भारतीय ज्योतिषविषयक पद्धतीचा मतिमंदतेच्या संदर्भात अभ्यासप्रकल्प (भाग २)

भाग १चा दुवा

अभ्यासप्रकल्पाचे सांख्यिकी बळ, प्रामादिक निष्कर्षाची शक्यता, प्रकार १ व प्रकार २चे प्रामादिक निष्कर्ष
प्रकार १ व प्रकार २चे प्रामादिक निष्कर्ष कुठले, हा विचार या अभ्यासप्रकल्पाबाबत करण्यालायक आहे. विचारांची सुरुवात येथून सुरू होते - सध्या मानले जाणारा विचार काय आणि सिद्ध किंवा असिद्ध केला जाणारा नवीन विचार काय? सध्या मानला जाणारा विचार जर ठीकच असेल, पण चाचणीमध्ये तो चुकीचा आहे असा प्रामादिक निष्कर्ष निघाला, तर त्याला प्रमाद-प्रकार-१ असे म्हणतात. सध्या मानला जाणार्‍या विचारापेक्षा वेगळा, नवीन विचार वस्तुस्थितीच्या जवळ जाणारा असला, पण सद्यस्थिती ठीक आहे, असा प्रामादिक निष्कर्ष चाचणीतून निघाला, तर त्याला प्रमाद-प्रकार-२ असे म्हणतात. वैद्यकात "सद्यस्थिती"चा अर्थ सामान्यपणे "अभ्यासवस्तूत जो संबंध शोधत आहोत, तसा कुठलाच संबंध नाही" असा घेतला जातो. "संबंध यदृच्छेपेक्षा वेगळा आहे" यास वैद्यकात नवीन विचार मानला जातो. परंतु, "सद्यस्थिती"चा असाही अर्थ घेता यावा - "जे काही सध्या मानले जाते ते - (म्हणजे संबंध आहे असे मानत असल्यास, तीच सद्यस्थिती.)" अनिश्चित निष्कर्ष मिळाल्यास सद्यस्थिती राखावी - इंग्रजी शब्द "डीफॉल्ट पोझिशन".

जर अनिश्चित निष्कर्षांच्या बाबतीत राखला जाईल तो विचार "यदृच्छेवेगळा काहीच संबंध नाही" असा असेल, तर काही स्पष्ट सिद्ध करायचे ओझे "काही संबंध आहे" या प्रमेयावर पडते. या परिस्थितीत :
- प्रमाद-प्रकार-१ असा की चाचणीत प्रामादिक संबंध भासतो, पण वस्तुस्थितीत कुठलाच संबंध नसतो.
- प्रमाद-प्रकार-२ असा की चाचणीत संबंध नाही असा प्रामादिक भास होतो, पण वस्तुस्थितीत संबंध असतो.

जर अनिश्चित निष्कर्षांच्या बाबतीत राखला जाईल तो विचार "यदृच्छेवेगळा काहीच संबंध आहे" असा असेल, तर काही स्पष्ट सिद्ध करायचे ओझे "काही संबंध नाही" या प्रमेयावर पडते. या परिस्थितीत :
- प्रमाद-प्रकार-१ असा की चाचणीत संबंध नाही असा प्रामादिक भास होतो, पण वस्तुस्थितीत संबंध असतो.
- प्रमाद-प्रकार-२ असा की चाचणीत प्रामादिक संबंध भासतो, पण वस्तुस्थितीत कुठलाच संबंध नसतो.

हा काथ्याकूट पुढील कारणाकरिता : चाचणी ही शितावरून भाताची परीक्षा आहे. त्यामुळे निष्कर्ष संदिग्ध असल्यास सद्यस्थिती बदलण्याबाबत चाचणी हात राखून असली पाहिजे. प्रमाद-प्रकार-१ फार मोठ्या प्रमाणात होण्यास चाचणीने वाव देऊ नये. (वैद्यकीय चाचण्यांमध्ये प्रमाद-प्रकार-१ जास्तीतजास्त ५% सुसह्य मानला जातो.) त्याच प्रकारे सद्यविचारांत बदल करणे आवश्यक असून आपण या चाचणीत तो निष्कर्ष काढला नाही, तर तसा प्रमादही कमीतकमी असावा. पण याबाबत संशोधक इतके काटेकोर नसतात. (वैद्यकीय चाचण्यांमध्ये प्रमाद-प्रकार-२ जास्तीतजास्त २०% सुसह्य मानला जातो. तरी ५% पेक्षा अधिक...)

हा विचार करण्यालायक आहे कारण निष्कर्ष संदिग्ध असल्यास काय कामचलाऊ निष्कर्ष पुढे करणार, याविषयी मतभेद जरूर होऊ शकतो. तरी माझे मत आहे, की या अभ्यासप्रकल्पाच्या बाबतीत ही काळजी काही प्रमाणात अनाठायी आहे. दोन विरुद्ध प्रमेयांच्या मध्ये चाचणीला कौल द्यायचा आहे
- १. कुंडल्यांमध्ये आणि वास्तविक मतिमंदतेत यादृच्छिकच संबंध आहे - साधारणपणे ५०% मतिमंद मुलांच्या कुंडल्या मतिमंद म्हणून सांगितल्या जातील, आणि या ५० टक्क्यांत यादृच्छिक गोष्टींत जितके कमी-जास्त अपेक्षित आहे, तितकेच चाचणीत दिसेल
- २. कुंडल्यांमध्ये आणि वास्तविक मतिमंदतेत यादृच्छिकपेक्षा अधिक काही संबंध आहे - तो किती हे आपल्या प्रशिक्षित-ज्योतिषी-सहकार्‍याने सांगायचे आहे. उदाहरणार्थ वर्गीकरण ७५% बरोबर असेल, ९०% बरोबर असेल, असे काही. या ७५% मध्ये (किंवा ९०%मध्ये) यादृच्छिक गोष्टींत जितके कमी-जास्त अपेक्षित आहे, तितकेच चाचणीत दिसेल

एकदा का दोन्ही प्रमेयांचे अपेक्षित आकडे गणिताच्या आधी ठरले, की गणित मुळीच बदलत नाही. केवळ त्या दोन्ही आकड्यांसाठी विश्वासार्हतेची सह्य मर्यादा ठरवावी लागते. वैद्यकीय प्रयोगांत विश्वासार्हतेचि मर्यादा साधारणपणे ९५% निवडतात. म्हणजे उदाहरणादाखल निष्कर्षाचे स्वरूप असे काही असते - बरोबर वर्गीकरण चाचणीत ८०% आहे, वस्तुस्थितीत ते ७०-९०% असल्याचा मला ९५% विश्वास वाटतो, इ.इ. केवळ उदाहरणादाखल असे वाक्य देत आहे.)

किती कुंडल्या उपलब्ध आहेत, ते आपल्याला माहित आहे. त्यातील किती "वर्गीकरण करता येत नाहीत" म्हणून बाजूला काढाव्या लागतील ते प्रकल्पाच्या प्राथमिक टप्प्यानंतर अनुमानित करता येईल. त्यावरून उरलेल्या कुंडल्यांची यदृच्छेने कशी वर्गीकरणे होऊ शकतील, यांचे गणित करता येते. दोन विरोधी प्रमेयांत अपेक्षेचा "खूप" फरक असला तर तो चाचणीतही दिसून येईल, प्रमेये "फारच एकसारखी" असलीत, तर फरक दिसून येणार येणार नाही - चाचणीत जे काही दिसेल ते यदृच्छेने असू शकेल. आता "अपेक्षांचा फार फरक" आणि "फारसा फरक नाही" यांत सीमारेषा कुठे काढायची हे गणित करता येते.

खालील तक्त्यात किती कुंडल्या वर्गीकरणास योग्य मानल्या जातील, आणि अपेक्षांतील कमीतकमी कितपत फरक सांख्यिकीने वेगळा सांगता येईल ते आकडे दिलेले आहेत.

वर्गीकरण करता आल्या त्या कुंडल्यांची संख्या "यदृच्छेपेक्षा = ५०% पेक्षा अधिक असे योग्य वर्गीकरण कितपत अपेक्षित आहे? तो निष्कर्ष ९५% विश्वासार्हतेने काढता आला पाहिजे"
१८० ६१.१%
१६० ६२.५%
१४० ६२.९%
१२० ६३.३ ते ६५%*
१०० ६६%
८० ६७.५%
६० ७० ते ७३.३%*
४० ७५ ते ८०%
२० ९०%

सर्व गणिते "फिशरच्या नेमक्या पद्धती"ने केलेली आहेत. *जिथे दोन आकडे दिले आहेत, तिथे प्रथम आकडा सद्यविचार "यादृच्छिक" मानल्यास, आणि द्वितीय आकडा सद्यविचार "संबंध आहे" असे मानल्यास. कुठलाही विचार "सध्याचा" मानला तरी आकड्यांत फारसा फरक पडत नाही हे लक्षात यावे.

तक्त्यावरून असे दिसून येते, की बहुतेक कुंडल्या वर्गीकृत केल्यात तर यादृच्छिकतेपेक्षा बारा-पंधरा टक्के जरी कुंडल्यांचे वर्गीकरण वरचढ असले तर ते सांख्यिकीच्या दृष्टीने वरचढ म्हणून दिसून येईल. जर बहुतेक कुंडल्या वर्गीकृत करता आल्या नाहीत, तर मूळ प्रमेय सिद्धासिद्ध काहीच करता येणार नाही. तरी ही चाचणी महत्त्वाची ठरेल, कारण अनेक कुंडल्यांचे वर्गीकरण होऊ शकत नाहि, हे नवे ज्ञान ज्योतिषांस आणि जातकांस प्राप्त होईल.

प्राथमिक टप्प्यानंतर मुख्य चाचणीचा टप्पा करण्यासाठी अट अशी :
सर्व संशोधक - यात प्रशिक्षित-ज्योतिषी-सहकारीही आलेच - या बाबतींत एकमताचे असावेत : १. वर्गीकरण करता येत नाहित, अशा सर्वाधिक कुंडल्या किती चालतील, आणि २. "यदृच्छेपेक्षा अधिक" असा संबंध वरील तक्त्यात दिलेल्या सीमेपेक्षा अधिक असावा. असे नसल्यास निष्कर्ष संदिग्ध निघू शकेल, आणि संशोधनातून विशेष निष्पन्न होणार नाही.

समारोप :
येथे वैद्यकीय चाचणीच्या चौकटीत या विषयाच्या अभ्यासाचा प्रकल्प चर्चिला आहे. सांख्यिकीच्या साहाय्याने ज्योतिषांस आणि जातकांसही या संशोधनाचा फायदा व्हावा.

-----------------समाप्त------------------------

Comments

छान

छान

अ. म्ह.


गुं

दमलो

वाचूनच दमलो बॉ!
विचार तर जाउ द्या पण
इतके कसे काय लिहिता तुम्ही?

आपला
गुंडोपंत

भारावलो


वाचूनच दमलो बॉ!
विचार तर जाउ द्या पण
इतके कसे काय लिहिता तुम्ही?


गुंडोपंत तुम्ही दमलात. पण मी मात्र भारावलो. अर्थहानी होता कामा नये ही दक्षता घेउन एवढ सुंदर मराठी अनुवाद एकटा धनंजयच करु जाणे. धनंजय हे एक वेगळेच जैविक रसायन आहे.

प्रकाश घाटपांडे

मा आ

धनंजय हे एक वेगळेच जैविक रसायन आहे.
अगदी मान्य हे!
मला तर काही दिवस वाटायचे
की ही ४-५ माणसे आहेत आणि धनंजय या नावाने एकत्रितपणे लिहितात!
(गुंडोपंतांचे मठ्ठ डोके कसे चालेल काही सांगता येत नाही!)
मग हळू हळू कळले के हा (बहुदा) एकच माणूस आहे!

अजूनही मला तसा संशय आहेच ;)))
पण आता विरत चाललाय तो!

आपला
गुंडोपंत
(लेखक "सूक्ष्म लेखन" करत असतील तर प्रतिसाद पण 'सूक्ष्म' द्यायला काय हरकत आहे?)

अत्यंत अवांतर आणि विनोदी

सावधान : या प्रतिसादाचा सदर चर्चेशी प्रमाद-प्रकार २ इतका सांख्यिकी संबंध असू शकतो. तरीही/त्यामुळे हा प्रतिसाद ह.घ्या. हे. वे. सां. न.ल.!

सांख्यिकीमधून निघणार्‍या निष्कर्षाबद्दल वादविवाद :

आपल्याला आश्चर्य वाटेल की जागतिक तापमानवाढ, भूकंप, बाँबस्फोट, चक्रीवादळे ह्या सर्वांचे मूळ कारण हे इ‌.स. १८०० पासून सतत घटत जाणारी 'चाच्यां'ची (समुद्री चाचे असतात ना? त्यांची) संख्या!

स्पष्टीकरण येथे पहावे : एक आध्यात्मिक पंथ: शेवईवाद

स्पष्टच सांगतो

धनंजय हे एक वेगळेच जैविक रसायन आहे.

हे सगळं बिनदिक्कत मान्य पण लेख पुढे पुढे आणि उत्तरार्धात काडीएक समजला नाही. उगीच फापटपसारा लावल्यासारखा वाटला. मूळ आशय थोडक्या आणि सर्वांना समजेल अशा भाषेत टाकून अधिक माहितीसाठी मूळ लेखाचा दुवा देणे मानवले असते. इथे वर प्रतिसाद देणार्‍यांतील कितीजणांना पहिल्या फटक्यात लेख समजला माहित नाही, समजला असेल तरी सर्व सभासदांच्या तुलनेत ५% लोकांना तरी समजला असावा असं मला वाटतंय. आणखी १०-१२ % लोकांना तो २-४ वेळा वाचून समजेल परंतु त्यांच्याकडे २-४ वेळा वाचण्याइतका वेळ असेलच असे नाही.

हा लेख या उपक्रमात भाग घेणार्‍या ज्योतिषांना समजावा अशीच अपेक्षा करतो.

तसे, आतापर्यंत किती ज्योतिषांनी संपर्क साधला ते कळेल का?

स्पष्ट मताबद्दल राग मानू नका.

-राजीव.

स्पष्टता आणि मर्यादा

हा मूळ प्रोजेक्ट चा मराठी अनुवाद आहे. या पद्धतीचा संख्याशास्त्रीय प्रकल्प भारतीय ज्योतिषात उपलब्ध नाही. एखाद्या विषयाची तांत्रिक क्लिष्टता टाळता येणे हे अवघड आहे. दुसर्‍या भागात तो तांत्रिक तपशील आला आहे. वाचकांच्या एखाद्या विषयाच्या आकलनाचा मसावि / लसावि काढणे हे लेखकाला शक्य असत नाही.

मूळ आशय थोडक्या आणि सर्वांना समजेल अशा भाषेत टाकून अधिक माहितीसाठी मूळ लेखाचा दुवा देणे मानवले असते.


हा पर्याय आहे. पण त्याच बरोबर वाचकाला न वाचण्याचा अथवा आपला तो प्रांत नाही असे समजून प्रतिक्रिया न देण्याचा पर्याय ही उपलब्ध आहे. पण तसे सुचित करणे हे वाचकाचा अवमान केल्यासारखे होते. आमच्या आकलनाच्या मर्यादा काढतो काय? असा विचार वाचकाच्या मनात येतो. तसेच लेखक हा बुद्धिदांडग्यांच्या समुहातील आहे त्याला वाचकांची गरज नाही वा फिकिर नाही असे सुद्धा वाटू लागते . यातुन लेखक व वाचक यात एक दरी व पुर्वग्रह तयार होतो. मग मुळ विषय राहतो बाजुला आणि चर्चेची गाडी वेगळ्या वळणावर येते. ज्याला संगितातील गति वा मति नाही तसेच आस्थाही नाही तो त्या विषयाचा आस्वाद घेउ शकत नाही तो त्याचा दोष नाही हे देखील वास्तव आहे. असा माणुस जर मैफिलिला श्रोता म्हणुन गेला तर गायक / वादक त्याने उस्फुर्त प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा करत नाही. पण त्याने उस्फुर्त प्रतिसाद दिला नाही म्हणुन कलाकार आपल्या सादरीकरणात काही चुक झाली नाहीना असे मात्र बघतो. एखाद्याने जाणकार श्रोत्याने काही त्रुटी काढली तर तो श्रोत्याला तुम्ही गाउन / वाजवुन दाखवा बरं अस म्हणत नाही. एखादी गोष्ट समजून तर घ्यायची आहे पण मी त्यासाठी अधिक लागणारा वेळ मी देणार नाही अशी भुमिका ठेवलि तर गोची होते.

आतापर्यंत किती ज्योतिषांनी संपर्क साधला ते कळेल का?


संपर्क अनेकांनी साधला पण चाचणीत भाग किती घेतात? हे महत्वाचे आणि पुणे परिसरातील ज्योतिर्विदांनी बहिष्कार टाकायचे ठरवले आहे. साधारण पणे १५ जुन नंतर आलेल्या प्रतिसादांना सॅम्पल्स पाठवायची सुरुवात् करणार आहोत.

प्रकाश घाटपांडे

कळले नाही

संपर्क अनेकांनी साधला पण चाचणीत भाग किती घेतात?

नेमका आकडा कळला आणि ते संपर्क साधणारे उत्तर भारतीय होते की मराठी इ. इ. चे विश्लेषण ऐकायला आवडेल.

हे महत्वाचे आणि पुणे परिसरातील ज्योतिर्विदांनी बहिष्कार टाकायचे ठरवले आहे.

तुम्ही हा प्रकल्प त्यांच्यासमोर कधी मांडला आणि कसा मांडला?

साधारण पणे १५ जुन नंतर आलेल्या प्रतिसादांना सॅम्पल्स पाठवायची सुरुवात् करणार आहोत.

किती प्रतिसाद आले आणि त्यापैकी कितीजणांना नमुने पाठवले याची आकडेवारी आपण येथे द्यालच अशी आशा बाळगतो.

लेखक हा बुद्धिदांडग्यांच्या समुहातील आहे त्याला वाचकांची गरज नाही वा फिकिर नाही असे सुद्धा वाटू लागते .

बुद्धीदांडगे नाही हो! उगीचच काय? पण लेखकाला वाचकांची नस पकडता येत नाही हे मात्र म्हणेन.

-राजीव.

मस्त!

प्रतिसाद आवडला ;))

येथून साभार

"एव्हरीथिंग शुड बी मेड ऍज सिंपल ऍज पॉसिबल, बट नॉट सिंप्लर."
सगळे काही शक्य तितके सोपे केले पाहिजे, पण त्याहून सोपे नको.
-आल्बर्ट आइन्स्टाइन

अपेक्षित वाचकवर्ग

अशा प्रकारच्या लेखाचा प्रमुख वाचकवर्ग कोण आहे हे लेखकाला साधारणपणे ठाऊक नसते. अशा वेळी सुरुवातीला सारांश देऊन महत्त्वाचे मुद्दे सांगितले जातात.

१. ज्यांना वेळ नाही त्यांनी सारांश वाचावा (याचा अर्थ बहुतेक शाळा-शिक्षित लोकांना समजेल.)
२. ज्यांच्यापाशी अधिक वेळ आहे, त्यांनी पहिले काही परिच्छेद वाचावेत, आणि गणिताचा भाग सोडून द्यावा.
३. ज्यांना अधिक कुतूहल आहे, आणि गणित खरेच जमते की नाही म्हणून स्वतःला पटवून घ्यायचे असेल, त्यांनी गणितही वाचावे.

सारांश पहिल्या भागात असा दिलेला आहे (लाल अक्षरांत एका वाक्यात फापटपसारा आटोपशीरपणे निपटला आहे.):

सारांश :
* हा अभ्यास-प्रकल्पाच्या चौकटीविषयी सल्ल्याचा सारांश आहे.
* उद्देश असा : शाळकरी मुलांच्या जन्मकुंडल्यांचे मतिमंद आणि सामान्य-मती असे वर्गीकरण प्रत्यक्षातल्या मतिमंदतेशी/सामान्य-मतीशी कितपत जुळते त्याचा ताळा करणे. श्री घाटपांडे यांच्यापाशी १०० मतिमंद आणि १०० सामान्य-मती शाळकरी मुलांच्या कुंडल्यांचे विदागार आहे.
* माझा अभिप्राय आहे की प्रशिक्षित ज्योतिषांना विश्वासात घेऊन प्राथमिक अभ्यास व्हावा. या अभ्यासात काही कुंडल्या आधीच कुठल्या मतिमंद आणि कुठल्या सामान्य-मती ते सांगून प्रशिक्षित ज्योतिषांना अभ्यासण्यास द्याव्यात.
* शिवाय थोडक्यात केलेली चर्चा -
(१) अभ्यासकांनी आणि प्रशिक्षित-ज्योतिषांनी कुंडल्यांचे वर्गीकरण कसे करावे, त्याबाबत काही प्राथमिक विचारार्थ पर्याय
(२) वेगवेगळे पर्याय निवडल्यास विश्लेषणासाठी योग्य असलेल्या वेगवेगळ्या गणितपद्धती
(३) संशोधनात सद्यविचार कुठला आणि नवविचार कुठला हे ठरविण्याचे महत्त्व - आणि ते न ठरवताही हा अभ्यासप्रकल्प राबवता येईल, हा विचार. अभ्यासप्रकल्प मर्यादित असल्यामुळे निष्कर्षातील अनिश्चिततेचे मोजमाप - कितपत अनिश्चितता ग्राह्य याबाबत निकष
(४) ज्या कुंडल्यांचे वर्गीकरण करणे अशक्य आहे, त्यांच्याबद्दल विचार
(५) भाकितांची अनिश्चितता कितपत असल्यास आणि अभ्यासप्रकल्पाची निर्णायकता कितपत असणार याविषयी तक्ता

प्रतिसादांतून असे दिसून आलेच असेल, की काही वाचकांना सुज्ञ प्रश्न सुचले. उदाहरणार्थ प्रियाली यांना प्रश्न सुचला की हवामानखात्याची भाकिते अनिश्चित असतात. मग ज्योतिषातील भाकितांच्या अनिश्चिततेविषयी काय करणार?
विसुनाना यांना प्रश्न सुचला की प्रकल्प "ज्योतिष चुकले आहे" असे सुरुवातीला मानून मांडला आहे. या भागात ते तसे नसल्याचे गणित दिलेले आहे.
(हे प्रश्न उदाहरणादाखल, अन्य सुज्ञ प्रश्नही वेगवेगळ्या प्रतिसादांत दिसतील.)

प्रियाली, विसुनाना, आणि अन्य वाचकांची बोळवण अशी करता येणे शक्य होते - "हे सर्व सांख्यिकी गणिताने जमते." पण तितके वाक्य फेकले असते, तर त्यांच्या शाहाण्या विचारक्षमतेचा अपमान झाला असता.

कोणा विशिष्ट व्यक्तीला त्यांच्या विवक्षित शालेय अनुभवांवरून (त्यांनी शाळेत निवडलेल्या विषयांचे आगमस्थान मानून) हा अहवाल लिहिणे शक्य आहे. पण वेगवेगळ्या लोकांनी शाळेत वेगवेगळे विषय निवडल्यामुळे तसा अहवाल फारच व्यक्तिसापेक्ष होऊ शकेल.

 
^ वर