महाराष्ट्र ज्योतिष परिषदेच्या विचारार्थ,

“फलज्योतिषाचा शास्त्रीय आधार तपासणार” – डॉ. नारळीकरांचा पुढाकार. सर्व प्रकारच्या ज्योतिषांना प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन!

या वार्तेवर माझे विचार फलज्योतिष शास्त्रींच्या या परिषदेच्या चर्चा सत्रात विचारार्थ मांडत आहे.

फल ज्योतिषाबद्दल जनसामान्य लोकांत संशय व भ्रम उपस्थित करून ज्योतिषशास्त्राला बदनाम करण्याची युक्ती अंनिस सारख्या संस्था वारंवार करत असतात. अंनिसने सुचवलेली तपासणी प्रक्रियाच पुढे करून त्यांचा डाव त्यांच्यावर उलटवणे आपल्याला शक्य आहे. त्यासाठी परिणामकारक व कायमचा तोडगा शोधण्यासाठी आपण इथे उपस्थित राहून विचार करणार असलो तर खालील प्रस्ताव मांडू इछितो.
1. अंनिस व त्यांच्या समविचारांच्या लोकांनी पोलिसी खाक्याने हे कुंडल्यांची तपासणी करण्याचे ठरवल्याने तसे करण्याचा त्यांचा अधिकार व योग्यता हा प्रश्न पुढे करून अशी तपासणी करण्याचे परिषदेने मान्य न करणे अगदी स्वाभाविक आहे. तथापि सामान्य जनांमधे आपल्या ज्योतिषशास्राच्या कार्याबद्दल आस्था कायम राहावी, त्यांच्या भावना व श्रद्धेला तडा जाऊ नये. लोकांची मनोधारणा ज्योतिषशास्त्राच्या विरोधात जाणार नाही, याची खबरदारी घेण्याची जबाबदारी परिषदेवर आहे.त्यामुळे अशी तपासणी करण्याचे आव्हान परिषदेला टाळून चालणार नाही. नाही तर विरोधकांनी लढाई न करताच विजय मिळवल्यासारखे होईल. भविष्यकाळात ते आणखी कुरापती काढण्याला उद्युक्त होतील. हे परिषद नाकारू शकणार नाही.
2. प्रस्ताव –
अ) या पुढे अंनिसने 'तपासणी 'असा शब्द न वापरता 'एकत्रितपणे हाती घेतलेले शोधकार्य' असा उल्लेख सर्वत्र व नेहमी करण्याचे बंधनपूर्वक मान्य करावे.
आ) परिषदेतर्फे सर्व संस्थांच्या ज्योतिषींना प्रतिनिधित्व मिळेल अशा संख्येचा संघ तयार करावा. त्याच प्रमाणे अंनिसच्या बाजूने ज्यांनी ज्योतिष शास्त्राचा अभ्यास केलेला आहे पण काही कारणाने त्या शास्त्राला न मानणाऱ्या व अंनिसच्या विचाराने प्रेरित अशा तितक्याच प्रतिनिधींना उपस्थित करावे. आता दोन्हीकडून ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक प्रतिनिधी असल्याने परिषदेची शास्त्राच्या मूलभूत तथ्यांची प्रत्यक्षात शहानिशा (तपासणी नव्हे) करण्यास हरकत नसावी.
इ) अंनिसला ही अट मान्य होईल तर चांगलेच. तथापि, त्यांनी तसे मानायला नकार दिला (तेच जास्त शक्य आहे) तर परिषदेने आपणहून अंनिसने सुचवलेली कसोटी आपल्यातर्फे राबवावी. त्यामुळे लोकांच्या आपेक्षांची पूर्तीही होईल व अंनिस कशी अडेल तट्टू आहे, याचा प्रत्यय ही लोकांना येईल. ज्योतिषशास्त्राची महानता लोकांना पटवून देण्याला परिषदेला आयतीच संधी मिळेल.
ई) अंनिस मागे हटली तर – १) परिषदेने पुढाकार घेऊन १०० मंदमती किंवा सव्यंग व्यक्तींच्या वेगळ्या कुंडल्या मिळवाव्यात. त्या पत्रिकांमधून ग्रहस्थिती व ज्योतिषशास्त्र पध्दतीच्या अन्य आडाख्यांवरून एक सर्वमान्य कोष्टक करावे. त्यामधून जमवलेल्या कुंडल्यांचा त्या कोष्टकाशी कसा मेळ बसतो, ते दाखवून देण्याचे कार्य करण्याचे घोषित करावे. तसे करत असताना काही कुंडल्या या आडाख्यांशी न जुळणाऱ्या आढळल्या तर त्यांचे स्पष्टीकरण ही करून दाखवले जाईल असे ही प्रसिद्ध करावे. २) त्या कुंडल्या ज्या व्यक्तींच्या होत्या त्यांची नावे व शक्य झाल्यास त्या सव्यंग व्यक्तींना प्रसारमाध्यमांसमोर प्रत्यक्ष उभे करून उत्तर द्यावे. म्हणजे परिषदेने जमवलेल्या पत्रिका ज्योतिषांनी आपल्या मनाने बनवलेल्या आहेत असा आक्षेप विरोधकांना घेता येणार नाही.
उ) लाजेकाजेस्तव जर अंनिसने एकत्रित होण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली तर त्यांच्या तर्फेच्या नेमलेल्या ज्योतिष शास्त्रींना परिषदेने उभे केलेले साक्षी पुरावे कसे अशास्त्रीय, तकलादू व भ्रामक आहेत ते साधार सिद्ध करावेच लागेल. शिवाय त्यांच्या त्या वक्तव्यावर परिषदेला प्रत्यावाद करायला वाव मिळेल. शिवाय अंनिस बावबतचे पुढील ध्येय धोरण ठरवता येईल.
ऊ) या प्रस्तावामुळे अंनिसचे नेते व कार्यकर्ते, थोर शास्त्रज्ञ, शैक्षणिक संस्था मधे पडू शकत नाहीत हे ही आपोआप सिद्ध होईल.
ए) ज्योतिष परिषदेला आवश्यक मान व दरारा मिळवण्यासाठी व पुढे तो तसाच राखण्यासाठी अशा तऱ्हेच्या शोधकार्याला वेगवेगळी क्षेत्रे निवडून वाहून घेणे भाग पडेल. एक सांघिक वेळापत्रक आखून, महाराष्ट्रभरातील वेगवेगळ्या ज्योतिषशास्त्राचे शिक्षण देणाऱ्या संस्थांतर्फे अशा तर्हेचे शोधकार्य करून त्याचे काय पडताळे आले, हे साधार दाखवून देण्याची संधी प्राप्त होईल. न जाणो या शोधकार्याला अंनिसच्या तर्फे ज्योतिषशास्त्राचे काम पाहाणारेही आपणहून साद देतील.
ऐ) अंनिस व परिषद एकत्र येऊन शोधकार्य करू इच्छित असतील तर सध्या आवाहन देणाऱ्या थोर व्यक्ती व शैक्षणिक संस्थांचा योग्य मान राखला जावा यासाठी त्यांची व परिषदेतर्फे परस्परांच्या सहमतीने ठरवलेल्या व्यक्तींचे एक मंडळ शोधकार्याचा ऑफिशियल निर्णय घोषित करण्यास बांधिल राहतील.

महाराष्ट्र ज्योतिष परिषदेच्या विचारार्थ,

शशिकांत ओक

लेखनविषय: दुवे:

Comments

यात या प्रयोगाचा फोलपणाही आहेच.

लेखन वाचले. बरेचसे पटले. काही नाही पटले.
शिवाय त्यावर बरेच विचारही सुचले.

फल ज्योतिषाबद्दल जनसामान्य लोकांत संशय व भ्रम उपस्थित करून ज्योतिषशास्त्राला बदनाम करण्याची युक्ती अंनिस सारख्या संस्था वारंवार करत असतात.
खरे आहे, मान्य आहे. असे ते करत असतात.
त्यांना काही इतर कामे नाहीत. फुकट मिळणार्‍या प्रसिद्धीच्या सोसापायी लष्करच्या भाकर्‍या भाजायला काही लोकही तयार आहेत. मग काय होणार?
लोकांची मनोधारणा ज्योतिषशास्त्राच्या विरोधात जाणार नाही, याची खबरदारी घेण्याची जबाबदारी परिषदेवर आहे.

छे! छे! इतके काही ओढवून घेण्याची गरज नाही अंगावर. परिषद नव्हती तेंव्हाही जोतिष होते व अनिस ने कितीही ज्ञानाचे अहंकारी अवडंबर माजवले तरी ते कायम राहिलच यात शंका नाही!
त्यामुळे काही प्रमाणात वरील वाक्य मान्य केले तरी १००% मान्य नाही.

या पुढे अंनिसने 'तपासणी 'असा शब्द न वापरता 'एकत्रितपणे हाती घेतलेले शोधकार्य' असा उल्लेख सर्वत्र व नेहमी करण्याचे बंधनपूर्वक मान्य करावे.

उत्तम विचार आहे. प्रकाश राव याबाबत काही करतील काय?

परिषदेतर्फे सर्व संस्थांच्या ज्योतिषींना प्रतिनिधित्व मिळेल अशा संख्येचा संघ तयार करावा.

इथे मात्र बोंब आहे.
कुणाला ज्योतिषी म्हणावे याची व्याख्या ना अनिस कडे आहे, ना परिषदेकडे!
मग ज्याच्या ज्ञानाची, काही कुठून शिक्षण घेतले, त्याचा दर्जा काय होता याची रूपरेखाच नाही. त्याचे काय करणार? नक्की कोणत्या पदवी पर्यंत शिक्षण घेतले हेच जर ठरवणे शक्य नसेल तर अशा "तपासण्यांना" काहीही अर्थ उरत नाही हे मी आधीच ठासून सांगितले आहे.
कोणत्याही संशोधना आधी आपले "टारगेट" हेच निश्चित करणे गरजेचे अनिस ला वाटत नाही यातच त्यांचा एकांगी दृष्टीकोन दिसून येतो.

यात या प्रयोगाचा फोलपणाही आहेच.

जर उद्या अकाउंटट्स ना हिशोबात नक्की काय येते अशी परिक्षा घ्यायची झाली तर ते किमान बिकॉम असावेत अशी अट घालाल की नाही?
मग या ज्योतिषात कुठे आहे ते "प्रमाणीकरण झालेले" शिक्षण?
कुणाला ज्योतिषी म्हणायचे हे तर आधी पक्के करा हो, मग घ्या असल्या तपासण्या हाती!

ज्योतिषशास्त्राची महानता लोकांना पटवून देण्याला परिषदेला आयतीच संधी मिळेल.

असं काही करावे असे मला तरी वाटत नाही. हे काही महान वगैरे शास्त्र नाही.
अडचणीच्या परिस्थितीत सामान्य माणसाला आशेचे बळ देणारे हे मनाला उभारी देणारे ज्ञान आहे. याला शास्त्र वगैरे कशाला म्हणायचे?

परिषदेने पुढाकार घेऊन १०० मंदमती किंवा सव्यंग व्यक्तींच्या वेगळ्या कुंडल्या मिळवाव्यात. त्या पत्रिकांमधून ग्रहस्थिती व ज्योतिषशास्त्र पध्दतीच्या अन्य आडाख्यांवरून एक सर्वमान्य कोष्टक करावे.

हा संशोधनाचा प्रस्ताव अतिशय उत्तम आहे. पण छोटा आहे!
पुढे जावून, मी तर म्हणेन की असा
१. कायम स्वरूपी संशोधन समन्वय विभाग परिषदेने स्थापावा.
२. त्यात काय संशोधन होवू शकेल याची एक रूपरेखा प्रकाशित करावी.
३. संशोधनाची दिशा नक्की करावी.
४. तसेच संशोधनाला कालाचे बंधन द्यावे.
५. या साठी पुणे, नागपूर व इतर विद्या पीठांच्या सांख्यिकी तसेच इतर विभागांची मदत घ्यावी.
६. याच सोबत या कार्यासाठी लागणारी साधने, संगणक, पुस्तके यासाठी एक सुसज्ज कार्यशाळा व वाचनालय असावे.
७. या साठी जगातल्या अनेक विद्यापीठांशीही सलग्नता घेता येईल. (नक्की माहिती नाही पण मला वाटते इंग्लंडच्या ब्रिस्टॉल विद्यापीठात असे संशोधन चालते. तसेच हॉलंडमध्येही महेश योगी यांनी सुरू केलेले असे एक केंद्र आहे. तसेच अमेरिकेतही काही ठिकाणी अशी केंद्रे आहेत.)
८. संशोधनातले सिद्धांत वेळोवेळी प्रकाशित केले जावेत.

यामुळे
१. ज्योतिषातील भंपक प्रकार या संशोधनांमुळे दूर होण्याचा मार्ग मिळेल.
२. योग्य ते गाळीव व शुद्ध ज्ञान हाती लागु शकेल.
३. गर्ग, भृगु, पाराशर, वराहमिहिर हे नक्की काय म्हणाले आहेत समोर येईल. यांची एक मेकांच्या विरोधी मते समोर येतील.
४. नक्की कोणते निष्कर्ष योग्य व का याचे काही प्रमाणीकरण होईल.
५. नवीन ज्योतिषी प्रवाह काय म्हणतात हे कळेल.
६. जगात इतर कोणत्या पद्धती आहेत याची काही खबरबात हाती लगेल.
अजूनही अनेक फायदे यात आहेत.

ज्योतिष परिषदेला आवश्यक मान व दरारा मिळवण्यासाठी व पुढे तो तसाच राखण्यासाठी अशा तऱ्हेच्या शोधकार्याला वेगवेगळी क्षेत्रे निवडून वाहून घेणे भाग पडेल.

ज्योतिषांचा दरारा असावा असे मला काही वाटत नाही. आणि मान म्हणाल तर तो योग्य रीतीने दिर्घकाल काम करून जनमासात स्थान मिळवले की आपोआपच येतो. त्यासाठी "असे" दरार्‍याचे प्रयत्न कशाला हवेत?
आजही जोतिषांना समाजात मान नाही, असे कुठे आहे? दोन चार उथळ पाण्याचे खळखळाट सोडले तर जोतिषांची परिस्थिती उत्तम आहे असे वाटते. त्या मानानी
अनिसचीच परिस्थिती गंभीर आहे! त्यांना कुणी हिंग लावून विचारत नाही म्हणून तर असले धंदे सुचतात.

"आपण आणि ते"
असा भेद अनिस ने केला आणि म्हणूनच अनिस सर्वसामान्य समाजात फारसे स्थान मिळवू शकलेली नाही.
जे समाजाला हवे आहे ते जोतिष देते आहे, हे 'सत्य' स्विकारणे अनिसला जमण्यासारखे नाही, कारण तो त्यांचा पोटापाण्याचा धंदा आहे.
जर कुणाला विरोध केला नाही तर त्यांनी पोट कसे भरायचे?
प्रसिद्धी कशी मिळवायची?

मी तर असे म्हणन की अनिस ने सर्वात आधी मुस्लीम आणि ख्रिश्चन समाजाच्या अंधश्रद्धांनाही हात लावून दाखवावा! बंगाली बाबांना, दर्ग्यांना हात तर लावून दाखवा म्हणा!
मदर तेरेसाला संतपद मिळावे म्हणून चमत्कार दाखवावा लागला, याचे काही खंडन त्यांनी केलेले दिसले नाही. ना त्यांना त्यावेळी त्या अंधश्रद्धेची ची काळजी वाटली. हा दुटप्पीपणा नाही का? का नाही त्या विरोधात देशव्यापी आंदोलन सुरु करत?
तिथे बरी कच खाता? पोपच्या विरोधात जायची हिम्मत नाही, ना मुल्ला मौलवींच्या!
मग गरीब बिचारे हिंदु आहेतच कधी धोपटायला...

त्यामुळे अनिस हाच भंपकपणा आता बंद करावा असे मला वाटते.
आणि सुरु ठेवायचा तर तो सर्व धर्मांना समान लागु असावा.

आणि अनिसचा सर्व धार्मिक अजेंडाही वर्षाच्या आधी प्रकाशित व्हावा व वर्षाच्या शेवटी अहवाल!

आपला
गुंडोपंत

आवाहनात गोम

नारळीकरांच्या
या चाचणी मधून प्रत्येक ज्योतिषाला किंवा संस्थेला 40 मुलांच्या पत्रिका अथवा पत्रिका तयार करण्यासाठी आवश्यक माहिती पुरवण्यात येईल चाचणी देणाऱ्यांनी फक्त त्यापैकी कोणत्या पत्रिका हुषारांच्या आणि कोणत्या पत्रिका मतिमंद मुलांच्या आहेत हे ओळखून दाखवावे.
या आवाहनातही गोम आहेच.

ते प्रत्येक व्यक्तीची जन्मवेळ हे त्या व्यक्तीची पहिला श्वास घेण्याची(च) वेळ आहे हे कशावरून सांगणार?

अनिस चे आजवरचे वर्तन पाहता ते कशावरून यात घोळ करणार नाहीत असे वाटते?

मुळात हे लोक स्वतःला कोण समजतात की त्यांनी जोतिषाला मान्यता द्यावी किंवा न द्यावी?
यांनी न दिली तरी सामान्य माणूस थांबणार आहे यांच्या मान्यते साठी?
उगाच काही तरी स्टंटबाजी करतायेत.

नारळीकरांनाही बहुदा संशोधनात हली काही स्फुरत नसावे, विष्णु पुराण वाचूनही वेळ जाता जात नसावा, म्हणून मग वेळ घालवायला हे उद्योग! ;)))

आपला
गुंडोपंत शंकासूर

गोम?


ते प्रत्येक व्यक्तीची जन्मवेळ हे त्या व्यक्तीची पहिला श्वास घेण्याची(च) वेळ आहे हे कशावरून सांगणार?

हीच गोष्ट ज्योतिषाकडे येणार्‍या प्रत्येक जातकाला लागू आहे. गुंड्याचा हातचा चुकला तरी गणित कसे काय बरोबर येते? त्यामुळे भाकित साधार असावे. चाचणीत भाकित हा भाग नाहिच आहे. तो फक्त वर्तमान ओळखून दाखवा असा आहे. काही ज्योतिषी म्हणतात आम्ही भविष्यातील घटना सांगतो. वर्तमानातल्या नाही त्यामुळे ही चाचणी आम्हाला लागु नाही.
प्रकाश घाटपांडे

चाचपणी

गुंडोपंतांचे संशोधन प्रस्तावाचे आठही मुद्दे मला व्यक्तिशः१००%मान्य आहेत. तसेच परिणिती बाबतचे सहाही मुद्दे मान्य. अजुनही अनेक मुद्दे आहेत हेही मान्य. http://mr.upakram.org/node/854 येथील प्रश्न क्रमांक ६२
परदेशातील फलज्योतिष संशोधनावरची उदाहरणे नेहमी उगाळली जातात मग आपल्याकडे या विषयावर संशोधन का केले जात नाही? हा भाग वाचावा.


कुणाला ज्योतिषी म्हणावे याची व्याख्या ना अनिस कडे आहे, ना परिषदेकडे!
मग ज्याच्या ज्ञानाची, काही कुठून शिक्षण घेतले, त्याचा दर्जा काय होता याची रूपरेखाच नाही. त्याचे काय करणार? नक्की कोणत्या पदवी पर्यंत शिक्षण घेतले हेच जर ठरवणे शक्य नसेल तर अशा "तपासण्यांना" काहीही अर्थ उरत नाही हे मी आधीच ठासून सांगितले आहे.


आम्ही बी हेच म्हन्तो.

जर उद्या अकाउंटट्स ना हिशोबात नक्की काय येते अशी परिक्षा घ्यायची झाली तर ते किमान बिकॉम असावेत अशी अट घालाल की नाही?
मग या ज्योतिषात कुठे आहे ते "प्रमाणीकरण झालेले" शिक्षण?
कुणाला ज्योतिषी म्हणायचे हे तर आधी पक्के करा हो, मग घ्या असल्या तपासण्या हाती!


महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष श्री श्री भट यांनी ज्योतिषाच्या अभ्यासक्रमाच्या प्रमाणीकरणाचा मुद्दा मांडला होता. कित्येक वर्षे ते तो मांडत आहे. ज्योतिषाच्या अभ्यासक्रमाबाबत ज्योतिषात एकमत होणे हे अशक्य हे आम्ही जाणतो. http://mr.upakram.org/node/1246 यावर व दा. भट यांच्या २००१ च्या ज्योतिषसंमेलनात केलेल्या भाष्यावर आमचे प्रतिभाष्याचा यानिमित्त आढावा घ्यावा.

१) परिषदेने पुढाकार घेऊन १०० मंदमती किंवा सव्यंग व्यक्तींच्या वेगळ्या कुंडल्या मिळवाव्यात. त्या पत्रिकांमधून ग्रहस्थिती व ज्योतिषशास्त्र पध्दतीच्या अन्य आडाख्यांवरून एक सर्वमान्य कोष्टक करावे. त्यामधून जमवलेल्या कुंडल्यांचा त्या कोष्टकाशी कसा मेळ बसतो, ते दाखवून देण्याचे कार्य करण्याचे घोषित करावे. तसे करत असताना काही कुंडल्या या आडाख्यांशी न जुळणाऱ्या आढळल्या तर त्यांचे स्पष्टीकरण ही करून दाखवले जाईल असे ही प्रसिद्ध करावे. २) त्या कुंडल्या ज्या व्यक्तींच्या होत्या त्यांची नावे व शक्य झाल्यास त्या सव्यंग व्यक्तींना प्रसारमाध्यमांसमोर प्रत्यक्ष उभे करून उत्तर द्यावे. म्हणजे परिषदेने जमवलेल्या पत्रिका ज्योतिषांनी आपल्या मनाने बनवलेल्या आहेत असा आक्षेप विरोधकांना घेता येणार नाही.


मान्य आहे. हे व.दा. भटांनाही मान्य आहे. एक वर्षाच्या अवधीत आपणच असे डिझाईन करावे असे त्यानी परिषदेत सुचित केले आहेच.
अवांतर- माझे काही बाबतीतील मौन हे सूचक असुन त्यातील अन्वयार्थ काढण्यात काही लोक गुंतले असणार हे आम्ही जाणतो

प्रकाश घाटपांडे

आमचे भाकित

सर्वसामावेशक सर्वमान्य चाचणी ही अशक्य आहे
http://mr.upakram.org/node/854 प्रश्न क्रमांक ४७ फल्ज्योतिष हे शास्त्र आहे काय ? यातील शेवटचा परिच्छेद वाचा.
प्रकाश घाटपांडे

महाराष्ट्र ज्योतिष परिषदे'ची अभिनंदनीय कृती !

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, आयुका व पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्‍त विद्यमाने फलज्योतिषाची कथित वैज्ञानिक चाचणी घेण्याच्या उपक्रमावर महाराष्ट्र ज्योतिष परिषदेने बहिष्कार टाकला. पुणे विद्यार्थीगृह येथे परिषदेच्या रविवारी झालेल्या एका बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या वेळी ज्येष्ठ ज्योतिषी श्री. श्री.श्री. भट, श्री. सिद्धेश्‍वर मारटकर, श्री. ओक, डॉ. धुंडीराज पाठक आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी श्री. भट म्हणाले, ``अंनिसचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी लोकांचा विश्‍वास गमावला आहे. ही चाचणी म्हणजे लोकांची फसवणूक करण्याची त्यांची नवीन चाल आहे. या चाचणीत आम्ही सहभागी होणार नसून कोणत्याही ज्योतिषाने असली आव्हाने स्वीकारू नयेत.'' डॉ. पाठक म्हणाले, ``मुळात फलज्योतिष हे शास्त्र आहे, हे अंनिससमोर सिद्ध करण्याची गरजच काय ? ही मंडळी खोटारडी असून त्यांच्याकडून डॉ. जयंत नारळीकर यांच्या नावाचा वापर करून घेतला जात आहे. `फलज्योतिष हे शास्त्र नाही', हे अंनिसवाल्यांनी अगोदरच ठरवून टाकले आहे. या चाचणीचे खोटेनाटे निष्कर्ष जमा करून ते विधिमंडळात न्यायचे व वादग्रस्त अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचे कथित महत्त्व पटवून देऊन तो मंजूर करून घ्यायचा, हाच या चाचणीमागील मुख्य हेतू आहे. या कायद्यामुळे `ज्योतिष' या विषयावरच बंदी येणार असल्याने असल्या चाचण्यांना विरोध करण्यापेक्षा थेट या कायद्यालाच विरोध करणे ज्योतिषांच्या हिताचे ठरेल.'' ज्योतिषशास्त्राच्या अन्य एक विद्यार्थिनी मेधा करमरकर यांनीही या चाचणीवर आक्षेप घेत ``फलज्योतिष हे हिंदु धर्मशास्त्राशी निगडित असल्यानेच डॉ. दाभोलकर त्यास विरोध करत आहेत'', असे सांगितले. ``हिंदु धर्मियांना त्रास देण्याचा त्यांचा हा प्रयत्‍न असून असली आव्हाने ते मुसलमान व ख्रिस्ती यांना देऊ शकतील का ?'', असा परखड प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. या वेळी श्री. व.धा. भट,श्री. ओक, श्री. श्रीकृष्ण जोशी, श्री. सिद्धेश्‍वर मारटकर, श्री. सतीश कुलकर्णी आदींची भाषणे झाली. श्री. शरच्चंद्र गोखले यांनी सूत्रसंचालन केले.

बैठकीतील ठराव
श्री. श्री.श्री. भट यांनी या प्रसंगी मांडलेल्या ठरावाला उपस्थित सर्वांनी अनुमोदन दिले. हा ठराव पुढीलप्रमाणे होता -
डॉ. जयंत नारळीकर व अंनिस यांनी दिलेले आव्हान आम्हा सर्व ज्योतिषांना अमान्य आहे. ज्योतिषशास्त्राकडे पूर्वग्रहदूषितपणे पहाणार्‍या अंनिसने व तिच्याबरोबर असणार्‍या डॉ. नारळीकर यांनी जनतेची विश्‍वासार्हता गमावली आहे. ही चाचणी संशयास्पद असून तिला कोणीही प्रतिसाद देऊ नये.

इधरका माल उधर?

हेही 'तेथून' जसे च्या तसे उचलले आहे. पुन्हा शब्दशः सारखे लेखन? उपक्रमच्या धोरणात हे बसते का? संपादन मंडळाने लक्ष घालावे.

नवीन,

नवीन,
असे प्रतिक्रियेत लिहून उपक्रमराव वाचतील तेव्हा वाचतील. त्यांना व्यनितूनही ही गोष्ट निदर्शनास आणून द्यावीस असे वाटते. याबद्दल उपक्रमचे धोरण पाहणे रोचक ठरावे

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

उचलेगीरी

धन्यवाद नवीन!
येथे झालेल्या उचलेगीरीचा मी निषेध करतो.

म्हणजे काय करतो?

तर म्हणजे उचलेगीरी केलेली असेल तर पुढच्यावेळी मी (बोटे कितीही शिवशिवली तरी!) प्रतिसाद देणार नाही....

आपला
गुंडोपंत

अरेरे

अरेरे! स्वीकारायचे होते आव्हान. करायचे होते अंनिस ला कायमचे गप्प. हा सर्व प्रकार पाहणार्‍या सर्वसामान्य माणसाला ज्योतिषांचा हा निर्णय परीक्षेत पास होणार नाही या भीतीने परीक्षेवरच बहिष्कार टाकण्यासारखा वाटला तर त्यांना दोष देता येणार नाही.

अंनिसचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी लोकांचा विश्‍वास गमावला आहे.

त्यांनी दिलेल्या चाचणीला ज्योतिषी सामोरे जाऊ शकले नाहीत यामुळे त्यांनी विश्वास गमावला की ज्योतिष्यांनी? सर्वसामान्य माणूस पूर्वीपेक्षा जास्त चिकित्सक आहे. त्यामुळे या माघारीमुळे सामान्य माणसाचा ज्योतिष्यांवरील विश्वास कमी होईल असे वाटते.

मुळात फलज्योतिष हे शास्त्र आहे, हे अंनिससमोर सिद्ध करण्याची गरजच काय ? ही मंडळी खोटारडी असून त्यांच्याकडून डॉ. जयंत नारळीकर यांच्या नावाचा वापर करून घेतला जात आहे.

सिद्ध न करताच; तुम्ही म्हणता म्हणून त्याला शास्त्र का मानावे? अंनिस केवळ निमित्त आहे. हा सर्व प्रकार सामान्य जनता पाहात आहे आणि ज्योतिषांनी ही संधी साधून फलज्योतिष हे शास्त्र आहे हे एकदाचे सिद्ध करून टाकावे किंवा हे शास्त्र नाही असे मान्य करावे. फलज्योतिष हे शास्त्र आहे हे सिद्ध न करताच हे शास्त्र आहे असे तुम्ही म्हणत असाल तर खोटारडे तुम्ही ठरता ते नाही.

फलज्योतिष हे शास्त्र नाही', हे अंनिसवाल्यांनी अगोदरच ठरवून टाकले आहे.

"तुम्ही सिद्ध करत नाही तोपर्यंत हे शास्त्र नाही" असे मानण्यात त्यांची काही चूक आहे असे कोणाही सुशिक्षित माणसास वाटणार नाही.

या चाचणीचे खोटेनाटे निष्कर्ष जमा करून ते विधिमंडळात न्यायचे व वादग्रस्त अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचे कथित महत्त्व पटवून देऊन तो मंजूर करून घ्यायचा, हाच या चाचणीमागील मुख्य हेतू आहे.

निष्कर्ष खोटेनाटे जमा केले जातील हे तुम्ही आधीच कसे ठरवले? वृत्तपत्रे आणि इतर माध्यमातून प्रसिद्धी मिळाल्यावर आणि पुणे विद्यापीठ आणि इतर प्रतिष्ठितांचा सहभाग असताना निष्कर्षात घोटाळा झाला तर तो नक्कीच बाहेर येईल. तेव्हा काळजीचे कारण नाही. फलज्योतिष शास्त्र आहे अशी तुमची ठाम धारणा असेल तर आपण चाचणीत यशस्वी होऊ असा विश्वास का वाटत नाही?

या कायद्यामुळे `ज्योतिष' या विषयावरच बंदी येणार असल्याने असल्या चाचण्यांना विरोध करण्यापेक्षा थेट या कायद्यालाच विरोध करणे ज्योतिषांच्या हिताचे ठरेल.

फलज्योतिष हे शास्त्र नाही हे सिद्ध झाले तर त्यावर बंदी येऊ शकते हे योग्यच आहे. अश्या कायद्याला ज्योतिष्यांनी विरोध करणेही स्वाभाविक आहे. शेवटी त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे.

ज्योतिषशास्त्राच्या अन्य एक विद्यार्थिनी मेधा करमरकर यांनीही या चाचणीवर आक्षेप घेत ``फलज्योतिष हे हिंदु धर्मशास्त्राशी निगडित असल्यानेच डॉ. दाभोलकर त्यास विरोध करत आहेत'', असे सांगितले. ``हिंदु धर्मियांना त्रास देण्याचा त्यांचा हा प्रयत्‍न असून असली आव्हाने ते मुसलमान व ख्रिस्ती यांना देऊ शकतील का ?'', असा परखड प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.

काही मार्ग दिसेनासा झाला की हिंदूंना त्रास देण्याचा प्रयत्न म्हणून छाती बडवून घेण्याची पद्धत 'सनातन' आहे. फलज्योतिष हे शास्त्र आहे की नाही याचा निर्णय होण्याची हिंदूंनाही तितकीच उत्सुकता आहे. हिंदू धर्मात वेळोवेळी आलेल्या अंधश्रद्धा (सती जाणे वगैरे) हिंदू धर्मियांनीच विवेकाने काढून टाकल्या आहेत. फलज्योतिष हे शास्त्र आहे हे ज्योतिषी सिद्ध करू शकले नाहीत तर त्यालाही काढून टाकणे योग्य आहे.

मला तरी नाही

फलज्योतिष हे शास्त्र आहे असं मी तरी मानत नाही. त्यामुळे त्या भानगडीत आपण तरी नाय बॉ!
हे मी वरही स्पष्टपणे नमूद केले होतेच.
पण कोणत्याही गोष्टीला १००% नाकारणे कितपत योग्य आहे याचाही विचार केलाच पाहिजे.

एखादी गोष्ट अनेकवेळा फोल 'वाटूनही' समाज का परत आणतो आहे याचाही विचार व्हायला हवा.

याचे सतिच्या चाली बरोबर कंपॅरिझन करणे योग्य नाही विसंगत (इन् ऍप्रोप्रिएट?) वाटते.

हिंदू धर्मात वेळोवेळी आलेल्या अंधश्रद्धा (सती जाणे वगैरे) हिंदू धर्मियांनीच विवेकाने काढून टाकल्या आहेत.

हे वाक्य धादांत खोटे आहे.
या गोष्टी ब्रिटिशांनी कायदा करून बंद केल्या होत्या. राजारामांनी त्याचा पुरस्कार केला तरी हिंदु विरोधाला न जुमानता बंदीचा कायदा ब्रिटिशांनीच होता.

असो,
फलज्योतिष हे शास्त्र आहे हे ज्योतिषी सिद्ध करू शकले नाहीत तर त्यालाही काढून टाकणे योग्य आहे.

ठीक आहे! मान्य आहे! टाकू या काढून!!!
फक्त हे 'कुठून' काढून टाकायचे ते तरी सांगा?!!

अहो ही गोष्ट ज्याच्या त्याच्या मनात आहे?
कधीतरी आयुष्यात अवघड स्थिती येते. मार्गच दिसत नाही.
अशा वेळी नैराश्याने घेरलेल्या स्थितीत
"माझा उद्या चांगला असणार आहे" हा आशावाद देणारी गोष्ट आहे.
ती काढून टाकायची?

आणि जरी काढली तरी ही मनाची आशेची भूक कशी भरून काढणार आहात?
ना इतके सायकॉलॉजिस्ट आहेत, ना त्यांच्या कडे जाण्याची मानसिकता!
हा प्रश्न तुम्ही म्हणता, मानता तितका उथळ नाहीये.

ज्योतिष हे फक्त भारतातच पाहिले जाते असे वाटत असेल तर तो तुमचा भ्रम आहे. उद्या कसा असेल याची पाहणी करण्याचा प्रयत्न करणे, हा जगभरात रुजलेला प्रकार आहे.
मग ते सायकीक्स असोत किंवा राशी वरून पाहणारे असोत नाहीतर मिडियम्स असोत. हा प्रकार सर्व संस्कृतींमध्ये आहे, फक्त हिंदु नाही! तसे असते तर इतके बंगाली बाबा दिसलेच नसते.

एकदा तुम्ही जोतिष हा फालतु प्रकार 'सगळ्या जगातून' कसा काढायचा हे तपशीलवार पणे सांगितले की मग दाभोळकर आणि नारळीकर हे कार्य हाती घ्यायला मोकळे!

काय म्हणता?

आपला
गुंडोपंत

मानसिक आधार वगैरे

फलज्योतिष हे शास्त्र आहे असं मी तरी मानत नाही. त्यामुळे त्या भानगडीत आपण तरी नाय बॉ!

मग फलज्योतिष हे काय आहे असे तुम्हाला वाटते? शास्त्र नसेल तर (म्हणजे ग्रहस्थिती आणि घटना यामध्ये काही संबंध नाही असे सिद्ध झाले तर) फलज्योतिष्यांच्या भाकितांबद्दल काही विश्वासार्हता राहील का?

एखादी गोष्ट अनेकवेळा फोल 'वाटूनही' समाज का परत आणतो आहे याचाही विचार व्हायला हवा.

कारण याविषयी अजूनही संदिग्धता आहे म्हणून. प्रात्यक्षिक/चाचण्यांनी एकदा 'दूध का दूध पानी का पानी' झाले की हि असंदिग्धता राहणार नाही

हे वाक्य धादांत खोटे आहे. या गोष्टी ब्रिटिशांनी कायदा करून बंद केल्या होत्या.

सुरुवात कोणी केली हे इथे महत्त्वाचे नाही. या प्रथा कायद्याच्या भीतीने बंद पडल्या नसून या प्रथांची अनिष्टता सर्वसामान्य हिंदूंच्या लक्षात येऊन त्यांनी आपणहोऊन या प्रथा बंद केल्या आहेत. कोणालाही विचारून पाहा "कायद्याने बंदी केली नसती तर तुम्ही किंवा तुमच्या जवळचे कोणी सती जावे असे तुम्हाला वाटेल का?" पूर्वीच्या काळी बंदीला विरोध, 'हिंदूंच्या धार्मिक भावनांवर हल्ला' असा गोंधळ झाला असणे शक्य आहे.

फलज्योतिष हे शास्त्र आहे हे ज्योतिषी सिद्ध करू शकले नाहीत तर त्यालाही काढून टाकणे योग्य आहे.

ठीक आहे! मान्य आहे! टाकू या काढून!!!
फक्त हे 'कुठून' काढून टाकायचे ते तरी सांगा?!!

फलज्योतिषी जे काही भाकित वर्तवतात त्यात तथ्याचा अंशही नाही असे सिद्ध होऊ द्या, काढून टाकण्यासाठी वेगळे काही करण्याची आश्यकता नाही. लोक सुज्ञ आहेत.

कधीतरी आयुष्यात अवघड स्थिती येते. मार्गच दिसत नाही. अशा वेळी नैराश्याने घेरलेल्या स्थितीत "माझा उद्या चांगला असणार आहे" हा आशावाद देणारी गोष्ट आहे. ती काढून टाकायची?

यासाठी मानसोपचारतज्ज्ञ आहेत, काउंसेलर्स आहेत. संकटात असलेल्यालाही खोटी आशा दाखवणे चुकीचे आहे (आणि खोटीच आशा दाखवायची तर त्याला ज्योतिषी कशाला पाहिजे कोणीही चांगले/गोड/प्रेरणादायी बोलणारी व्यक्ती चालेल). शिवाय ज्योतिषी नेहमी आशावादच सांगतात असे नाही. बर्‍याचदा पैसे उकळण्यासाठी मुद्दाम भितीदायक भविष्य सांगण्याचे प्रकारही होत असतात. आशावादी काही सांगण्यातही काही धोके आहेत जसे प्रयत्न कमी करणे, सतर्क न राहणे इ.

ज्योतिष हे फक्त भारतातच पाहिले जाते असे वाटत असेल तर तो तुमचा भ्रम आहे.

असा कोणताही भ्रम मला झालेला नाही. जगभरात काही ना काही प्रयत्न चालू असतातच. आपण आधी भारतापुरते पाहिले तर योग्यच आहे.

मानसिक आधार?

फलज्योतिषाचा मानसिक आधार म्हणून वापर होत असेल तर त्यात वाईट काय?
उत्तर येथे पहा .प्रश्न क्र. ५६

प्रकाश घाटपांडे

आहे ना

फलज्योतिष्यांच्या भाकितांबद्दल काही विश्वासार्हता राहील का?

राहिलच... जोवर मानवी मन आहे आणि त्याला उद्याची चिंता आहे तोवर हे सगळे शिल्लक राहणारच आहे.

प्रात्यक्षिक/चाचण्यांनी एकदा 'दूध का दूध पानी का पानी' झाले की हि असंदिग्धता राहणार नाही

करा ना मग कुणी अडवलं आहे? शिका जोतिष आणि करा प्रयोग!!
ही काही कुणा एकाची मक्तेदारी कुठे आहे? तुम्हाला शंका आहे तर तुम्ही प्रयोग करून पहा ना...
मी तरी आडवलेलं नाही. उलट तुम्हाला शिकायला काही मदत लागली तर सांगा नक्की करेन!

फलज्योतिषी जे काही भाकित वर्तवतात त्यात तथ्याचा अंशही नाही असे सिद्ध होऊ द्या, काढून टाकण्यासाठी वेगळे काही करण्याची आश्यकता नाही. लोक सुज्ञ आहेत.

भाकितं चुकत नाहीत असं कुठे आहे? अनेकदा चुकतात... पण इतकी भाकितं चुकत असुनही, लोकं जोतिषांकडे जातात म्हणजे ते सूज्ञ नसून चांगलेच मुर्ख असले पहिजेत नाही?
छ्या या लोकांना मार्गावर आणलंच पाहिजे बरं का!

पूर्वीच्या काळी बंदीला विरोध, 'हिंदूंच्या धार्मिक भावनांवर हल्ला' असा गोंधळ झाला असणे शक्य आहे.
काही तरी काय बोलताय?
या बंदी वरून केव्हढा गदारोळ माजला होता. पण कायद्याच्याच भीतीने ही प्रथा बंद झाली हे पण तितकेच सत्य आहे.

यासाठी मानसोपचारतज्ज्ञ आहेत, काउंसेलर्स आहेत. हे वाक्य किती फसवं आहे!
अहो मग तुम्हाला कल्पनाच नाहिये, या लोकांचा भारतातच नाही तर जगभरात मोठा तुटवडा आहे.
आणि लोक जायला हवेत ना यांच्या कडे? त्या भागात समाज जागृतीचं काही काम अनिस ने केललं कानावर कधीच कसं आलं नाही माझ्या?

शिवाय ज्योतिषी नेहमी आशावादच सांगतात असे नाही. बर्‍याचदा पैसे उकळण्यासाठी मुद्दाम भितीदायक भविष्य सांगण्याचे प्रकारही होत असतात.

काही खोटेपणा कुणीही करत असेल तर त्याला जागीच उघडं पाडलंच पाहिजे.
या मुद्याला माझा पाठिंबा आहे!

आपला
गुंडोपंत

हमम...

राहिलच... जोवर मानवी मन आहे आणि त्याला उद्याची चिंता आहे तोवर हे सगळे शिल्लक राहणारच आहे.

भविष्याबद्दल चिंता असेलच पण फलज्योतिष खरे नाही असे कळल्यावर त्यांच्याकडे कोण कश्याला जाईल?

करा ना मग कुणी अडवलं आहे? शिका जोतिष आणि करा प्रयोग!!
ही काही कुणा एकाची मक्तेदारी कुठे आहे? तुम्हाला शंका आहे तर तुम्ही प्रयोग करून पहा ना...
मी तरी आडवलेलं नाही. उलट तुम्हाला शिकायला काही मदत लागली तर सांगा नक्की करेन!

फलज्योतिष खरे आहे, शास्त्र आहे असे म्हणणार्‍यांवर ते सिद्ध करण्याची जबाबदारी आहे. अशी संधी मिळाली असताना त्यांनी माघार घेतली तर त्याचा अर्थ सर्वसामान्यांनी काय घ्यावा?

भाकितं चुकत नाहीत असं कुठे आहे? अनेकदा चुकतात... पण इतकी भाकितं चुकत असुनही, लोकं जोतिष्यांकडे जातात म्हणजे ते सूज्ञ नसून चांगलेच मुर्ख असले पहिजेत नाही?

या लोकांसमोर जर फलज्योतिष खरे नाही असे सिद्ध झाले तर बरेच लोक तिकडे जायचे बंद करतीलच. जगात बरेच लोक माहिती असूनही स्वतःला अहितकर गोष्टी करत असतात त्यामुळे त्यानंतरही काही लोक ज्योतिषांकडे जाऊ शकतात.

पण कायद्याच्याच भीतीने ही प्रथा बंद झाली हे पण तितकेच सत्य आहे.

हा कायदा नाही असे मानले तर तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीला सती जाऊ द्याल का? बहुतेक नाही, कारण ही प्रथा चुकीची आहे हे तुम्हाला मनोमन पटले आहे (असावे) ज्यांना हे अजूनही पटले नाही त्यांच्यासाठी कायदा आहे.

हे वाक्य किती फसवं आहे! अहो मग तुम्हाला कल्पनाच नाहिये, या लोकांचा भारतातच नाही तर जगभरात मोठा तुटवडा आहे.

खरे आहे. पण म्हणून ज्योतिष्यांनी आपला व्यवसाय सुरू ठेवणे हा काही त्यावरचा उपाय नव्हे. डॉक्टर कमी आहेत तरीही अशास्त्रीय उपचार करणार्‍यांवर बंदी आहेच.

वा गुंडोपंत वा!..

ठीक आहे! मान्य आहे! टाकू या काढून!!!
फक्त हे 'कुठून' काढून टाकायचे ते तरी सांगा?!!

वा गुंडोपंत काय बोललात वा!.. प्रतिक्रिया १००% पटली..

लोकांना निर्णय घ्यायला काहितरी दिशा हवी असते ती जेव्हा हरवते तेव्हा सगळेच जण तर्काने विचार करू शकतातच असे नाहि. अश्या वेळी त्यांना कुठल्यातरी दिशेला जाण्यासाठी - मग ती चुकीची का असेना एक निश्चित दिशा आणि एक आशा तर असते त्यासाठी- कसलातरी आधार लागतो. फलज्योतिष हे शास्त्र नाहि असे सिद्ध जरी झालं तरी लोकांना उत्तर न सापडणारे प्रश्न जोवर पडणार तोवर हे चालूच राहणार

आता बघा, दारूचे अतिसेवन वाईट आहे हे "शास्त्राने" सिद्ध केलय. ज्यांना गरज आहे / सवय आहे / वेळ आली आहे ते हे थांबवतात का?

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणरे आणि न समजणारे

द्विमान


जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणरे आणि न समजणारे


महत्वाचा विषय आहे. ऋषिकेश यावर वेगळे लेखन कर.

आता बघा, दारूचे अतिसेवन वाईट आहे हे "शास्त्राने" सिद्ध केलय. ज्यांना गरज आहे / सवय आहे / वेळ आली आहे ते हे थांबवतात का?


http://mr.upakram.org/node/1080 येथील नारळीकरांचे वारा आणि सुर्या चे उदाहरण आठवले.


लोकांना निर्णय घ्यायला काहितरी दिशा हवी असते ती जेव्हा हरवते तेव्हा सगळेच जण तर्काने विचार करू शकतातच असे नाहि. अश्या वेळी त्यांना कुठल्यातरी दिशेला जाण्यासाठी - मग ती चुकीची का असेना एक निश्चित दिशा आणि एक आशा तर असते त्यासाठी- कसलातरी आधार लागतो


http://mr.upakram.org/node/854 प्रश्न क्रमांक ५५ मधील जे का रंजले गांजले चे पुनरावलोकन करावे.
तसेच प्रश्न क्रमांक ५६ ही .

प्रकाश घाटपांडे

मानसिक आधार

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. गुंडोपंत लिहितातः''फलज्योतिष हे शास्त्र आहे असे मी तरी मानत नाही.'' ते पुढे म्हणतातः ''अहो ही गोष्ट ज्याच्या त्याच्या मनात आहे.
कधीतरी आयुष्यात अवघड स्थिती येते. मार्गच दिसत नाही.
अशा वेळी नैराश्याने घेरलेल्या स्थितीत
"माझा उद्या चांगला असणार आहे" हा आशावाद देणारी गोष्ट आहे.
ती काढून टाकायची?''


***
या संदर्भात एक किस्सा आठवला. अनेकांनी तो या ना त्या स्वरूपात वाचला असेल.
"एक माणूस एकदा विहिरीत वाकून पाहात होता. त्याच्या खिशातील किल्ली विहिरीत पडली. विहिरीच्या आजूबाजूला गवत वाढले होते. त्यात तो शोधू लागला. तेव्हढ्यात दुसरा एक जण तिथे आला. त्याने विचारले:

''काय हो, काय शोधताहात?''
'' किल्ली शोधतो आहे.''
'' कुठशी पडली किल्ली?''
" विहिरीत"
'' मग इथं काठावर शोधून कशी मिळणार?''
'' अहो, विहिरीत उतरता येत नाही, म्हणून या गवतात शोधतो आहे.किल्ली शोधल्याचे मानसिक समाधान तरी मिळेल ''

फरक

किस्सा चांगला आहे, आवडला. कुठेतरी वापरायला उपयोगी पडेल. परंतु,

किल्ली शोधणार्‍या या माणसाला किल्ली नेमकी कुठे पडली हे ठाऊक आहे. दुर्दैवाने किंवा सुदैवाने बाकीच्या सर्व माणसांना उद्या नेमके काय होणार त्याची कल्पना नसते आणि अनिश्चिततेसाठी आधार लागतो. हेच कारण आहे की माणसांना देव लागतो, कुटुंब लागते, आपल्यावर प्रेम करणारी माणसे लागतात, धर्म लागतो, ज्योतिष लागते.

तेव्हा दोन्ही गोष्टींत महत्त्वाचा फरक असल्याने किल्ली शोधणार्‍या माणसाचा किस्सा येथे लागू होत नाही असे वाटते.

इथे एक मागे उपक्रमावर दिलेले माझे आवडते इंग्रजी गाणे पुन्हा देते,

के सेरा सेरा, व्हॉटेवर विल बी विल बी
द फ्युजर'ज नॉट अवर्ज टू सी,
के सेरा सेरा, व्हॉटेवर विल बी, विल बी

माणसे जेव्हा येणारे आयुष्य आहे तसे स्वीकारायला सुरुवात करतील तेव्हा ज्योतिषांची गरज भासणार नाही.

फरक

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
प्रियाली लिहितात :"....तेव्हा दोन्ही गोष्टींत महत्त्वाचा फरक असल्याने किल्ली शोधणार्‍या माणसाचा किस्सा येथे लागू होत नाही असे वाटते.''
..पण मी जो संदर्भ दिला आहे त्याकडे त्या दुर्लक्ष करतात असे दिसते.तो संदर्भ असा:
"श्री. गुंडोपंत म्हणतातःराशिभविष्य हे शास्त्र आहे असे मी मानत नाही" म्हणजे राशिभविष्य विश्वासार्ह नाही. पुढे तेच लिहितात "राशि भविष्यामुळे लोकांना मानसिक आधार मिळतो, तो कशाला घालवायचा?'' ही विसंगती दाखविव्यासाठी हा किस्सा लिहिला.
...
प्रियाली यांच्या :
" माणसे जेव्हा येणारे आयुष्य आहे तसे स्वीकारायला सुरुवात करतील तेव्हा ज्योतिषांची गरज भासणार नाही."
या विचाराशी मी सहमत आहे.

.

प्रकाटाआ

माझाही पाठींबा

ही बातमी येथे दिल्या बद्दल धन्यवाद!
श्री. श्री.श्री. भट यांनी या प्रसंगी मांडलेल्या ठरावाला माझाही पाठिंबा आहे.
अनिस व नारळीकर यांचे भुमीका ही १००% पुर्वग्रह दूषीत जोतिष विरोधी आहे यात शंका नाही.

तसेच, फक्त हिंदु धर्मातील गोष्टींना "विरोधासाठी/प्रसिद्धीसाठी विरोध" हेच ध्येय आहे असे अनिस च्या मागील कार्यावरून सहजतेने दिसून येते.

त्यामुळे जोवर अनिस ही धर्मातीत/सर्व धर्मांना समानतेने वागवणारी, तसेच ज्ञानाला नाही, तर सर्व धर्मातील अंधश्रद्धांना समानतेने विरोध करणारी संस्था आहे, हे आकडेवारीने सिद्ध करत नाही, तोवर या संस्थेवर बहिष्कारच घातला पहिजे, यात शंका नाही.

हे जर हे आव्हान अनिस सिद्ध करू शकत नसेल तर अनिस वर सरकारने सामाजिक सलोखा बिघवडवण्याच्या प्रयत्ना बद्दल सिमि प्रमाणेच बंदी घालावी.
आणि नारळीकरांना बेजबाबदार वक्तव्यांबद्दल कारणे दाखवा नोटिस द्यावी?

आपला
गुंडोपंत

आवाहन व आव्हान

नारळीकरांनी कधीही "आव्हान" शब्द वापरला नाही. आव्हानात्मक भाषा दाभोळकरांची आहे. ती अर्थातच अंनिसच्या आव्हानाचा भाग आहे व सर्वज्ञात आहे. चळवळ म्हणले की मिळमिळीत भुमिका चालत नाही . त्या अर्थाने पुर्वग्रह दुषित म्हणता येईल. पण नारळीकरांनी हे आव्हान नसुन ज्योतिषांना आवाहन आहे असे पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितले होते. मिडिया ने सनसनाटी पणासाठी ते आव्हान असे छापले. नंतर खाली लिहिले हे आवाहन आहे म्हणून ही गोष्ट खरी आहे.
नारळीकरांची भुमिका अर्थातच मवाळ आहे. ती ज्योतिषांना दिलेली साद आहे प्रतिसाद द्यायचा की नाहि हे ठरवण्याचा हक्क अर्थातच ज्योतिषांना आहेच.
आमच्या रिसबुडांची भुमिका मात्र जहाल असायची. ते अंनिसला ही झोडपुन काढायचे आणि ज्योतिषांनाही. अंनिस वार्तापत्रात त्यांनी " थोतांड म्हणता पण का? ते सांगाल का?" या लेखात केवळ उथळ टीका करु नये असे बजावले आहे. त्यांनी तर अंनिसलाच आव्हान दिले होते कि तुम्ही सर्व्हे घेतला आहे का? थोतांड आहे हे सिद्ध करण्यासाठी तरी ज्योतिषाचा अभ्यास करा ना! मग बोला.

प्रकाश घाटपांडे

प्रतिक्रिया पोहोचवल्या

गुंडोपंत आणि मंडळींच्या भावना / प्रतिक्रिया नारळीकर व दाभोळकर यांच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत.
प्रकाश घाटपांडे

आहा!

वा वा!
आता दोघांचाही वेळ जरा बरा जाईल.
कारण आता या आक्षेपांचे खंडन करणारा वगैरे
एखादा लेख लिहावा लागेल ना त्यांना! ;))

तेव्हढाच जरा चेंज!
विष्णू पूराण वाचण्यातून मोकळीक आणि नवीन अंधश्रद्धा शोधत हिंडायला नको!

बाकी आक्षेपांमध्ये तो मुस्लीम व ख्रिश्चन अंधश्रद्धांना दिलेली अव्हाने - हा मुद्दा जरा अडचणीचा आहे त्याला बगल कशी द्यायची आणि कोणता मुद्दा वर आणायचा यावर जरा चर्चा पण करता येईल....

मला एक कळत नाही इतर इअत्क्या प्रकारच्या अंधश्रद्धा पदलेल्या असतांना जोतिषाच्याच मागे का लागतात हो ही मंडळी?

अनिस देवदासी प्रथेवर का नाही रोजच्या रोज आणि कायम स्वरूपी काम करत?
अजूनही अनेक आहेत की असे प्रश्न...
ज्यामुळे कुणाच्या आयुष्यात खरंच काही फरक पडेल असे आव्हानात्मक काम करण्यापेक्षा चार पांढरपेशा लोकांना धोपटणे हे सोपे म्हणून?

आपला
गुंडोपंत

प्रतिसाद नाही

महाराष्ट्र ज्योतिषपरिषदेला पाठवलेल्या माझ्या प्रस्तावावर पहिली एक वगळता कोणीचीच प्रतिक्रिया मिळत नाही.

मग

तुमचे "भाकीत" भरमसाठ प्रतिक्रिया असे होते की काय? खोटे ठरले का?

उपक्रमाची कुंडली / नाडीपट्टी पाहून तुम्हाला काय वाटले होते?

कृ. ह. घ्या.

दारु, सिगरेट/तंबाखु, वेश्याव्यवसाय, जुगार ह्या सारखे धंदे कायद्याने चालु असताना ज्योतिष ह्या धंद्यावर बंदी इतक्यात येणार नाही. कोणी काही म्हणले तरी. त्यामुळे आपण फिकीर करु नये.

बाकी अंनिस ने आयोजित केलेल्या ह्या प्रकल्पात भाग घेणे न घेणे हा स्वखुशीचा मामला आहे. जबरदस्ती नाही. लोकशाही आहे प्रत्येकाचे आपापले मत.

ज्योतिष हा सेवा व्यवसाय म्हणुन ओळखला जावा व पैसे घेउन ज्योतिष सांगण्यार्‍यावर समाधानकारक सेवा न मिळाल्यास खटला भरायची तरतुद हवी. यावर आपल्याला काय वाटते? ओकसाहेब सद्य परिस्थीती काय आहे काही प्रकाश टाकु शकाल्?

प्रत्युत्पन्नमती

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
वा!! श्री. सहज यांचा प्रतिसाद मितशब्दी असला तरी परिणामकारक आहे.
"दारु, सिगरेट/तंबाखु, वेश्याव्यवसाय, जुगार ह्या सारखे धंदे कायद्याने चालु असताना ज्योतिष ह्या धंद्यावर बंदी इतक्यात येणार नाही. कोणी काही म्हणले तरी. त्यामुळे आपण फिकीर करु नये. "
हे छानच आहे.श्री. सहज यांना समयोचित असे चांगले सुचते. ते प्रत्युत्पन्नमती आहेत.

तुम्ही या आधी...

स्पष्टच विचारतो -
१. तुम्ही या आधी कुणाच्या चर्चा प्रस्तावांना प्रतिक्रीया दिली आहे?
२. कधी कुणाच्या लिखाणाला दाद दिली आहे?
३. मग इतर कुणी ती तुम्हाला का द्यावी?

आशा आहे याला उत्तर द्याल!

आपला
गुंडोपंत

अपेक्षित

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
अपेक्षित तेच घडले.
" महाराष्ट्र ज्योतिष परिषदेच्या बैठकीत पारित झालेला ठराव :
श्री. श्री.श्री. भट यांनी या प्रसंगी मांडलेल्या ठरावाला उपस्थित सर्वांनी अनुमोदन दिले. हा ठराव पुढीलप्रमाणे होता -
डॉ. जयंत नारळीकर व अंनिस यांनी दिलेले आव्हान आम्हा सर्व ज्योतिषांना अमान्य आहे. ज्योतिषशास्त्राकडे पूर्वग्रहदूषितपणे पहाणार्‍या अंनिसने व तिच्याबरोबर असणार्‍या डॉ. नारळीकर यांनी जनतेची विश्‍वासार्हता गमावली आहे. ही चाचणी संशयास्पद असून तिला कोणीही प्रतिसाद देऊ नये."
हे अपेक्षितच होते. पूर्वी डॉ. अब्राहम कोवूर यांनी राशिभविष्याचा खरेपणा सिद्ध करणार्‍याला एक लाख रुपयांचे बक्षिस ठेवले होते. त्यासाठी कोणीही ज्योतिषी पुढे सरसावला नाही.आता अंनिसचे पाच लाख रुपयांचे आव्हान आहे. त्याला सामोरे जायला अद्यापि कोणीही तयार झाला नाही.
कारण भविष्यकथन निरर्थक आहे.थातुरमातुरा पलीकडे निश्चित भविष्य सांगणे कधीही शक्य होत नाही याची अनुभवी ज्योतिषांना जाणीव असतेच.केवळ धंदा चालला पाहिजे म्हणून ते काहीतरी सांगत असतात.समाजात भोळसट गिर्‍हाइकांची कमतरता नाही.
"छे! असे भविषकथन मला बापजन्मी जमणार नाही. मी किती दिवस लोकांना आणि स्वत:लाही फ़सवीत राहूं? शेवटी मला जाणवले की ज्योतिष हा माझा जीवनव्यवसाय होऊ शकणार नाही. उणंपुरं वर्षभर मी हा मानसिक ताण सोसला.अन्‌ एके दिवशी ज्योतिषकार्यालयाची पाटी स्वहस्ते खाली काढली...त्या दिवसापासून आजपर्यंत कोणाचेही भविष्य सांगीतले नाही.".
.(संदर्भ:आत्मपुराण लेखक: पं.महादेवशास्त्री जोशी.)
अशी सद्सद्विवेक बुद्धीची टोचणी लागणारे आणि आपल्या हातून कोणाची फ़सवणूक होऊ नये म्हणून आपले ज्योतिषकार्यालय स्वहस्ते बंद करणारे पं. महादेवशास्त्री जोशीं सारखे ज्योतिषी अपवादात्मकच.बाकीचे सगळे रेटून खोटे बोलणारे.
***पुण्यातील एका प्रसिद्ध ज्योतिषांच्या संदर्भातील ही सत्यकथा आहे. ते एका अग्रेसर वृत्तपत्रात भविष्यविषयक सदर लिहित असत.त्यांच्या कन्येचा विवाह रीतसर पाहून सवरून ठरला. नियोजित वधुवरांच्या पत्रिका स्वत: त्या ज्योतिषांनीच पाहिल्या. गुण जमले. अनुरूप अशा वराशी लग्न लागले. दुर्दैवाने अल्पकाळातच मुलीला वैधव्य आले. स्वत:च्या कन्येच्या भविष्यात काय आहे तें त्या ज्योतिषांना आधी समजू शकले नाही! कसली पत्रिका नि कसले काय!( पुढे दर आठवड्याला ते लोकांची राशिभविष्ये लिहितच होते.)

नवोदित ज्योतिष वर्गाची भुमिका

बहुतेक ज्योतिषी लोकांचे ज्योतिष वर्ग आहेत. त्यात तयार होणारे नवोदित ज्योतिषी ज्यात डॉक्टर इंजिनियर अशा वजनदार पेशांचा समावेश असणारा वर्ग आहे. मला आलेल्या प्रतिसाद व आत्तापर्यंतच्या अनुभवावरुन त्यांना एकीकडे चाचणी ही पटणारी गोष्ट वाटते. त्यांना प्रामाणीक पणे वाटते कि अशी चाचणी असण्यात काय गैर आहे? एकदा आपले ज्योतिष ज्ञान घासुन पुसुन् निघेल या निमित्ताने. आणि बुजुर्गांना मात्र भय वाटते. न जाणो हे नवोदित या जाळ्यात अडकले तर ? त्यांना या चाचणीपासुन लांब ठेवण्याचे प्रयत्न केले जातात. आवाहन न स्विकारताही हा भाग स्वयंअध्ययन वा चाचणी सराव म्हणून घेतले तरीही ही बाब नवोदितांना उपयुक्त ठरेल.
प्रकाश घाटपांडे

पटले

प्रकाशराव,
आपले म्हणणे पटते आहे.
त्यांना या चाचणीपासुन लांब ठेवण्याचे प्रयत्न केले जातात.
हे निषेधार्ह आहे. असे व्हायला नको. ज्यांना चाचणी द्यावीशी वाटते त्यांनी ती द्यावी .
आवाहन न स्विकारताही हा भाग स्वयंअध्ययन वा चाचणी सराव म्हणून घेतले तरीही ही बाब नवोदितांना उपयुक्त ठरेल.
आपले म्हणणे मलाही मान्य आहे. नक्कीच ठरेल्. खुप काही शिकायला मिळेल. नाही पटले तर वेळीच सोडून देता येईल.
पटले तर अभ्यास अजून लक्ष घालता येईल.

हेच मी नवीन यांनाही सुचवले होते.

आपला
गुंडोपंत

हेच

आपल्याला आता सगळे कळायला लागले,
अशी भावना झाली की ठोकर हमखास बसतेच यात वाद नाही!

पत्रीका योग्य असेल तर गोष्टीत्यात असतातच असे मला वाटते.
वेळप्रसंगी त्या मला वाचता येत नाहीत/दिसत नाहीत
हा माझ्या अभ्यासातला/साधनेतला कमी पणा आहे... जोतिषाचा नाही!

उद्या इंजिनियरींग मध्ये सुमारे ६२% मुले एटीकेटीचा आधार घेतात म्हणजे इंजिनियरींग मध्ये काही अर्थ नाही व त्यावर बंदी घातली पाहिजे ही मागणीही तितकीच हास्यास्पद वाटेल ना?
मुले अभ्यास करत नाही असे म्हणा, असेच स्पष्टीकरण याचे असेल असे मला वाटते.
(तसे नसेल तर मग मात्र अभ्यासक्रम सुचवणारी कमिटी मान्य करणारे लोक मुर्ख आहेत असे मान्य करण्यावाचून पर्याय नाही)

अनेक डॉक्टर्स चुकीची निदाने करतात/त्यांच्या कडून होतात.
मग एक निदान चुकले, रोगी दगावला की त्या सगळ्या डॉक्टरांची प्रॅक्टीस बंद केली जाते का?
की वैद्यकातच काही अर्थ नाही असे म्हणतात?
की वैद्यक हे शास्त्र आहे हे ही मान्य नाही?

आपला
गुंडोपंत

वैद्यकातील अनिश्चितता

माझा रोजचा (व्यवसायिक) अभ्यास वैद्यकातील अनिश्चिततेबाबत आहे.

वैद्यकातील ठोकताळ्याची अनिश्चितता मोजण्यासाठी सांख्यिकी आहे. कितपत अनिश्चितता ग्राह्य आहे (त्याहून अधिक ग्राह्य नाही) त्याबद्दल निकष आहेत. तेच निकष वापरल्यास कुठलेही भाकिते करणारी चौकट (वैद्यकाइतपत) शास्त्रीय मानता येईल.

फलज्योतिष्यात अनिश्चिततेच्या मोजमाप कसे करतात? कितपत अनिश्चितता ग्राह्य/अग्राह्य मानतात - त्यासाठी कुठले निकष वापरतात?

कशी

ठोकताळ्याची अनिश्चितता मोजण्यासाठी भाव, ग्रह, त्यांची स्थिती, नक्षत्रे व त्यांचे स्वामी यांची स्थिती
यावरोन मोजली जाते असे वाटते.
आज यातल्या कोणत्याही पद्धतीत मी पारंगत नाही.
यावर मी काही बोलावे असा माझा व्यासंग, अभ्यास नाही.

अहो शिवाय, ज्योतिषाचा अभ्यास याचेच प्रमाणीकरण झालेले नाही.
हे शिक्षणाचे, पदवीचे प्रमाणीकरण झाले तर काहीतरी संशोधनाला दिशा मिळेल असे वाटते.

मुलतः असे मानणाराही एक वर्ग आहे की,
ज्योतिषाचा अधिकारी होण्यासाठी ज्योतीष्मती प्रज्ञा जागृत असायला हवी. त्या नंतर किमान १६ वर्ष ज्योतिषाचा अभ्यास करावा.
ज्योतीष्मती प्रज्ञा जागृती कधी येते या बद्दल काही मत प्रवाह आहेत.
यात महत्वाची गोष्ट अशी मानली जाते की, कुंडलिनी जागृती आल्याशिवाय
ज्योतीष्मती प्रज्ञा जागृतीला महत्व नाही.
कुंडलिनी जागृतीसाठी योगसाधना व वासनांवर विजय महत्वाचा!
प्राणायम, यम नियम आदिं चे पालन होणे आवश्यक!
कुंडलिनी जागृतीसाठी काही योग अवस्था महत्वाच्या.
या अवस्था येण्यासाठी प्राणायमाचा अभ्यास व्हायला हवा.
प्राणायमाची बैठक तयार होण्यासाठी किमान १८० दिवस नियमांनी प्राणायमाचा अभ्यास व्हायला हवा.
मला नाही वाटत आज यातले काही वापरात आहे.
मुळात ज्याने काही अंशीतरी भावनांवर विजय मिळवला/तसा प्रयत्न केला आहे. असा माणूस पैशांमागे धावणार नाही.
अर्थातच त्याचे चित्त जागेवर असेल.

अशा स्थितीतून जे काही कुंडलीद्वारे पाहण्याचा प्रयत्न होईल ते निर्मळच असेल, यात कुणालाही शंका असण्याचे काही कारण नाही.

या उतरंडी मध्ये अनिस व इतर टिकाकार कुठे बसतात हे ज्याचे त्याने पहावे.
आपण कुठे आहोत याचा अंदाज घेवून त्यानुसार वाफ दवडावी!

आपला
गुंडोपंत

चुकीची तुलना

उद्या इंजिनियरींग मध्ये सुमारे ६२% मुले एटीकेटीचा आधार घेतात म्हणजे इंजिनियरींग मध्ये काही अर्थ नाही व त्यावर बंदी घातली पाहिजे ही मागणीही तितकीच हास्यास्पद वाटेल ना?

अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकवल्या जाणार्‍या सर्व संकल्पना या वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध झालेल्या आहेत आणि (म्हणूनच) व्यवहारात वापरल्या जात असलेल्या आपण पाहतो. त्याचा वापर करून गाड्या, रेल्वे, जहाजे, विमान इ. नेहमी चालताना आपण पाहतो. वीजेची निर्मिती, वहन, वितरण आणि वापर आपल्या जीवनाचा भाग आहेत. वेगवेगळी वीजेची उपकरणे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, संगणक, फोन, मोबाइल इ.इ. असंख्य गोष्टी आपण पाहतो, वापरतो. अभियांत्रिकीच्या बळावरच मंगळावर मानवनिर्मित यान फिरते आहे. (अवांतर - मंगळाचा त्यावर काही परिणाम कसा झाला नाही हे एक वेगळेच कोडे आहे. का नासाने मंगळाची शांती करून घेतली होती कोणास ठाऊक) त्या सर्वांमध्ये अभियांत्रिकीची मूलभूत तत्वे वापरली असतात. हे कळण्यासाठी अभियांत्रिकीचा सखोल अभ्यास करण्याची गरज नाही.

जर ही तत्वे बरोबर आहेत हे सिद्ध झाले नसेल, चुकीची तत्वे बरोबर म्हणून शिकवली जात असतील आणि सिद्ध न करता फक्त विश्वास ठेवा असे सांगितले जात असेल तर अभियांत्रिकीवर बंदी घालणे योग्य आहे.

वैद्यकातही अमुक एक रोग अमुक जिवाणू/विषाणूंमुळे होतो हे संशोधनातून कळले आहे आणि त्यातून बहुसंख्य रोगांवर इलाजही निघाले आहेत. वैद्यकातील मूलभूत तत्वे अशी सिद्ध झालेली आहेत. हे कोणीही तपासून पाहू शकते.

हे असे का होते? याचे उत्तर या दोन्ही विषयात मिळते तसे फलज्योतिषाचे आहे का? एखाद्या मुलीच्या जन्माच्या वेळी मंगळ ग्रह अमुक ठिकाणी होता म्हणून आता वीस/पंचवीस वर्षानंतर तिचे जेव्हा लग्न होईल तेव्हा पतीच्या जीवाला धोका आहे (तपशीलाबद्दल चुभूद्याघ्या) असे ज्योतिषी म्हणत असेल तर जीवाला धोका होणार का? झाला तर कधी? आणि सर्वात महत्त्वाचे, हे असे का होईल? या प्रश्नांची उत्तरे निश्चितपणे देता येतील का?

पत्रीका योग्य असेल तर गोष्टीत्यात असतातच असे मला वाटते. वेळप्रसंगी त्या मला वाचता येत नाहीत/दिसत नाहीत. हा माझ्या अभ्यासातला/साधनेतला कमी पणा आहे... जोतिषाचा नाही!

असे असेल तर 'हा दोष फलज्योतिषाचा नाही' हा फार तर तुमचा विश्वास असू शकतो सत्य नाही. कारण तुमच्या मते संपूर्ण अभ्यास केल्यावर यात तथ्य नाही असेही तुम्हाला जाणवू शकते.

भाकितांचा बोजवारा

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
** दोन वर्षांपूर्वी ई-टीव्ही (मराठी) वरील ’संवाद’ कार्यक्रमात एका प्रसिद्ध ज्योतिषाची मुलाखत झाली. त्या ज्योतिषाने खास ई-टी.व्हीच्या प्रेक्षकांना म्हणून एक भाकीत सांगीतले ते असे:
"येत्या तीन महिन्यांत राष्ट्रवादी कॉंग्रेस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर दावा करील. नंतर महिन्याभरात राष्टवादीचे एक आमदार मुख्यमंत्री होतील.
या भाकिताचे काय झाले ते सांगणे नलगे.
**२००४ च्या लोकसभा निवडणुकीत N.D.A. बहुमत मिळवील. त्यांचेच सरकार येईल असे भविष्य बहुतेक सर्व प्रसिद्ध ज्योतिषांनी वर्तवले होते. पंतप्रधान श्री. वाजपेयी होतील की अडवाणी याविषयी थोडी मतभिन्नता होती. पण डॉ. मुरलीमनोहर जोशी प्रचंड बहुमताने निवडून येतील आणि मंत्रिमंडळात त्यांना महत्त्वाचे पद मिळल असे छातीठोकपणे सांगणार्‍या प्रसिद्ध ज्योतिर्विदांची संख्या अडतीस होती. पुण्यातून निवडून येणार्‍या खासदारांची नांवे चार सुप्रसिद्ध ज्योतिषाचार्यांनी वर्तवली होती. ही सर्व भाकिते सपशेल खोटी ठरली.( पण दुसर्‍या दिवसापासून हे चारजण निर्लज्जपणे राशीभविषाचे सदर लिहितच होते.) ज्योतिषांचे आश्रयदाते डॉ. मुरलीमनोहर जोशी तर निवडणुकीत पराभूत झाले.(बहुधा त्यांचे डिपॉझिट जप्त झाले असावे. पण निश्चित आठवत नसल्याने मी तसे विधान करीत नाही.)

मला वाटते

मला माझ्यापुरते वाटते की,
जगात आपल्यालाच सगळे काही कळते हा भ्रम अंगी बाणवणे योग्य नाही.
काही गोष्टींची खात्री नकळत पटत जाते. आपले आयुष्य ही प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारे पटणारी गोष्ट आहे.
जोतिषाचे म्हणाल तर मी स्वतः या सगळ्या जोतिषाच्या/दैववादी विचारांच्या विरोधात अनेक वर्ष राहिलो आहे.
अनेक जणांशी भांडलो आहे. वाद घातले आहेत. आव्हाने दिली आहेत.

पण पुढे जाणीव वाढत गेली तसे या वादांमध्ये असे जाणवत गेले की, अरे या विषयातली आपल्याला काय माहिती आहे?
मग ज्या गोष्टीची पुर्ण माहितीच आपल्याकडे नाही, ज्यावर काही भाष्य करण्याची पात्रता आपल्यापाशी नाही,
त्याला नाकारण्याचा मला काय अधिकार?
मी जेंव्हा पाराशर, भृगु, वराहमिहिर आणि इतर यांच्या विचारधारा समजून घेईन,
ते काय म्हणाले आहेत, कोणत्या संदर्भात म्हणाले आहेत,
हे समजेन तेंव्हा मला कदाचित यावर काही भाष्य करायला मिळेल.

या विचारांनी मी अभ्यासाला सुरुवात केली आहे.
आपल्या कुवती/ज्ञानापलिकडेही काही आहे, ज्याचे आकलन तर्कमार्गाने होत नाही, ही जाणीव खुप काळ अस्वस्थ करून गेली...
स्वतःशी वाद घालण्यात, चिंतनात बराच काळ व्यतीत झाला. मग मलाही हे कळायला हवे, ही जाणीव वाढत गेली.
अजूनही मी या वाटेवरचा बालवाडीचा विद्यार्थीच आहे.
मात्र या बालवाडीतही मला इतकेच ठाम कळले आहे की "सगळे मला कळते" हा भ्रम व्यर्थ आहे.

जिथे अनेक ज्ञानी लोकांनी, ऋषीमुनींनी आयुष्येच्या आयुष्ये या चिंतनात घालवली त्यात काहीच नाही असे म्हणून नाकारूनच मोकळे होणे हा आत्मघातच आहे असे आता मला वाटते.

वरील प्रतिसादांमुळे काही गैरसमज होऊ नये म्हणून मी माझी भुमीका सांगितली.
ज्यांना परिक्षा घ्यायची आहे त्यांनी आपला या क्षेत्रातला ज्ञानाचा अधिकार आत्मसंशोधनाने पाहावा व परिक्षा घ्यावी, हा अधिकार ज्यांना योग्य वाटेल मान्य असेल त्यांनी ती परिक्षा द्यावी इतकेच मला वाटते!

आपला
गुंडोपंत

आमचा भ्रम

मात्र या बालवाडीतही मला इतकेच ठाम कळले आहे की "सगळे मला कळते" हा भ्रम व्यर्थ आहे.

आम्हाला इतकेच ठाम कळले आहे की ज्योतिष्याला सामान्य माणसापेक्षा जास्त भविष्यातले काही दिसते हा भ्रम आहे! (तुम्ही 'व्यर्थ' चुकून लिहिले आहे असे दिसते, तुम्हाला अपेक्षित अर्थाच्या विपरित अर्थ ध्वनित होतोय.)

जिथे अनेक ज्ञानी लोकांनी, ऋषीमुनींनी आयुष्येच्या आयुष्ये या चिंतनात घालवली त्यात काहीच नाही असे म्हणून नाकारूनच मोकळे होणे हा आत्मघातच आहे असे आता मला वाटते.

अनेक ऋषीमुनींमध्ये फलज्योतिषाचे समर्थन करणारे किती आणि कोण याचा अभ्यास करून पाहणे डोळे उघडणारे ठरावे.

ठीक!

मुळात, माझ्याकडे आपल्या इतकी अफाट बुद्धीमत्ता नाही.
शिवाय आपल्यासारखे शब्दांत खेळण्याचे चातुर्यही मजपाशी नाही.
आपण काही गोष्टी ठरवून टाकल्या आहेत असेही आपल्या लेखनातून जाणवते आहे.
आपल्याशी या विषयावर पुढे वाद घालणे मला शक्य वाटत नाही.
त्यामुळे तुमचे मुद्दे तुमच्यापाशी, माझे माझ्यापाशी!
कारण जगातली यच्चावत उदाहरणे आपण एकमेकांना दिली, तरी आपला वाद कधीच संपणार नाही.

या सर्व कारणांमुळे मी वादातून मी अंग काढून घेत आहे!

या शिवाय आधीच्या प्रतिसादात मी,
माझी भुमीका स्पष्ट केलीच आहे.

आपला
कोणतेही शेवट नसलेल्या वादांना कंटाळलेला
गुंडोपंत

 
^ वर