राज ठाकरे यांचे मुद्दे अनुल्लेखाने मारणार?

राज ठाकरे यांचे मुद्दे उपक्रमावर अनुल्लेखाने मारणार?

गेले काही आठवडे राज ठाकरे ह्यांनी उपस्थित केलेल्या उत्तर भारतीयांबद्दलच्या काही मुद्द्यांनी गाजवले. उपक्रमावर ह्या मुद्द्यांबाबत चर्चा करण्यास मज्जाव आहे कां? जर एखाद्याच्या नजरचुकीने राज ठाकरेंचे मुद्दे सुटले असतील, तर ठाकरेंनी मटा साठी लिहिलेला लेख इथे चर्चेसाठी घेता येईल. (तो मी खाली उद्धृत करतो आहे.)

राज ठाकरे ह्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांबद्दल उपक्रमवासीयांचे काय म्हणणे आहे?

धन्यवाद.
------------------------------------------------------------------------------------------------
माझी भूमिका, माझा लढा! - राज ठाकरे.

मराठी भाषा , मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीबद्दल बोलल्याबद्दल आणि तिच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरल्याबद्दल यूपी - बिहारमधून आलेल्या गुंडांकडून आणि पत्रकारांचा बुरखा पांघरून यूपी - बिहारची वकिली करणाऱ्या बहुतेक सर्व हिंदी चॅनल्सच्या भय्या पत्रकारांकडून माझी आणि माझ्या सहकाऱ्यांची , माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या संघटनेची सतत बदनामी होते आहे . महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी मुलं आणि जे तरुण रस्त्यावर उतरलेले आहेत , ते चांगल्या घरातले आहेत . त्यांची घरची तसेच सांस्कृतिक पार्श्वभूमी अतिशय चांगली आहे . त्यांना उत्तम करीयर्स आणि व्यवसाय आहेत . परंतु तरीही त्यांनी ही बदनामी आणि हा प्रचंड त्रास अंगावर घेतला , ज्यातून त्यांना काहीही आथिर्क किंवा इतर कोणत्याच प्रकारचा फायदा होणार नाही . तात्काळ कोणती सत्तापदंही मिळणार नाहीत . नेता म्हणून आणि एका पक्षाचा अध्यक्ष म्हणून मलाही या साऱ्या संघर्षाचा कोणताच व्यक्तिगत फायदा होणार नाही , हे सारं माहीत असूनही या संघर्षाला मी प्रवृत्त का झालो ?

संपूर्ण महाराष्ट्रातल्या समज असलेल्या जनतेसाठी मी हे लिहीत आहे . महाराष्ट्रात येणाऱ्या यूपी - बिहारमधल्या सर्व भय्यांना आपण इथे महाराष्ट्रात राज्य करण्याकरताच येतो आहे असे वाटत असते . एखाद्या प्रांतातल्या जनतेला तिची स्वत : ची भाषा असते . तिची समृद्ध अशी संस्कृती असते . पाहुणा जेव्हा येतो तेव्हा यजमानाकडून जशी आतिथ्यशीलतेची अपेक्षा असते , तशी पाहुण्याकडून यजमानाच्या घराशी , त्याच्या संस्कृतीशी समरस होण्याची अपेक्षा असते . उत्तर प्रदेश , बिहारमधला साधा माणूस असो , नेता असो , पत्रकार असो , शिक्षणासाठी येणारा विद्याथीर् असो , नट असो , वा मच्छीमार असो - तो तिथे त्या राज्यांमध्ये त्याच्यावर फाके मारण्याची वेळ तिथल्या नेत्यांमुळे आलेली असते म्हणून इथे महाराष्ट्रात येतो - पण इथे आल्यावर त्याची स्टाइल बदलते . इथली भाषा तो शिकत नाही . इथल्या संस्कृतीला , स्थानिक माणसाला तो तुच्छ लेखतो , त्याच्यावर दादागिरी करतो . एखाद्या यूपी - बिहारच्या रिक्षा - टॅक्सीवाल्यापासून ते सिनेमानटांपर्यंत हा अनुभव आपल्याला पुन : पुन्हा येत असतो . आपण आपल्या मराठी संस्कृतीनुसार त्याला उदार सहिष्णूपणे पुन : पुन्हा माफ करतो . विसरून जातो . असं बंगाली , पंजाबी , उडिया , आसामी किंवा तामिळ माणूस कधीही करणार नाही . कारण या भाषिकांची भाषिक आणि सांस्कृतिक उद्दिष्टं अतिशय तीक्ष्ण आहेत आणि त्याबाबत ते सतत सावध असतात . परंतु आपण सहिष्णू आहोत .

आजही सहिष्णुता हा मला गुणच वाटतो . सर्वच अमराठी माणसांशी असा संघर्ष करण्याच्या बाजूचा मी नव्हतो आणि नाही . परंतु यूपी - बिहारमधल्या भय्यांनी हा संघर्ष आमच्यावर लादलेला आहे . सैन्यात मराठा बटालियनमध्ये ' मराठा ' ( म्हणजे महाराष्ट्रीयन ) या शब्दाची फोड ' मरता लेकिन हटता नही वो मराठा ' अशी केली जाते . यापूवीर् हात जोडून या यूपी - बिहारवाल्यांना मी महाराष्ट्रातल्या मराठी माता - बांधवांच्या वतीने अनेकदा सांगितलेलं आहे की , इथल्या संस्कृतीने तुम्हाला सतत खूप दिलेलं आहे , तेव्हा या संस्कृतीचं रक्षण , संवर्धन आणि आदर करणं तुमचं कर्तव्य आहे , असं जाहीर भाषणांत आणि खासगी चर्चांत सांगितलं . परंतु यांची मगुरी इतकी आहे की , उत्तर प्रदेश - बिहारमधून तिथल्या जनतेची पूर्ण वाताहत करून गब्बर झालेले अमरसिंह , मुलायमसिंह आणि तत्सम इतर अनेक नेते इथे बोलावून घेऊन इथल्या मराठी जनतेला राज्यघटना आणि देशप्रेम ' शिकवण्याचे ' प्रयोग इथल्या यूपी - बिहारवाल्यांनी सुरू केले . एवढेच नव्हे , तर हिंदी भाषा आणि हिंदी संस्कृती मुंबई महापालिका आणि महाराष्ट्रावर लादण्यासाठी दादागिरीची भाषा सुरू केली.

महाराष्ट्रातल्या बहुतेकांना खरंतर हिंदी भाषा येतेच . पण मराठी ही इथली राजभाषा आहे . तिला घटनेने राष्ट्रभाषेचा दर्जा दिलेला आहे . शिवाय , स्वत : ची भाषा - संस्कृती वाढवण्यासाठी आणि अनिवार्य करण्यासाठी भाषावार प्रांतरचना झालेल्या राज्यातल्या जनतेला यूपी - बिहारमधल्या भय्यांची परवानगी घेण्याची गरज आहे का ? या भय्यांनी चक्क मुंबई महापालिकेत हिंदी अनिवार्य करण्याची मागणी करून मराठी मागे रेटण्याचे प्रयत्न सुरू केले . महाराष्ट्रात छट पूजा , उत्तर प्रदेश स्थापना दिवस , राजकीय बळ दाखवण्याकरिता , जोराने साजरे करायला सुरुवात केली . रिक्षा असो , टॅक्सी असो , रस्ते असोत , इमारती असोत , सोसायट्या असोत , वर्तमानपत्रं असोत , चॅनल्स असोत , मच्छिमारी असो , सिनेमे असो - सर्वत्र या यूपी - बिहारवाल्या भय्यांची बेबंद दादागिरी महाराष्ट्रात सुरू झाली . तेव्हा लक्षात आलं की , यांच्याशी हात जोडून बोलण्याचे दिवस संपले . आता यांना हात सोडून सामोरं जायला हवं . म्हणून मी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी महाराष्ट्रात यूपी - बिहारवाल्यांच्या सांस्कृतिक व राजकीय दादागिरी आणि गुंडगिरीविरुद्ध संघर्ष सुरू केला . महाराष्ट्रात राहायचं असेल तर महाराष्ट्राच्या आणि महाराष्ट्रीयनांच्याच जीवनपद्धतीप्रमाणे बाहेरून येणाऱ्यांना जगावं लागेल . महाराष्ट्राशी त्यांना जुळवून घ्यावं लागेल . हे झालं नाही तर महाराष्ट्रात अराजक माजेल.

महाराष्ट्रात जी कायदा - सुव्यवस्था आहे , महाराष्ट्रात ज्या विकासाच्या संस्था आहेत , त्यांचा फायदा देशभरचे लोक घेत असतात . ती संस्कृतीच उखडून टाकली , तर इथे जौनपूर - आझमगढसारखीच परिस्थिती निर्माण होईल . राजाभय्या , अमरसिंह , लालू , पासवानांसारखे लोक महाराष्ट्राचा कब्जा घेतील . हे केवळ मी म्हणतोय असं नव्हे , तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभाध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांनी आमचं आंदोलन झाल्याच्या दुसऱ्या दिवशी कोल्हापूरमध्ये ' महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री अमराठी झाले तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीही नाही ,' असे उद्गार काढले . आता कुपेकर हे काही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नव्हेत . परंतु ही सार्वत्रिक भावना आहे . मराठी जनतेत , मराठी नेत्यांमध्ये , मराठी नटांमध्ये , सर्व महाराष्ट्राच्या स्वाभिमानी लोकांमध्ये या यूपी - बिहारवाल्यांबद्दल चीड आहे . मी आणि माझा पक्ष फक्त वाईटपणा घेऊन त्यांचं प्रतिनिधित्व करतो . नागड्याला नागडं म्हणण्याचं साहस कुणीतरी सगळ्यांचे शिव्याशाप घेऊन केलं पाहिजे . ते साहस मी करतो आहे . परिणामांची पूर्ण कल्पना करून . एकेकाळी तेच साहस प्रबोधनकारांनी केलेलं होतं . आचार्य अत्र्यांनी केलेलं होतं . बाळासाहेबांनी केलेलं होतं . खुद्द कुसुमाग्रजांनी केलेलं होतं .

कित्येकजण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या आंदोलनाची तुलना शिवसेनेची स्थापना झाली तेव्हाच्या सुरुवातीच्या आंदोलनांशी करतात . परंतु भावना काही प्रमाणात तशीच वाटली तरी दोन्हींमध्ये फरक खूप आहे . तेव्हाचं ते आंदोलन हे गरीब मराठी माणसाचं , प्रामुख्यानं नोकऱ्यांसाठीचं आंदोलन होतं . इतर विषय त्याला नंतर चिकटत गेले . आज माझं आंदोलन हे उत्तर भारतीयांच्या महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक आणि राजकीय दादागिरी आणि गुंडगिरीविरुद्ध आहे . त्यांच्याकडे उत्तरेतून येणारे गुंड नेते , त्यांच्यामार्फत येणारे प्रचंड प्रमाणातले चलन , शस्त्रास्त्रं आहेत . इथे त्यांचं मग्रुर मनुष्यबळ वाढवण्याच्या प्रयत्नात ते असतात . भय्या टॅक्सीवाला , रिक्षावाला , मच्छीमार हा गरीब बिचारा उत्तरेतून आलेला असं चित्र भय्यांची लॉबी असलेली चॅनल्स उभी करतात . परंतु त्यांना रोजच्या जगण्यात एकेकटा स्थानिक मराठी माणूस भेटतो , त्यांच्याशी व्यवहार करतो , तेव्हा त्यांची खास उत्तरेतली मगुरी , महाराष्ट्राबद्दलचा त्यांचा द्वेष , उत्तरेतल्या गुंडांवरची त्यांची श्रद्धा या साऱ्याचं आपल्याला दर्शन होतं . त्यामुळे ' तो गरीब बिचारा पोटासाठी येतो ' अशा वाक्यात यांचं वर्णन होऊच शकत नाही .

राजकीय आणि सांस्कृतिक वर्चस्ववादाविरुद्धची ही आमची लढाई कितीतरी अवघड आहे . ती एकपदरी नाही , बहुपदरी आहे . महाराष्ट्रात आज राज्य कोणत्याही पक्षाचं असो . यूपी - बिहारमधले त्या त्या पक्षाचे नेते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला अतिशय मग्रुरीने ' व्हाया दिल्ली ' चेपू इच्छितात . हा महाराष्ट्राच्या १२ कोटी जनतेचा अपमान आहे . प . बंगाल , तामिळनाडू , आंध्र प्रदेश , ओरिसा , आसाम , केरळच्या बाबतीत हे होऊ शकत नाही . कारण तिथली जनता या भय्यांच्या गुंडगिरीबाबत अतिशय सावध आहे . स्वत : च्या सांस्कृतिक आणि भाषिक राजकीय अस्मितेविरुद्ध एकही शब्द ते सहन करत नाहीत . पण महाराष्ट्राची स्थिती तशी नाही .

आज मराठी माणूस समृद्ध आहे . त्याची आज जागतिक बाजारात पत आहे . दीपक घैसास , आशुतोष गोवारीकर , सचिन तेंडुलकर आणि यासारखे अनेक दिग्गज मराठी आज बाजारपेठेत वेगवेगळ्या क्षेत्रांत आपलं अस्तित्व दाखवत आहेत . आज परप्रांतीय मराठी माणसांकडे नोकऱ्या करत आहेत . हा बदल स्वागतार्ह आहे . पण राजकीय आणि सांस्कृतिक सावधपणाविना तो व्यर्थ जाऊ शकतो . या जाणिवेनेच मी आणि माझा पक्ष रस्त्यावर उतरलेलो आहोत .

एकेकाळी , म्हणजे बाळासाहेब पूर्णपणे कार्यरत असताना शिवसेना पक्ष मराठी माणसांचा पक्ष म्हणून ओळखला जायचा . तेव्हा तो माझाही पक्ष होता . तेव्हाही मी मराठी राजकीय वर्चस्वाचा मुद्दा लावून धरलाच होता . बिहारींविरुद्धचं माझं आंदोलन त्यावेळचंच . त्यामुळे माझ्या नव्या पक्षाच्या नव्या अजेंड्यात हा मुद्दा सामील झाला आहे असं अजिबातच नाही .

आता या भयानक परिस्थितीमुळे मी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी आपलं राजकीय आयुष्य आणि सांस्कृतिक पुण्याई जुगारावर लावण्याचा निर्णय घेतला आहे . आपल्यातलेच काही मराठी मला अाणि माझ्या सहकाऱ्यांना शिव्याशाप देत आहेत . पण त्यांची मुलं - नातवंडं पुढे मला दुवा देतील . कविता , पुस्तकं , संस्कृती , अहिंसा , सहिष्णुता मलाही कळते . नवनिर्माणाच्या विकास कामांसाठी , विकासदृष्टीसाठी मी अकादमीच ( पुण्यात ) सुरू केलेली आहे . ज्या शिवाजी पार्कवर परवा स . पा . ने बिहारच्या आणि उत्तरेतल्या गुंडगिरीच्या भाषा केल्या , तिथे मीच मराठी काव्यवाचन आणि मराठी पुस्तक प्रदर्शनाचं आयोजन केलं . त्यामुळे मराठी सुसंस्कृतपणा आणि सहिष्णुता मलाही कळते . पण मराठी भाषा टिकेल , तेव्हा मराठी कविता टिकेल . मराठी भाषा टिकेल , तेव्हा मराठी संस्कृती टिकेल . मराठी संस्कृती टिकेल , तेव्हा अस्सल मराठी राजकारण टिकेल . शेवटी रस्त्यावरचा संघर्ष कुणालाच प्रिय नसतो . पण आत्मरक्षणासाठी आणि संस्कृती टिकवण्यासाठी संघर्ष करावाच लागतो . तसं नसतं तर शेजाऱ्यांच्या सद्सदविवेकबुद्धीवर विश्वास ठेवून देशांनी सैन्य ठेवणं बंद केलं असतं आणि शेजारी राज्यांच्या प्रेमाखातर सर्व राज्यांत पोलिसदलही ठेवलं नसतं . संघर्ष करताना रक्त , घाम , अश्रू द्यावेच लागतात . पुढे ते संघर्ष यशस्वी झाल्यावर लोकप्रिय होतात !

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष सरकोझी आल्यावर स्वत : भारताचे पंतप्रधान शिखांच्या पगडीवर फ्रान्समध्ये असलेल्या बंदीवर रदबदली करतात . करुणानिधी मलेशियातल्या तामिळंासाठी मलेशियन सरकारशी वाग्युद्ध करतात आणि मग भारत सरकारला त्यात रदबदली करावी लागते . दमदमी टाकसाळमध्ये अकाली दलाच्या पुढाकाराने अतिरेकी जनेर्लसिंग भिंदनवाले याचा संत म्हणून फोटो लागतो . इंदिराजींच्या हत्येला कारणीभूत ठरणाऱ्या या संताबद्दल देशात अवाक्षरही निघत नाही . राजीव गांधींच्या हत्येला सरळ कारणीभूत असणाऱ्या एलटीटीईशी तामिळनाडूतील बहुतेक सर्व राजकीय पक्ष तामिळ मुद्द्यावर थेट संबंध ठेवून असतात . गांगुलीला टीममधून काढल्यावर पं . बंगालमधले कम्युनिस्ट बंगाली बनून आक्रमक होतात . हे सारं प्रांतवादी आणि सांस्कृतिक नाही ? मुंबईत चालणारे सर्व हिंदी चॅनल्स आणि त्यांचे पत्रकार महाराष्ट्राविरुद्ध विष ओकत यूपी - बिहारची वकिली करतात , ते प्रांतवादी नाहीत ? अमिताभ बच्चन स्वत : ला ' छोरा गंगा किनारेवाला ' मानतो . ते प्रांतवादी नाही का ? मी आणि माझ्या पक्षाने मराठी आणि महाराष्ट्राच्या अस्मिता यावर बोललं वा कृती केली की मी गुंड ठरतो ? हा मराठी माणसांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे .

अमिताभ बच्चननी त्यांच्यासाठी मरमर मरून काम करणाऱ्या सावंत नावाच्या मेकअपमनच्या मराठी , भोजपुरी चित्रपटांत दयेने काम केलं , तर ते जणू काही महाराष्ट्रावर उपकारच करताहेत , असं दाखवलं जातं . त्यांचा मेकअपमन जरी गांगुली , सुब्रम्हण्यम , मिश्रा कुणीही असता तरी ते असेच वागले नसते काय ? त्याच्यात त्यांचा महाराष्ट्राच्या अस्मितेशी संबंध काय ? ते तन , मन , धनाने उत्तर प्रदेशचेच आहेत . त्यांनी जे मिळवलं ते इथे , हेही सत्य नाही का ?

फक्त मी माझ्या महाराष्ट्रासाठी उभा राहिलो तर गुन्हेगार ठरतो ? राज्यघटनेत असं लिहिलंय का ?

मी इथे एकच पुन्हा सांगू इच्छितो . सर्व जग जरी विरोधात गेलं तरी मी आणि माझी संघटना मराठी भाषिक जनता , महाराष्ट्र संस्कृती , मराठी भाषा यासाठीच लढत राहू . यूपी - बिहारवाल्यांची महाराष्ट्रातली दादागिरी आणि गुंडगिरी आम्ही मोडून काढूच . मला महाराष्ट्राच्या मराठी जनतेला एवढंच सांगावंसं वाटतं की , जर मी तुमच्या मनातलंच बोलत असेन तर बघता काय ? सामील व्हा !

आपण विजयी होऊच ; कारण कोणताही कायदा , कोणतंही युद्ध , कोणताही माणूस पेटलेल्या मराठी मनांना थोपवू शकतच नाही . माझ्यावर विश्वास ठेवा . माझ्या मराठी माता - भगिनी - बांधवांनो , विजय तुमचाच आहे .

जय महाराष्ट्र !

------------------------------------------------------------------------------------------------

Comments

.

.

!

प्रकाश घाटपांडे

;-)

...

जुनी चर्चा

यावर उपक्रमवर नोड १०१६ आणि १०४१ येथे भरपूर चर्चा झाली आहे. त्यात मराठी अस्मिता नसलेल्या सदस्यांनीच बह्वत्वे भाग घेतला. राज ठाकरे मतांसाठी राजकारण करतो आहे हे हिंदी आणि इंग्रजी पत्रकार-मीडियाने ठासून ठासून प्रतिपादिलेल्या गृहीतकावर सर्वांनी डोळे झाकून विश्वास ठेवल्याने सर्व चर्चा राजच्या विरोधात गेली. ज्यांना राज हे का करतो आहे ते समजत नाही त्यांची करावी तितकी कींव थोडीच आहे. दुर्दैव महाराष्ट्राचे आणि इथल्या धृतराष्ट्रांचे!--वाचक्‍नवी

सहमत

मी यापूर्वी इथे राज यांच्या या लढ्याबद्दल कितीवेळा कोकललो आहे,पण फायदा शून्य. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे बहूतांश सदस्य परदेशात राहणारे आहेत.म्हणजे तिथले परप्रांतीय! अशावेळी ते राज यांच्या मुद्द्याला किती आणि कसा पाठिंबा देणार?

दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे.
-इनोबा म्हणे (inoba.blogspot.com)

मत-मतांतरे

याचे सर्वात मोठे कारण म्हणजे बहूतांश सदस्य परदेशात राहणारे आहेत.म्हणजे तिथले परप्रांतीय! अशावेळी ते राज यांच्या मुद्द्याला किती आणि कसा पाठिंबा देणार?

पाठिंबा देणे वा न देणे या पेक्षा 'म्हणुनच ते या मुद्याचा विचार संवेदनशीलतेने करु शकतात' असे माझे मत आहे . बाकी विकास यांचेशी सहमत.
प्रकाश घाटपांडे

चुकीचे समिकरण

त्यात मराठी अस्मिता नसलेल्या सदस्यांनीच बह्वत्वे भाग घेतला.

असे म्हणताना आपले समिकरण आहे "राजला पाठींबा = मराठीला पाठींबा" अथवा "राजला विरोध = मराठी अस्मितेचा अभाव". हे दोन्ही बरोबर आहेत असे वाटत नाही. सर्व प्रथम राजवर टिका करणारे त्याच्या विरोधात नसून त्याच्यावर शंका घेत आहेत आणि एखादा अपवाद वगळल्यास बहुतांशी लोकं मराठी अस्मितेच्या विरुद्ध आहेत असे वाटत नाही... (निदान मी तरी नाही. मला वाटते सर्वप्रकारच्या अस्मिता त्या त्या स्तरावर लागतात. म्हणजे बॉस्टनमधे एखाद्या इटालीयनला जर इंगा दाखवायचा असला तर माझ्या डोक्यात मी भारतीय म्हणून येईल, पण तेच जर कोणी मला भारतीय मी मराठी म्हणून बोलत असेल तर त्याला सुनावताना माझ्या डोक्यात मी मराठी आहे असे राहील (बाकी स्थळ/जात वगैरेशी माझा संबंध नाही). तेच कधी कधी हिंदू म्हणून.... असो. मला वाटते की मी ही टेप आधी पण लावली होती :)

अकलेचे दिवाळे

"राजच्या हाणामारीला विरोध म्हणजे मराठी अस्मितेचा अभाव" असले दळभद्री समीकरण मांडणे हे आपल्या अकलेची दिवाळखोरी जाहीर करण्याचा प्रकार आहे.

एकलव्य

विचारांमध्ये नेमकेपणा हवा आहे.

मित्रांनो, आपल्या विचारांमध्ये नेमकेपणा हवा आहे.

बहुतेक मला माझा प्रश्न नेमकेपणाने मांडता आला नसावा.

मित्रांनो, राज ठाकरेंना तुमचा पाठिंबा आहे की विरोध, असले गौण (फालतू) मुद्दे चर्चिण्यासाठी इथे भरभरून न्यूस् च्यानल्स् उपलब्ध आहेत. 'राज ठाकरे ह्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांबद्दल उपक्रमवासीयांचे काय म्हणणे आहे' असे विचारताना; मला वाटले, की त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांबद्दल मला आपले विचार (काही नवे, काही संदर्भ, काही अनुभव) वाचावयास मिळतील. झाले उलटेच!

वाचक्नवी म्हणतात त्याप्रमाणे कींव करावी तितकी थोडीच. दुर्दैव मराठी धृतराष्ट्रांचे!

हैयो हैयैयो!

दुवा

या संदर्भात हा लेख वाचनीय आहे.

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका, विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

मुं्बई आणि महाराष्ट्रीय

मुंबई महाराष्ट्रापासून तोडायचा नेहरूंनी रचलेला कट अधूनमधून डोके वर काढत असतो. त्याला खतपाणी घालणारे अनेक आहेत, आपल्या उपक्रमावरपण. अधिक माहितीसाठी
इथे वाचा.-वाचक्‍नवी

 
^ वर