मराठी साहित्यातील स्त्रीवाद (प्रतिसादात्मक लेख)

(डॉ. दिलीप बिरुटेंनी सुरु केलेल्या 'मराठी साहित्यातील स्त्रीवाद' या चर्चेला लिहिलेला हा प्रतिसाद बराच लांबला आणि मूळ विषयाव्यतिरिक्त अवांतर लिहिणेही झाले म्हणून इथे वेगळा प्रकाशित करीत आहे. मूळ चर्चाप्रस्तावकाच्या अनुमतीशिवाय हा उपद्व्याप केला, त्याबद्दल क्षमस्व. हाच लेख येथेही वाचता येईल.)

काशीबाई कानिटकर, लक्ष्मीबाई टिळक अशा लेखिका मराठी साहित्यात लिहित्या झाल्या तरी स्त्रीवादाची खरी मुहुर्तमेढ रोवली ती मालतीबाई बेडेकरांनी. १९३३ मध्ये विभावरी शिरुरकर या टोपणनावाने त्यांनी 'कळ्यांचे नि:श्वास' हा कथासंग्रह लिहून मराठी साहित्यविश्वात खळबळ माजवली. मुळात स्त्री-वादाचा पाया हा स्त्रीला वेगळे अस्तित्व आहे, वेगळे व्यक्तिमत्व आहे ही मान्यता मिळवण्यात आहे. केवळ स्त्री असल्याने वेगळी वागणूक मिळावी असा नाही. 'बाबांचा संसार माझा कसा होणार?' या कथेत एक मुलगी, बहीण, पत्नी, सून, आई म्हणून इतरांनी आपल्याकडे पाहू नये, तर एक स्वतंत्र विचारी व्यक्ती म्हणून पहावे हा त्याकाळी धाडसी वाटणारा विचार कथानायिका मांडते. त्यातील एक उतारा येथे वाचता येईल.

एका अर्थी मालतीबाई बेडेकर काळाच्या पुढे होत्या. विश्वास बेडेकरांच्या 'एक झाड दोन पक्षी' या आत्मचरित्रात त्याची चुणूक दिसते. साधारण पुढच्या एक-दोन दशकात, दुसऱ्या महायुद्धानंतर एक गरज म्हणून स्त्रियांची पहिली पिढी नोकरीसाठी प्रथमच घराबाहेर पडली. बटाट्याच्या चाळीचं शेवटचं स्वगत आठवतंय? एरवी एक पुस्तक म्हणून ते कितीही आवडत असले, तरी त्या स्वगतातला मुली नोकरीसाठी बाहेर पडल्या म्हणून हळहळणारा भाग मला कायम खटकत आला आहे. अर्थात एका दृष्टीने ते तेव्हाच्या समाजमनाचे प्रतिबिंब म्हणता येईल. नाइलाज म्हणून स्त्रियांना नोकरी करण्याची परवानगी देणारा, आणि पुढे मग मुलीच्या पगारावर घर चालते तेव्हा तिचं लग्न होऊन कसं चालेल अशा कोंडीत सापडलेला. बटाट्याच्या चाळीच्याच संगीतिकेतला अंतू जोशी पत्रे टंकताना आवडणाऱ्या शांतेपेक्षा किंचित काळ्या सरलेला 'शांता शांता इनोसंट मन - सरला पित्रे पर्मनंट पण. हुडकून काढीन म्हणतो पत्ता, पगार अन महागाई भत्ता' म्हणून अधिक पसंती देतो, तेव्हा तो निरुपायाने बदलणाऱ्या पुरुषप्रधान समाजाचेच प्रतिनिधित्व करतो. (अर्थात, इतर प्रांतांच्या मानाने महाराष्ट्रात हे बदल लवकर झाले. उत्तर भारत याबाबत अधिक मागासलेला होता. केवळ सायकल चालवणाऱ्या मुली/स्त्रिया हे 'अजाब' पाहण्यासाठी १९२० च्या दशकात पंजाबातून काही पुरुष सहलीसाठी पुण्यात आले होते, असे एका लेखात वाचल्याचे आठवते.)

साठोत्तरी साहित्य हे स्त्रीवादापेक्षा दलित साहित्य आणि नेमाडे, चित्रे, ढसाळ, कोलटकर यांच्यासारख्या नव्या स्वरुपाचे लेखन करणाऱ्यांनीच अधिक गाजवले असावे. [चू. भू. द्या. घ्या.] अर्थात, इरावती कर्व्यांनी परिपूर्तीमधे केलेले उपहासात्मक भाष्य (महर्षी कर्व्यांची सून, अमक्यांची कन्या, अमक्यांची पत्नी अशी लेखिकेची ओळख एका समारंभात करुन देण्यात येते. तरीही काहीतरी राहिलंय असं तिला वाटत राहतं. शेवटी आपल्या शाळकरी मुलाच्या मित्रांनी, 'अरे ती बघ आपल्या वर्गातल्या कर्व्याची आई' असे उद्गार काढल्यावर त्यांना आपली ओळख पूर्ण झाल्याचे, परिपूर्ती झाल्याचे समाधान मिळते.) याच काळातलं.[त्यांच्या मृत्युनंतर एका पत्रकारवर्यांच्या लेखात इरावतीबाईंच्या मानववंशशास्त्रातील संशोधन आणि लेखनकामापेक्षा - त्या तेव्हाच्या पुण्यात बुलेट चालवायच्या, नवऱ्याला दिनू म्हणून हाक मारायच्या असे कौतुक वाचल्यानंतर फार काही बदलले नाही याची खात्री पटली :)]

पद्मा गोळे, संजीवनी मराठे, इंदिरा संत, शांता शेळके या कवयित्रींनी आक्रमक स्त्रीवाद जरी कवितेतून मांडला नसला; तरी स्वतंत्र स्त्रीत्वाची जाणीव त्यांच्या कवितांतून डोकावत राहते. 'डोळा वाटुली संपेना' मध्ये कविताभर ताटकळणारी, आणि मग
शेवटच्या कडव्यात 'संपावया हवी वाट, लावायला हवा दिवा; पोटासाठी मुकाट्याने, हवा टाकायला तवा' म्हणणारी इंदिरा संतांनी रेखाटलेली आई, किंवा -

आता सोंगं पुरे झाली
सारी ओझी जड झाली,
उतरून ठेवून आता तरी
माझी मला शोधू दे
तुकडे तुकडे जमवू दे
विशाल काही पुजू दे

अशी आस लागलेली, पद्मा गोळेंच्या 'मी घरात आले' मधली कविता-नायिका (कथानायिका असते तशी) याच गोष्टीची साक्ष देतात.

एकंदरीतच स्त्रीवादी लेखक-लेखिका म्हणजे स्त्रियांच्या हक्कांसाठी हिरीरीने भांडणारे किंवा तळागाळातील स्त्रियांवर होणारे अन्याय रेखाटणारे अशी व्याख्या करणे संकुचितपणाचे होईल. (अशा यादीत मग फक्त 'मुलगी झाली हो' हे नाटक आणि इतर कार्यकर्ते-लेखकांची नोंद होईल). व्यापक अर्थाने, गौरी देशपांड्यांचं लेखन स्त्रीवादी म्हणता येईल. "मी एक टक्का स्त्रियांच्या जीवनाविषयी लिहिते असा आरोप असला तरी मला स्त्रियांत अशा अभेद्य भिंती जाणवत नाहीत. भाकरीची भ्रांत नसणाऱ्याला दुसरे प्रश्न असतातच की.", या शब्दांतून त्यांची भूमिका स्पष्ट होते. निपाणीतील विडी आणि जर्दा कारखान्यात काम करणाऱ्या गरीब स्त्रियांचे प्रश्न समाजासमोर मांडणाऱ्या अनिल अवचटांचं लेखन आणि मध्यमवर्गीय/सुखवस्तू घरातील नमू आणि कालिंदीच्या मन:स्थितीचा वेध घेणाऱ्या 'दुस्तर हा घाट' आणि 'थांग'सारख्या कादंबऱ्या -- वरकरणी दोन टोकं वाटली तरी त्यांना जोडणारा धागा स्त्रीवादी लेखनाचाच.

सुनीता देशपांडेंचं 'आहे मनोहर तरी', कमल पाध्येंचं 'बंध-अनुबंध' आणि माधवी देसाईंचं 'नाच गं घुमा' या तीन पुस्तकांचा उल्लेख केल्याशिवाय हा लेख अपूर्ण राहील. तिघीही साहित्यिकांच्या पत्नी. लेखक त्याच्या लेखनात ज्या मूल्यांचा सतत पुरस्कार करतो, तसे त्याचे व्यक्तिमत्व असते या प्रचलित समजाला तिघींचं लेखन कमी-अधिक प्रमाणात छेद देतं. 'आमच्या घरी तांदूळ आणि प्रूफं दोन्ही सुनीतालाच निवडावी लागतात', असं म्हणणाऱ्या पुलंमध्येही कधीतरी सुनीताबाईंना 'शिकिवनारा बाबा' ही पुरुषी अहंगंडाची किंवा 'लोकापवादो बलवान मतो मे' म्हणून समाजापुढे मान तुकवण्याची जी वृत्ती आढळली; ती वृत्ती - तो पुरुषी अहंगंड कमी अधिक प्रमाणात इतर दोघींनाही जाचत राहतो.

सध्याच्या लेखिकांमध्ये मेघना पेठे आणि कविता महाजनांचे नाव आवर्जून घ्यावं लागेल. शरीरसंबंधांविषयी लिहिताना मराठी लेखक फार सोवळेपणाने लिहितात. एकंदरीतच मध्यमवर्गीय पांढरपेशेपणा याबद्दल मोकळेपणाने लिहायच्या आड येते, असा या चर्चेत मुद्दा उपस्थित झाला होता.(अर्थात केवळ शरीरसंबंधाविषयी मोकळेपणाने लिहिणे म्हणजे आधुनिक/स्त्रीवादी लेखन असा दावा यातून करायचा नाही. परंतु, चित्रपटात वाट्टेल ते पाहण्याची तयारी असलेले आपण पुस्तकांबाबत अजून बरेचसे परंपरावादी आहोत, हेही खरं.) या दोघींच्या लेखनात अशी वर्णने जेव्हा कथानकाच्या ओघात येतात तेव्हा त्यांचा तोल कुठे ढळत नाही. कविता महाजनांच्या 'ब्र' या पुस्तकातील हा एक उतारा उदाहरणार्थ पहा. [टीप - या उताऱ्यात काही असभ्य, अश्लील आहे, असं मला वाटत नाही. केवळ सावधगिरी म्हणून ही टीप लिहिणे भाग आहे, की जर आपल्याला यात काही आक्षेपार्ह वाटणारं असेल, असं न वाचताच वाटत असेल तर कृपया पुढील दोन परिच्छेद गाळून पुढचा लेख वाचावा.]

"अख्खा दिवस ऑफिसमध्ये राबून; तिथल्या स्पर्धेला, कटकटींना सामोरं जाऊन, लोकलमध्ये लोंबकळून घरी परतायचं. परतताना मुलींना पाळणाघरातून घ्यायचं. भाजी, दूध घ्यायचं. पुन्हा मुलींचं काहीतरी असायचंच... उद्या शाळेत अमुक वही, तमुक रंग सांगितलेत आणायला, किंवा क्राफ्टपेपर, किंवा घरी कुंडीत एक झाड लावून त्याची वाढ पाहायला सांगितलंय; असं काहीतरी. दगड, धोंडे न् माती. मग रात्रीचा स्वयंपाक. मुलींचा गृहपाठ. उद्या सकाळची तयारी. या सगळ्यात शरीर दगा नाही देणार, तर काय दिवसभर एकाच जागी देठावर उमलून थांबलेल्या फुलासारखं झुलत बसणार? पण हे सगळं सहज बोलू शकतो दिनेश. रेवतीलाही ऐकवायचाच की.

रेवती एकदा म्हणाली होती, "कधीकधी इतकी चीड येते ऐकताना. वाटतं, आपणही सुनवावं. कधी आपली इच्छा झाली आणि याचं उठलंच नाही तर? बायका म्हणजे यांना हवं तेव्हा अंगाखाली यायला हव्यात. बळजोरी करता येते. नाहीच करता आली तर असं बोलून दाखवता येतं. पण मी जर असं म्हटलं कधी, तर किती घाण वाटेल ना? बघ, तुझा चेहरासुद्धा कसा झालाय हे इतकं साध्या सरळ भाषेत बोललेलं ऐकताना. त्यांच्यासारख्या खालच्या पातळीवर येऊन तशा गलिच्छ भाषेत बोलूच शकणार नाही कधी आपण. इतक्या पारंपारिक कल्पना ठाम असतात आपल्या डोक्यात. बाकी सारं आपण मोकळं बोलू. पाळीचं किंवा गरोदरपणीचं. पण असं निगेटिव्ह असलं, तर नाही बोलणार कधीच. आपल्या नवऱ्याच्या पुरुषार्थाचा कसा अपमान करणार आपण मैत्रिणीजवळसुद्धा? परवा दिनेश म्हणाला की 'तुम्हां बायकांची अशी नेहमीच कटकट असते काही ना काही. कधी रेड डिस्चार्ज कधी व्हाइट डिस्चार्ज. निमित्तं मिळतात नाही म्हणायला.' इतकी किळस दाटून आली मनात. सणसणीत काही बोलावं असं वाटलं. पण नाही बोलले. आधीच या लोकांचे इगो नाजूक. ते दुखवायचे आणि तेही सेक्ससारख्या बाबतीत म्हणजे आपलं मरणच. आणि खरंतर मला इंटरेस्ट नसतो असंही नाही. पण नवेपणीसारखी निव्वळ शरीराची ओढ आता कशी राहील?"

'मराठी साहित्यातील स्त्रीवाद' या विषयावर जे काही आठवलं ते लिहिलं. भविष्यात ह्या स्त्रीवादाचे स्वरूप कसे असेल?

नातिचरामित 'अलीकडच्या इतिहासातल्या कितीतरी टॉपला गेलेल्या आणि आपापल्या क्षेत्रांत स्वयंपूर्ण कर्तृत्वाने गाजलेल्या बायका या सगळ्यांचं मॅरिटल स्टेटस लक्षात घेतलं तर एक गोष्ट जाणवते -- यातल्या बहुतेक बायका या अविवाहित, परित्यक्त्या, घटस्फोटित, विधवा वा पुनर्विवाहित आहेत. हा निव्वळ योगायोग वा अपघात नाही, तर लग्नसंस्थेवरची झणझणीत टिपणी म्हणून याकडे बघता येईल.' असं एक निरीक्षण आहे. (संसारी स्त्रिया आपल्या कर्तृत्वाने उत्कर्ष साधू शकत नाहीत, असे लेखिकेला म्हणायचे आहे असा उफराटा निष्कर्ष यातून काढू नये; कारण हे निरीक्षण कथेच्या संदर्भात येते.) त्यावरुन परवाच एका अनुदिनीवर झालेली न्यूयॉर्क टाइम्सच्या एका पाहणीवरील चर्चा आठवली. घर आणि नोकरी, ह्या दोन्ही आघाड्या सांभाळताना स्त्रियांची दमछाक होते आहे आणि परिणामी त्यांचे असमाधान वाढते आहे हा या पाहणीचा निष्कर्ष. भारतातही नोकरी करणाऱ्या जोडप्यांत घटस्फोटाचे प्रमाण वाढते आहे.

याचाच अर्थ, स्त्रियांच्या समस्या दूर न होता उलट त्यांचे स्वरूप बदलते आहे आणि अधिक गुंतागुंतीचे होते आहे. आधुनिक स्त्रीची ही कुचंबणा जसजशा अधिकाधिक स्त्रिया लिहित्या होतील; तसतशी अधिक प्रभावीपणे मराठी साहित्यात व्यक्त होत राहील.

Comments

धीट

उपक्रमावरच्या धीट लेखना बद्दल अभिनंदन.
आपला लेख आवडला.

नातिचरामित 'अलीकडच्या इतिहासातल्या कितीतरी टॉपला गेलेल्या आणि आपापल्या क्षेत्रांत स्वयंपूर्ण कर्तृत्वाने गाजलेल्या बायका या सगळ्यांचं मॅरिटल स्टेटस लक्षात घेतलं तर एक गोष्ट जाणवते -- यातल्या बहुतेक बायका या अविवाहित, परित्यक्त्या, घटस्फोटित, विधवा वा पुनर्विवाहित आहेत. हा निव्वळ योगायोग वा अपघात नाही, तर लग्नसंस्थेवरची झणझणीत टिपणी म्हणून याकडे बघता येईल.' असं एक निरीक्षण आहे.

मला इतकेच म्हणायचे आहे की हाच निष्कर्ष पुरुषांनाही लावता येणार नाही का?

आपला
गुंडोपंत

नाही येणार

मला इतकेच म्हणायचे आहे की हाच निष्कर्ष पुरुषांनाही लावता येणार नाही का?

मला वाटते पुरुषांच्या यशा मध्ये त्यांच्या बायकांचा मोठा वाटा असतो. त्याचे श्रेय हे तिला म्हणावे तसे मिळत नाही. मुळात समाजात पुरुषप्रधान संस्कृती आहे ही वस्तुस्थिती मान्य केली पाहिजे. तशी ती नसावी हा वेगळा विषय आहे. पुष्पा भावे देखिल बाहेर गावी जाताना नवर्‍यासाठी सैपाक करुन जातात. नवर्‍याला बाहेरच खायला लागू नये म्हणून.( अर्थातच प्रेमापोटी) हे त्यांनीच अनौपचारिक गप्पात सांगितलेले मी ऐकले आहे. स्त्रियांना दोन्ही आघाड्यांवर लढावे लागते. ज्यांना ते जमत नाही त्या अर्थातच घर ही आघाडी गुंडाळतात. अविवाहित, परित्यक्त, विधूर, घटस्फोटित अशा टॉप ला गेलेल्या पुरुषांची संख्या तुलनेने बर्‍यापैकी कमीच.
अवांतर - भारतात विवाहसंस्था वेगाने मोडकळिस येणार हेच आमचे भाकित. (वेगाने म्हणजे किती वेगाने, कशा पद्ध्तीने हे मात्र गुलदस्त्यात)
प्रकाश घाटपांडे

वाटा

मला वाटते पुरुषांच्या यशामध्ये त्यांच्या बायकांचा मोठा वाटा असतो.

हा वाटा प्रामुख्याने कारकिर्दीत ढवळाढवळ न करणे स्वरूपाचा असावा. पुरुषांना ते करणे जमत नसल्याने (किंबहुना त्यांना ते अपेक्षितही वाटत नसल्याने) स्त्रियांच्या यशात त्यांचा वाटा दिसत/ असत नसावा आणि म्हणूनच नंदन यांची टिप्पणी योग्य वाटते.

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

सहमत

पूर्णपणे सहमत.
प्रकाश घाटपांडे

मोजून बघावे लागेल, पण स्त्री-पुरुष भेद आहे वाटते

'...आपापल्या क्षेत्रांत स्वयंपूर्ण कर्तृत्वाने गाजलेल्या ... बहुतेक बायका या अविवाहित, परित्यक्त्या, घटस्फोटित, विधवा वा पुनर्विवाहित आहेत.'
मला इतकेच म्हणायचे आहे की हाच निष्कर्ष पुरुषांनाही लावता येणार नाही का?

असे वाटत नाही. पटकन डोळ्यांसमोर येतात त्यांच्यापैकी अनेक टॉपचे पुरुष विवाहित आहेत. पण खरे म्हणजे मोजावे लागेल. काही बायका "परित्यक्ता" असतात, तशा प्रकारे कोणी पुरुषाला "परित्यक्त" म्हणत नाही हीदेखील एक सामाजिक टिप्पणी आहे.
वरील वाक्यात "परित्यक्त्या, घटस्फोटित, विधवा" आणि "पुनर्विवाहित" हे वेगवेगळे काढले आहे ते आपल्या समाजाचे स्त्रियांसाठी खास आहे.

पुरुषाकडे आपण बिजवर असला तर कधी "विधुर" किंवा "घटस्फोटित" होता हे मुख्य लक्षण मानत नाही. तो आपल्या डोळ्यांसमोर पुनर्विवाहित पेक्षा "विवाहित" असतो.

परित्याग, घटस्फोट, वैधव्य आल्यावर बहुतेक स्त्रिया एकट्या राहातील अशी आपली गर्भित (सामाजिक) अपेक्षा असते. अपवादाने पुन्हा लग्न करते.
"बायको पळून गेल्यावर", तिला घटस्फोट दिल्यानंतर, किंवा पहिली बायको वारल्यानंतर पुरुष बहुधा दुसरे लग्न केलेलाच सापडेल अशी आपली गर्भित (सामाजिक) अपेक्षा असते. अपवादानेच एकटा राहातो.

त्यामुळे तेच निरीक्षण पुरुष आणि स्त्रिया दोघांना समसमान लागू आहे असे मला वाटत नाही.

सुंदर आढावा

मराठी साहित्यातील स्त्री-वादाचा आढावा घेणारा प्रतिसादात्मक लेख आवडला. यामागचा मराठी साहित्याचा व्यासंग वाचताना जाणवतो. शेवटचे वाक्य आशावादी आहे, आणि म्हणूनच विशेष आवडले. अशाच प्रकारचे धीट आणि वेगळ्या वाटेवरचे लेखन भविष्यातही वाचायला मिळेल अशी आशा आहे.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

हेच म्हणतो !

नंदनसेठ,
मराठी साहित्यातील स्त्री-वादाचा आढावा घेणारा प्रतिसादात्मक लेख आवडला.
मराठी साहित्यातील याच विचारावरुन आम्ही चर्चा प्रस्ताव टाकलेला होता, आपला लेख अगोदर आणि मग आमचा चर्चाप्रस्ताव असे त्याचे स्वरुप असते तर उपक्रमावरील लेखांना आणि चर्चा प्रस्तावाला चार चांद
(दुसरा शब्द सुचला नाही ) लागले असते !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

असेच

यामागचा मराठी साहित्याचा व्यासंग वाचताना जाणवतो. शेवटचे वाक्य आशावादी आहे, आणि म्हणूनच विशेष आवडले. अशाच प्रकारचे धीट आणि वेगळ्या वाटेवरचे लेखन भविष्यातही वाचायला मिळेल अशी आशा आहे.

असेच म्हणायचे आहे.

हेच

अगदी हेच म्हणतो.

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

अभिनंदन!

नंदनने मालती बेडेकर, मेघना पेठे, कविता महाजन यांच्याबद्दल पूर्वीच लेखन केल्याने त्याच्याकडून प्रतिसाद/ लेखाची अपेक्षा होतीच म्हणून अक्कल पाजळायची गरज मला वाटली नाही. ;-) अभिनंदन नंदनचे आणि त्याला हा लेख येथे टाकण्यास प्रवृत्त केल्याबद्दल बिरुटेसरांचेही.

नंदनने दिलेला लेख वाचला. तोही पटण्याजोगाच आहे.

'अलीकडच्या इतिहासातल्या कितीतरी टॉपला गेलेल्या आणि आपापल्या क्षेत्रांत स्वयंपूर्ण कर्तृत्वाने गाजलेल्या बायका या सगळ्यांचं मॅरिटल स्टेटस लक्षात घेतलं तर एक गोष्ट जाणवते -- यातल्या बहुतेक बायका या अविवाहित, परित्यक्त्या, घटस्फोटित, विधवा वा पुनर्विवाहित आहेत. हा निव्वळ योगायोग वा अपघात नाही, तर लग्नसंस्थेवरची झणझणीत टिपणी म्हणून याकडे बघता येईल.' असं एक निरीक्षण आहे.

हे सर्वसाधारण निरीक्षण जगात सर्वत्रच लागू असावे असे वाटते. अगदी कालची गोष्ट सांगायची तर, ऑक्टोबरमध्ये मुलीची ३ दिवस 'स्विमिंग मीट' (पोहोण्याच्या शर्यती) आहे. त्यासाठी प्रत्येक कुटुंबाला १५ तास (३ शिफ्ट्स) स्वयंसेवा करणे भाग आहे. ते नाही केले तर $५० प्रति पाळीप्रमाणे $१५० दंड भरावा लागतो. खालील संवाद आम्हा तीन बायकांमध्ये झाला. पैकी, मी आणि डेब्रा घरी असतो.

डेब्रा: मी दोन शिफ्ट्ससाठी रेजीस्टर केले. तिसरी शिफ्ट नवर्‍याला म्हटलं तू कर. तर वैतागून आधी नाही म्हणाला. मी म्हटलं दोन मुलं, घर सांभाळून इथे १५ तास कशी राहू शकते? तू एक शिफ्ट घ्यायला कां कू तरी करू नकोस, तेव्हा कुरबुरत का होईना तयार झाला.

मी : मलाही दोन शिफ्टना रेजीस्टर करावं लागेल. नवर्‍याला अद्याप विचारायचे आहे पण त्याची प्रतिक्रिया तुझ्या नवर्‍यापेक्षा वेगळी असेल असे वाटत नाही.

तिसरी स्त्री (नाव माहित नाही): मला त्या आठवड्यात इतकं काम असणार आहे. (म्हणजे नोकरी करत असावी.) त्यावर ही मीट! पण दोन शिफ्टस् माझ्याच गळ्यात येणार. पूर्वानुभव आहे.

आजचे पुरुष घरात मदत करत नाहीत असे नाही. त्यांना बायकांचे प्रश्न कळत नाहीत असे नाही परंतु अद्यापही चाकोरीबाहेरची कामे करण्यात, तेथे बायकांना मदत करण्यात त्यांच्यात स्वयंस्फूर्ती दिसत नाही. तरीही असे म्हणावेसे वाटते की भारतीय समाजात त्यामागे कुठेतरी वर्चस्वाची भावना, बायकी कामे(?), समाज काय म्हणेल इ. चिंता दिसून येते ती पाश्चात्य समाजात कमी झालेली आढळते.

लग्नाबद्दल बोलायचे झाले तर, भारतात अद्यापही लग्न हे व्यक्तीशी न करता कुटुंबाशी केले जाते. लग्न झालेली स्त्री ही केवळ नवर्‍याशी बांधली न जाता सासू, सासरे, नणंद, दीर सर्वांशी बांधली जाते. इतक्याजणांना एकत्र सांभाळायचे/ सहन करायचे दडपण तिच्यावर येत असेल ही सहज कल्पना मान्य करताना अनेकांना त्रास होतो हे जाणवते. आपल्या सासू-सासर्‍यांची सोडा परंतु आपल्या आईवडिलांची काळजीही बायकोने उचलावी असे सोपे गणित मांडतानाच आजचे पुरुषही दिसतात. एक निरीक्षण सांगायचे झाले तर "बाईने तडजोड केली तर बिघडले कोठे?" हे वाक्य पुरुष अद्यापही मोठ्या संख्येने बोलताना आढळतात. यात चुकीचे असे काहीच नाही पण हे वाक्य ती स्त्री (स्वतः) सोडून इतरांनी बोलणे अनावश्यक वाटते.

अशा दडपणातून बाहेर पडलेल्या, घुसमट असह्य झाल्यावर बंडखोर लेखन करणार्‍या स्त्रियाच साहित्य विश्वात प्रामुख्याने दिसतात. इतर स्त्रिया फारच जपून आपल्या आयुष्याला, कुटुंबाला, प्रतिष्ठेला धक्काही लागणार नाही याची पुरेपुर काळजी घेऊन चाकोरीबद्ध लेखन करताना आढळतात.

वरील प्रतिसादात पुरुषांचे सर्वसामान्यिकरण करण्याचा हेतू नाही. तसे झाले असल्यास क्षमस्व!

खरं आहे पण.....

आजचे पुरुष घरात मदत करत नाहीत असे नाही. त्यांना बायकांचे प्रश्न कळत नाहीत असे नाही परंतु अद्यापही चाकोरीबाहेरची कामे करण्यात, तेथे बायकांना मदत करण्यात त्यांच्यात स्वयंस्फूर्ती दिसत नाही.

मलाच उद्देशून लिहिल्यासारखं वाटतं बॉ! उगाच खोट कशाला बोला!

तरीही असे म्हणावेसे वाटते की भारतीय समाजात त्यामागे कुठेतरी वर्चस्वाची भावना, बायकी कामे(?), समाज काय म्हणेल इ. चिंता दिसून येते

नाही हो हे काहींच्या बाबतीत खर आहे. पण सर्वांच्याच बाबतीत नाही. काही पुरुष आळशी व अल्पसंतुष्टी पण असतात माझ्यासारखे.

अवांतर- स्वतःवर हे ओढवून घेतल्यामुळे जरा गोचीच् झालीयं!

प्रकाश घाटपांडे

धन्यवाद

आपल्या प्रतिक्रियांबद्दल मनःपूर्वक आभार.

माझे रामायण ले. दत्तो आप्पाजी तुळजापूरकर

माझे रामायण- दत्तो आप्पाजी तुळजापूरकर" alt="right">
माझे रामायण

संक्षिप्त आवृत्ती मार्च १९६२
संपादिका - सुशीलाबाई धनेश्वर
प्रकाशक- व्हीनस प्रकाशन
पृष्ठे १५४ मूल्य- १५/-
मूळ आवृत्ती मी एकदा पाहिली होती. काळ हा १९२० पूर्वीचा असावा. या पुस्तकात फलज्योतिषचिकित्सेवर एक प्रकरण आहे म्हणून माझ्या वाचनात. अन्यथा मी एवढा सराईत वाचक नाही. अप्रतिम पुस्तक आहे. पुरुषाने केलेले स्त्री चे आत्मकथन असा काहीसा प्रकार आहे. उपोत्घात, जन्मकांड ,सुंदरकांड अरण्यकांड व युद्धकांड अशा भागात हे पुस्तक आहे. यातील "वाहवारे मामंजी " हे प्रकरणातील सासरा - सून विषयकांड मूळातून वाचण्यासारखे आहे. यातील स्त्रीवाद वाचण्यासारखा आहे. पुस्तक अर्थातच दुर्मिळ, पण अत्यंत दुर्मिळ नसावे. नंदनला वाचायला आवडेल.
प्रकाश घाटपांडे

 
^ वर