सृजनशीलता - भाग ९ - सामूहिक पातळीवर

(मागील भागावरून पुढे चालू)

आत्तापर्यंत आपण वैयक्तिक सृजनशीलतेबद्दल पाहिले. आता गटाच्या किंवा समूहाच्या एकत्रित सृजनशीलतेबद्दल पाहू.

तसे पाहिले तर व्यक्तीच्या तुलनेंत गटाची किंवा समूहाची सृजनशीलता कितीतरी अधिक असायला पाहिजे. कारण गटांत जितकी माणसे तितके डावे मेंदू व उजवे मेंदू उपलब्ध असतात ज्यामुळे कल्पना व पर्याय खूप मोठ्या प्रमाणावर निर्माण होऊ शकतात व कल्पना व्यवहार्य बनवण्यासाठी सर्वांचा विविध प्रकारचा व्यावहारिक अनुभवही हाताशी असतो. तरी देखील गटांतील सभासदांना योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षण नसेल तर त्याचा फायदा करून घेणे शक्य होत नाही. असे का होते?

भाग - ३ मध्ये म्हंटल्याप्रमाणे व्यक्तीच्या बाबतींतही नवीन पर्याय/कल्पना डाव्या मेंदूकडून 'अव्यवहार्य' म्हणून झिडकारली जाते. गटामध्ये पर्याय/कल्पना मांडणार्‍याच्या डाव्या मेंदूबरोबर इतरांचेही डावे मेंदू कार्यरत असतात. त्यामुळे एकामागून एक कल्पना झिडकारण्याचे प्रमाणही वाढते व कल्पना निर्माण करण्याचे कार्य बंद पडण्याची शक्यता असते. सृजनशीलतेंत हा एक मोठा अडसर ठरतो.

यावर उपाय शोधण्यासाठी आपण शारीरिक श्रमांचे उदाहरण घेऊ.

ज्या कामासाठी एका माणसाची ताकद पुरेशी नसते त्यासाठी आपण एकापेक्षा ज्यास्त माणसे लावतो. समजा, एखादी अवजड गोष्ट एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी हलवायची आहे आणि त्यासाठी आवश्यक असलेली पाच माणसे आपण लावली आहेत. ह्या माणसांनी आपली ताकद वेगवेगळ्या दिशांनी लावली तर परिणमत: एकाच्या विरोधांत बाकीच्यांची ताकद लागल्यामुळे ती वस्तू जागची हलणार नाही. म्हणजे सर्वांनी आपली ताकद एकाच दिशेने लावणे गरजेचे आहे. तसेच प्रत्येकाने एकाच दिशेने लावलेली ताकद वेगवेगळ्या वेळी लावली तरीही वस्तू जागची हलणार नाही. याचा अर्थ वस्तू हलवायची असेल तर सर्वांची ताकद एकाच वेळेला व एकाच दिशेने लागणे आवश्यक आहे.

सृजनशीलतेसाठी लागणार्‍या वैचारिक श्रमांचेही असेच आहे. भाग - ३ व भाग - ४ मध्ये म्हंटल्याप्रमाणे हे वैचारिक श्रम प्रामुख्याने पर्याय शोधणे, त्यांच्या मूल्यमापनासाठी अनुकूल व प्रतिकूल मुद्दे पाहणे व पर्याय व्यवहार्य करण्यासाठी प्रतिकूल मुद्द्यांवर व्यावहारिक उपाय शोधून कृतीचा आराखडा बनवणे यांसाठी लागतात. गटांत होणार्‍या चर्चेंत वाद-प्रतिवाद होत असल्यामुळे गटांतील सदस्यांचे बरेचसे वैचारिक श्रम एकमेकांच्या कल्पना हाणून पाडण्यांत खर्च होतात. पण गटांतील सर्वांनी ठरवून एका वेळी एका ठराविक दिशेने विचार केल्यास गटाचे वैचारिक श्रम अधिक फलदायी होतात. या पद्धतीला एडवर्ड् बोनो यांनी समांतर विचार पद्धति (Parallel Thinking) असे नाव दिले आहे. त्याचा वापर करण्यासाठी त्यांनी Six Thinking Hats नावाचे चर्चा-तंत्र विकसित केले आहे. त्यावर त्यांचे एक वेगळे पुस्तकही आहे. त्याची तपशीलवार माहिती द्यायची म्हंटले तर स्वतंत्र लेखमाला लागेल.

तथापि काही ठिकाणी समांतर विचार पद्धति ढोबळ स्वरुपांत कशी अमलांत आणली जाते ते पाहू.

आपल्याकडे आधुनिक व्यवस्थापन असलेल्या काही औद्योगिक संस्थांमधून गुणवत्ता मंडळे (Quality Circles) असतात. गुणवत्ता मंडळ म्हणजे एकाच खात्यांत एकाच ठिकाणी किंवा एकाच कार्यशाळेंत काम करणार्‍या आठ-दहा लोकांचे मंडळ असते. त्याचे उद्दिष्ट आपल्या खात्याच्या कामांतील समस्या सोडवणे व त्याची कार्यक्षमता वाढवणे हे असते. त्यासाठी या मंडळाच्या ठराविक मुदतीच्या अंतराने बैठका होतात. या बैठकांमध्ये ठराविक वेळ हाती घेतलेल्या समस्येच्या उकलीचे वेगवेगळे पर्याय सुचवण्यासाठी ठेवलेला असतो. त्यांत प्रत्येक सदस्याने त्याचा पर्याय मांडावा अशी अपेक्षा असते. एखादा सदस्य पर्याय मांडत असतांना दुसर्‍या सदस्यांनी त्याला अडवायचे नाही व सर्वांचे पर्याय मांडणे संपेपर्यंत कोणत्याही पर्यायावर टीकाटिप्पणी करायची नाही हा नियम असतो (रोको मत, टोको मत). तसे होतांना दिसले तर टीका करणार्‍याला इतर सदस्य नियमाची आठवण करून देतात. सर्व पर्यायांची लिखित नोंद ठेवली जाते. याला Brain Storming Sessionअसे म्हणतात.
जो पर्याय पुढील विचारासाठी घेतला जातो त्याला अनुकूल मुद्दे मांडतांनाही प्रत्येकाने फक्त अनुकूल मुद्देच मांडायचे असतात. इतर काही बोलायचे नाही हा नियम असतो. त्यामुळे अनुकूल मुद्दे मोठ्या संख्येने पुढे येतात.
प्रतिकूल मुद्दे मांडतांना प्रत्येकाने फक्त प्रतिकूलच बोलायचे हा नियम असतो. एखादा सदस्य आपल्याच पर्यायाच्या विरोधांतही बोलू शकतो. सर्वांना फक्त प्रतिकूल बोलण्याची सूचना असते. त्यामुळे प्रतिकूल मुद्देही मोठ्या संख्येने पुढे येतात.
अशा तर्‍हेने सर्वांचे वैचारिक श्रम एका वेळी एकाच दिशेने (एकाच प्रकारच्या विचार पद्धतींत) लागत असल्यामुळे गटांतील सदस्यांच्या संख्येचा फायदा मिळून निर्णय अधिक अचूक व परिपूर्ण होऊ शकतो.
वरील समांतर विचार पद्धति औद्योगिक संस्थांतच उपयोगी आहे असे नाही. कुटुंबांतही एखादा महत्वाचा निर्णय घेण्यासाठी कुटुंब सदस्यांचा गट वरील नियम पाळून या पद्धतीचा वापर करू शकतो.
समांतर विचार पद्धतीचा मुख्य फायदा म्हणजे चर्चेचा वेळ एकदम कमी होतो. बोनो यांनी Six Thinking Hats च्या प्रस्तावनेंत म्हंटल्याप्रमाणे ABB, IBM, यांसारख्या अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या महत्वाचे निर्णय घेतांना समांतर विचार पद्धतीवर आधारित Six Thinking Hats तंत्राचा अवलंब करीत आहेत. त्यामुळे ABB च्या बाबतींत आंतरराष्ट्रीय प्रकल्पांवरील चर्चेचा कालावधी तीस दिवसांवरून दोन दिवसांवर आला आहे तर IBMच्या बाबतींत meetingsचा वेळ एक चतुर्थांश झाला आहे असा बोनो यांचा दावा आहे.

सृजनशीलतेविषयी उरले सुरले मुद्दे पुढील भागांत पाहू.

(क्रमश:)

Comments

संग्राह्य लेखमाला

अत्यंत उपयुक्त आणि सृजनात्मक लेखमाला.
शरदजींचे आभार.

रंगतदार आणि उपयुक्त

हा भागही नेहमीप्रमाणे रंगतदार झाला आहे आणि माहिती नेहमीप्रमाणे उपयुक्त आहे!

वा!

सुंदर लेखनशैली ! हा भाग अधिकच फुलला आहे.
ब्रेन स्टॉर्मिंग आम्हीही एस्.टि.एच्. टेंप्लेट वापरून करू लागलो आहोत. त्याचा खरोखरच फायदा होतो.
या सुंदर भागाबद्दल आभार!

-ऋषिकेश

सृजनशीलता

सृजनशीलता हा विषय वाचुन मला खुप आनन्द मिळाला ;पुन्हा ह्या विषयावर आजुन वाचन करायला मिळाले तर जास्त फायदा मिळेल!

 
^ वर