लढा लहानगीचा

खुलासा: हे ललित साहित्य नाही. व्यक्तिचित्र म्हणता यावे, उपक्रमावर चालून जावे असे वाटते. अन्यथा, अप्रकाशित करण्यास लेखिकेची ना नाही.

गोष्ट फारशी जुनी नाही, कोणा प्रसिद्ध व्यक्तीचीही नाही. १९६० सालातील एका लहान अमेरिकन मुलीची आहे. यावर्षी लुईझियाना राज्याने गोर्‍यांच्या आणि काळ्यांच्या शाळांचे एकत्रीकरण करण्याचा कायदा लागू केला. त्यापूर्वी गोर्‍या मुलांच्या व काळ्या मुलांच्या शाळा वेगवेगळ्या असत. या कायद्यानुसार केवळ ६ काळ्या मुलांची गोर्‍यांच्या शाळेत जाण्यासाठी निवड करण्यात आली. त्यापैकी २ मुलांच्या पालकांनी घाबरून आपल्या मुलांना पूर्वीच्या शाळेत ठेवणेच पसंत केले. राहिलेल्या चौघांपैकी ६ वर्षांच्या लहानग्या रुबीवर 'विल्यम फ्रॅन्ट्स प्राथमिक शाळेत' एकटीने जायची पाळी आली.

रुबीच्या वडलांना रुबीचे गोर्‍या मुलांच्या शाळेत जाणे फारसे पसंत नव्हते. गोरी मुले तिला आपल्यात कधीच सामावून घेणार नाहीत ही भीती त्यांना वाटत होती. रुबीच्या आईला मात्र रुबीला या शाळेत चांगले शिक्षण मिळेल अशी खात्री वाटत होती. तिने रुबीच्या बाबांची बरेच दिवस समजूत घातली, 'ही लढाई आपली नाही तर संपूर्ण काळ्या समाजाची आहे. आपल्याला सुरुवात करायची संधी मिळाली आहे ती आपण गमवून चालणार नाही.' शेवटी बाबांनी परवानगी दिलीच. खरी लढाई मात्र लढायची होती ती लहानग्या रुबीला आणि आपल्याला नेमकी कोणती लढाई लढायची आहे हेच तिला माहित नव्हते.

१४ नोव्हेंबर १९६०चा दिवस काळ्या मुलांनी गोर्‍यांच्या शाळेत जाण्यासाठी निश्चित करण्यात आला. त्या दिवशी सकाळी रुबीला आईने उठवले. तिची तयारी करताना आईने तिला नव्या शाळेत जाण्याविषयी सांगितले. नव्या शाळेत जाताना काहीतरी गडबड होईल ही शंका असल्याने चार सरकारी अधिकारी रुबीला न्यायला येणार होते. शाळेजवळ गर्दी असेल, लोक काहीतरी आरडाओरडा करतील त्याकडे आपण अजिबात लक्ष द्यायचे नाही हे आईने रुबीला सांगून ठेवले.

ठरल्याप्रमाणे चार अधिकारी सकाळीच घरी आले. त्यांच्या गाडीतून शाळेत जाताना त्यांनी रुबीला आणि तिच्या आईला सांगितले की रस्त्यावरून चालताना दोन अधिकारी त्यांच्यापुढे चालतील आणि दोन अधिकारी मागून. काही गडबड झाल्यास ते काळजी घेतील. शाळेच्या आवारात गाडी थांबली तशी रुबीला बरेच लोक गर्दी करून उभे असल्याचे दिसले. तिने आईचा हात घट्ट पकडला. काही गोरे लोक जोरजोरात काहीतरी ओरडत होते. डोळ्यांच्या कोपर्‍यातून रुबीने पाहिले तर त्यांच्या हाताच्या मुठी आवळलेल्या तिला दिसल्या. येथे नक्की काय चालले आहे याची रुबीला कल्पना येत नव्हती. तो संपूर्ण दिवस रुबीने आणि तिच्या आईने मुख्याध्यापकांच्या कार्यालयात बसून काढला. कार्यालयाच्या खिडकीतून रुबीला ती जोरजोरात घोषणा देणारी माणसे दिसत होती. काहीजण आपल्या मुलांना शाळेतून काढून घरी घेऊन जात होते. या सर्व गोंगाटात रुबीचे नव्या वर्गात जाणे झालेच नाही.


दुसर्‍या दिवशीही ते अधिकारी रुबीला आणायला आले. आईही शाळेत आलीच. त्यादिवशीही शाळेच्या आवारात बरेच गोरे लोक जमले होते. त्यापैकी एकाने पुढे सरून शवपेटीत घातलेली काळी बाहुली रुबीला दाखवली. रुबीला ती बाहुली पाहून खूप भीती वाटली. हे लोक आपल्याला घाबरवत आहेत याची तिला प्रथमच जाणीव झाली. लोक रुबी आणि तिच्या आईवडिलांविषयी काहीतरी अर्वाच्य बोलत होते. त्यांना टाळून रुबीने शाळेत प्रवेश केला.

त्यादिवशी शाळेत एक गोरी स्त्री त्यांची वाट पाहात होती. "गुड मॉर्निंग, रुबी नेल. मी तुझी नवी शिक्षिका, मिसेस हेन्री." गोड आवाजात तिने रुबीचे स्वागत केले. मिसेस हेन्रींचा चेहरा दयाळू दिसत होता तरी रुबीला त्या कशा असतील, आपल्याशी बाहेरच्या लोकांप्रमाणेच वागतील की काय असा प्रश्न पडला. हेन्रीबाई, रुबीला आणि तिच्या आईला दुसर्‍या मजल्यावर रुबीच्या वर्गात घेऊन गेल्या. संपूर्ण वर्ग रिकामा होता. बाईंनी रुबीला पहिल्या बाकावर बसवले आणि संपूर्ण वर्गाला शिकवतो आहे अशा थाटात तिला इंग्रजी अद्याक्षरे शिकवायला सुरूवात केली. शाळेतला तो दिवस बरा गेला.

त्यानंतरच्या दिवशी आईने रुबीला जवळ घेऊन सांगितले की आजपासून तिला कामावर जाणे भाग आहे त्यामुळे ती शाळेत येऊ शकत नाही. यापुढे ते सरकारी अधिकारीच तिला शाळेत पोहचवतील व परत आणतील. रुबीचा चेहरा पडला. ते पाहून आई म्हणाली, "घाबरू नकोस रुबी. शाळेत जाताना मन लावून देवाची प्रार्थना म्हण. देव सर्वत्र असतो. तू तुझे लक्ष प्रार्थनेत ठेवलेस तर ते लोक तुझ्याबद्दल काय बोलतात हे तुला ऐकू येणार नाही." रुबीने आईचा सल्ला मानला. ते गोरे लोक रोज शाळेच्या आवारात जमायचे, आचकट विचकट बोलायचे. त्यांना टाळून शाळेच्या पायर्‍या चढताना रुबीला हायसे वाटायचे. शाळेत हेन्रीबाई रुबीची वाट पाहत असायच्या. रुबी दिसली की तिला जवळ घ्यायच्या, गोंजारायच्या. एव्हाना रुबीला त्या आवडू लागल्या होत्या. वर्गात हेन्रीबाई आणि रुबी दोघीच असायच्या. बाकीच्या मुलांची नावे त्यांच्या पालकांनी कमी करून टाकली होती. बाई फळ्यासमोर उभ्या राहण्याऐवजी रुबीच्या शेजारी बसून तिला शिकवू लागल्या. रुबीलाही शाळेत येणे आवडू लागले.

परंतु गोष्टी इथेच थांबल्या नाहीत. वर्णद्वेषी गोरे आता रस्त्यावर उतरले होते. संपूर्ण शहरात दंगलीचे लोण पसरले होते. रुबीच्या घराला लक्ष्य करण्याचे प्रयत्न करण्यात आले. रुबीच्या वडिलांनाही कामावरून कमी करण्यात आले. दुकानदाराने रुबीच्या कुटुंबाला धान्य व इतर सामान देणे बंद करून टाकले आणि आपल्या दुकानात येण्यास मनाई केली. रुबी आणि तिचे कुटुंबीय घराबाहेर पडले की त्यांना अर्वाच्य भाषेत शिव्या दिल्या जात. धमक्यांची पत्रे येत. मिसिसीपी राज्यात राहणारे रुबीचे आजी-आजोबाही या उद्रेकाचे बळी ठरले. परंतु याचबरोबर काही सहृदय माणसांनी रुबीच्या कुटुंबाची मदतही केली. एका शेजाऱ्याने रुबीच्या वडिलांना रंगार्‍याची नोकरी दिली. काहीजणांनी रुबीच्या घरावर लक्ष ठेवण्यास सुरूवात केली. त्यांना मदत मिळवून दिली. एवढेच नव्हे तर शाळेत जाताना रुबीच्या गाडीमागून रोज शांततेने चालण्यास सुरुवात केली.

रुबीच्या वर्गात मात्र रुबी आणि हेन्रीबाई दोघीच असायच्या. मधल्या सुट्टीत रुबीला बाहेर जाऊन इतर मुलांसमवेत खेळण्याची मनाई होती. हेन्रीबाई वर्गात स्वत: रुबी बरोबर खेळायच्या. शारिरीक शिक्षणाच्या तासाला रुबीबरोबर नाचायच्या, उड्या मारायच्या. केवळ हेन्रीबाईंमुळे रुबीला शाळा आवडायची. एक दिवस रुबीने त्यांना ती बाहेरची माणसे अशी क्रूर का वागतात असा प्रश्न विचारला. तशा हेन्री बाई तिला म्हणाल्या, "काही माणसांना एकदम बदलणे जमत नाही. ते वर्षनुवर्षे असेच वागत आले आहेत, यापेक्षा वेगळे वागायला कदाचित त्यांना भीती वाटत असावी. रुबी, ते लोक तुझ्यापेक्षाही जास्त घाबरलेले आहेत."त्यादिवशी रुबीला बाईंचे म्हणणे कितपत समजले कोणास ठाऊक परंतु त्यावर्षी ती तिच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा धडा शिकली. शाळेबाहेर उभे राहून अर्वाच्य बोलणारे लोक गोरे होते आणि हेन्रीबाईही गोर्‍याच होत्या, पण रुबीला भेटलेल्या प्रेमळ लोकांपैकी त्या एक होत्या. हेन्रीबाईंनी रुबीला डॉ. मार्टिन ल्युथर किंग ज्यु. यांची शिकवण शिकवली. "जगात कोणलाही त्याच्या कातडीच्या रंगावरून जोखू नये. देवाने सर्वांना सारखे बनवले आहे आणि तरीही प्रत्येकाला दुसर्‍यापेक्षा वेगळे." त्यादिवशीपासून शाळेत येताना रुबीने आपल्याबरोबरच त्या बाहेरच्या गोर्‍या लोकांसाठीही प्रार्थना म्हणायला सुरूवात केली. तेही आपल्यासारखेच घाबरलेले आहेत हे तिच्या बालमनाने पक्के जाणले होते.

म्हणता म्हणता वर्ष कसे सरले ते रुबीला कळलेही नाही. हेन्रीबाईंच्या सान्निध्यात तिचे व्यक्तिमत्त्व फुलून येत होते. वर्षभरात तिने एकही दिवस शाळा चुकवली नाही. बाहेरचे लोकही थंडावले. शाळेबाहेर येईनासे झाले. जून महिन्यात उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडल्या तशा रुबीने आणि हेन्रीबाईंनी एकमेकींचा निरोप घेतला. सप्टेंबरमध्ये रुबी शाळेत परतली तर शाळेचे रुपच पालटले होते. तिला पोहचवायला न्यायला येणारे ते अधिकारी आले नव्हते, शाळेत काही अधिक काळी मुले भरती झाली होती. शाळेबाहेर गोंगाट नव्हता. रुबीच्या वर्गात इतर मुलेही होती आणि त्यातली काही काळीही होती. जसे काही शाळेत काही घडूनच गेले नव्हते. रुबीला हेन्रीबाई मात्र दिसल्या नाहीत. चौकशी केले असता कळले की त्यांची बोस्टनला बदली झाली होती.

रुबीची शाळा व्यवस्थित सुरू झाली. तिने प्राथमिक शाळेनंतर, महाविद्यालयात प्रवेश मिळवला व आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर व्यवसाय शाखेचा अभासक्रम पूर्ण केला. पर्यटन विभागात नोकरी केली. रुबी ब्रिजेस हॉल आज पन्नाशीची आहे आणि आपल्या कुटुंबासमवेत सुखी आयुष्य जगते आहे. संपूर्ण गोर्‍यांच्या प्राथमिक शाळेत जाणरी ती अमेरिकेतील पहिली काळी मुलगी गणली जाते. वर्णद्वेषाबद्दल तिच्याच शब्दांत सांगायचे झाले तर, "आपल्यापैकी प्रत्येकजण निर्मळ मन घेऊन जन्माला येतो. आपल्या मुलांना वर्णद्वेषाबद्दल काहीही माहित नसते.. त्यांनी ती माहिती पुरवतो आपण. आपण वर्णद्वेष जीवंत ठेवतो आणि त्याचा वारसा आपल्या मुलांना देतो. आपल्या मुलांची मने निर्मळ राहावीत ही आपली जबाबदारी आहे."


जगात वर्णद्वेष या ना त्या प्रकारे सर्वत्र आढळतो, कितीही नाही म्हटलं तरी खोलवर आपल्या मनात तो रूजत असतो. १५ जानेवारी डॉ. मार्टिन ल्युथर किंग ज्यु. यांचा जन्मदिवस म्हणून अमेरिकेत साजरा होतो. त्यांच्याशी आणि त्यांच्या विचारांशी आपली बांधिलकी असेल नसेल परंतु वयाच्या सहाव्या वर्षी आपल्याला किंवा आपल्या मुलांना कनिष्ठतेची वागणूक मिळून एखादा दिवसतरी शाळेत रुबीप्रमाणे घालवावा लागल्यास काय वाटेल याची कल्पना करावी.

* प्रसिद्ध चित्रकर नॉर्मन रॉकवेल यांचे 'The problem we all live with' हे रुबीवर तयार केलेले तैलचित्र विकिपीडियावरून चिकटवले आहे.

** मार्टीन ल्यूथर किंग यांचे सुप्रसिद्ध भाषण आय हॅव अ ड्रीम येथे पाहता येईल.

Comments

उत्तम

आणि समयोचित (दोन्ही अर्थांनी - डॉ. किंग यांची जयंती आणि क्रिकेटच्या मैदानात घडणारे नाट्य लक्षात घेता) लेखन. यावरुन, लिटल रॉक मधल्या नऊ कृष्णवर्णीय विद्यार्थ्यांच्या लढ्याची आठवण झाली. [अधिक माहिती येथे]

हेन्रीबाईंनी रूबीला दिलेले उत्तरही विचार करण्याजोगे. बरेचसे म. गांधींच्या (किंवा त्यापासून प्रेरणा घेतलेल्या डॉ. किंग यांच्या) तत्त्वांचे सार सांगणारे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
(http://marathisahitya.blogspot.com)

छान

असेच म्हणतो.

ता.क. अशाच स्वरूपाची कथा इंग्रजीतून आधी वाचली होती.

-- आजानुकर्ण

समयोचित

नंदनप्रमाणेच म्हणायचे आहे. लेख आवडला.

खालच्या परिच्छेदात मार्टिन ल्यूथर किंग जेव्हा भारतात फिरून आले त्यानंतरची त्यांची मते पहा. आजच दुकानात पुस्तक चाळताना त्यांचे पुस्तक हाती आले होते, त्यातही जाताजाता वाचले होते. त्यात त्यांनी म्हटले आहे की भारत दारिद्रय, जास्त लोकसंख्या, बेरोजगारी अशाने बुजबुजलेला असूनही देशात गुन्हेगारी कमी आहे, आत्मिक पातळी उच्च (strong spiritual quality) आहे. तसेच भारतातील सवर्ण आणि अस्पृश्य आणि अमेरिकेतील वंशभेदाचे प्रश्न सारखेच आहेत, पण त्यांनी असेही म्हटले आहे की भारतातील नेते जाहीरपणे एकत्रिकरणाच्या कायद्यांना पाठिंबा देतात ( publicly endorsed integration laws), हे अमेरिकेत झालेले नाही". ते पुढे म्हणतात, आज भारतातील एकही नेता अस्पृश्यतेचे जाहिर समर्थन करणार नाही. पण अमेरिकेत मात्र रोज कोणीतरी नेता वंशभेदाचे समर्थन करतो".

संदर्भः http://www.stanford.edu/group/King/about_king/encyclopedia/India_trip.html

आज ह्यानंतर अनेक वर्षे उलटून गेली आहेत. भारतात गुन्हेगारी वाढली आहे. अमेरिकेत वंशभेदाविरूद्ध कायदे झाले आहेत. भारतातही अनेक कायदे केले आहेत आणि लोक पूर्वीच्या मानाने अन्याय होऊ नयेत म्हणून जागरूक आहेत. तरी ह्या गोष्टी होतच असतात, दोन्हीकडेही. भारतीयांच्या तत्कालिन उच्च आत्मिक पातळीचा उल्लेख डॉ. किंग यांनी केलेला आहे तोही एका अर्थाने योग्यच आहे. पण लोक शांत होते याचा अर्थ सगळीकडे आलबेल होती असा नाही, लोकांना अन्यायाची जाणीव नव्हती. स्वत्वाची जाणीव नव्हती. फक्त ही जाणीव झाली तरी आजूबाजूच्या जगाबद्दल घृणाच तयार झाली नसली तरच त्या जाणिवेचा उपयोग हा योग्य दिशेने होईल अन्यथा ती जाणीव जे काही चांगले आहे तेही जाळून टाकेल अशी भिती वाटते.
आजच्या जगात spiritual quality वरून बोलणे म्हणजे वेडेपणाचे धरले जाईल असे वाटते.

मस्त

लेख आवडला, वर नंदन यांनी म्हणल्याप्रमाणे समयोचीत. किंग यांचे "आय हॅव अ ड्रीम" वाचण्यासारखेच आहे. आमच्याकडे बॉस्टन ग्लोब मधे ते दरवर्षी संपादकीय पानावर छापतात!

वा!!

व्वा! सुंदर लेख!
माँटेग्मेरीच्या प्रसिद्ध बस बहिष्कारावर आधारीत "लाँग वॉक होम" या चित्रपटाची आठवण झाली. इथे ट्रेलर दिल्याशिवाय रहावत नाहि आहे :)

अवांतरः रुबीचा विषयही चित्रपट बनवायसाठी एक जबरदस्त पटकथा-नाट्य सारं काहि देतो. या विषयावर चित्रपट निघाला असेलच नाव कळेल काय? नसेल तर एखाद्या निर्मात्याला भेटलं पाहिजे ;)

असेच

सहमत आहे. लेख छान झाला आहे. इथे टू किल अ मॉकिंगबर्ड या सुंदर पुस्तकाची आणि तितक्याच अविस्मरणीय चित्रपटाची आठवण होते.

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

हरिजन

येथील हरिजन व तेथील काळे यांची समकालीन सामाजिक परिस्थितीतील तुलना केली तर आपल्याला कुठले चित्र कमी क्लेशदायक वाटते?
प्रकाश घाटपांडे

प्रश्न हा नाही

येथील हरिजन व तेथील काळे यांची समकालीन सामाजिक परिस्थितीतील तुलना केली तर आपल्याला कुठले चित्र कमी क्लेशदायक वाटते?

माझ्या मनात प्रश्न हा नाही की कोणते चित्र कमी क्लेशदायी वाटते. हा प्रश्न माझ्यामते निरूपयोगी आहे. प्रश्न हा आहे की ते क्लेश मला जाणवतात का? तर त्याचे उत्तर नक्कीच होय आहे.

प्रश्न हा ही नाही

प्रश्न हा आहे की ते क्लेश मला जाणवतात का? तर त्याचे उत्तर नक्कीच होय आहे.

माझ्या मते हे उत्तर निरोपयोगी आहे(?). प्रश्न हा आहे कि हे चित्र आशादायी करण्यात आपला कृतिशील सहभाग किती असतो? नुसतेच संवेदनशील होउन हळहळणे हे कृतीशील दृष्ट्या कितपत दखलपात्र?
अवांतर- यातून 'बोलके सुधारक 'कर्ते सुधारक 'हा नवीन विषय जन्माला येउ शकतो.
( आता पुणेकर)
प्रकाश घाटपांडे

महाराष्ट्रातील जातिभेद

महाराष्ट्रातील शहरांमध्ये, बेटीव्यवहार सोडला, तर दैनंदिन जीवनातून जातिभेद केव्हाच नष्ट झाला आहे. मुलगी देताना तिच्या नव्या घरची जीवनपद्धती फार वेगळी असू नये एवढाच उद्देश जातीत लग्न करण्यामागे उरला आहे. तसे पाहिले तर जातीचा विचार फक्त राजकारणी आणि पत्रकार करतात, सामान्य माणसांना जातीशी काही देणेघेणे नसते. या पार्श्वभूमीवर अमेरिकेत १९६० साली इतकी भयावह परिस्थिती असावी , हे जाणून आपण फारच प्रगत आहोत याचे खात्री पटली. स्त्रियांना मताधिकार, मला वाटते, भारतात अनेक प्रगत देशांच्या तुलनेने फार फार पूर्वीपासून आहे.--वाचक्‍नवी

स्त्रियांना मताधिकार

स्त्रियांना मताधिकार, मला वाटते, भारतात अनेक प्रगत देशांच्या तुलनेने फार फार पूर्वीपासून आहे.

- खरे आहे. एक अतिशय बोलकं उदाहरण म्हणजे, ज्या वर्षी भारताने इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली बांगलादेशला स्वतंत्र केले, त्याच वर्षी (१९७१) स्वित्झर्लंडमध्ये स्त्रियांना मताधिकार मिळाला. तोदेखील १/३ पुरुषांनी विरोध दर्शविल्यानंतर. [अधिक माहिती येथे]

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
(http://marathisahitya.blogspot.com)

जातिव्यवहार

स्त्रियांना मताधिकार, मला वाटते, भारतात अनेक प्रगत देशांच्या तुलनेने फार फार पूर्वीपासून आहे

तो अधिकार प्रगल्भतेने वापरण्याइतकी क्षमता पुरुषांत पण नव्हती व नाही. (तुलनात्मकदृष्ट्या)"नका इसरु गाय वासरु" यावर स्त्रियांची एक गठठा मते मिळायची. निरक्षरतेचे प्रमाण जास्त असताना कागदावर मताधिकार द्यायला काय जाते? अधिकार दिले म्हणजे वापरण्याची कागदावर मोकळिक दिली. democracy without education is hippocracy without limitation

मुलगी देताना तिच्या नव्या घरची जीवनपद्धती फार वेगळी असू नये एवढाच उद्देश जातीत लग्न करण्यामागे उरला आहे.

पुर्वी देशस्थ कोकणस्थ विवाह सुद्धा आंतरजातीय विवाहासारखा मानला जायचा. आजहि स्वैपाकात कांदा लसूण मसाला . भात, भाकरी बाबत घरातील चालीरितीचा फरक जाणवतो. जीवनपद्धती समान आली तरी बेटीव्यवहारात मात्र अजून मन कचरते असा अनुभव आहे. जाईल् तेही हळुहळु.

प्रकाश घाटपांडे

महाराष्ट्रातील जातिभेद

>>> महाराष्ट्रातील शहरांमध्ये, बेटीव्यवहार सोडला, तर दैनंदिन जीवनातून जातिभेद केव्हाच नष्ट झाला आहे.

हे तुमचे विधान मला थोडे धाडसी वाटले. धकाधकीच्या नागरी जीवनात तुमचे विधान सत्य आहे. पण नजिकच्या भूतकाळातील काही घटना, काही प्रसंग जातिव्यवस्थेच्या अस्तित्वाचे साक्षीदार नाहीत काय ? "खैरलांजी" चा प्रकार महाराष्ट्रातच, अगदी गेल्या वर्षी घडला. पुण्यात महिन्याभरापूर्वी चित्पावनांचे संमेलन भरले. भांडारकर इन्स्टिट्युट् मधील मोडतोड यासारखे प्रकार गेल्या २-३ वर्षातलेच.

जातिभेदाच्या बाबतीत, बिहार, युपी च्या मानाने महाराष्ट्र नक्की प्रागतिक अवस्थेमधे आहे हे खरेच. पण म्हणून जातिभेद नष्ट झाला आहे असे म्हणवत नाही.

सोय

"खैरलांजी" चा प्रकार महाराष्ट्रातच, अगदी गेल्या वर्षी घडला. पुण्यात महिन्याभरापूर्वी चित्पावनांचे संमेलन भरले. भांडारकर इन्स्टिट्युट् मधील मोडतोड यासारखे प्रकार गेल्या २-३ वर्षातलेच.

पटणारी उदाहरणे आहेत. जरी मी चित्पावन नसलो तरी त्या एकाच संमेलनाला जातीय म्हणणे मला योग्य वाटत नाही. त्या साठी जातीचा जाहीर उच्चार बंद करणे महत्वाचे आहे आणि अशी कुणाचीच संमेलने बंद करणे मला गरजेचे वाटते.
शहरीकरणात सोय म्हणून म्हणा अथवा पर्याय नाही म्हणून म्हणा पण जातीभेद दिसत नाही. पण हे बर्‍याचदा वरकरणी असते. वरची कातडी जरा खरवडली तर त्यातून नक्कीच जातीयता डोकावू लागते. एक उदाहरण म्हणून, जो पर्यंत वधुवर सुचक मंडळात आणि अगदी जालवरील अशाच स्थळांवर जातिवाचक "स्थळे" सांगीतली जातात तेंव्हा जातीयता संपली असे म्हणवत नाही.

--------------

थोडे स्पष्टीकरण

वाचक्नवीसाहेबानी "बेटीव्यवहारा"मधे जातपात आहे हे सांगितलेलेच आहे. माझा मुद्दा एकंदर दैनंदिन आयुष्याबद्दलचा होता.

जात आणि जातीयता

>>जो पर्यंत वधुवर सुचक मंडळात आणि अगदी जालवरील अशाच स्थळांवर जातिवाचक "स्थळे" सांगीतली जातात तेंव्हा जातीयता संपली असे म्हणवत नाही. <<
जोपर्यंत सर्व जातींतली तथाकथित जीवनपद्धती समान होत नाही, तोपर्यंत जातीबाहेरची "स्थळे" पाहिली जाणार नाहीत. तशी सहजासहजी फलद्रुप न होणारी आशा कुणी उराशी बाळगू नये. आणि यात काही भयंकर चुकते आहे असे नाही. फक्त वधूवरांनी संगनमताने आप‍आपसांत ठरविलेली लग्नेच याला अपवाद असतील. डॉक्टर मुलाने डॉक्टर मुलगी पसंत करावी, कॉम्प्यूटर तज्ज्ञाने तसाच जोडीदार निवडावा आणि भंग्याने भंगिणीशी लग्न करावे, यांत सारखीच जातीयता आहे.
जातींची संमेलने होतच राहणार. त्यांना विरोध करण्याचे काही कारण नाही. ब्राम्हण सोडून इतर जातींची संमेलने किंवा जातपंचायती आजतागायत वर्षानुवर्षे होतच आहेत. परंतु जेव्हा अशा संमेलनांतील भाषणांतून इतर जातींवर चिखलफेक होईल, तेव्हाच ह्या संमेलनांवर जातीयतेचा शिक्का मारावा; अन्यथा त्यांना सांस्कृतिक संमेलनच समजावे. डॉक्टरांचे, बांधकामशास्त्र्यांचे, वकिलांचे, साहित्यिकांचे, अशी सर्व संमेलने एका जातीच्या लोकांचीच असतात, तरी त्यांच्यावर कुणी टीकेची झोड उठवत नाही. --वाचक्‍नवी

साम्य - भेद - विरोध

आपल्या (वाचक्‍नवी यांच्या) प्रतिक्रियेत आणि मला म्हणायचे आहे त्यातील साम्य भेद सांगावेसे वाटत आहेत...

साम्य:

जातींची संमेलने होतच राहणार. त्यांना विरोध करण्याचे काही कारण नाही. ब्राम्हण सोडून इतर जातींची संमेलने किंवा जातपंचायती आजतागायत वर्षानुवर्षे होतच आहेत.

अगदी मान्य आणि मी देखील याच अर्थी वर लिहीले आहे की, "जरी मी चित्पावन नसलो तरी त्या एकाच संमेलनाला जातीय म्हणणे मला योग्य वाटत नाही. त्या साठी जातीचा जाहीर उच्चार बंद करणे महत्वाचे आहे आणि अशी कुणाचीच संमेलने बंद करणे मला गरजेचे वाटते."

भेदः

जोपर्यंत सर्व जातींतली तथाकथित जीवनपद्धती समान होत नाही, तोपर्यंत जातीबाहेरची "स्थळे" पाहिली जाणार नाहीत. तशी सहजासहजी फलद्रुप न होणारी आशा कुणी उराशी बाळगू नये. आणि यात काही भयंकर चुकते आहे असे नाही. डॉक्टर मुलाने डॉक्टर मुलगी पसंत करावी, कॉम्प्यूटर तज्ज्ञाने तसाच जोडीदार निवडावा आणि भंग्याने भंगिणीशी लग्न करावे, यांत सारखीच जातीयता आहे.

हे अर्धसत्य आहे. सर्वप्रथम मी विशेष करून शहरी आणि आर्थिक दृष्ट्या उच्चभ्रूंच्या संदर्भात जेथे रहाणिमान बर्‍यापैकी समान झालेले दिसते तेथे म्हणत होतो. मराठी "उच्च वर्णीयास" (वर/वधू) रहाणीमान वेगळे असलेला परप्रांतिय उच्चवर्णिय जोडिदार म्हणून पटकन चालू शकेल पण तेच मराठी इतर वर्गीय कदाचीत चालू शकणार नाहीत. तीच गोष्ट इतरप्रांतियांची. बरं आज शहरातील किती लोकं रहाणिमान हे पारंपारीकरीत्या त्यांच्या त्यांच्या जातीनिहाय जगत असतात? बरं अजून एक "स्टेप" पुढे अशीच माणसे जेंव्हा अमेरीकेत स्थायीक होतात तेंव्हा त्यांच्या अमेरिकन पुढच्या पिढीने गोरा वधू/वर निवडला तर हरकत नसते पण जमवून लग्न करायचे असेल तर मात्र तेथे आपल्याच जातीतील, ह्यात काय दिसणार? बरं गंमत म्हणजे जी माणसे ही जातीयता पाळतात त्यांनाच स्वतःला हिंदू म्हणायची वेळ आली की "सेक्युलॅरीझम" आठवतो!

विरोध:

माझा विरोध कशाला आहे तर जन्माने दिल्या जाणार्‍या जातीवर. आपण भंग्याचा उल्लेख करता तेंव्हा ते एखाद्याचे "पोट भरायचे" काम असले तर तो "भंगी" आहे. पण जेंव्हा त्याच्या वडलांचे ते काम असते आणि तो मात्र डॉक्टरकीला असला आणि तरी इतरांच्या नजरा त्याला "भंगी समाजातील" समजू लागतात तेंव्हा ते अयोग्य वाटते. प्रोफेशनमुळे तयार होणारे कळप आणि आपण वर म्हणत असलेल्या जातीतील फरक असा आहे की प्रोफेशन हे त्या त्या व्यक्तीने शिकताना निवडले असते म्हणून ती त्यांची निवड/चॉईस असते. पण "पोट भरण्यासाठी" काम करणार्‍याला कारणे काही असोत तो चॉईस नसतो आणि भारतात तो सरळ हिंदू धर्माचा भाग करून टाकला गेला होता. ज्याचे परीणाम आपण आजपर्यंत भोगत आहोत. त्यामुळे असली जातीयता जी कधीकाळी कुणाच्या का होईना स्वार्थापोटी धर्माचा भाग केली गेली आणि ती तशी शताकूनशतके राबवली गेली आणि परीणामी देशाचे आणि देशवासीयांचे अतोनात नुकसान झाले ती धर्माधिष्ठीत जातीयता मनापासून बंदच व्हायला हवी. त्याला विरोधच केला गेला पाहीजे असे माझे मत आहे.

--------------

उत्तम मुद्दे

जन्मापासून सिद्ध गट आणि स्वकर्तृत्वावर जमणारे व्यावसायिक गट यांत मूलभूत फरक आहे, याबद्दल विवेचन चांगले आहे.

अवांतर : तुम्ही तर बुवा वाटेल तिथे सेक्युलरांवर टीकास्त्र सोडता. त्यामुळे तुमच्या योग्य मुद्द्याचा विपर्यास होतो असे वाटते. तुम्ही लिहिता : "जी माणसे ही जातीयता पाळतात त्यांनाच स्वतःला हिंदू म्हणायची वेळ आली की "सेक्युलॅरीझम" आठवतो!" --- म्हणजे जात पाळणारे बहुधा "सेक्युलरवादी" असतात असे तुमचे म्हणणे आहे? तुम्हाला माझ्या नातेवाइकांची आणि शेजार्‍यापाजार्‍यांची जंत्री दाखवायला पाहिजे. जातीतच लग्न करणारे, जातीतच "शिक्षणाची संस्कृती" आहे असे मानणारे, आणि त्याचवेळी अभिमानाने हिंदुत्व (यात "हिंदू" शब्दासह पक्षप्रचार करणारेही आलेत) सांगणारे खूप आहेत. त्यामुळे तुम्ही सांगितलेले वाक्य माझ्या अनुभवाशी विसंगत आहे.

सेक्युलर वगैरे... ए टाईम टू किल

अवांतर : तुम्ही तर बुवा वाटेल तिथे सेक्युलरांवर टीकास्त्र सोडता. त्यामुळे तुमच्या योग्य मुद्द्याचा विपर्यास होतो असे वाटते. तुम्ही लिहिता : "जी माणसे ही जातीयता पाळतात त्यांनाच स्वतःला हिंदू म्हणायची वेळ आली की "सेक्युलॅरीझम" आठवतो!" --- म्हणजे जात पाळणारे बहुधा "सेक्युलरवादी" असतात असे तुमचे म्हणणे आहे?

मला आपल्याला वाटले तसे म्हणायचे नाही आहे. मी माणसाची विशेष करून या संदर्भातील भारतीय माणसाची मानसीकता सांगत होतो की अपॉर्च्यूनिझम (संधीसाधू हा शब्द जरा जास्तच स्ट्राँग वाटतोय) पाळताना कधी हिंदू तर कधी सेक्यूलर कधी अजून काही इतकेच. सगळेच जात पाळणारे सेक्युलरवादी नसतात जसे सगळेच हिंदूत्ववादी हे जातीय नसतात तसे. विपर्यास करणारे स्वतःच्या चष्म्यातून पहात असतात म्हणून तसा विपर्यास होतो. अर्थात हे मी आपल्याबद्दल बोलत नाही आहे, पण तुम्ही कळत न कळत माझ्याकडे बघताना मी हिंदूत्ववादी आहे म्हणजे मी सेक्युलॅरीझमच्या विरुद्ध आहे असे समजून बघत आहात असा पण अर्थ होऊ शकत नाही का? असो. शेवटचा प्रश्न ह.घ्या. केवळ मुद्दा मांडण्यापुरता केलेला...

हाच अनुभव या लेखासंदर्भात बोलायचे असेल तर अमेरिकेतपण येतो. कधी कधी सेक्युलर असणारे डेमोक्रॅट्स हे समोरच्याशी "चांगले" वागतात त्याचे कारण समोरची व्यक्ती कृष्णवर्णिय असते अथवा अल्पसंख्य असते. अशा वेळेस त्यांचे वागणे वरकरणी कितीही चांगले वाटले तरी ती व्यक्ती आपल्याला वेगळे समजून चांगले वागते हे काही आवडण्यासारखे नसते. या संदर्भात मला "ए टाईम टू किल" हा चित्रपट आठवतो. पाहीला नसला तर अवश्य पहा.

नुसतेच??

नुसतेच संवेदनशील होउन हळहळणे हे कृतीशील दृष्ट्या कितपत दखलपात्र?

यातील प्रश्नाला नुसतेच का लावावे ते समजले नाही. संवेदनशील होऊन हळहळणारा मनुष्य स्वतःपुरती आणि कदाचित स्वतःच्या कुटुंबापुरती दखल घेत असेल तर माझ्यासाठी ते दखलपात्र आहे आणि माझ्यामते तो १००% कृतिशील सहभाग आहे. प्रत्येकाला कर्वे, अण्णा हजारे, गांधिजी किंवा मार्टीन ल्यूथर किंग होण्याचीही गरज नसते.

कृती

संवेदनशील होऊन हळहळणारा मनुष्य स्वतःपुरती आणि कदाचित स्वतःच्या कुटुंबापुरती दखल घेत असेल तर माझ्यासाठी ते दखलपात्र आहे आणि माझ्यामते तो १००% कृतिशील सहभाग आहे.

कुटुंबापुरते दखल घेणे हे प्रगतीशील/कृतिशील हे मान्य आहे, कदाचित १००% म्हणणार नाही, कारण बर्‍याचदा आपल्या जवळच्या लोकांत आपल्या मित्रांचाही सहभाग असतो.

असे बरेचदा होते की लोक आपल्यासमोर जातींवरून बोलतात ( उदा: खालचे धनंजय यांनी दिलेले उदाहरण ). बोलणारी माणसे आपले जवळचे नातलग आणि मित्रच असतात. पण आपल्याला मनातून "हे काय बोलतायत त्यांचे त्यांना तरी कळते आहे का?" असे वाटत असते. तेव्हा अशा प्रत्येक प्रसंगी आपण वाईटपणा पत्करून बोलले पाहिजे. पण ते काहीवेळा होत नाही. कधी बोलणारे अगदी उथळ आढळणार्‍या फरकांवरून बोलत असतात. बोलत असतानाचे वातावरण खेळीमेळीचे असते. अशा वेळी विरोधी सूर काढणे हे कठीण असते हा माझा अनुभव. विरोधी बोलले नाही तर ते समर्थन केल्यासारखे असते हे माहिती असूनही बोलताना मैत्रीचे संबंध असल्याने कठीण जाते. त्यामुळे नुसते स्वत:चे कुटुंब नाही तर मित्रांपर्यंत हा संदेश पोचवणे महत्त्वाचे आहे असे वाटते. आपल्याला जवळच्या वाटेल अशा प्रश्नावरून आपला स्वतःचा चांगल्या कामातील सहभाग वाढवणे एवढे आपण करू शकतो.

जाती दूर झाल्या तरी कुठचेतरी भेद व्यक्तीव्यक्तीत राहणारच. मुख्य फरक एवढाच आहे की त्या दृश्य किंवा अदृश्य भेदांमुळे एखाद्या समाजाला मिळणारी वागणूक तुच्छतेची असल्यास (एखाद्या समाजाच्या चालीरीतींची कुचेष्टा करणे, त्या तुच्छ लेखणे, त्यांना योग्यता असूनही आयुष्यात समान संधी न मिळू देणे अशी कारस्थाने करणे ) यासंबंधी जोवर कोणाच्याच मनातून जातीव्यवस्था जात नाही तोवर कायद्याचेच संरक्षण हवे.

जात नाही ती जात

जात नाही ती जात. जाती राहणारच, त्यांचा बाऊ कुणी करू नये. प्रत्येक प्राण्यात जाती असतात. मुंग्यांत काळी,तांबडी, पांढरी, जाड, सडपातळ, भुळभुळी मुंगी, मुंगळे , राणीमुंगी, कामगार, शिपाई, गुराखी, भिकारी, चोरमुंगी अशा अनेक जाती असतात; माणसांत असल्या तर ते नैसर्गिक समजावे. जोपर्य़ंत एखाद्याला जातीवरून कमी लेखले जात नाही तोपर्य़ंत जातिभेदाने कसलेही नुकसान होत नाही. --वाचक्‍नवी

सहमत

वाचनक्वी यांच्याशी सहमत. जोवर जातिभेदाचा संबंध उच्चनीचतेशी, सामाजिक-राजकीय-आर्थिक उतरंडीशी लावला जात नाही, तोवर जातीजातीमधे आढळणार्‍या चालीरीती, आपापल्या परंपरागत व्यवसायांशी निगडीत ज्ञान, भाषिक संपदा, खाण्यापिण्याचे पदार्थ हा सर्व आपला अनेक शतकांचा सांस्कृतिक ठेवा आहे.

असहमत

जोवर जातिभेदाचा संबंध उच्चनीचतेशी, सामाजिक-राजकीय-आर्थिक उतरंडीशी लावला जात नाही, तोवर जातीजातीमधे आढळणार्‍या चालीरीती, आपापल्या परंपरागत व्यवसायांशी निगडीत ज्ञान, भाषिक संपदा, खाण्यापिण्याचे पदार्थ हा सर्व आपला अनेक शतकांचा सांस्कृतिक ठेवा आहे.

खाद्यपदार्थांसंबंधी असेच दुर्गाबाई भागवत म्हणतात, पण त्यांचे लेखन अनेकदा आवडत असूनही या बाबतीत ते पटत नाही.

एकतर व्यवसाय हे जर केले नाहीत, तर एकाच पिढीत परंपरागत ज्ञानाचा लोप होतो. भाषा, त्यातील वैविध्य आणि खाण्यापिण्याचे पदार्थ हा सांस्कृतिक ठेवा खरेच, पण ते जपण्यासाठी जातींची गरज नाही. कारण तसे असल्यास ब्राह्मणांनी अमूकच पद्धतीने स्वयंपाक करावा, मराठ्यांनी अमूक, सीकेपींनी तमूक, असली बंधने येणार. शेवटी माझ्या पुढच्या पिढीला जे ज्ञान मिळणार ते मी जे काही रोजच्या स्वयंपाकात, बोलण्यात वापरते तेच. याचाच अर्थ असा की मी जर अमूक जातीची असले आणि त्याच जातीतील पदार्थ त्याच पद्धतीने करत राहिले तर ते पदार्थ माझ्या पुढच्या पिढीला तसेच मिळणार. पण विचार करा की मी मला आवडतील त्या रेसिपी वेगवेगळ्या जातींकडून उचलल्या, आणि त्याचीच माझ्या घरच्यांना सवय झाली तर नक्की कुठच्या परंपरा माझी पुढची पिढी त्यांच्या जातिविशेष म्हणून सांगू शकेल? किंवा त्यातील माझ्या जातीविषयक पदार्थ सांगताना मला माझी जात सांगणे भाग आले. याचाच अर्थ मी जातीचे ज्ञान माझ्या पुढच्या पिढीच्या मनात आपसूक घालणे आले.

उत्सुकता वि. आयडेन्टीटी

नक्की कुठच्या परंपरा माझी पुढची पिढी त्यांच्या जातिविशेष म्हणून सांगू शकेल?

हे वाक्य वाचून थोडी मौज वाटली. आपण सगळेच कीती छोट्या छोट्या गोष्टींना आपली आयडेंटीटी (स्वत्व)समजतो. एखाद्या प्रकारचे जेवणबनवणारे, ठराविक विधी करणारे, ठराविक पदार्थ खाणारे इतकच काय पण ठराविक हेल काढून बोलणारे यामधेही आयडेंटीटी येते. आणि मग नव्या गोष्टी स्वीकारण्याची उस्तुकता आणि आपली आयडेंटीटी गमावण्याची भीती याच्या कात्रीत माणूस सापडत चालला आहे असं वाटतं

किंचित अवांतरः या सगळ्यात मीही आलो किंवा कदाचित केवळ मीच आलो कल्पना नाहि. तुम्हाला कोणाला अश्या कात्रीत सापडल्यासारखं वाटतं का?

कात्री ...

ही कात्री हाच तर आपला सार्‍यांचा (एक) कळीचा मुद्दा आहे ! नवे ज्या वेगाने येते आहे ; जुने तेवढ्याच वेगाने जाते आहे. या सार्‍यात "आपण" नक्की कुठे , हा तर मिलियन डॉलर्स प्रश्न !

नैसर्गिक नाहीत

माणसांत असल्या तर ते नैसर्गिक समजावे.

मानवांतील जाती नैसर्गिक नाहीत -
मानवातील जाती विशेषतः भारतातील जातीव्यवस्था ही नैसर्गिक नाही. माणसांच्या स्वभाव वैशिष्ट्यांप्रमाणे बुद्धीवादी, लढाऊ इत्यादी गुणांनी जाती सुरूवातीस निश्चित झाल्याही असतील पण त्या नंतर जन्माधिष्ठित झाल्या ही वस्तुस्थिती आहे, आणि अशा प्रकारे तयार झालेल्या जाती नैसर्गिक नाहीत. आधीच्या प्रतिसादात यावरून लिहीणार होते पण तो फारच वाढेल म्हणून थांबले.

वंश, रंग हे भेद म्हणत असाल, ते भेद नैसर्गिक आहेत. पण माझ्या रंगामुळे, चेहर्‍याच्या ठेवणीमुळे मी स्वभावाने कशी असेन याचा कोणी विचार करून माझ्याशी कसे वागायच, मला काय अधिकार द्यायचे इत्यादी हे मी व्यक्ती म्हणून कोण/कशी आहे हे समजून घेण्याआधीच निश्चित करीत असेल तर हा माझ्यावर अन्याय ठरेल.

एखाद्याची जात जन्माने अमूक म्हणून फक्त याच जातीत त्याचे लग्न व्हावे, त्याच्या संततीने तीच कार्यवाचक जात लावावी हे योग्य नाही. भंगी, चांभार, ब्राह्मण, शिंपी या सर्व शब्दांना अर्थ आहेत. ते त्या त्या जातीची कामे दर्शवतात. आजच्या काळात भारतात जर जातीवर आधारित कामे लोक करत नसतील (किंवा तशी अपेक्षा असेल) तर या सर्वाची पुढची पायरी म्हणून हे शब्द भाषेतून पुढील जातीवाचक वापरासाठी/व्यवहारासाठी रद्द केले गेले पाहिजेत किंवा या कृत्रिम जाती नष्ट केल्या पाहिजेत. पण ते व्हायला वेळ लागेल, तोवर निदान रोजच्या व्यवहारात मनातून जाती नष्ट व्हाव्या म्हणून प्रयत्न केले पाहिजेत.

म्हणूनच तर

कुटुंबापुरते दखल घेणे हे प्रगतीशील/कृतिशील हे मान्य आहे, कदाचित १००% म्हणणार नाही, कारण बर्‍याचदा आपल्या जवळच्या लोकांत आपल्या मित्रांचाही सहभाग असतो.

हल्लीच्या जगात कुटुंबालाच आपल्या विचारांवर चालायला लावणे इतके कठिण झाले आहे की जवळच्या मित्रमंडळींचा समावेश करण्याची हिम्मत नाही. त्यापेक्षा मुलांना आणि आपल्या साथिदाराला ज्यांच्याशी आपण सतत संपर्कात असतो, त्यांना वेगळा विचार करायला लावणे सोपे नसले तरी शक्य असते.

सहमत

चित्रा ताईंनी केलेले विश्लेषण मार्मिक आहे. पुर्णपणे सहमत. सरकारी नोकरीत जातींच्या आधारावर केलेल्या आरक्षण, तसेच त्यावरुन संधींच्या उपलब्धतेचे राजकारण या गोष्टी जातीभेद मिटवण्या ऐवजी पुन्हा दरी निर्माण करतात हे मी जवळुन अनुभवले आहे."आता आमचे दिवस आहेत, तुमचे दिवस होते तेव्हा तुम्ही माज केलात. भोगा आता त्याची फळे" कनेक्टींग ट्रेन ला उशीर झाला कि तुमची संधी हुकते मग त्या ट्रेनला उशीर होण्यासाठी मार्ग खुंटीत करायचे. शोषणाची संधी मिळाली कि शोषित हि शोषक बनतो. तो स्वकीयांचेच शोषण करतो. आरक्षणाने तेढ निर्माण झाली ती लाभार्थींमध्येच. विद्रोहातून विवेका कडे यायला वेळ लागणारच आहे. पण तोपर्यंत विवेकाची वाटचाल विद्रोहाकडे व्हायला लागते. हे चक्र चालूच राहणार.
प्रकाश घाटपांडे

लेख आरक्षण, जातीभेद याकरता नाही.

लेखात आणि लेखाच्या खालील दोन चार ओळींत लेखाचा उद्देश स्पष्ट केला आहे.

  • जगात वर्णद्वेष या ना त्या प्रकारे सर्वत्र आढळतो, कितीही नाही म्हटलं तरी खोलवर आपल्या मनात तो रूजत असतो.
  • वयाच्या सहाव्या वर्षी आपल्याला किंवा आपल्या मुलांना कनिष्ठतेची वागणूक मिळून एखादा दिवसतरी शाळेत रुबीप्रमाणे घालवावा लागल्यास काय वाटेल याची कल्पना करावी
  • काही माणसांना एकदम बदलणे जमत नाही. ते वर्षनुवर्षे असेच वागत आले आहेत, यापेक्षा वेगळे वागायला कदाचित त्यांना भीती वाटत असावी..


हा लेख मूळ उद्देश सोडून जातीभेद आणि आरक्षण अशा न संपणार्‍या मुद्द्यांकडे वळावा अशी लेखिका म्हणून माझी इच्छा नाही. तरी आरक्षण, संधीचे राजकारण, निधर्मी राष्ट्रवाद इ. साठी नवी चर्चा सुरू करावी.

मान्य

शाळेत शिकणार्‍या मुलांना त्यांची जात माहीत नसते असा माझा अनुभव आहे. दहावीत मुलगा किंवा मुलगी आली की शाळेच्या दप्तरात नोंदलेल्या जातीची पडताळणी करावी लागते. मुलांना जात विचारली की उत्तर मिळते की, "माहीत नाही, उद्या आईला विचारून सांगेन." दुसर्‍या दिवशी काही मुले शिक्षकांच्या कानाजवळ येऊन हळूच आपली जात सांगतात. आणि अशा प्रकारे त्या दिवसापासून जातिभेद निर्माण होतो.
सेक्युलॅरिझम हा शब्द फक्त राज्यकारभाराशी संबद्ध आहे. राजकारणाशी नाही. एखादा देशात सेक्युलॅरिझम आहे म्हणजे त्या देशात सरकारकडून किंवा न्यायालयांकडून कुणालाही जातीवर आधारित वेगळी वागणूक मिळत नाही. प्रत्यक्षात सरकार चालविणारी माणसेच स्वार्थी राजकारणासाठी जातवादाला प्रोत्साहन देतात. पत्रकार निवडणुकांच्या वेळी प्रत्येक मतदारसंघाचे जातीवर आधारित विश्लेषण करतात. त्यानुसार उमेदवार ठरवला जातो. मुसलमानबहुल्य मतदारसंघातील जागा हिंदू उमेदवाराकरिता राखीव असावी आणि तसेच बिगर आदिवासी संघातून आदिवासी निवडून यावा. असे करण्याने जातवादाला थोडातरी प्रतिरोध होईल.--वाचक्‍नवी

काळे आणि दलित

येथील हरिजन व तेथील काळे यांची समकालीन सामाजिक परिस्थितीतील तुलना केली तर आपल्याला कुठले चित्र कमी क्लेशदायक वाटते?

दगडापेक्षा विट मऊ या न्यायाने पाहिले तर्, अमेरिकेतील काळ्यांची सामाजिक परिस्थिती भारतातील दलितांपेक्षा बरी म्हणावी लागेल.

अवांतर : पण काळे हे राजकीय दृष्ट्या विस्कळीत वाटतात. उद्या त्यांना जर एखादी मायावती मिळाली आणि उत्तर प्रदेशात केले तसे सोशल इंजिनीयरिंग केले (समजा काळे अधिक हिस्पॅनिक), तर अमेरिकन राजकारणाची उलथापालथच होऊ शकेल!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

अवांतर

अमेरिकेतले काळे हे अल्पसख्यांक आहेत ह्या उलत आपल्याकडचे दलित हे बहुसंख्य (बहुजन) आहेत. त्यामुळे मायावती सारखे त्यांना एकत्र आणणारे नेतृत्व मिळाल्यास भारतीय राजकारणात उलथापालथ होऊ शकते पण अमेरिकेतल्या काळ्यांमध्ये हे (अल्पसंख्यांक असल्याने) शक्य नाही. तसेच मेक्सिकनस् (हिस्पॅनिक) हे काळ्यांना कधीच जवळ करणार नाहीत कारण ते काळ्यांसमोर त्यांना गोरेच समजतात. आणि काळे देखिल मेक्सिकन लोकांशी कधीच युती करणार नाहीत करणार अमेरिकेतील मेक्सिकन लोकांची वाढती संख्या सर्वात जास्त प्रमाणात काळ्यांचा रोजगार खात आहे.

हरीजन आणि कृष्णवर्णीय

येथील हरिजन व तेथील काळे यांची समकालीन सामाजिक परिस्थितीतील तुलना केली तर आपल्याला कुठले चित्र कमी क्लेशदायक वाटते?

याची वेगवेगळी उत्तरे आहेत -सर्वच कमी अधीक फरकाने पटू शकतील. पण एक निरीक्षण म्हणजे: आता कदाचीत जिथे संबंध येत असेल तेथे जातीने जवळ-लांब जाणे होत भारतात कदाचीत कमी झाले असेल. पण तेच भारतीय जेंव्हा अमेरिकेत येतात तेंव्हा त्यातील किती गौरवर्णीयांशी संबंध ठेवून आहेत आणि किती जण कृष्णवर्णीयांशी हा एक संशोधनाचा विषय होवू शकेल.

थोडक्यात आपली माणसे पण चष्मा वापरताना कमीअधीक प्रमाणात दिसतात असे कुठेतरी वाटते. कल्लू हा शब्द तर काय मिरा नायरमुळे न्यूयॉर्कमधील अनेक कृष्णवर्णीयांना माहीत झाला होता, परीणामी आपल्या भारतीयांनी तो नंतर सबवे मधे वगैरे वापरणे बंद केले (उगाच काना खाली बसायला नको या भितीने...)

--------------

समयोचित लेख

लेख समयोचित आहे.

वर्णविरोधी कायदे करण्यास अमेरिकेला अब्राहम लिंकननंतरही शंभर वर्षे लागावीत हे आश्चर्यजनक म्हणण्यापेक्षा खेदजनक आहे. आजही वयाची साठी ओलांडलेल्या अणि विशेषतः दक्षिणी राज्यातून आलेल्या गोर्‍यांच्या मनातून वर्णद्वेष पूर्णपणे गेला असेल असे वाटत नाही.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

अद्यापही ....

अद्यापही गोर्‍यांच्या मनातून् वर्णभेद पूर्णपणे गेला आहे असे वाटत नाही . हा पहा आताच वाचनात आलेला लेख.
येथे वाचा

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

वर्णभेद

गोरे, काळे, पिवळे, तपकिरी कोणाच्याही मनातून जात नाही, हे दुर्दैव आहे आणि तो जात नाही म्हणून कडवटपणा वाढत राहील हे ही.

रेशियल डिस्क्रिमिनीशन जगात सर्वत्र आहे आणि जेथे आवर्जून, 'येथे रेशियल डिस्क्रिमिनीशन केले जात नाही' असे सांगितले जाते तेथे ते हमखास असते.... अमुक चित्रपटातील पात्रांचा जिवंत किंवा मेलेल्या व्यक्तिंशी संबंध नाही असे लिहिलेल्या डिस्क्लेमराचा अर्थ तो चित्रपट खर्‍या व्यक्तींवर बेतलेला असतो त्याप्रमाणेच.

वा लेख आवडला!

लेख आवडला. वेगळा विचार करून त्या मार्गावर चालणारी माणसे नेहमीच भावतात. रुबी इतकेच तीच्या आईचेही महत्व आहे यात शंका नाही. तीच्या वडिलांना वाटलेली भीतीही वडिल या नात्याने काहीशी योग्यच होती नाही का? साठ सालात हे स्वरूप एका प्रगत देशातले आहे हे वाचून प्रगत देश याची व्याख्या काय असावी असा प्रश्न पडतो.

या सगळ्यात के के के या वर्णभेदी संघटनेने काय काय केले होते ते वाचणेही रोचक असेल. ही संघटना काळ्यांना सैतानी मानते व त्यांना जिवंत जाळणेही योग्य मानते/मानायची. (केव्ह्ढा विरोधाभास!)

आपला
गुंडोपंत

संत एकनाथ, गाडगे महाराज...

हा लेख आणि त्यावरील प्रतिक्रिया वाचताना नकळतच संत एकनाथांची आठवण आली. एका दलिताचे लेकरु उचलणे हे त्या काळात किती क्रांतिकारक असावे?

तसेच गाडगेबाबांचे सर्व लोकात मिसळणे आणि समाजप्रबोधन करणे.

समयोचित व्यक्तिचित्र

आवडले. आपण सर्वच समाजात कृतिशील होऊ शकणार नाही, हे खरेच. पण जागरूक आणि संवेदनाशील जरूर असावे, हे तुमचे विचार पटतात.

महाराष्ट्रात बेटीव्यवहाराखेरीज जातिव्यवस्था नष्ट झाली आहे, असे म्हणण्याचे धारिष्ट्य माझ्यापाशी नाही. (अमेरिकेत "अफर्मेटिव्ह ऍक्शन"चे राजकारण सोडल्यास वंशभेद संपला आहे, असे अनेक गौरवर्णीयांचे प्रांजळ मत आहे, हे विसरता कामा नये. यास अतिपरिचयाद् अवज्ञा म्हणावी की अंधत्व, हे कोणास ठाऊक.)

हल्लीच कोकण रेल्वे मार्गावर, एका लांब रेल्वे प्रवासात, माझ्या सोबत एक चुणचुणीत हल्ली लग्न झालेले जोडपे प्रवास करत होते. गप्पा मारू लागले. लग्न जातीतच कसे ठरवले, याचे वर्णन - हा झाला बेटीव्यवहार. पण पुण्यात अमुक-अमुक नव्या भागात वास्तव्य, इथे सर्व अमुक जातीचेच लोक राहातात. मुलगा एका बड्या कंपनीत काम करत होता. "बहुराष्ट्रीय नाही, मालकाचे नाव क्षक्षक्ष - अगदी आपल्या जातीतला..."

अशा प्रकारचे बोलणे माझ्या नातेवाइकांत राजरोस चालते. त्यामुळे या अनोळखी दांपत्याचे बोलणे माझ्याबरोबरचे नातेवाईक काहीच विचित्र न ऐकत असल्यासारखे ऐकत होते, माना डोलवत होते.

विचारांत कमालीच्या भिनलेल्या या जीवनपद्धतीच्या "सांस्कृतिक जवळिकीचा" आर्थिक परिणाम होत नसेल, असे म्हणणे धाडसाचे होईल. आणि म्हणणारच असाल, तर अमेरिकेतही आता वंशभेद जीवनपद्धतीच्या "सांस्कृतिक फरकांत" जमा झाला असे म्हणावे लागेल. (ही वस्तुस्थिती नाही, असे माझे मत आहे, हे सांगणे नलगे.) शिवाय अस्पृश्यता सोडली तर भारतातल्या स्पृश्य शूद्रांविरुद्ध (कोष्टी वगैरे बहुतेक जाती) शंभर वर्षांपूर्वीही वंशभेद नव्हता, केवळ जीवनपद्धतीच्या साम्यासाठी रोटीबेटीबंदता होती, असे म्हणण्यास वाव मिळतो. आणि १९५० मध्ये एका झटक्यात अस्पृश्यताही कायमची संपली...

त्यामुळे या समयोचित लेखाचा अमेरिकेतच नव्हे तर भारतातील परिस्थितीस मनात आणूनही विचार करावा, असे मला वाटते.

माणुसकीसाठी - स्वा. सावरकर

स्वा. सावरकरांचा "जातिभेद मोडण्यासाठी दुसरे काही करावयास नको" हा लेख वाचण्यासारखा आहे, पण मोठा असल्याने संक्षिप्तरूपात पण येथे लिहीण्यास वेळ लागेल. पण त्यांचे श्रद्धानंद या त्यांच्या मासीकाच्या वाचकांसाठीचे खालचे विधान अस्पृश्यतेविषयी आहे पण तरी देखील एकंदरीतच जातियतेविषयी बरेच बोलके आहे (समग्र सावरकर ६:३८०)

माणुसकीसाठी

श्रद्धानंदचे लेख नेहमी समग्र न वाचणार्‍या कोणा कोणा प्रामाणिक मनुष्याचा मधूनच काही छेदक (प्यारीग्राफ) किंवा वाक्ये वाचून भ्रांत समज होण्याचा संभव असल्याने हे स्पष्टपणे आणि वारंवार सांगणे भाग आहे की , प्रस्तुतची अस्पृश्यतेची रूढी ही अत्यंत अन्याय्य आणि आत्मघातकी असल्यामुळे मुख्यतः केवळ माणुसकीसाठी म्हणूनच तिचे आम्ही हिंदूंनी निर्दालन केले पाहीजे. इतर सर्व कारणे दुय्यम होत, हेच आमचे अबाधित मत आहे. (समग्र सावरकर ६:३८०)

--------------

आभार/ लेखाचा उद्देश

प्रतिसाद देणार्‍या सर्वांचे आभार.

लेखाचा उद्देश जातिव्यवस्थेवर टिका करण्यापेक्षा, एखाद्या पिडीत माणसाच्या चपलेत आपले पाऊल घुसवून पाहता येते का आणि ते घुसले तर आपल्याला कोणती अनुभूती येईल आणि ती आपल्याला रूचेल का हे पाहणे होता.

प्रतिसाद

rubee AvaDalee. Thanks,

technical problems to respond. sorry

रुबी आणि हेन्री

गो-यांच्या शाळेत शिकणा-या रुबीचे आणि हेन्रीचे अतिशय सुंदर वंशवादावरचे लेखन वाचायला मिळाले.

अतिशय सुंदर लेख

प्रियालीताई,

रुबीचे व्यक्तिचित्र फारच छान जमले आहे. लेख संग्रही ठेवावा असा झाला आहे. अशीच आणखीही व्यक्तिचित्रे लिहावीत ही विनंती.

आपला
(वाचक) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~
"असत्याला अस्तित्व नाही आणि सत्याचा अभाव नाही"

समयोचित आणि माहितीपूर्ण

लेख लिहील्याबद्दल धन्यवाद.

"त्यांच्याशी आणि त्यांच्या विचारांशी आपली बांधिलकी असेल नसेल परंतु वयाच्या सहाव्या वर्षी आपल्याला किंवा आपल्या मुलांना कनिष्ठतेची वागणूक मिळून एखादा दिवसतरी शाळेत रुबीप्रमाणे घालवावा लागल्यास काय वाटेल याची कल्पना करावी."

रुबी व तिच्या आईवडिलांचे कौतुक करावे तेव्हढे थोडेच आहे. मी हे असे पालक म्हणून (किंवा पाल्य म्हणूनही) अजिबात करू शकलो नसतो.

काळ्या मुलीची शाळेची गोष्ट छान

काळ्या मुलीची शाळेची गोष्ट छान
काळागोरा भेद आणि जातीयवाद सगळीकडे आहे हेच जाणवले

 
^ वर