आजी आजोबांच्या वस्तू

प्रस्तावना:

हल्लीचं जग हे प्रचंड वेगाने प्रगती करतंय. ही प्रगती गेल्या काही दशकांत तर इतक्या वेगाने झाली की अनेक पूर्वापार वापरण्यात आलेल्या वस्तू हा हा म्हणता नाहीश्या व्हायला लागल्या. लहानपणापासून अनेक पुस्तके वाचायची सवय होती. पुस्तकांमध्ये उल्लेख येणार्‍या वस्तूंपैकी बर्‍याचशा वस्तू कधी ना कधी पाहण्यात अथवा ऐकण्यात आल्या असत. परंतु गेल्या २५ वर्षात परिस्थिती इतकी बदलली की आताच्या लहान मुलाने तिच पुस्तके वाचायला घेतली तर त्याला अनेक शब्द अडतील; काही वस्तू कोणत्या असा प्रश्न पडेल. यातील शब्दसंपदा ही वाचन वाढवून, संदर्भाने वाढेल असे वाटते; परंतु अनेक वस्तू मात्र आता दिसेनाशा झाल्या आहेत. केवळ दोन पिढ्यांनी वापरलेल्या वस्तूंमध्ये आता बराच फरक आहे. ह्या लेखमालेत अश्या "आजी आजोबांनी" वापरलेल्या वस्तूंची माहिती देण्याचा प्रयत्न आहे.

काळाच्या ओघात दुसरा जाणवण्यासारखा बदल झाला तो भाषेत! हल्लीच्या मुलांची भाषा आणि आजी आजोबांची भाषा यात जशी तफावत आहे, तशीच २५ वर्षांपूर्वी लिहिल्या गेलेल्या मुलांच्या साहित्याच्या भाषेतही. हल्लीच्या मुलांना हल्लीच्या शहरी भाषेत माहिती द्यायचा प्रयत्नही या लेखमालेत केला आहे. आजी-आजोबांच्या वस्तूंचा परिचय मुलांना समजेल (आणि कदाचित आवडेल) अश्या भाषेत / शैलीत लिहायचा मानस होता. आता तो कितपत यशस्वी झाला याचं उत्तर बाळगोपाळच देऊ जाणेत.

या लेखमालेत जातं, पाणी तापवायचा बंब यासारख्या रोजच्या वापरातल्या वस्तूंपासून टाईपरायटर, चरखा, शिवणयंत्र अश्या अनेक विषयांवर माहिती आहे. हे लेख अनेक "मोठ्या" वाचकांनी आवडल्याचे आवर्जून कळवलं परंतू अजूनही लहानग्या टार्गेट ऑडियन्सच्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत आहे.

अनुक्रमणिका

आजी-आजोबांच्या वस्तु - १ (जातं)

काल आई आजीला फोनवर काहीतरी सांगत होती. की आता आपलं जातं माळ्यावर धूळ खात पडलंय. मला कळेना की जातं म्हणजे काय? मी आईला विचारलं. "काय गं जातं म्हणजे काय?". आई फार घाईत होती म्हणाली , "सांगेन नंतर कधीतरी, आत्ता मला आधी कुकर लाऊ दे. " मला काही स्वथ बसवेना, मी सरळ दादाच्या खोलीत गेलो. तो नेहेमीप्रमाणे गेम्स खेळत होता. वॉव! लेटेस्ट एन्.एफ्.एस्.!! मी पार विसरूनच् गेलो मला काय विचारयचंय ते. दादा कसला ग्रेट खेळतो! ओम ला मी सांगणार आहे आज की माझ्या दादाने ४ ट्रॅक्स त्याच्या आधी पूर्ण केले. अरे हो! मला एकदम आठवलं जात्याबद्दल. मी दादाला विचारलं की जातं काय असतं. तर म्हणे "ग्राइंडिंग मशिन, पुर्वी दळणाला वापरायचे बहुतेक.  बाबांना विचार. आणि मला खेळू दे"

तसा मी हुशार आहे... पण बाबा येइपर्यंत थांबायचं म्हणजे. तसंही बाबा येणार रात्री कधीतरी. तेव्हा मला आई झोपायला लावते. अरे हो.. तर जातं.. जर दादा म्हणतो तसं ग्राइंडिंग मशीन असेल तर आपल्या एवढ्याशा माळ्यावर कसं मावलं? आपल्या पिठाच्या गिरणीत तर केवढं मोठ्ठ मशीन आहे. तसा मी हुशार आहे, लगेच मी खाली नाना आजोबांकडे गेलो. आमच्या खालीच राहतात. त्यांच्याकडे फिशटँक आहे आणि त्यात किलर मासा पण आहे. मी त्याचं नाव डॅनी ठेवलंय. अरे हो.. तर जातं.. मी नाना आजोबांकडे गेलो. गेल्या गेल्या नेहेमीप्रमाणे त्यांनी हातातला पेपर खाली ठेवला. आणि मला गोळी दिली. 
"आजोबा, जातं म्हणजे काय हो?" मी पण गोळी तोंडात टाकल्या टाकल्या प्रश्न केला
" का रे बाबा? आज काय हे मधेच? शाळेत विचारलय का? का गृहपाठात आहे?"
"सांगा नाऽऽऽ!!" आमच्या नानांना प्रश्नच फार असं सतीश काका बोलल्याचं मला आठवलं
"बरं बरं. सांगतो. आमच्या घरातच जातं नाही आहे. पण आजच् एका मासिकात एका जात्यावर पिठ काढणार्‍या बाईचं चित्र आहे."

"वॉव. म्हणजे यात पिठ दळायच्? स्वतः?"
"अरे! पिठ दळता येतं का? धान्य दळायचं. आणि हो स्वतः! आता हे बघ..." त्यांनी एक् चित्र काढलं. "जातं असं दोन सपाट दगडांच्या जड चकत्यांचं बनलं असतं. एक घट्ट बसलेला असतो तर एक त्यावर गोल फिरतो. या इथुन वरून धान्य टाकायच आणि हे जातं गोल गोल फिरवायचं की या दोन दगडांमधे धान्य भरडलं जातं...."
"भरडलं भणजे?"
"म्हणजे स्मॅश होतं. आणि त्याचं पिठ बनतं. हे पिठ इथुन बाहेर येतं"
तसा मी हुशार आहे. लगेच विचारलं "पिठाला कसं काय कळतं कुठुन बाहेर यायचं ते."
"हं" आजोबा हसले. असे ते कधी कधी उगाच हसतात." हे चित्र बघ...."

".... हे  'आय' लिहिलं आहे ना तिथुन धान्य टाकायचं. जात्याला आतमध्ये चिरा असतात आणि चर असतात.. चर म्हणजे "क्रॅकिंग्ज" यामुळे धान्य नीट भरडलं जातं. व्हेरी फाईन. पिठ कीती जाड किंवा बारीक हवं आहे त्यावर हे चर कीती खोल आणि किती हवेत ते ठरतं. चिरा म्हणजे ज्यात धान्य भरडल्यावर पिठ साचतं ते!"
"पण ते बाहेर कसं येतं?"
"जेव्हा नवीन पिठ तयार होतं ते पिठ आधिच्या पिठाला चिरांमधून बाहेर ढकलतं"
इतक्यात आ़जी मस्त भज्या घेऊन आली
"आजी, तु पाहिलं आहेस जातं?"
"पाहिलं?! अरे मी तर स्वतः दळलं आहे जात्यावर. वा वा काय सुरेख पीठ मिळायचं अगदी आपल्याला हवं तसं जाड. त्या भय्याची कटकट नाही. इतरांचं हलकं पीठ मिसळायला नको."
आजी एकदम काहीतरी गाणं गुणगुणायला लागली. मला तर एकही शब्द कळेना.
"हे काय गातेस? काही कळलं नाही!"
"ही अहिरणी बोली आहे. तुला नाही कळायची"
मला नाही काळायची म्हटलं की अस्सा राग येतो मला! जाऊदे! तसंही आजीला काहि नव्हतं त्याचं ती त्या गाण्यतच अडकली होती.

आजोबा सांगत होते. " आपल्या भय्याचं जे मशीन असतं ना तेही असंच काम करतं फक्त एलेक्ट्रीक मोटार जात्याला फिरवते. त्यामुळे खुप पीठ वार जलद बाहेर येतं." मी विचार करत होतो की आपल्या जयकिसनला(आमचा पीठाचा भैय्या) एकदा मशीन उघडलं की मला बोलावं असं सांगायचं. इतक्यात मला आठवले की आपल्याकडे जातं आहे. मी तसा हुशार आहे! मी पक्क ठरवलं की रविवारी बाबांना जातं माळ्यावरून काढायला लावायचं आणि स्वतः पीठ काठून बघायचं. सही! कीती ग्रेट आयडिया आहे. ओमला आत्ता सांगतो या विकेन्डचा प्लॅन.. त्यालाही बोलावतो.... तुम्हीपण बघा कधीतरी जात्यावर दळून!!

आजी-आजोबांच्या वस्तु - २ (बंब)

मी एकदम खुष होतो. माझे आजी आजोबा गावावरुन येणार होते. त्यांना आणायला बाबा स्टेशनवर गेले होते. मला गावाला जायला फार फार आवडते. तिथे एक गोठा आहे. तिथे बर्‍याच गायी-म्हशी आहेत. एकदा मी आजीला सांगितलं होतं की आम्ही मुलाला 'गाय' म्हणतो. तर आजी "तुम्ही गाय कसले बैल आहात लेकाचे! " असं तोंडला पदर  लाउन हसत म्हणाली होती. ती अशी पदर तोंडाला लाऊन हसली की मला एकदम फनी वाटतं. मी आजी-आजोबांची खुप वाट बघत होतो.
तसा मी हुशार आहे. आजी आजोबा येणार म्हणून  शहाण्यासारखी आंघोळ करून बसलो होतो. माझा खणपण आवरला होता. नाहितर आई नेमकी त्यांच्यासमोर ओरडते. एकदाची दारावरची बेल वाजली. आईने लगबगीने दार उघडलं
"या आई, कसा झाला प्रवास?"
"सुरेख होऽ कोकण रेल्वेने अर्ध्या वेळात आणून सोडलं" आजी नेहेमीच्या फनी टोनमधे बोलली.
इतक्यात आजोबा आत आले. ते काही ओमच्या आजोबांसारखं धोतर घालत नाहित. मी त्याना पाहुन एकदम खुष. सगळ्या आजोबांसारखं ते पण मला मजेशीर गोष्टी सांगतात. तोपर्यंत आजीने एक पिशवी हातात दिली.
"जा आईला दे.. खरवस् आहे गोऽ त्यात... रंभा व्याली .. दुसर्‍या दुधाचा आहे हो.."
"व्याली म्हणजे?" मी लगेच विचारलं
"म्हणजे तिला बाळ झालं. एकदम छान रेडकु आहे. डोक्यावर मोती आहे त्याच्या"
माझ्या डोळ्यासमोर ती मारकी म्हैस आली. म्हणजे तिला बाळ झालं तर. आजी आणि आईची काहितरी बडबड चालली होती. माझं लक्ष आजीकडच्या गोळ्यांकडे होतं इतक्यात "...त्यात काल आमचा बंब बिघडला..." असं काहितरी आजी बोलली. म्हटलं हे काय नवीन प्रकरण? तसा मी हुशार आहे, आई मला असा उघडाबंब बसु नको असं कधी म्हणते हे मला लगेच् आठवलं. त्यातला का हा बंब?
मी आजोबांना जाऊन बिलगलो. "आबा, बंब म्हणजे काय?"
"कसला रे बंब? आग विझवायचा? आग विझवायचा बंब म्हणजे ते फायर ब्रिगेडवाल्यांकडे असतो ना तो!"
"तुमच्याघरी पण हा आग विझवायचा बंब आहे?"
"नाहि रे.. घरी कसा असेल? केवढा मोठा असतो तो!"
"मग आजी काय् म्हणतेय ?की तो बिघडला आहे म्हणून"
"हा हा हा".. ठ्योऽऽय छिकऽक .. आजोबा एकदम जोरदार आवाजात शिंकले. मी तर हसायलाच लागलो. पण त्यांना कळलच नाही ते सांगत होते" अरे घरी तर पण पाणी तापवायचा बंब आहे"
"म्हणजे?"
"म्हणजे पाणी तापवायचं यंत्र."
तसा मी हुशार आहे. मला लगेच् कळलं  "अच्छा म्हणजे गिझर!!"
" हो गिझरच पण कोळशावर चालणारा."
"पण त्यात पाणी कसं गरम होतं?"
इतक्यात बाबा ओरडले "अरे ते आत्ताच आले आहेत त्यांना थोडावेळ बसु देत" मी पटकन आजोबांपासुन दुर झालो.
"नाही रे तु विचार बिनधास्त" असं म्हणून आजोबांनी मला परत जवळ ओढलं. आजोबा म्हणूनच मला आवडतात. मी बांबांकडे हळुच चिडवत पाहिलं. तोवर आजोबांनी एका कागदावर हे चित्र दुसरं काढलं होतं

                                                        

हा बंब आहे. हा पितळेचा असतो. पितळेची वस्तु लगेच गरम होते ना, म्हणून हा बंब पण पितळेचा.म्हणजे यात पाणीपण लगेच गरम होईल. तर यात मागे या झाकणातुन कोळसा घालतात. बंबाच्या आतमधे असे दोन भाग असतात. वरच्या भागात थंड पाणी ओततात . ते ह्या नळ्यांमधुन येतं ह्या नळ्या कोळशामुळे मस्त तापलेल्या असतात. त्यातुन पाणी गेल्यावर ते लगेच गरम होतं एकावेळी बरच पाणी ह्या छोट्या छोट्या नळ्यांमधुन आल्याने एकदम बरच् तापलेलं पाणी आपल्याला पटकन मिळतं. यातुन बरीच वाफ तयार होते ती इथुन चिमणीमधुन बाहेर येते."
मला एकदम गंमत वाटली. "म्हणजे मग हा बंब उघडता येतो?" मी विचारलं
" हो येतो की. गावाला आलास ना की मी उघडून दाखविन नक्की"
तसा मी हुशार आहे,  मी लगेच विचारलं. "मग गिझरमधे कुठे कोळसा घालतो आपण? मग त्यात पाणी कसं तापतं?"
"अरे, गिझरमधे इलेक्ट्रिसिटीने पाणी तापतं"
"इलेक्ट्रिसिटीने कसं तापतं? कोळसा पेटला म्हणून गरम होतो? पण इलेक्ट्रिसिटीने वायर कुठे गरम होते?"
"वायरचं मटेरियल कुठलं त्यावर ते अवलंबुन असतं. इस्त्री आपण इलेक्ट्रिसिटीने तापवतो की नाही तसं"
"बाबा, मग आपण घरी बंब नाही आणत? हा गिझर का वापरतो?"
" बंबाला कोळसा, लाकुड, गोवर्‍या लागतात. त्या जाळल्याने बराच धुर होतो. शिवाय त्यामुळे हा बंब साफ करायला लागतो तो वेगळाच" गोवऱ्या मला एकदम शेणाचा वास आठवला. घरात नको बाबा तो वास. आणि तसंही रोज तो बंब पिटवत बसलो तर शाळेला रोजच सुट्टी!!
"हं म्हणजे आपल्याला वस्तु गरम करायला गॅस, इलेक्ट्रिसिटी नाहितर कोळसा हवाच आणि बंबात कोळसा असल्याने पाणि तापतं. त्यातही नळ्या असल्याने ते एकदम लवकर तापतं. "
"आहे बाबा तुझा पोरगा हुशार!" आजोबा बाबांना म्हणाले.. मी जाम खुष.. मी इतकं छान बोलल्याबद्दल आबांना एक पापा दिला आणि खेळायला पळालो.

आजी-आजोबांच्या वस्तु - ३ (मोजमापे)

आजी आजोबा आले तेव्हापासुन घरात माझा वेळ मस्त जातो. आधी फक्त टिव्ही बघ, नाहीतर गेम्स, नाहीतर क्रिकेट काहिच नाही नाही तर दादाला त्रास दे आणि तो ही नसला तर अभ्यास यात सगळा वेळ जायचा. आजी आजोबा आले आणि माझं टाईमटेबल बदलूनच गेलं. मी हल्ली आजी बरोबर सकाळी फुलं तोडायला जातो. सॉरी! वेचायला किंवा खुडायला (आजी रागवते तोडायला म्हटलं तर्!) मला ह्या फुलांची नावंच माहित नव्हती, पण आता मी अजून हुशार झालोय. मला जास्वंद आणि गुलाब माहित होते. पण आता मोगरा, कण्हेर, प्राजक्त ही पण फुलं माहित आहेत. आजीने तर बिट्टी आणि गोकर्णातील फरकही समजावून सांगितला आहे.
काल आजी म्हणाली, "आपण मैलभर पुढे जाउया का रे? तिथे शंकराचं देऊळ आहे ना!"
मला हे देऊळ पक्क माहित आहे. तिथे एक भेळवाला पण बसतो. " हो पुढे आहे एक देऊळ. जाऊ आपण" मी आजीचा हात धरून तिला देवळात घेऊन गेलो. भेळ पण खाल्ली. आणि फ्रि पुरी पण! परत घरी जात होतो.. अचानक आठवलं म्हणून विचारलं, "आजी, मैल बरोबर का मीटर? का आपण मराठीत मीटरला मैल म्हणतो?".
"नाहि रे, मीटर किलोमीटर आत्ता वापरतात. आधी आम्ही मोजायला मैलच वापरायचो. बहुतेक गोरे वापरायचे मैल. "
"गोरे म्हणजे आपले समोरचे गोरे काका?"
"नाहि रेऽऽऽ" आजीने परत हसायला तोंडाला पदर लावला. "गोरे म्हणजे इंग्रज!"
"अच्छा, म्हणजे ब्रिटिश!" मी तसा हुशार आहे कळलं मला लगेच! बोलता बोलता आम्ही घरी येऊन पण पोचलो. आजीने जरा हुऽऽश्श् केलं आणि आजोबांना म्हणाली "भारी चौकस होऽऽ नातु तुमचा. तुम्हीच सांगा आपण लांबी कशी मोजायचो ते"
"काय रे, कसली लांबी??"
तसा मी हुशार आहे, मी लगेच सांगितलं "लांबी म्हणजे लेन्थ!" आजोबा हसले.
"आस्स् का?अरे आम्ही छोट्या लांब्या इंचात मोजायचो. तुझ्या फुटपट्टीवर अजून इंच आणि सेमी दोन्ही असतं की नाही. आणि अजून मोठं अंतर फुटात. आणि त्याहुन लांब अंतर मैलामधे. "
"म्हणजे तुमच्यावेळी पण फुटपट्टी होती?"
"हो ही बघ"

आबांची ती फुटपट्टी बघुन मला मजा वाटली. एकदम जूनी फोल्डिंग फुटपट्टी होती.
"आरे लांबीचं तरी ठिक होतं, वजनं मात्र तुमच्यापेक्षा फार वेगळी होती."
"म्हणजे?"
"सोनं, चांदी अश्या गोष्टी छोट्या तराजूत तोलायचे त्याला तागडी म्हणायचे. हे बघ ही सध्या वापरतात त्या तागडीचं चित्र आलं आहे. आणि ही आमच्यावेळची तागडी"
         

"यात एका बाजूला गुंजा घालायच्या आणि दुसर्‍या बाजूला सोनं"
"गुंजा म्हणजे?"
"गुंजा म्हणजे एक बी असते. एका शेंगेत ४-५ गुंजा निघतात. ही चित्रं बघ......     

....गंमत अशी की प्रत्येक गुंजेचं वजन एकदम सारखं असतं"
"ही गुंज काय मस्त दिसते नाही" मला ही गुंज फार आवडली. लाल चुटुक.
"आता पण मिळतात गुंजा?"
आजी म्हणाली "हो मिळतात की, आता शंकराच्या देवळामागे मला दिसल्या गुंजांच्या वेली, परत गेलो ना देवळात की दाखवीन होऽऽ"
तसा मी हुशार आहे. " पण जर खुप जास्त सोनं हवं असेल तर कीतीतरी गुंजा लागतील."
"बरोब्बर म्हणून जास्त वजनासाठी तागडीबरोबर इतर वजनमापंही  वापरायचे. जसे वाल, कवड्या वगैरे. पण वानरं आल्यावर आमच्या लहानपणीच हल्ली वापरतात तशी मापे वापरायला सुरवात झाली होती."
"वानरं म्हणजे माकड ना?"
" हो, पण इंग्रजांची नाकं आणि गाल लाल असायचे अगदी आपल्या हुप्प्या वानरासारखे, म्हणून त्यांना वानरं म्हणायचो आम्ही!"
" आपल्याकडे माळ्यावर एक तागडी आहे ना रे?" आबांनी बाबांना विचारले. "हो पण आपण नंतर बघुया का?" बाबा पेपर वाचत होते. पण आबांनी त्यांच न ऐकता त्यांना माळ्यावरून ती तागडी काढायला लावली

"वॉव, किती मस्त! त्याच्याबरोबर वेगवेगळी वेट्स म्हणजे आबा म्हणतात तशी वजनमापे होती.  आबा म्हणाले "जा आतून एक वाटीभर चणे घेऊन ये. आणि ते या एका बाजुला घाल. आता या चण्याचं वजन करायचय आपण. कीती असेल?"
"असेल खुप"
"खुप म्हणजे? १००ग्रॅ., २००ग्रॅ? की एकदोन ग्रॅ?"
"..." मी वेड्यासारखा बघतच राहिलो. आता मला कसं कळणार!
"बरं, असं करु या दुसर्‍या बाजूला १०० ग्रॅ. च वजन टाक"
तिथे वजन ठेवल्या ठेवल्या ती बाजू एकदम खाली गेली. म्हणजे चणे १०० ग्रॅ.पेक्षा कमी वजनाचे होते.
"आता ५० बघ घालून"
पण ५० घातल्यावर चण्याचं वजन जास्तच राहिलं.

123
"आबा आपल्याकडे १०० आणि ५० याच्यामधलं वजन् कुठे आहे?"
"हुशार आहेस!" (आहेच मुळी) "अरे, मग त्याच बाजुला आणखी २०ग्रॅ चं घाल"
"पण मग आता वजन जास्त झालय"
4

"आता गंमत करू. चण्याच्या बरोबर आणखी ५ ग्रँ.चं वजन घाल"

5
"सह्ही!! काटा बरोब्बर मधे आलाय! म्हणजे वजन कीती?"
तसा मी हुशार आहे "७०-५ बरोबर ६५ ग्रॅम!!!"
"कर्रेक्ट!!" आजोबा असं मधेच इंग्रजी बोलले की फार गंमत वाटते. आजोबांनी मग एक कॅडबरीपण दिली
आता मी ठरवलंय की ओमला बोलावून आमच्या सगळ्या जिआयजोंचीं वजनं करायची. तुम्हीपण कुठुन तरी तागडी मिळवा आणि स्वतः वेगवेगळ्या वस्तुंची वजन करून बघा. खुप मजा येते!

टिपः बाकी श्री. प्रकाश घाटपांडे यांनी जालावर चढवलेली तागडीची चित्रे मुलांना येथुन दाखवता येतील

आजी - आजोबांच्या वस्तु - ४ (टाईपरायटर)

काल मी दादाच्या  खोलीत बसून कॉम्प्युटरवर मस्तपैकी गेम्स खेळत बसलो होतो. आबा कधी मागे येऊन उभे राहिले कळलंच नाही. माझ्या ३ लेवल्स पार झाल्यावर मी मागे वळून पाहिलं तर आबा अगदी चष्मा लावून स्क्रीनकडे कौतुकाने पाहत होते. मला गंमत वाटली, म्हटलं  "आबा, इतकं काय बघताय? फ़क्त गेम आहे तो."
"अरे, आमच्या लहानपणी नव्हते असे खेळ. असो मी आलो कारण मला माझं पाकिटावर नाव घालायचंय. हाताने लिहिलं असतं पण आपल्या अक्षरापेक्षा छापील अक्षर असलं की सरकारी पत्राला जास्त वजन येतं असा अनुभव आहे."
"पाकीट म्हणजे एन्व्हलप ना?"
"हो रे बाबा. करतोस का नाव पत्ता टाईप? मग आपण पाकिटावर प्रिंट करूया"
"मला टायपिंगच येतं फक्त, पाकिटावर प्रिंट कसं करायचं ते फक्त दादालाच माहीत आहे. मी टाईप करून ठेवतो. मग दादा आला की काढा प्रिंट"
"हं ठीक आहे. पण जर घरात टाईपरायटर असता तर किती बरं झालं असतं दोन मिनिटात पत्ता छापून तयार."
तसा मी हुशार आहे "टाईपरायटर म्हणजे ते पेपर घालून टायपिंग करतात तेच ना?"
"हो तेच ते"
"आपल्याकडे होता टाईपरायटर?"
"हो होता. अजूनही असेल चल आईला विचारूया तुझ्या"
मी आणि आबा किचनमधे म्हणजे स्वयंपाकघरात गेलो.  मी लगेच आईला विचारले
"आई, आपल्याकडे टाईपरायटर आहे का?"
"का रे आता कुठे मध्येच आठवला तुला?"
"अगं त्याला नाही मलाच " आबा पुढे आले "म्हटलं असेल बाहेरच तर बघू थोडं तेल-पाणी करून ठेवतो बसल्या बसल्या"
"अहो, हे आले की काढायला सांगते माळ्यावर असेल"
"तो आल्यावर कशाला? आम्हीच काढतो की. तेवढीच दुपार व्यस्त राहील, चल रे"
आबां मग स्वतः माळ्यावर चढले. कसले ग्रेट आहेत ते!! आणि हनुमानासारखा तो टाईपरायटर खाली आणला.

त्या टाईपरायटरवर खूप धूळ जमा झाली होती. आजोबांनी तो फडक्याने नीट पुसून काढला.
"आबा, आता हा वापरायचा कसा?"
"हा टाईपरायटर कार्बनच्या एका पट्टीमुळे प्रिंट करतो. याला ही जी बटणं आहेत ना ती आतून धातूच्या ठश्यांना जोडलेली असतात."
"म्हणजे? मला नाही कळलं"
"हं.. हे बघ.. हा कार्बनचा रोल. यावर तू जे काही ठेवशील, लिहिशिल त्याची आकृती मागच्या कागदावर उमटेल.

टाईपरायटरमध्येही जेव्हा तू बटण दाबतोस तेव्हा त्याचा ठसा या कार्बनच्या पट्टीवर जोरात आपटतो आणि कागदावर अक्षर उमटतं. आपण टाईपरायटर चालू करूया म्हणजे कळेल तुला" आजोबांनी टाईपरायटर उघडला. मला म्हणाले" हं आता एक एक बटण दाबून बघ"
मी एक एक बटण दाबत होतो. जे बटण दाबलं जायचं ना।ई तिथे आबा थोडं तेल टाकत. मग हळू हळू सगळी बटण नीट दाबली जाऊ लागली.
"पण मग हे सगळे पार्टस काय आहेत?"
"माझ्याकडे एका जुन्या टाईपरायटरचं चित्र आहे. यात बघ. आपला टाईपरायटर जरी या चित्रातल्या यंत्रापेक्षा खूप  प्रगत असला तरी तुला पार्टस ची म्हणजे वेगवेगळ्या भागांची कल्पना येईल." आजोबांनी पुढील चित्र दाखवले

"तू रिबिन म्हणजे कार्बनची पट्टी तर बघितली आहेसच. प्लॅटन म्हणजे धावपट्टी. ही पट्टी पेपरला मागून आधार देते. जेव्हा आपण बटण दाबतो तेव्हा हे टाईपबार्स म्हणजे टंकपट्ट्या ठसा रिबिनीवर आपटतात. रिबीन आणि धावपट्टी यांच्यामध्ये असलेल्या पेपरवर अक्षरे उमटतात. तू जसजसं टाईप करत  जातोस तसतसं ही धावपट्टी पुढे पुढे सरकत जाते. पान संपलं की तुला हे हँडल दाबून धावपट्टी परत पहिल्या जागी आणायला लागते."
"म्हणजे हे असं दर वेळी करत बसायचं?"
"हो"
"त्यापेक्षा आमचा काँप्युटर बरा" मी आजोबांना चिडवायला म्हटलं. पण आजोबांना हे माहीत होतं बहुतेक. तेच म्हणाले.
"हो रे! आता टाईपरायटर वापरण्यापेक्षा संगणक उत्तमच. पूर्वी हाताने लिहावं लागत असे. तेव्हा त्यापेक्षा टाईपरायटर बरा होता. पुढे संगणक आल्यावरही टाईपरायटर वापरणं गरजेचं राहिलं नाही. पण म्हणून तो माहीत नसावा का?"
"माहिती हवीच! मला तर फार आवडला. गंमत म्हणून किंवा घरच्याघरी प्रिंट करायला चांगला आहे." मी एकदम मोठ्या माणसांसारखं बोललो. आबा मोठ्याने हसले आणि पाठिवर थाप मारली
"पण आबा, याच्या बार्सवर ही अक्षर उलट का हो? आणि हा 'रिबन व्हायब्रेटर' कशासाठी?"

"तू ठसा बघितला आहेस का?"
"ठसा म्हणजे?"
"म्हणजे स्टँप. पोस्टाचा नाही. स्टँपिंगवाला"
"होऽ बघितला आहे"
"त्यात कस उलट अक्षरं असतात. ती कागदावर सरळ होऊन उमटतात तसंच हे. आणि हा व्हायब्रेटर म्हणजे कार्बनपट्टीला वरखाली करतो. कार्बनची पट्टी सतत हवेच्या संपर्कात आली तर लवकर सुकते. म्हणून फक्त ठसा जवळ आला की हा व्हायब्रेटर रिबिन वर करतो."

मी मग त्या टाईपरायटरमध्ये कागद घातला. तिथे दोन पट्ट्या होत्या त्याने कागद धावपट्टीवर घट्ट बसला. मग मी माझं नाव, आईचं नाव, बाबांचं नाव, आबा-आजींची नावं सगळं टाईप करून बघितली.
आता आबा पुढे झाले आणि त्यांनी त्यांच्या पाकिटावरही  नाव टाईप करून घेतलं. आता आज आम्ही पोस्टात जाणार आहोत ते पाकीट पाठवायला!!

आजी - आजोबांच्या वस्तु - ५ (शिवणयंत्र)

काल मी आजी बरोबर फुलं वेचायला गेलो होतो. नंतर देवळातही गेलो. आजीने त्या वेलीवरच्या गुंजादेखील दाखवल्या. मस्त लाल चुटुक गुंजा! मी काही शेंगा तोडल्या आणि खिशात भरल्या. उद्या शाळेत बाईंना दाखवणार आहे. मी खूश होतो, कारण आजी म्हणाली होती की आज आपले ब्रह्मकमळ फुलणार आहे. हे फूल कधीतरीच येते म्हणून आम्ही ते बघायला पटापट घरी आलो. पण ती कळी अजून उमललीच नव्हती. आई म्हणाली
"जा आधी हात पाय धुऊन घे आणि उपमा खायला बस. ती कळी संध्याकाळी उमलेल. उगाच तिच्या शेजारी बसून राहू नकोस"
मग काय! मी उठलो. इतक्यात मला खिशातल्या गुंजांची आठवण झाली. मी खिशात हात घातला आणि शेंगा बाहेर काढल्या पाहतो तो काय बर्‍याच शेंगांमधल्या गुंजा हरवल्या होत्या. मग कळलं की माझ्या चड्डीचा खिसा थोडा उसवला होता.
आजी म्हणाली "जा सुई-दोर्‍याचा डबा घेऊन ये. शिवून टाकूया."
"काय हो आई, या शिवण्यावरून आठवलं, घरचं चालू आहे का शिवणयंत्र?" आईने आजीला विचारलं
"नाही गोऽ बर्‍याच महिन्यात हातही लावला नाही आहे. आजकाल हे देखील तयार कपडे वापरायला लागल्यापासून काही गरजच पडत नाही"
"तू स्वतः कपडे शिवायची" मला एकदम मजा वाटली.
"सगळे कपडे नाही रे, पण पोलकी, यांचे सदरे, झालंच तर पिशव्या आणि हल्लीच्या मुलींना फॉल वगैरे लावून द्यायचे त्यावर."
"पिशव्या कशाला? गावात मिळत नाहीत पिशव्या?"
"इथल्यासारख्या गावाला सगळीकडे प्लॅस्टिकच्या पिशव्या मिळत नाहीत. प्रत्येकजण बाजारात कापडी पिशव्या घेऊन जातं. तशाही, तुमच्या या प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरणं चांगलं नाहीच. तिथे त्या प्लॅस्टिकच्या पिशव्या गुरं खातात, विहिरींमध्ये-पाण्यात जातात. इथे त्या गटारांत जातात, पाणी साचतं अगदी जमिनीत पुरल्या तरी जमीन खात नाही त्यांना"
"मग तू आता काही वापरत ते मशीन?"
"दमली रे आता आजी तुझी" असं म्हणून आजी गप्प झाली.
"चल रे जा बाहेर, आजोबा बघ काय सांगताहेत. इथे लुडबुड करू नकोस मध्ये"
आईने मला बाहेर पाठवलं
तसा मी हुशार आहे सुईंग मशीन मी गावाला गेलो असताना बघितलं आहे. पण मला ते चालतं कसं हे कळलंच नव्हतं
"आबा, सुईंगमशिन चालतं कसं?"
आजोबा पेपर वाचत होते. तो बाजूला ठेवत ते म्हणाले "म्हणजे शिवणयंत्र!"
"तु बघितलं आहेस ना आपल्याकडचं यंत्र? आपल्याकडे जे यंत्र आहे ते जरा जुनं आहे. त्यावर शिवायला पायाने खालची फळी हालवत बसावी लागते. थांब तुला चित्रच दाखवतो."

 

"तर हे शिवणयंत्र. याला एक खास पुढे भोक असलेली सुई वापरतात त्यात दोरा घातलेला असतो. हा दोरा इथे वरच्या रिळातून येतो. ही सुईच्या खालची चीर असलेली पट्टी पाहिलीस? याला हवंतर कपड्याची धावपट्टी म्हणता येईल. त्याच्या खाली अजून एक छोटंसं रीळ असतं त्याला बॉबिन म्हणतात. बॉबिनीवर मुख्य रिळावरच्या रंगाचाच दोराचा असतो. ही सुई या आतल्या उभ्या दांड्याला आणि तो एका आडव्या दांड्याला जोडलेला असतो. हे चित्र बघ म्हणजे समजेल तुला"
तसा मी हुशार आहे. पण तरी नक्की शिवलं कसं जातं हे काही मला कळलं नाही. आबा बोलतच होते..अगदी मन लावून..
"आता तू हे पॅडल वर खाली केलंस की हे चक्र पट्ट्यामुळे फिरतं हा आतला दांडा फिरतो. हा दांडा सुईला सतत वरखाली वरखाली असा हालवतो. ची कापडामागून बॉबिनीच्या दोर्‍याबरोबर गुंफली जाते आणि टाका बसतो. या धावपट्टी वरून आपण कापड पुढे पुढे न्यायचं नाहीतर सगळे टाके एकाच ठिकाणी पडून गुंताही होईल नी कापडही फाटेल."

"पण त्यात बॉबीनीचा दोरा कशाला हवा. आपण तर सुईने शिवतो त्याला एकच दोरा लागतो."
"यासाठी, मला मध्ये जालावर म्हणजे तुझ्या इंटरनेटवर एक चित्र सापडलं होतं ते मी दादाला सेव्ह करायला सांगितलं होतं. संगणक चालू कर दाखवतो तुला."
मी काँप्युटर चालू करायला नेहमीच तयार असतो. तो मी चालू केला.आबांनी एक फाइल उघडली. त्यात पुढील चित्र होतं"

"वॉव.!" आबांना काही सांगायची गरजच पडली नाही मला हे चित्र पाहूनच कळलं की टाका कसा पडतो.
आबांनी मात्र मला अजून थोडी माहिती शोधायला सांगितली. हे शिवणयंत्र कधी वापरात आले? सिंगर कोण होता? नंतर आलेले इलेक्ट्रॉनिक शिवणयंत्र कसे चालते?
तसा मी हुशार आहे. पण मी ही माहिती इंटरनेटवरून शोधणार आहे. दादाने शिकवलंय कसं शोधायचं ते. तुम्हीपण नक्की शोधा.
अरे हो विसरलोच, आमचं ब्रह्मकमळ देखील दुपारनंतर छान फुललं.

आजी - आजोबांच्या वस्तु - ६ (चरखा)

सुप्परमॅन सुप्परमॅऽन .. सुप्परमॅऽऽन.. सुप्परमॅन! वरतुन चड्डी आतून पँऽऽऽटऽ.... सुप्परमॅन सुप्परमॅऽन ... सुप्परमॅऽऽन!!!!!..... काय सही गाणं आहे हे. कालच आजोबांनी मला "अग्गोबाई ढग्गोबाई'ची सीडी आणून दिली. मला खूप आवडली.. आताही मी गाणीच ऐकत होतो. मला एकदम एक जुनी शंका आठवली..

"आबा! सुपऽमॅन असतो का हो खरंच? ओम म्हणतो की सँटाक्लॉज सारखा सुपरमॅन पण खरा नाही आहे"
"त्याला काय माहीत.. सुपरमॅन असतोच आणि एक नाही तर बरेच असतात. फक्त त्यांना सुपरमॅन म्हणून ओळखत नाही कोणी. अरे भारतात बरेच सुपरमॅन होऊन गेले. तुला रामाच्या अनेक गोष्टी माहीत आहेतच, शिवाय कृष्ण आहे, बुद्ध आहेत; हल्लीचं म्हणावं तर शिवाजी महाराज वगैरे सगळे खरंतर सुपरमॅनच होते. त्यांचे कार्य खूप सुपर होते"
"तुम्ही पाहिलाय का कोणता सुपऽमॅन?"
"होऽ.. मी लहान असताना एक सुपरमॅन होता. महात्मा गांधी"
तसा मी हुशार आहे "म्हणजे मोहनदास करमचंद गांधी!"
"बरोब्बर! तेच ते. आपल्या नोटेवरही तेच असतात"
"ते खूप वेगात चालत आणि चरख्यावर सूत कातत ना?"
"बरोब्बर. अरे सूतकताई तर त्यांनीच जगभरात प्रसिद्ध केली"
"तुम्हाला येतं सुत कातता?"
"हो तरुणपणी शिकलो होतो. पण पुढे गरज पडली नाही. आता माहीत नाही येईल का ते"
"सही! म्हणजे तुम्हाला चरखा चालवता येतो. ग्रेट! पण सुत निघतं म्हणजे नक्की कसं निघतं? "
"हं सांगतो. सूतकताईसाठी सगळ्यात आधी चांगला कापूस शोधावा लागतो. ज्यातून चांगला लांब धागा निघतो तो व्यापारी कापूस वेगळा आणि आपण घरी वातींसाठी वगैरे वापरतो तो कापूस वेगळा. चांगला कापूस मिळाल्यावर तो पूर्वी पिंजून घ्यावा लागे. हल्ली बाजारात असा पिंजलेला कापूसच मिळतो. कापूस मिळाल्यावर मुख्य काम असते ते त्याची पुन्नी बनवणे. चल आपण नेटवर बघूया पुन्नीचं चित्र"

आम्हाला नेटवर पुढील चित्र मिळाले.

           

आजोबा परत सांगू लागले "तू सिगार बघितली आहेस का?"
"म्हणजे सिगारेट? शेजारचे काका ओढताना पाहिली आहे."
"सिगारेट नाही रे! जुन्या चित्रपटात असतात बघ."
"हा! ती जाडजूड सिगारेट"
"हं! तर त्या सिगारच्या आकारासारखा नीट पिंजलेला कापूस गुंडाळून घेतात. याला पुन्नी म्हणतात. ही कापसाची पुन्नीमध्ये जितक्या कमी गुठळ्या असतील तितके सुत चांगले निघेल. चरख्याला एका टोकाला मोठं चक्र असतं आणि दुसर्‍या टोकाला एक छोटं चक्र असतं या चक्राला एक जाड सुई म्हण किंवा दाभण म्हण अडकवलेली असते. याला इंग्रजीत स्पिंडल म्हणतात. जेव्हा मोठं चाक फिरतं तेव्हा हे छोटं चक्र फिरतं आणि म्हणून हे स्पिंडल फिरतं. स्पिंडलला पुन्नीचं एक टोक जोडतात. जेव्हा चरखा फिरू लागतो तेव्हा पुन्नीतून छान दोरा निघतो. तो स्पिंडलभोवती गोळा होतो."
"मला नाही कळलं नीट"
"बरं हे बघ हे जुन्या चरख्याचं चित्र आणि हे हल्लीच्या"

       charkha_modern

"आपण काही विडियो मिळताहेत का नेटवर ते पाहू.. हा बघ एक विडियो नवीन चरख्यातून सुत कसं काततात ते दाखवतोय...

सह्ही आता कळलं की किती कठीण होतं सुत कातणं. बरं झालं आमच्यावेळी रेडीमेड शर्टस असतात. आजोबांनी आता अजून एक काम दिलं आहे. कोणकोणत्या नोटेवर गांधीजींचं चित्र असतं ते सांगायचंय. तसंच चरखा आणि आपला झेंडा यात काय संबंध होता ते नेटवर शोधायचंय. पण ते उद्या.. आता मी परत गाणी ऐकतोय "मी पप्पाचा घेऊन फोऽऽऽन.. फोन केले एकशे दोन!!!" तुम्ही पण ऐका "अग्गोबाई ढग्गोबाई"

टिपः मुलांना दाखवायला बरेच विडियो यू ट्यूबवर उपलब्ध आहेत

आजी - आजोबांच्या वस्तु - ७ (पतंग आणि मांजा)

काल आई "तिळगुळाचे लाडू बनवायला हवेत" असं आजीशी बोलताना म्हणाली. तसा मी हुशार आहेच, लगेच ओळखलं की संक्रांत जवळ येते आहे. मी कालच शाळेत ओमशी बोललो. आमच्यापुढे एक मोठा प्रश्न होता. गेल्यावर्षी आम्ही ओमकडे पतंग उडवायला गेलो होतो. हल्ली त्याचा दादा आमच्याशी खेळत नाही. तो म्हणतो की आता तो मोठा आहे आणि त्याचे मित्र पण मोठे आहेत. पतंग तो त्यांच्याबरोबर उडवणार. मग यंदाच्या पतंगाचं काय?
मी एकदम सॅड होऊन बसलो होतो. आजोबा कुठुनसे आले.
"काय रे! आता संध्याकाळ होईल.. तू घरी कसा?"
"असंच"
"असंच कसं? काहीतरी झालं असणार. भांडलास का कोणाशी? का मारामारी केलीस? का कोणी काही बोललं का?"
"नाही"
"मग?"
"मग काय? मला पतंग उडवायचाय"
"हात्तिच्या एवढंच ना. उडवूयात की आपण"
"खरंच?!?"
"हो त्यात काय."
"चला मग जाऊया आता पतंग आणायला"
"आता? अरे अजून ४-५ दिवस आहेत. आपण असं करूयात का घरी बनवून बघायचा का पतंग?"
"घरी येतो बनवता?"
"होऽ येतो की एकदम सोपं आहे. जा हे पैसे घे आणि सोसायटीच्या दुकानातून पतंगाचा कागद घेऊन ये. आणि बाहेर रस्त्यावर जायचं नाही! नसेल त्या दुकानात तर सरळ घरी ये!!"
मी धावत गेलो आणि पळत आलो. मस्त लाल लाल कागद घेऊन आलो. घरी येऊन बधतो तर आबा खराटा घेऊन बसले होते. म्हटलं
"हे काय आता पतंग करायचाय ना तुम्ही सफाई काय करताय?"
"नाही रे! आपल्या पतंगासाठीच काठी शोधत होतो. पण खराट्याची नाही चालणार. फारच तकलादू आहे"
मग आबाच खाली गेले आणि मजबूत पण फ्लेक्झिबल काठ्या घेऊन आले. म्हणाले "गोळेवाल्याकडून घेऊन आलो त्याने अजून तुकडे केले नव्हते" मग आबांनी एक काठी फूटभर लांबीची घेतली आणि दुसरी काठीही तितक्याच लांबीची करून घेतली. दोन्ही काठ्या सारख्याच जाड होत्या. आता त्यांनी एका काठीचा मध्य शोधला आणि ती काठी दुसऱ्या काठीवर आडवी ठेवली. मग त्यांना उभ्या काठीच्या उंचीचा डायमंड शेप पतंगाच्या कागदातून कापून घेतला. पुढची चित्र बघा म्हणजे नीट कळेल.

"आता हा पतंग झाला तयार. त्याला कन्नी बांधायची आहे. "
"कन्नी?"
"हो अरे मांजा सरळ पतंगाला गुंडाळत नाहीत त्याला कन्नी बांधावी लागते. ही कन्नी पतंगाला दोन बाजूंनी तोलते ज्यामुळे तो वाऱ्यावर तरंगतो."
मग आबांनी एका साधा दोरा पतंगाला बांधला (शेवटच्या आकृत्या). त्यासाठी आडव्या काठीच्या वर आणि आडव्या काठीखाली त्याच्या दुप्पट अंतरावर  भोकं पाडली.
"आता मांजा आणायला जायचं?"
"मांजा कशाला आणायचाय तोपण बनवू यात चल!"
"तो कसा काय बनवणार?"
"जा आईला खळ करायला सांग. मी तो पर्यंत लांब दोऱ्याच गुंडा घेऊन आलो."
इतक्यात आई म्हणाली "अहो आबा, स्टार्च नाही आहे घरी खळ कशी बनवणार?"
"हो का! ठीक आहे स्टार्च पण घेऊन आलो."
आबा स्टार्च आणि दोरा घेऊन आले. स्टार्च पाण्यात शिजवून त्याची खळ तयार केली. खळ तयार होत असताना एका प्लॅस्टिकच्या भांड्याला बाजूने दोन भोकं समोरासमोर पाडली. मग दोरा त्या भोकांतून काढला. शिवाय एक जुनी काचेची बाटली फोडली आणि पाटा वरवंट्याखाली काचेचा रवाळ चुरा केला.
"चल आता गच्चीत. मांजा सुकेलही पटापट आणि घरी तसंही इतकी जागा नाही आहे."
गच्चीवर गेल्यावर त्यांनी एका ओल्या फडक्यावर थोडी काच पावडर ओतली.

मग त्या दोन भोकं आणि त्यातून दोरा असलेल्या भांड्यात खळ ओतली. आणि दोरा हळूहळू खेचू लागले त्याच वेळी दुसऱ्या बाजूला काचेच्या फडक्यातून दोरा काढत त्यामुळे तो काचेचा चुरा त्या खळीला आणि दोऱ्याला चिकटे. मी तो दोरा घेऊन पुढे जात होतो आणि सुकला की रिळाला गुंडाळत होतो. काय मस्त झालेला मांजा एकदम कडक आणि धारधार!!
मला आता आबा पतंग उडवायला पण शिकवणार आहेत. शिवाय पतंगोत्सव कुठे कुठे होतो, चीनमधले ड्रॅगनचे पतंग, वेगवेगळ्या आकारातले पतंग शिवाय पतंगांची गाणी सगळं काही नेटवर मिळेल असं आबा म्हणाले तेही शोधायचंय. तुम्हीही शोधाच. फक्त जर मांजा घरी बनवणार असाल तर कोणीतरी मोठं माणूस घरी असेल तरच बनवा. हॅपी संक्रांती! तिळगूळ घ्या गोड बोला!!

आजी - आजोबांच्या वस्तु - ८ (तार)

आज रविवार असल्याने घरात सगळेजण होते. दादा काँप्युटरवर बसला होता. शेजारी आबा काही न बोलता शांतपणे तो काय करतोय ते बघत होते. त्याने नेहमीप्रमाणे मेलबॉक्स उघडला, तसंच याहूवरही तो ऑनलाईन गेला. त्याच्या मित्रांशी चॅट सुरू केलं. खरंतर पटकन जेवण संपवून मला काँप्युटरचा ताबा घ्यायचा होता. पण गारेगार ताक पिण्याचा नादात दादाने काँप्युटर पटकावला.
आबा अचानक म्हणाले "बरंय रे आता, एखाद्याशी संवाद साधायला किती माध्यमं आहेत! फोन आहे, झालंच तर तुमचं चॅटिंग आहे, शिवाय फॅक्स आहे, ईमेल आहेत एखाद्याशी बोलणं आता फारच सोपं झालं आहे"
"तुमच्यावेळी कसं होतं हो आबा?"
तसंही दादा मला काँप्युटरवर बसू देणार नव्हताच तेव्हा एक डोळा तिथे ठेऊन आबांशीच गप्पा मारत बसलो.
"आमच्यावेळी तर मुळात टेलिफोनच नव्हते. मग हे इंटरनेट, आणि फॅक्स कसले येताहेत."
"मग तुम्हाला एखादा मेसेज फास्ट पोचवायचा असेल तर काय करायचात"
"साधारणत:  पत्र पाठवून खुशाली विचारणं होत असे. पण लगेच संपर्क साधायचा असला तर तार करावी लागे"
"तार म्हणजे"
"म्हणजे टेलीग्राम"
"हे काय असतं? हल्ली कुठे येते तार? आणि तार म्हणजे तारेवर मेसेज लिहायचे? मग ते वाचत कसे येणार? आणि ति तार मेसेज लवकर कसा पाठवणार?"
"अरे हो.. हो.. हो.. किती प्रश्न विचारशील! सांगतो." असं म्हणून आजोबा जरा बाहेर गेले.
तसा मी हुशार आहे! मी दादाला म्हटलं.."दादा, आबा काहीतरी तारेचं सांगताहेत. नेटवर काहीतरी मिळेल. तुझं झालं की लगेच सांग"
दादा  तर माझ्यापेक्षाही हुशार आहे. म्हणाला "ये इथे शोधू आपण मग करतो मी माझं काम"
इतक्यात आबा आले. मग मी परत काँप्युटर मिळवायचा नाद सोडला. नेहमीप्रमाणे त्यांच्याकडे एक फोटो होताच.

 

हे तारयंत्र. तार म्हणजे "वायर". हे यंत्र म्हणण्यापेक्षा बटण किंवा स्वीच म्हण हवंतर. हे यंत्र वायरच्या एका बाजूला असतं तर बीपर किंवा ध्वनीयंत्र दुसर्‍या बाजूला असा सेटअप असायचा. माझ्या वडिलांच्या म्हणजे तुझ्या पणजोबांच्या काळात तर तार म्हणजे खरोखरच्या तारा असायच्या. पुढे रेडियोचा शोध लागल्यावर रेडियो टेलीग्राफि चालू झाली आणि संदेश वायर शिवाय येऊ लागला. पण एकदा "तार" नाव पडलं की पडलं! "
"पण मग वायर मधून सिग्नल कसा पाठवायचे?"
"हा तारेचा स्वीच विशिष्ट क्रमाने दाबला की विशिष्ट अक्षर समजले जाते. या मान्यताप्राप्त लिपि म्हणजे कोडला मोर्स कोड म्हणतात. आपल्याकडे नोकियाचा जुना हँडसेट आहे बघ. त्यात एस्.एम्.एस्. आल्यावर कसा आवाज येतो."
तसा मी हुशार आहे लगेच आवाज काढून दाखवला "बिप् बिप् बिप्.... बीऽऽप बीऽऽप.. बिप् बिप् बिप्"
"बरोबर!! यातल्या कमी वेळ चालणार्‍या बिप् ला डिट् अथवा डॉट् म्हणतात. तर दीर्घ म्हणजे जास्त वेळ आवाज होणार्‍या बीऽऽप ला डाह् अथवा डॅश म्हणतात. मोर्स कोड मध्ये एस् हे इंग्रजी अक्षर '...' अश्या तीन डॉट् ने मिळून बनले आहे तर एम् म्हणजे '__' दोन डाह्. म्हणून एस्.एम्.एस् म्हणजे ..?!?"
"डॉट् डॉट् डॉट्  डाह् डाह्  डॉट् डॉट् डॉट्"
"शाबास!"
"पण मग हे आवाज कसे काय पाठवत असत?"
"ते सोपं आहे.  आता तू दारावरचं बटण दाबलं की काय होतं?"
"घरात बेल वाजते आणि आपल्याला कळतं की बाहेर कोणीतरी आहे"
"तसंच हे ही. फक्त बेल कशी वाजवतो त्याचा मोर्स कोडने क्रम ठरवला आहे. म्हणजे जर तीनदा पटापट बेल वाजवली तर एस् .. तीच दोनदा दीर्घकाळ वाजवली तर एम् असं"
"मग तेव्हा दूरवरून मेसेज पाठवायला वायर्स टाकल्या होत्या."
"हो असं दिसतंय.. " दादा एकदम म्हणाला. म्हणजे तो ऐकत होता तर! "हे बघ. विकिपीडियावर १८९१ ला जगात अश्या वायर्स कुठे कुठे होत्या ते दाखवलं आहे. पुढे रेडियो आल्यावरही सिग्नल्स मोर्स कोडनेच पाठवत फक्त तारेच्या ऐवजी 'बिनतारी' संदेश असे म्हणत. नंतर हा कोड ऐकून मग संदेश बनवण्या ऐवजी डायरेक्ट कोडचा अर्थ छापणारी मशीन्स आली"

आबा परत सांगु लागले. "पण कधी कधी संदेश पाठवणारा जरा चुकला तरी फार मजा येत असे. असो. हा मोर्स कोड अजूनही काही जागी वापरला जातो. आता तो कसा हे मात्र तू नेटवर शोध. बघू मिळतंय का"
"हा कोड सद्ध्या शिकला येईल  का हो!" दादाने विचारले. त्याला भलती हौस असते सगळ्याची.
"हो येईल की. जगात अनेक क्लब्स आहेत. आपल्याकडेही ठाण्याला हॅम क्लब आहे. तिथे हा कोड शिकता येईल. तो तुमचा हॅम सेट म्हणजे तार यंत्र बनवायला मदत करतं शिवाय जगभरातील हॅम रेडियो धारकांशी संवाद साधू शकतोस तेही चकटफू"
"ग्रेट!" असं म्हणून दादा जरा बाहेर गेला.
मी लगेच काँप्युटरचा ताबा मिळवला आणि गेम्स सुरू केले!!

----------------
संदर्भः
१. माहिती: विकीपिडिया आणि हॅम रेडियो क्लब, ठाणे यांच्या तर्फे आलेल्या व्याख्यात्याकडून २ वर्षापूर्वी मिळालेली माहिती
२. चित्रे: विकीपिडिया

आजी - आजोबांच्या वस्तु - ९ (बोरू)

आमच्याकडे या रविवारी बरेच पाहुणे येणार होते. त्यामुळे घरात बरीच धांदल होती. दुपारी जेवणं होईपर्यंत सगळे कामात होते. दुपारची जेवणं झाली आणि आई-आजी दमल्याने जरा विसावल्या. आजोबा उरलेल्या कामांची यादी करायला बसले. मला काहीच उद्योग नसल्याने त्यांच्या बाजूला बसून काय लिहितायत ते वाचत होतो.
आजोबा नेहमीप्रमाणे नीट टेबलसमोर बसून व्यवस्थितपणे कागदावर लिहीत होते. त्यांचे अक्षर एकदम क्लास आहे, छापल्यासारखेच वाटते.
"काय छान अक्षर आहे हो तुमचं!"
"हं. आहे. सुबक आहे. आमच्या दामले मास्तरांची कृपा बरंका!"
"का ते खूप वेळा लिहायला लावायचे?"
"नाही रे, लहानपणीच त्यांनी आम्हाला बोरूने कित्ते गिरवायला लावले."
"बोरू म्हणजे?"
"बोरू म्हणजे एक प्रकारचं लाकडी पेन. माझ्याकडे असेल बहुतेक अजून एखादा बोरू. चल त्या खाटेखाली पेटी आहे ना त्यात शोधूयात"
आबांनी पेटीतून एक लाकडाची काडी काढली

boru

"हा बोरू. याने आम्ही अक्षरे गिरवायचो."
"मग यात शाई कुठून भरायची?"
"यात शाई भरायची नाही तर हा शाईत बुडवून लिहायचं"
मला तो बोरू बघून मजा वाटली. तो एका टोकाला एकदम टोकदार होता. आबा सांगत ओते
"हा बोरू वेगवेगळ्या आकारात असतो. त्याने वेगवेगळ्या मापाची, जाडीची, तर्‍हेची अक्षरे काढता येतात. हे चित्र बघ यात वेगवेगळ्या प्रकारचे बोरू दाखवले आहेत. यालाच आम्ही टाक म्हणायचो."

किती प्रकारचे बोरू होते त्या चित्रांत. प्रत्येकाने वेगवेगळ्या जाडीतली अक्षरे काढता येतात.
"आबा, मग आता आपण पेन वापरतो लिहायला. तुम्ही पेन कधी वापरायला लागलात?"
"अरे आम्हीही पेनच वापरायचो. बोरू फक्त अक्षर सुधारण्यासाठीच्या कित्त्यांपुरते. फार पूर्वी पासून एकोणीसव्या शतका पर्यंत बोरू बरोबरच पक्षांची पिसे देखील लिहायला वापरली जात असत. बोरूचा वापरदेखील अगदी इजिप्शियन संस्कृतीतही झालेला दिसतो."
"बापरे इतक्या आधी?"
"हो. बोरू बनवायला फार तंत्राची गरज नव्हती. बांबू घेतला आणि एका बाजूने छान निमुळता केला की बोरू तयार. शाईचा मात्र खूप मोठा इतिहास आहे. इजिप्तमध्ये बनलेली शाई होती पण भारतातील फक्त काजळीमध्ये तेल मिसळून एकदम दाट शाई बनवलेली असे ती जगभर प्रचलित झाली. त्या शाईने जे सुबक अक्षर येत असे त्याला तोड नाही. पुढे फाऊंटन पेन आल्यावर मात्र ही शाई चालेनाशी झाली. त्यात वेगवेगळी रसायने मिसळून अधिक प्रवाही तरीही कागदाला धरून ठेवणारी शाई बनवली जायला लागली"
"हं... आपल्याला लिहिता येईल का या बोरूने?"
"हो!! येईल की. दौत आहे का आपल्याकडे?"
"हो माझ्या शुद्धलेखनासाठी बाबांनी कालच फाऊंटनपेन आणलं आहे त्याच्या बरोबर शाईची बाटली - म्हणजे दौतसुद्धा आणली - आहे"
"अरे वा मग आण की..मी दौत घेऊन आलो. आजोबांनी त्यात बोरू २ मिनिटं बुडवून ठेवला आणि मग एका कागदावर "श्री गणेशाय नमः" असे इतक्या सुंदर अक्षरात लिहिले म्हणून सांगू. मी पण मग बोरू घेतला. पण काही लिहिताच येईना.
"आबा, मला लिहिता का येत नाही हो?"
"अरे लगेच कसे येईल, तो कोन साधावा लागतो. म्हणून तर प्रत्येक हाताचा बोरू वेगळा ठेवत असत.प्रत्येकाची लिहायची पद्धत वेगळी त्यामुळे वेगवेगळ्या जागी दाब पडत असे. एकाचा बोरू दुसर्‍याला वापरायला कठीण. असो. आपण तुला नवा बोरू बनवू आणि मग तुला हवं तसं लिही. तो पर्यंत थोड्या वेगळ्या कोनातून लिहून बघ जमेल तुला"
थोडावेळ ट्राय केल्यावर एकदाची अक्षरं उमटायला लागली. पण आजोबांच्या अक्षरापुढे अगदीच कोंबडीचे पाय वाटत होती :)

आजी - आजोबांची विशेष माणसे

आज तर माझी खूप म्हणजे खूपच मजा होती. माझे दुसरे आजोबा पण घरी आले होते. ते पुण्याला राहतात वाड्यात. काय मजा येते तिथे. गेल्यावेळी मी गेलो असताना आजोबांनी मला भोवरा फिरवायला शिकवले होते. तो पण दोरीवाला भोवरा. मी परत घरी आल्यावर सगळ्यांना तो भोवरा फिरवून दाखवून काय स्टाइल मारली होती म्हणून सांगू!
आज मात्र आजोबा गप्पाच मारायच्या मूडमध्ये होते. दोन्ही आजोबा त्यांच्या लहानपणीच्या गमतीत रमले होते. त्यांच्या बोलण्यात बरंच काही नवीन नवीन ऐकू येत होतं. मी आपला नुसताच ऐकत बसलो होतो. इतक्यात आबांनी मला काहीतरी विचारले मी माझ्याच तंद्रीत होतो. मी आपलं काहीतरी उत्तर द्यायचं म्हणून नुसतीच मान हालवली. तर आजोबा म्हणाले "अरे बोल ना तोंडाने, काय नंदीबैलासारखा माना हालवतो आहेस"
"नंदीबैल म्हणजे सांग सांग भोलानाथ गाण्यात आहे तोच ना!?"
"बरोब्बर"
"आई नेहमी म्हणून दाखवते ते गाणं.. एकदम सह्हीये ते गाणं"
"तुला येतं कारे? दाखव पाहू म्हणून"
आता आली ना पंचाईत. मी तसा हुशार आहे. मी एकदम विषयच बदलला
"हा भोलानाथ वाला रोज यायचा तुमच्या घरी"
"रोज नाही रे फार पुर्वी दर सोमवारी यायचा. सोमवार शंकराचा आणि नंदी शंकराचं वाहन, म्हणून मग दर सोमवारी यायचा तो. गळ्यात ढोल, मस्त सजवलेला रुबाबदार बैल, त्याची शिंग पण रंगवलेली असायची, तो भोलानाथ मग त्या ढोलावर काठ्या घासून बूग्वूऽऽबूग्वूऽऽ असा आवाज काढायचा. आम्ही तमाम पोरंसोरं जमा होतं असू. हा नंदीबैलवाला गावाच्या वेशीला जाईपर्यंत आम्ही पण मग त्याच्या मागंमागं अख्खा गाव हिंडत असू! लोक त्याला प्रश्न विचारत आणि तो बैल हो किंवा नाही अश्या माना हालवत असे."
"आजोबा, मग तुम्ही कधी प्रश्न नाही का विचारला"
"लहानपणी खूप प्रश्न विचारले. आता फारसे आठवत नाहीत. पण पुढे मोठं झाल्यावर माझा फारसा विश्वास उरला नव्हता, पण एक वर्ष तुझ्या बाबांना खूप ताप भरला होता. काही करूनही कमी होईना. तेव्हा अचानक समोर नंदीबैल ओता त्याला विचारलं की माझ्या पोराचा ताप कमी होईन ना रे? आणि त्याने चांगलं चारचारदा मान हालवून हो म्हटलं आणि ४ दिवसात ताप उतरला"
"बरं का, पण भोलेनाथाचा बूग्वूऽऽबूग्वूऽऽ आणि डोंबार्‍यांचं बूग्वूऽऽबूग्वूबूग्वूऽऽबूग्वूऽऽएकदम वेगळं"
"डोंबारी म्हणजे?" हे मी कधीच ऐकलं नव्हतं
"डोंबारी म्हणजे एकप्रकारची रस्त्यावरची सर्कस म्हण ना. हे डोंबारी बरेच लोकं जमल्यावर वेगवेगळे खेळ करून दाखवायचे. त्यातील सगळ्यात प्रसिद्ध खेळ म्हणजे दोरीवरून चालणे. दोन बांबूंच्यामध्ये एक दोरी लावलेली असायची आणि त्या वाद्याच्या तालावर ती डोंबारीण अगदी रस्त्यावर चालावं तसं सहजपणे चालायची त्यावेळी ही डोंबारीण आम्हाला जगातील सगळ्यात शूर स्त्री वाटायची. काही डोंबारीतर आगीतून उड्या मारायचे खेळ पण करायचे. त्या जाळामुळे नाकातून-डोळ्यातून पाणी यायचं पण आम्ही पोरं तर बाहीला नाक पुसत पुसत ते खेळ जीव डोळ्यात साठवून पाहायचो. काय हो आठवतायत का डोंबारी?"
शेवटचा प्रश्न दुसर्‍या आजोबांना होता
"हो तर, डोंबारीच काय मला तर माकडांचे खेळ करून दाखवणारे मदारी, सकाळी सकाळी एकापेक्षा एक सुंदर गाणी म्हणत दिवसाची निर्मळ सुरुवात करणारा वासुदेव..."
"मला मदारी माहीत आहे आता हा वासुदेव कोण?"
"वासुदेव म्हणजे सकाळी सुंदर भजनं, भूपाळ्या म्हणत दारोदार फिरून पोट भरणारा एक गावकरी. हा डोक्यावर मस्त मोरपिसांची टोपी घालायचा आणि हातात टाळ. त्याच्या गाण्याशिवाय दिवस सुरू झाला असं वाटायचंच नाही. कोंबडा आरवतोय, समोर बंबात पाणी कढत होतंय, आबांचे न्हाणीघरातून "हर हर गंगे भागीरथीऽऽ" करून घंगाळा रिकामं केल्याचा आवाज येतोय, आईने नुकताच सडा घातला आहे, ती सुंदर रांगोळी काढते आहे, मी एखाद्या वासरा शेजारी बसून झोपेत राखुंडीने दात घासतो आहे आणि समोरून एखादी सुंदर भूपाळी गात, आपल्याच आनंदात डुल्लत, मस्त गिरकी घेत देवाच्या भक्तीत रममाण झालेला वासुदेवाचं आगमन व्हायचं. त्याचा ह्या रूपामुळे कित्येक वर्ष मला हा वासुदेव सगळ्यात सुखी माणूस वाटायचा हा फोटो आहे बघ एक वासुदेवाचा"

Vasudev madari garudi

"वासुदेवच काय आमचं लहानपण अश्या असंख्य लोकांनी भरलं आहे."
"म्हणजे कोण कोण"
"आता जेवायचंय पण नुसती नावं सांगतो, डोंबारी, मदारी, वासुदेव याशिवाय आमच्याकडचा नेहमीचा पाहुणा म्हणजे गारुडी. त्याचा तो फस्स्स्स् करत येणारा काळा कभिन्न नाग, त्याच्या डोक्यावरचा तो १० चा आकडा, केवढं अप्रूप होतं या सगळ्याचं"
"याशिवाय कडकलक्ष्मी सुद्धा तर नेहमी यायचा."
"तो काय करायचा?"
"तो फाट् फाट चाबकाचे फटके स्वतःच्या अंगावर मारून घ्यायचा. आम्ही त्याला जाम टरकून असायचो. त्याशिवाय काही स्त्रिया देखील गावात नेहमी यायच्या त्यातली दर महिन्याला येणारी अमावास्येची बाई! तिला दर अमावास्येला आई तांदूळ, कांदा, शिळी भाकरी असं काय काय द्यायची. महिन्यातून एकदाच अन्न घेऊन तेच महिनाभर खाते याचं मला फार वाईट वाटायचं. तिचं डोक्यात असल्याने त्यामुळे मी कधी पानात टाकत नाही. दुसरी स्त्री म्हणजे बोहारीण. ही तर अजूनही येते नाही?"
"हो येते ना!" मी तसा हुशार आहे, मला लगेच आठवलं "आई मग कपडे देऊन नेहमी एखादा डबा नाहीतर, मोठं पातेलं घेते."
"या शिवाय, दर महिन्याला येणारा बांगडीवाला, गोटी-सोडा पुऽऽईई-फुट्ट् करून फोडणारा सोडावाला, फुगेवाला, गोळावाला असे विक्रेते तर ठरलेले. त्याशिवाय डोळा लावून मुंबई-ताजमहाल दाखवणार्‍याचा खेळ पाहण्यासाठी मी माझ्या बाबांकडे खूप हट्ट केल्याचं आठवयतय मला"
"आबा, मग इतके सगळे लोक गेले कुठे?"
"गेले.. काळाच्या पडद्या आड!!!.. शेवटी कालाय तस्मै नमः दुसरं काय?"
मला हे काही कळलं नाही. आता आजोबांना भूक लागली आहे असं मला वाटलं आणि म्हटलं "चला आजोबा भूक लागली आहे, जेवूया आता"