषशास्त्रीय कसोट्या काय आहेत? असा प्रश्न किमान २०० मान्यवर ज्योतिषाचार्यांना विचारण्यात यावा. त्याचे उत्तर नि:संदिग्ध असावेच असा आग्रह धरू नये.
एक तथाकथित (उदा. फलज्योतिषातले काहीही माहित नाही असा मी) सांगेल की राहू आणि गुरू यांची पंचम स्थानातली युती असेल आणि तिच्यावर शनीची दृष्टी असेल तर ती व्यक्ती मतीमंद असते. आणि / अथवा चंद्र आणि मंगळ यांची प्रथम/अष्टम/नवम स्थानात युती असेल आणि चतुर्थ स्थानात गुरू असेल तर ती व्यक्ती हुशार असते... वगैरे. यात कोणी किती अंशांची युती असते तेही सांगेल.
असा सर्व विदा गोळा करून त्यात त्यांचे कितपत पटते ते पहावे. यात ज्योतिर्विदांचीही मदत घ्यावी.

जी उत्तरे सर्वात जास्त वारंवारतेची आहेत (बेल शेपचा अत्युच्च बिंदू) त्यांना एकत्र करून काही सम्यक ग्रहस्थिती ठरवाव्यात. परंतु जर ही वारंवारता यादृच्छिक स्वरूपाची दिसली तर फलज्योतिर्विज्ञान खोटे आहे हे स्पष्ट होईल.
(हा सर्व विदा यादृच्छिक उत्तराप्रमाणे सावळा गोंधळ नसेल असे वाटते. कारण एकाच मानदंडाप्रमाणे ज्योतिषी ज्योतिर्विद्या शिकत असतात असा सर्वसाधारण समज आहे. कोणत्याही 'शास्त्राचा' मूलभूत पाया एकच असतो.)
या सम्यक ग्रहस्थितींचा लिखित दस्तैवज बनवून त्यावर त्या २०० ज्योतिर्विदांची मान्यता घ्यावी. काही अधिक उणे भासत असेल तर त्याचाही विचार करून अंतिम निकष ठरवावेत.

हे निकष वापरून एक संगणक आज्ञावली लिहावी जी केवळ जन्मगाव आणि जन्मवेळ दिली असता ती व्यक्ती बुद्धीमान (हुषार/ सामान्य बुद्धीमतेची) अथवा मतिमंद आहे ते सांगू शकेल.

दुसरी पायरी:
यानंतर ५० मुलांच्या / व्यक्तींची खरी जन्मवेळ आणि जन्मठिकाण घेऊन ते या आज्ञावलीला पुरवावे. तसेच या जन्मवेळेच्या अधिक उणे १० मिनिटे* (दर १ मिनिट ) २० जन्मवेळा आणि उणे अधिक १ अक्षांश -रेखांश* (दर १० मिनिट) या संगणक प्रणालीला पुरवाव्यात (जेणेकरून जन्मवेळेबाबत आणि जन्मगावाबाबत वाद होणार नाही. * हे अधिक उणे किती असावे तेही ज्योतिषांना विचारून ठरवता येईल. जसे - नक्षत्र/चरण इ.)
अशा रितीने संगणक आज्ञावली प्रत्येक कुंडलीसाठी २१ * ७*७ = १०२९ उत्तरे देईल. त्या उत्तरांपैकी केवळ ५१% पेक्षा जास्त शक्यतेचे उत्तर (मतिमंद आहे/ नाही) ग्राह्य धरावे. शक्यता ४९-५१% असल्यास ती कुंडली बाद ठरवावी. आता आज्ञावलीची ग्राह्य उतरे आणि मूळ व्यक्तीचा बौद्धिक स्तर यांची सांगड घालून किती उत्तरे बरोबर आली ते पहावे.

यामुळे मूळ निकषांपैकी कोणते बरोबर आणि कोणते चूक ठरले तेही स्पष्ट होईल.
कोणत्याही निकषांधारे
ही उत्तरे ९०% पेक्षा जास्त लागू पडली तर तेवढेच निकष ग्राह्य मानून इतर बाद ठरवावेत. ते संगणक आज्ञावलीतून काढून टाकावेत.

तिसरी पायरी :
आता उर्वरित निकषांच्या आधारे १००० मुलांच्या / व्यक्तींची खरी जन्मवेळ आणि जन्मठिकाण घेऊन ते या आज्ञावलीला पुरवावे. आज्ञावलीची ग्राह्य उतरे आणि मूळ व्यक्तीचा बौद्धिक स्तर यांची सांगड घालून किती उत्तरे बरोबर आली ते पहावे.

अशा प्रकारची चाचणी मुळात फलज्योतिषाच्या बाजूने झुकलेली असल्याने तिला ज्योतिर्विदांचा विरोध व्हायचे कारण नाही. त्यांना त्यांचे ज्ञान सिद्ध करण्याची पूर्ण संधी या चाचणीद्वारे देता येईल.

ही उत्तरे ९०% पेक्षा जास्त लागू पडली तर ज्योतिष हे शास्त्र आहे असे मान्य करावेच लागेल.
७०% पेक्षा जास्त बरोबर आली तर घाटपांडे/नारळीकर/दाभोलकर प्रभृतींनी ज्योतिष हे शास्त्र असावे पण त्यात अजूनही त्रुटी आहेत असे मान्य करून त्या भरून काढण्यासाठी स्वतः पुढाकार घेऊन इतरांच्या साहाय्याने अभ्यास करावा, हीण बाजूला काढावे आणि 'आधुनिक भारतीय ज्योतिर्विज्ञान कोश' नामे ग्रंथ लिहून आधुनिक जोतिषशास्त्राचा पुरस्कार करावा. त्यामुळे खूप फायदे होतील.

सर्व निकषांधारे ७०% पेक्षाही कमी उत्तरे बरोबर आली तर मात्र ज्योतिष हे थोतांड आहे हे ज्योतिषांनी मान्य करावे. करायलाच पाहिजे असे नाही. पण माझ्यासारखे सर्वसामान्य लोक ते समजतीलच.

विसुनानांची चाचणी


त्याऐवजी 'फलज्योतिष हे शास्त्र आहे' असे गृहित धरून एक आधुनिक कसोटी करता येईल.
खालील पद्धतीने या कसोटीचा विचार करता येऊ शकेलः


अशी चाचणी ज्योतिषाच्या अंतर्गत वर्तुळातच झाली तर ते अधिक चांगले पण तसे होणार नाही कारण पुन्हा प्रश्न क्रमांक ६२
विसुनानांनी तिन्ही पायर्‍या या वि.म दांडेकरांनी मांडल्या होत्या. पण मला त्या पटल्या नव्हत्या.
फलज्योतिषातील शास्त्रत्व तपासण्यासाठी एम्पीरिकल संशोधन करुन या वादाचा निर्णय लावता येईल अशी आशा पुष्कळ बुद्धीवादी लोकांना वाटते. परंतु हे शास्त्र अशा संशोधनासाठी निरुपयोगी आहे असे आम्हास वाटते. याची कारणे :-
१) या शास्त्रातल्या फलित दर्शवणाऱ्या पॅरामीटर्सची संख्या अगणित बनत जाते. शिवाय पूर्वसंचितासारखे अज्ञेय पॅरामीटर्स त्यात आहेत.
२) ग्रहस्थितीची आयडेंटीकल पुनरावृत्ती कधीच होत नसते. त्यामुळे पुन:प्रत्यय घेणे शक्य नसते. म्हणजे हे संशोधन प्रत्यक्षात आणणे शक्य नाही.
३) सौख्य व स्वभाव विश्लेषण या गुळमुळीत अथवा सापेक्ष बाबींमध्ये एम्पीरिकल संशोधन कसे आणणार? त्यासाठी निसंदिग्ध बाबी घेतल्या पाहिजेत उदा. मृत्यू, मोठे आजारपण, मोठा अपघात, शारिरिक व्यंग, इ.
४) पुरेसा डाटा मिळणं व्यक्तिगत पातळीवर शक्य होत नाही. वि.म दांडेकरांनी संख्याशास्त्रीय निष्कर्ष काढण्याइतपत डाटा मिळाला नाही असे सांगितले होते. परदेशात पुन:पुन: एम्पीरिकल संशोधने केली गेली. पण त्यातून फारसे काही हाती आले नाही. फलज्योतिषाच्या समर्थन करणाऱ्यांविरुद्ध ते निष्कर्ष गेले की ते संशोधनात त्रुटी काढतात. गोकॅलीनच्या संशोधनाचा प्रचलित फलज्योतिष, शास्त्र म्हणून सिद्ध होण्यास काहीही उपयोग झाला नाही.
त्यानंतरही अनेक फलज्योतिषी व संशोधक यांच्यात बऱ्याच चर्चा झाल्या. प्रयोगही झाले. हे प्रयोग कुठल्याही भाकितांशी संबंधीत नव्हते. कारण संशोधनासाठी घेतलेले पाश्चात्य फलज्योतिष हे भाकितांशी संबंधीत नसतेच. ते स्वभाव विश्लेषण, प्रवृत्ती, नैसिर्गिक कल वा पिंड यांचा पत्रिकेशी परस्पर संबंध या अनुषंगाने असते. अगदी अलिकडे गॅरी फिलिप्सन या ब्रिटीश पत्रकाराने लिहिलेल्या ' अस्ट्रॉलॉजी इन द ईयर झिरो ` या सप्टेम्बर २००० साली प्रकाशित झालेल्या पुस्तकाच्या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले. डेनिस एल्वेल या ब्रिटीश ज्योतिषाने भले थोरले लेख लिहून प्रतिवाद केले. त्याचे खंडन ज्योतिष चिकित्सक जॉफ्रे डीन, प्रो. इव्हान केलि, आर्थर माथर व रुडॉल्फ स्मिट यांनी केले. अखेर हा वाद जाने २००२ मध्ये संपला. डेनिस तपासता येईल अशी कुठलीही टेस्ट सुचवण्यास असमर्थ ठरला. त्याच्या मते जातकाचे समाधान हे महत्वाचे तसेच ग्रहयोगाचा साकल्याने विचार झाला पाहिजे. अशी सर्वसमावेशक संख्याशास्त्रीय चाचणी घेणे संशोधकांना अशक्य आहे. म्हणजे पुन्हा जैसे थे परिस्थिती

प्रकाश घाटपांडे

ज्योतिर्विद घाटपांडे

यांनी आपली फलज्योतिष चिकित्सकाची भूमिका क्षणभर बाजूस ठेवून वरील चाचणीकडे पहावे. ते स्वतःच एक जिज्ञासू फलज्योतिषी होते(/आहेत?). त्यामुळे त्यांनी अभ्यासलेल्या ज्योतिषविषयक ग्रंथांची नावे त्यांना नक्कीच माहित असावीत. सर्वसाधारणपणे सहदेव-भाडळी या स्वरूपाच्या ग्रंथांना शास्त्रशुद्ध म्हणता येणार नाही. केवळ कल्याणवर्म्याचे 'बृहत् पराशर होराशास्त्र' आणि तद्भव इतर ग्रंथांना (साभार : विकी) प्रमाणभूत मानून एक ग्रंथसूची तयार करता येईल. खरे तर वरील चाचणीसाठी ज्योतिर्विदांचीही गरज नाही. श्री. धनंजयांसारखे संस्कृतचे काही अभ्यासू वि़द्वान अशा ग्रंथसूचीतून समान असलेली सूत्रे एकत्र करून केवळ 'मतीमंद अथवा बुद्धीमान' या निर्णयासाठी लागणारे होराशास्त्रीय निकष वेगळे काढू शकतील.

असे झाले तर निदान 'मतीमंद अथवा बुद्धीमान' या एका अणि एकाच निर्णयापुरते तरी फलज्योतिष / होराशास्त्र खरे ठरते का? ते चाचपता येईल. याचप्रमाणे मग नैसर्गिक आपत्तींबाबत वगैरे चाचपणी करता येईल. (मानवी शरीर आणि निसर्ग - यांच्याबाबत चाचणी केली तर ती निरपेक्ष ठरेल असे वाटते.)

अनेक ज्योतिषी हे ढोंगी आहेत हे खरे. पण अनेक डॉक्टरही 'क्वॅक्स' असतात.त्यांच्यामुळे आधुनिक वैद्यक खोटे ठरत नाही. त्याचप्रमाणे 'काही ज्योतिषी ढोंगी असतात की ज्योतिषच एक ढोंग आहे?' या प्रश्नाचे उत्तर मिळेल.

इतरत्र झालेल्या चाचण्या 'गुळमुळीत अथवा सापेक्ष बाबींमध्ये 'केलेल्या होत्या. दांडेकरांची चाचणीही दोन पत्रिकांच्या संबंधांवर अवलंबून होती. आपण केवळ एका आणि एकाच व्यक्तीच्या पत्रिकेला या निकषांवर घासून पाहू.

म्हणून म्हटले की विश्वास नसला तरी क्षणभर विश्वास ठेवून अशी चाचणी करण्यास काय हरकत आहे?

+१

मी तर सुरुवातीपासुन हेच म्हणतोय. ज्योतिषी बायपास करुन टाका. ह्या अभ्यासाच्या मर्यादित कक्षांमध्ये संशोधकांना काही त्या मुलांचे संपूर्ण भविष्य काढायचे नाही. मूल मतिमंद होणे ह्यासाठी नेमक काय क्रायटेरिया आहे तो संदर्भ ग्रंथ चाळून सरळ संगणकात भरावा. आणि मग संगणकाला प्रत्येक कुंडलीवर भाकित वर्तवु दे.

अर्थात इथे हे वाचल्यावर ते वाटते तितके सोपे नाही हे पटते पण त्यासाठी १-२ ज्योतिषांचा सल्ला घेउन मग क्रायटेरिया ठरवता येईल.

तटस्थ : काय गृहीत धरलेले आहे

वरील चाचणी निष्पक्ष असली तरी ज्योतिर्विदांना ती 'फलज्योतिष हे शास्त्र नाही ' हे गृहित धरून केलेली वाटत आहे. ती फलज्योतिषाला खोटे पाडण्यासाठी तयार केलेली आहे, ज्योतिषाबद्दल खरे खोटे असे काटा-छापा करून ठरवता येत नाही इ. आक्षेप आले आहेत.

याविषयी चर्चा भाग २ मध्ये दिलेली आहे. (दुवा)
सारांश : "कुंडल्यांचा मतिमंदतेशी संबंध आहे" किंवा "कुंडल्यांचा मतिमंदतेशी संबंध नाही" अशी कुठलीही प्राथमिक मनःस्थिती असली तरी गणितात फरक पडत नाही.

ही चाचणी केवळ इतपतच आहे : आजकालच्या पद्धतीने कुंडलीचे वर्गीकरण वस्तुस्थितीशी कितपत जुळते.

"हे शास्त्र आहे" किंवा "हे शास्त्र नाही" याबाबत ही चाचणी नाही. "शास्त्र म्हणजे काय?" याबद्दल निकष ठरवल्यानंतर ती चाचणी घेता येईल.

बुद्धीमत्ता आणि मतिमंदता यांच्या ज्योतिषशास्त्रीय कसोट्या काय आहेत? असा प्रश्न किमान २०० मान्यवर ज्योतिषाचार्यांना विचारण्यात यावा. त्याचे उत्तर नि:संदिग्ध असावेच असा आग्रह धरू नये. ...युती...
तुमचे म्हणणे बरोबर आहे. असाच काही विदा गोळा करण्याबाबत प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात सांगितलेले आहे. प्रकल्पाचे उद्दिष्ट्य क्र. ३ असेच आहे.

परिपूर्ण चाचणी पद्धत्

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. विसुनाना यांनी सुचवलेली चाचणी पुनःपुन्हा वाचली. त्यात कोणतीही उणीव दिसली नाही.त्यांनी सर्व शक्यतांचा विचार केला आहे.ज्योतिषांना तर अशा चाचणीला विरोध करताच येणार नाही. कारण मतिमंदतेच्या संदर्भातील ग्रहयोग कोणते हे ज्योतिषांनीच ठरवायचे आहे."व्यक्तीच्या जन्मकुंडली वरून तिच्या बुद्धिमत्तेचे काहीही निदान करणे शक्य नाही " असे जर ज्योतिषांनी सांगितले तर फलज्योतिष मोडीत निघते."अमक्या नक्षत्रावर जन्मलेली व्यक्ती बुद्धिमान असते असे अनेक ज्योतिषी सांगत असतात.
खरे तर श्री. विसुनाना यांनी सुचवलेल्या या चाचणी पद्धतीने ज्योतिषांनी स्वतःच आपल्या शास्त्राची चिकित्सा करावी.

हे उत्तम


खरे तर श्री. विसुनाना यांनी सुचवलेल्या या चाचणी पद्धतीने ज्योतिषांनी स्वतःच आपल्या शास्त्राची चिकित्सा करावी

.
हे उत्तम http://mr.upakram.org/node/1246#comment-20593 येथे तसे सुचित केले आहेच.
१ जुन २००८ ला भारत इतिहास संशोधक मंडळात झालेल्या बृहन्महाराष्ट्र ज्योतिष परिषदेच्या व्याखान मालेत शेवटी नंदकिशोर जकातदार म्हणाले ," आम्ही मतिंदत्वाबाबतचे दहाच नियम देउ. ते नियम त्यांनीच कुंडल्यांना लाउन पहावेत. आम्ही नियमांच्या चाचणीला तयार आहोत. नारळीकर , संख्याशास्त्राचे कुंटे सर व आम्ही पण अशी चाचणी घेउ . यातील संख्याशास्त्रिय चाचणीचा निकाल हा दाभोलकरांनी मानला पाहिजे. अन्यथा आम्ही दाभोलकरांची गाढवावरुन धिंड काढू"
या वाक्यानंतर प्रचंड टाळ्या.
भानावर आल्यावर जकातदार यांनी दाभोलकरांची माफी मागितली.

प्रकाश घाटपांडे

दाभोलकरांची गाढवावरुन धिंड

मला वाटते घाटपांडे इथे दिशाभूल करत् आहेत. दाभोळकरांना "अशी चाचणी मान्य आहे का?" असा प्रश्न सभेतील संतप्त उपस्थितानी विचारला त्यावर दाभोळकरांची दातखिळ् बसली. त्यावर जकातदार वरील् प्रमाणे बोलले. जकातदारांनी माफी मागितल्याचे मला स्मरत नाही.

स्मरण

जकातदारांनी माफी मागितल्याचे मला स्मरत नाही.

कार्यक्रमानंतर मागितली. मी तिथे हजर् होतो. जकातदार हे सभ्य आहेत. त्यात कमी पणा वाटण्याचे कारण नाही. माहोल मध्ये ते तसे बोलले.

मला वाटते घाटपांडे इथे दिशाभूल करत् आहेत.

कार्यक्रमाची व्हिडिओ जकातदारांकडे आहे.
प्रकाश घाटपांडे

मजकूर संपादित. वैयक्तिक स्वरूपाचे प्रश्न खरडवही किंवा व्य. नि. तून विचारावे.

ह्यातनं काहीही साध्य होणार नाही

असे वाटते.
अर्थात असे प्रकल्प राबवूच नये असे माझे मत नसून त्यातून जी काय फलनिष्पत्ती होईल ती कोण आणि किती स्वीकारेल ह्याबद्दल मनात शंका आहे. त्यामुळे केलेले परिश्रम फुकट जातील ह्याची चिंता वाटते.
कुणाचाही विश्वास/अंधविश्वास इतक्या सहजासहजी नष्ट होणे कठीण आहे.
तरीही आपल्या प्रयत्नाला सलाम आणि प्रकल्पाला शुभेच्छा!

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

शुभेच्छा...

धनंजय राव, प्रकाशराव ह्यांना मनापासुन शुभेच्छा.
आणि हो, ह्याचे(चाचणीचे) निकाल कधी, कुठे प्रकाशित होणार आहेत, ते ही कळवलत तर बर होइल.
(माहिती जालावर कुठे पाहता येतील हे कळवलत तरी पुरे.)

जन सामान्यांचे मन

+१

माझ्यापण शुभेच्छा!

एक(च) उत्सुकतेपोटी प्रश्नः जर यात पत्रिकांवर आधारीत भाकीत हे सांख्यिकीच्या आधारे खरे ठरले तर अनिंस काय मान्य करणार? उलट झाल्यास काहीच प्रश्न नाही!

अनिर्णायक चाचणीही होऊ शकते

कुठल्या निकषांवर चाचणी "अनिर्णायक" म्हणून घोषित करावी याचे गणित करता येते (भाग २ बघावा) - केवळ त्याची कल्पना आधी असली म्हणजे झाले.

सर्व निकष चाचणीच्या मुख्य आकडेमोडीच्या आधी ठरवलेले असणे महत्त्वाचे आहे.

होय


पत्रिकांवर आधारीत भाकीत हे सांख्यिकीच्या आधारे खरे ठरले तर अनिंस काय मान्य करणार?


याचे उत्तर होय असे दाभोलकरांनी पत्रकार परिषदेत दिले आहे.
प्रकाश घाटपांडे

शुभेच्छा

तुमच्या या सामायिक प्रकल्पाला शुभेच्छा!

ही चाचणी आधी एक प्रशिक्षण देते असे दिसते आहे - ज्यात त्या समूहातील बिंदूंचा (कुंडल्या आणि त्यांचे "निर्देशक" फलित म्हणजे "मतिमंदता आणि मतिमंदता नसणे") यांचा अभ्यास करता येतो, ज्या अभ्यासानंतर समूहातील बाकीच्या बिंदूंबद्दल निर्णय घेणे सोयीचे जाऊ शकते. जर १० हून अधिक कुंडल्या या अभ्यासासाठी मिळाल्या तर अधिक चांगले झाले असते असे वाटते, परंतु तसे नाही तरीही काही ठळक गोष्टी मतिमंदत्वाच्या कदाचित निर्देशक म्हणून वेगळ्या अशा या कुंडल्यांमधून दिसल्या पाहिजेत. आणि "पुरेसा डाटा मिळणं व्यक्तिगत पातळीवर शक्य होत नाही" हे घाटपांडे म्हणतात तेही मान्य होण्यासारखे आहे.

कोलबेर यांनी म्हटल्याप्रमाणे ज्योतिष्यांना बाद करणे हे फक्त अनेक ज्योतिष्यांनी या प्रकल्पास आधी मतिमंदत्वाच्या निकषांचा पुरवठा केल्यास करता येऊ शकते असे वाटते.

 
^ वर