सृजनशीलता - भाग ८ - मला दिसलेली

(मागील भागावरून पुढे चालू)

मागील भागांत म्हंटल्याप्रमाणे सृजनशीलतेची अनेक उदाहरणे स्वत:च्या व इतरांच्या अनुभवांत तसेच वा़ड्मयांत - विशेषत: विनोदांत व चातुर्यकथांत आढळून येतात. त्यांतील काही उदाहरणे खाली दिली आहेत.

१) सर्वसाधारण माणसांना चाकोरीबद्ध विचार करण्याची संवय असते. याचा (गैर)फायदा घेऊन काही चतुर माणसे इतरांना विशिष्ट विचारशृंखलेंत अडकवून आपल्या अनपेक्षित कृतीने त्यांना चकित करतात.
अ) आग्र्याच्या कैदेंतून सुटण्यासाठी शिवाजी महाराजांनी पहारेकर्‍यांचे विचार पेटार्‍यांभोवती घुटमळत राहतील अशी योजना केली व स्वत: पेटारे वाहून नेणार्‍या भोयाच्या वेषांत सटकले (असे म्हणतात). दुसर्‍या प्रसंगी शाहिस्तेखानाची बोटे कापल्यावर पाठलाग करणार्‍या मोंगल सैन्याला बैलांच्या शिंगांना जळते पलिते बांधून कात्रजच्या घाटांत चकवले होते.
ब) अशाच प्रकारची आणखी एक चातुर्यकथा पहा.
एकदा एका राजपुत्राने आपल्याला तलवारयुद्धाची कला शिकवलेल्या गुरूला द्वंद्वाचे आव्हान दिले. गुरूंनी ते शांतपणे स्वीकारले.
राजाज्ञेप्रमाणे द्वंद्वाचा दिवस ठरला. त्याअगोदर काही दिवस गुरूंनी राज्यांतील लोहाराकडे आपल्या तलवारीसाठी नेहमींच्या चौपट लांबीचे म्यान करायला टाकल्याची बातमी राजपुत्राच्या कानांवर आली. आपल्या गुरूंचा स्वत:च्या लांब तलवारीने लांबूनच आपला पराभव करायचा विचार आहे हे राजपुत्राच्या लक्षांत आले म्हणून त्यानेही लोहाराकडे स्वत:साठी चौपट लांबीची तलवार व तिच्यासाठी म्यान तयार करायला टाकले.
द्वंद्वाच्या दिवशी राज्यांतील सर्वजण ठरलेल्या ठिकाणी गोळा झाले. गुरू व राजपुत्र दोघेही कमरेला लटकणार्‍या लांबलचक तलवारींनिशी हजर झाले. द्वंद्व सुरू होण्याचा इशारा होताच दोघेही तलवार काढू लागले. राजपुत्राला आपली मुद्दाम बनवून घेतलेली चौपट लांबीची तलवार म्यानांतून पूर्ण बाहेर काढता येईना. गुरूंना मात्र आपली तलवार झटकन काढता आली कारण म्यान चौपट लांबीचे होते तरी त्यांत असलेली गुरूंची तलवार नेहमींच्याच लांबीची होती. शेवटी तलवारही काढता न आल्यामुळे राजपुत्राचा पराभव झाला.
२) इतरांच्या सहजासहजी लक्षांत न येणार्‍या तर्कसंगतीचा वापर करून साहित्यांत कधीकधी विनोद निर्माण केला जातो (भाग - १).
अ) चिं.वि.जोशी यांच्या "उन्हाळा आला" या लेखांत एका गप्पिष्ट टोळक्यांतील संभाषण दिले आहे. त्यांत एकजण म्हणतो, 'आपण कोकिळेचा आवाज चांगला व कावळ्याचा आवाज वाईट म्हणतो कारण पूर्वींपासून कवी व लेखकांनी लोकांना ठरवून मूर्ख बनवलय्.' त्यावर दुसरा म्हणतो, 'म्हणजे तुला असं म्हणायचंय का की साहित्यिकांनी लोकांना बनवण्याच्या हेतूने कोकिळेला विनकारण हरभर्‍याच्या झाडावर चढवले?' त्यावर तिसरा विचारतो, 'चढवलं का उतरवलं? कारण कोकिळा आंब्याच्या झाडावर असते आणि हरभर्‍याचं झाड आंब्याच्या झाडापेक्षा ठेंगणं असतं.'
ब) पु.ल.देशपांडे यांनी खानावळीवर लिहिलेल्या लेखांत म्हंटले आहे की, 'अन्न हे पूर्ण ब्रह्म' असं म्हणणारा ऋषि वेदकालीन खानावळीचा मेंबर असावा. खानावळीचं अन्न खाऊन ज्याला ब्रह्म आठवलं नाही असा मेंबर विरळा.
३) विचारार्थ घेतलेल्या गोष्टीचे चित्र मन:चक्षूंसमोर आणण्यामुळे एरवी न सुचणारी कल्पना सुचू शकते (भाग - ६).
अ) इसापाच्या ओझ्याची गोष्ट सर्वांना ठाऊक असेलच.
ब) अशीच आणखी एक गोष्ट पाहू.
एका गावांत भागीदारींत कापसाचा व्यापार करणार्‍या चार व्यापार्‍यांचे गोडाऊन होते. एकदा त्या गोडाऊनमध्ये एक मांजर राहायला आली आणि त्या दिवसापासून त्यांच्या व्यापाराला तेजी आली. म्हणून त्यांनी ती शकुनाची मांजर पाळायचे ठरवले. तिचा खाण्यापिण्याचा खर्च आपसांत वाटून घ्यायचे ठरले व औषधपाण्यासाठी त्यांनी तिच्या शरीराची वाटणी करून घेतली. त्यांत त्यांनी प्रत्येकाच्या वाटणीचा पाय ठरवून टाकला.
एकदा त्या मांजरीच्या एका पायाला अपघात झाला. ज्याच्या वाटणीचा तो पाय होता तो व्यापारी तिला पशुवैद्याकडे घेऊन गेला व आपल्या खर्चाने त्याला बँडेज बांधले. त्या अवस्थेंत ती मांजर तीन पायांवर लंगडत फिरू लगली.
एके दिवशी एका घरासमोर लावलेल्या पणतीच्या बाजूला सरकल्यामुळे तिच्या बँडेजच्या थोड्या सैल झालेल्या टोकाने पेट घेतला. त्याबरोबर मांजर घाबरली व पटकन् आपल्या सुरक्षित घरांत अर्थात् गोडाऊनमधे गेली. पायाला लागलेली आग आंतील कापसाला लागली व सर्व कापूस माजरीसह जळून खाक झाला.
ज्या पायाच्या बँडेजमुळे आग लागली होती त्या पायाच्या मालकाला इतरांनी जबाबदार धरले व त्याच्याकडे नुकसानभरपाईची मागणी केली. पण दुखावलेल्या पायाच्या मालकाला ते मान्य झाले नाही व तो कोर्टांत गेला.
झालेल्या घटनेवर विचार करून कोर्टाने निर्णय दिला की दुखावलेल्या पायाच्या बँडेजला लागलेल्या आगीमुळे कापूस जळला असला तरी बँडेजला आग गोडाऊन बाहेर लागली होती. या बाहेर लागलेल्या आगीला गोडाऊनमधे नेण्याचे काम बाकीच्या तीन पायांनी केले कारण मांजर दुखावलेल्या पायाने चालू शकत नव्हती. म्हणून नुकसानाची जबाबदारी चांगल्या पायांचे मालक असलेल्यांवर आहे. त्यांनीच सर्व नुकसान सोसायला पाहिजे.
४) इच्छानुवर्ती विचार (wishful thinking) :
अ) एक लघु उद्योजक डीझेलवर चालणार्‍या विद्युत्जनित्रांसाठी विद्युत्दाब नियामक उपकरणे बनवीत असत. ही उपकरणे स्वत:ची विद्युत् जनित्रे असणार्‍या साखर कारखान्यांना लागतात. सदर उद्योजक ऑर्डर मिळवण्यासाठी अशाच एका कारखान्यांत गेले. त्यांत चार वेगवेगळ्या क्षमतेची जनित्रे होती. नियामकाचे डिझाइन् ज्या जनित्रासाठी ते वापरायचे त्याच्या क्षमतेवर अवलंबून असल्यामुळे सदर गृहस्थांनी कारखान्याच्या व्यवस्थापनाला प्रत्येक जनित्रासाठी दोन (एक वापरांत व तो बिघडल्यास काम अडू नये म्हणून एक ज्यास्तीचा) नियामक घ्या असे सुचवले. त्यावर व्यवस्थापनाने त्यांना, कुठल्याही मशीनवर लावता येईल असे उपकरण (wishful thinking) दिलेत तर आम्हाला ज्यास्तीचा एक नग ठेवला तरी पुरे होईल कारण सर्व नियामक काही एकदम बिघडणार नाहीत, असे सांगितले. याचा अर्थ कारखान्याला आठाऐवजी पाचच नग घेऊन चालले असते. जनित्राच्या क्षमतेप्रमाणे उपकरणाच्या आकारांत होणारा बदल त्यांतील काही घटकांच्या बदलणार्‍या क्षमतेमुळे होता, हे लक्षांत घेऊन सदर उद्योजकाने असे घटक ज्यास्तींत ज्यास्त क्षमतेचे घेऊन त्यावर हवी तितकी क्षमता निवडण्याची सोय (tapping) करण्याचा मार्ग काढला व व्यवस्थापनाची सूचना मान्य केली. त्यामुळे प्रतिनग किंमत थोडी वाढत होती. पण आठाऐवजी पाचच नग पुरत असल्यामुळे गिर्‍हाइकाचा त्यांत फायदा होता. त्या उद्योजकाला पाच नगांची ऑर्डर मिळाली.
ब) एका कंजूष व्यापार्‍याने मरणासन्न असतांना मरणोत्तर आपल्याला चांगली गति मिळावी म्हणून एका ब्राह्मणाच्या सांगण्यावरून आपल्या मृत्यूनंतर आपला घोडा विकून जी किंमत येईल ती ब्राह्मणाला दान करावी अशी इच्छा व्यक्त केली. त्याच्या मृत्यूनंतर ती अखेरची इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी त्याच्या बायकोवर येऊन पडली. तिची घोड्याच्या किंमतीएवढी मोठी रक्कम - जी त्याकाळी १०० रुपये होती - दान करण्याची बिलकुल इच्छा नव्हती. पण ती नवर्‍याला तसे वचन देऊन बसली होती. काही दिवसांनी लोकांकडून व ब्राह्मणाकडून सारखी विचारणा होऊ लागल्यावर नवर्‍याची इच्छा पूर्ण करण्यासाठी ती घोड्याला विकायला बाजारांत घेऊन गेली. त्याच्या गळ्यांत लावलेल्या पाटीवर तिने घोड्याची किंमत १ रुपया अशी लिहिली. इतक्या स्वस्तांत घोडा मिळ्तोय् हे पाहिल्यावर अनेक गिर्‍हाइके चौकशीला आली. आलेल्या प्रत्येक गिर्‍हाइकाला ती आपल्या हातांतील मांजर दाखवून सांगे, ' जो माझी ही मांजर ९९ रुपयांना घेईल त्यालाच घोडा १ रुपयाला मिळेल'. तसाही घोडा १०० रुपयांना वाईट नव्हता म्हणून एक गिर्‍हाइक तयार झाले. व्यापार्‍याच्या बायकोने घोडा विकून आलेला एक रुपया ब्राह्मणाला दान केला.

वरीलप्रमाणे अजून कित्येक उदाहरणे आहेत. पण हा भाग अगोदरच फार लांबल्याने आवरता घेतो.

आत्तापर्यंत आपण वैयक्तिक पातळीवरील सृजनशीलतेविषयी पाहिले. एखादा गट किंवा समूह एकत्रितपणे सृजनशील कसा होऊ शकतो ते पुढील भागांत पाहू.

(क्रमश:)

Comments

वा!

उदाहरणे मस्त आहेत. हा भाग वाचून कधी संपला कळलेच नाही. शकुनी मांजराची गोष्ट मस्त आहे :) पुढच्या भागांत काय?

मस्त

आत्तापर्यंतचे सगळे भाग् वाचले खूपच आवडले पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत..

असेच

आत्तापर्यंतचे सगळे भाग वाचले खूपच आवडले पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत..

असेच म्हणतो.

वा! फार छान!

ही डोक्यालिटी फार्फार आवडली.
पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत.

सुरेख

उदाहरणे छान आहेत. क्रमांक एक मध्ये बसेल असे आणखी एक उदाहरण क्रिकेटमध्ये बरेचदा बघायला मिळते. जलदगती गोलंदाजाने अचानक टाकलेला 'स्लोअर वन' किंवा फिरकीवाल्याने टाकलेला राँग वन/गुगली ही आणखी काही उदाहरणे. कदाचित यामुळेच खूप वग नसतानाही पोलॉक किंवा मॅकग्रासारखे खेळाडू इतके यशस्वी झालेले दिसतात.
----

 
^ वर