सृजनशीलता - भाग ७ - भन्नाट कल्पना

(मागील भागावरून पुढे चालू)

नवीन नवीन कल्पना हा नवनिर्मितीचा कच्चा माल आहे. त्यांतील काही भन्नाट असतात. बर्‍याच वेळा त्या हास्यास्पद व वेडगळपणाच्या वाटतात. त्या मांडणारा लोकांच्या उपहासाचा विषय होतो. त्यामुळे बहुतेक वेळा अशा कल्पना शब्दरूप घेण्यापूर्वीच निकालांत निघतात. तथापि मनुष्यजातीच्या प्रगतीचा इतिहास पाहिला तर अनेक क्रांतिकारक बदलांच्या मुळाशी एकेकाळी भन्नाट वाटणार्‍या कल्पना होत्या असे दिसून येते. आपल्याला पक्ष्यांप्रमाणे हवेंत उडता यायला हवे ही कल्पना कोणाच्या तरी डोक्यांत आली, त्याने ती मांडली म्हणून विमानाचा शोध लागला. त्यामुळे भन्नाट कल्पनांची निर्मिति करता येणे हा सृजनशीलतेंतील महत्त्वाचा भाग आहे. अशा कल्पना निर्माण करण्याच्या मुख्यत: तीन पद्धती आहेत.
१) एखादी प्रचलित, नेहमींच्या व्यवहारांतील कल्पना शब्दबद्ध करून ती उलट करणे : यांत उलट करणे म्हणजे होकारात्मक विधान नकारात्मक करणे नव्हे, तर त्यांतील क्रम, तर्कसंगति, घटकांचा परस्परसंबंध उलट करणे होय. उदहरणार्थ, माणूस बस पकडतो याच्या उलट कल्पना माणूस बस पकडत नाही अशी नसून बस माणसाला पकडते अशी आहे. अशाच आणखी काही परस्पर विरोधी कल्पनांच्या जोड्या:
अ) मी शीतपेय पितो याउलट शीतपेय मला पिते.
ब) दुकानदार/उत्पादक वस्तूची किंमत ठरवतो व गिर्‍हाइक त्या किंमतीला ती वस्तू विकत घेते याउलट गिर्‍हाइक वस्तूची किंमत ठरवते व दुकानदार/उत्पादक त्या किंमतीला ती वस्तू गिर्‍हाइकाला विकतो.
वरीलपैकी उलट कल्पना (ब) च्या व्यवहार्यतेबद्दल आपण विचार करू.
अनुकूल मुद्दा : विक्रीमध्ये "आवाजवी किंमत" हा अडसर राहणार नाही.
प्रतिकूल मुद्दा : गिर्‍हाइक इतकी कमी किंमत सांगेल की त्यांतून उत्पादन खर्चही निघणार नाही.
आता याबद्दल काय करता येईल ते पाहू. किंमतीबाबत एक वस्तुस्थिति लक्षांत घेतली पाहिजे. ती म्हणजे उत्पादक जी किंमत ठरवतो ती उत्पादन खर्च व इतर खर्च निघून काही नफा मिळावा या हिशोबाने ठरवतो. सर्वसाधारण गिर्‍हाइक वस्तूची किंमत त्या वस्तूचा त्याला कितपत उपयोग आहे त्याप्रमाणे ठरवते. तिच्या उत्पादकाला ती बनवण्यासाठी किती खर्च आला याच्याशी गिर्हाइकाला काही देणेघेणे नसते. यांतून पुढीलप्रमाणे मार्ग काढता येईल.उत्पादकाने चाचणी म्हणून मालाची एक बॅच काढायची व आपल्या पद्धतीने प्रत्येक नगाची विक्रीची किंमत ठरवायची. मात्र विक्रेत्यांना त्या किंमतीवर अडून न राहता गिर्‍हाइक जी किंमत द्यायला तयार असेल त्या किमतीला त्याला ती विकण्याची मुभा द्यायची. त्यांत निरनिराळ्या किंमतींना किती किती नग विकले गेले ते समजेल. ज्या किंमतीमुळे विक्रीचे ज्यास्तींत ज्यास्त उत्पन्न आले असेल ती किंवा तिच्यापेक्षा कमी इतकी गिर्‍हाइकासाठी विक्रीची किंमत ठरवून टाकायची व उलटा हिशोब करून उत्पादन खर्चांत कपात करायची. हे कच्चा माल मोठ्या प्रमाणावर किफायतशीर दराने घेऊन, उत्पादन प्रक्रियेंत सुधारणा करून व प्रत्येक बॅचमधल्या नगांची संख्या वाढवून करता येईल. पहा आपण कुठून कुठे पोचलो ते!
२) एखाद्या गोष्टींतील महत्वाचा किंवा त्रासदायक भाग वगळून आपला हेतु कसा साध्य करता येईल याचा विचार करणे : यासंबंधीची दोन उदाहरणे पूर्वी दिलेली आहेत. (पहा : भाग ४ मधील "खाद्यपदार्थांशिवाय उपहारगृह" व भाग ६ मधील "अन्न न शिजवता खाणे")
३) इच्छानुवर्ति विचार व स्वप्नरंजन (wishful thinking) : पुष्कळदा अमुक एक गोष्ट जगांत असती तर बरे झाले असते असे आपल्याला वाटते. अशा काही (सध्यातरी) भन्नाट वाटणार्‍या कल्पना :
अ) मानवी रक्त तयार करणारे कारखाने असावेत व पाहिजे त्या गटाचे रक्त केमिस्टकडे मिळावे.
ब) समुद्राच्या पाण्यावर शेती करता यावी.
क) लहान मुले आत बसून स्वत: उडवू शकतील अशी विमाने असावीत.
ड) लढाईच्या दिवसांत अणुबाँबपासून रक्षण व्हावे म्हणून अवकाशांत एखादे संरक्षक छत्र निर्माण करता यावे.
वरील सर्व कल्पनांत एक सामायिक अनुकूल मुद्दा आहे. तो म्हणजे त्यामुळे सध्याच्या अनेक काळज्या दूर होणार आहेत. त्यांतील प्रतिकूल मुद्दा म्हणजे उपलब्ध तंत्रज्ञानाने ते अशक्य दिसते. त्याची कारणे शोधून त्यावर व्यवहार्य उपाय शोधल्यास वरील भन्नाट कल्पना कोणत्या ना कोणत्या तरी रुपांत प्रत्यक्षांत येऊ शकतात.

वरील तिन्ही प्रकारांत न बसणार्‍या भन्नाट कल्पना :
१) मोटार गाडीचे इंजिन गाडीच्या टपावर बसवणे : अनुकूल मुद्दे - इंजिन थंड ठेवणे सोपे जाईल, गाडींत ज्यास्त लोकांना बसायला जागा मिळेल, इंजिनची दुरुस्ती करणे सोपे जाईल, गाड्यांची टक्कर झाल्यास इंजिन सुरक्षित राहील, पावसाळ्यांत रस्त्यांत पाणी साठले तरी इंजिनांत पाणी शिरणार नाही. प्रतिकूल मुद्दे - कोणालाही सुचतील. त्यावर उपाय - प्रयत्न करून पहा.
२) मोटारगाडीला चौरसाकार चाके : या कल्पनेवरून एडवर्ड् बोनो यांनी आपल्या पुस्तकांत Intelligent Suspension ची संकल्पना मांडली आहे. हे suspension नेहमींच्या वर्तुळाकार चाके असलेल्या मोटरगाडीस वापरल्यास गाडी खडबडीत रस्त्यावरून धावतांनाही आंत बसलेल्यांना आजिबात धक्के जाणवणार नाहीत.

आपण सतर्क राहिल्यास आपल्याला सृजनशीलतेची अनेक उदाहरणे स्वतःच्या व इतरांच्या अनुभवांतून मिळू शकतात. त्याशिवाय साहित्यांत विशेषत: विनोदी लेखन, चातुर्यकथा, बोधवाक्ये यांत व कधीकधी दृक्श्राव्य माध्यमांतील कार्यक्रमांतही सृजनशीलता आढळून येते. अशी काही उदाहरणे पुढील भागांत पाहू.

(क्रमश:)

Comments

उत्तरोत्तर रंगतदार

लेखमालिका उत्तरोत्तर रंगतदार होत चालली आहे. पुढील भागांची वाट पाहतोय.

असेच

लेखमालिका उत्तरोत्तर रंगतदार होत चालली आहे. पुढील भागांची वाट पाहतोय

+१

-ऋषिकेश

समुद्राच्या पाण्यावर शेती करता यावी.

श्री. कोर्डे यांनी भन्नाट कल्पनांमध्ये सागरी शेतीची कल्पना मांडली आहे. मत्स्यशेती किंवा खेकडे उत्पादन इत्यादी सागरी
शेतीतच समाविष्ट होत असले तरी श्री.कोर्डे यांना भात शेती सारखी सागर शेती अपेक्षित असावी. त्यालाही सुरवात झाली
आहे. शेवाळ्यांचे अनेक प्रकार आहेत.त्यांमधील काहींमध्ये ५०% पर्यंत तेल असूं शकते. या तेलाचा उपयोग डीझेल तयार
करण्यासाठी होऊ शकतो.सागरामध्ये असे शेवाळे वाढवून डीझेल निर्माण करण्यास सुरवात झाली असून काहीं वर्षांतच
हा इन्धनाचा एक प्रमुख स्रोत होईल.
[ दर हेक्टरी पाम किंवा एरंडापासून मिळणाऱया डीझेलपेक्षा शेवाळ्यापासून मिळणारे डीझेल कितीतरी पटींत जास्त मिळते.]
शरद.

 
^ वर